रब्बी/उन्हाळी हंगामातील पिकांसाठी सूक्ष्मसिंचन पध्दतीचा वापर : काळाची गरज


त्यामुळेच रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकासाठी ठिबक सिंचन किंवा सूक्ष्म सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. कमी पाण्यात कमी वेळेत अधिक क्षेत्रासाठी सिंचन करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीशिवाय दुसरा पर्याय नाही. ह्या तंत्राच्या वापराने पिकांचे विक्रमी उत्पादन मिळणे सहज शक्य असल्याने आर्थिक उत्पन्नात सुध्दा वाढ होईल. त्यामुळे सूक्ष्म सिंचन पध्दतीवर प्रगत तंत्राने रब्बी हंगामातील पिकाची लागवड करणे काळाची गरज आहे.

खरीपाच्या हंगामातील ज्वारी, मका, सोयाबीन, उडीद, मूग काढण्याचे काम सुरू आहे. काहींचे आटोपले असून रब्बी हंगामातील पिके लागवडीचे नियोजन सुरू आहे. ह्या वर्षी पाऊस चांगला समाधानकारक झाल्याने विहीरी मध्ये पाणी चांगले समाधानकारक असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडीसाठी पाणी उपलब्ध आहे त्यामुळे रब्बी हमगामामध्ये पिकांची लागवड होणार आहे. पाणी भरपूर भरपूर उपलब्ध म्हणून रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, मका इ. पिकांसाठी पाटपाणी / मोकाट सिंचन पध्दतीचा शेतकर्‍यांनी अवलंब करू नये. पाटपाणी पध्दतीमध्ये पिकांना पाणी देण्याऐवजी जमिनीस पाणी दिले जाते खूप पाणी दिले म्हणजे अधिक उत्पादन मिळते असा गैसमज आहे. पाटपाणी पद्दतीमध्ये फक्त ३-४ दिवस जमीन वाफसा राहतो.

अशा वेळी रब्बी हंगामातील पिकांच्यासाठी सूक्षिमसिंचन (ठिबक सिंचन अथवा तुषार सिंचन) चा वापर करणे अधिक फायदेशीर ठरणार आहे. सूक्ष्मसिंचन पध्दतीमुळे कमी पाण्यात, कमी वेळेत, कमी विजेत अधिक क्षेत्रावर पिकांची लागवड करणे सहज शक्य होते. रात्री सुध्दा पिकांना एकसमान पाणी देता येते. रब्बी हंगामात शेतकरी गहू, हरभरा, मका, कांदा, बटाटा, सूर्यफूल, रब्बी ज्वारी ह्या पिकांची पारंपारिक पध्दतीने लागवड करीत असतात त्यामुळे पिकांचे उत्पादन कमी मिळते. त्यामुळे आर्थिक नफाही कमी मिळतो. त्यामुळे वर्षानुवर्षे करीत येत आलेल्या ह्या पिकांच्या लागवडीसाठी प्रगत तंत्राचा वापर करणे गरजेचे आहे. कमी पाण्यात अधिक क्षेत्र लागवडीखाली कसे आणता येईल ह्या करीता सूक्ष्म सिंचन पध्दतीचा अवलंब करणे आता काळाची गरज झालेली आहे.

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, मका, सूर्यफूल, बटाटा, ज्वारी ह्या पिकांची पारंपारिक पध्दतीमध्ये सपाट, वाफा, व सरीवरंबा पध्दतीने लागवड केली जाते. दागीवाफा पध्दतीवर लागवड अधिक फायदेशीर आहे. गादी वाफ्यामध्ये हवा, पाणी ह्यांचे संतुलन योग्य राखले जाते, सूक्ष्मसिंचन पध्दतीमध्ये जमिनीमध्ये कायम वाफसा होते. त्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते व चांगला आर्थिक फायदा होतो.

गहू, हरभरा, भुईमूग, कांदा पिकांसाठी ९० से.मी रूंदीचा गादी वाफा तयार करावा. गादी वाफ्याची उंची २५ ते ३० सें.मी असावी. मका आणि बटाटा लागवड करण्यासाठी गादी वाफ्याची रुंदी ७५ सें.मी व उंची २५ ते ३० सें.मी असावी. गहूची पेरणी करतांना दोन ओळींमध्ये २२.५ सें.मी अंतर ठेवावे. तर हरभरासाठी जातीनुसार दोन ओळीत ३० ते ४५ सें.मी अंतर ठेवावे. तर दोन रोपामध्ये १० ते १५ सें.मी अंतर ठेवावे.

मका व हरभर्‍याची टोकण पध्दतीने लागवड करावी. मका पिकाचे दोन ओळीमध्ये ३० ते ४० सें.मी अंतर ठेवावे तर दोन रोपांमध्ये २० ते २५ सें.मी अंतर ठेवावे. मका प्रमाणेच रब्बी ज्वारीची ठिबक वर लागवड करता येते. त्यामुळे ज्वारीचे विक्रमी उत्पादन मिळते.

बटाट्याची लागवड करतांना दोन ओळीमध्ये ३० सें.मी अंतर ठेवावे तर दोन कंदामध्ये अंतर २० ते २५ सें.मी अंतर ठेवावे. कांदा पिकाची लागवड करतांना दोन ओळीत १० सें.मी तर दोन रोपांमध्ये ही अंतर १० सें.मी ठेवावे. ९० सें.मी रूंदीच्या गादी वाफ्यावर कांद्याच्या नऊ ओळी लागतील.

भुईमूगाची लागवड करतांना दोन ओळीत ३० सें.मी तर दोन झाडांत १० सें.मी अंतर ठेवावे किंवा दोन ओळीत २० सें.मी तर दोन झाडात २० सें.मी अंतर ठेवावे. भुईमूगाची टोकण पध्दतीने लागवड करावी.

सूर्यफुलाची लागवड सुध्दा ठिबक सिंचन पध्दतीवर करता येते. दोन ओळी मध्ये ४५ ते ५० सें.मी तर दोन रोपांमध्ये २५ ते ३० सें.मी अंतर ठेवावे. एका गादी वाफ्यावर सूर्यफुलाच्या दोन ओळी टोकण पध्दतीने लागवड कराव्या.

दोन गादी वाफ्यामध्ये दीड ते दोन फूट रूंदीची सरी सोडावी. त्या सरीचा उपयोग गादी वाफ्यावरील तण काढण्यासाठी सरीमध्ये बसून तण काढता येईल तसेच औषधी फवारणीसाठी, रासायनिक खते देण्यासाठी सरीतून जाता येईल. ह्या पध्दतीने काम करण्यास सुलभ जाते. गादी वाफ्यावर गहू, हरभरा, कांदा, मका, बटाटा, सूर्यफुल, भुईमूग ह्या पिकाची वर सुचविल्याप्रमाणे लागवड केल्यानंतर मात्र ह्या पिकासाठी पाणी भरपूर उपलब्ध आहे म्हणून पारंपारिक मोकाट सिंचन पध्दतीने पाण्याचे व्यवस्थापन न करता सूक्ष्म सिंचन पध्दतीचा अवलंब करणे अधिक फायदेशीर ठरते. ह्यामध्ये ठिबक सिंचन किंवा सूक्ष्म तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करता येतो.

सूक्ष्म सिंचन पध्दतीचा निवड : गहू, हरभरा, कांदा, भुईमूग, सूर्यफुल, बटाटा ह्या पिकासाठी ठिबक सिंचन आणि सूक्ष्म तुषार (मायक्रो स्प्रिंकलर्स, रेनपोर्ट सिस्टिम) सिंचन पध्दतीचा अवलंब करता येवू शकतो. गहू, हरभरा, कांदा, भुईमूग, सूर्यफुल, मका ह्या पिकाची गादी वाफ्यावर लागवड करण्यापूर्वी इनलाईनची (जैन टर्बो एक्सेल, जैन टर्बो अ‍ॅक्युरा,जैन टर्बो स्लीम, जैन टर्बो लाईन) उभारणी करून घ्यावी. गादी वाफा वाफसा अवस्थेत आणल्यानंतर पेरणी किंवा लागवड करावी. प्रत्येक गादी वाफ्यासाठी एक इनलाईन नळी गादी वाफ्याच्या मध्यभागी ठेवावी. नळी सरळ ठेवावी आणि शेवटी नळी खुंटीला बांधावी म्हणजे इनलाईन नळी गादी वाफ्यावर सरळ राहील. त्यामुळे संपूर्ण वाफा वाफसा अवस्थेत ठेवण्यास मदत होईल. दोन इनलाईन नळ्यामध्ये अंतर ४.५ ते ५ फूट अंतर ठेवावे. दोन ड्रिपरमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार ३० ते ५० सें.मी अंतर ठेवावे. ड्रिपरचा प्रवाह सुध्दा जमिनीचा प्रकारानुसार २.४ ते ४ लि. प्रति तास निवड करावी.

तसेच गहू, हरभरा, कांदा, भुईमूग, सूर्यफुल, बटाटा ह्या पिकासाठी ठिबक सिंचन आणि रेनपोर्ट सिस्टिम किंवा सूक्ष्म तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करता येतो. ह्यामध्ये मायक्रोस्प्रिंकलर्सचा उपयोग करावयाचा असल्यास दोन मायक्रो स्प्रिंकलर्स मध्ये ३ x ३ मीटर किंवा ४ मीटर अंतर ठेवावे. दोन मायक्रो स्प्रिंकलर्स मधील अंतर स्प्रिंकलर्सचा प्रवाहानुसार ठेवावे.

रेनपोर्ट सिस्टिम मध्ये सुपर १०, ५०२२, ५०१ यु, ५०२ एच हे मॉडेल उपलब्ध आहेत. रेनपोर्ट सिस्टिम मध्ये पाण्याचा थेंब नेहमीच्या पितळी स्प्रिंकलरचा वापर करतांना १० x १० मीटर अंतर ठेवावे. तर ५०१ यु, ५०२ एच यांचा वापर करतांना ६ x ६ अंतर ठेवावे. रेनपोर्ट सिस्टिम मध्ये पाणी वापर कार्यक्षमता ८० ते ८५ टक्के मिळते. नेहमीच्या स्प्रिंकलरपेक्षा पाणी वापर कार्यक्षमता अधिक असते. ह्यांचा उपयोग ककांदा, भुईमूग, आले, हळद इत्यादी पिकांना ही करता येतो. ह्या दोन्ही सिंचन पध्दतीमध्ये पाण्याच्या प्रत्येक थेंबावर आपले नियंत्रण असते. पाटपाणी पध्दतीमध्ये हे शक्य होत नाही. पाणी वापर कार्यक्षमता अधिक मिळते.

ह्याचबरोबर ह्या पिकांच्या अधिक उत्पादनासाठी संतुलीत रासायनिक खतांचा वापर करणे गरजेचे आहे. ठिबक सिंचनातून पाण्यात विरघळणारी युरिया, अमोनिया सल्फेट, १२:६१:०, १३:०:४५, ०:०:५०, पांढरा पोटॅश ही खते व्हेंचुरी किंवा फर्टिलायझर टँकमधून देता येतात. पारंपारिक रासायनिक खते पारंपारिक पध्दतीच्या वापरामुळे खतांची कार्यक्षमता ४० ते ५० टक्के मिळते. पाण्यात विरघळणारी खते ठिबक मधून दिल्यास खत वापर कार्यक्षमता ८० ते ९० टक्के मिळते. त्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते, उत्पादनात भरीव वाढ होते तसेच गुणवत्ता ही चांगली मिळते. रब्बी, बाजरी सारख्या पिकांमध्ये ठिबक सिंचनाचा वापर झालेला आहे. ज्वारीचे एकरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन तर उन्हाळी बाजरीचे एकरी १०.०० क्विंटल उत्पादन मिळाले आहे. रब्बी ज्वारीची लागवड ही मका प्रमाणे ठिबक सिंचन पध्दतीवर करता येते.

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना पाण्याची टंचाई, विजेची टंचाई, मजुरांची समस्या, रासायनिक खतांची टंचाई ह्या समस्या भेडसावत आहेत. ह्या समस्यांवर सूक्ष्म सिंचन पद्दतीचा वापर हा सर्वोत्तम रामबाण उपाय आहे. सूक्ष्म सिंचन पध्दतीच्या वापरामुळे पाणी वापरामध्ये ४० ते ५० टक्के बचत होते. ठिबक सिंचनाचा उपयोग पिकांना फक्त पाणी देण्यासाठी करू नये. पिकांना ज्या ज्या वेळी ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्याल त्या त्या वेळी पाण्यात विरघळणारी रासायनिक खते व्हेंच्युरी किंवा फर्टिलायझर टँक मधून द्यावीत.

सर्व झाडांना सारखे पाणी दिले जाते. जमीन कायम वाफसा अवस्थेत ठेवली जाते. ठिबक सिंचनामधून पाण्यात विरघळणारी खते दिल्याने खतांच्या वापरामध्ये २५ ते ३० टक्के बचत करता येते.

पिकांना पाण्याचा आणि अन्नद्रव्यांचा संतुलीत पुरवठ्यामुळे पिकांची वाढ जोमदार होते. दाणे चांगले भरले जातात. दाण्यांना वजन चांगले मिळते तसेच दाण्यांची गुणवत्ता ही चांगली मिळते. कांदे चांगले पोसले जातात. कांद्यांची साईज चांगली मिळते. लहान कांद्यांचे प्रमाण अतिशय कमी रहाते.

बहुउपयोगी ठिबक सिंचन पध्दती :


जवळच्या अंतराच्या पिकासाठी इनलाईन ठिबकचा वापर करावा. ह्या करिता विविध पर्याय उपलब्ध आहेत. ज्या शेतकर्‍यांना कृषी विभाग शासनाकडून अनुदान हवे असेल त्यांच्या करीता जैन एक्सेल १२ मि.मी, १६ मि.मी, २० मि.मी, व्यासामध्ये आणि ड्रिपरचे अंतर ३० सें.मी, ४० सें.मी, ५० सें.मी, ६० सें.मी, ७५ सें.मी, ९० सें.मी आणि १०० सें.मी अंतरावर उपलब्ध आहेत. तर ड्रिपरचा प्रवाह ताशी २.४ लिटर आणि ४ लिटर मध्ये उपलब्ध आहेत.

ज्या शेतकर्‍यांना कमी खर्चाचे आणि शासकीय अनुदान हवे नसल्यास त्यांच्या करीता जैन टर्बोस्लिम, जैन क्लासवन ह्या इनलाईन नळ्या उपलब्ध आहेत.

दोन इनलाईन नळ्यांमध्ये ४.५ ते ५ फूट अंतर निवड केल्यास खालील पिकाची लागवड करता येवू शकते :भाजीपाला - टोमॅटो, ढोबळी मिरची, मिरची, वांगी, कांदा, लसूण, कोबी, फुलकोबी, काकडी, टरबुज, खरबूज, कारले, भोपळा इ.

मसाला पिके - आले, हळद
नगदी पिके - कापूस, ऊस
तृणधान्ये - गहू, मका, ज्वारी, बाजरी, भात
तेलबिया - भुईमूग, सोयाबीन, सूर्यफुल, एरंडी, मोहरी इ.
कडधान्य - हरभरा, तूर, वाटाणा
फळपिके - केळी, पपई, स्ट्रॉबेरी

वरील सर्व पिकांची लागवड इनलाईन ठिबक पध्दतीवर सहज करता येते. ह्या पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर करतांना बदल करण्यासाठी बदल करण्याची गरज पडत नाही.

त्यामुळेच रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकासाठी ठिबक सिंचन किंवा सूक्ष्म सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. कमी पाण्यात कमी वेळेत अधिक क्षेत्रासाठी सिंचन करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीशिवाय दुसरा पर्याय नाही. ह्या तंत्राच्या वापराने पिकांचे विक्रमी उत्पादन मिळणे सहज शक्य असल्याने आर्थिक उत्पन्नात सुध्दा वाढ होईल. त्यामुळे सूक्ष्म सिंचन पध्दतीवर प्रगत तंत्राने रब्बी हंगामातील पिकाची लागवड करणे काळाची गरज आहे.

सम्पर्क


श्री. बी.डी. जडे, जळगाव - मो : ९४२२७७४९८१

Path Alias

/articles/rababaiunahaalai-hangaamaataila-paikaansaathai-sauukasamasaincana-padhadataicaa-vaapara

Post By: Hindi
×