स्वत: चे शेत हेच पाणलोट विकास क्षेत्र


देशातील बेगडी विकासामुळे नवनवीन आकर्षणे निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम राहणीमानावर सातत्याने होत असतो. घरात टीव्ही असावा, मुलांना नीट-नेटके कपडे असावेत, घरात विविध उपयोगाच्या वस्तू असाव्यात अशी कुटुंबीयांना इच्छा झाल्यास नवल ते काय? या सर्व गरजा पुरविण्यासाठी त्याला जास्तीचे उत्पन्‍न अत्यावश्यक बनत चालले आहे.

भारतामधील बहुतांशी शेती ही कोरडवाहू शेती आहे अशी ओरड गेल्या कित्येक वर्षांपासून आपण करीत आहोत. शेतकर्‍यांजवळ स्वत:ची शेतजमीन, स्वत:ची मेहनत, दर्जेदार बिया, रासायनिक खतांची उपलब्धता, पिकांवरील औषधे, मशागत करण्यासाठी आर्थिक प्रबंधन यासारख्या सर्व निविष्ठा योग्य प्रमाणात उपलब्ध असूनसुद्धा शेतकरी प्रत्येक वर्षी फक्‍त एकच पीक आपल्या शेतामधून घेत असतो. ही वस्तुस्थिती सर्वांनाच परिचित आहे. पाण्याची पुरेशी उपलब्धता नसल्यामुळे तो आपल्या जमिनीचा दोनदा किंवा तीनदा वापर करू शकत नाही व त्यामुळे शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार झालेला आहे हेही आपल्या निदर्शनाला येत आहे. या दृष्ट चक्रातून शेतकरी बाहेर पडूच शकणार नाही काय? हा महत्त्वाचा प्रश्‍न आज भारतीयांसमोर आहे व याचे उत्तर मात्र शोधण्याच्या दृष्टीने होणारे प्रयत्न फारच त्रोटक आहेत असे म्हणावेसे वाटते.

मराठवाड्यातील सरासरी पर्जन्यमान लक्षात घेता दरवर्षी सर्वसाधारणपणे 600 ते 700 मि.मी. पाऊस पडतो. हे आपल्या सर्वांना विदित आहेच. एक एकर शेताच्या तुकड्यावर जर 700 मि.मी. पाऊस पडला तर 28 लाख लिटर पाण्याची उपलब्धता त्या एका एकराला मिळते. सर्वसाधारपणे शेताचा आकार पाच एकर जर पकडला तर एक कोटी 40 लाख लिटर पाणी त्या शेतावर पावसाद्वारे पडते, असे म्हणावयास कोणतीही हरकत नसावी.

स्वत:चे शेत हेच एक पाणलोट विकास क्षेत्र आहे असा विचार जर केला व या पडणार्‍या पावसाचे योग्य व्यवस्थापन केले तर आपल्या शेतावर पाणलोट विकास कार्यक्रम राबवला गेला असे म्हणावयास हरकत नसावी. हे जर प्रत्येक शेतकर्‍याने केले तर मी कोरडवाहू पद्धतीने शेती करतो या म्हणण्यातील चूक आपल्या लक्षात सहजपणे येऊ शकते. माझ्या शेतातून पाण्याचा एकही थेंब मी माझ्या शेताच्या बाहेर जाऊ देणार नाही अशा प्रकारचे व्यवस्थापन त्याने करण्याचे ठरविले तर तो स्वत:चा राजा झाल्याशिवाय राहणार नाही.

आज पाण्याअभावी प्रत्येक शेतकरी स्वत:च्या शेतीची लागवड वर्षातून एकदाच म्हणजेच फक्‍त चार महिन्यासाठी करतो असे आपल्या निदर्शनास येते. म्हणजेच बाकीचे आठ महिने त्या जमिनीचा वापर होत नाही, असे म्हणण्यास हरकत नाही. शहरातील कारखानदार त्याच्या यंत्रसामुग्रीचा दररोज तीनदा वापर करून तीन पाळ्यांमध्ये उत्पादन काढतो व त्याद्वारे आपल्या साधनांचा पुरेपूर वापर करतो ही गोष्ट दृष्टीआड करता येणार नाही. माझी शेती हासुद्धा धान्य निर्माण करणारा एक कारखानाच आहे या दृष्टीने शेतीकडे बघितल्यास बाकीचे आठ महिने या शेतीचा वापर करण्यासाठी मी काय केले पाहिजे याबद्दल प्रत्येक शेतकर्‍याने विचार करणे गरजेचे आहे.

मला एका गोष्टीचे सतत वाईट वाटते ती ही की आपल्या गरिबीचे कौतुक करण्यात शेतकरी पटाईत झाला आहे. मी हातपाय हलवणार नाही, कोणीतरी येऊन मला मदत करावी आणि माझे भले करावे हाच विचार जर मनात बळावत असेल तर हा मार्ग विनाशाकडे नेणार याबद्दल खात्री बाळगा. पण माझ्या शेतामध्ये उपलब्ध असलेल्या पावसाच्या पाण्याचे योग्य संचयन, व्यवस्थापन व नियंत्रण केल्यास मी या संकटातून बाहेर पडू शकेन ही बाब आज शेतकर्‍यांच्या मनावर बिंबवण्याची खरी गरज आहे. ‘मोअर क्रॉप- पर ड्रॉप’ हे वाक्य वारंवार वाचून आणि ऐकून कंटाळा येत चालला आहे. पण या वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन शेतकरी जलव्यवस्थापन का करीत नाही हेही एक कोडेच आहे.

ज्यावेळी शेतकरी पावसावर अवलंबून असतो त्यावेळी त्याला खालील संकटांना निश्‍चितच तोंड द्यावे लागते.

1) पाऊस आला तर उत्पादन, अन्यथा नाही. या संकटाला त्याला सामोरे जावे लागते. शेताची योग्य मशागत करणार, पेरण्याची सर्व तयारी करणार आणि आकाशाकडे डोळे लावून बसणार. हेच जर त्याने करायचे ठरविले तर त्याचा विनाश अटळ आहे. त्यामुळे पावसावर किती प्रमाणात अवलंबून राहयचे हे ज्याचे त्याने ठरविणे आवश्यक आहे.

2) पावसावर अवलंबून असणारा शेतकरी स्वत:च्या मर्जीप्रमाणे पिकांची रचना करू शकत नाही. पाऊस म्हणेल ती पूर्वदिशा व तो म्हणेल ती पिकाची निवड असे झाल्यास सर्वच शेतकरी एकाच पिकाची लागवड करू शकतात व सर्वांचे धान्य एकाच वेळी बाजारात आल्यामुळे भाव कोलमडतात व मेहनत करूनसुद्धा त्या मेहनतीचे चीज होत नाही, हे संकट शेतकर्‍यांसमोर वारंवार उद्भवते. सरकारने अन्‍नधान्याचे भाव बांधून द्यावेत ही मागणी हा शेतकरी सातत्याने करीत राहतो. म्हणजेच दुखणे वेगळ्या ठिकाणी पण उपाय मात्र वेगळा व्हावा ही मागणीच चुकीची आढळते.

3) वर्षातून चारच महिने शेती होत असेल तर घरातल्या सभासदांना शेतावर काम कसे द्यायचे हाही शेतकर्‍यांसमोर पडणारा महत्त्वाचा प्रश्‍न दिसतो. घरी रोजगार नाही म्हणून मग इतरत्र रोजगार शोधण्याची पाळी कुटुंबातील सभासदांवर आल्याशिवाय राहत नाही. बरेचदा तर या रोजगाराच्या शोधात शेतकर्‍याला शहराकडेसुद्धा धाव घ्यावीशी वाटते व त्यामुळे ग्रामीण प्रश्‍नांबरोबरच शहरी प्रश्‍नसुद्धा वाढावयास सुरुवात होते. स्वत:च्या शेतात दोन किंवा तीन पिके घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यास घरातील सदस्यांचा रोजगाराचा प्रश्‍न यशस्वीपणे सोडविला जाऊ शकतो.

4) शेतकर्‍यांच्या शेतावर काम करण्यासाठी गावातील मजूरसुद्धा अवलंबून असतात. स्वत:च्याच कुटुंबातील सभासदांना जर तो काम देऊ शकत नसेल तर इतरांना काय काम देणार? यामुळे ग्रामीण मजुरांचा रोजगारीचा प्रश्‍न तीव्रतेने वाढू शकतो. या मजुरांना रोजगार पुरविणे हेसुद्धा एकापेक्षा जास्त पिके घेणार्‍या शेतकर्‍याला शक्य होऊ शकते.

5) पाऊस पाण्याच्या आणि पिकावरील रोगांच्या लहरी सोडविता सोडविता एका हंगामात किती पीक घरी येते हीही बाब विचारात घेण्यासारखी आहे. या पिकात खाणार काय आणि विकणार काय? हे उत्पन्‍न वर्षभर पुरेसे पडू शकते काय? हाही विचार महत्त्वाचा ठरतो आणि जर हे शक्य नसेल तर स्वाभिमानाने जगायचे कसे हाही प्रश्‍न विचार करायला लावणारा ठरतो. यातून नैराश्य आल्यास आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय शेतकर्‍यांसमोर दिसत नाही.

6) देशातील बेगडी विकासामुळे नवनवीन आकर्षणे निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम राहणीमानावर सातत्याने होत असतो. घरात टीव्ही असावा, मुलांना नीट-नेटके कपडे असावेत, घरात विविध उपयोगाच्या वस्तू असाव्यात अशी कुटुंबीयांना इच्छा झाल्यास नवल ते काय? या सर्व गरजा पुरविण्यासाठी त्याला जास्तीचे उत्पन्‍न अत्यावश्यक बनत चालले आहे. त्याचबरोबर शेताच्या मशागतीसाठी लागणार्‍या निविष्ठांच्या किमतीही वारेमाप वाढत चाललेल्या आहेत. बी- बियाणे, खते, औषधे यांच्यासाठी आज नगदी पैसा मोजल्याशिवाय या निविष्ठा हातात पडत नाहीत. म्हणजेच एका बाजूने वेगाने वाढत जाणारा खर्च व दुसर्‍या बाजूने स्थिर किंवा घटत जाणारे उत्पन्‍न या कैचीत आपला शेतकरी सध्या सापडला आहे. त्याला या चक्रातून बाहेर काढणे आवश्यक आहे.

7) दिवसेंदिवस मोसमी पावसाचा लहरीपणापण वाढत चालला आहे. पाऊस अत्यंत उशिरा सुरू होतो व लवकर संपतो. ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. पण त्याचबरोबर पर्जन्यमानात घट नाही म्हणजेच पूर्वी जेवढा पाऊस पडत होता, जवळपास तेवढाच पाऊस आजही सर्वसाधारणपणे पडतो हीही बाब नक्कीच. याचा अर्थ असा की पावसाळी दिवसात तो खूप वेगाने पडतो आणि वाहून चालला जातो. पूर्वीच्या काळातील खरीप आणि रब्बी हंगामाचे दिवसही आता अनिश्‍चित होत चालले आहेत. त्यामुळे खरीप हंगाम करावा की रबी हंगाम करावा याही अडचणीत शेतकरी सापडला आहे. सर्व शक्‍ती खरीप हंगामामध्ये वापरली आणि पावसाने दगा दिला तर खरीप हंगाम साधत नाही व रबी हंगाम कसण्यासाठी हातात साधने नाहीत अशा कैचीत शेतकरी सापडतो व त्यामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी आणखी मोठ्या अडचणीत सापडतो. ही आज सर्वसाधारण दिसणारी परिस्थिती आढळते.

8) पूर्वीच्या काळी पाऊस पडण्याच्या पद्धतीतही एक निश्‍चितता होती. ठराविक नक्षत्रे पाऊस देणारी व ठराविक नक्षत्रे कोरडी असे ठोकताळे शेतकर्‍यांजवळ तयार होते व त्याप्रमाणे स्वत:ला त्या परिस्थितीशी जुळवून घेणे शेतकर्‍याला शक्य होते. मृगाचा पाऊस पडला म्हणजे पेरण्या कराव्यात असे अनुभव सांगत होता. पण आता पेरण्या झाल्यानंतर पाऊस जो दडी मारून बसतो त्यामुळे निव्वळ पिकेच नाही तर शेतकरीही हवालदिल बनलेला दिसतो. बरेचदा तर पेरणीही वाया जाते. पुन्हा पेरणी करणे या संकटाला शेतकर्‍याची अर्थव्यवस्था मान्यता देऊ शकत नाही. कारण ती करण्यासाठी त्याच्याजवळ अर्थप्रबंधनच नसते. त्यामुळे या वर्षीची पिक-पाण्याची गाडी त्याला न घेताच निघून जाते व शेतकरी मात्र हवालदिलपणे त्या जाणार्‍या गाडीकडे बघत राहतो.

प्रश्‍न एवढ्यावरच संपत नाही. पेरणी चांगली झालेली आहे, पिकाची वाढही चांगली झालेली आहे व आता चांगला हंगाम घरी येणार असे वाटत असतानाच पाऊस डोळे वटारतो, वादळ येते व गारा पडतात आणि शेतकर्‍याचे उभे पीक त्याच्या डोळ्यांसमोर आडवे झालेले दिसते. थोडक्यात कपामध्ये आणि ओठामध्ये असलेल्या अंतरामुळे कपातला चहा पोटात जाईलच याची हमी शेतकरी देऊ शकत नाही व हाती येणारे पीक नेस्तनाबूत झाले म्हणजे शेतकर्‍याच्या दु:खाला पारावार राहत नाही. त्यामुळे या मोसमी पावसाच्या कचाट्यात सापडायचे की स्वत:ची जलव्यवस्था निर्माण करायची याचा विचारसुद्धा शेतकर्‍याला करणे आवश्यक आहे.

9) मोसमी पावसावर अवलंबून राहिल्यास खरिपाच्या हंगामात दोन अडचणी प्रामुख्याने जाणवतात. मृगाचा पाऊस पडल्यानंतर शेतकरी योग्य वापसा आल्यानंतर पेरणी करतो व रोपे उगवण्याला सुरुवात होते; पण नंतर मात्र पाऊस दडी मारून बसतो व त्यामुळे रोपांची योग्य त्या प्रमाणात वाढ होत नाही. बरेचदा जास्त ताण बसला तर रोपे जळूनसुद्धा जातात. खूपच ताण बसला तर संपूर्ण पिकच हातातून निघून जाते.

दुसरी अडचण अशी की पीक काढतेवेळी आजकाल जास्त प्रमाणात पाऊस यावयास लागला आहे. त्यामुळे मूग आणि इतर कडधान्य लावणे अडचणीचे झाले आहे. कारण नेमके पीक काढताना पाऊस असल्यामुळे शेंगा फुटून जातात व आवश्यक तेवढे उत्पादन मिळत नाही. एवढेच नव्हे तर उत्पादन पावसात सापडल्यामुळे ते काळपट बनते व अशा मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे पावसावर अवलंबून असणे शेतकर्‍याला परवडत नाही.

10) रबीच्या हंगामात मोसमी पावसामुळे तीन अडचणी उद्भवतात. रबीसाठी शेत तयार करण्यास पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे पेरणी लांबण्याचीच शक्यता जास्त राहते. त्याचा उत्पादनावर निश्‍चितच परिणाम जाणवतो. दुसरे असे की प्रत्यक्ष पेरणीच्यावेळेस जमिनीत आवश्यक तेवढी ओल नसल्यामुळे उगवणीचे प्रमाण घटते व त्यामुळे एकूण उत्पादनावर त्याचा विपरित परिणाम जाणवतो.

तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे मोसमी पावसाळा आजकाल हात आखडता घेत असल्यामुळे पावसाळा लवकर संपतो व पिकाच्या वाढीसाठी जमिनीत जेवढी ओल पाहिजे तेवढी न मिळाल्यामुळे दाणे भरण्याचे प्रमाण खूपच घटते. एवढेच नव्हे तर आर्द्रता नसल्यामुळे दाणे बारीक पडतात व या दोन्ही कारणांमुळे उतारा फारच कमी भरतो. अशा प्रकारे मोसमी पावसावर अवलंबून राहिले तर खरिपाचा व त्याचबरोबर रबीचाही नाश होतो व शेतकरी अडचणीत सापडतो.

वर वर्णिलेल्या अडचणींवर मात करायची असेल तर स्वत:जवळ हुकूमी पाण्याची सोय निर्माण करणे शेतकर्‍याला अनिवार्य ठरते. नाही तीन पिके तर निदान दोन पिके तरी समाधानकारकपणे हाती आल्यास शेती हा शाश्‍वत व्यवसाय बनतो व त्यामुळे शेतकर्‍याला स्वत:ची आर्थिक घडी मजबूत करण्याची संधी मिळते.

शेतीसाठी कर्ज काढले असल्यास मोसमी पावसावर अवलंबून असणारा शेतकरी नेहमीच अडचणीत येतो. कारण होणारा खर्च तर होऊनच जातो; पण उत्पादन न झाल्यामुळे त्या कर्जाची परतफेड करणे त्याला शक्य होत नाही. व एकदा का तो कर्जबाजारी झाला तर तो सातत्याने कर्जाच्या चक्रात सापडतो व त्यातून बाहेर पडणे त्याला शक्य होत नाही. पन्‍नास वर्षांपूर्वी आम्ही शिकत असताना शेतकरी कर्जातच जन्मतो, कर्जातच जगतो आणि कर्जातच मरतो. असे शिकलो होतो. पन्‍नास वर्षांनंतर या परिस्थितीत काहीही फरक झालेला दिसत नाही आणि त्यामुळे कर्जबाजारीपणा हा कोरडवाहू शेतकर्‍यांच्या जीवनातील एक स्थायीभाव बनलेला आढळतो. यातूनच मग कर्जमाफीसारख्या संकटांना तोंड द्यावे लागते व शेतकर्‍याचे व्यक्‍तिगत संकट हे सामाजिक संकट बनते.

शेतीचा विकास करणारी कोणतीही योजना ही शेतकर्‍याला कर्ज घेण्याची क्षमता वाढविणारी नसावी तर कर्ज परतफेड करण्याची क्षमता वाढविणारी असावी, असे 1956 साली स्थापन झालेल्या गोरवाला समितीने आपल्या अहवालात नमूद केले होते. मध्ये एवढा मोठा कालखंड जाऊनसुद्धा परिस्थितीत काहीच फरक पडला नाही व आजही थकबाकीदारांची संख्या मोठ्या दराने वाढत जाताना दिसत आहे. त्यामुळे शेती विकास करताना कशावर भर द्यावा याबद्दल योग्य विचार होऊनच पावले उचलली जावीत हे म्हणणे जास्त रास्त ठरेल.

शेताला पाण्याची उपलब्धता वाढली तर लावलेले पीक अधिक उत्पादन देईल एवढेच नव्हे तर एकापेक्षा जास्तदा शेती करणे शेतकर्‍याला शक्य होईल. या दोन गोष्टींचा संयुक्‍त परिणाम म्हणून शेतीमध्ये शाश्‍वतता येऊन त्याचा फायदा शेतकर्‍याची पतक्षमता वाढविण्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे बाकी सर्व कार्यक्रम दुय्यम समजून शेतकर्‍याला पाण्यासारखी निविष्ठा कशाप्रकारे उपलब्ध करता येईल यावर प्राधान्याने विचार होणे आवश्यक ठरते.

पाण्याची जोपासना कशी करावी?


आतापर्यंत आपण पाण्याची गरज कशी आहे याचा विचार केला. साहजिकच ही गरज पूर्ण करण्यासाठी पाण्याची उपलब्धता कशाप्रकारे वाढविता येईल यावरही विचार करणे गरजेचे आहे. यासाठी खालील उपाययोजना करणे योग्य ठरेल.

1) माझ्या शेतावर पडलेल्या पावसाचे पाणी माझ्याच शेतात थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे प्रत्येक शेतकर्‍याला आवश्यक ठरते. हे करण्यासाठी त्याला जे जे शक्य असेल ते करणे उपयुक्‍त राहू शकेल. शेतात ज्या ज्या ठिकाणी चांगले पीक येऊ शकत नाही अशी हलक्या दर्जाची जमीन पाहून त्या ठिकाणी खोल खड्डे खणले तर पिकांच्या दृष्टीने कोणतेही नुकसान न होता शेतावर पाण्याचा संग्रह वाढविणे शक्य होईल. काही शेतकर्‍यांनी अशा प्रकारचे प्रयोग केल्यानंतर त्याचा फायदा शेतकर्‍यांना निश्‍चितच झालेला आहे.

2) आधीच सांगितल्याप्रमाणे दिवसेंदिवस पावसाचा वेग वाढत चाललेला आहे. या वेगामुळे पाणी वाहून जाण्याचे प्रमाण आणि जमिनीच्या धुपाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. या दोन्ही गोष्टी टाळायच्या असतील तर शेतावर जास्त प्रमाणात वृक्षारोपण करणे आवश्यक झाले आहे. आज आपण आगगाडीने किंवा रस्त्याने प्रवास करतो तर मैलोंमैल दोन्ही बाजूची शेते भकास दिसतात. कारण वनराई संपूर्णपणे नष्ट करण्यात आलेली आहे. यामुळे पावसाचे पडलेले पाणी वेगाने निघून जाते.

पाण्याबद्दल खालील नियम महत्त्वाचा समजला जातो :


धावते पाणी चालते करा, चालते पाणी रांगते करा,
रांगते पाणी थांबते करा, थांबते पाणी जिरते करा.

पाण्याच्या प्रवाहाचा वेग जर कमी झाला तरच त्याचे मुरण्याचे प्रमाण वाढते ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पावसाचे थेंब जेव्हा जमिनीवर पडतात त्यावेळी जमिनीवरील माती ढिली करण्यास ते कारणीभूत ठरतात व मोकळी झालेली माती सहजपणे वाहायला लागून जमिनीची धूप वाढीस लागते; पण तोच पावसाचा थेंब जर वनराईवर पडला तर त्याच्यातील शक्‍ती निघून जाऊन ते पाणी जमिनीवर येईस्तोवर त्याचा वेग संपलेला असतो व त्यामुळे जमिनीमध्ये पाणी मुरण्याचे प्रमाण वाढीला लागते.

3) ज्यावेळेस झाड उभे वाढते त्यावेळेस त्याची मुळे जमिनीत खोलवर जात असतात. ही खाली जात असताना जमिनीतील कठीण स्तरांनाही त्यांच्यासमोर नमावे लागते. त्यांना छेद देऊन ही मुळे जमिनीत खोलवर रुजतात. यामुळे खोलवर फटी पडल्यामुळे पाणी मुरण्याच्या प्रमाणाला वेग येतो व त्यामुळे पाण्याचा संग्रह चांगल्याप्रकारे होण्यास मदत होते.

4) वृक्षांमुळे आणखी एक फायदा होतो. वृक्ष वाहत्या वार्‍याला प्रतिबंध करतात. त्यामुळे हवेचा वेग कमी होतो. ही हवा बाष्पीभवनाचा वेग सातत्याने वाढवत असते. हा अवरोध झाल्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाणही कमी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच आपले पाणी आपल्याजवळच शिल्लक राहते.

5) भूपृष्ठावर जेवढे पाणी असते त्याच्यातील निम्म्यापेक्षा जास्त पाणी सूर्य बाष्पीभवनाद्वारे घेऊन जात असतो. सूर्य हा आपला उष्णता आणि प्रकाश देणारा मित्र जरी असला तरी बाष्पीभवनाच्या दृष्टिकोनातून तो आपला महत्त्वाचा शत्रूसुद्धा आहे. त्यामुळे हे बाष्पीभवन थांबविण्याचे झाल्यास या पाण्याला सूर्यापासून लपवून ठेवणे अत्यावश्यक ठरते. हे पाणी एकदा का भूपृष्ठाच्या आत शिरले की त्यावर सूर्याची मात्रा चालत नाही व त्यामुळे शेतकर्‍याजवळ त्या पाण्याचा साठा सुरक्षित राहतो. यासाठी स्वत:च्या शेतावर शेततळे खणणे हा एक अत्यंत सहज व सोपा मार्ग शेतकर्‍याजवळ उपलब्ध आहे, अशा प्रकारचे शेततळे खणले तर त्या तळ्यात शेतावरील पाण्याचा संग्रह वाढतो व काही दिवसांनंतर जाऊन पाहिल्यास हा संग्रह जमिनीने पूर्णपणे पिऊन टाकलेला पण दिसतो. यालाच आपण पुनर्भरण म्हणावयास काय हरकत आहे? हे पाणी शेतकर्‍याला दुबार शेती करण्यासाठी निश्‍चतच उपयोगी ठरू शकते.

6) शेतर्‍यांशी चर्चा करताना शेततळे खणल्यामुळे तेवढी जमीन वाया जाते व त्याचा उत्पादनावर परिणाम होतो अशा प्रकारच्या अडचणी काही शेतकर्‍यांनी व्यक्‍त केल्या. इंग्रजीत 'Penny Wise and Pound foolish' अशा अर्थाची एक म्हण आहे. जमिनीचे थोडे नुकसान होऊन जमलेल्या पाण्यातून एकदाच नव्हे तर दोनदा जास्त उत्पन्‍न मिळत असेल तर होणारे नुकसान भरून निघणार नाही का हा विचार शेतकर्‍याने करणे निश्‍चितच आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकर्‍याने स्वत:च्या शेतात शेततळे खणणे- मग सरकारकडून मदत मिळो अथवा न मिळो - आवश्यक समजावे.

7) शेततळ्याचे प्रक्षेत्र मोठे असल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त राहू शकतो. त्यामुळे याच शेततळ्याच्या बाजूला छोट्या तोंडाची एखादी विहीर खणली तर हे पाणी सहजपणे त्या विहिरीत पाझरु शकेल व त्यामुळे खुले तोंड लहान झाल्यामुळे बाष्पीभवनाला निश्‍चितच आळा बसू शकेल व त्या विहिरीतील पाणी पाहिजे तेव्हा उपसून पिकाला देण्याची सोय करता येणे शक्य राहील.

8) भारतातील शेती ही तुकड्या तुकड्यांमध्ये विभक्‍त असल्यामुळे शेतीचा आकार फारच लहान झालेला आहे. अशा परिस्थितीत माझ्या शेतावर शेततळे खणणे मला परवडणार आहे काय? या दृष्टीनेही शेततळ्याचा विचार होणे आवश्यक आहे. जे माझे रडगाणे आहे तेच माझ्या शेजार्‍यांचेपण आहे. कारण त्यांचेही तुकडे माझ्यासारखेच लहान - लहान आहेत. त्यामुळे जवळपासच्या पाच- सहा शेतकर्‍यांनी मिळून एकच शेततळे खणून त्यातील पाणी वापरण्याचा प्रयत्न केला तर ही बाब सर्वांनाच फायद्याची ठरू शकेल. आंधळा आणि लंगडा स्वतंत्रपणे जत्रेला जाऊ शकणार नाही, पण लंगडा माणूस जेव्हा आंधळ्याच्या खांद्यावर बसतो तेव्हा दोघेही जण सहजपणे जत्रेला जाऊ शकतात ही गोष्टी आम्ही लहानपणी शिकलो. याच तंत्रज्ञाने छोटे छोटे शेतकरी एकत्र आले तर पाण्याची सोय त्यांना सहजपणे करता येईल.

9) मी छोटा शेतकरी, विहिरीमध्ये जरी पाणी असले तरी ते उपासण्याची माझ्याजवळ काय सोय हा प्रश्‍नही पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दहा शेतकर्‍यांनी एकत्र येऊन एक बचतगट स्थापन केला तर त्या बचत गटाद्वारे पाणी उपसण्याचा पंप आणि कॅनव्हॉस पाईप खरेदी केला जाऊ शकतो व या बचत गटापासून भाडेतत्त्वावर प्रत्येक शेतकरी पाळीपाळीने या सोयीचा वापर करून स्वत:ची शेती चांगल्याप्रकारे भिजवू शकतो. ‘विनासहकार, नही उद्धार’ ही गोष्ट शेतकर्‍यांनी लक्षात ठेवणे आवश्यक ठरते.

10) प्रत्येक शेतातून लहानमोठे नाले, ओढे व प्रवाह वाहतच असतात. कारण जमिनीतील चढउतार या ओढ्यांसाठी कारणीभूत ठरतात. दर पावसाळ्यात या ओढ्याद्वारे पाणी वाहू लागते. त्यावेळी या ओढ्यांवर दोनशे अडीशे फुटावर लहानसे मातीचे बंधारे, दगडांचे बंधारे वा रिकाम्या पोत्यांचे वाळू भरून तयार केलेले बंधारे बांधले जाऊ शकतात व त्याद्वारे वाहणार्‍या पाण्याला अनुरोध केला जाऊ शकतो. यामुळेही जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण वाढीस लागते व त्याचा फायदा भूस्थरातील पाण्याची पातळी वाढण्याकडे होऊ शकतो. फावल्या वेळात या नाल्यांना व ओढ्यांना जास्त खोल व रूंद केले तर पाण्याचा संग्रह वाढीस लागतो व जमिनीत पाणी शिरणारी छिद्रेही मोकळी केली जावू शकतात. यामुळे कृत्रिम पुनर्भरणाचा वेगही वाढविला जावू शकतो.

नहराद्वारे, कालव्याद्वारे सिंचनाचा लाभ संगळ्यानाच मिळू शकेल इतके नशिबवान आपण सर्वच असू शकत नाही. पण वर वर्णिलेल्या मार्गाद्वारे जर आपण चांगल्याप्रकारे जलसंधारण करू शकलो तर त्याचा लाभ आपल्याला निश्‍चितच होऊ शकेल.

मोटरद्वारे प्रवाहीपद्धतीने पाणी देणे हीसुद्धा योग्य गोष्ट नव्हे. पाणी वेगाने न मिळता ते संथपणे मिळाले तर सिंचन जास्त उपयुक्‍त ठरते. यासाठी स्वत:च्या शेतात पाण्याचे एक मोठे टाके बांधून त्या टाक्यात पाण्याचा संग्रह करून ते पाणी जर बारीक नळ्यांद्वारे शेतामध्ये वितरित करण्यात आले तर त्याचा फायदा शेताला जास्तप्रमाणात होऊ शकतो. याच पद्धतीने ठिबक सिंचनाचासुद्धा चांगल्याप्रकारे लाभ घेतला जाऊ शकतो.

असे केल्यास शेतकर्‍याला शेतापासून जास्त उत्पन्‍न प्राप्त होऊ शकते व त्याच्या शेतीमध्ये शाश्‍वतता येऊ शकते. त्यामुळे त्याची पत वाढवून पाहिजे तेव्हा अर्थपुरवठासुद्धा त्याला चांगल्याप्रकारे होऊ शकतो. यामुळे त्याची सामाजिक प्रतिष्ठासुद्धा वाढीला लागू शकते. घरातील कुटुंबीयांना व त्याचप्रमाणे गावातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची हमीसुद्धा शेतकरी जर देऊ शकत असेल तर त्याचा निव्वळ त्यालाच नव्हे तर समाजालासुद्धा फायदा होऊ शकतो हे नव्याने सांगण्याची गरज पडू नये.

Path Alias

/articles/savata-cae-saeta-haeca-paanalaota-vaikaasa-kasaetara

Post By: Hindi
×