कांदा रडवणारच


कांदा एक वर्ष शेतकर्‍याला रडवतो तर एक वर्ष ग्राहकाला. हे अनादी काळापासून सुरुच आहे. हे थांबवण्याचा प्रयत्न कोणीही करतांना दिसत नाही. दर वर्षीप्रमाणे या प्रश्‍नावर वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भरुन येत असतात पण प्रश्‍नाच्या मूळाकडे कोणीही जात नाही. जणू काय सरकारचाच दोष आहे असे समजून शेतकरी व ग्राहक आणि त्याचप्रमाणे विरेधी पक्ष (मग तो कोणताही का असेना) सरकारला झोडपून मोकळा होतो.

कांदा एक वर्ष शेतकर्‍याला रडवतो तर एक वर्ष ग्राहकाला. हे अनादी काळापासून सुरुच आहे. हे थांबवण्याचा प्रयत्न कोणीही करतांना दिसत नाही. दर वर्षीप्रमाणे या प्रश्‍नावर वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भरुन येत असतात पण प्रश्‍नाच्या मूळाकडे कोणीही जात नाही. जणू काय सरकारचाच दोष आहे असे समजून शेतकरी व ग्राहक आणि त्याचप्रमाणे विरेधी पक्ष (मग तो कोणताही का असेना) सरकारला झोडपून मोकळा होतो. कोणी सरकारी कार्यालयांवर कांदाफेक करुन स्वतःच्या मनाची तसल्ली करुन घेतो. कोणी मंत्र्याच्या गळ्यात कांद्याची माळ घालून मोकळा होतो. कोणी रागारागाने कांदा नाल्यात फेकून मोकळा होतो. वर्तमानपत्रे सुद्धा रकानेच्या रकाने या प्रश्‍नावर खर्च करुन वातावरण तापवत असतात. या प्रकाराने प्रश्‍न सुटला असता तर काही म्हणायचे नाही. पण तो सुटत नाही ना म्हणून हा लेखन प्रपंच.

बाजारपेठेला अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे चालावे लागते. मालाच्या किंमती मागणी व पुरवठ्यावर अवलंबून असतात हे आता शाळकरी मुलालाही समजायला लागले आहे. कांदा तयार व्हायला तीन ते चार महिन्याचा अवधी लागतो. चार महिन्यांनंतर बाजाराची परिस्थिती काय राहणार आहे याचा विचार करुन कांद्याची लागवड केली तर प्रश्‍न काही अंशी सुटण्यासारखा आहे. बाजाराची परिस्थिती काहीही असो, मी कांदा निर्माण करणार, तो विकला गेला नाही तर सरकार त्याला जबाबदार आहे असे म्हणून प्रश्‍न सुटत नसतात. थोडा विवेक बाळगला तर खालील मार्ग विचारात घेतले जावू शकतात.

१) कांद्याचे आयुष्य वाढविण्यासाठी किती शेतकर्‍यांनी वखारी उभारल्या याचाही विचार व्हावयास हवा. कांदा तयार झाल्या बरोबर बाजारात धाव घेतली तर कांद्याचे भाव पडणारच ना. मी काही शेतकर्‍यांशी या बद्दल बोललो. ते म्हणतात, या वखारी उभारण्यासाठी आम्हाला कर्ज मिळत नाही, या संबंधात बँका आमच्याकडे दुर्लक्ष करतात. मग कांद्याचे भाव वाढवून मागण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा बँकांनी आम्हाला कर्ज द्यावे या साठी आंदोलन करा ना. आंदोलन जरुर करावे पण त्याचा उद्देश रचनात्मक असावा.

२) ठोक बाजारात कांदा जेव्हा पाच पैसे किलो झाला होता त्याच दिवशी मी बाजारात कांदा खरेदीसाठी गेलो होतो. मला मात्र कांद्यासाठी २५ रुपये किलो हा भाव द्यावा लागला. बाजार व्यवस्थेतील हा विरोधाभास संपवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कांदा विशिष्ट प्रदेशात निर्माण होतो. सर्व कांदा तयार झाल्याबरोबर जवळपासच्या बाजारपेठेत जातो. तिथे पुरवठा इतका वाढतो की तिथे भाव पडणारच. आज देशभरातील कांद्याचे बाजारभाव काय आहेत याची माहिती इंटरनेटवर उपलब्ध असते. तिथे तर भाव ५ पैसे किलो नसतो ना? तुम्हाला तुमच्याच गावात नोकरी हवी असल्यास पगार फारच कमी मिळतो. पण जर तुम्ही आपले गाव सोडून दूर जायला तयार असाल तर सहाजिकच बरा पगार मिळू शकतो. तीच गोष्ट शेतमालालाही लागू पडते. मोबाइल काय फुकट चॅट करण्यासाठी असतो काय? तुमच्या हातात आधुनिक तंत्रज्ञान आलेले आहे. त्याचा वापर केला तर तुमच्यावर अशी पाळी येणार नाही याची खात्री बाळगा. पिकते तिथे विकत नाही ही म्हण आपणास प्रत्येकाला माहित आहे. तुम्हाला तुमच्याच गावात व तोही ताबडतोब कांदा विकायचा असेल तर मग तुम्हाला मिळेल तो भाव पदरी पाडून घेणे आवश्यक आहे.

३) सरकार कोणत्याही बाबतीत योग्य निर्णय घेत असते. पण तोंडातून शब्द निघाला म्हणजे क्षणार्धात तो अंमलात येईल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. सरकारी निर्णय पाझरत पाझरत खाली येत असतो. कोणतेही सरकार आले तरी तुम्ही अपेक्षिता ती कार्यक्षमता येण्यासारखी परिस्थिती नसते. पण तुम्ही मात्र हातघाईवर आले असता. तुमच्याच घरातले उदाहरण घ्या ना. मला जेवायला वाढ म्हंटल्याबरोबर तुमची बायको तुमच्या समोर ताट आणून ठेवू शकते काय याचा विचार करा. तिला तयारी करायला जसा तुम्ही वेळ देता तो सरकारलाही द्यायला हवा हे तुम्ही नाकारु शकत नाही. तुमच्या या अगतिकतेचा तुमचे नेते फायदा घेत असतात. तुम्हाला भडकवून देणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो. तुम्ही अडचणीत असल्यामुळे व तुमच्या् भावनेला हात घातल्यामुळे त्यांचे म्हणणे तुम्हाला सहजपणे पटते व तुम्ही सरकारवरील आपली नाराजी व्यक्त करता. हे सरकार शेतकरी विरोधी आहे अशी तुमची भावना करुन देण्यात आली आहे. त्यांचे हाती सरकार होते तेव्हा हे सर्व प्रश्‍न सुटले काय हा प्रश्‍न तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की. ७० वर्ष एक हाती सत्ता असतांना हे प्रश्‍न सुटले असते तर तुम्ही आता नंदनवनातच राहायला हवे होते.

४) तो पंतप्रधान ओरडून ओरडून तुम्हाला सांगतो आहे की तुमच्या शेत मालाचे तुम्ही मूल्यवर्धन करा. कांद्याची भुकटी करणे वा पेस्ट करणे हे विज्ञानाने शक्य करुन दाखवले आहे. आज जगाच्या बाजारपेठेत अशा मालाला मागणी वाढत आहे. मालाला मागणी वाढविण्यासाठी उत्पादकालाही प्रयत्न करावे लागतात. तुम्ही आपले कांदा एके कांदा करील बसलात तर काय साध्य होणार? कोणी उद्योगपती पुढे आला व त्यांने हे सुरु केले आणि नफा कमवायला सुरवात केली तर तुम्ही पुन्हा त्याचे नावाने बोटे मोडायला तयार राहणार. एवढी चांगली संधी तुमचे दार ठोठावते आहे. ती जर तुम्ही नाकारली तर दुसरा पुढे येवून त्या संधीचे सोने करणार ही गोष्ट लक्षात ठेवा.

५) तुमच्या मुलांना शिकण्यासाठी कृषी विद्यापीठे व कृषी महाविद्यालये सुरु केली. अपेक्षा अशी होती की ते शिकतील, त्यांचे अद्यावत ज्ञान शेतात वापरतील व त्यामुळे तुमचे भले होईल. त्याचे काय झाले? ते शिकल्याबरोबर अर्ज घेवून नोकरीच्या मागे लागतात. आपण शेतकरी आहोत हे ते विसरुन जातात. त्यांच्या अभ्यासक्रमात कृषी उद्योग समाविष्ट असतात. या ज्ञानाचा वापर त्यांनी आपल्या जीवनात करावयास हवा होता. पण ते चाकरमाने बनतात व त्या मिळालेल्या ज्ञानाचा बट्ट्याबोळ होतो. ज्याचेजवळ ज्ञान आहे तो वापरायला तयार नाही व ज्याचेजवळ ते ऩाही तो हतबलपणे बघत बसतो अशी सध्या दैन्यावस्था झालेली आहे.

वरील मुद्यांचा विचार करा. आज आत्मसंशोधन महत्वाचे आहे. माझे काही चुकते का याचा विचार करणे गरजेचे आहे. काळाप्रमाणे बदलणे हे आजचे बोधवाक्य आहे हे जाणा.

सम्पर्क


डॉ. दत्ता देशकर
पुणे, मो : ९३२५२०३१०९


Path Alias

/articles/kaandaa-radavanaaraca

Post By: Hindi
×