जलश्री : मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव

दुर्मिळ पशू, पक्षी, वनस्पती, कीटक यांचे संवर्धन करण्याच्या हेतूने जळगाव जिल्ह्यातील जंगले व जैवविविधतेवरील अतिक्रमण रोखण्यासाठी शाश्वत शेतीचे एक प्रात्यशिक तयार करण्यात आले आहे. या मध्ये सेन्सर तंत्रज्ञान व स्वयंचलित प्रणालीचा वापर करून, पाणी वापर व कार्यक्षमता वाढविता येवू शकते याचे प्रात्यक्षिक केलेले आहे. या प्रकल्पात रिमोट सेन्सींग तंत्रज्ञानाचा वापर करून 56 मार्गांवर सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. या माध्यमातून जैवविविधतेची अचूक माहिती संकलित करण्यात आली.

गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा आणि कोकणातील पश्चिम वाहिनी नद्या अशा पाच नदी खोऱ्यात राज्याचे क्षेत्र विभागले गेले आहे. यापैकी कृष्णा व कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांची खोरी वगळता उर्वरित खोरी पाण्याच्या तुटीची खोरी म्हणून ओळखली जातात. सुमारे 66 टक्के क्षेत्र तुटीच्या प्रभावाखाली येते. पाण्याच्या तुटीच्या क्षेत्राचे आकारमान मोठे आहेच, तद्वतच जलक्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी व उन्नतीसाठी सामाजिक कार्यकर्ते पुढे आले नाहीत, ही देखील मोठी तूट आहे. वैज्ञानिक अद्ययावतता, आत्मनिर्भरता, लोकसहभागाचा व्यापक आधार, पाण्याच्या विविध उपयोगांचा समन्वय, व्यवस्थांचे स्थायित्व, समृध्दीची निर्मिती आणि निर्मलता ही आदर्श जलसंस्कृती लक्षणे. ती रूजविण्यासाठी सामाजिक आघाडीवर अपेक्षित गतिमानता आलेली नाही, ही जलतज्ज्ञांना सतत जाणवणारी खंत. ती दूर करण्यासाठी ठोस म्हणता येतील असे प्रयत्न खान्देशात सुरू झाले आहेत. वास्तविक खान्देशचा समावेश अतितुटीच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापी खोऱ्यात होतो. तथापि आपत्तीतून इष्टापत्ती या धारणेतून काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींची खाण, ही खानदेशची नवी ओळख ठरते आहे. अर्थात जलसंपत्तीचे जतन व काटकसरीने वापर या आघाडीवर राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेले प्रयोग खचितच समाधान देणारे आहेत. मात्र पाणी व पाण्याशी संबंधित नैसर्गिक संपत्ती यावर संशोधन करून ते समाजापर्यंत पोहचविण्यासाठीचे आगळेवेगळे काम खान्देशातील जळगावमध्ये सुरू झाले आहे.

केळी, कपाशी आणि कविता यासाठी प्रसिध्द असलेला खान्देशातील जळगाव जिल्हा संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. अशा या जळगावचे काही मानबिंदू आहेत. यात अग्रभागी असलेल्या संस्थांमध्ये खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचा समावेश होतो. संस्थेतर्फे चालविले जाणारे मूळजी जेठा महाविद्यालय खान्देशातच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रतिष्ठा प्राप्त महाविद्यालय आहे. विद्यापीठाने निर्धारित केलेले अभ्यासक्रम शिकविणारे आणि परीक्षा घेणारे केंद्र एवढीच या महाविद्यालयाची ओळख नाही. समाजिक दायित्वाच्या भावनेतून विविध उपक्रमांची अंमलबजावणी, हे या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य राहिले आहे. अर्थात या महाविद्यालयाचे संचालन करणाऱ्या खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनामध्ये सहभागी असलेल्या संस्था चालकांच्या दूरदृष्टीचा हा परिपाक आहे. समाजाचे पाण्याशी नवे नाते निर्माण होत आहे, पण त्या बाबतीतील नवी जाण अजून समाजाला पूर्णत: आलेली नाही, हे निरीक्षण लक्षात येताच खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीने मूळजी जेठा महाविद्यालयाच्या माध्यमातून ठोस काम करण्याचा निर्णय घेतला. यासाठी 15 ऑगस्ट 2006 रोजी जलश्री वॉटरशेड सर्व्हेलन्स अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली. दशकपूर्तीकडे वाटचाल करीत असतांना नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन या विषयावर प्रकल्प विकास, संशोधन आणि प्रशिक्षण देणारी विश्वासाहार्य संस्था म्हणून जलश्रीने खान्देशात नावलौकिक प्राप्त केला आहे.

Untitled

जलश्रीने केवळ पाणी अडवा पाणी जिरवा या एकमेव अजेंड्यावर लक्ष केंद्रीत केलेले नाही. पाणलोट क्षेत्र विकास व जल - मृदा व्यवस्थापन या पायाभूत आघाडीवर संस्थेचे काम आहेच, याशिवाय जैवविविधता संवर्धन, पर्यावरण संवर्धन, शाश्वत शेती, जैवतंत्रज्ञान, शाश्वत उपजिवीका उच्चतंत्रज्ञान हरितगृह, अक्षय ऊर्जा, सॉफ्टवेअर विकास आणि सेन्सर व स्वयंचलित प्रणाली असे विविध पैलूंशी निगडीत संस्थेचे क्षेत्र आहे. स्थापनेनंतरच्या पहिल्या टप्प्यात सन 2008 मध्ये संस्थेने जळगाव जिह्यातील पाथरी आणि सामनेर (ता. पाचोरा) या गावांचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करून आदर्श पाणलोट क्षेत्र विकास (Model Watershed Development) या प्रकल्पास सुरूवात केली. यासाठी हैद्राबाद येथील इक्रीसॅट (ICRISAT) या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेचे तांत्रिक व अर्थसहाय्य जलश्रीला लाभले आहे. जमीन, माती आणि पाणी या नैसर्गिक घटकांच्या संवर्धनाच्या विविध पध्दती तसेच तंत्र विकसित करून त्यांच्या परिणामांचे विश्लेषण करणे हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश होता.

जलश्रीने यासाठी उपग्रहाच्या माध्यमातून प्रतिमा प्राप्त करून व रिमोट सेंन्सींग व जी.आय.एस. तंत्राचा वापर करून निचरा (Drainage) , माती (Soil) , उतार (Slope) , रस्ते (Road) , लोकवस्ती (Settlement ), जमीन वापर (Land use), जैवविविधता (Biodiversity) इत्यादी विविध प्रकारचे नकाशे तयार केले. निर्धारित करण्यात आलेली उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली, अंमलबजावणीसाठी आदर्श पाणलोट क्षेत्र विकास समितीचे गठण करण्यात आले. या समितीच्या माध्यमातून एकात्मिक माती व पाणी संवर्धनासाठी माती परिक्षण करून शेतकऱ्यांमध्ये सुधारित बियाणे, सुधारित शेत जमिनीची रचना, पोषण द्रव्ये या संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी रचनात्मक प्रयत्न करण्यात आले. गाळ काढणे, नर्सरी विकास, व्हर्मी कंपोस्ट, शेततळे, साठवण बंधारे, चेक बंधारा, केटी वेअर इत्यादी विविध पध्दतींचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले. पाथरी आणि सामनेर परिसरात आधुनिक बांधकाम तंत्राचा वापर करून Diversion Canal, Sunken Pits, Gabion Structure इत्यादी तंत्रावर आधारित बंधारे उभारण्यात आले आहेत. या माध्यमातून पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. पाण्याची उपलब्धता वाढली. मात्र शेती करण्याचे व पिकांना पाणी देण्याचे तंत्र पारंपारिकच होते. जलश्रीने आपल्या तज्ज्ञसहयोगी सदस्यांच्या मदतीने Tropicuttor Machine च्या सहाय्याने सुधारित जमीन वाफे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. याशिवाय पाणलोट विकास क्षेत्रामध्ये स्वयंचलित हवामान यंत्र (AWS), Hydrological Station, जमिनीची धूप मोजण्याचे यंत्र बसविण्यात आले. या माध्यमातून मिळणाऱ्या

माहितीची शेतकऱ्यांना मोलाची मदत होते. स्वयं - मदत (SHG) गट तयार करण्यात आले आणि त्या माध्यमातून उपजीविकेची विविध साधने देण्यात आली, महिला सशक्तीकरण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यात आले. या पाणलोट क्षेत्रामध्ये उच्च तंत्रज्ञान वापरून शाश्वत शेती (Sustainable Agriculture), शेती व्यवस्थापन (Agro Business Management) तसेच सांडपाण्याचा पूर्ण वापर करणे या उद्देशाने सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रात एक मॉडेल विकसित करण्यात येत आहे.

जैवविविधता संवर्धन :


दुर्मिळ पशू, पक्षी, वनस्पती, कीटक यांचे संवर्धन करण्याच्या हेतूने जळगाव जिल्ह्यातील जंगले व जैवविविधतेवरील अतिक्रमण रोखण्यासाठी शाश्वत शेतीचे एक प्रात्यशिक तयार करण्यात आले आहे. या मध्ये सेन्सर तंत्रज्ञान व स्वयंचलित प्रणालीचा वापर करून, पाणी वापर व कार्यक्षमता वाढविता येवू शकते याचे प्रात्यक्षिक केलेले आहे. या प्रकल्पात रिमोट सेन्सींग तंत्रज्ञानाचा वापर करून 56 मार्गांवर सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. या माध्यमातून जैवविविधतेची अचूक माहिती संकलित करण्यात आली. सुधारित जमिनीची रचना व पोषकद्रव्य व्यवस्थापन या विषयी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे ज्ञान या प्रकल्पाद्वारे उपलब्ध आहे, असा दावा या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पावडे यांनी केला आहे.

Untitled

या प्रकल्पासाठी इटलीतील मिलान सिटी कौन्सिल या संस्थेचा सहयोग लाभला आहे. Map of Italian Nature आणि Hotspot Geoinformatics या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील जैवविविधतेचे विविध निर्देशक (Indicators) तसेच जैवविविधतेची संवेदनशिलता (Sensitivity) या आघाडीवर ठोस काम करणे जलश्रीला शक्य झाले आहे.

इस्त्रो (ISRO) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने जलश्रीमध्ये सन 2009 - 2012 मध्ये जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय कार्बन प्रकल्प राबविण्यात आला. या प्रकल्पाच्या निमित्ताने जिल्ह्यातील कार्बनचे अंदाजित मापन करण्यात आले आहे. त्यानंतर कार्बन संवर्धनासाठी विविध उपाय योजना सादर करण्याची जबाबदारी जलश्रीने पार पाडली आहे. अमेरिकेतील नॅशनल सायन्स फाऊंडेशन आणि Pennstate University यांच्या सहकार्याने Hotspot Geoinformatics Software विकसित करण्यात आले आहे. या सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर करून भूपृष्ठावरील कुठल्याही निर्देशकाचा संवेदनशील प्रभाग शोधता येतो. या प्रणालीचा वापर पाणी, जैवविविधता, शेती उद्योग, पर्यावरण, अर्थ इत्यादी अनेक क्षेत्रांसाठी होवू शकतो.

Untitled

भाभा संशोधन केंद्र आणि जलश्री यांच्या संयुक्त विद्यामाने आकृती तंत्रज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामीण तंत्रज्ञान माहिती वितरण व प्रशिक्षण हा या केंद्राचा प्रमुख उद्देश आहे. या केंद्रामधून केळी, बीजगुण व उति संवर्धन तंत्रज्ञान (Banana Tissue Culture), शुध्द पेयजल निर्मिती संच तंत्रज्ञान (Drinking Water Filter Kit), सौरऊर्जा वापर तंत्रज्ञान (Foldable Solar Dryer), व मृदा सेंद्रीय कर्ब परिक्षण संच तंत्रज्ञान ( Soil Organic Carbon Testing Kit) यांचे प्रात्यक्षिक, प्रसार, वितरण, कौशल्य विकास, ग्रामीण उद्योजकता विकास या सेवा पुरविण्यात येतात.

असे विविधांगी व बहुआयामी कार्यकक्षा असलेल्या जलश्रीने कौशल्य विकास केंद्राची स्थापना करून एक पाऊल पुढे टाकले आहे. कौशल्य विकास अभ्यासक्रम राबविण्यासाठी शेती, जल, जैवतंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर असे काही क्षेत्र निश्चित करण्यात आली आहेत. या कौशल्य विकास केंद्रातर्फे काही प्रमाणात अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने भौगोलिक माहिती तंत्रज्ञान, जल व्यवस्थापन, ऊती संवर्धन, लोक जैवविविधता, हरितगृह तंत्रज्ञान, अळींबी उत्पादन, जैविक खत उत्पादन, मृदा परिक्षण, रोपवाटिका तंत्र, गांडूळ खत निर्मिती, कृषी अवजारे, सेंद्रीय शेती तंत्रज्ञान, बायोगॅस तंत्रज्ञान आणि उद्योग जगतासाठी सामाजिक बांधिलकी उपक्रम इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

नागपूर येथील महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ आणि जलश्रीच्या संयुक्त विद्यमाने जैवविविधता कायदा 2002 वर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या अभ्यासक्रमाद्वारे ग्रामपंचायत पातळीवरील जैवविविधता समित्यांना कुशल मनुष्यबळ प्राप्त होणार आहे.

उत्तर महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावरील खान्देशातील जिल्ह्यांचे एक निसर्गदत्त आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. राज्यातील इतर नद्या पूर्वाभिमुख वाहात जावून शेवटी बंगालच्या उपसागराला मिळतात. तथापि खान्देशातील तापी नदी मात्र पश्चिमेकडे वाहत जावून सुरतेजवळ अरबी समुद्राला मिळते. दख्खनच्या लाव्हारसापासून बनलेल्या या प्रदेशाचे वेगळेपण ठकळपणे दिसून येतेच. तसेच या मातीत निर्माण झालेल्या जलश्रीने आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत स्वयंसेवी संस्थांसाठीच नव्हे तर उभारत असलेल्या जलनायकांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

श्री. संजय झेंडे

श्री. संजय झेंडे, धुळे - मो : 09657717679

Path Alias

/articles/jalasarai-mauulajai-jaethaa-mahaavaidayaalaya-jalagaava

Post By: Hindi
×