पाण्याच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन


मानवी आरोग्यास शुध्द पाण्याची नितांत आवश्यकता आहे. बहुतांशी आजार हे दूषित पाण्याने होतात. पाण्याचे साठे हे मर्यादित स्वरूपाचे आहेत आणि लोकसंख्या तर वाढतच आहे. अशा परिस्थितीत पाण्याची गुणवत्ता दर्जेदार ठेवून त्याचा योग्य विनियोग केल्यास मानवी आरोग्य पाणी टंचाईवर निश्चितच मात करू शकेल यात शंका नाही.

पाणी हा विषय मानवाच्या सर्वांगीण विकासाला व्यापून राहीलेला विषय आहे. कारण पाणी आणि विकास ही परस्परपूरक बाब आहे. सृष्टीच्या आगिम व्युत्पत्तीपासून ते तंत्रज्ञानाच्या विविधांगी दिशेने चालणाऱ्या मानवाच्या वाटचालीत पाण्याचा मोठाच वाटा आहे. किंबहुना मानवाची प्रगती पाण्यामुळेच झाली असे म्हटल्यास वावगे ठरू नये, एवढे मानवी जीवनात पाण्याचे महत्वाचे स्थान आहे.

सबंध पृथ्वीतलावर 70 टक्के क्षेत्र पाण्याने व्यापले असून त्यातील 1 टक्क्यापेक्षाही कमी वाटा हा गोडे पाण्याचा आणि पर्यायाने मानवाच्या दैनंदिन उपयोगितेकरिता योग्यतेचा आहे. नदी, सरोवरे, तळे, झरे, विहीरी, भूजल यांनी तो व्यापलेला आहे. मानवी संस्कृती जसजशी विकसित होत गेली तस तसा पाण्याचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी होत गेला.म्हणजे जसे पाण्याचा मुख्य उपयोग हा पिण्यासाठी आहे हे ज्ञात आहेच, परंतु आता 21 व्या शतकात पाणी हे पर्यटन व मनोरंजनाच्या क्षेत्रात प्रचंड आर्थिक उलाढाल म्हणजेच नफा करून देणारे साधनही ठरले आहे. आदिम काळ ते आजची स्थिती असा टप्प्याटप्प्याने अभ्यास केला असता असे दिसते की, सद्य:स्थितीत पाण्याचा जितका बहुढंगी वापर आपण करीत आहोत तेवढा या अधी झालेला नाही. परंतु या सोबतच आज पाणी नियोजन, त्याचे समन्यायी वाटप, गुणवत्ता आणि व्यवस्थापन यांच्या यापूर्वी कधीही झालेली नव्हती अशी दु:स्थिती निर्माण झालेली आहे.

या संदर्भात उदा. द्यायचे झाले तर आपल्या औरंगाबादचेच घेवून यात. सुमारे 400 वर्षांपूर्वी मलिक अंबरने जो खिजार तलाव बांधला (आताचा सलीम अली तलाव) आणि संपूर्ण खडकी गावाला (आताचे औरंगाबाद) पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा केला, शहराला भोवती एक दोन नव्हे तर 51 दरवाजे बांधले. त्याखाली खंदक तयार करून शहराभोवती पाणी खेळते ठेवले. हा जल स्थापत्य शास्त्राचा आणि सुनियोजित व्यवस्थापनाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून आजही आम्ही त्याकडे बघतो.

आज आम्ही या सर्वांची किती दुरावस्था केलेली आहे. 400 वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांनी केलेले उत्कृष्ट जल व्यवस्थापन आम्ही टिकवून ठेवू शकलो नाही. हे सर्व खंदक - खाम नदीचे झरे आज नाल्यात रूपांतरीत झालेले आहेत. जलस्त्रोतांची एवढी हेळसांड याआधी या प्रमाणात कधी झाली नव्हती. निष्कर्ष रूपात या उदा. मांडणी करावयाची झाल्यास अशी करता येईल.

'पाण्याचा वापर वाढला परंतु त्याच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन कोलमडले.'

21 व्या शतकात जगभरातील जलस्त्रोतांची परिस्थिती थोड्याफार फरकाने अशीच आहे. विकसित, विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांच्या मध्ये दरडोई वापरासाठा मिळणारे पाणी यांत जशी तफावत आहे. त्याचप्रमाणे पाणी प्रदूषणाच्या प्रमाणातही लोकशाही प्रगती तफावत आहे. भारतासारख्या लोकशाहीप्रणीत विकसनशील देशाला आज जल गुणवत्तेच्या व्यवस्थापनासंबंधी एका सुनिश्चित अशा सक्षम प्रणालीची नितांत आवश्यकता आहे.

मागील 50 वर्षात लोकसंख्या वाढ झपाट्याने झाली. त्याआधी मर्यादीत लोकसंख्या असल्यामुळे नैसर्गिक साधनसामुग्री मुबलक प्रमाणात होती. त्यावर ताण पडत नव्हता आणि पर्यायाने व्यवस्थापनाची फारशी गरजच नव्हती. आता मात्र लोकसंख्या प्रचंड वाढल्याने व्यवस्थापन केल्याशिवाय पाणी टिकून ठेवणे शक्य होणार नाही.

लोकसंख्या वाढ - औद्योगिकरण - शहरीकरण - नैसर्गिक संसाधनावर प्रचंड ताण - पर्यावरणाचा असमतोल - शुध्द पाण्यासाठी संघर्ष

हे चक्र बघता आता पाण्याच्या गुणवत्तेच्या व्यवस्थापनाची आवश्यकता किती आहे हे लक्षात येते.

1. पाण्याचा एकूण उपलब्ध साठा आणि लोकसंख्या
2. दरडोई पाणीपुरवठा
3. प्रत्येक क्षेत्रासाठी वापर व त्याचे प्रमाण (जसे की पिण्यासाठी क्ष %, शेतीसाठी व % य उद्योगासाठी असे)
4. वापरलेल्या पाण्याला सांडपाण्याची दिलेली प्रक्रिया (घरगुती सांडपाणी आणि औद्योगिक सांडपाण्यावर केलेली प्रक्रिया)
5. सांडपाण्याच्या विल्हेवाटीच्या पध्दती
6. पाण्याचे पुनर्भरण, पुनर्वापर, साठवण, संवर्धन इत्यादी
7. जलीय चक्रासाठी आवश्यक असा मानवी हस्तक्षेप
8. पाणी जपणूकीसाठी लोकसहभाग
9. पाणीपट्टीचा दर
10.पाणीपुरवठ्यावरील खर्च व पाणीपट्टी यांचे प्रमाण इत्यादी

वरील सर्व मुद्दे जल व्यवस्थापनाअंतर्गत मोडतात.
जॉन मॅथर या भूगोलशास्त्रज्ञाच्या मते, जलसाठ्याचे व्यवस्थापन म्हणजे योग्य गुणवत्तेचे पाणी, योग्य प्रमाणात, योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या वेळेस आणि योग्य त्या मोबदल्यात आपल्या विविध गरजा भागविण्यासाठी मिळू शकणे, ह्यालाच जलसाठ्याचे व्यवस्थापन असे म्हणतात. आपल्या वापरण्यायोग्य 1 % पेक्षा कमी असलेले गोडे पाणी याचाच विचार आपण येथे करणार आहोत.

पाण्याची गुणवत्ता :
पिण्यायोग्य असे 1 % पेक्षाही कमी असणारे गोडे पाणी ( Fresh water) आपण सर्वच ठिकाणी सर्व प्रकारच्या उपयोगासाठी वापरतो. पिण्यासाठी, शेती, औद्योगिक क्षेत्रात, पोहण्याचे तलाव व कारंजे इ. मनोरंजनासाठी आपण हेच प्रक्रिया केलेले शुध्द पाणी वापरतो. पिण्यासाठी योग्य असलेल्या पाण्याचे भौतिक - रासायनिक - सूक्ष्मजीवशास्त्रीय मानकेही जागतिक आरोग्य संघटना आणि भारतीय मानक संस्था यांनी ठरविलेल्या मापदंडानुसार असावयास हवी. असे नसल्यास ते पाणी पिण्याच्या योग्यतेचे नसते.

आपणास मिळणारे पाणी हे नदी, तलाव, धरणे, विहिरी इ. जमिनीवर आणि जमिनीखालील पाण्याच्या स्त्रोतातून मिळत असते. घरगुती आणि कारखान्यातून निघणाऱ्या सांडपाण्यावर योग्य ती प्रक्रिया करणे आवश्यक असते. कारण हे सांडपाणी शेवटी नदी, तलाव, इ. ना जावून मिळतात. प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यात अनेक प्रदूषके असतात.

अ. घरगुती सांडपाणी :
यामध्ये मुख्यत्वे सेंद्रीय घटक अधिक प्रमाणात असतात. या सांडपाण्यात मानवी विष्ठा असल्याकारणाने त्याला प्रक्रिया न देता तशीच जलस्त्रोतात सोडणे म्हणजेच जलीय परिस्थितीकीय रचना धोक्यात आणणे होय. ही सर्व सेंद्रीय घटक जलस्त्रोतांच्या जीवन घटकांचे (Nutrients) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवतात व त्यावर तगणाऱ्या शैवालाचीही वाढ झपाट्याने होते. प्रकाश - संश्लेषण करतांना शैवाल पाण्यात विरघळलेल्या प्राणवायू (Oxygen) या प्रक्रियेसाठी वापरतात. पर्यायाने पाण्यातील प्राणवायूचे प्रमाणही झपाट्याने कमी कमी होत जाते. हे असेच सुरू राहिले तर कालांतराने जलस्त्रोत हिरव्या रंगाचे दिसते. कारण सर्वत्र शेवालाची वाढ झालेली असते. हा प्रकार आपणास एका ठिकाणी साचलेल्या जलस्त्रोतात म्हणजेच तळे, सरोवरे इ. ठिकाणी (Stagnant waterbody) बघावयास मिळतो. सरोवराच्या या स्थितीला सरोवरांचे अतिरिक्त पोषण (Eutrophication) असे म्हणतात.

वाहत्या पाण्यात ही समस्या कमी भेडसावते. कारण वाहणारे पाणी सतत हवेच्या संपर्क येत असते. त्यामुळे ते (उदा. नदी) स्वत:ची स्वयं स्वच्छता ((Self purification) करीत असतात.

जमिनीवरील वाहणाऱ्या दूषित प्रवाहामुळे भूगर्भातील पाण्याचीही प्रत खालावत असते आणि हा प्रकार अतिशय धोकादायक ठरतो. कारण भूजलाचे शुध्दीकरण करणे शक्य नसते. शिवाय भूजलीय झरे एकमेकांना प्रदुषित करून प्रदूषणाचा धोका सार्वत्रिक करू शकतात.

ब. कारखान्यातील सांडपाणी :
औद्योगिक क्षेत्रातून निघणारे सांडपाण्यात असेंद्रीय घटक अधिक प्रमाणात असतात, त्यातील कित्येक घटक हे विषारी असतात. नियमानुसार या सांडपाण्यावर कारखान्यातच प्रक्रिया करणे बंधनकारक आहे, असे असूनही आजमितीला अनेक कारखान्यातील सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करताच जलस्त्रोतात सोडण्यात येतात. कित्येक वेळा पाण्यातील जलचर अकस्मात मृत होतात, यामागचे कारण म्हणजे सांडपाण्यातील विषारी घटकांचे अधिक प्रमाण होय. हे सांडपाणी झिरपून भूजल दूषित तर करतातच शिवाय कारखान्याच्या परिसरातील विहिरींमध्ये मानवी आरोग्यास हानीकारक असणारे असेंद्रीय प्रदूषके, आरोग्य धोक्यात आणतात.

कारखान्यातील सांडपाण्यात असणारे सर्व असेंद्रीय घटक जलीय जीवसृष्टी, जलीय परिस्थितीकी आणि मानवी आरोग्य यांना घातक असतात. ते पाण्यात मिसळल्या गेल्यास त्या घटकांना पाण्यातून वेगळे करणे अशक्य असते. त्यामुळे प्रक्रिया न केलेले औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी जलस्त्रोतात सोडणे अत्यंत धोकादायक असते.

व्यवस्थापन :
जल गुणवत्तेचे व्यवस्थापन करीत असतांना दोन महत्वाच्या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एक तर आपणास वापरण्यायोग्य असलेला जलसाठा आणि तो टिकवून ठेवणे. दुसरे म्हणजे तो प्रदूषित होवू नये यासाठी आधीच सर्व उपाययोजना करणे. प्रदूषित जलस्त्रोत पुन्हा मूळ स्थितीत म्हणजेच प्रदूषण मुक्त करणे हे अत्यंत खर्चिक, किचकट, वेळ खाऊ व प्रसंगी अशक्य प्राय: असे काम असते. गंगा अॅक्शन प्लॅनची स्थिती सर्वज्ञात आहेच.

परंतु आजही जगभरातील जलसाठे हे प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. प्रदूषण म्हणजे काय ? तर कुठल्याही नैसर्गिक संरचनेत झालेला बदल म्हणजे प्रदूषण होय. हे जलसाठे, पिण्यायोग्य पाणी, प्रक्रियेनंतरचे सांडपाणी, शेती व्यवस्थेसाठी आवश्यक असणारे पाणी इ. सर्वांचेच मानके ठरवून दिलेली आहेत. त्यानुसार ती असावयास हवी. परंतु जगभरातील शास्त्रीय अभ्यासकांच्या नोंदी असे मत नोंदवितात की जगभरातील जलसाठे हे दिवसेंदिवस अधिकाधिक प्रदूषित होत आहेत.

दरदिवशी 2 अब्ज टन सांडपाणी (प्रदूषकांसहीत) जागतिक जलसाठ्यात मिसळते आणि दरवर्षी 1.5 अब्ज मुले दूषित पाण्याने होणाऱ्या आजाराने मृत्युमुखी पडतात. अशा प्रकारची सांख्यिकी आकडेवारी भरपूर उपलब्ध आहे. परंतु प्रस्तूत लेखाचा घाट हा फक्त प्रचलित व्यवस्थेतील प्रणाली कशी सुधारावी हाच नसून सर्वसामान्यांना उपलब्ध असणारे पाणी हे किती अडथळे पार करून पिण्यायोग्य ठरते म्हणून पाण्याचा योग्य विनियोग,पुनर्वापर, भूजलाचे पुनर्भरण इ. उपाययोजना करून व्यक्तिश: पाणी जपणूक कशी करावी हा देखील आहे.

सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या कमी खर्चिक प्रकारच्या पध्दतीला स्विकारण्याची तयारी शासनाने दर्शवायला हवी. Root Zone Technology, Biological Treatment, Sand Filters, Oxidation Ponds and Lagoons म्हणजे मूळ प्रवाह तंत्र, जैविक उपचार पध्दत, वाळूची चाचणी इ. अनेक सोप्या पध्दती शास्त्रशुध्द पध्दतीने विकसित केल्यास प्रदूषकांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी होते. याच्याशी संबंधीत असे छोट्या प्रमाणावरील प्रकल्प यशस्वी झालेले आहेत, असे असूनही आपल्याकडे अद्यापतरी शास्त्रीय अभ्यासक आणि निर्णय घेणारी शासनव्यवस्था यांच्यात समन्वय होवू शकलेला नाही. याचा दुष्परिणाम म्हणजे एकतर छोटे मोठे संशोधन छापील स्थितीत संशोधन पत्रिकेत राहतात आणि दुसरे म्हणजे सद्य:स्थितीत आवश्यक असणाऱ्या स्थानिक स्तरावरील दैनंदिन भेडसावणाऱ्या समस्या या संशोधनासाठीच्या समस्या समजून त्यांचे शास्त्रीय निराकरण करण्यास अभ्यासक धजावत नाहीत.

भारतासारख्या विकसनशील देशाला कमी खर्चिक हाताळावयास सोप्या अशा प्रक्रियातंत्राची गरज आहे. येथील सर्वच 14 मोठ्या नद्यांनी प्रदूषणाच्या धोकादायक सीमा केव्हाच ओलांडलेल्या आहेत. तलाव क्षेत्रफळ कमी होत आहे आणि बहुतांशी अतिपोषित अवस्थेत आहेत. भारतात असलेल्या एकूण धरणांच्या निम्मी धरणे एकट्या महाराष्ट्र राज्यात आहेत. परंतु येथेही पाणीटंचाई आहेच. जल दर वाढविणे, पाणीपुरवठा क्षेत्राचे खासगीकरण करणे, कंत्राट देणे, पाणीपट्टी वाढविणे, मीटर बसविणे, दंड आकारणे इ. गोष्टींनी व्यवस्थापन सुधारेल अशी आशा बाळगणे बाळबोधपणाचे ठरेल. या सोबतच सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी व आर्थिकदृष्ट्या परवडणारी यंत्रणा उभारणे, कारखान्यांच्या प्रदूषणावर अंकुश ठेवणाऱ्या यंत्रणेचा कारभार पारदर्शक ठेवणे, सर्वसामान्यांमध्ये जलजागृती करणे इ. गोष्टीही प्राधान्यक्रमाने करावयास लागतील.

स्थानिक स्तरावरील जलसाठे हे त्या त्या परिसरातील लोकांनी दत्तक घेवून त्यांचे नैसर्गिक गुणधर्म टिकवून ठेवल्यास असे तलाव प्रदूषणापासून दूर राहतील. शासनयंत्रणेनी सांडपाणी नि:स्सारण केंद्राची नव्याने पुनर्रचना करावयास हवी. आज वापरात असलेल्या एकत्रित मलनि:स्सारण व्यवस्थेमुळे आपण स्नानगृहे, स्वयंपाक घर इ. तून येणारे सांडपाणी विनाकारण दूषित करीत असतो आणि प्रक्रिया करण्यास आवश्यक असणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाणही वाढवत असतो. यावरही निश्चितपणे पर्याय शोधण्याची वेळ आली आहे.

मानवी आरोग्यास शुध्द पाण्याची नितांत आवश्यकता आहे. बहुतांशी आजार हे दूषित पाण्याने होतात. पाण्याचे साठे हे मर्यादित स्वरूपाचे आहेत आणि लोकसंख्या तर वाढतच आहे. अशा परिस्थितीत पाण्याची गुणवत्ता दर्जेदार ठेवून त्याचा योग्य विनियोग केल्यास मानवी आरोग्य पाणी टंचाईवर निश्चितच मात करू शकेल यात शंका नाही.

डॉ. क्षमा खोब्रागडे, औरंगाबाद - (भ्र : 9822294639)

Path Alias

/articles/paanayaacayaa-gaunavatataecae-vayavasathaapana

Post By: Hindi
×