योग्य प्रकारे पाणी व्यवस्थापन करून वाढवा अन्नधान्याच्या पिकांची उत्पादकता


जास्त उत्पादन देणार्‍या सुधारित वाणांचा वापर, जमिनीची योग्य मशागत, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि पीक संरक्षण या पाच घटकांचा पीक उत्पादन वाढीशी सरळ संबंध आहे. सर्व घटकांचा योग्य प्रकारे अवलंब करून कुठल्याही अन्नधान्याच्या पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळविणे शक्य होते. या पाच घटकांचा पीक उत्पादन वाढीत समान वाटा ग्रहितधरल्यास प्रत्येक घटकाच्या अवलंबनामुळे साधारणपणे पीक उत्पादनामध्ये प्रत्येकी 20 टक्के वाढ होणे अपेक्षित असते. त्यानुसार पाणी व्यवस्थापन या एकट्या घटकाचा विचार करता कोरडवाहू क्षेत्रात घेतलेल्या पिकाची उत्पादकता आणि बागायती क्षेत्रात घेतलेल्या पिकाची उत्पादकता यामध्ये जवळपास दुपटीने फरक दिसून येतो.

वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन वाढविणे, उत्पादनाची प्रतवारी उच्च दर्जाची राखणे आणि अन्नधान्याचे वितरण योग्य प्रकारे करणे हे अन्नसुरक्षेतील महत्वाचे घटक आहेत. उत्पादित अन्नधान्याचे वितरण हा वेगळ्या यंत्रणेचा भाग असून अन्नधान्याच्या पिकांची उत्पादकता वाढविणे आणि त्याची प्रतवारी चांगली मिळविणे हे कृषी शास्त्रज्ञांसमोरील मोठे आव्हान आहे.

अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत आपण चांगली प्रगती केली असली तरी अनेक पिकांच्या बाबतीत सरासरी उत्पादकता देशाच्या उत्पादकतेच्या जवळपास निम्मी आहे. तसेच महाराष्ट्रातील ओलीत क्षेत्र 16.4 टक्के असून हे क्षेत्रही देशाच्या ओलीत क्षेत्राच्या (39 टक्के) तुलनेत निम्म्याहूनही कमी आहे. अन्नसुरक्षेच्या दृष्टीने विचार करता अन्नधान्याची उत्पादकता 5 ते 6 टन प्रति हेक्टर साध्य करणे गरजेचे असून पाणी व्यवस्थापनाच्या आधुनिक तंत्राचा अवलंब केल्यास महाराष्ट्रातील ओलीत क्षेत्र 34.33 टक्क्यांपर्यंत वाढवणेही शक्य आहे. मात्र अन्नधान्याच्या पिकासाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी त्यासंबंधीच्या वेगवेगळ्या बाबींचा पाणी व्यवस्थापनात अंतर्भाव करणे आवश्यक आहे. यामध्ये जमिनीचे सपाटीकरण जमीन-पीक-पाणी यांचा परस्पर संबंध, हवामान विषयक बाबी, रानबांधणी, जमिनीची योग्य मशागत, पिकांच्या पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्था, पाणी देण्याच्या आधुनिक पध्दतींचा अवलंब या सर्व गोष्टींचा अंतर्भाव होतो. या सर्व बाबींचा एकात्मिकरित्या वापर करून बागायती क्षेत्रातील अन्नधान्याच्या पिकांचे जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे गरजेचे आहे.

पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी जमिनीचे सपाटीकरण :


उंचखोल किंवा अति उताराच्या जमिनीत पिकास सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात पाणी बसत नाही. उंचवट्यावरील पिकाची वाढ खुंंटते आणि सखल भागातील पिके पिवळी पडतात. जमिनीस प्रमाणापेक्षा जास्त उतार असला तर उताराच्या दिशेने पाणी वेगाने वाहून जाते. पर्यायाने जमिनीची धूप होवून पाण्याचाही मोठ्या प्रमाणात नाश होतो. जमीन एकदम सपाट असेल व तिला कोणत्याही दिशेने अजिबात उतार नसेल तरी सुध्दा जमिनीत पाणी पुढे सरकण्याची गती प्रमाणापेक्षा जास्त मंद होते आणि त्यामुळे पाणी जमिनीत जरूरीपेक्षा जास्त खोलवर मुरते, परिणामी पाण्याचा फार मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. म्हणून पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी उंचसखल भाग नाहिसा करून त्यास ठराविक दिशेने योग्य उतारासह आकार देणे गरजेचे असते.

जमिनीच्या प्रकारानुसार पिकास योग्य प्रमाणात पाणी देण्यासाठी पाणी देण्याच्या दिशेने भारी जमिनीत 0.25 टक्के व मध्यम ते हलक्या जमिनीत 0.20 ते 0.40 टक्के उतार ठेवावा व जमिनीच्या सपाटीकरणानंतर सरीे अथवा सर्‍यांची लांबी भारी जमिनीत 150 ते 200 मिटर, मध्यम जमिनीत 100 ते 150 मिटर तर हलक्या जमिनीत 60 ते 100 मिटरपर्यंत ठेवावी.

जमीन, पाणी व पिक यांचा परस्पर संबंध :


पिकाच्या योग्य वाढीसाठी जमीन, हवा व पाणी यांच्या संतुलनाची गरज असते. जमिनीत सेंद्रीय पदार्थाबरोबर घन पदार्थांची टक्केवारी 40 ते 50 राहून बाकीची उरलेली पोकळी पाणी व हवेने व्यापलेली असते. पिकांची कार्यसाधक मुळे जमिनीत जिथपर्यंत परसरलेली असतात तिथपर्यंतचाच ओलावा पिकास उपयोगी पडतो. खोल आणि अतिखोल जमिनीत एकूण उपलब्ध पाण्याचे प्रमाण जास्त असते व हलक्या, उथळ जमिनीत एकूण उपलब्ध पाण्याचे प्रमाण कमी असते. जमिनीतील एकूण उपलब्ध पाण्यापेकी सर्वसाधारणपणे 40 ते 60 टक्के पाणी पिकाला सहजरित्या उपलब्ध होते. अशा रितीने मध्यम ते भारी जमिनीत 80 ते 120 मि.मी. तर हलक्या जमिनीत 40 ते 80 मि.मी. पाणी पिकाला उपलब्ध होते.

पिकास प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिले तर जमीनी पानथळ, क्षारयुक्त व चोपण होवून पीक वाढीवर विपरित परिणाम होतो. अशा जमिनीत प्राणवायू योग्य प्रमाणात मिळत नसल्यामुळे बियांची उगवण कमी होते, उगवलेल्या पिकांची पाणी व अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणार्‍या जिवाणूंची क्रियाही मंदावते. जमिनीत क्षारांचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त झाल्यास वनस्पतीची मुळे जळून जातात. याउलट पिकास कमी पाणी दिल्याने पिकांना लागणारी मुलद्रव्ये कमी प्रमाणात उपलब्ध होतात, त्यांचे शोषणही कमी होते त्यामुळे मुळांची वाढ खुंटते पर्यायाने पीक उत्पादन घट होते. या सर्व गोष्टी लक्षात घेवून पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार योग्य मात्रेत पाणी पुरवठा करणे गरजेचे असते वाढीसाठी व पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी हलक्या जमिनीत 4 ते 6 सें.मी. मध्यम जमिनीत 6 ते 8 सें.मी व भारी जमिनीत 8 ते 10 सें.मी. उंचीचे पाणी पिकास प्रत्येक पाळीत द्यावे.

पाणी व्यवस्थापनात हवामान विषयक बाबींचा उपयोग :


पाणी व्यवस्थापनात हवामान विषयक बाबींचा उपयोग पिकाला पाणी कधी द्यावे याकरिता करता येतो. पिकाची पाण्याची गरज व दोन पाण्याच्या पाळ्यांतील अंतर ही पीक क्षेत्रातील जमिनीवरून होणार्‍या पाण्याच्या बाष्पीभवनावरून ठरविता येते. सर्वसाधारणपणे पावसाळ्यात 6 .मि.मी हिवाळ्यात 3 ते 4 मि.मी. व उन्हाळ्यात 8 ते 10 मि.मी. प्रतिदिन एवढा बाष्पीभवनाचा वेग असतो. त्यानुसार पावसाळ्यात 13 ते 14 दिवसाच्या अंतराने, हिवाळ्यात 18 ते 20 दिवसाच्या अंतराने तर उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पिकास जमिनीच्या प्रकारानुसार योग्य मात्रेत पाणी द्यावे.

पिकांना पाणी देण्यासाठी योग्य रानबांधणीचा अवलंब :


जमिनीची रानबांधणी केल्याने पिकास योग्य प्रकारे, समप्रमाणात पाणी देणे शक्य होते. जमिनीची रानबांधणी करण्यापूर्वी त्या जमिनीचा उतार किती टक्के आहे हे जाणून घेणे महत्वाचे असते कारण उतारानुसार रानबांधणी करणे योग्य ठरते. जमिनीचा उतार 0.2 ते 0.4 टक्के असल्यास सर्‍यांची लांबी भारी जमिनीत 150 - 200 मिटर मध्यम जमिनीत 100- 150 मिटर तर हलक्या जमिनीत 60-100 मिटरपर्यंत ठेवावी. जमिनीचा उतार 0.6 टक्के असल्यास भारी जमिनीत 90 मिटर, मध्यम जमिनीत 70 ते 80 मिटर तर हलक्या जमिनीत 50 ते 60 मिटर एवढी सर्‍यांची लांबी ठेवावी. सर्‍यांची रूंदी 2.5 ते 3 मिटर पेक्षा जास्त असू नये. जमिनीचा उतार 0.6 ते 1 टक्क्याच्या दरम्यान असल्यास सर्‍यांऐवजी 10 X 4.5 मिटर आकाराचे वाफे तयार कराव्यात. सर्‍यात पाण्याचा प्रवाह 6 ते 9 लिटर तर वाफ्यात 6 लिटर प्रति सेकंद असावा.

अशा प्रकारे जमिनीच्या उतारानुसार योग्य प्रकारे रानबांधणी केल्यास पिकास पाणी समपातळीत बसून पाण्याचा अपव्यय टाळता येतो तसेच पिकापासून हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादनही मिळवता येते.

जमिनीची योग्य मशागत :


बागायती अन्नधान्याच्या पिकाचे हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने मशागतीच्या योग्य पध्दतीचा अवलंब करणे गरजेचे असते. जमिनीच्या पूर्वमशागतीबरोबरच पिकास पाणी दिल्यामुळे पिकाबरोबर तणांची होणारी वाढ आंतरमशागत करून थांबवणे गरजेचे असते. किंबहुना पिकात वारंवार खुरपणी, कोळपणी करून पिकाचे संपूर्ण क्षेत्र तणविरहीत ठेवण्याच्या तसेच जमिनीत हवा खेळती ठेवण्याच्या दृष्टीने महत्वाचे असते.

अन्नधान्याच्या पिकांना पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्था :


जास्त उत्पादन देणार्‍या सुधारित वाणांचा वापर, जमिनीची योग्य मशागत, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि पीक संरक्षण या पाच घटकांचा पीक उत्पादन वाढीशी सरळ संबंध आहे. सर्व घटकांचा योग्य प्रकारे अवलंब करून कुठल्याही अन्नधान्याच्या पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळविणे शक्य होते. या पाच घटकांचा पीक उत्पादन वाढीत समान वाटा ग्रहितधरल्यास प्रत्येक घटकाच्या अवलंबनामुळे साधारणपणे पीक उत्पादनामध्ये प्रत्येकी 20 टक्के वाढ होणे अपेक्षित असते. त्यानुसार पाणी व्यवस्थापन या एकट्या घटकाचा विचार करता कोरडवाहू क्षेत्रात घेतलेल्या पिकाची उत्पादकता आणि बागायती क्षेत्रात घेतलेल्या पिकाची उत्पादकता यामध्ये जवळपास दुपटीने फरक दिसून येतो. याचाच अर्थ असा की, केवळ पिकासाठी पाण्याचा वापर केल्याने पिकाची उत्पादकता 20 टक्क्यापेक्षा जास्त मिळते. अशा परिस्थितीमध्ये पाणी आणि अन्नसुरक्षा यांचे एकमेकांशी अतुट नाते असून अन्नधान्याच्या पिकासाठी योग्य प्रकारे पाणी व्यवस्थापन अन्नसुरक्षा साधण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

सम्पर्क


डॉ.कल्याण देवळाणकर, वैज्ञानिक संशोधक गहू विस्तार केंद्र निफाड

Path Alias

/articles/yaogaya-parakaarae-paanai-vayavasathaapana-karauuna-vaadhavaa-ananadhaanayaacayaa

Post By: Hindi
×