आपापल्या उत्पादनाचे वेळी निर्माण होणारा कारखान्यातील सर्व मैला नदीत, नाल्यात सोडून ते मोकळे होतात. या दूषीत पाण्यावर प्रक्रिया करून शुध्द केलेले पाणीच नदीत सोडावे हे बंधन झुगारून देवून कायद्याचे उल्लंघन करताना त्यांना काही वाटत नाही व अशा बाबींवर ज्यांचे नियंत्रण असायला हवे अशा शासकीय खात्याच्या अधिकाऱ्यांनाही नियमांचे उल्लंघन करू देण्यात त्यांच्या स्वार्थ लोलुपतेमुळे काही गैर वाटत नाही. गावातील विहिरी, तलाव ही तर गुरे धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, स्नानासाठी गावकऱ्यांना आंदण दिलेली सार्वजनिक ठिकाणेच जणू काही.
लेखाचे शिर्षक म्हणजे वरकरणी पाहता केवळ तीन शब्दांचा एक समूह. पण त्यातील प्रत्येक शब्दाला महत्व आहे. स्वतंत्र अर्थ आहे व स्वत:चा असा वेगळा गुणधर्म आहे.पाणी :
पाणी म्हणजे मानव, पशु, पक्षी, वृक्ष, वल्ली, कृषी, उद्योग, बांधकाम.... एकंदर साऱ्या जीवांचा अन् सृष्टीचा तारणहार. पाण्याशिवाय जीव व जीवन असूच शकत नाही. सर्वांनाच ज्ञात आहे की आपण हवेशिवाय केवळ काही मिनिटे, पाण्याशिवाय काही तास अन् अन्नाशिवाय महत्प्रयासाने काही दिवसच तग धरू शकतो. अशा परिस्थितीत हवा, पाणी व अन्नाचे जीवनातील महत्व वेगळे सांगायला हवे असे नाही. अशा जीवनावश्यक व संपूर्ण जीवनभर लागणाऱ्या बाबी मानवाला, प्राण्यांना निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी चांगल्या प्रतीच्या, चांगल्या गुणवत्तेच्या असायला नकोत काय? पिण्यासाठी दिवसातून अनेक वेळा लागणारे शुध्द व निर्मळ पाणी, सकस अन्नधान्याची गरज विचारात घेता त्यासाठी पुरवठा करावे लागणारे निर्जंतुक पाणी सातत्याने कसे देता येवू शकेल याचा विचार करताना उपरोक्त शब्दसमूहातील गुणवत्ता हा शब्द आपल्यासमोर हात जोडून उभा राहतो.
गुणवत्ता :
पाणी निसर्गत:उपलब्ध असते. पाण्याचा मुख्य स्त्रोत पाऊस हाच असतो. पाणी कृत्रीमरित्या प्रयोगशाळेत निर्माण करण्याचे शास्त्र अद्यापपावेतो तरी विकसीत झालेले नाही. त्यामुळे अपेक्षित गुणवत्तेचे पाणी निर्माण होऊ शकत नाही. उपलब्ध असलेल्या पाण्याची गुणवत्ता राखण्याचे काटेकोरपणे प्रयत्न मात्र करता येवू शकतात.
पाण्याची प्रत किंवा पाण्याची गुणवत्ता याचा विचार करताना पाण्याच्या भौतिक (Physical) रासायनिक (Chemical) व जीवशास्त्रीय (Biological) गुणधर्मांचा शास्त्रीय अभ्यास असणे गरजेचे ठरते. प्रत्यक्षात ज्या कारणासाठी पाणीवापर करणे अपेक्षित आहे त्या कारणानुसार पाण्याची गुणवत्ता कमीजास्त प्रमाणात स्वीकृत असू शकते. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सर्वेच्च प्रतीची असणे क्रमप्राप्त असते. त्या खालोखाल कृषीसाठी, उद्योगासाठी वा सर्वसाधारण वापरासाठी कमी अधिक गुणवत्तेचे पण अपेक्षित गुणवत्तेच्या मर्यादेत असलेले पाणी चालू शकते. विविध कारणांसाठी लागणाऱ्या पाण्याचे निकष व मर्यादांचे स्वरूप वेगवेगळे असू शकतात. पाण्यात संपूर्णपणे विरघळलेल्या व अजिबात न विरघळलेल्या पण अस्तित्वात असलेल्या विविध भौतिक, रासायनिक पदार्थांच्या टक्केवारीवर पाण्याची गुणवत्ता अवलंबून असते. पाण्यात मिसळलेल्या विविध भौतिक व रासायनिक पदार्थांच्या परिमाणावर व टक्केवारीवर पाण्याचा रंग, गंघ , वास, चव या भौतिक गुणधर्मांप्रमाणेच आम्लयुक्त, अल्कलीयुक्त, तसेच अन्य रासायनिक पदार्थांच्या अनुषंगाने कमीजास्त प्रमाणात दुर्गंधी, जंतुंचे प्रमाण, विविध आजारांना नियंत्रण देणारे घटक यांचा झालेला प्रादुर्भाव यावर पाण्याची बरीवाईट गुणवत्ता ठरत असते.
पाण्याच्या गुणवत्तेची स्वीकारार्हता व अस्वीकारार्हता याचा स्वतंत्र अभ्यास व सखोल तपशील याबाबतचा अंतर्भाव तज्ज्ञ लेखक व शास्त्रज्ञ यांच्या लेखांतून अवगत होवू शकेल. पण कॉलरा, पटकी, कावीळ, विषमज्वर किंवा केवळ प्रदूषित पाण्यामुळे होणारे 70 टक्के आजार टाळावयाचे असतील तर चांगले, निर्मळ, शुध्द पाणी प्रत्येकाला प्रत्येक कारणासाठी मिळणे अपेक्षित आहे. सृष्टीत उपलब्ध असलेले पाणी (नैसर्गिक कारणांमुळे) मानवी हस्तक्षेपामुळे, निष्काळजीपणामुळे किंवा जाणतेपणे सांडपाणी व उद्योजगतेतील रसायने नदी, नाले, ओढे, तलाव व विहिरीत सोडल्याने प्रदूषित होत असताना हे पाण्याचे प्रदूषण थांबवून पाण्याची अपेक्षित गुणवत्ता कशी राखायची याचा विचार करताना व्यवस्थापन हा शब्द समूहातील तिसरा व महत्वाचा शब्द आपले लक्ष वेधून घेतो.
व्यवस्थापन :
उत्तम व्यवस्थापनाशिवाय जीवनात काहीही साध्य होत नसते. जन्मापासून मृत्युपर्यंत जीवनात अनेक घटनांचे, प्रसंगांचे व घटकांचे देखील नियोजन व व्यवस्थापन करावेच लागते. विद्यार्थीदशेत अभ्यासाच्या काळ, काम, वेगाचे, नौकरीत व उद्योगात आपापल्या कामाच्या स्वरूपास अनुसरून नियोजन व अंमलबजावणीचे, निवृत्ती नंतर व वृध्दापकाळात आपल्या एकाकी जीवनातील पोकळी भरून काढण्यास्तव विविध कार्यक्रमांचे नियोजन व व्यवस्थापन केल्याशिवाय जीवन सुसह्य होवूच शकत नाही. आपल्या दैनंदिन जीवनातील दिनक्रमात घरातील गृहिणीला तर अनेक व्यवधाने सांभाळत तारेवरील कसरत करतच आपल्या विविध कामांचे व्यवस्थापन करणे नकळत का होईना पण क्रमप्राप्तच ठरत असते.
आयुष्यात कधी कुठे प्रवासाला जायचे म्हंटले तरी बस, रेल्वे, विमान इत्यादीने प्रवासाचे आगावू आरक्षण, विविध ठिकाणी राहण्याच्या, जेवणाच्या व पर्यटणस्थळांच्या भेटींचे क्रमवार केलेले व्यवस्थापन यावरच प्रवासाचे यश अवलंबून असते. इव्हेंट मॅनेजमेंट हा तर आज परवलीचा शब्द झाला आहे. दोन दशकापूर्वीपर्यंत घरोघरीच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात डॉक्टर वा इंजिनियर होण्याची क्रेझ होती. आता मात्र कुठल्याही शाखेचा विद्यार्थी त्याच्या पदवी परिक्षेनंतर व्यावसायिक व्यवस्थापन क्षेत्रात पदवी मिळवून जीवनात स्थिरावण्याचे स्वप्न पाहात आहे. इतकेच नव्हे तर प्रत्यक्षात डॉक्टर्स, इंजिनिअर्स व आय.ए.एस. झालेले कलेक्टर्स यांचाही मोठ्या प्रमाणात एम.बी.ए. चे शिक्षण घेवून त्या क्षेत्रात करिअर करण्याकडे कल वाढत चालला असल्याचे दिसून येते. एकूणच काय, जीवनातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी सुयोग्य व सक्षम व्यवस्थापनाची प्रत्येक क्षेत्रात वाढती गरज असल्याच्या सत्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
पाण्याच्या गुणवत्तेच्या व्यवस्थापनाबाबतही हे विधान तितकेच खरे आहे. आज विविध क्षेत्रात कार्यरत असलेले आपण सर्वचजण पाणी प्रदूषित करण्यास फार मोठ्या प्रमाणात हातभार लावत असतो. पावसामुळे उपलब्ध होणारे निसर्गदत्त पाणी मूलत: शुध्द, निर्मळ असेच असते. जमीनवर पडलेले पाणी भूपृष्टावरून वाहत नदी, नाले, ओढ्यांना मिळताना वाहतूक प्रक्रियेत त्यात मिसळणाऱ्या क्षारांमुळे ते, काही प्रमाणात का होईना, दूषीत होते... आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस घरातील सांडपाणी सार्वत्रिक पाण्यात सोडून देऊन पाणी अधिक प्रदूषित होण्यास हातभार लावतो तर हॉटेल्स, सिनेमागृहे, सार्वजनिक नळ, संडास इत्यादींच्या माध्यमातून जलप्रदूषणात मोठीच भर पडते. उद्योजक व कारखानदार या प्रक्रियेत मग मागे कसे राहतील? आपापल्या उत्पादनाचे वेळी निर्माण होणारा कारखान्यातील सर्व मैला नदीत, नाल्यात सोडून ते मोकळे होतात. या दूषीत पाण्यावर प्रक्रिया करून शुध्द केलेले पाणीच नदीत सोडावे हे बंधन झुगारून देवून कायद्याचे उल्लंघन करताना त्यांना काही वाटत नाही व अशा बाबींवर ज्यांचे नियंत्रण असायला हवे अशा शासकीय खात्याच्या अधिकाऱ्यांनाही नियमांचे उल्लंघन करू देण्यात त्यांच्या स्वार्थ लोलुपतेमुळे काही गैर वाटत नाही. गावातील विहिरी, तलाव ही तर गुरे धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, स्नानासाठी गावकऱ्यांना आंदण दिलेली सार्वजनिक ठिकाणेच जणू काही.
जलाची गुणवत्ता टिकविण्यासाठी प्रदूषित जलावर प्रक्रिया करून सर्वसाधारणपणे अपेक्षित गुणवत्तेचे पाणी जनसामान्यांना व शेतकऱ्यांना पुरविण्याची जबाबदारी मात्र महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत व शासनाच्या जीवन प्राधिकरण, जलसंपदा अशा खात्यांची. आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास असे म्हणतात ना त्याप्रमाणे आधीच काम न करणाऱ्या वा कामाबाबत उदासीन असणाऱ्या या यंत्रणांवर जलप्रदूषित करून आपण सारेजण अधिकचा ताण टाकत असतो. हजारो-लाखो लोकांनी घाण करायची व काही खात्यांच्या तोकड्या यंत्रणेने ती उपसायची म्हंटल्यावर सफाईचे व शुध्दीकरणाचे गणित सुटणार तरी कसे आणि केव्हा ?
शासनाच्या या कार्यात नगरपालिका, महानगरपालिका बरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था, अशासकीय व अराजकीय अशा सेवाभावी संस्था यांचा हातभार लागणे अपेक्षित आहे. अशा कामात लोकसहभागाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर वाढणे अत्यावश्यक आहे. जलसाक्षरता, सरोवर संवर्धिनी सारख्या कार्याद्वारे हे विधायक उपक्रमाचे लोण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला हवे. सर्वांच्या एकत्रीत प्रयत्नांतूनच कुठल्याही क्षेत्रातील गुणवत्तेचे व्यवस्थापन यशस्वी होवू शकेल. पण जेथे सुशिक्षित व पुढारलेले, स्वत:ला शिस्तीचे भोक्ते समजणारे पांढरपेशे लोकच जलप्रदूषण होण्यास मोठ्या प्रमाणात हातभार लावतात तेथे जलसाक्षरतेचे धडे द्यायचे तरी कोणाला? कुणीतरी तन, मन, धनाने व समर्पित वृत्तीने हे विधायक समाजकार्य करावे अशीच बहुतेक सर्वांची धारणा असते. पण हे कुणीतरी म्हणजे आपण सोडून कुणीतरी असेच सर्वांना वाटत असते. ही वृत्ती बदलायला हवी. अशा विधायक कामाची सुरूवात स्वत:पासूनच करायला हवी.
प्रत्येक वैयक्तिक माणसाने, कुटुंबाने, शेतकरी व शेतकरी कुटुंबाने, उद्योजकाने व कारखानदाराने आपापल्या परिने सांडपाणी वा एफ्लुअंट प्रक्रियेविना नदीत न सोडण्याची किंवा आपल्याच आवारत कुठेतरी शोषखड्डे करून मुरवण्याची व त्याचे रूपांतरण खतांमध्ये करण्यासाठी विशेष योजना आखली तर गुणवत्ता व्यवस्थापनेवरील मोठा ताण कमी होवू शकेल.
मोठ्या माणसांच्या छोट्या व कोत्या विचारांऐवजी छोट्या माणसांचे असे मोठे वैयक्तिक विचार देखील व्यवस्थापन शास्त्रात फार मोठी भूमिका बजावत असतात. हे विधायक विचारांचे लोण घेवून आपण सारेजण वैयक्तिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर व संयुक्तपणे पाण्याच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन करण्याच्या कामात आतापासूनच सहभागी होवू यात. सेवाव्रती लोकसहभाग हाच आज विधायक सामाजिक कार्याच्या यशस्वीतेचा मूळ मंत्र आहे. तेव्हा वाट कसली पाहता? चला, उठा अन् आजच कार्याला लागा. आपली, आपल्या कार्याची गुणवत्ता हीच पाण्याची गुणवत्ता, आपले व्यवस्थापन, आपल्या वृत्तीचे व्यवस्थापन हेच कुठल्याही कार्याच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असलेले व्यवस्थापन होय. पाणी प्रदूषित करून शुध्द करण्यापेक्षा प्रदूषण होवू न देण्याचे व्यवस्थापन हेच उत्कृष्ट व यशस्वी व्यवस्थापन ठरेल.नाही का?
Path Alias
/articles/paanayaacayaa-gaunavatataecae-vayavasathaapana-0
Post By: Hindi