सरोवरांची निर्मिती व संवर्धन - एक दृष्टिक्षेप


सरोवर म्हणजे सभोवताली जमिनीने वेढलेल्या पाण्याचा भाग, इंग्रजीमध्ये सरोवराला लेक (Lake) असे संबोधतात आणि हा शब्द ग्रीक भाषेतील Lakkos म्हणजेच छिद्र किंवा तळे यापासून घेतला आहे. जगभरातील बहुतांश भागात सरोवरे आढळतात. जास्त प्रमाणात पाणी असलेले काही समुद्र खरे पाहता सरोवरेच असतात. यामध्ये मृत समुद्र, गॅलिलीचा समुद्र व कॅस्पीयनचा समुद्र यांचा समावेश होतो.

भारत देशाला तलावाची संस्कृती आहे. महाभारतात एक प्रसंग आहे. नारद ऋषी युधिष्ठिराला विचारतात, तुझ्या राज्यातील शेतकरी केवळ पावसावर अवलंबून आहेत का ? त्यासाठी तू योग्य अंतरावर तलाव तयार केले आहेत का? या एकाच प्रश्‍नात तलावाचे तथा सरोवराचे महत्त्व दिसून येते. भारतातील राज्यकर्त्यांनी तलावाच्या संस्कृतीची जोपासना केली त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा होय. तिथल्या गोंड राजांनी तलाव तयार करण्याकरीता वाराणसीहून कुशल कारागीर आणले होते. त्यांनी सुंदर तलाव बांधले. या तलावांमुळे तेथील धानाच्या पिकाचा विकास झाला. मराठवाडा व आंध्रप्रदेशाच्या सिमेवर नांदेड जिल्ह्यामध्ये धर्माबादच्या परिसरात निजामकाळात तलावांची मोठ्या प्रमाणात शास्त्रोक्त पध्दतीने निर्मिती झाली. ह्या तलावांची रचना अशा पध्दतीने केली आहे. की, एक तलाव भरला की त्यातून वाहणारे पाणी व संकलन क्षेत्रातून येणारे पाणी विशिष्ट अंतरावर असलेल्या खालच्या तलावात जाते असे एकूण विशिष्ट अंतरावर एका खाली एक असे ३०० तलाव असल्याचे सांगितले जाते. यावरच त्यावेळची शेती अवलंबून होती. शास्त्रोक्त आणि कार्यक्षम असे पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन त्याकाळी केले जात होते.

अशा प्रकारच्या पाणी साठ्यामुळे भूगर्भातसुध्दा पूनर्भरण होत असे. तसेच छत्तीसगड हे तर तलावांचे राज्य गणले जाते. कारण राणी दूर्गावतीने आयुष्यभर एकच व्रत स्वीकारले होते, नवीन तलाव तयार करावयाचे. दूर्गावती राणीने शेकडो तलाव बांधले. त्यामुळे भाताचे पीक शाश्वत झाले. त्यामुळे आज छत्तीसगड राज्य भारताचे कोठार मानले जाते. त्याच प्रमाणे एम.विश्वेश्वरय्या यांनी म्हैसूर संस्थानात नवीन तलाव बांधण्याचे कार्य केले आहे. ते म्हैसूर संस्थानाचे दिवाण होते व स्वत: अभियंते होते. म्हैसूर संस्थानात जेव्हा अवर्षण पडत असे तेव्हा जी दुष्काळी कामे हाती घेतली जात त्यात नवीन तलावाच्या निर्मितीला प्राधान्य दिले जाई. अशा तर्‍हेने म्हैसूर संस्थानात शेकडो तलाव निर्माण झाले. या तलावांमुळे येथील शेतीचा विकास झाला. तलावामुळे खरीप हंगामातील पीक तर शाश्वत होतेच परंतु रब्बी हंगामातही कमी पाणी लागणारी पिके घेता येतात. शिवाय तलावातील पाणी जमिनीत मुरते व भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे विहीरींना पाणीपुरवठा होतो. जर भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण व्हायचे असेल तर आपण नवीन तलाव निर्माण करण्याला प्राधान्य दिले पाहिजे तसेच जुन्या तलावांचे तथा सरोवरांचे संवर्धन केले पाहिजे त्यांची देखभाल करून पाणी साठवण क्षमता टिकवून ठेवली पाहिजे. तरच अन्नधान्य व ईतर कामांसाठी काहीतरी पाणी उपलब्ध होऊ शकेल. सध्या जगामध्ये प्रामुख्याने कृषी, औद्योगिक व घरगुती बाबींवर पाण्याचा वापर हा खालील प्रमाणे आहे.

१. जलसंपदेचा वापर जगात (सरासरी)-
१. कृषी - ७० टक्के
२. औद्योगिक - २२ टक्के
३. घरगुती - ०८ टक्के
२. श्रीमंत व प्रगत देशामध्ये -
१. कृषी - ३० टक्के
२. औद्योगिक - ५९ टक्के
३. घरगुती - ११ टक्के
३. अल्प व मध्यम विकसीत देशामध्ये -
१. कृषी - ८२ टक्के
२. औद्योगिक - १० टक्के
३. घरगुती - ०८ टक्के

वरील गरज पूर्ण करण्याची क्षमता मानव तथा निसर्ग निर्मित तलाव आणि सरोवरांमध्ये असल्याचे अनेक जाणकारांचे मत आहे. त्या संदर्भात सरोवरांचा परिचय आणि संवर्धन होणे काळाची गरज आहे.

सरोवर म्हणजे सभोवताली जमिनीने वेढलेल्या पाण्याचा भाग, इंग्रजीमध्ये सरोवराला लेक (Lake) असे संबोधतात आणि हा शब्द ग्रीक भाषेतील Lakkos म्हणजेच छिद्र किंवा तळे यापासून घेतला आहे. जगभरातील बहुतांश भागात सरोवरे आढळतात. जास्त प्रमाणात पाणी असलेले काही समुद्र खरे पाहता सरोवरेच असतात. यामध्ये मृत समुद्र, गॅलिलीचा समुद्र व कॅस्पीयनचा समुद्र यांचा समावेश होतो. काही सरोवरे समुद्रसपाटीपासून बर्‍याच उंचीवर आढळतात तर काही समुद्रसपाटीपासून खूपच खालच्या भागात आढळतात. दक्षिण अमेरिकेतील टीटीकाका सरोवर हे समुद्रसपाटीपासून ३८१२ मी. उंचीवर आहे. ईस्त्रायल व जॉर्डन यांमध्ये असलेला मृत समुद्र जवळपास ४०० मी. समुद्रसपाटीच्या खाली आहे. ईस्त्रायल देशातील गॅलिलीचा समुद्र त्याला देशवासी कनेरेट सरोवर ह्या नावाने ओळखतात. हे सरोवर गोड पाण्याचे आहे. ह्या केनेरेट सरोवरावर (गॅलिलीचा समुद्र) ईस्त्राईल सरकारने एक राष्ट्रीय पाणी उपसा योजना उभारली आहे. ज्याद्वारे जवळपास संपूर्ण देशामध्ये नहर तथा पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा केला जातो. अतिशय सुरक्षित जागी म्हणजे पहाडाच्या खाली ह्या सरोवराच्या काठावर एकाच ठिकाणी १२००० अश्व शक्तीचा एक असे तीन म्हणजे एकूण ३६००० अश्व शक्तीचे पंपं हाऊस उभारले आहे. एक अतिशय महत्त्वाकांक्षी पाणी उपसा योजना म्हणून जगात प्रसिध्द आहे. ह्या देशात बहुतांश ठिकाणी ह्या योजनेद्वारेच पाणी पुरवठा होतो. बायबल ग्रंथामध्ये जॉर्डन नदीचा जागोजागी संदर्भ आहे. कारण प्रभू येशूंचा जन्म व कार्य ह्या नदीच्या तीरीच आहे.जॉर्डन देशातून ईस्त्राईल देशात वाहत येणारी ही नदी केनेरेट सरोवरात (गॅलिलीच्या समुद्रात) वाहत येते. हे सरोवर समुद्र सपाटी पासून सरासरी २०० मी. खाली आहे व मृत समुद्राच्या २०० मीटर वर आहे. म्हणजेच मृत समुद्र हा समुद्र सपाटीपासून ४०० मी. खाली आहे. पृथ्वीवरील ही सर्वात खोल जागा समजली जाते. त्यामुळे ह्या समुद्रातील पाणी ईतरत्र कुठेही वाहून जावू शकत नाही. केनेरेट सरोवर (गॅलिलीचा समुद्र) भरल्यानंतर सरोवरातून वाहून जाणारे पाणी मृत समुद्रात जाते. मृत समुद्रातून फक्त बाष्पीभवनाद्वारेच पाण्याचा र्‍हास होतो. त्याकारणाने दिवसेंदिवस पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढत जाते ते आता इतके जास्त आहे की, त्यात कुठलेही प्राणी किंवा जिवजंतू जिवंत राहू शकत नाहीत आणि म्हणूनच ह्या समुद्राला मृत समुद्र म्हटल्या जाते. क्षारांचे प्रमाण इतके जास्त आहे की, त्यामुळे त्या पाण्याची घनता जास्त आहे. पाण्यावर झोपून आपण वर्तमानपत्र वाचू शकतो. त्याकारणाने ह्या सरोवरात माणूस बुजत नाही. काहीही हातपाय न हलविता तो तरंगतो, त्यामुळे जगातील काही आश्‍चर्यंपैकी हे एक आश्‍चर्य समजल्या जाते.

मृत समुद्रापासून ईस्त्राईल देशाला अन्य मार्गांनी खूप उत्पन्न मिळते. ह्या समुद्रातील चिखल, कातडींचे रोग बरे होण्याकरीता उपयुक्त असल्यामुळे चांगल्या किंमतीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकला जातो. मृत समुद्र हा इतर सरोवरांसारखा पिण्याच्या पाण्यासाठी व पर्यावरण निर्मितीसाठी जरी फारसा उपयोगाचा नसला तरी त्यापासून विविध रूपांनी जे आर्थिक बळ ईस्त्राईल देशाला मिळते ते खरोखरच आश्‍चर्यकारक आहे. ईस्त्राईल देशाला आर्थिक सुबत्ता मिळून देण्यामध्ये मृत समुद्राचा सिंहाचा वाटा आहे. हे मला येथे नमूद करणे गरजेचे वाटते, अर्थात त्याला ईस्त्राईल लोकांची जिद्द व हुशारी कारणीभूत आहे. कारण जॉर्डन देशांनी मात्र ह्या संपत्तीचा फारसा आर्थिक सुबत्ता वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेला दिसत नाही.

तसेच जपानमधील शिगा राज्यातील औत्सु गावालगत, बिवा नावानी ओळखले जाणारे गोड्या पाण्याचे सरोवर सरासरी खोली २५ ते ३० मीटर आहे. ह्या सारोवरातून जपान मधील ओकासा, शिगा, क्वेटो आणि होंगाई ह्या चार राज्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. ह्या बिवा सरोवरात लहान मोठ्या एकूण ९२ नद्या येतात त्या सर्व नद्यांचे उगमापासून तर मुखापर्यंत गरजेप्रमाणे रूंदीकरण व खोलीकरण करून बांधून काढल्या आहेत. पावसाळा सोडून इतर वेळेस या नद्यांचे पात्र हे मेळावे, प्रदर्शने व तसेच विविध खेळांच्या कार्यक्रमासाठी वापरले जातात. ह्या बांधणीमुळे बिवा सरोवरात स्वच्छ पाणी वाहत येते व पाण्याची प्रत टिकविण्यास मदत होते. ह्या राज्यांचा ह्या सरोवरामुळे विकास झाला आहे. जपान वासीयांनी ह्या पाण्याचा दर्जा किंवा प्रत चांगली राखली असून धार्मिक भावाने ते या सरोवराकडे बघतात.

ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे सरोवर म्हणजे आयरे जे समुद्र सपाटीपासून १६ कि.मी. खाली आहे. जेव्हा अनियमित पावसाची वादळे येतात तेव्हा हे सरोवर भरते.

उपलब्ध पाणी :


तिसर्‍या जागतिक पाणीपरिषदेच्या निमित्ताने ऑशियन डेव्हलपमेंट बँकेने अभ्यास करून पृथ्वीवर पाण्याच्या उपलब्धतेबाबत काही माहत्त्वाची माहीती प्रकाशित केली.

१. एकूण पाणी - १३०० ते १४०० द.ल.घ.कि.मी
२. खारे पाणी - ९७ टक्के (१२६५ ते १३६५ ज.ल.घ.कि.मी)
३. गोड पाणी - ३ टक्के (३५ द.ल.घ.कि.मी) ह्या पैकी बर्फाच्या रूपात ७५ टक्के, भूगर्भात खूप खोल १४ टक्के जे पाणी वापरण्यासाठी कधीच उपलब्ध होवू शकणार नाही.
४. भूगर्भ, सरोवर, नद्या, मातीतील ओलावा व हवेतील आर्द्रता ह्यामध्ये ११ टक्के गोड पाणी आहे हेच खरे मानवाला व इतर सजीवांना वापरण्यासाठी उपलब्ध होवू शकते.

तसा जर बारकाईने अभ्यास केला तर एकूण ३ टक्के (३५ द.ल.घ.कि.मी) गोड पाण्यापैकी अर्धा टक्क्यापेक्षाही कमी पाणी विविध माध्यमातून प्रत्यक्षात उपलब्ध होवू शकते.

 

सरोवरातून

०.३५ टक्के

मातीच्या ओलाव्यातून

०.०६ टक्के

नद्यांमधून

०.०३ टक्के

वातावरणातील ओलावा

०.०३५ टक्के

एकूण

०.४७५ टक्के

 

ढोबळमानाने विचार केला व समजा हे सर्व पाणी आपण एका लहान जार मध्ये भरले तर एक चहाचा लहान चमचा एवढे पाणी आपल्याला वापरण्यासाठी उपलब्ध होईल व यातच सगळ्या जगाचा कारभार चालवावा लागणार आहे. ह्यावरून हे प्रत्येकाने स्वत: ठरवायचे आहे की, त्याचा वापर कसा करावा लागेल.

सरोवरांचे व पर्यावरणाचे संवर्धन कार्यक्रम राबविण्याच्या संदर्भात सरोवरांचा परिचय व सरोवरासंबंधी सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस तलावांच्या रक्षणाची जबाबदारी वाढली आहे. त्याच बरोबर माणसाच्या अस्तित्वासाठी हवा असलेला पाणीसाठा सपाट्याने कमी होत असल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. ज्या ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे त्यापैकी सरोवरे आणि तलाव ही फार महत्त्वाची कामगिरी बजावितात. कारण आजही सर्वात जास्त पाणी हे सरोवरांमध्येच आहे. पृथ्वीवरील नद्यांमध्ये जेवढे पाणी आहे त्यापेक्षा जवळपास १० पटीने जास्त पाणी सरोवरांमध्ये आहे. नद्यांपेक्षा दुप्पट पाणी हे मातीतील ओलाव्यात असून नद्यापेक्षा ०.०५ टक्के अधिक पाणी हे वातावरणात आहे आणि म्हणून सरोवराबद्दल खोल माहीती असणे क्रमप्राप्त आहे. किंबहुना ती करवून घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

सरोवरांची निर्मिती :


पूर्वीच्या काळात हिमनद्यांनी वेढलेल्या भागात सरोवरांचे प्रमाण जास्त आहे. हिमनद्या जेव्हा पुढे सरकतात तेव्हा खोल दरी निर्माण होते आणि हिमनगांचा साठा एक अडथळा म्हणून धरणासारखे पाणी अडवितात आणि जसजसे हिमनग वितळण्यास सुरूवात होते, तसतसे खोल दरीत पाणी जमा होते व सरोवरे तयार होतात. उत्तर युरोप व आशिया खंडाच्या उत्तरेकडील भागात दक्षिणेकडील भागापेक्षा जास्त सरोवरे हिमनगाच्या प्रभावामुळे असल्याचे यामुळेच निदर्शनास येते. फिलँडमध्ये हिमनगाच्या प्रभावाने हजारो सरोवरे निर्माण झालेली आहेत. उत्तर अमेरिकेतील प्रसिध्द सरोवरे काही प्रमाणातील हिमनगाच्या प्रभावानेच निर्माण झालेली आहेत. पर्वत रांगेच्या प्रदेशात आरामखुर्चीच्या आकाराची सरोवरे हिमनगाच्या प्रभावानेच निर्माण झालेली आहेत. हिमनगाखाली दबलेले बर्फाचे तुकडे काही दिवसांनी वितळतात व तेथे छिद्रे निर्माण होतात. नंतर ही छिद्रे पाण्याने भरली जातात या छिद्रांना किटल होल्स असे म्हणतात व अशाप्रकारे सरोवरे निर्माण होतात.

चुनखडीचा दगड असलेल्या भागांत काही सरोवरे निर्माण होतात, जसे की, अमेरिकेतील फ्लोरीडा प्रांतात अशी सरोवरे आढळतात. चुनखडीचा दगड असलेल्या प्रदेशात पडणारा पाऊस हा आम्ल स्वरूपाचा असतो. यामुळे खडकांची झीज होते व जमिनीखाली प्रवाह निर्माण होतो. जेव्हा वरचा भाग पडतो तेव्हा खोल खड्डा किंवा खोलगट भाग तयार होतो. काही खोलगट भागातून (खलगे) मातीच्या विशिष्ट प्रकारच्या आवरणामुळे पाणी झिरपण्याचा वेग मंदावतो व ती पूर्णपणे भरली जातात व यामुळे सरोवरे निर्माण होतात. अन्य काही क्रियेद्वारे सुध्दा सरोवरे निर्माण होतात. जमिनीच्या पृष्ठभागाच्या घरसणीतून कसराळे निर्माण होतात आणि पुढे त्यांचे सरोवरांत रूपांतर होते. जगातील सर्वात खोल सरोवर रशियातील बैकल सरोवर याचे एक उदाहरण आहे. पूर्व अफ्रिकेतील काही सरोवरे खोल दर्‍यांच्या समावेशामुळे निर्माण झालेली आहेत. अन्य सरोवरे, जसे की इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरील, टोबा सरोवर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झाले आहे. घाना देशातील बोसुमतवी सरोवर व तसेच महाराष्ट्र जिल्ह्यात बुलढाणा जिल्ह्यामधील लोणार सरोवर उल्कापातामुळे तयार झाले आहे.

आयर्लेंडमध्ये रूंद विस्तार नद्यांमुळे काही सरोवरे जसे की, लोह देर्ग तयार झाले आहेत. लोह देर्ग हे सरोवर शेनॉन नदीच्या रूंद विस्तारातून तयार झालेले आहे. काही सरोवरे नद्यांनी बदललेल्या मार्गातून तयार होतात, अशा सरोवरांना ऑक्सबो असे संबोधतात परंतु ही ऑक्सबो सरोवरे काही काळांनी नष्ट होतात. कारण यामध्ये मातीचा भराव व वनस्पती वाढ होऊन ती भरली जातात. समुद्रकिनारी रेती, गारगोट्या व लहान मोठे दगडद्वारे बनत असलेल्या सरोवरांना लगुन म्हणतात.

धरणाच्या बांधकामांतून तयार होत असलेल्या सरोवरांना पाणस्थळे असे संबोधण्यात येते. अफ्रिकेत झांबेझी नदीच्या भागात, करीबा जॉर्ज येथील धरणामुळे मागे सरोवर तयार झाले आहे. त्याची लांबी २८२ कि.मी. पेक्षा जास्त आहे. ऑस्ट्रेलियात बर्फाच्छादीत पर्वतरांगामुळे पाणस्थळे तयार होतात. यामुळे जल संवर्धन होवून सिंचन शक्य होते. तसेच पाण्याद्वारे उर्जानिर्मिती सुध्दा होते.

काही सरोवरात नदी व पर्वतरांगातून पाणी साठल्या जाते. परंतु अन्य सरोवरात कुठल्याच प्रकारचा प्रवाह येऊन मिळत नाही. अशा सरोवरात भूपृष्ठाखालून झर्‍यांचे व इतर पाझराचे पाणी गोळा होते. काही सरोवरांना आंर्तप्रवाह असतो. परंतु बाह्य प्रवाह नसतो. कुंडात जेव्हा नदीचा प्रवाह येतो तेव्हा सरोवर किंवा मोठा तलाव तयार होतो या सरोवरांना प्लेअ‍ॅज असे संबोधण्यात येते. ऑस्ट्रेलियात खूप प्लेअ‍ॅज आहेत. आयरे, फ्रोमे व टोरेन्नस सरोवर इ. ही याचीच काही उदाहरणे आहेत.

आज अस्तित्वात असलेली सरोवरे कालांतराने नष्ट होऊ शकतात. काही सरोवरे वातावरणातील बदलामुळे कोरडी होतात काही सरोवरात वाहत येत असलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग बदलल्याने ती नष्ट होतात. काहीवेळा भूकंपामुळे, भौतिक बदलामुळे सरोवरे नाहीशी होतात. कधीकधी सरोवरातील पाणी दुसर्‍या पाणस्थळात वाहून जाते व अस्तित्वात असलेली सरोवरे नाहीशी होतात. चुनखडीचा दगड असलेल्या प्रदेशातील खळगे भरण्यासाठी भूगर्भातील पाण्याची मदत होते. परंतु अशा प्रदेशातील सततच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे तळे / खड्डे / खळगे कोरडी होतात तसेच काही प्रमाणात पाणी भूगर्भात प्रसारित होते व सरोवरे नाहीशी होतात व त्यांचे अस्तित्व संपुष्टात येते. भूतलावरील खोल खड्डे, दर्‍या ही सर्व नाहीशी झालेली सरोवरे आहेत.

सरोवराचे महत्त्व व उपयोगिता :


सरोवराचे आपले स्वत:चे वेगळेच असे विश्व असते. यामध्ये अनेक झाडे झुडपे असतात, ती वेगवेगळ्या प्रकारची व निरनिराळ्या स्वरूपाची असतात. काही तळात खालच्या भागात असतात तर काही पाण्यावर तरंगतात. या सर्व वनस्पतींमुळे खाद्य उपलब्ध होते. सरोवरात मासे, गोगलगायांना व इतर जलचरांना खाद्य उपलब्ध असते. पाण्याच्या पृष्ठभागावर बदके, हंस, कबूतरे, फ्लेमींगो, क्रेन, इग्रेटस इत्यादी पक्षी मुक्तपणे विहार करतात. सोबतच आपले भक्ष्य शोधतात व उदरनिर्वाह करतात.

सरोवराच्या सभोवतालचा प्रदेश हा रमणीय असतो. त्यामुळे अशा प्रदेशातील लोकांवर सरोवराचा प्रभाव असतो व यावरूनच त्यांचे राहणीमान व इतर व्यवसाय ठरविला जातो. उन्हाळ्यात पाणी व जमीन लवकर गरम होत नाही, म्हणून सरोवराच्या प्रदेशात थंड वारे वाहतात. थंडीच्या काळात जमीन पाण्यापेक्षा लवकर थंड होते. त्यामुळे सभोवताली उष्णता निर्माण होते व वातावरण आल्हाददायक राहते.

सरोवरातून उष्ण वाहणार्‍या वार्‍यामुळे शरद ऋतुत सुध्दा पीकांना पोषक अशी परिस्थिती मिळते. उत्तर अमेरिकेतील ग्रेट लेक परिसरात अशा प्रकारच्या वातावरणामुळे झालेला फायदा लक्षणीय आहे. या संदर्भात ओनटारिओ सरावराचे प्रभावावरून असे लक्षात आले की, अमेरिका व कॅनडाच्या सीमेवरील भागात मका, फळझाडे यांची उत्कृष्ठ वाढ होत आहे. अशाच प्रकारचे दुसरे मिशीगन सरोवर आहे या सरोवरामुळे पूर्व किनार्‍यावरील शेतीला फार मोठा फायदा झाला आहे. वसंत ऋतुतील थंड वारा फळधारणेस विलंब करतो व धुक्यामुळे फळे गळतीस अडथळा निर्माण होतो. शरद ऋतुतील उष्ण वार्‍यामुळे फळे धुक्यापूर्वीच परिपक्व होतात.

ग्रेट सरोवरांचा प्रवास व व्यापारासाठी होत असलेला उपयोग सर्वांना माहितच आहे. पूर्वीच्या काळी उत्तर अमेरिकेतील काही साहसी प्रवाशांनी जग भ्रमणासाठी ग्रेट सरोवरांचाच आसरा घेतलेला आहे. यासाठी सेंट लॉरेन्स नदीच्या ग्रेट सरोवराशी जुडणार्‍या प्रवाहाचा जास्त उपयोग घेण्यात आला त्यासाठी पॅडल कॅनोजचा वापर करण्यात आला. आज पॅडल कॅनोज ऐवजी स्वीम बोटींचा उपयोग होत आहे. तसेच फायटरस, टगबोट व बारजेस यांचा मालवाहतुकीसाठी उपयोग होत आहे. या माध्यमातून किनार्‍यालगत शहरातील उद्योगधंद्यांना ग्रेट लेक मार्गे कोळसा, लोखंड व धान्य पुरवठा करणे शक्य झाले आहे.

सरोवरातील पाणी सिंचनासाठी उपयुक्त स्त्रोत म्हणून उपयोगात येते. सरोवरातून सरी व नाल्यातून पाणी शेतकर्‍यांच्या शेतात पोहचविता येते. तसेच सूक्ष्म सिंचनासाठी पाण्याचा उपसा करून वापर करता येतो. लोकांनी वाळवंटी प्रदेशात नद्यांचा प्रवाह अडवून धरणे बांधली व जलस्थळ तयार केलीत त्यापासून सिंचनास मदत झाली आहे. ईजिप्तमध्ये नाईल नदीवरील आस्वान धरण सर्वांना परिचयाचेच आहे. इंदू नदीवरील धरणामुळे १४.८ दशलक्ष हेक्टर वाळवंटी क्षेत्राचे सिंचन शक्य झाले आहे. यामुळे पाकिस्तानात कित्येक लक्ष लोकांना अन्नधान्य पुरवठा शक्य झालेला आहे.

जेव्हापासून लोक शहरात, नगरात राहायला लागले तेव्हापासूनच पाण्याचा तुटवडा आढळत आहे. आधी सरोवरातून पाणी गरजा भागविल्या जात. परंतु आजच्या शहरांचे विस्तारित स्वरूप बघता त्यांच्या पाणी गरजा भागविण्यासाठी धरणे बांधण्यात आली व गावाबाहेर जलस्थळ तयार करण्यात आलीत. ही जलस्थल दूरवरून पाणीपुरवठा करतात. पश्‍चिम ऑस्ट्रलियातील पाणी हे ८० कि.मी. अशा जलस्थळावरून आणण्यात येते. महाराष्ट्रात सुध्दा मुंबईसारख्या विस्तृत शहरांना पाणी पुरवठा फार लांबून केला जातो.

Image-1आपण ज्या वेळेस पाणी साठ्याच्या जागेविषयी बोलतो त्यावेळेस साधारणत: महासागर व समुद्र यामध्ये असलेल्या प्रचंड पाणी साठ्याचाच विचार करतो. यापेक्षा लहान पाणी साठ्याच्या जागाविषयी आपण क्वचितच विचार करतो. सरोवर, (सभोवताली जमिनीने वेढलेल्या पाण्याचा भाग) जरी आकाराने लहान असले तरी जीवन आणि जीव सृष्टीच्या दृष्टीने प्रचंड पाणी साठा असलेल्या जागांइतकेच महत्त्व सरोवरांचेही आहे. सरोवर स्वत:चाच असा पाणी स्त्रोत निर्माण करतात. त्यामुळे सरोवर भोवताल पशुपक्षी व वनस्पती आपले अस्तित्व निर्माण करतात. एखादे मोठे सरोवर त्या प्रदेशात लोकांच्या सर्वांगीण विकासात मदत करते. शिवाय सभोवताली चर्चेचा विषय ठरते. सरोवर असलेल्या प्रदेशातील लोकांच्या जैविक गरजा, कामे व इतर गोष्टी सरोवरांशी संबंधीत असतात. झर्‍यातील पाण्यामुळे सरोवरात पाणी येते. काही सरोवरात भूगर्भातील झर्‍याद्वारे पाणी येते, काही प्रवाहामुळे निर्माण होतात. असे असले तरी काही सरोवर कालांतराने नष्ट होतात व काहीची नवीन निर्मिती होते. काही सरोवर खूप मोठी असतात त्यांचे आकार जवळपास लहान समुद्राएवढे असतात उदाहरणार्थ कास्पीयन समुद्र या लेखात सरोवरांची निर्मिती व पर्यावरण ह्या विषयी सविस्तर माहिती दिली आहे. सरोवरांचे दैनंदिन असलेले महत्त्व व त्यापासून होणारा प्रभाव ह्या आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. आज निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये सरोवरांची काळजी घेणे त्यांचे संवर्धन व संगोपन करणे फारच गरजेचे आहे. थोडक्यात या पुढे सरोवरांचे संवर्धन ज्या दृष्टीने समाजात वावरणारा प्रत्येक मनुष्य हा जलसाक्षर असावा. विशेषत: खर्‍या अर्थाने वृत्तीप्रवण आणि जलसाक्षर नवीन पीढी निर्माण होणे ही उज्वल भविष्यासाठी काळाजी गरज आहे. किमान तलावांच्या जमिनी तलावांना परत करणे आणि भविष्यात तलावांच्या जागेवर अतिक्रमण होणार नाही ह्याची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी सहभागाने जन चळवळ उभी करावयाची झाल्यास ती जरूर उभी झाली पाहिजे व सहभागीने जूने तलावांचे तथा सरोवरांचे नुतनीकरण करून संवर्धन करणे हा एक रामबाण उपाय अवलंबविणे शहाणपणाचे ठरणार आहे.

Path Alias

/articles/saraovaraancai-nairamaitai-va-sanvaradhana-eka-darsataikasaepa

Post By: Hindi
×