नाशिक (महाराष्ट्र) येथील सोशल नेटवर्कींग फोरम टीम,ग्रामस्थ, माळेगाव (ता.त्र्यंबक,जि.नाशिक) आणि विद्या निकेतन माजी विद्यार्थी परिवार यांच्या संयुक्त सहकार्यातून साकारलेले गेले आहे एक अनोखे काम जे भारतातील सर्व आदिवासी पाड्यावर राबविले जाऊ शकते,लाखो लोकांना प्रेरणा देऊ शकते ज्यांना खरोखर काम करण्याची इच्छा आहे.
शासकीय विद्या निकेतन माजी विद्यार्थी परिवार यांच्या विशेष सहकार्यातून हे सोशल नेटवर्किंग फोरम जलाभियान साध्य झाले. चला तर मग जाणून घेवूया सोशल नेटवर्कींग फोरम चे संस्थापक प्रमोद गायकवाड यांच्या कडून हे काम कसे उभे राहिले ते.
प्रमोदजी सांगू लागतात,त्याचे असे झाले, ‘गेल्या डिसेंबरमध्ये आपल्या गावचा पाणी प्रश्न घेऊन त्र्यंबक तालुक्यातील माळेगाव या गावाचे ग्रामस्थ भेटले. या गावाला ‘सोशल नेटवर्किंग फोरम’च्या सदस्यांनी भेट दिली आणि पाणी प्रश्न हाती घेण्याचे ठरवले. एक ग्रामसभा घेऊन त्यात एकूण कामाची रूपरेषा ठरवण्यात आली. ग्रामस्थांचे श्रमदान, ग्रामपंचायतीची साठवणूक टाकी आणि सोशल नेटवर्किंग फोरमची पाईपलाईन, वीजपंप आणि अन्य कामांसाठी निधी संकलन अशा जबाबदाऱ्या ठरल्या. मार्च महिन्यात कामाला सुरुवात करण्यात आली. सोशल नेटवर्कर्सची भक्कम साथ आणि शासकीय विद्या निकेतन माजी विद्यार्थी परिवाराने उचललेली जबाबदारी यामुळे निधी संकलनाची चिंता मिटली. श्रेयवाद - राजकारणाच्या पलीकडे जाऊन गावानेही साथ दिली आणि अवघ्या दिड महिन्यात गावातील टाकीत पाणीही पडले.
मागील वर्षीच्या भीषण दुष्काळात पाच गावांना टंचाई मुक्त केल्यावर यावर्षी फक्त पाच लाख रुपयात अजून एक गावाची पाण्यासाठीची वणवण थांबवण्यात आपल्याला यश आलं आहे.
नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर (तळवाडे फाट्यापासून १२ किलोमीटर) ग्रामपंचायत, माळेगाव,( ता त्र्यंबकेश्वर जि. नाशिक) येथे १४ एप्रिल २०१७ रोजी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी या योजनेचे लोकार्पण गावातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते करण्यात आले आणि अखंड मानवतेच्या प्रेरक शक्ती म्हणून ओळखल्या जाणा-या बाबासाहेबांना आदरांजली वाहिली.
या ऊपक्रमासाठी निधी संकलनसाठी माझ्यासह डॉ. पंकज भदाणे, श्री. जीवन सोनवणे, डॉ. टी. चंद्रकांत यांचे मोलाचे योगदान लाभले तर तांत्रिक संयोजनासाठी इंजीनिअर प्रशांत बच्छाव, व्यवस्थापक सचिन शेळके यांची मदत झाली गावातील नियोजन सरपंच तानाजी दिवे, ऊपसरपंच बाळू गोर्हे, ग्रामसेवक मनोहर गांगूर्डे व त्यांच्या सहका-यांनी सांभाळले.समन्वयाची जबाबदारी डॉ. ऊत्तम फरताळे, अॅड. गुलाब आहेर, रामदास शिंदे यांनी उत्तम रित्या सांभाळली माळेगाव कामाच्या पहाणीसाठी डॉ. पंकज भदाणे आणि इंजि. प्रशांत बच्छाव यांच्यासमवेत जावून आलो.रस्त्यात ब्राम्हणवाडी या गावात डोक्यावर हंडे घेतलेल्या महिलांनी भरलेले रस्ते पाहीले. पुढे नांदगाव कोहोळी या गावातही हीच परिस्थीती. ऊन्हातान्हात आपल्या कच्याबच्यांना सोबत घेवून दोन तिन किलोमीटरपर्यंत पाण्यासाठी वणवण भटकणा-या या महिलांना पाहिलं आणि मन गलबलून आलं.
एका बाजूला माळेगावच्या महिलांच्या हालअपेष्टा संपणार असल्याचे समाधान तर दुस-या बाजूला हे आश्वासक चित्र.आता पाण्याची कमतरता भासणार नाही.
Path Alias
/articles/saosala-naetavarakainga-phaorama-jalaabhaiyaana-bhaaga-1
Post By: Hindi