आपण पाण्याच्या दुर्भिक्ष्याकडे वाटचाल करीत आहोत


भारतासारख्या महाकाय देशाला पाणीप्रश्‍न हे कायमचेच संकट राहणार आहे आणि त्यामुळे सांडपाण्याचा पुनर्वापर करणे ही भारताची कायमचीच गरज राहणार आहे हे निश्‍चित. एखाद्यावेळी हा निर्माण करण्यात आलेला पुनर्वापरित सांडपाण्याचा साठा पेयजल म्हणूनसुध्दा वापरावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे आपण खरेच करू शकू काय ? अमेरिका, युरोप आणि इस्त्राईलमध्ये अशा पाण्याचा पेयजल म्हणून वापर सुरूसुध्दा झालेला आहे.

सोली पारसीवाला यांचा पाण्यासंबंधी लेख माझ्या वाचनात आला आणि तो सद्यपरिस्थितीवर योग्य प्रकाश टाकणारा असल्यामुळे मला तो जलसंवादच्या वाचकांसमोर सादर करणे आवश्यक वाटला. म्हणून या लेखाचे स्वैर भाषांतर वाचकांसमोर सादर करीत आहे.

श्री. पारसीवाला हे जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) दक्षिण आशियाचे एनव्हेरमेंटल हेल्थ या विभागाचे प्रमुख होते. त्याचबरोबर नागपूर येथे असलेल्या निरी या संस्थेचे ते संचालक पण होते. त्यांच्या मताप्रमाणे भारतातील जलपुरवठा करणारे स्त्रोत हे दिवसेंदिवस घटत आहेत. भारतात पडणारा पाऊस हा मर्यादित आहे. नद्या आणि तलावांमधील पाण्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पण त्याचबरोबर शेती आणि औद्योगिक क्षेत्रात पाण्याचा वापर बेसुमार वाढत चाललेला आहे. त्याचबरोबर लोकांच्या बदललेल्या जीवनशैलीमुळेसुध्दा पाण्याची मागणी वाढत आहे. समस्या वाढविण्यासाठी, वाढते प्रदूषणसुध्दा पाण्याच्या पुरवठ्यावर मर्यादा आणत असलेले दिसते. एकूण काय तर भारत हा जलउपलब्धतेच्या संदर्भात अचडणीत सापडलेला देश आहे असे म्हणावयास हरकत नाही.

30 वर्षांपूर्वी जेवढे पाणी आपल्या देशात उपलब्ध होते त्याच्या फक्त अर्धे पाणी आज वापरासाठी उपलब्ध आहे. तळ्यांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी 30 टक्क्यांपेक्षा जास्त पाण्याचे भारतातील हवामानामुळे बाष्पीभवन होत असते. त्याचप्रमाणे नागरी जलव्यवस्थेसाठी पाणी उपलब्ध करत असताना 20-40 टक्के पाणी ही वितरणातील हानी होत असते. याचाच थोडक्यात अर्थ असा की एक ग्लास पाणी उपलब्ध करण्यासाठी आपल्याला विविध कारणांसाठी दोन ग्लास पाणी हे गमवावे लागते.

इतके असूनसुध्दा भारतात जलसंधारणाकडे आवश्यक त्याप्रमाणात लक्ष दिले जात नाही ही दुर्दैवाची बाब आहे. भारत बर्‍याच देशांपैकी असा एक देश आहे की ज्या ठिकाणी शेतकर्‍याला जलउपसा करण्यासाठी स्वस्तात वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचबरोबर शेतकर्‍यांना विनामूल्य वीज उपलब्ध करून देण्याची शासनाला इच्छाही आहे. त्यामुळे तर प्रश्‍न अधिक गंभीर झाला आहे. कारण एका बाजूने आपल्याला पाणी वापरावर नियंत्रण आणायचे आहे आणि त्याचबरोबर जलसंधारणाबाबत आपण गंभीर विचार करायलाही तयार नाही. वास्तविकत: भारतात विविध भागांत पाणीटंचाईने भयावह स्वरूप धारण केले आहे.

पाण्याचा पुनर्वापर :


भारताला पाण्याचा पुनर्वापर नवीन नाही. भारतीय शेतीत गेल्या शंभर वर्षात बर्‍याच ठिकाणी पाण्याचा पुनर्वापर होताना दिसतो. 1960 नंतरच्या कालखंडात उद्योग आणि व्यवसायात वापरल्या जाणार्‍या पाण्याचा काही प्रमाणात पुनर्वापरही सुरू झालेला आढळतो. 1993 पासून तर पाण्याचा समाजासाठी पुनर्वापर कसा करायचा याबद्दलचे तंत्रज्ञानही भारतात विकसित झालेले दिसते. ही एक महत्त्वाची उपलब्धी असूनसुध्दा त्याकडे जनतेचे लक्ष गेलेले दिसत नाही. हैद्राबाद येथील हुसेनसागर तलावामधील सांडपाण्याचे शुध्दीकरण करून पाणी सोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे बाष्पीभवनामुळे होणारे नुकसानही मोठ्या प्रमाणात टाळण्यात आले आहे.

हैद्राबादमध्ये दररोज बाष्पीभवनापासून होणारे नुकसान रोखण्यासाठी वीस दशलक्ष लीटर पाण्याचे शुध्दीकरण करून ते या प्रसिध्द तलावात सोडण्यात येत असते. यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान हे अत्यंत आधुनिक असून, त्यामुळे तलावातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यामध्येसुध्दा यश मिळालेले दिसते. जागतिक तापमान वृध्दीसाठी प्रोत्साहन देणारी कार्बनडाय ऑक्साईड आणि मिथेनसारख्या गॅसची निर्मितीही यामुळे कमी झालेली आहे. बाष्पीभवनामुळे पाण्याची उपलब्धता कमी झाल्या कारणाने तलावातील बरिचशी जमीन उघडी पडत असे आणि या उघड्या जमिनीवर मानवी आक्रमणाची भीतीही निर्माण होत असे. त्यावरही यामुळे धरबंध बसला आहे. हे सर्व काम गेल्या दहा वर्षांपासून चांगल्याप्रकारे चालू असल्यामुळे तलावाच्या परिसरातील पर्यावरणसुध्दा सुधारलेले आढळते. या तलावातील पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे जलशुध्दीकरण शंभर टक्के करण्याची गरजही पडलेली नाही. एक परदेशस्थित संस्था या कार्यक्रमाच्या विकासासाठी काम करताना आढळते.

भारतातील जलसमस्या :


भारतातील सगळ्याच तलावांच्या संदर्भात शहरात जमा झालेले सांडपाणी व कारखान्यातून बाहेर पडलेले अशुध्द पाणी तलावात सोडल्यामुळे जलसमस्या निर्माण झाली आहे. बहुतांश तलाव हे अतिप्रदूषित झाले आहेत. त्यापैकी बहुतांशी तलाव पावसाळा संपल्यानंतर लवकरच कोरडे पडताता आणि त्यामध्ये फक्त प्रदूषित पाणीच जमा झालेले आढळते. हे बहुतांश कोरडे झालेले तलाव बांधकामासाठी कोरडी जागा उपलब्ध करून देतात आणि लवकरच बिल्डर्स या जागेचा ताबा घेताना दिसतात. त्यामुळे हे थांबवायचे असेल तर या प्रदूषित पाण्याला शुध्द करून जलसाठे टिकवून ठेवणे आवश्यक आहे की ज्यामुळे या जागा बिल्डर्सच्या घशात जाणार नाहीत. ठाणे आणि नव्या मुंबईतील बर्‍याचशा तलावांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत आणि हेच प्रयत्न बाकीच्या छोट्या आणि मोठ्या तलावांच्या संदर्भात इतरही प्रदेशात करणे आवश्यक आहे.

राजस्थानमध्ये तर तलावांच्या विकासाच्याबाबतीत एक मोठी क्रांतीच झालेली दिसते. यासाठी लागलेला पैसा हा स्थानिक प्रयत्नातूनच जमा करण्यात येतो आणि हा जलसंचय पर्यटन विकासाच्या दृष्टीने आवश्यक ठरलेला आहे. जयपूरमधून निर्माण झालेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते उपलब्ध झाल्यामुळे बाष्पीभवनामुळे होणारे नुकसान टाळण्यात येऊन तलावामधील जलसंयच वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहे. पण तलावामधील हे पाणी जलक्रीडेसाठी वापरले जाण्याची शक्यता असल्यामुळे त्याला अधिक शुध्द करणेसुध्दा आवश्यक आहे. यामुळे पाणी शुध्द करून त्याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने करण्यात आलेले शास्त्रीय प्रयोग या योजनेला यशस्वी करू शकतील.

जलसंचय लहान असो अथवा मोठा, त्यात जमा झालेल्या प्रक्रिया केलेल्या शुध्द पाण्यापासून समाजातील घटकांना उत्पन्न वाढीची शक्यता असल्यास त्याचा फार मोठा अनुकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. हे उत्पन्न कमी प्रमाणात असले तरी चालण्यासारखे आहे. पाणी शुध्द केल्यामुळे त्याचा जलक्रीडांसाठी आणि इतर उचित कामासाठी वापर केल्यामुळे उत्पन्नाचे स्त्रोत निश्‍चितच वाढू शकतील. या उत्पन्नामुळे या योजनेशी निगडित असलेल्या लोकांना वाढीव उत्पन्न मिळाल्यामुळे त्यांचा या प्रयत्नात यशस्वी सहभाग वाढविण्याची शक्यता अधिक राहील. हे उत्पन्न जर सरकारला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना जाणार असेल तर काम करणार्‍या व्यक्तींना त्यात स्वारस्य राहणार नाही व त्यामुळे अशा प्रकारच्या योजना अयशस्वी ठरण्याची शक्यताच जास्त राहील.

भारतासारख्या महाकाय देशाला पाणीप्रश्‍न हे कायमचेच संकट राहणार आहे आणि त्यामुळे सांडपाण्याचा पुनर्वापर करणे ही भारताची कायमचीच गरज राहणार आहे हे निश्‍चित. एखाद्यावेळी हा निर्माण करण्यात आलेला पुनर्वापरित सांडपाण्याचा साठा पेयजल म्हणूनसुध्दा वापरावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे आपण खरेच करू शकू काय ? अमेरिका, युरोप आणि इस्त्राईलमध्ये अशा पाण्याचा पेयजल म्हणून वापर सुरूसुध्दा झालेला आहे. सिंगापूरमध्येसुध्दा या दृष्टिकोनातून प्रयत्न झालेले आहेत. समुद्राचे खारे पाणी गोड्या पाण्यात रूपांतरित करणे सर्वच देशात परवडू शकेल असे नाही. शिवाय ते अंतरामुळे बरेच ठिकाणी शक्यही होणार नाही. बर्‍याच ठिकाणी यंत्रसामुग्रीच्याद्वारे या सांडपाण्यावर प्रक्रिया करून मग ते नैसर्गिक प्रक्रियेसाठी सोडले जाते. जयपूरमध्ये अशाप्रकारचे प्रयोग करण्यात आले आहेत. असे झाल्यामुळे हे अर्धवट शुध्द पाणी जमा केलेल्या साठ्यातून जमिनीमध्ये मुरण्याला सुरूवात होते. या मुरण्याच्या प्रक्रियेत निसर्ग जलशुध्दीकरणासाठी फार मोठी मदत करीत असतो. या प्रक्रियेमध्ये ते मूळचे सांडपाणी स्वत:चे अस्तित्व पूर्णपणे विसरून ते संपूर्णपणे शुध्द होण्याच्या मार्गावर लागते आणि मग त्याचा पुनर्वापर करणे समाजाला अडचणीचे वाटत नाही. एवढेच काय तर अशा पाण्याचा जमिनीतून उपसा केल्यानंतर त्याचे यांत्रिक पध्दतीने पुन्हा एकदा शुध्दीकरण केल्यास पुनर्वापरातील सर्वच अडचणी दूर होऊ शकतात.

समशितोष्ण हवामानातील बाष्पीभवनाची होणारी क्रिया ही समाजाला नेहमीच महागात पडणार आहे. जगात कोठेही सांडपाणी तलावामध्ये बाष्पीभवनामुळे होणार्‍या नुकसानाची भरपाई म्हणून वापरले जात नाही. भारतात हवामानाचा विचार करता हे करणे गरजेचे झाले आहे. पण त्यासाठी यांत्रिक आणि नैसर्गिक प्रक्रिया करूनच मग त्याचा वापर होणे आवश्यक आहे. अस केल्यास पाणीप्रश्‍नावर आपण सहजपणे मात करून शकू.

Path Alias

/articles/apana-paanayaacayaa-daurabhaikasayaakadae-vaatacaala-karaita-ahaota-0

Post By: Hindi
×