इको बाबाचे नदी स्वच्छता अभियान


आज देशातील गंगेसारख्या सर्वच नद्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्या असून, त्यांना स्वच्छ करण्यासाठी शासन करोडो रूपये खर्च करीत आहे. गेली कित्येक वर्षे अगदी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कारकिर्दीपासून (१९८५) गंगानदी स्वच्छता मोहीम राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण त्याला हवे तसे यश येत नाही. देशातील कोणतीही नदी घ्या - यमुना, ब्रम्हपुत्र, नर्मदा, तापी, साबरमती, मुशी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी - सगळ्या गंगेसारख्या प्रदूषित आणि अस्वच्छ झाल्या आहे. अगदी आपल्या भोगावती, तळसी, कुंभी, कासारी, धामणी, पंचगंगा, दुधगंगा, बेदगंगा, हिरण्यकेशी, ताम्रपर्णी, घटप्रभा, वारणा, कडवी यासुध्दा सगळ्याच नद्या स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे. अनेक इंजिनिअर, तंत्रज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि इतर विषयांचे तज्ज्ञ त्या कामात गुंतले आहेत. परदेशी तंत्रज्ञानही आणले आहे, पण हवा तो परिणाम साधता येत नाही आहे. गंगा अजूनही स्वच्छ शुध्द होत नाही. करोडो रूपये मात्र दरवर्षी खर्च होत आहे.

काली बेई नदी को साफ करने वाले संत सीचेवालकाली बेई नदी को साफ करने वाले संत सीचेवालआपल्या पंचगंगेचे तरी काय होत आहे ? निरनिराळ्या सामाजिक संस्था, त्यांचे सभासद, वर्तमानपत्रे ठराविक काळाने तोच एक कार्यक्रम राबवितांना दिसतात -पंचगंगा घाट स्वच्छता मोहीम, एकाच खड्ड्यात दरवर्षी वृक्षारोपणाची आपण खिल्ली उडवितो, पण आपण नियमित पंचगंगा घाट घाण करून तसेच वागत असतो. हे आपल्या लक्षातच येत नाही. सरकार सर्व प्रयत्न करीत आहे, पण लोकांच्या उदासीनतेमुळे आणि शासकीय अधिकार्‍यांच्या आडमुठ्या धोरणाने पैसे असूनही काम होत नाही. जिथे होते ते भ्रष्टाचारामुळे अत्यंत विकृष्ट दर्जाचे होते. अशा वेळी सगळीकडेच अंधार असता कुठेतरी एक लुकलुकता दिवा दिसावा तसे पंजाबमधील एक संत सर्वांना प्रकाश दाखविण्यास पुढे आले. नदी कशी साफ करावी याचे एक चांगले उदाहरण त्यांनी सर्वांना प्रत्यक्ष कृतीतून दाखविले. त्यांचे नाव शीख धर्मगुरू श्री. संत बलबीर सिंग सिचेवाल. असा संत ज्याने काली बेन नावाची १६० कि.मी लांबीची नदी स्वच्छ केली. त्यांना इको - बाबाही म्हणतात.

पंजाबचे नाव घेताच डोळ्यासमोर येतो तो पाच नद्यांच्या दुआबाच्या प्रदेशाने संपन्न झालेला, पाण्याच्या मुबलकतेने हिरवीगार शेती असणारा, एक सधन संपन्न प्रदेश. या पंजाबात कधी पाण्याची काही समस्या असेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण या दुआबाच्या प्रदेशातील नद्या मृत होत आहेतच, पण नाहीशा होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. अशीच एक बियास नदीची उपनदी काली बेन नदी नहीशी होण्याच्या मार्गावर होती. तिच्या पात्राचे चक्क हॉकी मैदान झाले होते. ही नदी पंजाब प्रांताच्या होशियारपूर आणि कपूरथाळा जिल्ह्यात असून, तिला काळी बेरी या नावानेही ओळखतात. ती शिखांची अत्यंत पवित्र नदी आहे. पण गेल्या काही वर्षात लोकांच्या चुकांमुळे ही पवित्र काली बेन नदी अनेक ठिकाणी गटारगंगेत, तर सुलतानपूर लोघी येथे चक्क वाळून गेलेली, मृत अवस्थेत होती.

सन २००० मध्ये शीख धर्मगुरू संत बलबीर सिंग यांना नदीचे ते मृत रूप पाहून खूप वाईट वाटले. अकबर बादशाहच्या काळात या नदीचा काही भाग फुलझाडे, झुडेपे, वेली लावून सुंदर सजवला होता. पूर्वी ही नदी बियास नदीत मिसळत होती, पण नंतर बियास नदीचे पात्र बदलले आणि काली बेन नदी अडचणीत आली. लोकांनीही तिला हळूहळू मलमूत्र वाहक गटार बनवली. गावे, शहरे, औद्योगिक कंपन्या सर्वांनी तिला सांडपाणी आणि केर कचर्‍याने भरून टाकले. संत बलबीर सिंग यांनी करसेवा करायचा निर्णय घेतला आणि स्वत: त्या गटारगंगा झालेल्या नदीत उतरले व कामाला लागले. विशेष म्हणजे या करसेवेत त्यांना प्रथम साथ दिली ती शाळकरी मुलांनी आणि स्त्रियांनी. एक एक करत स्वयंसेवक जमायला लागले आणि कारंवा बनता गया.

पण, हा कारंवा असा सहजासहजी बनला नाही. त्यासाठी बलबीर सिंग यांना सातत्याने जनजागृती करावी लागली. नदीकाठावरील गावा- गावांतून प्रवचनांच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली. ते लोकांना नदी पुनर्स्थापित करण्याचे फायदे समजावून सांगत. या नदी स्वच्छता मोहिमेसाठी त्यांनी लोकांकडून स्वेच्छा निधीही जमवायला सुरूवात केली. त्यांनी बुलाथ गावातून एक धार्मिक मिरवणूकही काढली. रॅलीची सुरूवात पंजाबमधील बुलाथ या गावापासून झाली. ही रॅली दिवस - रात्र चालत शेवटी सुलतानपूर लोधीला येवून पोहोचली. ६५ कि.मी चे अंतर कापण्यास त्यांना पाच दिवस लागले. या प्रचार कार्यामुळे हजारो करसेवक - स्वयंसेवक कामाला मिळाले. काम इ.स. २००० मध्ये सुरू झाले. ते अजून चालूच आहे. नदीतील माती, वाळू, गवत, केंदाळ, शेवाळ, इतर भौतिक अडथळे काढून झाले तरी, जोपर्यंत नदीत येणारे मलमूत्र, घरगुती सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी थोपविले जाणार नाही, तोपर्यंत नदी खर्‍या अर्थाने स्वच्छ होणार नाही, हे बलबीर सिंग यांना माहीत होते. त्यांनी गावातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी गावा - गावातून भूमिगत सांडपाणी निर्गतीची योजना आखली. यासाठी त्यांना स्थानिक लोकांचीच मदत घेतली. गावातून काँक्रीटचे पाईप टाकून त्याद्वारे सांडपाणी वाहून नेण्याची सोय केली. हे येणारे सांडपाणी स्वच्छ करण्याची गरज लक्षात घेवून स्थानिक लोकांच्या सहाय्याने गावातून सिवेज ट्रीटमेंट यंत्रणा तयार केली आणि उभी केली. त्यामुळे पाणी स्वच्छ होवून नदीत मिसळू लागले.

नदीकाठावरील सर्व गावांना सिवेज ट्रीटमेंटची अशी सोय करण्यात आली. या नदीकाठावर एकूण ६४ गावे आहेत. या सर्व गावांना त्यांचे सांडपाणी प्रक्रिया करूनच नदीत सोडण्याच्या सूचना आहेत. या ६४ गावांपैकी अनेक गावांतून जैविक शुध्दीकरण योजना राबविण्यात आल्या आहेत. याच्या जोडीला नदीकाठावरील मोठ्या शहरांसाठी स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया उभ्या करण्यात येत आहेत. सुल्तानपूर लोघी शहरासाठी दोन कोटींची, तर कपूरथाळा शहरासाठी दहा कोटींची योजना तयार करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांना भेटून त्यांनाही त्यांचे सांडपाणी शुध्द करूनच नदीत सोडण्याच्या सूचना करण्यात आल्या.

काली बेन नदी स्वच्छता अभियान हे चार टप्प्यांत राबविण्यात आले. पहिल्या टप्प्यात करसेवा नदीतील गाळ, माती, वाळू, गवत, लव्हाळे आणि हा.लिथ काढून टाकण्यात आले.नदीचे पात्र खोल आणि सपाट करण्यात आले. नदीचे काठ दगड - गोटे - काँक्रीट यांनी बांधून काढून सुरक्षित केले. काठावर अंघोळीसाठी व्यवस्थित घाट बांधले. तसेच नदीच्या काठाने व्यवस्थित फिरता यावे यासाठी काठाला समांतर पक्क्या भाजीव विटांचे रस्ते बांधले. रस्त्यांच्या बाजूने सुंदर फुलझाडे आणि फळझाडे लावली. तसेच पाणीपुरवठा, सांडपाणी निर्गत आणि ऊर्जापुरवठा यंत्रणा उभारल्या. दुसर्‍या टप्प्यांत काली नदीचे पात्र धानोवा या होशियारपूर जिल्ह्यातील गावापासून ते कन्जाली या कपूरथाळा जिल्ह्यातील गावापर्यंत स्वच्छ करण्यात आले. तिसर्‍या टप्प्यांत (२००४ - २००५) सुल्तानपूर लोधीच्या आसपासच करसेवा करण्यात आली. शहरातील लोकवस्तीत सांडपाणी निर्गत यंत्रणा आणि सांडपाणी शुध्दीकरण यंत्रणा बसविण्यात आल्या.

चालू टप्प्यात (२००६ - २००८) प्रक्रिया केलेले सांडपाणी पाईपलाईनद्वारे शेतीला सिंचनासाठी देण्याची योजना आखली गेली. यामुळे नवे आर्थिक समीकरण पंजाबींना मिळाले. होशियारपूर जिल्ह्यातील ६००० एकर जमीन योग्य ड्रेनेज विकसित झाल्याने पुन्हा लागवडीखाली आली. नदीच्या काठावर केलेल्या रस्त्यांमुळे लोक एकमेकांच्या जवळ आले. शेतातील माल बाजारपेठेत नेणे सोपे झाले. सर्वात महत्वाचे म्हणजे नदीकाठ झाले. फुलझाडे, कठडे आणि घाट यांनी सुशोभित झाला. नदीत दुथडी भरून पाणी वाहू लागल्याने तिचे रूप पालटून गेले. पंजाबी इको संत शीख धर्मगुरू केवळ नदी साफ करूनच थांबले नाहीत, तर त्यांनी मुलांसाठी शाळा काढल्या, आरोग्य केंद्रे सुरू केली.

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निमडणुका जिंकून सत्तेवर आलेल्या नवीन सरकारने पंजाबमधील सर्वच नद्या काली बेन नदी स्वच्छता मोहिमेप्रमाणे स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी इको बाबा संत शिरोमणी श्री बलबीर सिंग सिचेवाल यांचे मार्गदर्शन घेण्याचे ठरविले असून, त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे.

आपणही महाराष्ट्रातील प्रदूषित नद्या त्याच धर्तीवर स्वच्छ करायला काय हरकत आहे ? चला तर मग आपल्या गावातील, तालुक्यातील आणि जिल्ह्यातील नदी, नाले , तलाव आणि सरोवरे स्वच्छ करायला एकत्र येऊया आणि स्वच्छ, शुध्द आणि भरपूर पाणी मिळून आपले आणि आपल्या भावी पिढीचे भविष्य निश्‍चित करूया, चला, उठा, तुमच्या पातळीवर एकत्र येण्यास सुरूवात करा. पहिले पाऊल उचला. पुढचा हजारो कि.मी चा प्रवास सहज होवून जाईल. एक करून हजारो तुम्हाला साथ द्यायला पुढे येतील. आम्ही किंवा इतर कुणी बोलवतंय का ? याची वाट पाहू नका. तुम्ही कधी हाक देताय, याचीच आम्ही वाट पाहतोय असे समजा.

डॉ. अनिलराज जगदाळे, कोल्हापूर, मो : ८३०८००१११३

Path Alias

/articles/ikao-baabaacae-nadai-savacachataa-abhaiyaana

Post By: Hindi
×