सप्तश्रृंगी पाणी वापर सहकारी संस्था म. अंतरवेली


संस्था स्थापन झाल्यानंतर संस्थेच्या कार्यक्षेत्रात कामाची पाहाणी केली. जवळजवळ कोठेही शेतचारी नव्हती. मायनरची अवस्था अतिशय बिकट होती. अशा परिस्थितीत पाटबंधारे खात्याचे अधिकारी व संस्थेचे पदाधिकारी यांनी संयुक्त पहाणी केली. तशा कामाच्या नोंदी केल्या. त्यापैकी काही पाटबंधारे खात्याकडे पाटपुरावा करून घेतले. काही कामे लाभधारकांनी श्रमदानाने केले काही ठिकाणी मायनरवर व शेतचाऱ्यावर अडचणी निर्माण झाल्या परंतु सामाजिक दबाव, भरतभाऊ कावळे व खात्याचे अधिकारी यांनी अडचणी सोडवण्यास वेळोवेळी मदत केली रब्बी 95-96 हंगामापासून संस्थेने पाणी वाटप ताब्यात घेवून आजपर्यंत सुरळीत कामकाज केले.

अंतरवेली गाव हे निफाड तालुक्याच्या पश्चिम सिमेलगत आहे. गावाच्या सर्व शिवार ओझरखेड कालव्याच्या क्षेत्रात येतो कालव्याचे नियोजन होवून शिवारास पाणी येण्यापूर्वी 80 टक्के शिवार जिराईत कोरडवाहू होता. 20 टक्के शिवार विहीरीचे पाण्याचा वापर करून शेतकरी उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु विहिरीचे पाणी अपुरे पडत असल्याने शेतकरी अडचणीत येवून शेतीवर केलेला खर्च वाया जात होता.

सदर क्षेत्र ओझरकडे कालव्याचे - 1. अंतरवेली मायनर. 2. पिंपळगाव मायनर. 3. पिपळगांव सब मायनर चे पाणी मिळण्यास सुरूवात झाली व त्या पाण्यावर शेतकरी पिके घेण्याचा प्रयत्न करू लागले. संस्थेच्या कार्यक्षेत्रात पिपळगाव (बु) शिवारातील वणी रोड लगतचे काही क्षेत्र येते. कालव्याचे पाणी वाटप हे पाटबंधारे खात्याच्या पध्दतीनुसार होत होते. निसर्ग हवामान व पिकाची वाढीची वेळ विचारात न घेता खात्याच्या मर्जीप्रमाणे पाणी सोडले जात होते व ते पाणी जे लोक पाणी मागणी अर्ज करत त्यापैकी 80 टक्के लाभधारकांना मिळत नव्हते. अवेळी सोडलेले पाणीसुध्दा सधन शेतकऱ्यांच्याच उपयोगी पडत असते शिवाय काही आडदांड लोक पाणीपट्टी न भरता अनाधिकृत पाण्याचा गैरवापर करत असत. त्यामुळे गरजू व गरीब लाभधारकांना पाणी मिळत नव्हते. याबाबत संबंधिताकडे तक्रारी करून उपयोग होत नव्हता.

संस्थेच्या कार्यक्षेत्रात समाविष्ठ असलेली जमीन वितरिकेच्या शेवटच्या टोकाला असल्याने, जमीनीस पाणी न मिळाल्याने क्षेत्र पाण्यापासून वंचित रहात होते. पर्यायाने लाभधारकांना उघड्या डोळ्याने होणारे नुकसान पहावे लागत असे.

अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने निती, नियम व समानता न राहता असंतुष्ठ लाभधाराक व गैरफायदा घेणारे यांच्यात वैमनस्य निर्माण होवून भांडण तंटे होत असे. प्रतिवर्षी पावसाचे प्रमाण कमी कमी होत चालले होते. त्यामुळे विहीरीवर आधारित असलेली बागाईत जमीन कोरडवाहू होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. 90 ते 100 फुट खोल विहिरी व 300 ते 350 फुट बोरवेल करूनही उपयोग होत नव्हता. जमिनीच्या पोटात पाणी नसल्याने उपयोग होत नसे. विहीरीच्या भरवशावर केलेली पिके पाण्याअभावी जळत असत. अशा परिस्थितीत ओझर येथील पाणी वापर संस्थाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कै. बापूसाहेब उपाध्ये व मा.श्री. भरतभाऊ कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.श्री.दे.श.महाले यांनी संस्था स्थापन करण्याची कार्यवाही चालू केली.

दिनांक 21.1.1993 रोजी मा.कार्यकारी अभियंता श्री. भायभंग साहेब व मा. उप अभियंता ओझरखेड, कालवा उपविभाग क्र.2 पिपळगांव (बु) श्री.पाटील साहेब आणि संबंधित कर्मचारी यांनी गावी मिटींग घेवून सहकारी पाणी वापर संस्थेबाबत मार्गदर्शन करून पाणी वितरण कार्यपध्दतीची माहिती दिली व सहकारी पाणी वापर संस्था स्थापनेमुळे लाभधारकांचे कसे फायद्याचे आहे याबाबत माहिती देवून सूचना दिल्या आणि आमच्या खात्याकडून योग्य त्या वेळी उपयुक्त मदत व सहकार्य दिले जाईल अशी हमी दिली.

उपरोक्त नमूद उद्देशाप्रमाणे सहकारी पाणी वापर संस्था स्थापन होवून पाणी वितरण संस्थेमार्फत केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून आर्थिक दृष्ट्या सुधारणा होईल तसेच आपआपसातील मतभेद व वैमनस्य दूर होईल. अशा अनेक हेतुस्तव ग्रामस्थांनी शेती प्रश्नांशी निगडीत अशी सेवाभावी संस्था गावी व्हावी म्हणून सर्वानुमते नियोजन व आखणी करून गावी सप्तश्रृंगी सहकारी पाणी वितरण संस्था म. अंतरवेली स्थापण्याबाबत निर्णय घेतला. सर्व कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर दिनांक 29.5.1993 रोजी सरकार खात्याकडून सप्तश्रृंगी पाणी वापर संस्थेस मान्यता मिळाली.

संस्था स्थापन झाल्यानंतर संस्थेच्या कार्यक्षेत्रात कामाची पाहाणी केली. जवळजवळ कोठेही शेतचारी नव्हती. मायनरची अवस्था अतिशय बिकट होती. अशा परिस्थितीत पाटबंधारे खात्याचे अधिकारी व संस्थेचे पदाधिकारी यांनी संयुक्त पहाणी केली. तशा कामाच्या नोंदी केल्या. त्यापैकी काही पाटबंधारे खात्याकडे पाटपुरावा करून घेतले. काही कामे लाभधारकांनी श्रमदानाने केले काही ठिकाणी मायनरवर व शेतचाऱ्यावर अडचणी निर्माण झाल्या परंतु सामाजिक दबाव, भरतभाऊ कावळे व खात्याचे अधिकारी यांनी अडचणी सोडवण्यास वेळोवेळी मदत केली रब्बी 95-96 हंगामापासून संस्थेने पाणी वाटप ताब्यात घेवून आजपर्यंत सुरळीत कामकाज केले.

नियोजित पाणीपुरवठा होतो त्यावेळी पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करून भविष्य काळाकरिता शिल्लक ठेवलेल्या पाण्याचा उपयोग करता आला. सदर शिल्लक पाणी योग्य वेळी मिळवून वापरता आले आणि उत्पन्नात वाढ करता आली.

जे लाभधारक पाण्याचा गैरवापर करतात, जरूरतेपेक्षा अनाधिकाराने अधिक पाणी घेतात, तसेच काही लाभधारक चोरून पाणी वापरतात व पाणीपट्टी न भरता शासनाचे नुकसान करत होते. अशा गैरप्रकारांना आळा बसला. पाणी केव्हा मिळणार, किती मिळणार यांची माहिती हंगामाच्या सुरूवातीला मिळू लागली. त्यामुळे कोणत्या जमिनीत काय पिके घ्यावी यांचे नियोजन करणे शक्य झाले. अशा नियोजनामुळे उत्पन्न वाढवून शेतकऱ्यांना शासकीय धोरणाचा लाभ घेवून गावात त्याच बरोबर देशात संपन्नता वाढली.

मायनरमधील बांधकामाचे संकुचित विचारापोटी, काही वेळेस बुध्दीपुरस्कर नुकसान केले जात होते. अशा गैरप्रकारांना आळा बसला. चाऱ्यांचे नुकसान टाळणे शक्य झाले.

गावात शेतकऱ्यांची मुले पदविधर आहेत. नोकरीच्या शोधात होती परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. त्यांच्याच शेतीला योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होवू लागल्याने ते त्यांच्या बुध्दीमत्तेचा उपयोग करून शेतीचे उत्पन्न वाढवू लागले. त्यामुळे काही अंशी बेरोजगार व बेकारी दूर झाली.

संस्थेची उद्दिष्ट्ये :


1. संस्थेच्या कार्यक्षेत्रात मुखाशी पाटबंधारे खात्याकडून घनमापन पध्दतीने पाणी मोजून घेणे.
2. मोजून घेतलेल्या पाण्याचे लाभधारकांना पूर्व नियोजनानुसार काटेकोरपणे पाणी वितरण करणे.
3. पाण्याचा नाश टाळून काटकसरीने तसेच आवश्यकतेनुसार कमीत कमी पाण्याचा वापर करून पाणी वाचविणे.
4. वापरेलेल्या पाण्याची पाणीपट्टी लाभधारकांकडून मुदतीत वसुल करून आलेली रक्कम त्वरित संबंधित बँकेत जमा करून शासनाने मंजूर केलेल्या सवलतीचा फायदा मिळविणे.
5. मायनरची देखभाल दुरूस्ती व साफसफाई करणे, शेतचाऱ्यांवरील बांधकामे सुस्थितीत ठेवणे व त्याचे नुकसान होवू नये म्हणून जनजागृती करणे.
6. लाभधारकांच्या कल्याणासाठी विविध योजना व उपक्रम तयार करून त्यांची राबवणूक करणे.
7. कमीत कमी पाण्यात सिंचन करून शेती उत्पन्न वाढविणे.

संस्थेमुळे झालेले फायदे :


1. संपूर्ण जलनियोजन संस्थेच्या जबाबादरीवर होत असल्याने योग्य अवस्थेत योग्य वेळी पिकांना पाणी पुरवठा होतो, पाणी काटेकोरपणे वापरून मंजूर क्षेत्रास वितरण करणे शक्य होते. त्यामुळे लाभधारकांचे उत्पन्न वाढवून फायदा झाला.

2. अगदी शेवटच्या लाभधारकाला कमी व सुरूवातीच्या लाभधारकाला अधिक असा भेदभाव न होता मिळालेले पाणी नियमानुसार समन्यायाने वितरण होऊ लागले जेणे करून संबंधित लाभधारकांचे कोणत्याही प्रकारचे वाद होणार नाही याची काळजी घेतली जाते.

3. विहिरीवरील पिकांना देखील पाणी पुरविणे शक्य झाल्याने तसेच पिक स्वतंत्र असल्याने लाभधारकांच्या उत्पादनात वाढ झाली.

4. पाण्याची काटकसर करून वापर केल्याने शिल्लक पाण्याचा कोठा उन्हाळ्यात वापरता आल्याने लाभधारकांमध्ये पाणी बचतीची भावना निर्माण झाली. शिवाय संस्थेच्या कार्यक्षेत्रात सतत पाणी येत असल्याने विहिरीची पाण्याची पातळी वाढून सिंचन क्षेत्रात वाढ झाली.

5. गाव पातळीवर संस्था पाणी वितरण करत असल्याने सिंचन नियोजनाबाबतची गुंडगिरी व दादागिरी संपुष्टात आली.

6. लाभधारकांच्या विविध कार्यकारी योजना व उपक्रम राबवू लागले, गावात संघटित वातावरण निर्माण झाले, सर्वांच्या सहकार्याने कामे पार पाडण्याची प्रवृत्ती निर्माण झाली.

7. सवलती मिळविणे व संस्था व्यवस्थित चालविणेसाठी शंभर टक्के वसूली मुदतीत मिळू लागली.

ओझरखेड कालव्यावरील पाटाला पाणी सोडले तरी ते शेवटच्या टोकाला संस्थेच्या कार्यक्षेत्रात कधीही पाणी मिळाले नव्हते. आता मात्र हे चित्र बदलले असून 200 हेक्टर सिंचन संस्थेने केलेले आहे. पाटबंधारे खात्याकडून कधीही सुमारे 25 हेक्टर पेक्षा जास्त सिंचन झालेले नव्हते. सध्या सर्व लाभधारकांना पाणी मिळेल याची काळजी घेतली जाते. प्रत्येकाला सिंचनासाठी पाणी मिळाले की नाही, त्यांचा संपर्क साधून चर्चा केली जाते.

मुख्य म्हणजे शेवटच्या टोकाला जमिनीपर्यंत पाणी पोहोचेल याची काळजी घेतली जाते. आता पिकांचे नियोजन केले जाऊ लागले आहे. कष्ट वाया जाऊ नयेत यासाठी कोणती पिके त्यात घ्यावी म्हणजे चार पैसे पदरात पडतील याचा विचार केला जाऊ लागला, परिणामी एके काळी रोजगारासाठी अन्य गावात जावे लागणाऱ्या अल्पभूधारक व मागासवर्गीयांची कोरडवाहू शेतीही बारमाही पिकांनी हिरवीगार होऊ लागली. 418 सभासदांच्या 583 सिंचनयोग्य क्षेत्रापैकी 225 हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष व फळबागा फुलल्या आहेत. काही शेतकरी निर्यातही करतात. गहू, हरभरा, भाजीपाला कांदे, मका, अशी पिके घेतली जातात. यातील 80 हेक्टर क्षेत्र मागासवर्गीयांचे आहे. सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनमानात व उत्पन्नात झालेल्या बदलामुळे गावातील अन्य लोकांनी प्रेरणा घेवून सरस्वती पाणी वापर संस्था ही दुसरी संस्था स्थापन केली. तिचे कामकाज संस्थेच्या कार्यालयातून केले जाते. पाटबंधारे विभागाकडे पाणीपट्टीची थकबाकी ही मोठी समस्या असते. येथे मात्र सगळेच वेळेत पाणीपट्टी भरतात. संस्थेच्या कामकाजात समाज परिवर्तन केंद्र, पाटबंधारे खाते यांचे संबंधित अधिकारी या सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य वेळोवेळी मिळत आहे. तसेच संस्थेचे, चेअरमन व्हा.चेअरमन, संचालक, सचिव, पाटकरी, व सर्व सभासद या सर्वांचे सहकार्य असल्याने संस्था प्रगतीपथावर आहे.
संस्थेमुळे होणारे फायदे व या संस्थेची प्रेरणा घेवून ओझरखेड कालव्यावर सुमारे 26 पाणी वापर संस्था स्थापन झालेल्या आहेत. सदर संस्थेचे ओझरखेड कालव्यावरील क्षेत्रापैकी सुमारे 68 टक्के हे पाणी वापर संस्थेचे आहे.

ओझरखेड कालव्यावरील वितरिका संघ स्थापन करण्यासाठी कार्यवाही चालू आहे. जेणे करून लाभधारकांचा सिंचनामध्ये प्रत्यक्ष सहभाग वितरिका स्तरापर्यंत वाढविणे सक्य होईल. तसेच वाघाड पाणीवापर संस्थेचा महासंघ याची प्रेरणा घेवून व चांगला आदर्श डोळ्यासमोर ठेवून ओझरखेड पाणी वापर संस्थांचा महासंघ करण्याचा विचार विनिमय चालू आहे.

संस्थेची वैशिष्ट्ये :


1. संस्था स्थापण्यापूर्वी साधारणपणे 25 हेक्टर क्षेत्र भिजत होते.
2, संस्था स्थापनेनंतर 200 हेक्टर पर्यंत क्षेत्र भिजत आहे व त्यात सातत्याने वाढ होत आहे.
3. संस्था स्थापण्यापूर्वीची विभागाची जुनी थकबाकी संस्थेने 100 टक्के वसुल करून दिली आहे.
4. टेल भागातील लाभधारकांना संस्था स्थापण्यापूर्वी कधीही पाणी मिळत नव्हते. आता संस्थेचा मंजूर कोटा नक्की झाल्यामुळे संपूर्ण लाभधारकांना गरजेप्रमाणे पाणी मिळत आहे.
5. पिकांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांचा फायदा झाला, पर्यायाने राष्ट्राचे उत्पन्न वाढले.
6. जास्तीत जास्त लाभधारकांसाठी सिंचनाची व्यवस्था झाली.
7. शासनाची 100 टक्के वसुली होऊ लागली.
8. शेतकऱ्यांच्या मुलांना स्वत:च्या शेतातच काम मिळाले.
9. पूर्वी शेतमजूर रोजगारासाठी बाहेरगावी जात होते. आता गावातच रोजगार उपलब्ध झाला.
10. द्रााक्ष बागेचे क्षेत्र संस्था स्थापण्यापूर्वी 47 हेक्टर होते ते आता (जवळपास) 225 हेक्टर झाले आहे.
11. संस्था कार्यक्षेत्रातील मायनरचे संस्थेने स्वबळावर 750 फुट लांब लोखंडी गज वापरून लोड बेरींग टाकून त्यावर काँक्रिट केले.
12. संस्थेच्या कार्यक्षेत्रात पाणी वाटपासाठी संस्थांनी हंगामी पाटकरी तसेच एक सचिव व एक शिपाई नियुक्त केलेले आहेत.
13. संस्थेने उपलब्ध पाण्याचा सुयोग्य, सुनियंत्रीत व काटकसरीने वापर करून ग्रामीण विकासाच्या सिंचन व्यवस्थापनात लाभधारकांसह उद्दिष्ट पूर्ततेसाठी वैशिष्ट्यपूर्ण काम केलेले आहे. यांची दखल घेवून समाज परिवर्तन केंद्र नाशिक तर्फे पाणी वापर संस्थांसाठी येणारा राज्यस्तरीय बापूसाहेब उपाध्ये स्मृती पुरस्कार दिनांक 3मार्च 2003 रोजी संस्थेला प्रदान करण्यात आला आहे.
14. संस्थेने स्वमालकीचे सुमारे 450000/- रूपये खर्च करून स्वत:चे कार्यालय बांधले आहे.
15. संस्थेने उपलब्ध पाण्याचा सुयोग्य वापर करून सिंचन व्यवस्थापन तसेच लाभधारकांच्या सहभागास ग्रामीण विकासाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी उल्लेखनिय कार्य केले आहे. त्यांची दखल घेवून त्यासाठी महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग, प्राधिकरण नाशिक, पालखेड पाटबंधारे विभाग नाशिक यांच्या वतीने प्रशस्तीपत्रक दिनांक 15 ऑगस्ट 2009 रोजी देण्यात आले आहे.

श्री. जगन महाले, अंतरवेली (भ्र : 9420061490)

Path Alias

/articles/sapatasararngai-paanai-vaapara-sahakaarai-sansathaa-ma-antaravaelai

Post By: Hindi
×