पाण्याची निर्मिती करण्याची पध्दत अजून प्रत्यक्षात आली नाही. पण निसर्गाने दिलेल्या पाण्याचे रक्षण न करता आपण दूषित करत आहोत त्यावर उपाय करणे जरूरीचे आहे. नदीच्या पाण्यात सोडण्यात येणारे सांडपाणी, प्रक्रिया न करता सोडल्याने आपण चांगले पाणी प्रदूषित करत आहोत. शास्त्रज्ञांनी संशोधनात्मक अभ्यासातून असे दाखवून दिले आहे की प्रत्येक मनुष्य सांडपाण्यामध्ये दररोज 17 ग्रॅम्स केमिकल्स टाकून पाण्याचे प्रदूषण करतो.अशाप्रकारे संपूर्ण शहरातून येणारे सांडपाणी नदीतील चांगले पाणी प्रदूषित करत असते. आधुनिक पध्दतीच्या रहाणीमानात, स्वच्छतेच्या अयोग्य पध्दतीतून अनेक प्रकारची घातक रसायने वापरली जातात.
जल म्हणजे जीवन. मानवी जीवनात पाण्याला अत्यंत महत्व आहे. पृथ्वीवर पाणी मूबलक असले तरी त्याची वाटणी मात्र विषम झाली आहे. तसेच हे सर्वच पाणी मानवासाठी उपयोगी नाही. पृथ्वीवरील एकूण पाण्याच्या साठ्यापैकी 97 टक्के पाणी महासागरात खाऱ्या पाण्याच्या स्वरूपात आहे. व 03 टक्के पाणी गोड्या पाण्याच्या स्वरूपात आहे. परंतु 03 टक्के पाण्यापैकी 2.1 टक्के पाणी घनस्वरूपात आहे त्यामुळे मानवास त्याचा विशेष उपयोग होत नाही. तर फक्त 0.9 टक्के पाण्याचाच जे पाणी नद्या, सरोवरे, विहीरी, तळी इ. च्या स्वरूपात आहे व त्याचाच उपयोग करावा लागतो. म्हणून जसजशी लोकसंख्या वाढेल व विकास होईल तसे गोडे पाणी मिळणे अवघड होईल. ही बाब लक्षात घेऊनच संयुक्त राष्ट्र संघाच्या सिरीयाच्या प्रतिनीधीने अशी चेतावनी दिली की - तो दिवस दूर नाही की ज्या दिवशी एक थेंब पाणी एक थेंब खनिज तेलापेक्षा महाग होईल.जागतिक स्तरावर भरलेल्या संमेलनात तर एका देशाच्या प्रतिनिधीने म्हटले की, तिसरे जागतिक महायुध्द झाले तर त्याचे कारण पाणी हेच राहिल असे भाकीत त्यांनी केले. एवढी मोठी पाण्याची समस्या भविष्यात निर्माण होणार आहे.
आपल्या देशात सरासरी 19 हजार कोटी घनमीटर पाणी वापरण्यासाठी उपलब्ध होते. यापैकी जवळपास 86 टक्के पाणी नदी, सरोवरे इ. रूपाने प्राप्त केले जाते व बाकीचे भूमिगत जलाच्या रूपाने प्राप्त केले जाते. भारतात लोकसंख्या वाढीबरोबर पाण्याचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे व या वाढत्या लोकसंख्येला स्वच्छ व शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे फार कठीण झाले आहे. माणसाच्या शरिराला रोज 5 लिटर पाण्याची आवश्यकता असते. तसेच दररोज सरासरी 40 लिटर पाणी प्रत्येकाला विविध कारणांसाठी वापरावे लागते. पाण्याचा उपयोग -
उद्देश | पाण्याचा उपयोग दररोज/दरडोई/लिटर |
स्वयंपाक | 4.5 |
धार्मिक कार्य | 18.5 |
भांडे धुण्यासाठी | 13.6 |
कपडे धुण्यासाठी | 13.6 |
शौचालयासाठी | 27.3 |
स्नानासाठी | 27.3 |
साधारणपणे प्रत्येक व्यक्ती ही दिवसाला वरील प्रमाणे पाणी वापरते. काही जण यात कमीजास्त प्रमाणात पाणी वापरतात.
भारतातील काही प्रमुख शहरात पाण्याचा उपयोग पुढील प्रमाणे दिला आहे.
प्रमुख शहर | पाण्याचा उपयोग दरडोइ लिटर |
आग्रा | 115 |
अलाहाबाद | 125 |
बंगलोर | 190 |
भोपाळ | 100 |
मुंबई | 320 |
कलकत्ता | 190 |
दिल्ली | 160 |
हैद्राबाद | 205 |
कानपूर | 205 |
लखनौ | 90 |
चेन्नई | 160 |
मथुरा | 120 |
पाटना | 115 |
पुणे | 275 |
वाराणसी | 115 |
वरील आकडेवारी वरून असे दिसून येते की भारतीय शहरात पाण्याच्या उपयोगाच्या प्रमाणात जी असमानता आहे त्याला अनेक घटक जबाबदार आहेत. भारतात जलप्रदूषणाची समस्या काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत व गुजरात पासून ते अरूणाचल प्रदेश पर्यंत एक सारखीच आहे. भारतातील जलप्रदूषणाची समस्या ही उद्योगधंद्याप्रमाणे किंवा त्यापेक्षा जास्त जबाबदार घटक गावातील व शहरातील घाण पाणी आहे. या शहरातील घाण पाण्यामुळे भारतातील असंख्य नद्या आणि सरोवरे प्रदूषित झाली आहेत. जलप्रदूषण जरी नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांमुळे होत असले तरी सर्वात जास्त कारणीभूत घटक म्हणून मानवनिर्मित घटकांचा उल्लेख करावा लागतो.
जलप्रदूषणाची कारणे :
1. देशातील बहुतेक उद्योगधंदे हे नद्यांच्या किनारी प्रदेशात आहेत व त्यामुळे कारखान्यातील दुषित पाणी नदीत सोडले जाते व त्यामुळे नदीतील शुध्द पाणी प्रदूषित होते.
2. रासायनिक खतांच्या उपयोगामुळे जलप्रदूषणाची नवी समस्या निर्माण झाली आहे.
3. जलवाहतूकीद्वारे होणारी इंधन गळती, घातक द्रव्ये व घनरूप पदार्थांची गळती, अपघात इत्यादी क्रियांद्वारे पाण्यात अपद्रव्यांचा समावेश होऊन पाणी प्रदूषित होते.
4. स्नान करतांना साबणामुळे त्याचप्रमाणे कपडे धुतांना वापरलेल्या डिटर्जंटमुळे पाण्यात रसायने मिसळून पाणी दूषित होते.
5. किटकनाशके, जंतुनाशके व तणनाशकांच्या वाढत्या वापरामुळे व त्यांच्या पाण्यातील प्रवेशामुळे पाणी प्रदूषित होत आहे.
जलप्रदूषणाचे परिणाम :
जलप्रदूषणाचे परिणाम हा मानवी शरीरावर व त्याच्या सभोवतालच्या पर्यावरणाच्या आरोग्यावर होतो. दूषित पाणी पिल्यामुळे हगवण, कॉलरा, टाईफाईड, कावीळ इ. रोग होतात. भारतात दूषित पाणी पिल्याने आजारी पडून दरवर्षी सरासरी 7 कोटी 30 लाख कामाचे दिवस नष्ट होतात व उपचारासाठी होणारा खर्च दरवर्षी सरासरी 600 कोटी रूपये आहे. दूषित पाण्यामुळे जलचर प्राण्यावर परिणाम होतो व ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
जलप्रदूषणाचे नियंत्रण आणि उपाय :
जलप्रदूषण हा काही फक्त स्थानिक प्रश्न नसून तो जागतिक स्वरूपाचा प्रश्न आहे. म्हणून जलप्रदूषण टाळण्यासाठी खालील उपाय करणे आवश्यक आहे -
■ पाण्याची शास्त्रीय तपासणी करून जलप्रदूषणाची तीव्रता कमी करणे.
■ जल प्रदूषणासाठी जबाबदार असणारी प्रदूषके, कारणे व त्यांची उगमस्थाने शोधून जलप्रदूषणाविषयी योजना तयार करणे व प्रदूषण नियंत्रणायोग्य ती कार्यवाही करणे, उदा. सांडपाणी, मैलापाणी यासाठी गटार प्रक्रिया सयंत्राचा वापर करणे.
■ ग्राम व नगरविकास योजनेत जलव्यवस्थापनास व प्रदूषण नियंत्रणास प्रथम पसंती देणे त्यासाठी विविध योजना आखून लोकजागृती करणे.
■ जल शुध्दीकरणाच्या नवनवीन तंत्राचा वापर करून पिण्याच्या पाण्याची सर्वाधिक काळजी घेणे.
■ दूषित पाणी शुध्द करून पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे.
■ दूषित पाण्याची उगमस्थाने तपासून पर्यायी व्यवस्था व नियोजन करणे.
■ जल प्रदूषण कमी करण्यासाठी जनसंपर्क, जागृती व संवर्धनाच्या हेतूने विविध माध्यमांचा प्रभावी वापर करणे.
■ जलनियोजन व पर्यावरण रक्षणाचे महत्व विविध स्तरावर प्रतिबिंबीत करणे.
■ सरकारी माध्यमातून कडक कायदे करणे व केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करणे.
■ जलप्रदूषणाची संपूर्ण शास्त्रीय माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवून लोकजागृतीद्वारे नियंत्रण उपाय योजणे.
■ ग्रामीण भागात व शहरात सुलभ संडासाची सोय करणे. जेणेकरून लोक नदीकाठावर व उघड्यावर संडास करणार नाहीत.
■ प्रेत जाळण्यासाठी विद्युत शवागृहाची सोय करणे की जेणेकरून प्रेत नदीत फेकून दिली जाणार नाहीत.
■ सुमारे 80 टक्के पेक्षा जास्त आजार हे पाण्यापासून होतात. त्यामुळे पाण्याची स्वच्छचा राखणे हे प्रत्येक व्यक्तीचे आद्यकर्तव्य मानले पाहिजे.
■ ग्रामीण भागातील साखर कारखाने प्रदूषणाची केंद्रे होवू नयेत म्हणून कारखान्यातील मळी व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची सोय सक्तीने बंधनकारक करावी.
■ पाण्याच्या शुध्दतेसाठीची जाणीव व पाण्याच्या योग्य वापराविषयीचे ज्ञान लोकांना व्हावे म्हणून 22 मार्च हा जागतिक जलदिन व 29 एप्रिल हा जलसंपत्ती दिन म्हणून साजरा करावा व लोकात जागृती निर्माण करावी. तसे केंद्र व राज्य शासन स्वच्छता अभियान हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवत आहे. जास्तीत जास्त लोकांचा सहभाग हा आवश्यक आहे. लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात जलसाठे वाढत नाहीत म्हणून जे जलसाठे आहेत त्याचे शास्त्रोक्त पध्दतीने जलसंवर्धन करणे ही काळाची गरज झाली आहे.
प्रा. सौ. किरण कळंबे, भोकरदन - (भ्र : 9422219593)
/articles/jalasanvaradhana-kaalaacai-garaja