नदीच्या पात्रातच पाण्याचे मोठे तलाव : पाण्याचे दुर्भिक्ष व दुष्काळावरील उत्तम उपाय

काही प्रदेश असे आहेत की तेथील नद्यांमधून बारा महिने भरपूर पाणी वहात असते. असे प्रदेश पाण्यासाठी पावसावर अवलंबून नसतात व त्यामुळे तेथे पाण्याचे दुर्भिक्ष वा दुष्काळ संभवत नाही. पण बहुतांशी प्रदेश असे आहेत की ते पाण्यासाठी अंशत: किंवा संपूर्णपणे पावसावर अवलंबून असतात. सरासरी किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाऊस जेव्हा पडतो तेव्हा तेथील नद्यांतून भरपूर पाणी वहात असते व धरणांमध्ये पाण्याचा भरपूर साठा असतो. तरीसुध्दा अशा प्रदेशांतील काही विभाग हे पालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थेपासून खूपच दूर असतात. अशा विभागात सरासरी इतका पाऊस झाला तरी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवतं कारण पावसाळ्यानंतर काही महिन्यात नदीचे पात्र बहुतांशी कोरडे पडलेले असते. सरासरी पेक्षा कमी पाऊस पडतो तेव्हा सर्व प्रदेशातच पाण्याची टंचाई जाणवते व जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा परिस्थिती अगदी चिंताजनक होते.

पाण्याच्या टंचाईला वा पडणाऱ्या दुष्काळाला काबूत आणण्यासाठी एक अभिनव अशी संकल्पना खाली सविस्तरपणे सुचविली आहे.

पावसाळा संपल्यावर तीन ते चार महिन्यांत बहुतेक नद्यांची पात्रे कोरडी पडतात. नदीवर बांधलेल्या शेवटच्या धरणापुढे नदीच्या सखल भागातील कोरड्या पात्रात चर खणायचे. त्या चरांची रूंदी नदीच्या पात्राइतकीच ठेवायची. चरांची लांबी व खोली पाण्याच्या आवश्यकते प्रमाणे ठेवायाची उदाहरणार्थ लांबी 100 ते 1000 मीटर्स किंवा त्याच्या पेक्षा कमी वा जास्त आवश्यकतेप्रमाणे ठेवायची. चरांची खोली 5 ते 39 मीटर्स पर्यंत असावी. कमी किंवा जास्त जरूरी प्रमाणे ठेवता येईल.

वरीलप्रमाणे पहिला चर खणायचा. त्या चराच्या पुढील 30 ते 50 मीटर्स पर्यंतचे नदीचे पात्र जसे आहे तसेच ठेवायचे. नंतर दुसरा चर खणायचा. त्या दुसऱ्या चराच्या पुढील 30 ते 50 मीटर्स पर्यंतचे नदीचे पात्र आहे तसेच ठेवायचे व नंतर तिसरा चर खणायचा. अशा पध्दतीने शक्य असेल तिथे व पाण्याच्या आवश्यकतेप्रमाणे शहर वा गावाच्या जवळपास चर खणत गेल्यावर त्यांची एक मोठी मालिका तयार होईल. नदीचे संपूर्ण पात्रच अशा पध्दतीने खणून काढावे असे येथे मुळीच सुचविले नाही.

पावसाळा सुरू झाला की पाऊस कमी जास्त प्रमाणात सर्व प्रदेशात पडतो. हे पावसाचे पाणी नाले, ओढे व छोटे मोठे प्रवाह यांतून वहात शेवटी नदीच्या पात्रात शिरते. ते प्रथम चरांमध्ये उतरेल, पाऊस जसजसा पडेल तसे चरांतील पाणी वाहू लागेल. पाऊस व्यवस्थित पडला तर चर पूर्णपणे भरून खालच्या बाजूला ओसंडून वाहू लागतील. व नदीच्या पात्रांतील पाण्याची उंचीपण वाढू लागेल. खूप पाऊस पडला तर धरणेसुध्दा ओसंडून वाहू लागून ते पाणी नदीच्या पात्रांतून वाहू लागल्यामुळे नदी दुथडी भरून वाहू लागेल. काही काळानंतर पावसाचा जोर ओसरल्यावर नदीच्या पाण्याची पातळी कमी होवून लागेल. काही महिन्यांनंतर नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडते. पण चर खणलेले असल्यामुळे त्या चरांतील साठलेले पाणी वाहून जावू शकणार नाही व साठवलेले राहील.

अशा पध्दतीने नदी सखल भागातून वहायला सुरूवात करते तेथपासून ती समुद्राला मिळेपर्यंतच्या तिच्या पात्रात खणलेल्या चरात पाणी साठविलेल्या स्वरूपात राहील.

याच पूर्णपणे पाण्याने भरलेल्या चरांना नदीच्या पात्रांतच पाण्याचे मोठे तलाव असे संबोधले आहे. पाणी एकदा साठवले की ते कसे व कशासाठी वापरायचे याचे योग्य नियोजन आपण करू शकतो.

उदाहरणार्थ 100 मीटर्स लांब, 30 मीटर्स खोल व 20 मीटर्स रूंद असलेल्या एका चरामध्ये खालील प्रमाणे पाणी साठविले जाईल.

साठवलेले पाणी = 100 मीटर्स X 30 मीटर्स X 20 मीटर्स
6,00,00 घनमीटर्स
(एक घन मीटर = 1000 लिटर्स)
= 6 लाख किलो लिटर्स

या संपूर्ण लेखामध्ये चराची खोली व लांबी केवळ उदाहरणासाठी घेतलेली आहे. गरज, आवश्यकता व भौगोलिक परिस्थितीप्रमाणे त्यात कमी वा जास्त बदल करावा.

चर खणण्याच्या खर्चाचा दर हा चराची खोली जशी वाढत जाते तसा वाढत जातो. तसाच पात्र कशा स्वरूपाचे आहे त्यावर पण तो दर अवलंबून असतो. नदीचं पात्र मुरूम किंवा मऊ मातीचे असेल तर तो खूपच कमी असतो. व पात्र जर खडकाळ किंवा कातळाच असेल तर तो खूप जास्त असतो.

सर्व साधारणपणे हा दर रूपये 100 पासून ते रूपये 2000 पर्यंत प्रत्येक घनमीटरला असतो.

चर खणण्यासाठी येणारा खर्च जर आवाक्या बाहेर होत असेल तर चराची खोली कमी करून लांबी वाढवावी. खोली 5 मीटर्सपर्यंत ठेवली तरी चालू शकेल.

योग्य लांबी व खोली असलेले छोटे छोटे चर ओढे व नाले यामध्ये सुध्दा खणून ठेवल्यास त्यांत साठणारे पाणी सुध्दा खूप असेल व त्याचा चांगला उपयोग होवू शकेल.

अ) संकल्पनेतील अडचणी / प्रश्न व त्यांची उत्तरे :
1. चरांमध्ये गाळ साचून ते गाळाने भरून जातील.

साचलेला गाळ वर्षातून एकदा किंवा दोन वर्षांतून एकदा काढावा लागेल. गाळ किती साचतो आहे यावर ते अवलंबून आहे. गाळ साठण्याचे प्रमाण हे प्रत्येक प्रदेशात वा विभागात वेगवेगळे असेल व ते त्या भागातील जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असेल. तरी सुध्दा पहिल्या दोन किंवा तीन चरांमध्ये गाळ साठण्याचे प्रमाण खूप असेल व नंतरच्या चरांमध्ये हे प्रमाण खूपच कमी झालेले असेल.

गाळ धरणांमध्ये व इतर पाटबंधारे योजनांमध्ये सुध्दा साठत असणार. परंतु चरांतील गाळ काठणे हे तौलनिक दृष्ट्या नक्की सोपं ठरणार आहे. गाळ जर खूप जास्त जमत असेल तर चरांची खोली कमी ठेवल्यास सोयीस्कर होईल.

हा एक महत्वाचा प्रश्न आहे. प्रयोगिक तत्वावर जे चर खणायचे आहेत त्यामध्ये या प्रश्नाचा सखोल अभ्यास व निरिक्षण करून तो सोडवावा लागेल.

गाळ बाहेर काढण्यासाठी सुचविलेला उपाय :


नदीच्या बांधांमधून एक छोटासा मार्ग तयार करायचा. या मार्गवरून गाळ वाहून नेणारा ट्रक नदीच्या पात्रात उतरू शकेल. चर खणतांनाच चराच्या पुढील व मागील टोकांना आवश्यक असा उतार द्यायचा. या उतारावरून ट्रक नदीच्या पात्रातून चराच्या तळापर्यंत नेता येईल. चरांतून काढलेला गाळ या ट्रकमध्ये भरून तो गाळ योग्य त्या ठिकाणी टाकता येईल. पावसाळा संपल्यावर नदीचे पात्र जेव्हा कोरडे पडते तेव्हा हा गाळ काढणं सहज शक्य होवू शकेल.

2. गाव वा शहराचं सांडपाणी आणि कारखान्यांचे दूषित पाणी चरांमध्ये शिरेल :
मुख्य प्रश्न असा आहे की आत्ता या घडीला नदीच्या पाण्याच वरीलप्रमाणे घाण शिरत नाही काय ? नसेल तर चर खणल्यावर सुध्दा ते घाण पाणी चरांत शिरायचा प्रश्न येत नाही व जर ते शिरत असेल तर आत्ता पण तो प्रॉब्लेम येत असणार. मग तो कसा सोडवला जातो ?

असो. तरी सुध्दा चरांची जागा अशी निवडायची की त्यामध्ये वरील घाण शिरणार नाही. शिवाय दूषित पाणी शुध्द करण्यासाठी यंत्रणा (Effluent Treatment Plants) बसविण्याची सक्ती करावी लागेल.

3) 30 मीटर्स किंवा त्याच्या पेक्षा खोल खणणं शक्य आहे का ?
कोळशाच्या व इतर खाणी जमिनीच्या खाली 1 ते 5 कि.मी पर्यंत खणलेल्या असतात. मेट्रो रेल्वे जमिनीखालून 50 ते 60 फूटावरून जाते. तेव्हा जास्त खोल खणण्याचं तंत्रज्ञान व क्षमता आपल्याकडे सहज उपलब्ध आहे.

4) नदीचं पात्र दगडाचं किंवा कातळाचं असेल.
मोठ्या क्षमतेचे स्फोटक पदार्थ वापरून दगडात चर खणणं अशक्य नाही. कोकण रेल्वे बांधतांना अगणित बोगदे डोंगरांतील खडक फोडूनच (Controlled Blasting) बांधलेले आहेत.

ब) काही शंका व त्यांची उत्तरे :
1. चरांत साठवलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होईल :
याचे प्रमाण खूपच कमी असेल. धरणाच्या पाण्याचे व इतर पाटबंधारे योजनांमध्ये सुध्दा असे बाष्पीभवन होतच असतं. चरांमधील पाण्याचे बाष्पीभवन आणखीन कमी असेल कारण फक्त 3 ते 4 महिनेच ते होणार आहे व शिवाय सूर्याचे सरळ किरण चरांतल्या पाण्यावर दिवसांतील फक्त 3 ते 4 तासच पडणार आहेत व चरांतील पाण्याचे पृष्ठफळ (Surface Area) साठलेल्या पाण्याच्या तुलनेत खूपच कमी असणार आहे.

2. चरांतील पाणी जिरून जाईल :
ही गोष्ट ताबडतोब होत नाही. त्याची गती (Rate) खूप कमी असते. व जरी ते जिरले तरी आजूबाजूच्या जमिनीत ओलाव्याच्या स्वरूपात ते असेल किंवा जमिनीखालील पाण्याच्या साठ्यामध्ये जावून तो साठा वाढेल (Water Table conditions will improve) एवढ नक्की की साठवलेले पाणी फुकट जाणार नाही.

3. नदीचे किनारे पात्रात कोसळतील :
चर खणतांना किनाऱ्यांना आजिबात हात लावयाचा नाही. ते आहेत तसेच ठेवायचे आहेत. चर खणतांना नदीच्या पात्रात किनाऱ्यापासून 1 मीटर जागा तशीच ठेवून चर खणायचे. शिवाय चरांच्या भिंतीना एक विशिष्ट उतार द्यायचा.

चरांत साठलेले पाणी स्थिर स्वरूपातच रहाणार आहे. ते वाहणार नाही त्यामुळे किनारे किंवा चरांच्या भिंती कोसळण्याची शक्यता जवळ जवळ नाही. तरीही प्रायोगिक तत्वावर खणलेल्या चरांमध्ये याचा नीट अभ्यास करता येईल.

4. पर्यावरणाला धोका आहे :
नदीचा प्रवाह बदलेला नाही. झाडे तोडलेली नाहीत. प्राणी पक्षी व वन्य जीवांची हत्या केलेली नाही. कुठच्याही प्रकारचा धूर व इतर प्रदूषण नाही. त्यामुळे पर्यावरणावरून विरोध होवू नये.

चर जरूर खणलेले आहेत पण ते नदीच्या पात्रातच आहेत. खाणी, मेट्रो रेल्वे, बोगदे, मोठे मोठे टॉवर्स बांधतांना ज्या खोलीपर्यंत खणलं जातं त्याच्या तुलनेत चरांच्या खणण्यामुळे पर्यावरणाला धोका असू शकत नाही.

क ) प्रायोगिक तत्वावर राबवायची योजना :
100 मीटर्स लांब, 15 मीटर्स खोल व 20 मीटर्स रूंद असा एक चर नदीच्या पात्रात ते कोरडे असतांना खणायचा. पावसाळा सुरू झाल्यावर या चरामध्ये पाणी साठू लागेल व पावसाळा संपल्यावर या चरामध्ये पाणी पूर्णपणे भरून राहिले असेल.

वरील चरांत साठलेले पाणी
साठवलेले पाणी = 100 मीटर्स X 15 मीटर्स X 20 मीटर्स
30,000 घनमीटर्स
(एक घन मीटर = 1000 लिटर्स)
= 1 किलो लिटर्स
= 30,000 किलो लिटर्स

शक्य असेल तर दोन आणखीन चर, एक 5 मीटर्स खोलीचा व दुसरा 10 मीटर्स खोलीचा खणून त्यात पाणी साठवावे.

चरांत साठविलेल्या पाण्याचा व चरांचा सुध्दा अ आणि ब मध्ये उल्लेख केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने अभ्यास व निरीक्षण करायचे.

जर प्रायोगिक तत्वावर खणलेल्या चरांपासून अपेक्षित फायदा झाला व ही संकल्पना यशस्वी होईल असं वाटलं तर निरीक्षण व अभ्यासाप्रमाणे योग्य ते बदल व सुधारणा करून वेगवेगळ्या क्षमतेचे चर आवश्यकते प्रमाणे योग्य त्या जागी खणून हळूहळू सर्व राज्यात ही योजना आपण राबवू शकू व पाण्याचं दुर्भिक्ष व दुष्काळावर मात करू शकू.

मूळ संकल्पना प्रथमदर्शनी चमत्कारीक वाटली तरी ती यशस्वी होईल अशी लेखकाला खात्री वाटत आहे.

ड) यशस्वी योजने पासून होणारे फायदे :


1. पावसाळा संपल्यावर नदीचे पात्र कोरडे पडते तेव्हा चरांत पाणी साठवलेले राहील. पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण नाहीशी होईल. शेतीला पाणी मिळून उत्पादन वाढू शकेल.
2. पाऊस जेव्हा सरासरी इतका किंवा जास्त पडतो तेव्हा या अधिक साठविलेल्या पाण्यापासून शेतकरी वर्षातून दोनदा पिके घेवू शकतील. कारखाने व उद्योगांना सुध्दा पाणी मिळू शकेल.
3. चरांची रूंदी नदीच्या पात्राइतकीच ठेवायची असल्यामुळे भूसंपादनाची गरज पडणार नाही जी इतर योजनांमध्ये एक डोकेदुखी होवून बसते.
4. पाटबंधारे वा इतर पाणी साठविण्याच्या योजनांच्या आड हे चर येणार नाहीत त्या योजना जशा आहेत तशाच राहतील व आणखी राबविता येवू शकतील.
5. चरांमध्ये साठणारा गाळ हा अतिशय सुपिक असणार आहे त्यामुळे पुढील वर्षी जेव्हा तो काढण्यात येईल तेव्हा त्याला शेतकऱ्यांच्या कडून मागणी येवू शकेल.
6. विशिष्ट प्रदेशांतील चरांमध्ये चांगल्या प्रतीची रेती साठू शकेल की जी बांधकाम व्यवसायासाठी अत्यंत जरूरी आहे.
7. चर खणता खडक व कातळ फोडावे लागले तर ते बाहेर काढलेले दगड बांधकाम व इतर कारणांसाठी उपयोगी होवू शकतील. त्याची बांधकामाला व रस्त्यांना लागणारी खडी तयार करता येईल.
8. प्रचंड पाऊस पडून जेव्हा नद्यांना पूर येतो तेव्हा त्याची तीव्रता खूप कमी होवू शकेल. चर खणलेले नसले तर तेवढे पाणी गावांत व शहरात पसरून पूराची तीव्रता वाढेल.
9. मत्स्यव्यवसाय किंवा तसेच इतर धंदे एखाद्या चरांत सुरू करता येतील.

इ) आर्थिक दृष्ट्या ही संकल्पना परवडेल का ?
1. चर खणण्यासाठी एकदाच खर्च होणार आहे.
2. चरांत साठविलेले पाणी पुरवठा करण्यासाठी यंत्रसामुग्री बसवावी लागेल पण तो खर्च सुध्दा एकदाच करावयाचा आहे.
3. चरामधील गाळ काढण्याचा खर्च दरवर्षी किंवा दोन वर्षांपर्यंत एकदा करावा लागेल.
4. पाणी पुरवठा करण्यासाठी बसविलेल्या यंत्रसामुग्रीचा देखभालीचा खर्च दरवर्षी करावा लागेल.

वरील प्रमाणे होणारा एकूण भांडवली खर्च आणि यावरील व्याज व दरवर्षी करावा लागणारा देखभालीचा खर्च हा खालील नमूद होणाऱ्या फायद्यांमधून 5 ते 10 वर्षाच्या आत वसूल होवू शकेल.

1. बाहेरून पाणी पुरवण्यासाठी दरवर्षी होणारा पाण्याच्या टँकर्सवरचा खर्च वाचेल.
2. चरांत साठविलेले पाणी उद्योगधंद्यांसाठी पुरविले तर त्यावर आकार लावता येईल.
3. शिवाय ड मध्ये उल्लेखिलेल्या फायद्यांपासून आर्थिक फायदा ज्याचे मूल्यमापन आज करणे किंवा आधी करणे कठीण आहे.

Conclusion :
मला असं वाटतं, नव्हे माझी तशी खात्री आहे की ही संकल्पना समजून व व्यवस्थित राबविली तर आपण परिणामकारकपणे पाण्याचे दुर्भिक्ष व दुष्काळ यावर मात करू शकू.

फक्त जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे व उपाय कुणी सुचविला आहे या पेक्षा तो काय सुचवला आहे अशी अहंकार मुक्त भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे.

संकल्पनेतील मला न उमगलेले दोष व तिच्यामाधील अव्यवहार्यता मला कुणी उदाहरणे देवून पटवून देवू शकत असेल तर माझी समक्ष भेट व चर्चा करायची इच्छा व तयारी आहे.

प्रकाश सोहोनी

प्रकाश सोहोनी, मुंबई - फोन : 26112139, इमेल : prakashsohoni16@gmail.com

Path Alias

/articles/nadaicayaa-paataraataca-paanayaacae-maothae-talaava-paanayaacae-daurabhaikasa-va

Post By: Hindi
×