दि.27.12.2007 रोजी जागतिक बँकेचे ब्राझील येथील प्रतिनिधी श्री. जॉन ब्रिस्को यांनी संघास भेट देऊन सर्व पाणी वापर संस्थांशी संवाद साधला. प्रत्यक्ष शेतावर जाऊन लाभार्थी शेतकऱ्यांशी चर्चा केली एक्सपोर्ट शेतीमालाविषयी चर्चा केली. व चारी कामाच्या पुनर्स्थापना कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. या सर्व उपक्रमांनी प्रभावित होऊन पुन्हा एकदा येऊन संवाद साधण्याचे आश्वासन दिले व संघाच्या कामकाजाबद्दल व वाटचालीबद्दल गौरवउद्गार काढले.
सन 1991 पासून वाघाड उजव्या कॅनालवर ओझरच्या कार्यक्षेत्रात सहकारी पाणी वापर सोयायट्या स्थापन करण्याची चळवळ कै.बापूसाहेब उपाध्ये, भरत कावळे, रामनाथ वाबळे, कै.राजाभाऊ कुलकर्णी यांनी चालू केली. पुढे ती चळवळच होऊन संपूर्ण वाघाडच्या उजव्या आणि डाव्या कॅनालवर एकंदरीत 24 तास पाणी वापर सह. संस्था स्थापन झाल्या. या सर्व संस्था एकत्रीत येऊन संपूर्ण सिंचनाचे पाण्याचे नियोजन करत व संपूर्ण रब्बी हंगामातील पाणी बचत करून उन्हाळ्यात वापरत असे. कै.बापूसाहेब उपाध्ये आम्हाला नेहमी म्हणत आपण सर्वांनी आता धरणाचे मालक होऊन शेतकऱ्यांनी सिंचनाचे पाणी ताब्यात घ्यावे. आणि तो दिवस प्रत्यक्षात उजाडला दिनांक 1 नोव्हेंबर 2004 रोजी. महाराष्ट्र शासन पाटबंधारे खात्याचे राज्यमंत्री मा.ना.श्री. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रितसर वाघाड धरण-स्थळी संघाकडे संयुक्त पाणी नियोजन हस्तांतरीत झाले.या एक वर्षाच्या कालावधीत संघाने भरपूर अनुभव घेतला. पाण्याचे योग्य नियोजन केले. या काळात तत्कालीन पाटबंधारे खात्याचे सचिव मा.श्री. सोडल साहेब यांनी प्रत्यक्ष वाघाड कॅनालला दिनांक 5.12.2003 रोजी पाहणी करून प्रत्यक्ष कॅनाल लिकेज पाहिले व अधिकाऱ्यांना व मॅकॅनिकल विभागाला सूचना केल्या. संघाच्या दुसऱ्या वर्षी (2004-05) अतिशय काटकसरीने नियोजन करून 4 + 2 असे सहा रोटेशन एकूण रब्बी व उन्हाळा हंगाम मिळून करता आले.
संघाच्या तिसरे वर्ष म्हणजे 2005-06 साली वाघाड प्रकल्पास भारत सरकारचा राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कार पाण्याचे योग्य नियोजन व एकूण उत्पन्नात वाढ यासाठी तो पुरस्कार मिळाला.
या हंगामात संघाने योग्य पाणी नियोजन सर्व सहकारी संस्थांना विश्वासात घेऊन केले. त्यामुळे रब्बी व उन्हाळा मिळून 7 रोटेशन (4 + 3) करता आले. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र शासन जलसंपदा खात्याने 24.11.2005 रोजी संघाशी अंतिम करार करून संपूर्ण सिंचनाचे पाण्याचे करार केले आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री, जागतिक बँकेचे प्रतिनिधी तसेच जलसंपदामंत्री, सचिवसाहेब तसेच प्रकल्पावरील सर्व संस्थांचे 300 ते 400 प्रतिनिधी जलदिंडी घेऊन गेले होते. तो एक एैतिहासिक सोहळा होता. सन 2006-07 साली हातनोरे गावाजवळील मोठा स्लॅबड्रम 1 ऑक्टोबरला अतिवृष्टीत कोसळला. त्यामुळे 1 नोव्हेंबर पासून सुरू होणारे रब्बीतले आवर्तन स्लॅब बांधकाम होईपर्यंत उशिरा सुरू झाले त्यामुळे अहवाल सालात 3 + 1 व उन्हाळा हंगामात दोन रोटेशन देण्यात आले. परंतु काही संस्थांना उन्हाळ आवर्तन क्र.2 मध्ये पाणी कमी देता आहे.
याच अहवाल सालात महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम 2005 ची अधिसूचना (कायदा) लिहून प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली. नवीन कायद्यानुसार सर्व पाणी वापर संस्थांच्या निवडणुका पुन्हा नव्याने नवीन कायद्यानुसार कार्यकारी अभियंतासाहेब यांच्या देखरेखीखाली पार पाडल्या व सर्व संस्थांनी बिनविरोध निवडणुका करून एक नवा आदर्श निर्माण केला. शासनाने पण बिनविरोध निवडणुकांचे अनुदान देऊन आदर्श प्रोत्साहन दिले. तसेच या अहवाल सालात महाराष्ट्र जलसुधार-प्रकल्पांतर्गत वाघाड उजवा व डावा दोन्ही कॅनालचे पुनर्स्थापना अंतर्गत कामे चालू झाली. या कामांना व संघास जागतिक बँकेचे जलसुधार प्रकल्पाचे मायकल कार्टर यांनी भेटी दिल्या.
सन 2007-08 या अहवाल सालात पाटांचे व चाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर जलसुधार पुनर्स्थापना कार्यक्रमातंर्गत कामे चालू झाली. या अहवाल सालात संघाने 3 + 3 = 6 रब्बी व उन्हाळ पाणी देऊन सिंचन केले आहे. या अहवाल सालात पाणी वापर संस्थांनी पुनर्स्थापना कामाच्या लाभार्थी हिस्सा 200/- रूपये प्रमाणे प्रति हेक्टरी संस्थांची सभासद वर्गणी भरली आहे. उर्वरित 300/- रूपये हेक्टर प्रमाणे गाळ गवत काढण्याचे कामे केली आहे. असे एकूण संस्थांनी लाभार्थी सभासद हिस्सा म्हणून 500 /- रूपये प्रति हेक्टर प्रमाणे आपला सहभाग एकूण 23 पाणी वापर संस्थांनी 19,28,400/- ची सहभाग वर्गणी शासनाची भरली आहे.
सिंचन परिषदेत सक्रिय सहभाग :
मा.कै.श्री.बापू उपाध्ये यांंचे स्मृतीप्रित्यर्थ पाणी वापर संस्था सक्षमीकरण या विषयावर महाराष्ट्र राज्याची पाणी परिषद नाशिक येथे राजमाता मंगल कार्यालय येथे दिनांक 29.2.2008 रोजी समाज परिवर्तन केंद्र ओझर (नाशिक) तसेच वाघाड प्रकल्प पाणी वापर संस्थांचा संघ मर्या. मोहाडी व पालखेड पाटबंधारे विभाग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. त्या परिषदेला पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी असे 740 प्रतिनिधी, शासनाचे प्रतिनिधी म्हणून जलप्राधिकरणाचे सचिव श्री.सुरेश सोडल, श्री.गवळे श्री. म.वि.पाटील, श्री. इश्वर चौधरी उपस्थित होते. या परिषदेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला, पाणी वापर संस्थांची सद्यस्थिती व त्यापुढील आव्हाने यावर सखोल चर्चा होऊन ठराव करण्यात आले व ते शासनास पाठविण्यात आले. त्यानंतर शासनाने सकारात्मक निर्णय घेतले.
जागतिक बँक पथक पाहणी दौरा :
दिनांक 11.12.2007 रोजी वर्ल्ड बँक सेक्टर ऑफिसर मिसेस स्टेन्शन्स बर्नाड व केंद्राचे टीम लिडर श्री.पाठक साहेब यांनी संघास व जलसुधार प्रकल्पांच्या कामांना भेट देऊन पाहणी केली व संघाच्या कार्यक्षेत्रात झालेली प्रगती पाहून समाधान व्यक्त केले.
दि.27.12.2007 रोजी जागतिक बँकेचे ब्राझील येथील प्रतिनिधी श्री.जॉन ब्रिस्को यांनी संघास भेट देऊन सर्व पाणी वापर संस्थांशी संवाद साधला. प्रत्यक्ष शेतावर जाऊन लाभार्थी शेतकऱ्यांशी चर्चा केली एक्सपोर्ट शेतीमालाविषयी चर्चा केली. व चारी कामाच्या पुनर्स्थापना कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. या सर्व उपक्रमांनी प्रभावित होऊन पुन्हा एकदा येऊन संवाद साधण्याचे आश्वासन दिले व संघाच्या कामकाजाबद्दल व वाटचालीबद्दल गौरवउद्गार काढले.
राष्ट्रीय पातळीवरील हैद्राबाद येथील कार्यशाळा :
डिसेंबर 2007 रोजी हैेद्राबाद येथे राष्ट्रीय पातळीवरील पाणी वापर संस्थांच्या राष्ट्रीय कार्यशाळेस डॉ.श्री.संजय बेलसरे, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, उपअभियंता श्री.बाळासाहेब काथेपुरी व संघाचे अध्यक्ष श्री.शहाजी सोमवंशी तसेच महात्मा फुले पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष श्री. गोवर्धन कुलकर्णी व योगेश्वर पाणी वापरचे रामनाथ वाबळे यांनी सहभाग घेऊन पेपर वाचन केले, लेख सादर केले. राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा घेवून सर्वांनी वाघाडच्या यशस्वी प्रयोगाची प्रशंसा केली.
जलसंपदा सचिवाची भेट :
दि.23.7.2008 रोजी राज्याचे सचिव मा.श्री.व्यंकटराव गायकवाड यांनी वाघाड संघास प्रत्यक्ष भेट देऊन संघाच्या कार्याची पाहणी केली. तसेच विविध पाणी वापर संस्थांना भेटी दिल्या. त्यांच्या हस्ते श्रीकृष्ण पाणी वापर संस्था, पाडे व कै.रं.गो. पाटील पाणी वापर संस्था, वलखेडे यांच्या स्वमालकीच्या कार्यालयाचे उद्घाटन केले व वाघाडीवरील सर्व पाणी वापर संस्थांविषयी त्यांनी प्रशंसोदगार काढले व राज्याच्या पाणी धोरणाला दिशा देणारा प्रकल्प म्हणून कौतुक केले. पाणी वापर संस्थांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी लवकरात लवकर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
जलसाहित्य संमेलनात वाघाड :
दि.16 व 17 फेब्रुवारी रोजी गोखले एज्युकेशन सोसायटी व नाशिक एज्युकेशन सोसायटी यांनी आयोजित केलेल्या जलसाहित्य संमेलनात संघाने मोलाचा सहभाग घेऊन उपस्थितांना वाघाडच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची माहिती दिली.
जलदेवतेचे पूजन :
वाघाड संघ दरवर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरण स्थळी जलदेवतेचे पूजन करण्याची सर्व पाणी वापर संस्था व सर्व अधिकारी एकत्र येऊन जलपूजन करतात व सुसंवाद बेठक घेऊन विचारविनिमय करतात. ही प्रथा नित्यनेमाने पार पाडण्यात येते.
पाणीपट्टीचा 100 टक्के भरणा :
शासकीय पाणीपट्टीचा आतापर्यंतचा म्हणजे सन 2008-09 पर्यंतचा पाणीपट्टीचा भरणा शासनास अदा केला आहे.
अहवाल सालातील मिटींगा / उपक्रम चर्चासत्रे :
अहवाल सालात कार्यकारी मंडळाच्या सर्वसाधारण प्रतिमासिक एक किंवा द्विमासिक एक तसेच सर्व पाणी वापर संस्था प्रतिनिधीच्या किमान 5 ते 6 बैठका घेऊन त्यात मार्गदर्शन आढावा, धोरण, वसुली इ. बाबत मार्गदर्शन नियमीत केले जाते. विविध कार्यशाळा वाल्मी संस्था औरंगाबाद, कृषी चर्चासत्रे, विविध उपक्रमे राबविले जातात.
सन 2008-09 चा वार्षिक अहवाल :
महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा 2005 च्या 17 (1) अन्वये नव्याने नोंदणी दिनांक 9.9.2008 या साली वाघाड संघाची पूर्वी 1960 च्या सहकार कायदा कलम 9 (6) अन्वये असलेली नोंदणी रद्द होऊन वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था मोहाडी म्हणून नव्याने कार्यान्वित झाली. या नवीन कायद्यानुसार 3.10.2008 रोजी नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले. ही सर्व प्रक्रिया सभासद संस्थांनी सहकार्य करून बिनविरोध पार पाडून एक आदर्श निर्माण केला.
वाघाड प्रकल्पस्तरीय संस्थेचे संगणकीरण :
प्रकल्पस्तरीय संस्थेने आपल्या दैनंदिन कामकाजासाठी व संस्थेला आपली दैनंदिन माहिती संकलित करण्यासाठी व ती तात्काळ उपलब्ध होण्यासाठी आधुनिक काळाची गरज म्हणून संस्थेने संगणक खरेदी केलेला असून संस्थेने स्वत:च्या पत्र व्यवहारासाठी इमेल आयडी नंबर inf@waghadproject.org घेतला आहे. तसेच संकेतस्थळ (Website) सुरू केले आहे. त्याची लिंक www.waghadproject.org संस्थेने इंटरनेट सुविधा चालू केलेली आहे. त्यामुळे हवामान, बाजार भाव, पिके, खते-औषधी निर्यात संस्था इ. माहितीची सेवा देता येते व घेता येते.
पाणी वापर :
सन 2008-09 या अहवाल सालात संस्थेने रब्बीत 3 व उन्हाळ 2 आवर्तने सभासद संस्थांना व उचल पाणी वापर करणाऱ्या संस्थांना, शेतकऱ्यांना पाणी पुरवठा केला आहे. प्रत्यक्ष चारी मुखाशी संस्थांना 511 द.ल.घ.फु. पाणी वापर झाला आहे. एकूण धरणातून 1345 द.ल.घ.फु. पाणी घेतले आहे. उचल संस्था, शेतकरी यांचे अचूक मोजमाप नसल्याने त्यांची आकारणी क्षेत्रीय बेसीसवर आहे त्यामुळे प्रत्यक्ष लॉसेसचे प्रमाण जास्त दिसते. परंतु कॅनालचे नुतनीकरण चालू असल्याने झिरप्याचे प्रमाण वाढवले आहे तरी पण सरासरी पाण्याची ड्युटी 1.19 आलेली आहे. लॉसेसचे प्रमाण कामे पूर्ण झाल्यानंतर 20 ते 25 टक्के पर्यंत खाली येऊन अजून रब्बीत 1 व उन्हाळ्यात 1 आवर्तन असे देण्यात येतील असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. (अहवाल सालात संचालक मंडळ व सभासद संस्था मिळून एकंदरीत 14 सभा घेतल्या आहेत.)
लेखापरिक्षण अहवाल :
अहवाल सालात संस्थेस ऑडीट वर्ग अ प्राप्त झाला असून संस्थेस नफातोटा पत्रकाप्रमाणे 7,09,473/- (सात लाख नऊ हजार चारशे त्र्याहत्तर रूपये) नफा झालेला आहे. संस्थेने शासनास वेळेत पाणीपट्टी अदा केल्याने शासनाने संस्थेला पाणीपट्टी परतावा नवीन कायद्याने दिल्याने सदर नफा झाला आहे.
राखीव निधी तरतूद :
संस्थेकडे आतापर्यंत रू.35,474/- रूपये निधी व इमारत निधी रू.1,11,869 /- जमा आहे. त्यात अहवाल सालात मा.श्री.व्यंकटराव गायकवाड, सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार गंगाजळीची तरतूद चालू वर्षीच्या नफ्यातून करावयाची आहे. राखीव निधी, महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा 2005 कलम 58 अन्वये एकूण पाणीपट्टीच्या 10 टक्के इतकी रक्कम रू.1,77,708/- आणि पाणी वापर संस्थेस झालेल्या नफ्याच्या 10 टक्के इतकी रक्कम रू.70,947/- मिळून 2,48,655/- राखीव निधीत वर्ग करावयाची आहे. व उर्वरित रू.4,60,818/- इमारत निधीत वर्ग करीत आहोत.
वाघाड प्रकल्प जलक्षेत्र सुधार कार्यक्रम एक दृष्टीक्षेप व पाणी वापर संस्था सहभाग :
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाने महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प कार्यक्रम अंतर्गत वाघाड जलक्षेत्रसुधार कार्यक्रमांर्तगत जागतिक बँकेच्या अर्थसाह्यातून व पाणी वापर संस्थांच्या वर्गणीतून व शासनाच्या सहकार्याने वाघाड उजवा व डावा कालवा पुनर्स्थापना कार्यक्रम तसेच दोन्ही कालव्यावरील वितरण प्रणालीचे पुनर्स्थापनेच्या कामांना सुरूवात होऊन कामे मोठ्या प्रमाणावर प्रगतीपथावर आहे. यासाठी 24 तास पाणी वापर संस्थांनी प्रति हेक्टर 200/- रू. प्रमाणे 19,17,000/- भरले आहेत. तसेच प्रति हेक्टर 300 /- रू. प्रमाणे संस्थांनी स्वत: अंदाजे 24,00,000/- रू. चे गाळ गवत झाडेझुडपे काढून भरावयाची कामे केली आहेत. निविदे प्रमाणे 20 पाणी वापर संस्थांची कामे चालू आहेत. उर्वरित 4 पाणी वापर संस्थांची कामे पावसाळा संपल्यानंतर सुरू करण्यात येत आहे. 5 संस्थांची कामे अंतिम टप्प्यात असून फक्त सिंमांकर करणे बाकी आहे.
डाव्या कॅनालचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे उजव्या कॅनालचे काम देखील 40 ते 50 टक्के प्रगतीपथावर आहे त्यामुळे कालवा वहन क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येते.
प्रकल्पस्तरीय संस्थेला व पाणी वापर संस्थेला स्वत:चे कार्यालय बांधण्यासाठी जागा उपलब्ध झाल्याने प्रकल्पस्तरीय संस्थेने प्लॅन व एस्टीमेट तयार करून पालखेड जलसंपदा विभागाला पाठविले आहे. लवकरच त्याची निविदा निधेल त्याची एस्टीमेट कॉस्ट 20,22,650/- झाली असून, शासन 85 टक्के अनुदान संस्था 15 टक्के स्वत: भरणार आहे. बऱ्याच संस्थांचे कार्यालय इमारतीचे टेंडर्स निघालेले आहे. ओझरच्या तिनही पाणी वापर संस्थांचे एकत्रीत कार्यालयाची सुंदर इमारत तयार होऊन कार्यारंभ पण केला आहे.
कृषि साहय्यता सेवा घटकांतर्गत उपक्रम :
वाघाड जलक्षेत्रसुधार प्रकल्पांतर्गत ज्याप्रमाणे पुनर्स्थापना कामे चालू आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्पांतर्गत कृषि सहाय्यता सेवा घटकांपर्यंत करारशेती प्रयोगाची व विविध खरीप व रब्बी पिके प्रात्यक्षिके चर्चासत्र, एकात्मिक कीड नियंत्रण एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन आणि द्राक्ष टोमॅटो, कांदा यांचे प्रात्यक्षिक प्लॉट, रोपवाटिका माती व पाणी नमुने तपासले. सुक्ष्मअन्नद्रव्ये व्यवस्थापन यासाठी चालू वर्षी 9 पाणी वापर संस्थांची निवड होऊन प्रत्यक्ष कार्यवाही चालू आहे.
वाल्मी, औरंगाबाद संस्था प्रशिक्षण कार्यक्रम :
वाल्मी, औरंगाबाद यांचे यांच्यामार्फत प्रत्यक्ष संस्था कार्यक्षेत्रात शेतकरी सहभागी संशोधन कार्यक्रमांतर्गत, सोनेवाडी ओझर, आवनखेड, दिंडोरी येथे एकदिवसीय वर्ग आयोजित केले होते तसेच प्रत्यक्ष वाल्मी औरंगाबाद येथे वेळोवेळी प्रशिक्षण शिबीर आयोजित करून सर्व पाणी वापर संस्थांना प्रशिक्षित केले आहे.
पाणीपट्टी भरणा व परतावा :
अहवाल सालात संस्थेने रब्बी हंगाम 2007-2008 ची पाणीपट्टी रक्कम रू.7,69,022/- पूर्ण भरली आहे. तसेच उन्हाळ हंगाम 2007-08 ची पाणीपट्टी रक्कम रू.15,77,466/- असे एकूण 23,46,488/- रू. शासनास अदा केले आहे. त्यावर संस्थेस 10,47,011/- रू. एवढा परतावा प्राप्त झाला आहे व सर्व पाणी वापर स्स्थांना रू.10,45,176/- एवढा परतावा नवीन कायद्यानुसार देण्यात आलेला आहे.
तसेच 2008-09 ची एकूण रब्बी व उन्हाळ पाणीपट्टी मिळून रू.24,40,706/- शासनास मुदतीत भरणा केला असून त्यापैकी रब्बीचा परतावा पाणी वापर संस्थेस 2,46,642/- रू. व प्रकल्पस्तरीय संस्थेस 3,41,175/- रू. प्राप्त झाला आहे. उन्हाळ परतावा शासनाकडून लवकरात लवकर येणे अपेक्षित आहे.
आजपर्यंत पालखेड पाटबंधारे विभागाची (शासनाची) कोणतीही पाणीपट्टी थकबाकी वाघाड क्षेत्रातील संस्थेकडे व प्रकल्पस्तरीय संस्थेकडे नाही.
जलपूजन व सुसंवाद बैठक :
वाघाड धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर दरवर्षी प्रकल्पस्तरीय संस्था व सर्व पाणी वापर संस्था व उचल पाणी संस्था शेतकरी नित्यनेमाने पाणीपूजन कार्यक्रम धरणस्थळी आयोजित करीत असतात. सन 2008 च्या हंगामात दि.4.10.2008 रोजी तसेच दि.12.10.2008 रोजी श्री. प्रफुल्ल झपके साहेब यांनी सपत्नीक जलपूजन केले. यावर्षीचे म्हणजे ऑक्टोबर 2009 मध्ये वाघाड धरण भरलेले आहे.
निसर्गाशी जवळीक तसेच पर्यावरणाबद्दल जागृतता आणण्यासाठी असे उपक्रम संस्था नेहमीच करत असते.
मान्यवरांचे अभिप्राय व संस्थेस भेटी :
आतापर्यंत संस्थेस देश - विदेशातील मान्यवरांनी भेटी देऊन संस्थेच्या कार्याची माहिती घेऊन संस्थेस धन्यवाद दिले आहेत. त्यात प्रामुख्याने आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील पाटबंधारे प्रकल्प अधिकारी व सेवाभावी संस्था शेतकरी यांनी भेटी दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्रातील इतर प्रकल्पावरील शेतकरी, अधिकारी, संस्थांनी भेटी दिल्या आहेत.
दि.11.12.2007 रोजी सेक्टर ऑफिसर मिस कॉन्सन्स बर्नाड व केंद्राचे टिमलिडर पाठक साहेब तसेच 27.12.2008 ला जागतिक बँकेचे ब्राझील येथील प्रतिनिधी जॉन ब्रिस्को यांनी कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला. दि.23.7.2008 रोजी जलसंपदा विभागाचे सचिव मा.व्यंकटराव गायकवाड तसेच लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे सचिव मा.एकनाथराव पाटील उभयतांनी भेट देऊन पाहणी केली.
दि.25.8.2008 रोजी डॉ.जी.व्ही. जयराम, तामिळनाडू
दि.6.9.2008 रोजी मा. एकनाथराव पाटील सचिव लाभक्षेत्र विकास प्राधिकरण मंत्रालय मुंबई
दि. 22.10.2008 रोजी ईजिप्त, इथोपिया आणि सूदान या देशातील अभियंत्यांचे शिष्टमंडळ भेट व चर्चा
दि.22.11.2008 रोजी अॅग्रो ऑयडॉल श्री. ज्ञानेश्वर बोडके, पुणे
दि.4.12.2008 रोजी श्री.यज्ञदत्त शर्मा, सचिव, सिंचन व्यवस्थापन नवी दिल्ली.
दि.27.12.2008 रोजी श्री,वैभव भामोरिया, आय.आय.एम. अहमदाबाद
दि.25.12009 श्री.शितल वाघचौरे सामाजिक कार्यकर्ता पाणी पंचायत पुणे
दि.23.2.2009 सॅम एच.जॉनसन वॉटर रिसोर्स कन्सलटंट यू.एस.ए
दि.24.2.2009 श्री.आर.एस.पाठक, चास्क फार्म, नवी दिल्ली
दि.11.3.2009 सचिव, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, ओरिसा
दि.13.3.2009 श्री.वडनेरे निवृत्त प्रधान सचिव जलसंपदा विभाग
दि.22.3.2009 श्री.सु.वा.साळुंके लेखापरिक्षण अधिकारी मुंबई
दि.22.3.2009 संचालक मंडळ, भैरवनाथ पाणी वापर संस्था, कडूस ता.खेड जि.पुणे
इत्यादी अनेक मान्यवरांनी संस्थेस भेटी देऊन आमच्या उपक्रमास शुभेच्छा देऊन प्रोत्साहित केले आहे.
नवीन उपक्रमाकडे वाटचाल (वाघाड अॅग्री.प्रोड्यूसर कंपनी लि.) :
संस्था सर्व सभासद बांधवांना पाणी वाटप करते यातून संपूर्ण वाघाडच्या लाभक्षेत्रात झालेला बदल आपणा सर्वांना परिचित आहे. भविष्यात नुसते पाणी वाटप व वापर एवढ्या सिमित कार्यात न राहता शेतकऱ्यांनी मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ व्हावी. त्यांचे राहणीमान उंचवावे या उद्देशाने त्यांच्या शेतामालाला बाजारपेठ मिळावी म्हणून वाहतूक, निर्यात उत्पादने, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक गरज पूर्ण करण्यासाठी तसेच खते, बि-बियाणे, सोडवणूक करण्यासाठी वाघाडच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकरी व संस्था यांचे मागणीनुसार वाघाड अॅग्री.प्रोड्यूसर कंपनी लि. ची स्थापना दि.11.सप्टेंबर 2009 रोजी करण्यात येऊन नोंदणीचे सर्टीफिकेट संस्थेस प्राप्त झाले. त्यानुसार कार्यक्षेत्रात महाराष्ट्र शासन कृषि उपविभागातर्फे बिजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेऊन सुरूवात केली आहे. (भविष्यात कृषि माल निर्यात आयात वाहतूक साठवणूक उपपदार्थ निर्मिती यावर कंपनी भर देणार आहे.)
वाघाड प्रकल्पास राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कार प्राप्त (सन 2007-08) :
वाघाड प्रकल्पास पाणी नियोजन व सकळ उत्पन्नात वाढ या दोन गोष्टीसाठी केंद्र शासनाच्या कृषि विभागाचा राष्ट्रीय उत्पादकता परिषदेचा दुसऱ्या क्रमांकाचे मानांकन पुरस्कार प्राप्त झाला आहे. दि.24.9.2009 रोजी नवी दिल्ली येथे वाघाड प्रकल्पस्तरीय संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. शहाजी सोमवंशी व पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ.संजय बेलसरे तसेच समाज परिवर्तन केंद्राचे मा.श्री. भरतभाऊ कावळे, मुख्य अभियंता मा.म.वि.पाटली, तसेच अधिक्षक अभियंता मा.श्री.इश्वर चौधरी यांना श्री. के.व्ही थॉमस कृषि राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. हा एक संस्थेचा सन्मान आहे.
मोलाचे सहकार्य :
वाघाड कार्यक्षेत्रातील सर्व शेतकरी बांधव, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, सभापति, उपसभापति, कादवा कारखाना अध्यक्ष व संचालक तसेच सर्व सोसायटी अध्यक्ष व संचालक सर्वांनी प्रकल्पस्तरीय संस्थेस सहकार्य केले आहे. यात सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सर्व पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष, संचालक व कर्मचारी सर्वांनीच सहकार्याच्या भावनेने केलेल्या प्रयत्नांमुळेच हे सर्व शक्य झाले आहे. आमचा सर्वांचा एकविचार, एकपक्ष पाणी पक्ष त्यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला आहे.
श्री. शहाजी सोमवंशी, अध्यक्ष, मोहाडी (भ्र : 9420061490)
Path Alias
/articles/vaaghaada-eka-saetakarai-saincana-parakalapa
Post By: Hindi