जैन इरिगेशनचे सिंचन क्षेत्रातील योगदान


जैन इरिगेशनच्या सिंचन क्षेत्रातील वाटचालीस 1986 साली अमेरिकेत, प्रेस्नो येथे झालेल्या सूक्ष्म सिंचवावरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन कारणीभूत ठरले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण त्या प्रदर्शनातच भाऊंनी ठिबक सिंचनाचे, पाणी वाटप करणारं आणि शेतकर्‍यांना जास्त उत्पादन देणारं असं तंत्र पाहिले आणि ते आत्मसात करण्यासाठी इस्त्राईल देशामधील कंपन्यांशी सहकार्याबाबत प्रयत्न केला. परंतु त्यात त्याकाळी यश आले नाही. शेवटी, जेम्स हार्डी या इटालीयन कंपनीशी करार झाला. हार्डी ही कंपनी त्यावेळची जगातील ठिबक सिंचन क्षेत्रातील सर्वेसर्वा कंपनी होती. जेम्स हार्डी समवेत करार झाल्यानंतर खर्‍या अर्थाने भवरलालजींची स्वप्नपूर्तीकडे वाटचाल सुरू झाली.

भारतातील प्रभावी जलव्यवस्थापनाच्या इतिहासात जैन इरिगेशनचे नाव मोलाचे आहे. कंपनीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री भवरलालजी जैन यांना भारतीय ठिबक सिंचनाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाते ते त्यांच्या या योगदानामुळेच. भारतातील सुक्ष्म सिंचनाचा विकास आणि जैन इरिगेशनच्या विकासात एक समान सुत्री धागा सापडतो. जैन इरिगेशन व्यतिरिक्त 20 वर्षांपूर्वी भारतात अनेकांनी ठिबक सिंचन आणण्याचा प्रयत्न केला. ही संकल्पना शेतकर्‍याला इतर कंपन्यांनी एका व्यापाराच्या, वस्तूच्या स्वरूपात विकली. यामुळे तिचा प्रसार झाला नाही. लोकशिक्षणाअभावी पाणी बचतीच्या या तंत्राला शेतकर्‍यांनी सुरूवातीला नाकारले. नेमका हाच धागा पकडून जैन इरिगेशनने सुरूवातीपासून लोकशिक्षणावर व कृषीविस्तारावर भर दिला. याचा परिणाम शेतकर्‍यांच्या जागृतीत झाला. सूक्ष्म सिंचनाच्या एकूण व्याप्तीत सद्यस्थिततीत भारतातील 55 टक्के वाटा हा एकट्या जैन इरिगेशनचा आहे. उरलेला 45 टक्के वाटा हा इतर कंपन्यात विभागलेला आहे. यावरून लोकांचा या कंपनीवर असणारा विश्वास व्यक्त होतो. सूक्ष्म सिंचनाच्या क्षेत्रात भारतात 0.6 मिलीयन हेक्टर प्रती वर्ष एवढी वाढ होत आहे. यात विशेष म्हणजे जैन इरिगेशनचा वाटा 0.31 मिलीयन हेक्टर प्रती वर्ष एवढा! जैन इरिगेशनची भारतीय सिंचन क्षेत्रावर असणारी पकड याद्वारे स्पष्ट होते. आज जैन इरिगेशन एक बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून नावारूपास आली आहे. भारतीय आणि विशेषत: महाराष्ट्रातील शेतकर्‍यांशी असलेल्या बांधीलकीतून ही प्रगती साधणे शक्य झाले.

कंपनीचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांचे शेती आणि मातीशी घट्ट नातं आहे. त्यांना शेती, खेडी आणि शेतकरी यांचे अर्थशास्त्र चांगले उमगले. मागील काही दशकांत व आजही बर्‍याच ठिकाणी पारंपारिक पध्दतीने शेतीला पाणी दिले जाते. पाण्याच्या या मोकाट पध्दतीत पाण्याचा मोठ्या प्रमाणातील अपव्यय टाळण्यासारखा आहे. जुन्या काळी मध्यम आणि गरीब शेतकर्‍यांना त्या वेळी प्रचलीत असलेल्या सिमेंट किंवा लोखंडी पाईप परवडण्यासरखे नव्हते. हे लक्षात घेवून भवरलालजी जैन यांनी पी.व्ही.सी पाईपचे उत्पादन करण्याचे ठरवले. शेतकर्‍यांना पडवडणार्‍या याच्या किंमती असल्याने व गुणवत्तेतही त्या सरस ठरल्याने पी.व्ही.सी पाईपांची मागणी वाढली. जैन पाईपचे रोपटे नंतर इतके वाढले की त्याने वटवृक्षाचे रूप कधी धारण केले ते समजलेच नाही. सन 1980 ला कंपनीचे वार्षिक उत्पादन 500 टनांचे होते. हेच उत्पादन 1984 पर्यंत 23000 टन प्रतिवर्ष असे पोहोचले. पी.व्ही.सी. पाईपच्या देशातल्या पहिल्या दोन उत्पादकात जैन इरिगेशनची मोहोर लवकरच उमटली. ( आज जैन पी.व्ही.सी. पाईपांची क्षमता तब्बल 90750 टन प्रती वर्ष एवढी स्थिरावली आहे. आणि पी.ई.पाईपांचाही वापर सिंचनासाठी वाढतोय.

जैन इरिगेशनच्या सिंचन क्षेत्रातील वाटचालीस 1986 साली अमेरिकेत, प्रेस्नो येथे झालेल्या सूक्ष्म सिंचवावरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन कारणीभूत ठरले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण त्या प्रदर्शनातच भाऊंनी ठिबक सिंचनाचे, पाणी वाटप करणारं आणि शेतकर्‍यांना जास्त उत्पादन देणारं असं तंत्र पाहिले आणि ते आत्मसात करण्यासाठी इस्त्राईल देशामधील कंपन्यांशी सहकार्याबाबत प्रयत्न केला. परंतु त्यात त्याकाळी यश आले नाही. शेवटी, जेम्स हार्डी या इटालीयन कंपनीशी करार झाला. हार्डी ही कंपनी त्यावेळची जगातील ठिबक सिंचन क्षेत्रातील सर्वेसर्वा कंपनी होती. जेम्स हार्डी समवेत करार झाल्यानंतर खर्‍या अर्थाने भवरलालजींची स्वप्नपूर्तीकडे वाटचाल सुरू झाली. त्या काळात म्हणजे 1985-86 मध्ये पाणी प्रश्‍नावर कोणी देखील विचार करीत नव्हते. 1970 च्या दशकापर्यंत राजकीय नेतृत्वालाही सूक्ष्म सिंचन या तंत्रप्रणालीची पूर्ण माहितीही नव्हती. नोकरशाहीला या प्रणालीशी काहीच देण-घेणे नव्हते. या सर्व पार्श्वभूमीवर सूक्ष्म सिंचन हा प्राधान्याचा आणि मन:पूर्वक निवडलेला आयुष्यभराचा व्यवसाय म्हणून त्यात भाऊंनी उडी घ्यायचे ठरवले, आणि निश्‍चित दिशेने कंपनीची वाटचाल सुरू झाली.

ठिबक सिंचनची संकल्पना शेतकर्‍यांपर्यंत पोहचवायची असल्यास पाणलोट विकासाची साथ त्याला द्यावीच लागले. ठिबक सिंचन हा कमी पाण्यात उत्तम शेतीचा मंत्र आहे परंतु त्या आधी पाणी निर्माण करू शकणार्‍या पाणलोट विकासाचे तंत्र शेतकर्‍यांपर्यंत पोहचवावयास हवे, पाणलोट विकासाशिवाय ठिबक सिंचनाचे हे तंत्र शाश्वत विकासाचा पर्याय होऊ शकत नाही यासाठी जैन इरिगेशन कंपनीने चर्चासत्रे, प्रदर्शने आणि प्रशिक्षण वर्ग आयोजित केले. या विषयाशी ज्यांचा ज्यांचा म्हणून संबंध, संपर्क येत होता त्या सर्वांसमोर ह्या विषयाचे सादरीकरण झाले. त्यामध्ये बँका आल्या, शासकीय अधिकारी आले, मोठे अन् प्रगतीशील शेतकरी, लोकप्रतिनिधी आले, कृषी विद्यापीठे आली. या सर्व प्रयत्नांनी लोकांची मने खुली करायला कंपनीला जवळजवळ दहा वर्षे लागली. त्यासाठी सतत खडतर प्रवास करावा लागला. बर्‍याच जणांना पटवून द्यावे लागले, आणि प्रात्यक्षिकांचा अवलंबही खूप करावा लागला.

शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती पहाता सिंचन यंत्रणेची सुरूवातीची भांडवली हुंतवणूक हा एक प्रकारचा अवजड बोजाच होता. शेतकर्‍यांना थेट तगाईच्या रूपाने राज्य शासनाने हस्तक्षेप करण्याचीच खरी गरज होती. सरकारनेही शेतकर्‍यांच्या या कल्याणकारी मार्गाला प्रसंत केले. केवळ नफ्याचा विचार करून या व्यवसायात इतर उद्योजक घुसले. त्यांच्याकडे उत्पादनास योग्य अशी साधनसामग्री नव्हती ना विक्री-विपणनाची व्यवस्था, ना विक्रीपश्‍चात सेवेची सोय. शेतकर्‍यांना पुरेसे मार्गदर्शन व सेवा अशा उत्पादकांनी न दिल्यामुळे हा उद्योग बदनामही झाला. खरे पहाता यामध्ये सूक्ष्म सिंचन पध्दतीचा मुळीच दोष नव्हता.

या उलट जैन इरिगेशन कंपनीने एका भव्य शेती संशोधन, विकास आणि प्रात्यक्षिस केंद्राची उभारणी केली. त्यामध्ये हे तंत्र आणि त्याचे देदीप्यमान फायदे प्रत्यक्ष प्रदर्शित केले. फक्त शेतकर्‍यांसाठीच नव्हे, तर शासकीय अधिकार्‍यांसाठी आणि शेतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी कंपनीने एका प्रशिक्षण केंद्राची तसेच उजळणी अभ्यासक्रमांचीही व्यवस्था केली. देशाच्या कानाकोपर्‍यातून लोक गटागटांनी इथे येऊन स्वत:च्या डोळ्यांनी या देदीप्यमान तंत्राचे अविश्वसनीय असे फायदे पाहू लागले. या सर्वांचा फारच गहन परिणाम झाला आणि अशा उद्योगांची निरोगी वाढ होऊ लागली. शेतकरी वर्ग आपणहून पुढे येऊन ही यंत्रणा मागू लागला. कंपनीला विक्रेत्यांचे जाळे आणखी खोलवर पसरवणे भाग पडले. अखेरीस सर्व देशभर कंपनीने जवळजवळ सर्व पिकांसाठी ठिबक सिंचनाची उपयुक्तता सिध्द करून दाखविली. उपलब्ध असलेल्या जमिनीतून कमी पाण्याचा वापर करून जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर ठिबक शिवाय पर्याय नाही हे तंत्र आता प्रत्येकाच्या लक्षात आले आहे.

सिंचन व्यवस्थापनात कृषीक्षेत्राचा अविभाज्य घटक म्हणूनच आज पाहिलं जातयं. याचे मूर्तीमंत उदाहरण द्यायचे झाले तर आंध्रप्रदेश सरकाने No lift, without Drip हे एकात्मिक सूत्र जाहीर केले आणि त्याची अंमलबजावणीही सुरू आहे. पाण्याची कमतरता असणार्‍या राजस्थानात तर ठिबकशिवाय आज पर्यायच नाही. पाण्याची कमतरता कधीही न भासणार्‍या गंगा-यमुनेच्या प्रदेशातही ठिबक सिंचन अधिक शेती उत्पादनाचा मंत्र ठरला आहे. हिमाचल प्रदेशात सिंचन ही संकल्पनाच न पटण्यासारखी असताना पाईपच्या जाळ्यांनी आणि ठिबकच्या थेंबांनी हेच शक्य करून दाखवलंय. सिंचनाला ठिबकची जोड असल्याशिवाय आपण शाश्वत विकासाकडे वाटचाल करूच शकत नाही.

ठिबक सिंचनाबरोबर स्प्रिंकलर्सचाही प्रसार होत आहे. पाण्याची उपलब्धता आणि त्याचा काटकसरीने वापर होण्यासाठी ठिबक आणि स्प्रिंकलर्सचा प्रसार अजूनही पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. भारताच्या एकूण सिंचीत क्षेत्राच्या 5 टक्के पेक्षा कमी क्षेत्र आज ठिबक आणि स्प्रिंकलर्सच्या सहाय्याने सिंचित केले जाते. पाण्याची बचत करणारे हे तंत्र शेतकर्‍यांच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचे आहे. सर्वदूर शेतकर्‍यांपर्यंत हे तंत्र पोहोचण्यासाठी नवनव्या संकल्पनाही जैन इरिगेशन राबवित आहे. ठिबक सिंचन आणि सौर उर्जा यांचे गणित बसवण्याचा प्रयत्न कंपनी करीत आहे. ठिबकची कमी जाडीच्या पातळ नळीमुळे शेतकर्‍यांवरचा खर्चाचा बोजा कमी होईल. तसेच स्प्रिंकलर्सच्या रेनपोर्ट मॉडेलमध्ये नवनवीन सुधारणा आणून त्याची उपयोगिता वाढवण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्न चालू आहेत. मागणीरूप सिंचनासाठी (On demand Irrigation) लागणार्‍या आधुनिकतेवर भविष्यात कंपनी भर देऊन ती शेतकर्‍यांना परवडेल. कंपनीच्या प्रतिमेस साजेशी अशीच सेवा देत राहील कारण स्पर्धेपेक्षा शेतकर्‍यांना सर्वोत्तम सेवा हेच जैन इरिगेशनचं ब्रिद वाक्य आहे.

Path Alias

/articles/jaaina-iraigaesanacae-saincana-kasaetaraataila-yaogadaana

Post By: Hindi
×