पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी व वाढीव उत्पादनात सातत्य राखण्यासाठी पाणी हा सर्वात महत्वाचा घटक आहे. पिकास संवेदनक्षम अवस्थेत पाण्याची कमतरता भासल्यास पिकाच्या उत्पादकतेवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. पिकांना आवश्यक तेवढेच पाणी देणे फार महत्वाचे असते. प्रमाणापेक्षा कमी पाणी दिल्यास उत्पादनात घट येते आणि प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यास अन्नद्रव्यांचा निचरा होऊन उत्पादनात अपेक्षित वाढ होत नाही. पिकांना पाणी देताना जमिनीतील ओलावा नेहमी वाफसा अवस्थेच्या जवळपास असावयास पाहिजे.
भारतातील 60 टक्के शेती आणि महाराष्ट्रातील 84 टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक, भूशास्त्रीय, पर्जन्य पर्यावरण परिस्थितीचा विचार करता कोरडवाहू शेती क्षेत्राचे प्रमाण जास्त असणे अनिवार्य आहे. मोठे कोरडवाहू क्षेत्र उपलब्ध असल्याने आपल्या वाढीव कृषि उत्पादनासाठी एक मोठी संधी आहे ही गोष्ट जरी आव्हानात्मक असली तरी कोरडवाहू शेतीत पाणी उपलब्ध करणे आणि पाम्याचे योग्य नियोजन आखून शाश्वत शेती करणे ही काळाची गरज आहे.बारमाही बागायती शेती सोडल्यास बहुतेक सर्व पिके पावसाच्या पाण्यावरच घेतली जातात. शक्य असेल त्या ठिकाणी संरक्षित पाणी देण्यात येते. मध्यम ते भारी जमिनी असलेल्या क्षेत्रात रब्बी हंगामात जमिनीतील अंग ओलीतावर वाल, कुळीथ, चवळी या सारखी पिके घेतली जातात. बागायत क्षेत्रही मान्सूनच्या पावसावर अवलंबून असते. मान्सून चांगला झाला तर धरणे भरतात, विहीरींना पाणी उपलब्ध होते. त्यामुळे पाऊस चांगला झाला तर बागायत क्षेत्रातही व्यवस्थित पाणी पुरवठा होऊन उत्पादन चांगले मिळते.
मान्सून पाऊस आणि पिके :
मान्सूनच्या स्वरूपानुसार प्रत्येक विभागातील पिके ठरलेली असतात. जास्त पाऊस पडणार्या कोकण विभागात भात, नाचणी, वरी इत्यादी पिके घेतली जातात. दक्षिण व मध्य महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, मका, तूर, भूईमूग, सूर्यफूल, बटाटा, भाजीपाला व फळपिके घेतली जातात. जगाच्या तुलनेत महाराष्ट्रातील पर्जन्यमान चांगले आहे, परंतु तृणधान्याचे सरासरी उत्पादन भारताच्या तुलनेत कमी आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे पडणार्या पावसातील अनियमितता तसेच पिक वाढीच्या कालावधीत पावसात पडणारे खंड होय. परंतु पडणार्या पावसाचे, जमिनीवरून वाहून जाणार्या पाण्याचे योग्य प्रकारे संवर्धन केले, पिकात आंतरमशागत करून जमिनीतील ओलावा जास्तीत जास्त टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला, खरीप गंहामातील जे उपलब्ध पाणी आहे त्या पाण्याचा उपयोग पिकाच्या संवेदनक्षम अवस्थेत संरक्षक पाणी म्हणून देण्यासाठी केला तर कोरडवाहू क्षेत्रातील शेतीमधूनही अपेक्षित उत्पादन घेणे शक्य होईल.
पृथ्वीवरील जलसंपदा :
1. पृथ्वीवरील एकूण पाणी - 1300 ते 1400 दशलक्ष घन किलोमिटर
अ. खारे पाणी - 97 टक्के (1265 ते 1365 दशलक्ष घन किलोमिटर)
ब. गोड पाणी - 3 टक्के (35 दशलक्ष घन किलोमिटर) यापैकी 75 टक्के बर्फाच्या स्वरूपात आणि 14 टक्के भूगर्भात खूप खोल - जे वापरासाठी कधीच उपलब्ध होत नाही. फक्त 11 टक्के पाणी वापरासाठी उपलब्ध होऊ शकते.
एकूण 3 टक्के (35 दशलक्ष घन किलोमिटर) गोड पाण्यापैकी प्रत्यक्षात अर्धा टक्क्यापेक्षाही कमी पाणी वापरासाठी उपलब्ध होते. वापरासाठी उपलब्ध असलेले पाणी खालील विविध माध्यमातून उपलब्ध होते.
1. सरोवरे - 0.35 टक्के
2. नद्या - 0.03 टक्के
3. मातीतील ओलावा - 0.06 टक्के
4. वातावरणीतील ओलावा - 0.035 टक्के
एकूण 0.475 टक्के
जलसंपदेचा वापर (जगात)
1. कृषि - 70 टक्के
2. औद्योगिक - 22 टक्के
3. घरगुती - 08 टक्के
जलसंपदेचे संवर्धन व शेतीसाठी वापर :
भूजल विकास साधावयाचा झाल्यास वाहून जाणार्या पाण्यास, भूशास्त्राच्या आधारे व अभियांत्रिकी पध्दतीने अडसर निर्माण करणे गरजेचे आहे.
1. पिकाची लागवड नेहमी उताराच्या आडव्या दिशेने केल्यास पावसाचे पाणी शेतात सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात मुरते.
2. पिकांची मशागत समपातळीवर विशिष्ट रेषेवर केल्यास पाणी भूपृष्ठावरून वाहून न जाता, त्याचा वेग मंदावून जमिनीत मुरण्यास मदत होते.
3. उभ्या पिकात आंतमशागतीने तण नियंत्रण होतेच, शिवाय जमिनीत पडलेल्या भेगा बुजल्या जाऊन बाष्पीभवनाचा वेग मंदावतो व ओलावा टिकून राहतो.
4. जमिनीमध्ये प्रत्येक हंगामात एकच पिक न घेता पिकांची फेरपालट करावी त्यामुळे जमिनीतील विविध थरांमधील अन्नद्रव्ये पिकांना नियमित उपलब्ध होतात व जमिनीचा पोत टिकून राहून जमिनीची पाणी धारण क्षमता सुधारते.
5. समपातळीवर जीवंत गवती बांध घातल्याने पावसाचे पाणी अडून जमिनीमध्ये मुरण्याचे प्रमाण वाढते. हलक्या आणि मध्यम प्रतिच्या जमिनीत पावसाचे पाणी मुरवण्यासाठी सुध्दा हा बांध उपयुक्त आहे.
6. सर्व उपायानंतरही पावसाळ्यात अधिक पाणी वाहून जाते त्यासाठी उपलब्ध जागेनुसार सपाट जमिनीवर चौकोनी आकाराचे शेततळे किंवा खोलगट भागात मातीच्या आडवा बांध टाकून पाण्याचा अटकाव करता येतो. शेततळ्यात साठविलेले पाणी, पावसाच्या मोठ्या खंडात पिकांना संवेदनक्षम अवस्थेत दिले गेले तर उत्पादनात निश्चितच वाढ होते.
पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी व वाढीव उत्पादनात सातत्य राखण्यासाठी पाणी हा सर्वात महत्वाचा घटक आहे. पिकास संवेदनक्षम अवस्थेत पाण्याची कमतरता भासल्यास पिकाच्या उत्पादकतेवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. पिकांना आवश्यक तेवढेच पाणी देणे फार महत्वाचे असते. प्रमाणापेक्षा कमी पाणी दिल्यास उत्पादनात घट येते आणि प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यास अन्नद्रव्यांचा निचरा होऊन उत्पादनात अपेक्षित वाढ होत नाही. पिकांना पाणी देताना जमिनीतील ओलावा नेहमी वाफसा अवस्थेच्या जवळपास असावयास पाहिजे.
पाण्याचा कार्यक्षम वापर :
उपलब्ध पाणी कमी होत असल्याने पाण्याचा काटेकोर वापर करणे आवश्यक आहे. त्याकरिता पाणी देण्याची योग्य पध्दत, योग्य वेळ न योग्य प्रमाण या सर्व बाबी लक्षात घेणे महत्वाचे आहे. याकरिता खालील बाबींचा अवलंब करावा -
1. पिकास आवश्यक तेवढेच पाणी देणे.
2. पाणी देण्याची योग्य पध्दत वापरणे.
3. आच्छादनाचा वापर करणे.
4. पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत पाणी देणे.
Path Alias
/articles/upalabadha-paanayaacae-saetaisaathai-yaogaya-vayavasathaapana
Post By: Hindi