वेल्हे : ऐतिहासिक तोरणा व राजगड किल्ल्याच्या मधोमध डोंगर रांगांच्या कुशीत लपलेली देवपाल-वडेवस्ती ही वेल्हे तालुक्यातील एक चिमुरडी वस्ती आहे. जेमतेम शंभर एक लोकसंख्या असणारी ही वस्ती मेट पिलावरे या ग्रामपंचायतीमध्ये मोडते. मेट पिलावारे व पाल खुर्द या दोन गावांच्या बेचक्यात ही वस्ती वसलेली आहे. वर्षानुवर्षे पाणीटंचाईला गांजलेली अशी ही वस्ती दरवर्षी उन्हाळ्यात आशेने टँकरकडे डोळे लावून बसलेली असते.
उन्हाळ्यात टँकर येणार पण तोही गावठाणाच्या सरकारी विहिरीत ओतला जाणार. ही विहीर या वस्तीपासून दीड एक किलोमीटर आहे. त्यात भरीस भर म्हणजे या वस्तीतील घरे डोंगरात विखुरलेली आहेत. त्यामुळे आधी डोंगरातून खाली येऊन गावठाणापर्यंत पायपीट केल्यानंतर मग कुठे टँकरचे विहिरीत ओतलेले पाणी मिळणार. हे पाणी पुन्हा पायपीट करून डोंगरवर घेऊन जायचे अशी ही अजब तर्हा ! या टँकरच्या पाण्यासाठी गावठाणातील लोकांचा पहिला हक्क. वस्तीवरच्या मंडळींचा पाण्यासाठी नंबर लागणे मुश्कील. मग ही धनगर मंडळी अधिक लांबच्या देवपाल गावच्या विहिरीवरून पाणी आणण्यासाठी धडपडणार ! पाण्याची एक खेप करायची म्हणजे किमान एक तासापेक्षा जास्त वेळ जाणार. या धनगर समाजाची लोकसंख्या मोजकी असली तरी जनावरे मात्र भरपूर. एकेका कुटुंबाकडे किमान पाच ते सहा जनावरे. एकेका जनावराला दिवसाकाठी किमान ५० लिटर पाणी लागते. त्यामुळे पाणी वाहणे हाच काय तो उन्हाळ्याचा एक कलमी कार्यक्रम.
याच मेटपिलावारे ग्राम-पंचायतीमधील खोपडेवाडी या अन्य एका गावाने तीन वर्षे यशस्वीपणे झुंजून श्रमदान व लोकवर्गणीच्या माध्यमातून ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या मदतीने पाणीटंचाईविरुद्ध दिलेला यशस्वी लढा या चिमुकल्या वाडीने जवळून बघितला होता. तीच प्रेरणा व जिद्द उराशी बाळगून पाणीटंचाईच्या अंध:काराशी लढण्यास ही वाडी सज्ज झाली. पाणीटंचाईविषयक माहिती घेण्याकरिता आलेल्या ज्ञान प्रबोधिनीच्या अजित देशपांडे व सुनिल जोरकर या कार्यकर्त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन गावाच्या वतीने देण्यात आले. गावात नवीन विहीर बांधली तरच आपला पाणी प्रश्न खात्रीने सुटेल याची खूणगाठ त्यांनी पक्की उराशी बाळगली. संस्थेने विहिरीच्या जागेचे ग्रामपंचायतीच्या नावाने अधिकृत बक्षीसपत्र करून मागितले. त्यासाठी गावाने जागामालक धावू कोंडीबा ढेबे यांची समजूत काढून त्याला बक्षीस पत्रासाठी राजी केले. बक्षिसपत्रासाठी सरकारी उदासीनता आड येऊ लागली. अधिकृत नोंदणीपत्रासाठी सही आवश्यक असणारा ग्रामसेवक लपंडाव खेळून टाळाटाळ करू लागला. अखेरीस ग्रामस्थांनी त्यास त्यांच्या पद्धतीने सज्जड दम भरून ठिकाणावर आणले. बर्याच हेलपाट्यांनंतर अखेरीस अधिकृत बक्षीसपत्र हाती पडले (मे २०१५ मध्ये) परंतु तोपर्यंत कामाचा हंगाम उलटून गेल्यामुळे प्रत्यक्षात एक वर्ष वाया गेले.
यंदा संक्रांतीनंतर (जानेवारी २०१६) लगेचच ग्रामस्थांनी विहिरीपर्यंत जाण्याचा रस्ता जेसीबी लावून स्वखर्चाने तयार करून घेतला आणि संस्थेकडे विहिरीचे काम चालू करण्याचा तगादा लावला. ग्रामस्थांची चिकाटी पाहून संस्थेने पुरेसा निधी नसतांनाही विहिरीच्या कामास सुरुवात केली. संस्थेतील तंत्रज्ञ पंकज शिर्के यांनी तातडीने एकूण विहिरीच्या कामाचे रीतसर अंदाजपत्रक करून दिले. सुरवातीच्या काही सुरुंगाच्या फेर्यानंतर निघालेली दगडमाती या धनगर मंडळीनी श्रमदानाने काढली. परंतु वस्तीचे मोजके मनुष्यबळ या कामासाठी अपुरे पडू लागल्यावर त्यांनी स्वखर्चाने जेसीबी लावून दगड माती काढण्यास सुरुवात केली. जेसीबीच्या खर्च ग्रामस्थांनी ४३ हजार रुपयांची लोकवर्गणी काढून केला. १५ फुट खोली झाल्यानंतर दगडमाती काढण्यास यारी मशीन (क्रेन) आणण्यात आली. यारी मशीनच्या भांड्यात दगड माती भरण्याचे काम मात्र ग्रामस्थांनी पूर्णपणे श्रमदानाने केले. एकूण २५४ मनुष्य दिवस ग्रामस्थांनी श्रमदान केले त्याचे मूल्यच मुळी पाऊण लाखाच्या आसपास आहे. कामात खंड पडू न देता काम सलगपणे चालू राहावे यासाठी प्रबोधिनीचे अनिल पालकर हे गावात मुक्कामी ठाण मांडून बसले. ग्रामस्थांना एकत्र करण्यात उपसरपंच राजू ढेबे व गंगाराम ढेबे यांचा पुढाकार महत्वाचा होता.
दरम्यानच्या काळात या विहिरीच्या कामासाठी निधी मिळविण्यासाठी प्रबोधिनीने अनेक प्रयत्न केले परंतु त्यास विलंब लागत होता. अखेरीस प्रबोधिनीच्या सुनीता गायकवाड यांनी या गावच्या चिकाटीची कथा केपीआयटी टेक्नॉलॉजीचे सीएसआर प्रमुख तुषार जुवेकर यांच्या कानावर घातली. त्यांनी तातडीने गावास भेट देऊन पाच लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आणि हातात पैसे नसतांना काम चालू करणार्या कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला. आत्तापर्यंत विहिरीचे खोदकाम पूर्ण झाले असून नुकतीच बांधकामासही सुरवात झाली आहे. सुमारे २६ फुट व्यास व २७ फुटाची खोली असणार्या या विहिरीतील पाणीसाठ्याची क्षमता सुमारे सव्वा चार लक्ष लिटर इतकी झाली आहे.
विहिरीचे बांधकाम करतांना विहिरीभोवती पडलेला दगडमातीचा विळखा हटविणे गरजेचे होते. त्यातून बांधकामासाठी चांगले दगड निवडून बाजूला काढणेही उपयोगाचे होते. अशा वेळेस पुण्यातील विविध महाविद्यालयातील तरूणाई ग्रामस्थांच्या मदतीला धावून आली. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी युवक विभाग, रमणबाग वाद्य विभाग व युवा वाद्य पथक अशी गणेशोत्सवात सक्रीय असणारी मंडळींनी या पाणीटंचाई निवारण कार्यात मनापासून रस घेतला. शनिवार-रविवार हे युवकांचे जत्थे गावात आपापल्या वाहनासह धडकू लागले आणि हे दगड निवडून वाहतूक करण्याचे वेळखावू काम झटपट संपविले. आत्तापर्यंत शंभराहून अधिक शहरी तरुणमंडळी या गावात येऊन गेली हे विशेष !
आता या विहिरीच्या बांधकामाचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे. अखेरपर्यंत जिद्द व निर्धारशक्ती दाखविणार्या या गावापुढे अडथळ्यांनीसुद्धा हार मानली आहे. शहरवासीयांनी या जिद्दीला सलाम करण्यासाठी किमान एखादा दूरभाष करण्याचे औदार्य तरी नक्कीच दाखवायला हवे.
सम्पर्क
गाव संपर्कासाठी दूरध्वनी: राजू ढेबे (०२१३०) २०४०१९
Path Alias
/articles/paanaitancaaicae-jaokhada-jhaugaaranaarai
Post By: Hindi