रंगीत ढोबळी मिरचीचे विक्रमी उत्पादन व विक्रमी नफा


ज्याप्रमाणे इतर क्षेत्रांमध्ये नवीन तंत्रज्ञान येत आहेत त्याचप्रमाणे शेती क्षेत्रात ही खूप बदल होत आहेत. नवीन प्रगत तंत्रज्ञान शेतकर्‍यांसाठी उपलब्ध होत आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून जमिनीचे क्षेत्र मात्र कमी कमी होत चालले आहेत. तसेच हवामानातही वारंवार बदल होत आहोत. कधी अति जास्त तापमान, कधी अतिवृष्टी, कधी अति थंडी त्यामुळे उत्पादनावर मोठा विपरित परिणाम होतांना दिसतो. ह्यामुळेच आता शेतकरी नियंत्रित शेतीकडे वळू लागले आहेत. कमी जागेत अधिक उत्पादन सहज घेता येते हे शेतकर्‍यांच्या लक्षात येवू लागले आहे. नियंत्रित शेती (पॉली हाऊस) मध्ये पिकांची गैर मौसमी लागवड करून ज्यावेळी भाजीपाला बाजारात उपलब्ध असतो त्यावेळी पॉली हाऊसमध्ये गैर मौसमी भाजीपाला लागवड करन अधिक नफा मिळविता येतो. त्यामुळे शेतकरी आता नियंत्रित शेतीकडे वळू लागले आहेत.

अनंतने रंगीत ढोबळी मिरचीह्या वरील सर्व बाबींचा अभ्यास करून अनंत नितीनचंद्र परिहार, गाव - जांभोरे, तालुका - धरणगाव, जि. जळगाव स्वत: डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअर असून नोकरीचा विचार न करता शेतीमध्ये प्रगती करण्याचे ठरविले. ठिबक सिंचन पध्दतीवर कापूस पिकाचे एकरी २० क्विंटल उत्पादन मिळविले. कापूस पिकामध्येही प्रगत तंत्राचा अवलंब केला. ह्यावर्षी ही तूर पिक ही ठिंबक सिंचन वर लागवड केली असून फर्टिगेशन तंत्राचा वापर करीत आहे. अनंत परिहार ह्यांच्याकडे स्वत:ची १२ हेक्टर जमीन तीन ठिकाणी आहे. त्यातील ७ हेक्टर बागायती असून ५ हेक्टर कोरडवाहू आहे. ह्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही. बागायती ७ हेक्टर क्षेत्र सर्वच ठिबक सिंचनाखाली आहे. ह्यामध्येच मागील वर्षापासून पॉली हाऊसमध्ये रंगीत ढोबळी मिरचीचे उत्पादन घेत आहेत.

अनंत परिहार हा तरूण इंजिनिअर असल्यामुळे एकदम ह्या व्यवसायामध्ये शिरण्याआधी त्यांनी बर्‍याच ठिकाणी जावून प्रत्यक्ष पॉली हाऊस मधर्लल विविध पिकांची कार्केशन्स, गुलाब, जरबेरा, स्ट्रॉबेरी, काकडी, हिरवी ठोबळी मिरची, रंगीत मिरची या सर्व पिकांचा काळजीपूर्वक अभ्यास केला. शेतकर्‍यांसोबत चर्चा केली. केवळ लागवडीबाबत अभ्यास न करता त्याने विक्री कोठे, कशी करावी, मार्केट कुठे उपलब्ध आहे, दिल्ली, मुंबई, पुणे, औरंगाबाद, इंदौर मार्केटचा अभ्यास केला. त्यानंतरच त्यांनी रंगीत ढोबळी मिरची लागवडीबाबत निर्णय घेतला. शेतीमध्ये नवीन असून सुध्दा नवीन करण्याचे धाडस केले. प्रत्येक वेळी ह्या बाबत मी त्यांना मार्गदर्शन करीत होतो. जाती बाजारात कोणत्या उपलब्ध आहेत. रोपे कोठे उपलब्ध होतील, लागवड केव्हा किती अंतरावर करावी, गादीवाफे कसे बनवावेत, बेसल डोस, गादीवाफा कसा भरावा या बाबत खूप वेळा चर्चा करण्यात आली. अनंतने खाजगी कंपनीतून पॉली हाऊसची २ हजार चौ.मी. (२० गुंठे) क्षेत्रावर उभारणी करून घेतली. तांत्रिक दृष्ट्या सक्षम बाबत खात्री करून घेतली. पॉली हाऊसची संपूर्ण उभारणी नंतर त्यामध्ये ३ फूट रूंदीचे गादीवाफे करून घेतले.

गादीवाफ्यामध्ये मुरूम, चांगले कुजलेले शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश, निंबोळी पेंड, रॅली गोल्ड, ट्रायकोडर्माचे मिश्रण भरून घेतले. त्यानंतर जैन इरिगेशनकडून ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन यंत्रणा बसवून घेतली. पाण्याचा स्त्रोत विहीर असून विहीरीवर पाण्यात कचरा, पाला पाचोळा पडू नये तसेच पाण्यात शेवाळं तयार होवू नये ह्याकरिता ९० टक्के शेडनेट टाकून झाकून घेतली आहे. त्यानंतर गादीवाफे पूर्ण वाफसा अवस्थेत आणून घेतला. गादीवाफ्यावर बुरशीनाशकाची फवारणी करून घेतली. ३ फूट रूंदीच्या गादीवाफ्यांवर १६ मि.मी च्या दोन इनलाईन नळ्या पसरवून घेतल्या. दोन ट्रिपरमधील अंतर ३० सें.मी असून ट्रिपरचा प्रवाह २.४ लिटर तास आहे. रंगीत ढोबळी मिरचीची रोपे कुमार बायोटेक, पुणे यांच्याकडून आणली. बचाटा ही पिवळ्या रंगाची तर इन्सपीरेशनही लाल रंगाची ढोबळी मिरचीची जात आहे. रोपे आणल्यानंतर ३-४ दिवसांनी ती ६० X ४५ सें.मी अंतरावर गादीवाफ्यावर रोपांची व्यवस्थित लागवड करून घेतली. रोपांची लागवड ४ जुलै २०१५ रोजी केली. लागवडीनंतर २१ दिवसांनी शेंडा खुडून घेतला. त्यानंतर ७ दिवसांनी नॉयलॉनचे दोरा आधारासाठी नीट रोपांना बांधून घेतला. रोपांची चांगली वाढ होण्यासाठी १९ : १९ : १९ ह्या विद्राव्य खतांची फवारणी करून घेतली. लागवडीनंतर ३-४ दिवसांनी फर्टिलायझर टँकमधून फर्टिगेशन सुरू केले. फर्टिगेशन शेवटपर्यंत सुरू ठेवले. फर्टिगेशनसाठी ढोबळी मिरचीच्या अवस्थेनुसार १९ :१९ :१९, १२ :६१ :०, १३ :० :४५, ० :० :५० आणि कॅल्शीयम नायट्रेटचा उपयोग केला तसेच विद्राव्य खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केली. फुल गळ घेवू नये म्हणून प्लॅनोफिक्स संजीवकाची फवारणी केली. जमीन वाफसा अवस्थेत राहील एवढेच ठिबकने पाणी दिले. पाणी खत व्यवस्थापन आणि पिकसंरक्षण ह्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले, त्याकरिता श्री. जडे साहेबांच्या संपर्कात सातत्याने राहिलो.

ढोबळी मिरचीमध्ये पिक संरक्षणाचे व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे आहे. त्यात बरोबर पाणी व्यवस्थापन सुध्दा खूप महत्वाचे आहे. पाणी जादा दिले तर पिकांची वाढ खुंटते, बुरशीचे रोग वाढतात, मर रोग वाढतो, अन्नद्रव्येझिरपून जातात, त्यामुळे अन्नद्रव्यांच्या उणीवा आढळतात म्हणून ठिबक सिंचनाद्वारे जमिनी वाफसा अवस्थेत राहिला एवढेच ५ ते १५ मिनिटे ठिबकने पाणी दिले. पिकास पाण्याचा ताण पडू दिला नाही. रंगीत ढोबळी मिरचीसाठी प्रत्येक आठवड्यात एक वेळा कीटकनाशक व बुरशीनाशक यांची फवारणी केली. फवारणी करतांना किटकनाशक व बुरशीनाशक ह्यांचा पुन्हा पुन्हा वापर होणार नाही याची काळजी घेतली. काही वेळा त्यांचे मुळाजवळ ड्रॅचिंग केले. ट्रायकोडर्माचे ड्रेचिंग केले. फवारणी सोबत काही वेळी संजीवके सूक्ष्म अन्नद्रव्ये, विद्राव्य खंतांचाही उपयोग केला. रंगीत ढोबळी मिरचीची तोडणी सप्टेंबर अखेर तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली. नऊ महिन्यांपर्यंत रंगीत ढोबळी मिरचीची काढणी सुरू होती. मार्च अखेरला पिकांची काढणी संपली. अनंतने २६०० रोपे पिवळ्या रंगाची बचाटा जातीची ढोबळी लागवड केली होती. त्यापासून १०.२०० टन उत्पादन मिळाले. तसेच २६०० रोपे लाल रंगाची ढोबळी मिरचीचे इन्सपीरेशन जातीची लागवड केली होती. त्यापासून १०.५०० टन उत्पादन मिळाले. असे एकूण २० गुंठे क्षेत्रामध्ये २०.७०० टन उत्पादन रंगीत ढोबळी मिरचीचे मिळाले. म्हणजे एकरी ४१.४०० मे. टन उत्पादन मिळाले. अनंतच्या रंगीत ढोबळी मिरची पिकास मी स्वत: प्रत्येक महिन्यास भेट दिली.

अनंतने रंगीत ढोबळी मिरची आझारपूर मंडी, दिल्ली, मुंबई येथे विक्री केली. त्यास सरासरी ५५ रू. किलो दर मिळाला. त्यापासून ११,३८,५०० करूपये ढोबळ उत्पन्न मिळाले. ढोबळी मिरचीसाठी साधारपणे पॉलीहाऊस, ठिबक सिंचन, जनरेटर, पॉलीहाऊसला केलेले कंपाऊंड ह्यांचे आयुष्य १० वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे त्याचा घसारा विचारात घेणे गरजेचे आहे. तसेच पॉलीहाऊसमध्ये वापर केलेल्या नायलॉन धागे, दोर्‍यास अँगल निदान २ ते ३ वर्षे उपयोगात येणार आहेत. पॉलीहाऊससाठी १५ लाख रूपये खर्च आला असून ५० टक्के कृषि विभागाकडून अनुदान प्राप्त झाले. जनरेटरसाठी ७५००० रूपये खर्च आला. ढोबळी मिरचीची या वर्षीही लागवड केलेली आहे. ह्या वर्षी २५ टन पेक्षा अधिक उत्पादन घेण्याचे लक्षांक ठेवले आहे. पॉलीहाऊस मधील शेतीमध्ये कमी जागेत, कमी वेळेत अधिक आर्थिक नफा झाला. शेतकर्‍यांनी कमी जागेत अधिक उत्पादन आणि अधिक आर्थिक नफा मिळवायचा असेल तर नियंत्रित वातावरणातील शेती हाच त्यावर उत्तम पर्याय आहे. मोकळ्या शेती मध्ये हवामानातील बदल, कमी - अधिक तापमान, अवकाळी पाऊसह्या सारख्या समस्या असतात. त्या पॉलीहाऊसमध्ये घेतलेल्या पिकांना त्यांचा त्रास होत नाही व आर्थिक नुकसान होत नाही. ह्या तंत्रज्ञानाचा वापर करतांना पिकांविषयी, त्यांच्या विक्री पध्दती बाबत संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.

श्री. बी.डी. जडे, जळगाव, मो : ९४२२७७४९८१

Path Alias

/articles/rangaita-dhaobalai-mairacaicae-vaikaramai-utapaadana-va-vaikaramai-naphaa

Post By: Hindi
×