रसमय आप


पावसाचे पाणी आकाशातून पडताना सर्वत्र एकाच प्रकारचे असते, परंतु ज्या प्रकारच्या जमिनीवर ते पडते व ज्या ऋतूत पडते त्यानुसार त्याचे गुण बदलतात. मूळचे आकाशातून पडणारे पाणी शीतल गुणधर्माचे, शुध्द कल्याणकारक, स्वादिष्ट, स्वच्छ व हलके असे सहा गुणांनी युक्त असते. चरकसंहितेत पावसाचं सुंदर वर्णन आलं आहे. असं हे सुंदर व पवित्र ‘आपतत्त्व’ मानवी शरीरातही मोठ्या प्रमाणावर आहे.

पंचमहाभूतांतील जलतत्वांत आपला वास कसा आहे हे अर्जुनाला सांगताना भगवंत म्हणतात, रसोऽहमप्सु कौन्तेय। ज्ञानेश्वर म्हणतात कुंतीपुत्रा, जलामध्ये जो असे रस, तोच मी. ह्या जलतत्वातील क्षीराब्धीत भगवान विष्णूचा वास आहे अशी आमची धारणा आहे.

विश्वातील सजीव सृष्टीची सुरूवात ज्यात झाली ते पंचमहाभूतातील ‘आप’ किंवा ‘जलतत्व’ हे दुसरं तत्वं. ह्या पृथ्वीवर पंचवीस टक्के जमीन तर पंचाहत्तर टक्के पाणी आहे. अर्थातच हे पाणी नद्या, तलाव, सरोवर यातील पाण्याच्या व बर्फाच्या रूपात गोठलेलं तसेच समुद्रातील पाणीसाठा यामध्ये साठवलेले आहे. या साठवलेल्या पाणीसाठ्यातून पावसाच्या रूपाने आपल्याला गोड पाणी मिळते, पृथ्वीवरच्या नियमित ऋतुचक्रामुळे हे जलचक्रही अविरत सुरू असते. पावसाच्या रूपात धरतीवर येणारे हे गोड व शुध्द पाणी फक्त तीन टक्के असते. त्यापैकी दोन्ही ध्रुवांवर व ग्लेशियर्सच्या रूपात दोन टक्के पाणी गोठलेल्या स्थितीत साठलेले असते.

भूपृष्ठाखाली खोल तीनशे फूटांवर ‘झिरो पॉईन्ट साठा’ (०.६० टक्के) असे पाणीसाठा रूपात असते, तर पृथ्वीवर असणारे गोड पाणी ‘झिरो पॉईन्ट चाळीस (०.४० टक्के) ’ असते. हे पाणी नद्या, तलाव, सरोवरातील पाण्याच्या रूपात असते. बाकी ९७ टक्के पाणी हे सागराच्या खार्‍या पाण्याचा साठा असतो, यावरून आपल्याला गोड पाण्याचे माहात्म्य कळावे. केवळ गोड पाण्यामुळेच मानवाने नदीकाठी वसाहती केल्या. ऑमेझॉन, टायग्रिस, नाईल, यांगत्से, सिंधू अशा जगातील निरनिराळ्या भागातील नद्यांच्या खोर्‍यात वेगवेगळ्या संस्कृती फुलल्या - बहरल्या. उत्तर ध्रुवावरून आलेल्या आर्यांनी सिंधू नदीच्या खोर्‍यात वसाहत केली. त्यावेळी त्यांनी नदीला कालवे काढले होते. शेतीसाठी पिण्यासाठी दैनंदिन वापरासाठी हे गोड पाणी त्यांनी उपयोगात आणले. नंतरच्या काळात जसजसे माणसांचे स्थलांतरण झाले तसतसे गावतळी, विहीरी, बंधारे, धरणं हेही पाण्याची गरज पुरवणारे पाणीसाठे निर्माण झाले. नद्.या तरून जाण्यासाठी होड्यांचा शोध लागला, तसा निसर्गाचा शोध घेत घेत स्वत:चाही शोध घ्यायला त्याने सुरूवात केली. अनेक कथा मानवाने स्वत: भोवती व या दृष्यामान जगाबाबत रचल्या. आपल्या अदृष्य मनाचा वेध घ्यायला त्याने सुरूवात केली.

आर्यांच्या मते नर्मदा ही सर्व प्रथम सात हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर आलेली नदी, राजा भगीरथाने सातत्याने अनेक वर्ष प्रयत्नांची शिकस्त करीत हिमालायातील गंगोत्रीहून गंगेचा प्रवाह खाली भूतलावर आणला तो पाच हजार वर्षांपूर्वी. गंगेमुळे साठ हजार सागरपुत्रांना ‘मुक्ती ’ मिळाली. शिवाय ‘गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आली’ असे मानवल्यामुळेही गंगा ही पवित्र नदी मानली गेली. यमुना नदी व श्रीकृष्ण असं अद्वैत आहे, तर सरस्वती ही साक्षात वेदांत वर्णिलेली नदी. त्यामुळे गंगा, यमुना, सरस्वती ह्या तिन्ही नद्या व त्यांचा संगम ‘प्रयाग’ हे तिर्थस्थान झालं. सरस्वती ही अनेक ठिकाणी गुप्तरूपात वाहते. उत्तर भारतातील सर्व नद्या हिमालयात उगम पावतात त्यामुळे त्यांना बारमाही भरपूर पाणी असते. गंगा, यमुना, सरस्वतीप्रमाणे मानससरोवरात उगम पावणार्‍या ब्रम्हपुत्रा, सिंधू, सतलज, कर्नाळ या सर्व नद्या तिबेटच्या पाठारावरून वाहत येवून भारतात येतात. यातील कर्नाळ नदी ही भारतात शरयू म्हणून ओळखली जात, जिच्या काठावर ईश्वाकूवांसीयांची अयोध्यानगरी वसली आहे. या सर्व नद्यांनी ‘भारतीय संस्कृती, मानवी जीवन व भारतीय अध्यात्मिक जीवन’ संपन्न केले. कारण यांच्या काठावर अनेक ऋषी - मुनी यांना तपसाधना - ज्ञानसाधना केल्या. भारतीय संस्कृतीला एक नवा आयाम मिळवून दिला, एक नवी अध्यात्मिक दिशा दिली.

पावसाळ्यातील काळेभोर ढग, चकाकणार्‍या विजा, गंभीर मेघगर्जना, धो - धो कोसळणारा पाऊस, ‘धबधबा तोय आदळे’ च्या चालीवर कोसळणारे धबधबे, पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने निर्माण झालेल्या दर्‍याखोर्‍या, हिमालायातील ग्लेशियर्स, मैलोन्मैल वाहणार्‍या गोड पाण्याच्या नद्या, त्यांना येणारे पूर व महापूर, समुद्राचा क्षितीजापर्यंत पसरलेला अथांग व असीम पाणीसाठा या सार्‍यांतून दिसणार्‍या - जाणवणार्‍या या जलतत्वाचं दर्शन आश्‍चर्यचकित करणारं, स्तंभित करणारं आहे. त्यात समुद्रातील लाटा, भरती - ओहोटी, समुद्राची गाज, त्याचप्रमाणे जर त्सुनामी आली तर त्यातून होणारे निसर्गाचे भयानक दर्शन जलतत्वांतील महाभूताचे व्यापक दर्शन घडवते, भयचकित करते. अनेक सूक्ष्म व अजस्त्र महाकाय जलचर या जलतत्वलांत राहतात. समुद्रतळाशी असलेली वनस्पतीसृष्टी व ‘जीवो जीवस्य जीवनम्।’ या न्यायाने त्याचं खाद्यही निसर्ग त्यांना या जलसाठ्यातच देत असतो. आपल्या धार्मिक रूढींमध्ये जसे गंगास्नान तसे समुद्रस्नानही पुण्यदायी मानले जाते. त्यामुळे गंगासागर वा रेवासागर पवित्र मानले जाते. कारण हा गंगा व नर्मदा व सागराचा संगम आहे. नदी व सागर संगमाचे रूपक पत्नी व पतीच्या मीलनातही मानले गेले आहे.

साहित्यात जलतत्वाचं वर्णन वैदिककालापासून येतं. देव आणि दानवांनी मिळून अमृतप्राप्ती साठी सागराचे मंथन केले. त्यावेळी अमृतकुंभासह चौदा रत्नं सागरातून बाहेर आली ही कथा सर्वांनाच माहीत आहे. ‘वरूण’ ही जलतत्वाची देवता मानतात. असीम - अथांग सागराला महासागर, महोदधि, महार्णव, रत्नाकर, समुद्र अशा अनेक नावांनी संबोधिले जाते. गंगेलाही आम्ही फार पवित्र मानतो. गंगेच्या पाण्याने स्नान करून सूर्याला अर्ध्य देतो, पितरांना तर्पण करतो, गंगाजल मृत्युसमयी धारण करतो. इतकेच नाही तर गावाकडच्या छोट्या नदीलाही गंगाच म्हणतो. तेच पावित्र्य प्रवाहात पाहतो. या सार्‍या आध्यात्मिक गोष्टी फक्त भारतीय संस्कृतीत येतात. प्राचीन वाङमयात पर्जन्यास्त्राचा उल्लेख येतो.

‘अग्नि-अस्त्र’ शमविण्यासाठी पर्जन्यास्त्राचा वापर केल्याचे उल्लेख अनेक ठिकाणी येतात. वरूण पर्जन्याची देवता असल्याने आमच्या नौदलाचे बोधवाक्य ‘शं नो वरूण:।’ - वरूणदेवता आमचे रक्षण करो, असे आहे.भारताचा खूप मोठा भूभाग या जलतत्वाने सुरक्षित केला आहे. रामायण, महाभारत, इतर महाकाव्य, शंकराचार्यांचे ‘गंगालहरी’ व ‘नर्मदाष्टक’ तसेच इतर साहित्यांतून पावसाची - समुद्राची - नदीकाठच्या सौंदर्याची अनेक वर्णने येतात. ‘गंगाया:चश्‍चल तीरे शतश्‍चंद्र नभ: स्तलम्। ’ हे काव्य किती मनमोहक आहे. गंगेच्या पाण्यात आम्ही दीप सोडतो, या सार्‍याला एक अध्यत्मिक माहात्म्य प्राप्त होते. मेघदूतात कालिदासाने ‘महांकालाच्या सायंकालीन पूजेच्या वेळी होणारा मेघाचा गडगडाट हा शिवशंकराच्या पूजेच्यावेळी पूर्ण होणारा गायनाच्या संचांतील चौघड्यांचा आवाज’ - असं म्हणूनच म्हटलंय. ‘सत्तावीसातून नऊ गेले तर शून्यच उरले हाती, पडतील स्वाती तर पिकतील मोती’ असं पावसाळी नक्षत्रांचं वर्णन तसंच अनेक भावगीतं अन् सिनेगीतं यातून पावसाचं वर्णन येतं. त्याशिवाय पावसाळा हा प्रणयाचा - मीलनाचा काळ असंही वर्णन साहित्यात आढळतं. तसेच अनेक धार्मिक कार्यक्रम, सणसमारंभ, व्रतवैकल्य व पंढरीची वारी हेही चातुर्मासातच येतात.

‘जलमेकविधं सर्व पपत्यैन्द्रं नभस्तलात्।
तत्तत्त्पतितश्‍चैव देशकालावपेक्षते॥
शीतं शुचिं भ्रष्टं विमलं लघु षड्गुणम्॥’
(चरकसंहिता अध्याय ३७)


पावसाचे पाणी आकाशातून पडताना सर्वत्र एकाच प्रकारचे असते, परंतु ज्या प्रकारच्या जमिनीवर ते पडते व ज्या ऋतूत पडते त्यानुसार त्याचे गुण बदलतात. मूळचे आकाशातून पडणारे पाणी शीतल गुणधर्माचे, शुध्द कल्याणकारक, स्वादिष्ट, स्वच्छ व हलके असे सहा गुणांनी युक्त असते. चरकसंहितेत पावसाचं सुंदर वर्णन आलं आहे. असं हे सुंदर व पवित्र ‘आपतत्त्व’ मानवी शरीरातही मोठ्या प्रमाणावर आहे. रक्तरूपाने ते शरीरभर वाहते. अश्रूंच्या रूपात प्रेम, आनंद, पश्‍चात्ताप, दु:ख व्यक्त करते. कफ, लाळ व मलमूत्राच्या रूपात शरीरशुध्दी करते. केवळ मानवालाच नाही तर - पशू, पक्षी, वनस्पती सृष्टी - सर्वच सजीवांना या जलतत्वाने- जीवनाने ‘जीवन’ दिलं आहे. आपल्या शरीरात हे जलतत्व वाहत असतं तोवरच आपलं जीवन असतं, नाहीतर ते संपतं. म्हणूनच जलतत्वाला जीवन म्हणतात. जे पृथ्वीवर चिरकाल टिकतं. ज्याच्यामुळे वारंवार नवी सृष्टी निर्माण होते, भगवतांनी जीवनाला ‘रस’ असे म्हटलं आहे. रस फळात असतो. रस जीवनात असतो. एखाद्या कलाकृतीचे ‘रसग्रहण’ केले जाते. जीवन ‘रसपूर्ण’ जगलं जातं. कारण भगवान जसे जलातील रस आहेत तेच ब्रम्हांडातील रसतत्व आपल्या शरीरात आहे. आपल्या पूर्वजांनी खूप अभ्यास करून हे शरीरातील जलतत्व व पृथ्वीवरील जलतत्व यांची एकरूपता सांगितली आहे. हे आध्यात्मिक शोधकार्य करताना केवढे परिश्रम घ्यावे लागले असतील त्यांना. चरकसंहिता, वैद्यकशास्त्र यांसारख्या अनेक ग्रंथांतून हा विचार प्रकर्षाने मांडला जातो.

अशा या शुध्द जलतत्वाचे सध्या मात्र प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होते आहे. नद्यांना धरणं बांधली, कालवे काढले. मग कालव्यातून शुध्द पाण्याचा पुरवठा होवू लागला. नदीपात्र कोरडी पडली. त्या कोरड्या पात्रात सांडपाणी - दूषित पाणी सोडण्यात आले. त्यामुळे या प्रदूषित पाण्याने रोगराई वाढली. लोकसंख्या वाढीचा भस्मासूर, आधुनिक जीवनशैलीसाठी वाढलेली कारखानदारी हेही यासाठी जबाबदार आहे. तसेच नागरिकांची वाढत चाललेली बेफिकीर वृत्ती, शिळे पाणी अशासारख्या कल्पना जनतेने सोडाव्या म्हणून अनेक वैज्ञानिक, निसर्ग-सेवक व समाजधुरीण प्रयत्नांची शिकस्त करतात.

आजही या सर्वांचे कार्य प्राचीन ऋषिमुनींइतकेच महत्वपूर्ण आहे. अजूनही समाजात पाण्याचे समान वाटप होत नाही. ग्रामीण भागातील समस्या उन्हाळ्यात तीव्ररूप धारण करतात. खरं पाहता, आपल्या ऋषीमुनींनी फार पूर्वीच विचार करून पाण्याचे उपयोजन कसे करावे हे सांगून ठेवले आहे. पृथ्वीवरच्या पडणार्‍या पावसाच्या पाण्याबाबत ‘तैत्तिरीय उपनिषदात’ असे म्हटले आहे की, ‘पावसाच्या पाण्याचे बारा भाग करावेत, त्यातील दोन भाग पाणी माणसांना, दोन भाग पाणी वनस्पतींना, दोन भाग पाणी प्राण्यांना वापरण्यात द्यावे. उरलेले सहा भाग पाणी निसर्गाला नद्यांतून परत करावे. हे पाणी नद्यांतून वाहत जावून समुद्रात परत जाईल हे पहावे.’ किती सुंदर विचार आहे का ! शुष्क नि निरस जीवन जगण्यापेक्षा पूर्वजांनी आध्यात्मिक विचारांद्वारे सांगितलेले तत्वज्ञान उपयोगात आणून पाण्यासारखे प्रवाही व रसपूर्ण जीवन जगूया ! कारण या जलातील रसतत्वांत भगवंतांचे अधिष्ठान आहे. जे ब्रम्हांडी तेच पिण्डी या न्यायाने आपल्याही अंतरात भगवंतांचे अधिष्ठान असू दे !

आशा कुलकर्णी, पुणे - मो : ९८८१७३१४५५

Path Alias

/articles/rasamaya-apa

Post By: Hindi
×