वावीहर्ष आदिवासी सहकारी उपसा जलसिंचन योजना


सर्वसाधारणपणे बहुतेक उपसा सिंचन योजना विद्युत देयके न भरल्यामुळे बंद पडतात, असा सर्वत्र अनुभव आहे. किंवा मुख्य पंप बंद झाला तर सर्वच क्षेत्रातील सिंचन व्यवस्थापन कोलमडते. या योजनेत एखादा पंप काही कारणास्तव बंद झाला तर इतर पंपाचे पाणी त्या गटाकडे वळविण्याची सोय करण्यात आली आहे.

प्रचलित उपसा सिंचन योजनेपेक्षा वेगळी वावीहर्ष आदिवासी सहकारी उपसा जलसिंचन योजना, वावीहर्ष ता.त्र्यंबकेश्वर जि.नाशिक

सामान्यत: शासनातर्फे उभारण्यात येणाऱ्या सहकारी उपसा जल सिंचन योजनेसाठी जलस्त्रोतातील पाण्याचा उपसा करण्यासाठी योजनेसाठी उच्च दाबाचे प्रचंड मोठे पंप बसविले जातात. या सहकारी उपसा सिंचन योजनेचे लाभक्षेत्र बरेच मोठे असते. पंपाव्दारे उचललेले पाणी उंच जागेवरील वितरण कुंडात सोडले जाते. प्रचलित पध्दतीमध्ये, उघडया कालव्याचे जाळे निर्माण करून वितरण कुंडातील पाणी सर्व लाभक्षेत्रात वितरण करण्याची व्यवस्था निर्माण केली जाते. व्यवस्थापनातील अडचणी व प्रचंड पाणी नाश हे कालवा वितरण प्रणालीत आढळणारे दोष या प्रकारच्या उपसा सिंचन योजनेत कायम राहतात. कालवा व्यवस्थेत होणारा पाणी नाश विचारात घेऊन सिंचनासाठी लागणारे पाणी उचलावे लागत असल्यामूळे विजेचा अपव्यय खूप जास्त असतो.

संपुर्ण लाभक्षेत्रास लागणाऱ्या एकत्रित पाण्याचा हिशेाब करून या योजने साठी पंपाचा विसर्ग व एच पी ठरविला जातो. त्यामूळे पाणी उचलण्यासाठी अति उच्च दाबाचे अवाढव्य पंप या पध्दतीमध्ये कार्यान्वित करावे लागतात. या पंपाचा वार्षिक देखभाल दुरूस्तीचा खर्चही प्रचंड असतो. या पंपाना लागणारा वीज पुरविठयाचा दर कमी दाबाच्या वीज दरापेक्षा काही पटीत जास्त असतेा. त्यामूळे शासनाच्या सुधारित धोरणानुसार पुर्ण व कार्यान्वित झालेल्या या योजनांचे हस्तांतरण करून घेण्यास पाणी वापर संस्था तयारच होत नाहीत. वरील सर्व अडचणीवर वावीहर्ष आदिवासी सहकारी उपसा जलसिंचन योजना या पाणी वापर संस्थेने यशस्वी मात केली, त्या शिवाय इतरही अनेक फायदे मिळविले आहेत. लाभक्षेत्राची विभागणी लहान लहान गटात करून त्या साठी स्वतंत्र पंपाची निवड केल्यास अवाढव्य पंपाचा वापर टाळता येतो. त्या समवेत पी व्ही सी पाईपव्दारे पाण्याचे वितरण केल्यास पाणी नाश शुन्याच्या जवळ नेता येतो शिवाय सिचंन जल व्यवस्थापन अतिशय सुलभ होते याचा आदर्श या पाणी वापर संस्थेने निर्मांन केला आहे. त्यांच्या या वैशिष्ट पूर्ण कामगिरीची ओळख या लेखात करून घेऊया.

योजनेची विशेष वितरण प्रणाली:


.संस्थेच्या 371 हेक्टर लाभक्षेत्राची विभागणी 20 गटात करण्यात आली. वैतरणा जलाशयात एका जॅकवेलचे बांधकाम करण्यात आले. प्रचलित पध्दती प्रमाणे संपूर्ण लाभ क्षेत्रासाठी एक किंवा दोन अवाढव्य विद्युत पंपा ऐैवजी प्रत्येक गटासाठी स्वतंत्र असे एकूण 20 सबमर्सिबल विद्युत पंप, जॅकवेल मध्ये बसविण्यात आले. गटाच्या लाभक्षेत्राच्या प्रमाणात एक लिटर प्रती सेंकद प्रति हेक्टर या दराने पंपाचा विसर्ग ठरविण्यात आला. लाभक्षेत्राची जलस्त्रोतापासूनची उंची व अंतर व आवश्यक विसर्ग यावर आधारीत नियोजन व संकल्पने करण्यात आली. प्रत्येक गटाच्या मूखाजवळ वितरण कुंडाचे बांधकाम करण्यात आले. पंप ते वितरण कुंडापर्यंत स्वतंत्र रायझिंग मेन (पी व्ही सी पाईपलाईन) टाकण्यात आली. रायझिंग मेन च्या शेवटास असणाऱ्या या वितरण कुंडाचे संकल्पन दिंडॊरी तालुक्यातील इंदोरे लघू पाटबंधारे तलावावरील जय मल्हार सहकारी उपसा सिंचन योजने प्रमाणे केले आहे. सर्व गटातील सर्व क्षेत्रास समान व प्रमाणशीर पाणी वाटप या पध्दतीमध्ये करता येते. या योजनेतील विद्युत पंपाची क्षमता 65 एच पी. पेक्षा कमी असल्याने उच्च दाबाच्या विद्युत जोडणीऎवजी कमी दाबाची विद्युत जोडणी घेता आली. त्यामुळे विद्युत बिलाच्या खर्चात सुमारे 50 टक्के पेक्षाही जास्त बचत होत आहे.

पाणी वाटपाची सुंदर व्यवस्था :


गटाचे लाभक्षेत्र 20 हे. असल्यास वितरण कुंडाच्या उभ्या भिंतीवर 90 मी मी व्यासाचे व 30 सेंमी लांबीचे 20 पाईप समान पातळीवर बसविण्यात आले. या पाईपचा उपयोग आउटलेट सारखा होतो. रायझिंग मेन मधून 20 लिटर प्रति सेंकद या वेगाने येणाऱ्या पाण्याची विभागणी आपोआप होते व प्रत्येक पाईप आउटलेट मधून 1 लिटर प्रति सेंकद या वेगाने पाणी बाहेर पडते. लाभधारक शेतकऱ्याचे मालकीचे क्षेत्र 3 हेक्टर असल्यास त्याच्या वाटयाचे 3 पाईप मधील पाणी बाहेरच्या कप्यात गोळा करण्यात येते. या कप्यातील पाणी पुढे स्वतंत्र पाईप व्दारे त्या शेतापर्यंत नेले जाते.

अश्या प्रकारे मालकीक्षेत्राच्या प्रमाणात पाणी वाटपाची अतिशय सुंदर व्यवस्था तयार करण्यात आली.

योजनेचे इतर फायदे :


■ पाण्याचे वितरण पी व्हि सी पाईपव्दारे असल्यामुळे वहन पाणी नाश नाही. पाण्यात मोठी बचत झाली.

■ प्रत्येक रायझिंग मेन वर पाणी मोजण्याचे यंत्र (मिटर) बसविण्यात आले. यामुळे कोणत्या गटाचा पाणी वापर किती झाला यावर नियंत्रण करता येते व घनफळावर आधारीत पाणी पुरवठा करता येतो. तसेच जॅकवेलच्या वर बांधण्यात आलेल्या नियंत्रक कक्षा मध्ये हे सर्व मीटर बसविण्यात आल्यामुळे एकाच ठिकाणी सर्व लाभक्षेत्रात झालेला पाणी वापर मोजता येतो. घनफळावर आधारीत पाणीपट्टी आकारणी सुलभतेने करता येते.

■ जल व्यवस्थापनात सुलभता आली आहे

■ सर्व शेतक-यांना त्यांच्या क्षेत्राच्या प्रमाणात पाणी मिळत असल्यामुळे पाणी वाटपात पारदर्शकता आली. हेड, मिडल, टेल असा भेद उरला नाही

■ सर्वांना एकाचवेळी समन्यायी तत्वाने पाणी मिळत असल्याने कुठेही चालुबंद करण्यासाठी व्हाल्वची गरज नाही.

■ पाणी वाटपासाठी पाटकऱ्याची गरज उरली नाही. व्यवस्थापन खर्चात बचत होत आहे.

■ सर्वसाधारणपणे बहुतेक उपसा सिंचन योजना विद्युत देयके न भरल्यामुळे बंद पडतात, असा सर्वत्र अनुभव आहे. किंवा मुख्य पंप बंद झाला तर सर्वच क्षेत्रातील सिंचन व्यवस्थापन कोलमडते. या योजनेत एखादा पंप काही कारणास्तव बंद झाला तर इतर पंपाचे पाणी त्या गटाकडे वळविण्याची सोय करण्यात आली आहे.

■ या योजनेचे लाभधारक आदिवासी असल्याने आणि त्यांच्या गटासाठी कमी अश्वशक्तीचा विद्युत पंप, कमी दाबाचा विद्युत पुरवठा असल्याने, विजेचे दर केवळ 30 पैसे प्रति युनिट इतका कमी आहे. विद्युत देयक एक किंवा दोन शेतक-यांनी भरले नाही, तरी संपूर्ण योजना बंद न पडता फक्त त्यांच्या गटाचाच पंप बंद पडेल. किंवा त्या गटात एखादा जरी सक्षम शेतकरी असला, तरी तो हे विद्युत देयक भरुन पंप चालू ठेवू शकेल. मोठ्या अश्वशक्तीच्या योजनांमध्ये देयकाचा खर्च आवाक्याबाहेर असल्याने असे करणे शक्य होत नाही.

■ एकाच जॅकवेल मध्ये 20 पंप व विहिरीवर बांधण्यात आलेल्या खोली मध्ये त्या सर्व पंपाचे स्टार्टर बसविण्यात आले आहे. केवळ एकच व्यक्ती हे सर्व पंप चालू बंद करण्याचे काम करतो. या व्यवस्थेमुळे मागणी नुसार गट निहाय पाणी पुरवठा करता येतो.

■ द एखाद्या लाभधारकास पाणी नको असेल तर तो त्याच्या वाटयाचे पाणी गरजू शेजाऱ्यास उसने देऊ शकतो.

■ वेळेवर होणाऱ्या व न्यायोचित पाणी पुरवठयामुळे भाजी पाला क्षेत्रात मोठी वाढ शक्य हेात आहे. त्यामुळे लाभधारकांचे आर्थिक उत्पन्न झपाट्याने वाढत आहे.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये


1. प्रकल्पाची सुधारीत किंमत

328.16 लक्ष

2. प्रकल्पाचे लाभक्षेत्र

371 हेक्टर्स

3. योजनेतील लाभधारकांची संख्या

215 कुटुंबे (सर्व आदिवासी)

4. गट संख्या

20 गट

5. पंप क्षमता

10 ते 30 हॉर्स पॉवर सबमर्सिबल

6. रायझिंग मेन व लांबी

एकूण 20 रायझिंग मेन लांबी 475 ते 1950 मी.

7. रायझिंग मेनचा व्यास

140 मीमी ते 200 मीमी

8. पाईपचे प्रेशर रेटींग

4 ते 6 कि.ग्रॅ/वर्ग सें.मी.  पी.व्ही.सी.पाइप्स

9. वितरण पाईपलाईन्स

वितरण कुंडापासून 90 मी.मी. 4 कि.ग्रॅ /वर्ग सें.मी. प्रकाराचे पी.व्ही.सी. (जैन इरिगेशन) पाइप्स

10. सुधारीत प्रतिहेक्टरी किंमत

रू 86545 (सुधारीत मापदंड 86800 प्रति हेक्टर)

11. लाभव्यय प्रमाण

1.68

 


श्री. प्रदीप भलगे, औरंगाबाद (भ्र : 09421305100)

Path Alias

/articles/vaavaiharasa-adaivaasai-sahakaarai-upasaa-jalasaincana-yaojanaa

Post By: Hindi
×