व्यवस्थापन कार्यपध्दती आणि आजचा काळ


आता मोठी धरणे बांधायच्या सुयोग्य जागा संपल्या आहेत. भूमी अधिग्रहण आणि विस्थापनाचे मुद्यांवरून लोकांचा प्रत्येक प्रकल्पास विरोध होत आहे असे दिसते आहे. तर सुमारे 60 टक्के क्षेत्र आणि त्यामुळे तो शेतकरी हा आपले भवितव्य पावसावर अवलंबून ठेवून बसला आहे. दारिद्र्याचे चटके भोगतोय. तेही न सहन झाले तर आत्महत्या करतो.

एका अर्थाने विसाव्या शतकाचे अखेर पर्यंत ग्रामीण भारतीयांच्या परंपरागत ज्ञानावर आधारलेल्या आणि अनेक शतके टिकलेल्या परंपरागत पध्दती ह्या जवळजवळ संपल्या. काही अद्याप धुगधुगी धरून आहेत पण त्यांचाही मार्ग तोच दिसतोय आणि त्यांचे आहे त्या स्थितीत पुनरूज्जीवन करता येणे ही कठीण बाब आहे.

दुसरीकडे आम्ही विकेंद्रीत जलसाठ्यांऐवजी एकत्रित केंद्रीभूत जलसाठे निर्माण करण्याची मोठ्या धरणांची पध्दत स्वीकारली ती स्वीकारूनही साठ वर्षे होऊन गेली. अजूनही आमची सिंचित जमीन ही लागवडीखालील जमिनीच्या 25 टक्के पेक्षा जास्त जात नाही. महाराष्ट्रात हे प्रमाण 16 टक्के चे आसपास आहे तर धुळे जिल्ह्याचे केवळ 8.85 टक्के इतकेच. आता मोठी धरणे बांधायच्या सुयोग्य जागा संपल्या आहेत. भूमी अधिग्रहण आणि विस्थापनाचे मुद्यांवरून लोकांचा प्रत्येक प्रकल्पास विरोध होत आहे असे दिसते आहे. तर सुमारे 60 टक्के क्षेत्र आणि त्यामुळे तो शेतकरी हा आपले भवितव्य पावसावर अवलंबून ठेवून बसला आहे. दारिद्र्याचे चटके भोगतोय. तेही न सहन झाले तर आत्महत्या करतो.

एक गोष्ट पुन्हा स्पष्ट करू या. भारतात सरासरी 780 मि.मी. पाऊस पडतो, दरवर्षी. देशाचे क्षेत्रफळ आहे 329 द.ल. हेक्टर (mha) वरील पावसापैकी सुमारे 30 टक्के पाऊस हा बाष्पीभवनात उडून जातो तर 10 टक्के वापरातच येत नाही. आणि कृषीसाठी वापरात असलेले क्षेत्र हे 55 टक्के चे आसपासच आहे. त्यामुळे हे उपलब्ध पाणी 55 टक्के क्षेत्रात म्हणजे 170 द.ल. हेक्टर क्षेत्रात समान दिल्या पसरविले तर सुमारे 940 मि.मी उंचीचा पाण्याचा स्तंभ उभा रहातो. हे पाणी आपली लोकसंख्या 160 कोटीपर्यंत पोहोचली तरीही आपली गरज भागवू शकेल इतके आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई हा आपल्यासमोरचा प्रश्न नाहीच.

पुन्हा मागचेच गणित. सरासरी 96 तासात हा पाऊस पडतो. पैकी किमान किंवा त्यापेक्षाही जास्त पाऊस हा सुमारे 18 ते 22 तासात पडून जातो. एवढा थोडाच कालावधीत पडणारा पाऊस साठविण्याची, अडविण्याची आणि जिरविण्याची कोणतीही यंत्रणा आपल्या देशात नाही. तशी नियमावली नाही. किंबहुना जे नियम आहेत ते पाणी अडवण्यास अडकाठी करणारेच आहेत.

म्हणजे असे की कोट्यावधी रूपये खर्च करून धरण बांधायचे तर 75 टक्के विश्वासार्हता पहावी लागे म्हणजे दर चार वर्षांपैकी तीन वर्षे तरी ते भरलेच पाहिजे अशा हिशोबाने बांधायचे. नंतर ही विश्वासार्हतेची लढाई सुप्रिम कोर्टात गेली आणि 50 टक्के विश्वासार्हतेला परवानगी मिळाली. म्हणजे 4 पैकी दोन वर्षे भरेल अशा रितीने धरण आखावे असे धोरण आले. पण पाऊस तुमचे धोरण पाहून थोडाच पडतो ? त्याची पडण्याची पध्दत ही त्याची स्वत:ची असते. त्याने केव्हा, कुठे आणि किती पडावयाचे यावर कुणाचेही नियंत्रण नाही. जर सुमारे 20 तासात 400 मि.मी पाऊस पडून जाणार असेल आणि तो 9000 तास पुरवायचा असेल (खरे तर 9600 तास किंवा 400 दिवस, कारण पावसाळा कधी कधी ताणही देऊ शकतो) तर हे 50 टक्के विश्वासार्हतेचे गणितही पुरणारे नाही.

1. आम्हाला 15 टक्के विश्वासार्हतेने म्हणजे 6 वर्षातून धरण एकदा भरले तरी चालले अशा पध्दतीने हे पाणी अडवावे लागेल. त्यासाठी छोट्या, छोट्या प्रमाणात विकेंद्रित स्वरूपात पाणी साठविण्याची योजना करावी लागेल. असे पाणी साठवितांना भूमी अधिग्रहण आणि विस्थापन हे प्रश्न येणारच नाहीत.... आलेच तर अगदी स्वल्प प्रमाणात असतील याची खात्री करून घ्यावी लागेल आणि लोकांनाही पटवून द्यावे लागेल.

2. जलसाठवण प्रकल्प योजनांना तिथल्या भूगर्भाचा अभ्यास करावा लागेल. भारतात अभिजन्य खडकाचे स्वरूप मुख्यत्वे दोन प्रकारचे आहे. ग्रॅनाईट.. ह्या प्रकारच्या खडकात थर नाहीत. एकदा खडक लागला की खाली खोलपर्यंत खडकच. ते काय पाणी अडवेल ते त्याचे बरं. दुसरा बसाल्ट... ह्यात एक आड एक खडक आणि मऊ थर आहेत. अर्थात त्यातही सूक्ष्म फरक आहेतच. पण मुख्य विभागणी म्हणजे युनीलेअर्ड आणि मल्टीलेअर्ड अशी आहे. ह्या मधल्या मधल्या वाळू, माती, मुरूम, चुनखडीच्या थरात पाणी आढळते. तेच पाणी विहीरींना मिळते. हा भूगर्भाचा विशेष गुण जलसंधारणासाठी वापरता येणे शक्य आहे. 'Underground water storages' ही संकल्पना माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांनी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला तो याच गुणधर्मावर आधारित.

दुसरा प्रकार म्हणजे जलजन्य किंवा थरांचे खडक हा पाणी साठविण्यास उत्तमच.
तिसरा प्रकार हा रूपांतरीत खडक हाही अग्नीजन्य खडकासारखाच. अगदी कमी जलधारणाची शक्ती असलेला.

असे असले तरीही फोल्ड (Fold), फॉल्ट (Fault) डाईक ( Dyke) ह्या अनेक प्रकारांमुळेही पाणी साठविण्यास, मुरण्यास मदत होऊ शकते.

चिरा दगड (लॅटराईट) बॉक्साईट, अॅल्युलिना म्हणजे चिकणमातीचा थर हे अन्य प्रकार. त्यांचा अभ्यास करून जलसंधारणासाठी उपयोग करता येणे शक्य आहे, गरजेचेही आहे

3. पुरेसा पाऊस पडतो. पुरेसे पाणी आहे हे आकडेवारी सांगते आणि दरवर्षी टंचाई जाणवते - टँकरची गरज लागते हेही खरेच आहे. दोन्ही परस्पर विरोधी अशा खऱ्या गोष्टी, सांगड तर घालावीच लागेल.

त्यामुळेच खालील उपायायेजना करणे अपरिहार्य आहे.
- नदी करार व कोणी किती पाणी वापरावयाचे याचा पुनर्विचार व्हायला हवा.
- खोरे निहाय विचार करतांना क्षेत्रफळानुसार विचार न करता गावानुसार विचार करायला हवा. जिथे लोकसंख्या व गावांची संख्या जास्त तिथे जास्त पाणी द्यावे लागेल. तसे ते मंजूर व्हावे.
- पाण्याचा विचार करतांना मुख्यत्वे पृष्ठजलाचाच विचार केला जातो. भूजलाचा फारसा विचार केला जात नाही. आता भूजलाचा कायदा केंद्र सरकार करू इच्छिते आहे. तशी तपासणीही सुरू आहे परंतु जोपर्यंत तो परिणामकराक पध्दतीने अंमलात येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग होणार नाही.
- माणसाच्या पाण्यासंबंधीच्या सर्व गरजांचा विचार केला तर पिण्याचे पाणी हे केवळ 4 ते 5 टक्के एवढेच. पिण्याचे पाणी म्हणजे घरगुती वापराचे सर्व पाणी त्यात आले. त्याचे दोन प्रश्न विचारात घ्यावे लागतील -

1. भारतात कुठेही 200 मि.मी पेक्षा कमी पाऊस पडत नाही. तरीही केवळ 4 ते 5 टक्के एवढेच घरगुती वापराये पाणी... तेही आपण खात्रीशीररित्या पुरवू शकत नाही. स्वातंत्र्यानंतर पासष्ट वर्षानंतरही. आणि मुळात पाणीपुरवठाच नाही तर त्याची गुणवत्ता, स्वच्छता, शुध्दता हे मुद्दे तर फार दूरच आहेत.

2. जिथे पाणी पुरवठा होतो अशा शहरांमध्ये व महानगरांमध्ये घरात जेवढे दर माणशी पाणी मिळते त्यातले 85 ते 90 टक्के हे सांडपाणी म्हणून घरातून बाहेर पडते.

3. ते शुध्द स्वरूपात घरात येते आणि ड्रेनेजमध्ये वाया जाते. हा खर्च कसा कमी करता येईल ?

4. मैला वाहून नेण्यासाठी पाण्याऐवजी दुसरे माध्यम वापरता येणे शक्य आहे काय ? त्याचाही विचार होणे गरजेचे आहे. विमानात शौचगृहांमध्ये हवेच्या किंवा दाबाने सोडलेल्या हवेचा वापर करतात. भारतीय रेल्वेही त्याचा वापर सुरू करीत आहे. ह्या पर्यायावर इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरण्याचे दृष्टीने संशोधन होणे गरजेचे आहे.

5. मैला पाण्याचे शुध्दीकरण अत्यंत काटेकोरपणे करणे आणि शुध्द केलेल्या पाण्याचा पुन्हा वापर करणे. पाणी आयात करणाऱ्या सिंगापूरला हे जमले. त्यांची शुध्दता प्रक्रिया इतकी काटेकोर की तेथे हे पाणी पिण्यासाठी देखील वापरतात. 6 वेळा ते पाणी पुन्हा पुन्हा पुनर्वापरासाठी फिरविले (recycle) जाते. त्यामुळे निम्म्या पाण्यातच त्यांची गरज भागते. आपल्यालाही हा विचार लवकरच कृतीत आणावा लागणार आहे.

6. स्वच्छता, शुध्दता आणि गुणवत्ता हे आजपर्यंतचे दुर्लक्षित विषय. कपडे धुणे, भांडी घासणे, अंघोळ, गुरे धुणे, शौचविधी ह्या सर्व कामांसाठी आपल्याकडे नदी - नाले यांचा मुक्तपणे वापर केला जातो. अर्धवट जळालेली प्रेते इथपासून ते देवावरील निर्माल्य हे सगळे नदीत स्व: केले जाते. तेवढे वाहून नेण्याची व शुध्द करण्याची नदीची क्षमता आहे की नाही हे न पहाताच.

पण हे सगळे मुद्दे येतात ते नंतर. प्रश्न आहे तो पुन्हा मूळ मुद्यांचाच. पाणी आहे तर टंचाई का ? आणि हा विरोधाभास नष्ट कसा करता येईल.

1. 'Small is beautiful' ही म्हण लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या कुटुंबापुरता हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा. छतावरील पावसाचे पाणी व प्लॉट मध्ये पडणारे पावसाचे पाणी ह्याची साठवण (Storage)किंवा जमिनीच्या पोटात पुनर्भरण हे दोन प्रकार उपलब्ध आहेत. दुर्दैवाने महाराष्ट्रातला खडक हा बासाल्ट स्वरूपाचा आहे. तो फारसे पाणी पोटात झिरपू देत नाही. त्यामुळे पुनर्भरण यांचे ऐवजी पुनर्साठवण हा एकमेव खरा पर्याय उपलब्ध आहे. प्रारंभी तो थोडा खर्चिक असला तरीही फायदेशीर आहे.

2. जी गोष्ट घराची तीच शेताची. आपल्या गरजेइतका पाऊस शेतात पडतो, वाहून जातो.शेत समतल करणे, बांध बंदिस्ती करणे, शेततळे करून त्यात पाणी साठविणे, शक्य असेल तर विहीरीत, विंधन विहीरीत ह्या शेततळ्याच्या पाण्याचे पुनर्भरण करणे ह्यावरून शेतकरी आपली स्वत:ची गरज भागवू शकतो. एक हेक्टर शेतात 30 मी. X 40 मी X 3मी ह्या सरासारी मापाचे शेततळे पुरेसे पाणी साठवू शकते.

3. गावाने आपल्याला नेमके किती पाणी लागते ह्याचे गणित करून वर्षभर (9600 तास) पुरेल एवढे पाणी साठविले, नीटपणे वाटले व जपून वापरले तर टंचाई कधीच जाणवणार नाही इतके पाणी मिळेल. मात्र पावसाळ्यात, हिवाळ्यात पाणी आहे म्हणून उधळमाधळ आणि मग उन्हाळ्यात पाणी संपले म्हणून टँकर ही पध्दत चालणार नाही. किंवा तळ्याजवळच्या माणसाला जास्त पाणी आणि लांबवर रहाणाऱ्याचे नळाला पाणीच नाही ही पध्दतीही चालणार नाही.

4. अ. ह्याच पध्दतीने शहरांना लागणारा पाणीसाठा हा केवळ घरगुती वापराचा पाणीसाठा म्हणून करणे गरजेचे आहे. त्याचे छतावरच्या पाण्याची साठवण पध्दत, पावसाचे पाणी स्वतंत्रपणे गोळा करणे व साठविणे. नदी, नाले आदी जलस्त्रोत पूर्णपणे प्रदूषण मुक्त ठेवणे ह्याचीही गरज आहे. त्यामुळे दोन गोष्टी घडतील - आज होते काय - शहरांना पाणी कमी पडते. मग सिंचनासाठी साठविलेले पाणी हे शहरासाठी राखून ठवावे लागते. त्यामुळे सगळेच टांगणीला. शेताला पाणी मिळते की नाही म्हणून गावकरी गॅसवर तर घरगुती वापराचे पाणी तरी मिळणार की नाही म्हणून शहरे चितांक्रांत. वेगवेगळी सुविधा केली तर हे दोन्ही प्रश्न सुटतील.

4. ब. औद्योगिक गरजांसाठी लागणारे पाणी ह्याच पध्दतीने स्वतंत्रपणे साठवून वापरावे लागेल.

4.क. ह्या सर्व पाण्याचे व्यवस्थापन व वाटप यात स्त्रियांचा व विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग करून घेणे गरजेचे आहे. गावागावाचीे जी जलव्यवस्थापन समिती असेल त्यात स्त्रियांचे पुरेसे प्रतिनिधित्व असायला हवे. त्यांना जिथे गरज असेल तिथे विद्यार्थ्यांचे सहकार्य हवे उदा. पाणी मोजणे, पाण्याचे गणित मांडणे, प्रत्येकाला किती पाणी मिळेल हा हिशोब समजावून देणे ही कामे विद्यार्थी करू शकतात. पाण्याचा, पावसाचा बाष्पीभवनाचा ताळेबंद व हिशोब सांभाळू शकतात.

5. पिण्याचे पाण्याचा पाणवठा वेगळा तर गुराचा वेगळा आणि धुणी, भांडी स्नानासाठी वेगळा असे किमान तीन साठवण तलाव गावात तयार केले जावेत. दर उन्हाळ्यात त्याचा गाळ काढणे, सांडवा असल्यास दुरूस्त करणे ही कामे केली जावीत.

6. विहीरी असतातच. जमिनीत झिरपलेले पाणी हे विहीरींना मिळते. कुणाच्याही विहीरीत ते गेले तरी ते सगळ्यांचेच पाणी असते. त्यामुळे सरत्या उन्हाळ्यात एक दिवस ठरवून गावाने सर्व विहीरीतील पाण्याची पातळी किती खोल आहे ते नोंदवून ठेवावे. त्याच्यावर जेवढे पाणी पण सगळ्यात विहीत येईल तेवढेच त्याचे. त्याला तेवढेच वापरायला परवानगी.

7. वाजवी पेक्षा जास्त पाणी पिकांना दिले तर जमिनीतील क्षार उफाळून जमीन खारपड होते, बिनउपजावू होते. त्यामुळे अतिरिक्त पाणी वापरणे कटाक्षाने टाळावे.

8. कमी पाण्यात जास्त पिके घेता यावी ह्यासाठी तुषार सिंचन, ठिबक सिंचन, डिफ्युजर इत्यादी सर्व आधुनिक प्रकाराचे सहाय्य घेण्यात यावे.

9. सध्या अनेक धरणांमध्ये अशी स्थिती आहे की तिथे पाणीसाठा आहे परंतु शेतकऱ्यांची मागणीच नाही. अशावेळी त्या लाभक्षेत्रात किती शेत आहे, त्यांना हेक्टरी किती पाणी मिळू शकेल याचे गणित करून प्रबोधन केले जावे. त्यांच्या गरजेच्या वेळी त्यांना पाणी मिळाले पाहिजे ह्यासाठी जलवाटपाचे व्यवस्थापनात ह्या लाभार्थांना सहभागी करून घ्यावे.

10. जे जे जलसंधारणाचे काम हाती घेतले जाईल ते ते यंत्रसामग्रीचा वापर करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल व त्याचा लाभ घेता येईल अशा पध्दतीने वेळापत्रकानुसार पूर्ण व्हावे. त्यामुळे पैशाचीही बचत होते व पाण्याचा लाभही होतो.

11. सर्व जलसाठ्यातला गाळ न चुकता दरवर्षी काढावा. विजयनगरचे साम्राज्यात हा गाळ काढणे, त्याच्यापासून माठ, मूर्त्या, विटा वगैरे बनविणे हा अधिकार व जबाबदारी कुंभार जमातीची होती तर बंधाऱ्याची डागडुजी हे काम कोळी जमातीचे होते. अशी जबाबदारी सोपविलेली असल्याने ते काम निश्चितपणे होई.

आता अशा जातीजमातींचा विचार करून जबाबजाऱ्या देता येणार नाहीत. पण थोडा लवचिक पध्दतीने विचार करून त्या वाटल्या तर ? विटा तयार करणाऱ्या व्यक्तींना अगर त्यांचे समुहाला गाळ काढण्याची जबाबदारी दिली आणि मासेमारीची कामे करणाऱ्या गटावर डागडुजीचे काम सोपविले तर ?

हे सारे घडविणे म्हणजे दिवास्वप्न पहाणे नव्हे. हे घडू शकेल. त्यासाठीही आम्हाला मोठी धरणे हवी आहेत. परंपरागत पध्दती हव्या आहेत. त्यांचा आधुनिक रूपात , नव्याचा शोध घेत घेत काही सापडले तर तेही हवे आहे.

अगदी थोडक्यात सांगावयाचे तर पाण्याचा प्रत्येक थेंब हा मौल्यवान आहे. तो पडेल तिथेच थांबवायला हवा, अडवायला हवा, जिरवायला हवा. जिथे तो पुन्हा जमिनीवर पडेल तिथे भौगोलिक स्थितीनुसार मोठे-लहान साठवण निर्माण करायला हवे. डोंगरमाथे संभाळायला हवेत. जंगले राखायला हवीत. कुरणे व खारफुटी संभाळायला हवी.

लहान साठवण की मोठे साठवण धरण हा प्रश्नच नाही. लहान आणि मोठे, जुने आणि नवे आणि त्या दोघांचाही योग्य ती सांगड हाच खर्चा मार्ग आहे. आणि तेवढा एकच मार्ग दिसतोय.

अर्धे जग पाण्यासाठी हाय हाय करतेय. आपण त्यामानाने सुदैवी आहोत पण हा देवदत्त वर संभाळायला हवा, जपायला हवा. नव्या जुन्याचे सांगडीतून हे 10 ते 22 टक्के ह्या दरम्यान रेंगाळणारे सिंचन किमान तिप्पट पातळीवर न्यायला हवे. ते कुठेही 33 ते 35 टक्क्यांपेक्षा कमी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. हाच आहे खरा संपन्नतेचा मार्ग.

हे काम एका दिवसाचे नाही, एका वर्षाचे नाही, वर्षानुवर्षे सतत करावयाची ही आराधाना आहे, तप आहे, पूजा आहे, राजकीय विचारांचे, मतभेदांचे जोडे ह्या मंदीराचे बाहेर काढून ठेवूनच ह्या जलदेवतेकडे जावे लागेल. तरच ती प्रसन्न होऊ शकेल.

नव्या - जुन्याची, लहान - मोठ्याची सांगड घालीत, पुनर्भरण व पुनर्वापर हा अनिवार्य करीत आणि पाण्याची शुध्दता संभाळीत काम केले तर उद्यांचा भविष्यकाळ हा जलटंचाई शब्दच शिल्लक उरणार नाही. हाच आहे परंपरांचा खरा मागोवा व खरा फायदा. तस्मात्... हरी ओम् म्हणा, कामाला लागा बाकी सारे जलस्वाधीन. ते कधीच नाराज करणार नाही.

श्री. मुकुंद धाराशिवकर, धुळे - (फोन : 02562236987)

Path Alias

/articles/vayavasathaapana-kaarayapadhadatai-anai-ajacaa-kaala

Post By: Hindi
×