सामुहिक पुरूषार्थाचे उत्तम उदाहरण - इस्त्राईल


प्रस्तावना


इस्त्रा म्हणजे झगडा आणि एल म्हणजे आला. झगडणारा आत्मा. पण कुणाबरोबर? परमेश्वराबरोबर परमेश्वराच्या सहाय्याने जेकोब नावाच्या महापुरूषाने हा मार्ग प्रशस्त केला आहे. पाच हजार वर्षे ही संस्कृती घडत गेली. जुना करार आधार मानला आणि इसवी सनाच्या पहिल्या शतकात एका यहूद्याने बंड केले. मी परमेश्वराचा पुत्र आहे असे सांगितले. त्यावेळी या मरूभूमीवर रोमन सम्राटाचे राज्य होते. धार्मिक यहुद्यांच्या सल्ल्याने सम्राटाने या यहुद्याला म्हणजे जीससला क्रुसावर चढविले. पण ख्रिश्चन, ख्रिश्चनिटी. ख्रिश्चन चर्च अस्तित्वात यायला इ.स. 326 उजाडावे लागले. बेथलहेममध्ये ते पहिले चर्च उभे राहिले. रोमच्या सम्राटानेच पुढे ख्रिश्च्यानिटीचा स्वीकार केला पण या मरूभूमीवर मात्र शेजारच्या सौदी अरेबियाने हल्ला करून प्रेषित महमदांची इच्छा पूर्ण केली. मूळचे यहूदी म्हणजेच ज्यू (यहूदी) मंदिर (सिमेगॉग) पाडून टाकले आणि तिथेच प्रेषितांच्या (महमद) स्वर्गारोहणाची जागा (रॉक टोम्ब) बांधले. मूळ भिंती कायम आहेत. मध्ये मात्र नवीन मशिद आणि या रॉक वर सुवर्ण घुमट (टोम्ब) उभा केला. आधीच मरूभूमीवर असलेल्या या जागेवर मग उरली ती स्मशान शांतता.

यहूदी स्थलांतरीत होत राहिले. जगभर पसरत राहिले. जगभर छळ सोसत, नांदत राहिले. अजूनही त्यांच्या शाळांमध्ये हे शिकविले जाते की जगभर छळ झाला। हिन्दुस्तान मात्र अपवाद राहिला।।

आणि छळाच्या कहाणीचा कहर झाला तो दुसऱ्या महायुध्दात. हिटलरने फक्त 65 लाख ज्यू ठार मारून चरम सीमा गाठली आणि सतराशे वर्षे पुढील वर्ष - जेरूसलेम मध्ये हा मंत्र घोकणाऱ्या ज्यूंनी जेरूसलेम वस्ती करून मूळ मंदिराचा परिसर जिंकून घेतला. आणि झगडणाऱ्या आल्याने इस्त्राईलला जन्म दिला ते साल होते 1948. सध्या इस्त्राईलची लोकसंख्या आहे 72 लाख.

भूगोल :


भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर जे वाळवंट आहे तिथे सध्या 35 डिग्री पश्चिम या रेखावृत्तावर हा देश आहे. एवढेच फक्त सांगता येते कारण या देशाची रूंदी 15 ते 115 कि.मी आहे. 30 डिग्री उत्तर ते 35 डिग्री उत्तर अक्षवृत्ताचा मध्ये हा देश आहे. अधिकात अधिक लांबी 470 कि.मी. आहे. स्वाभाविकच क्षेत्रफळ फक्त 21000 चौ.कि.मी.आहे. (मराठवाड्याची लोकसंख्या 126 लाख क्षेत्रफळ 60000 चौ.कि.मी)

इस्त्राईलच्या उत्तर भागात 1000 मी. उंचीच्या गोलन टेकड्या, तर मध्यभागही थोड्या कमी उंचीचा पण डोंगराळच. दक्षिणेत मात्र बऱ्यापैकी सपाट पण नेगेव्हचे वाळवंट. सर्व इस्त्राईलच मुळी अति हलक्या प्रकारच्या जमिनीचा. सर्वात उंच शिखर 1200 मीटरचे हर्मन माउंट.

नैसर्गिक संसाधने :


शेती करण्यायोग्य जमीन जवळ जवळ नाहीच. उख़र भागात थोडी बरी, जार्डन (जिची लांबी 250 कि.मी. फक्त) नदीच्या काठावर. जॉर्डन नदी एकच नदी उत्तर भागातून प्रवेश करते आणि जॉर्डन देशात घुसते. मध्येच इस्त्राईलमध्ये ती टिबेरियस नावाच्या गावाजवळ गॅलिली नावाच्या नैसर्गिक समुद्रात (जल साठवण क्षमता साधारण 600 द.ल.घ.मी जायकवाडीची 2900 द.ल.घ.मी) जाते. पुढे तिला जाऊ दिले जात नाही. गोड्या पाण्याचे हे एकमेव सरोवर. गोलन टेकड्यात 720 मि.मी. मध्यभागात 550 तर नेगेव्हच्या वाळवंटातच सरासरी 30 मि.मी. पाऊस पडतो. स्वाभाविक वनस्पती सगळ्यामिळून 2500 (मराठवाडा फक्त 2 लाख) उघड्यावर पिके घेता येतील अशी म्हणजे खजूर, डाळींब, ऑलिव्ह, चीनी सफरचंद, पिचेस, अंगूर, अॅव्हा काडो, निवडुंग, सफरचंद आणि सीताफळ.

हवामान:


वाळवंटात थंडी आणि उष्णता दोन्ही तीव्र. जंगल कुठून आढळणार? प्राणी सृष्टीतला गाढव मात्र दिसला. बाकीचे प्राणी काही गाढव नाहीयेत, त्या देशात राहायला.... महान येशू लहानपणी बकऱ्या चारत असे तो डोंगर ऑलिव्हचा डोंगर म्हणून दाखवतात. खजूराशी फक्त ऑलिव्हची स्पर्धा आहे. तेही उत्तर आणि मध्य इस्त्राईलमध्ये. दक्षिणेत तेही नाही. एकूण पाणी गरज 1800 द.ल.घ.मी पेक्षा अधिक नाही.

पण पण पण....


या विचित्र इतिहास भूगोलाच्या पार्श्वभूमीवर विपरीत परिस्थितीत ज्यू मंडळींनी आपली शिक्षण पध्दती, कार्य पध्दती, विकास पध्दती, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, धार्मिक जीवन आणि जगातले आपले स्थान मार्गी लावले आहे. केवळ जगात मार्गी लावून थांबले आहेत असे नव्हे तर जगात अव्वल नंबर आणला आहे.

वॉटेक - 2009 (WATEC - 2009) :


(17 नोव्हेंबर 2009) या जलप्रदर्शनात प्रवेश कारण्यापूर्वीच बघायला येणाऱ्यांचेही रजिस्ट्रेशन करण्यात येते. घडीपत्रके, पुस्तके, गोळा झालेल्या वस्तू ठेवण्यासाठी एक पिशवी देण्यात येते. हो, आणि छातीवर लावण्यासाठी एक बॅचही.

दि.17 नोव्हेंबरलाच दुपारी हे जल तांत्रिक प्रदर्शन पाहायला मिळाले. प्रवेश द्वाराजवळ स्वागत कक्षात एक सभामंच होता. सभामंचाचा पुढील पाण्याचा पडदा सतत बदलत होता. पाण्याच्या थेंबाचे असे ऑटोमेशन केले होते की THANKS, WELCOME, EXHIBITION, WATEC 2009, ISRAEL इत्यादी नावे हिब्रु आणि इंग्रजी भाषेत हवेतच तयार होऊन नाहीसे होत. या मनोहारी दृष्याने गर्दी खेचली. आणि आत 3 सभागृहात जवळ 120 इतके बूथस् लागले होते. एका ठिकाणी ठळक वाक्य होते. A Full spectrum of solution कृषि व जल यांच्या व्यवस्थापनामध्ये येणाऱ्या अडचणीचे समाधान (Solution) आमच्या जवळ तयार आहे.

प्रदर्शनातील खालील बुथस् खूप आवडले. आपल्या देशात त्याची उपयुक्तता अधिक आहे.
1. ELCO Water Technologies. Management controls
2. Water purification & absorption - by Toxsorb’s novel Yechnologies - MAC
3. TEFEN - MIXRITE fertilizer & chemical injector
4. JURAN - Releasing the power of the Pomegranate
5. MOTTECH - Rural water distribution

जलशुध्दीकरण प्रकल्प (cycling water) :


दि.18 नोव्हेंबर 2009 ला सकाळी जलशुध्दीकरण प्रकल्प पाहिला. पंचवीस वस्तीचे सांडपणी तेल अवीव शहराजवळ गोळा केले आहे. अधिकात अधिक सत्तर कि.मी. पासून गोळा करीत आणलेले पाणी शुध्दीकरणाच्या विविध टप्प्यातून जाते. निवेदिका छातीठोकपणे सांगत होती की शुध्द केलेले पाणी पिण्यायोग्य आहे, तर गावातील विविध बागा, शेते,येथे हे प्रामुख्याने पुरविले जात असल्याची माहिती दिली गेली.

भारतात सांडपणी व्यवस्थापन म्हणजे शुध्दीकरण आणि पुनर्वापर अजून प्रायोगिक अवस्थेतच आहे. भारतात शहरातल्या सांडपाण्यावर घेतल्या जाणाऱ्या भाज्या अनारोग्यास कारणीभूत होतात हे आता लपून राहिलेले नाही. दिल्लीसारख्या राजधानीच्या ठिकाणची यमूना, काठावर फिरायला जाण्याची बातच सोडा पण पाहण्यायोग्यही शिल्लक नाही, यापेक्षा मोठा आणि भयानक डिझास्टर कोणता असू शकतो?

MEKOROT ही National Water Company असून ही पाणी शुध्द करणे, शुध्द ठेवणे, पाणी गोळा करणे, पृष्ठभागावरून आणि जमिनीवरून पाणी काढून पुरवठा करणे, गुणवत्ता तपासणे, सांडपाण्याची व्यवस्था करणे इ. कामे करते. इस्त्राईलचे 70 टक्के पाणी ही कंपनी पुरवते.

JURAN ही कंपनी डाळींबाच्या फळापासून डाळींबाचे दाणे वेगळे करते. मिनीटाला तीस डाळींबे सोलणे एवढी प्रचंड गती आहे. त्या दाण्यांच्या पुढील प्रक्रिया पूर्ण करते. रू. दोन कोटींच्या आसपास किंमत असलेली मशिन तयार करून जगभर विकते. भारतात आतापर्यंत तशा दोनच मशिन विकल्या गेल्या आहेत.

संध्याकाळी कॉकटेल होतं. कॉकटेल हे नाव ऐकून नको म्हणून सांगितलं. पण बघावं तरी म्हणून पैसे भरले आणि आश्चर्य असे की माझ्या संकल्पनेचं छप्पर फाटलं होतं. आस्तवादात कुणी रमलेलं दिसेना. आपापल्या कामाची माहिती देण्यात आणि घेण्यात माणसं रमली होती. परिचय कार्डांची देवाणघेवाण हे त्यांच वैशिष्ट्य. मलाही विविध विद्यापीठातली माणसं भेटली. पुन्हा भेटायचं असं परस्परांना आश्वासन देऊन माणसं न झिंगता पांगली.

कॉकटेलचं आयोजन केलं होतं इस्त्राईल - ऑस्ट्रेलिया चेंबर ऑफ कॉमर्सनी आणि पाहुणे होते भारत (महाराष्ट्र) आणि अमेरिकेतले (कॅलिफोर्निया). पाहुण्यांकडून सुध्दा चांगले 27 डॉलर्स प्रति व्यक्ती घेतले.

गॅलिली नावाचा समुद्र :


गॅलिली हे या वाळवंटातील गोड्या पाण्याचे सरोवर जेमतेम 600 द.ल.घ.मी पैकी 400 द.ल.घ.मी दरवर्षी वापरले जाते. याचा मुख्य स्त्रोत जॉर्डन नावाची नदी आणि डोंगरांचा झिरपा. जवळ जवळ 200 मीटर समुद्र सपाटीच्या खाली हे जगातले दोन क्रमांकाचे सरोवर. यातून 150 मीटर उंच पाणी उचलले जाते आणि राष्ट्रीय जल वाहक (National Water Carrier) मध्ये टाकले जाते आणि पुढे बंद नळयांमधून देशभर पुरवले जाते. इस्त्राईलचा मुख्य स्त्रोत हाच.

इस्त्राईलमध्ये दरडोई उपलब्धता 500 घ.मी. पेक्षा कमी पडते तर महाराष्ट्रात अति तुटीच्या खोऱ्यात ती 15000 घ.मी/दरडोई पर्यंत जाते. शेतीसाठी दर हेक्टरी उपलब्धता 900 घ.मी. पेक्षा कमी आहे. महाराष्ट्रात 25 उपखोरी आहेत. सगळ्यात कमी उपलब्धता 1140 घ.मी/हेक्टर पडते.

हे सर्व पाणी बंद नळ्यांद्वारे देशभर खेळवले जाते. या बंद नळ्यांची लांबी 10500 कि.मी. भरते. तेही विशिष्ट दाबाखाली त्यामुळे देशभर ठिबक सिंचन/ तुषार सिंचनच वापरले जाते. महाराष्ट्रात कोणत्याही धरणाच्या कालव्यावर अजून ठिबक सिंचन नाही. जे आहे ते विहिरीवर आहे. आपण अजूनही शेजापाळीपत्रकातून वर आलेलो नाही. माजलगाव धरणाची गंगामसला शाखा स्वयंचलित (Automatic) केली खरी पण पूर्णपणे यशस्वी झाली हा दावा कोणी करत नाही. त्यावरही ठिबक सिंचन नाही.

इस्त्राईलमध्ये देशभर वॉटर मीटर्स बसवलेले आहेत. ते चालू अवस्थेत असून पिण्याच्या पाण्याचे दर ज्या आकाराचे वॉटर मीटर असेल तसे असतात. (तक्ता खालीलप्रमाणे)

तर सिंचनाचे दर हे घनफलाकात्मक असून त्यांचा दर सेंटस् 18 ते 19 दर घनमीटरला म्हणजे 18 X 50 = 9000 पैसे = 90 रू./ घनमीटर हे असे महागडे पाणी वापरतात. परंतु उत्पादनात मात्र जगात अग्रेसर आहेत. कापूस दर हेक्टरी 55 क्विंटल तर अंगूर 50 टन / हेक्टर. गायीचे दूध 10200 लिटर / वर्ष (भारतीय कोणतीही गाय 10 लिटर रोज दूध देते असे गृहीत धरले तर 3650 लिटर वर्षाचे झाले) स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकूण उत्पादनात 7 पट वाढ केलेला हा इस्त्राईल देश आहे.

खजूराची शेती :


वाळवंटात येणारे मोठे उत्पादन म्हणजे खजूर. हे झाड म्हणजे वाळवंटात वरदानच आहे. एकूण नऊ प्रकारच्या खजूरांपैकी 4 प्रकार पाहण्यात आले. 1. मजूळ 2. बेरी येलो 3. ऐकेल नाऊ 4. झालूदी ही झाडे 9 मी X 9 मी. अंतराने लावतात. म्हणजे एकेका झाडाला 81 चौ.मी. एवढी जागा लागते. पाच पाच वर्षे पाण्याविना राहणारे झाड पन्नास वर्षापेक्षा अधिक राहू शकते. चौथ्या किंवा पाचव्या वर्षी फळ देण्याला प्रारंभ झालेले झाड दरवर्षी 80 ते 100 किलो फळ देते. फळे तोडण्यासाठी माणसाला उंच नेणारे मशिन तयार केले आहे. मशिन जेवढे उंच नेऊ शकेल तेवढे झाड वाढू दिले जाते. ऑगस्ट ते सप्टेंबर हा फळ तोडण्याचा हंगाम. एका किलोचे त्या शेतकऱ्याला 70 शेकेल (शेकेल ही इस्त्राईलची करन्सी असून 1 शेकेले = 12 रू.) म्हणजे एका किलो पासून 840 रू. मिळतात. एक झाड 8400 रूपये मिळवून देऊ शकते.

खजूराच्या झाडाला हिवाळ्यात 200 लिटर तर 700 लिटर / दिवस उन्हाळ्यात पाणी लागते. सलाईन किंवा क्षारयुक्त पाणी चालत असल्यामुळे पुनर्वापराचे पाणी (Recycled water) दिले जाते. खजूराच्या झाडाची मुळे पाच ते सहा मीटर खोल जातात तर 20 मीटर पर्यंत आडवी पसरतात. म्हणून इस्त्राईल मधला शेतकरी महिन्याला रू.70000/- कमावतो.

नेटाफीम :


ही ठिबक सिंचनाची कंपनी आहे. जगभर मोठे जाळे पसरले असून भारतातही विस्तार पावत आहे. टिबेरियस नावाच्या गावाजवळ मुख्यालय असून श्री.झीव (ZIV) हे अॅग्रोनॉमिस्ट सध्या मुख्यालय सांभाळतात. पीचेस, अंगूर आणि डाळींब यावर संशोधन चालू आहे. डाळींबाचे संशोधन आश्चर्यकारक आहे. नऊ प्रकारचे झाड वाढवले जाते, एका आड एक झाड विरूध्द दिशेला वाकवून दोन झाडातील अंतर कमी केले आहे. सरासरी 500 ते 1000 ग्रामचे डाळींब घेतले जाते. अंगूर दर हेक्टरी 40 टन घेऊ शकत असताना दारूसाठा विशेष वाढ करून 15 टनच घेतले जाते.

कोल्ड स्टोरेज (Cold Storage) :


किर्यात शमोना या गावतले कोल्ड स्टोरेज 100 चेंबर्सचे होते तर एकेका चेंबरची क्षमता 60 टन एवढी होती उणे 10 (- 18 डीग्री) इतके तापमान साठविलेल्या मालाचे केले जाते.

अलमॉग नावांचे किबुट्झ :


इस्त्राईलने वेगवेगळ्या देशातून आलेल्या ज्यू मंडळींच्यासाठी किबूट्झ म्हणजे वस्त्या / गावे वसविली. अलमॉग या गावांत 150 कुटुंबे राहात होती. 400 लोकवस्तीचे हे किबूट्झ आता ओस पडत चालले आहे. किबूट्झने सामूहिक उद्योग यशस्वीपणे चालविले आहेत. पण आर्थिक प्राप्ती वाढताच किबूट्झ सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

भारतातही शेती या उद्योगाभोवती गावे वसविली गेली. कृषिप्रधानता होती तोपर्यंत भारतातली गावे टिकली. आता मात्र बकालपणा वाढत चालला आहे. भारतात ही गावे (ग्रामस्वराज्य) हजारो वर्षे टिकली. इस्त्राईलमध्ये 50 वर्षात त्यांचा दम उखडला. आधुनिक शेतीने (ग्रामस्वराज्य) हळूहळू विस्कळीत होत आहे. हे सत्य आहेच. जीवन पध्दतीचे पाश्चात्यीकरण हेही कारण आहेच.

अशा या इस्त्राईलने जगासमोर आदर्श उभा केला आहे. जीवनाच्या विविध पैलूंवर त्यांनी आघाडी मारली आहे. प्रोफेशनल स्कील ( व्यावसायिक गुणवत्ता) व टीम वर्क (एकत्र काम करण्याची शैली) यामुळे साधलेल्या प्रगतीचे पाणी - शेती च्या मर्यादेतच ही लेखनसीमा. सामूहिक पुरूषार्थाच्या आधारावर WASTE IS ENERGY हे सिध्द करणारा देश म्हणजेच इस्त्राईल.

श्री. रमेश पांडव, उस्मानाबाद - (भ्र : 9730081661)

Path Alias

/articles/saamauhaika-paurauusaarathaacae-utatama-udaaharana-isataraaila

Post By: Hindi
×