प्रकाश वाटा पाऊलवाटा - दुष्काळ मुक्तीचा लढा सुरू

यावर्षीचा मराठवाड्यातील दुष्काळ बरेच काही शिकवून गेला. पाण्याअभावी मराठवाड्यातील शेतकरी किमान दहा वर्ष मागे फेकला गेलाय. फळबागांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले. मराठवाड्याची देशभर ओळख असलेल्या मोसंबी बागा मोठ्या प्रमाणात पाण्याअभावी जळून गेल्या. मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले व पशुधनाचेही हाल झाले.

यावर्षीचा मराठवाड्यातील दुष्काळ बरेच काही शिकवून गेला. पाण्याअभावी मराठवाड्यातील शेतकरी किमान दहा वर्ष मागे फेकला गेलाय. फळबागांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले. मराठवाड्याची देशभर ओळख असलेल्या मोसंबी बागा मोठ्या प्रमाणात पाण्याअभावी जळून गेल्या. मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले व पशुधनाचेही हाल झाले. पाण्याच्या टँकरसाठी दिवस दिवस वाट पहावी लागली. धान्य होते पण पाण्याची टंचाई सगळीकडे होती. 'गरज ही शोधाची जननी ' या म्हणीनुसार या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर इथून पुढे चांगले होईल ते करायचेच यासाठी पुढाकार घेतला तो 'ग्रामविकास संस्थेने' यासाठी निमित्त ठरले ते वसुंधरा कार्यक्रम.

केंद्र सरकारचा महत्वकांक्षी असलेला व महाराष्ट्रासाठी वरदान ठरलेला वसुंधरा पाणलोट प्रकल्प ग्रामविकास संस्थेने सतत टंचाईग्रस्त औेरंगाबाद शहरापासून 15 कि.मी अंतरावर असलेल्या आय.डब्ल्यु.एम.पी 17 या पाणलोट प्रकल्पातील माथ्यावरील सिंदोन गावापासून ते पायथ्याकडील चित्तेपिंपळगाव या नैसर्गिक व्हॅली आकाराच्या सहा हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचवीस गावे, तांडे, वाडी, वस्तीचा शाश्वत ग्रामीण विकासाकरीता निवड केली. प्रकल्पाच्या सुरूवातीला दुष्काळात पाण्याचे काय मोल असते ते या भागातील जनतेला चांगलेच समजले होते.

वसुंधरा (IWMP - 17) प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये :


1. जमिनीचा उतार 3 ते 35 टक्के असून, यात 19 लघु पाणलोटाचा समावेश आहे.
2. 6427 हेक्टर जमीनीपैकी 2136 हेक्टर जमीन पडीक आहे.
3. जमीन डोंगराळ व उतार जास्त असल्यामुळे मातीची धूप मोठ्या प्रमाणात होते.
4. 11013 लोकसंख्येची उपजीविका या प्रकल्पावर अवलंबून आहे.
5. ही गावे औरंगाबाद शहरापासून जवळ असल्यामुळे भाजीपाला, दुध, फळे उत्पादनास येथे मोठा वाव आहे.

अशी झाली सुरूवात :


सर्वप्रथम वसुंधरा प्रकल्पाबाबत जाणीव जागृती व्हावी यासाठी ग्रामसभा, जाणीव जागृती कार्यक्रम, स्वयंसहाय्यता व उपभोक्ता गटाचे प्रशिक्षण आणि आदर्श गाव भेट सहलीचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांना वसुंधरा प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती झाली. याचबरोबर पी.आर.ए. (ग्रामीण सहभागीय मूल्यावलोकन) गटनिहाय सर्व्हेक्षण, सामाजिक व आर्थिक सर्व्हेक्षण या सर्व तंत्राचा वापर करून व आधुनिक पध्दतीद्वारे शास्त्रोक्त विश्लेषण करून उपलब्ध स्थानिक, नैसर्गिक व इतर संसाधनाचा वापर करून प्रकल्पातील सर्व जनतेचे जीवनमान उंचावण्याबाबतचा रोड मॅप डी.पी.आर च्या स्वरूपात तयार करण्यात आला.

अशी झाली जल व मृदसंधारणाची कामे :


दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी कामे झालीच पाहिजेत या जिद्दीने सिंदोन, एकोड, पाचोड, आपतगाव, चित्तेपिंपळगाव येथील 350 हेक्टर कपार्टमेंट बंडींगचे काम करण्यात आले.

लोकसहभाग व सी.एस.आर :


ग्रामस्थांना पाण्याचे मोल समजल्यामुळे ग्रामस्थांनी उत्स्फुर्त सहभाग दिला. निखळ लोकसहभागातून सिंदोन येथील पाझर तलावातून शेतकऱ्यांनी स्वखर्चाने 3000 ट्रीप गाळ काढला. याचबरोबर सी.एस.आर च्या माध्यमातून देवगिरी महाविद्यालयाच्या आर्थिक सहकार्यातून एकोड येथील माती बंधाऱ्यातून 500 ट्रीप गाळ काढण्यात आला. गाळ वाहून नेलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील जमिनीचा पोत सुधारलेला असून किमान पाच वर्ष रासायनिक खत वापरण्याची आवश्यकता नाही.

महिलांचा सक्रिय सहभाग :


प्रकल्प क्षेत्रातील गावात जुने - नवे अशा शंभर महिला बचत गटाची स्थापना करण्यात आलेली असून याच 2000 महिलांना सहभागी करून घेण्यात आलेले आहे. महिलांचा सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलेले असून या पुढील काळात स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य व प्रशिक्षण देवून महिला सक्षमीकरण करून महिलांचा शाश्वत ग्रामीण विकासात सक्रिय सहभाग घेण्यात येणार आहे. पंचायतराज व्यवस्था बळकटीकरणासाठीही याचा फायदा होणार आहे.

नावीन्यपूर्ण उपक्रम :


वसुंधरा प्रकल्प क्षेत्रातील सर्व गावात एकोपा निर्माण व्हावा याकरीता सर्व गावासाठी एक असा अनौपचारिक संघ स्थापन करण्यात आलेला असून यामध्ये निखळ गावासाठी निस्वार्थ भावनेने वेळ देणाऱ्या व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रकल्पातील सर्व कामे दर्जेदार व्हावीत, इतर विभागाकडून पुरक कामे करून घेण्यात यावीत, लोकसहभागातून जमा होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग व्हावा, प्रकल्प समाप्तीनंतर प्रकल्पातून झालेल्या कामाची देखभाल दुरूस्तीकरिता या भागातील स्थानिक नेतृत्वाची सक्षम फळी निर्माण व्हावी व पाण्याचा सामुहिक कार्यक्षम वापराबाबतचे प्रकल्प क्षेत्रातील सर्वांचे सामुहिक धोरण असावे हा या मागचा उद्देश आहे.

याच बरोबर वृक्षारोपण व शालेय विद्यार्थ्यांसाठी जलमित्र नावाचा उपक्रम राबविण्यात आला.

असा झाला एकत्रित परिणाम :


पहिल्या टप्प्यातील विविध जल व मृदसंधारण कामाचा एकत्रित परिणाम असा झाला आहे की ज्या भागात जल व मृदसंधारणाची कामे झाली आहेत त्या भागातील विहीरींच्या पाण्याची पातळी वाढून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळे कापूस उत्पादनात प्रति एकरी चार ते पाच क्विंटलने वाढ होणार असून रब्बी, भाजीपाला, फळबागा सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायालाही स्थिरता लाभली आहे.

यापुढील नियोजन :


वसुंधरा प्रकल्प क्षेत्रातील दुष्काळ कायमचा हटवून जनतेचे जीवनमान उंचावण्याकरीता विविध कामाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये 3530 हेक्टर क्षेत्रावर कंपार्टमेंट बंडींग, 69 हेक्टर क्षेत्रावर ड्रिप सी.सी.टी, 30 शेततळे, 8 सिमेंट बांध व उर्वरित इतर कामे इतर संबंधीत विभागाकडून करून घेण्यात येणार आहेत. भूमीहिन, महिला, अल्पभूधारक शेतकरी यांचे दरडोई उत्पन्न वाढून जीवनमान उंचावण्याकरिता प्रशिक्षण, शेती व शेतीपुरक उद्योगासाठी फिरते भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एवढ्यावरच न थांबता ग्रामविकास संस्था इतर विभागाच्या मदतीने व लोकसहभागातून शाश्वत ग्रामीण विकास साध्य करण्याकरीता किशोरीकरीता 'जीवन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम ' ग्रामीण युवकांसाठी ' ग्रामीण नेतृत्व विकास शिबीर' शालेय विद्यार्थ्यांकरीता पर्यावरण संवर्धक 'जलमित्र' महिला करीता गृहउद्योग, शेतकऱ्यांकरीता दुग्ध व्यवसाय, ठिबक, भाजीपाला, शेडनेट इत्यादी उपक्रम राबविण्याचे नियोजित आहे व याचबरोबर मूलभूत सुविधा देण्याकरीता ग्रामविकास संस्थेच्या वतीने कृषी विभाग, जि.प, डी.आर.डी.ए, पशु वैद्यकीय विभाग, बँका, कार्पाेरेट क्षेत्र, (सी.एस.आर) यांची मदत घेण्यात येणार आहे.

हा प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित करण्याकरीता जिल्हाधिकारी विक्रमकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पंडीतराव लोणारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. याच बरोबर ग्रामविकास संस्थेच्या अध्यक्षा जयश्री हदगल, सचिव नरहरी शिवपुरे, सरपंच, ग्रामस्तरीय समिती, पदाधिकारी, सचिव व ग्रामविकासचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांचे मोलाचे योगदान आहे.

नरहरी शिवपूरे, औरंगाबाद

Path Alias

/articles/parakaasa-vaataa-paaulavaataa-dausakaala-maukataicaa-ladhaa-saurauu

Post By: Hindi
×