राळेगणसिध्दी : विकासाचा पुढचा टप्पा


लोकांना उत्पन्नात किती फरक पडतो हे सिंचनाच्या अनुभवावरून कळाल्यामुळे लोक या निर्णयाला मान्यता देतात व योजना प्रभावीपणे राबवतात असा विश्वास आपल्यालाही राळेगणची फेरी केल्यावर व इथल्या संस्था पाहिल्यावर वाटू शकतो. तीन वर्षांनंतर राळेगणमध्ये प्रवाही सिंचन पूर्णपणे बंद होऊन संपूर्ण गाव ठिबक कडे वळलेले असेल. हे एक आश्चर्यच असेल.राळेगण सिध्दी हे गाव आता आधुनिक काळातील तीर्थक्षेत्र बनले आहे. 1975 पासून या गावाला 5 लाखाहून अधिक लोकांनी भेटी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या, स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या, अभ्यासकांच्या भेटी इथे चालू असतात. पद्मश्री अण्णा हजारे यांच्यामुळे या गावाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. 400 मि.मी. पाऊस, 80 टक्के उपाशी लोक, कुठलाच धंदा व्यवसाय नाही, त्यामुळे रोजगार नाही, अशी या गावाची स्थिती. पाणलोट क्षेत्र विकासामुळे, अण्णांच्या नेतृत्वामुळे या गावाचे भाग्य बदलले आहे. राज्यरस्ता क्र. 50 या गावावरून जातो. गावात सर्व आधुनिक सोयी आहेत. पक्की घरे, भरपूर दुकाने, सर्व प्रकारची मालवाहतुकीची सोय, पक्के रस्ते, सरासरी उत्पन्नात वाढ, ही आजची स्थिती. गाडीत माल भरायला मजूर मिळत नाही म्हणून बाहेरून आणावा लागतो. पाऊस तेवढाच आहे, पण शेती सुधारली आहे. दोन पिके सर्व जण घेतात. आजही पाऊस पडत नाही. पण इथे पेरण्या झाल्या आहेत. कारण पाण्याची साठवण केली आहे. इथले संत निळोबाराय विद्यालय, जि.प. हायस्कूल पाहिले की प्रगतीची, आर्थिक उन्नतीची कल्पना येते. इथे एक नापास मुलांची शाळा आहे. तिथला मॅट्रीक चा निकाल 10 ते 100 टक्के च्या दरम्यान लागतो एवढी उच्च दर्जाची शैक्षणिक व्यवस्था आहे. शाळेचे मैदान, हेवा करावे असे आहे.

श्री. अण्णा हजारेंनी इथे आलेल्या वारकऱ्यांसमोर भाषण केले, तेव्हा ते म्हणाले - महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असा संदेश दिला होता. राळेगणची आर्थिक स्थिती इतकी चांगली आहे की, शहरात गेलेले लोकही इथे परत येतील. या गावाने म.गांधींच्या स्वप्नातील ग्रामीण रचना निर्माण केली आहे. या गावातील लोकांनी जसा विचार केला, तसा अन्य गावांनी केला तर खेड्यातील स्थिती सुधारेल. गांधीजी म्हणत, आधी भाकरीचा प्रश्न सोडविला पाहिजे. इथे रोजगार, शिक्षण, आरोग्य निर्माण झाले तर लोक शहरात कशाला जातील ? आणि शहरातील बकालपणा पाहता, इंधनाच्या प्रश्नामुळे लोकांना शहर सोडून खेड्याकडे एक दिवस यावेच लागणार आहे. माझ्या सहा दिवसांच्या मुक्कामात महाराष्ट्र शासनातील मंत्री महोदयापासून, वारकरी, महिला, कर्नाटकातील यात्रेकरू, चौधरी यात्रा कंपनीची सहल असे अनेक प्रकारचे लोक आलेले पाहिले. त्या सर्वांना अण्णा म.गांधींचा संदेश सांगत असतात आणि खेडे बदलेल असा आशावाद जागवतात.

काही महिन्यांपासून भारत सरकारचे ग्रामीण विकास मंत्री आणि त्यांचे 5-6 सचिव भेटायला आले होते. त्यांच्यासमोर त्यांनी एक अभिनव कल्पना मांडली. पाणलोट क्षेत्राचे पुनर्भरण ! विहीर पुनर्भरण आपण ऐकले. पण संपूर्ण पाणलोटाचे पुनर्भरण ही कल्पना त्या सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. मंत्री म्हणाले - अशा कल्पना तुम्हाला कशा सुचतात. त्यावर अण्णा म्हणाले - काम ही कामाची जननी आहे. ध्येयासाठी वेडा झालेला माणूस काम करत राहतो. त्यातून अशा कल्पना सुचत राहतात.

राळेगण हे 600 एकराचे पाणलोट, डोंगरावर समतल चर, लूज बोल्डर स्ट्रक्चर, मातीचे बांध, सिमेंट बंधारे, पाझर तलाव अशी सर्व कामे पाणी अडवण्यासाठी केलेली आहेत. पण तरीसुध्दा काही प्रमाणात पाणी शिवाराच्या बाहेत जाते. जानेवारीनंतर बाहेर वाहून जाणाऱ्या पाण्याचा काहीच उपयोग होत नाही. पाणलोटाच्या शेवटाला जिथून हे पाणी बाहेर जात होते तिथे ते अडवून, एका 15 मीटर व्यासाची विहीर आहे, त्यात पाणी आणण्याची रचना करण्यात आली. हृी विहीर आधीपासूनच आहे. तिथून गावाला पाणीपुरवठा होतो. त्या नाल्यावर कोल्हापूर पध्दतीचा बंधारा आहे. त्यावरून पाणी ज्यावेळी वाहून जाईल तेव्हा ते विहीरीत आणण्याची रचना 30 से.मी. व्यासाच्या पाईपद्वारे केली आहे. विहीर नाल्याच्या वरच्या भागात अधिक उंचीवर आहे.

100 एच.पी.चे पंप इथे बसवले आहेत त्याद्वारे पाणी उचलून पाणलोटाच्या सर्वात उंच भागात म्हणजे डोंगरावर (Ridge line) नेले आहे. पाण्याला पुन्हा पाणलोटातून फिरायला लावले आहे. हे जादा वाहून जाणारे पाणी पुन्हा एकदा समतल चर, चेक डॅम, पाझर तलाव, विहीरी, बंधारे, असे फिरते केले आहे. संत तुकाराम म्हणतात - बळ, बुध्दी, वेचूनिया शक्ती उदक चालवावे युक्ती. याचा प्रत्यय इथे येतो. वाहून जाणारे पाणी 100 एच.पी ने उचलून नेणे ही अफाट कल्पना आहे.

ही कल्पना ऐकल्यावर आम्ही मित्रांनी विज बिलाचे काय, हा खर्च प्रचंड असेल, तो कोण करणार असे प्रश्न विचारले. आण्णांनी त्याला उत्तर म्हणून सांगितलेली माहिती अशी आहे - असे करायचे ठरल्यावर त्यांनी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारून वीज बिलाचा अंदाज घेतला. पाणी किती उचलून न्यायचे, किती दिवस उचलायचे याचे गणित आधीच तयार होते. याचे कारण 600 एकरच्या पाणलोटात 4 ठिकाणी पर्जन्यमापक बसवले आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणी माहिती आहे. सर्व स्ट्रक्चरचे पाणी साठे माहिती आहेत. पाण्याची पातळी प्रत्येक विहीरीत मोजली जाते. त्यामुळे हिशेब केला तर अण्णांच्या लक्षात आले, 53 लाख रू.

एक रकमी जमा करून ठेव म्हणून ठेवले तर त्याच्या व्याजात वीज बिल, कामगाराचा पगार, दुरूस्ती देखभालीचा खर्च भागवला जाऊ शकतो. या योजनेची माहिती मा.मुख्यमंत्री श्री. अशोक चव्हाण यांना समजल्यावर त्यांनी योजनेचा संपूर्ण भांडवली खर्च रू. दोन कोटी शासनातर्फे दिले आहेत. त्या पैशातून सारी संरचना उभी करून पाणी वर उचलून तपासणी करण्यात आली आहे. त्यात यशही आले आहे. गावकऱ्यांच्या बैठका झाल्या, सर्व योजनेची इत्यंभूत चर्चा झाली. हृा खर्च उभा करायचे ठरले. या पुनर्भरणामुळे तिसऱ्या पिकासाठी पाण्याची हमखास सोय होणार आहे. त्याचप्रमाणे आर्थिक उन्नतीही होणार आहे.

संपूर्ण क्षेत्राचे सिंचन ठिबक पध्दतीने करायचे ठरविले आहे. राळेगणमधले सर्व विंधण विहीरी (त्यामुळे उपसा वाढतो म्हणून) बंद करायचे ठरविण्यात आले. डोंगर उतारावर फलोत्पादन योजना राबवणार आहेत. वर उचलून नेलेले पाणी ठिबक पध्दतीने या फळबाग योजनेला उपलब्ध होणार आहे. या सर्व निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले आहे. भांडवली खर्च शासनाने दिल्यामुळे चालवण्याचा खर्च लोकांकडून उभा करणे सुरू झाले आहे. परिणामत: या वर्षी लोक तिसरे पिक घेऊ शकतील असा अण्णांना विश्वास आहे.

लोकांना उत्पन्नात किती फरक पडतो हे सिंचनाच्या अनुभवावरून कळाल्यामुळे लोक या निर्णयाला मान्यता देतात व योजना प्रभावीपणे राबवतात असा विश्वास आपल्यालाही राळेगणची फेरी केल्यावर व इथल्या संस्था पाहिल्यावर वाटू शकतो. तीन वर्षांनंतर राळेगणमध्ये प्रवाही सिंचन पूर्णपणे बंद होऊन संपूर्ण गाव ठिबक कडे वळलेले असेल. हे एक आश्चर्यच असेल.

इस्त्राईलमध्ये पाण्याचा काटेकोर हिशेब, संपूर्ण ठिबक असे इतके दिवस आपण ऐकत होतो, पण आता अण्णांच्या राळेगळसिध्दीमध्ये असा पाण्याचा हिशेब, पाण्याचे व्यवस्थापन व सिंचनातून समृध्दी व ग्रामीण भागाचा आर्थिक विकास हे स्वप्न प्रत्यक्षात पाहता येईल.

सम्पर्क


प्रा. उपेंद्र कुलकर्णी, नांदेड - (भ्र : 9423478848)

Path Alias

/articles/raalaeganasaidhadai-vaikaasaacaa-paudhacaa-tapapaa

Post By: Hindi
×