वारसा पाण्याचा - भाग 9


शहराला पाणी पुरवठा करण्याच्या व्यवस्था या मध्ययुगीन कालखंडात निर्माण झाल्या होत्या. काही शहरे, (पुणे, सांगली, मिरज, कोल्हापूर, तंजावर, बाळापूर - अकोला, बुऱ्हाणपूर, बहादूरगड - श्रीगोंदा) ही नदीच्या काठावर वसलेली शहरे आहेत. तरी पण या शहरांसाठी नदीतून पाणी पुरवठ्याची व्यवस्था केलेली नाही. याचाच अर्थ असा होतो की, नदीतील उघडे पाणी हे पिण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने हितकारक नसते हे त्या काळी लोकांना उमजले होते.

शहराला पाणी पुरवठा करण्याच्या व्यवस्था या मध्ययुगीन कालखंडात निर्माण झाल्या होत्या. काही शहरे, (पुणे, सांगली, मिरज, कोल्हापूर, तंजावर, बाळापूर - अकोला, बुऱ्हाणपूर, बहादूरगड - श्रीगोंदा) ही नदीच्या काठावर वसलेली शहरे आहेत. तरी पण या शहरांसाठी नदीतून पाणी पुरवठ्याची व्यवस्था केलेली नाही. याचाच अर्थ असा होतो की, नदीतील उघडे पाणी हे पिण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने हितकारक नसते हे त्या काळी लोकांना उमजले होते. या काळात पाणी शुध्दीकरणांच्या आजच्या सारख्या शास्त्रशुध्द योजना (Water purification plants) अस्तित्वात असल्याबद्दलचे पुरावे सार्वत्रिकपणे आढळून आलेले नाहीत. कंधारच्या जगतूंग तलावातून पाणी घेताना आणि मांडवगड येथे राणी रूपमतीच्या महालातून पाणी घेतांना कोळसा, वाळी, यांच्या टाक्यातून पाणी प्रवाहीत करून शुध्द करण्याच्या व्यवस्था आढळून आलेल्या आहेत इतरत्र मात्र तसे कोठे दिसून आलेले नाही.

शहरांच्या जवळच्या टेकडीतून पाझरणाऱ्या खडकाचा, मातीचा फायदा होवून त्यात साठवलेल्या पाण्याला (through infiltration galleries) भूमिगत कालव्याद्वारे नैसर्गिक उताराने शहरामध्ये आणून वेगवेगळ्या भागांमध्ये त्याचे वाटप करून पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक सोय केलेली आढळते. राज्याच्या आणि खास लोकांच्या महालांसाठी अशा स्वतंत्र नहरी (कालवे) बांधून घेतल्याचे दिसून येते. काही ठिकाणी भूमिगत कालव्याच्या ऐवजी खापरी नलिकांचा (Terracotta pipes ) वापर केलेला आढळतो. ज्या शहराच्या जवळून मोठी नदी वाहत नाही, (खडकी, कल्याण, अमृतसर, फलटण, अचलपूर, तंजावर, विजापूर) अशा ठिकाणी पण जवळच्या टेकडीतून भूमिगत कालवे वा भूमिगत नलिकांद्वारे शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केलेला दिसून येतो.

या भूमिगत कालवे आणि नलिकांची व्यवस्था निर्माण करतांना त्यांनी त्या परिसरांचा, हवामानाचा, पावसाचा, भूस्तराचा चांगला अभ्यास केला होता हे निश्चित आहे. उंचीवर पाऊस जास्त पडतो आणि म्हणून टेकडीवर पडलेला पाऊस ज्या ठिकाणी भूस्थर पाणी मुरवून घेणार आहे, अशा ठिकाणांचा शोध घेवून नेमके त्या ठिकाणीहून कालवा - नलिकांद्वारे पाणी शहरात खेळविले होते. या कालव्यातून आणि नलिकांतून पाणी प्रवाहित करण्यासाठी जलगती शास्त्रांचा त्या काळच्या समाजाला चांगला अभ्यास होता. देवगिरी किल्ल्याच्या खंदकात inverted siphon च्या मदतीने पाणी आणले आहे. यासाठी 400 मिलीमीटर व्यासाचे खापरी पाईप आणि 200 मिलीमीटर व्यासाच्या दगडी नलिकांचा वापर करण्यात आलेला आहे. या नलिका भूमार्गात 20 ते 25 मीटर खोल जावून एक नाला ओलांडतात. नाला ओलांडल्यानंतर परत जमिनीवर येवून देवगिरीच्या खंदकात पाणी ओततात.

या नलिका पाण्याच्या दाबाने निखळून (outflanking) पडू नयेत म्हणून त्या जमिनीवर दगडी बांधकामात भक्कमपणे बसविलेल्या (embeded) आहेत. त्या समाजाने जलगती शास्त्रात ( hydraulics) गाठलेली उंची यातून दिसून येते. काही ठिकाणी या कालव्याची (बुऱ्हाणपूर, औरंगाबाद) लांबी सहा ते सात किलोमीटर आहे. कालव्यात साठलेला गाळ काढण्यासाठी ठराविक अंतरावर लहान विहीरीच्या आकाराचे पोकळ स्तंभ बांधलेले आहे. या स्तंभाचा उपयोग हवा पुरवठा करणारे (Airvent) उच्छवास म्हणून केलेला दिसतो. ज्या ठिकाणी जमिनीची पातळी खोल गेलेली आहे अशा ठिकाणी स्तंभाची उंची जास्त आहे. तापी नदीकाठी वसलेल्या बुऱ्हाणपूर शहरात 100 कूप (विहीरी) असलेली भूमिगत कालव्याची व्यवस्था आज पण कार्यरत आहे. या शहरामध्ये जवळच्याच सातपुड्याच्या पायथ्यातून भूमिगत कालव्याद्वारे भूजल आणलेले आहे. या कालव्यातील गाळ काढण्यासाठी जवळ जवळ 200 विहीरींचे जाळे आज पण या परिसरात आपणास पहावयास मिळतात. औरंगाबाद शहरात 52 नहरींपैकी जवळ जवळ 5 ते 6 नहरी अहोरात्र वाहत असतात. विजापूर, जुन्नर, अचलपूर या ठिकाणच्या नहरी पण कार्यरत आहेत.

या स्तंभाना बंब, हत्तीणी, उसासे, उच्छवास, (Manholes, Towers) इत्यादी स्थानिक नावाने संबोधले जाते. प्रवाह हा नैसर्गिक उताराचा (Gravity flow) असल्याने काही भागात हे कालवे व नलिका पाण्याने पूर्णपणे भरून दाबाने (under pressure) पाणी वाहून घेवून जातात. मार्गातील अशा टॉवर्सचा उपयोग जवळच्याच वस्तीला पाणी पुरवठा करण्यासाठी पण केलेला दिसतो. आणि म्हणून हे टॉवर्स distribution towers म्हणून पण काम करतात. पूर्णा तापी खोऱ्यातील बाळापूर (अकोला) येथील किल्ल्यासाठी अशाच प्रकारे गोड्या पाण्याचा पुरवठा 5 - 6 कि.मी अंतरावरील बाग बारवेतून भूमिगत नलिकेद्वारे केलेला आहे हे त्या ठिकाणच्या अवशेषावरून दिसून येते. हा किल्ला दोन नद्यांच्या विळख्यात आहे. पण पाणी खारे आहे. बीड येथील खजाना विहीरीच्या भूमिगत कालव्याचा उपयोग सिंचनासाठी पण केलेला आहे. बीड गावातच सध्याच्या पाटबंधारे कार्यालयाच्या जवळच हा कालवा पृष्ठभागावर येतो व नाला ओलांडतो. या कालव्यासाठी Siphon बांधून पाणी वाहून नेले आहे.

गंगेचे कालवे मानवी प्रतिभेला भुरळ पाडणारे आहेत. कधीही गाळाने न भरणारे आणि सतत वाहणारे हे कालवे अभियांत्रिकी क्षेत्रातील उंची दर्शवितात अशा रीतीने कालवा आणि नलिकांच्या माध्यमातून त्या काळातील 1. जलविज्ञान, 2. जलगतीशास्त्र, 3. भुयारी कालवा, (Infiltration Gallery) 4. भूस्तर, 5. भूगर्भशास्त्र, 6. दगडी बांधकामातून स्थिरीकरण, (Embedment) 7. पेयजल, 8. सिंचनासाठी पाणी, 9. कालवे निर्मिती, 10. खडकातील कालवे, 11. दगडी नलिका, 12. खापरी नलिका, 13. गाळ काढणे, 14. उच्छवास, 15. नहरी, 16. उलटी वक्र नलिका, (Inverted Siphon) 17. कालव्याचा नदी सारखा वापर, (Canal as river) 18. नागरी पाणी पुरवठा, 19. गाळ विरहित आणि घर्षण विरहित प्रवेग (non silting & non scouring velocity) इत्यादी क्षेत्रातील लोककौशल्याचे दिग्दर्शन होते.

देशभर तलावांचे, बंधाऱ्यांचे जाळे पसरलेले आहे. या देशातील तलावाची संस्कृती हजारो वर्षापासून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अविरतपणे प्रवाहित असून भोवतालचा परिसर समृध्द करण्यास कारणीभूत ठरली आहे. भारतात जेवढी खेडी आहेत, त्याच्या किमान दुप्पट संख्येने तलाव असावेत. याचाच अर्थ गाव तेथे गावतळे व शेत तेथे शेततळे हे तत्व त्या समाजाने अंगिकारले होते. तलावाची बांधणी हा एक अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना आहे. एका खाली दुसरा तलाव, त्याचे खाली तिसरा तलाव अशा मालिका निर्माण केलेल्या आहेत. यातील वैशिष्ट्य म्हणजे खालचा तलाव भरल्याशिवाय वरचा तलाव भरणार नाही. हा त्यातील सामाजिक न्यायाचा भाग. खडकी - देवगिरीच्या परिसरात अनेक तलावांच्या मालिका आपणास दिसतात. हरिशूल, हिमायत बाग, मौसाळा या तलावाच्या मालिका आहेत.

मुंबई, धारूर, ठाणे, कल्याण इत्यादी ठिकाणी अनेक तलाव होते. कोकणात तर त्याची मोजणी येणार नाही इतकी संख्या आहे. तीच परिस्थिती विदर्भातील वैनगंगा खोऱ्यातील आहे. बंगलोर, हैद्राबाद, उदयपूर, भोपाळ ही तलावांची शहरे म्हणून प्रसिध्द आहेत. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. पावसाचे पाणी साठवून वर्षभर वापरण्याचे कौशल्य हे फार खोलवर रूजले होते हेच यातून दिसून येते. मौर्य काळातील मातीच्या भरावामध्ये बांधलेले तलाव गुजराथ, महाराष्ट्र या ठिकाणी सुदर्शन तलाव या नावाने ओळखले जातात. वाशीम जवळ पेनगंगा नदीच्या उपनदीवर 2 ते 3 कि.मी लांबीचे साधारणत: 15 ते 20 मीटर उंचीचे मातीचे धरण आजसुध्दा आपणास पहावयास मिळते. मधल्या काळात हे धरण फुटले आणि या जुन्या तलावात गाळ साचल्यामुळे तलावाची तळ पातळी वर आलेली दिसते. या गाळाच्या जमिनीवर उत्तम प्रकारची शेती केला जाते. जवळचे लोक या तलावाला महाभारतातील तलाव असे म्हणतात. तलाव जुना झाल्यानंतर - फुटल्यानंतर त्याचा वापर गाळपेर जमीन म्हणून केला जातो व जात आहे.

पृथ्वीराज चव्हाण याचे आजोबा अनंगपाल यांनी औरंगापूर या ठिकाणी बांधलेल्या तलावाचा संदर्भ सापडतो. हे धरण दगडामध्ये बांधलेले आहे. औरंगापूर हे ठिकाण दिल्लीपासून फरिदाबादकडे 20 कि.मी अंतरावर आहे. रामटेक (नागपूर) जवळ मातीच्या भरावामध्ये बांधलेले अनेक तलाव मौर्य कालीन आहेत असे म्हटले जाते. मौर्य, सातवाहन, गुप्त, राष्ट्रकुट, चालुक्य, यादव, चौल, शिलाहार, भोज, विजयनगर इत्यादी राजांच्या राजवटीमध्ये तलावांचे बंधाऱ्याचे, कालव्याचे काम मोठ्या प्रमाणावर झाल्याचे आपणास स्पष्टपणे दिसतात. महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, धुळे, औरंगाबाद या परिसरात नद्यांवर बंधारे बांधून पाणी वळवून फड पध्दतीने सिंचन करणारे बंधारे अनेक ठिकाणी आपणास पहावायस मिळतात.

असे सर्व बंधारे दगडी बांधकामातील आहेत. या बंधाऱ्याच्या कालव्यावर रस्ता ओलांडण्यासाठी कमानीचे पूल बांधलेले आहेत. वाळूवर बंधारे बांधण्याचे शास्त्रसुध्दा त्या काळात लोकांना अवगत होते. विदर्भात गौंड राज्याच्या राजवटीत मातीमध्ये अनेक तलाव बांधलेले आहेत आणि त्यापैकी आजसुध्दा अनेक कार्यक्षम असल्याचे आपणास दिसते. या तलावांना सांडव्यासाठी भिंत नाही. एका बाजूने जमिनीच्याच पातळीचा उपयोग करून जास्तीचे पाणी पुन्हा वळविण्याची सोय केलेली दिसते. पुरात माशांना विरूध्द दिशेने प्रवास करता यावा यासाठी अशा सांडव्याचा उपयोग होतो हा विचार मनात ठेवून सांडव्याची रचना केल्याचे आपणास दिसते. अनेक ठिकाणी तलाव आणि बंधारे एका खाली एक बांधून त्यांची शृंखला केल्याचे दिसते. देवगिरी किल्ल्याच्या जवळ सूर्य तलाव, चंद्र तलाव, याची मालिका आणि शेवटच्या खंदकातील (Moat) दगडी बंधारे आपल्याला त्या काळच्या व्यवस्थेची आठवण करून देतात.

नळदुर्गच्या किल्ल्याच्या खंदकाचा पाणी साठविण्यासाठी जलाशय म्हणून वापर केलेला आहे. या दगडी धरणाला पाणी वाहून जाण्यासाठी ogee shape नाही. साधारणत: 100 फूट उंची वरून दरवर्षी पाणी खाली पडते. या दगडी धरणातच जलमहल आहे. या महालाला वातानुकूलित करण्यासाठी नल आणि दमयंती अशा दोन सांडवारूपी मोऱ्याचा उपयोग करण्यात आलेला आहे. पाऊस जास्त पडून मोठा पूर आला तर पूर्ण धरण पाण्याखाली जाते पण जलमहालात एकही पाण्याचा थेंब येत नाही. या जलमहालात येण्यासाठी किल्ल्यातून बोगदापण तयार केलेला आहे असे कळते. सोलापूर, चंद्रपूर या ठिकाणच्या तलावासाठी किल्ल्याच्या तटबंदीचाच वापर केलेला आहे. अमृतसर येथील तलावांना आणि तसेच त्या परिसरातील इतर तलावांना पण शेजारच्या रावी नदीवर बंधारा बांधून कालव्याद्वारे पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था राजा रणजीतसिंहाच्या काळात केली असल्याचे कळते.

अमृतसर शहरात मात्र जालीयानवाला बागेतून जाणारा आणि अमृतसर या सरोवराला पाणी पुरवठा करणारा कालवा आज पण आपण पाहू शकतो. शहरामध्ये जुना कालवा पण दिसतो आणि नवीन कालवा पण दिसतो. हे सर्व तलाव पिण्याच्या पाण्यासाठी निर्माण केले असणार हे निश्चित. तलावात स्नान केल्याने रोग बरे होतात व पुण्य लाभते अशी भावना जोडून आज त्यांचा वापर सार्वजनिक उपयोगासाठी केला जात नाही. पंजाब प्रांतातील तलाव मात्र जमिनीमध्ये खोदून तयार केलेले आहेत. त्याला जवळच्याच बारमाही नदीच्या पाण्याचा पुरवठा करून ते वर्षभराकरिता उपयुक्त ठरले आहेत.

अशा प्रकारे मातीमध्ये धरण बांधणे, दगडी बांधकामात बंधारे बांधणे, बंधाऱ्याची मालिकाच तयार करणे, जनकल्याणार्थ अशा पायाभूत सोयींची निर्मिती करणे याचे ज्ञान, कौशल्य, शहाणपण त्या काळातील लोकांना फार चांगल्या प्रकारे अवगत होते असेच दिसून येते. मध्यप्रदेशात खजुराहो या भागामध्ये रस्त्याच्या भरावाचा उपयोग तलावाची पाळ ( Road - dam) म्हणून केल्याचे अनेक ठिकाणी दिसते. नदीवरील पुलाच्या वरच्या भागात वेगळा आकार देवून (गोलाकृती) सांडव्याची लांबी वाढवून जास्तीचा पूर वाहून घेवून जाण्याची कल्पक योजना पण आपणास पहावयास मिळते. Weir ची लांबी वाढल्यामुळे पुराच्या पाण्याची उंची (Flood height) कमी होते. इसवीसनाच्या पहिल्या शतकामध्ये कावेरी नदीवर बंधारे बांधल्याचे पुरावे आपल्या डोळ्यासमोर आहेत. या बंधाऱ्याचा पाया दगडात व (Lime mortar) चुन्यामध्ये केलेला आहे.

म्हणून या देशामध्ये फार पूर्वीपासूनच मुघल सत्ता येण्याच्या अगोदरच चुन्याचा (mortar) बांधकामासाठी उपयोग होत होता, याचे ज्ञान या लोकांकडे होते हेच दिसून येते. पुलासाठी, जलसेतूसाठी दगडी कमानीचा वापर केल्याचे अनेक जुन्या वास्तूमध्ये दिसून येते. काही ठिकाणी बंधाऱ्याची कामे वीट बांधकामात केली आहेत. अलीकडच्या काळात (1846) ब्रिटीशांनी हरिद्वार येथे गंगा नदीवर गंगा कालव्यांची निर्मिती केली. यासाठी जवळच विटा निर्माण करण्याचे कारखाने त्यांनी काढले. मोठमोठ्या किल्ल्यांची बांधकामे वीटेमध्येच झाल्याचे आपणास दिसते. मोहंजोदारो, हरप्पा, धोलवीरा या ठिकाणची स्नानगृहे, तलाव, गटारी इ. चे सर्व बांधकाम विटेमध्येच केल्याचे आपणास दिसून आलेले आहे. तर ही सातवाहन कालीन साम्राज्याची औद्योगिक राजधानी होती. या ठिकाणी रामायणकालीन कुंड दिसून आले आहेत. या ठिकाणाहून, खडकी, वेरूळ, अजिंठा, नाणे घाट, कल्याण बंदरामार्गे पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे हे इतिहास संशोधनातून स्पष्ट झाले आहे. तेर येथे रामायण काळातील वीट बांधकामातील कुंड सापडले आहेत आणि म्हणून वीटा बनविण्याचे लोककौशल्य पण या देशात रामायण काळापासून रूजले आहे असेच म्हणावे लागेल.

मातीच्या धरणावर जलाशयातील पाण्याच्या लाटामुळे मातीची झीज होवू नये म्हणून अतिशय उत्तमप्रकारचे दगडी अस्तरीकरण केल्याचे आपणास सार्वत्रिकपणे दिसते. भोपाळ येथील भोज तलावाचे अस्तरीकरण हे अभियंत्याला शिकण्यासाठीचा एक नमुना आहे. अस्तरीकरण हे किती भक्कम असू शकते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. विजयनगरच्या हंपी या राजधानीच्या परिसरात तुंगभद्रेवर बंधारे बांधून काढलेल्या कालव्याला केलेले दगडी अस्तरीकरण 600 ते 700 वर्षांनंतरसुध्दा मजबूत आहे.

देवगिरीच्या किल्ल्याच्या खंदकात बाजूच्याच डोंगरावरून पावसाचे पडलेले पाणी एकत्रित करून पाईप लाईनच्या वर (inverted siphon) उलटी वक्रनलिकेचा वापर करून खंदकात पाणी भरण्याची व्यवस्था म्हणजे त्या काळातील वर्षा जल संधारण (Rain water harvesting) चा एक उत्तम नमुना आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. अशीच व्यवस्था हैद्राबाद येथील गोवळकोंड्याच्या किल्ल्यासाठी केलेली दिसते. बाजूच्याच डोंगरातील पाणी दुर्ग या नावाच्या तलावात एकत्र करून त्या ठिकाणाहून भूमिगत कालव्याद्वारे खंदकात पाणी आणून टाकण्याची व्यवस्था आजही आपणास पहावयास मिळते. पावसाचे पाणी एकत्र करून वर्षभर वापरले गेल्याची देशभर अनेक उदाहरणे आहेत. प्रत्येक डोंगरी किल्ला हा वर्षा जल संधारण (Rain Water Harvesting) चा उत्तम नमुना आहे. सिंहगडावर 360 तलाव होते. पावनगडावर 52 तलाव, शिवनेरीवर 52 तलाव, रायगडावर 300 तलाव, पुरंदरवर 52 तलाव, नरनाळावर 52 तलाव अशी तलावांची संख्या होती.

भामेर या गडावर 365 तलाव होते असे समजते. एका दिवसाला एक तलाव असा त्या मागील विचार असावा. अनेक शहरात तलावांची शृंखला होती. हैद्राबाद शहरात 81 गाव तलाव होते असे समजते. बंगलोर शहर हे तलावांचे शहर म्हणून प्रसिध्द आहे. उदयपूर हे पण तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. आज पण या पैकी काही गाव - तलाव शिल्लक आहेत. निसर्गातून पडणारे पाणी तलावात साठविणे हे सहजपणे घडत असावे. असे न घडले तरच आश्चर्य म्हणावे. इतिहासात कोठेही अशी नोंद नाही की किल्ल्यावर पाण्याची चणचण भासली. किल्ले हे पाण्याने विपुल होते असेच म्हणावे लागते. वन किल्ल्यातसुध्दा अशीच परिस्थिती होती.

माणिकगडचा वन किल्ला हे याचे उदाहरण आहे. किल्ल्यात तलाव आणि त्याच्या बाजूला विहीरी हे वर्षा जलसंधारणाचे उदाहरण आहे. तलाव हे वर्षा जल संधारण (Rain Water Harvesting) चे साधन म्हणून वापरले गेले. यातून पुनर्भरणाची सोय झाली व पिण्याच्या पाण्याला सातत्य मिळाले. ग्रामीण भागासाठी, गाव तलाव व आड हेच संभाव्य उत्तर आहे असाच यातून निष्कर्ष निघतो.

छतावरील जलसंधारणाचे कौशल्यसुध्दा आपल्या पूर्वजांना इतिहास काळापासूनच उत्तमपणे अवगत होते. कल्याण (मुंबई) येथील कान्हेरी लेण्यात छतावर पडलेले पाणी खडकात कोरलेल्या टाक्यात साठवून ठेवण्याची व्यवस्था आज पण आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रात दिवे घाटात, सासवडच्या जवळ जाधवरावांची गढी आणि सासवडच्या मस्तानीचा महाल ही छतावरील पाणी साठविण्याची उत्तम उदाहरणे आहेत. जाधवरावांच्या गढीवरील चवथ्या पाचव्या मजल्यावर पडलेले पाणी तळमजल्यावर साठवून ठेवण्याची व्यवस्था आज पण दिसते. यातूनही उरलेले पाणी गढीच्या बारवेमध्ये आणण्यात येत असे. या बारवेच्या पाण्यातून फळाची बागायती शेती केली जात असे. छतावर पडलेल्या पाण्याचा उपयोग गढीत राहणारे किमान 50 लोक वर्षभरासाठी करीत असावेत असे आपल्याला आज अनुमान बांधता येते. कऱ्हा नदीच्या काठावर हा महाल आहे. छतावर पडलेले हे पाणी भूमिगत टाक्यामध्ये साठवण्याची व्यवस्था असावी. आज ती व्यवस्था वरून दिसत नाही आणि म्हणून आश्चर्य वाटते.

तामिळनाडूतील वैगई नदीच्या काठावरील मदुराई मिनाक्षी मंदीराच्या छतावर पडलेले पाणी त्याच मंदिराच्या समोरील गोल्डन लोटस टँक मध्ये साठवले जाते. इतिहास कालापासून हे पाणी तीर्थ म्हणून वापरले जाते. तामिळनाडू आणि केरळ मध्ये प्रत्येक मंदीराच्या छतावरील पाणी बाजूच्या तलावात साठवण्याची व्यवस्था सार्वत्रिकपणे दिसून येते. या तलावांना मंदीर तडाग (Temple tank) म्हणून संबोधले जाते. गुजराथमध्ये खुद्द अहमदाबाद शहरात हाथीसिंह जैन मंदिरात छतावर पडलेले पाणी मंदिरासमोरील टाक्यांत साठवून अविरत पणे वापरले जाण्याची व्यवस्था स्पष्टपणे दिसून येते. या टाक्यांची तोंडे लहान केलेली आहेत. बाष्पीभवनाने पाण्याच्या नाश होवू नये हा हेतू या पाठीमागे आहे.

पाण्याच्या या टाक्यांच्या तोंडावर झाकण ठेवण्याची व्यवस्था होती. झाकणे तांब्यांच्या भांड्याची (copper) केलेली आहेत. पाण्याच्या सान्निध्यात तांबे धातू ठेवल्यास तो धातू पाण्याला निर्जंतूक बनवितो इतका बारीक विचार त्या काळातील लोकांना अवगत होता. लोखंड वा इतर धातूचा वापर त्यांनी केलेला नाही. आग्रा जवळील फत्तेपूर सिक्री येथील अकबराच्या गुरूच्या समाधीवरील छत संगमरवरी आहे. समोर मोठे प्रांगण आहे. या समाधीच्या छतावरील पाणी समोरच्याच टाक्यात साठविण्याची व्यवस्था आज पण आपणास दिसून येते. छतावरून पाणी खाली आणण्यासाठीची व्यवस्था समाधीच्या खांबातून, नलिका काढून केलेली आहे. या समाधीच्या प्रांगणात पडलेले पावसाचे सर्व पाणी बाजूच्या पठाणी दरवाज्याच्या बारवेमध्ये साठवण्याची व्यवस्था आपणास पहावयास मिळते. महाराष्ट्रात कुंथलगिरी या डोंगरावरील जैन मंदिराच्या छतावर पडलेले पाणी बाजूच्या टाक्यात साठविण्याची व्यवस्था आजपण पहावयास मिळते.

राजस्थान हे छतावरील पाणी साठविण्याचे माहेर आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. शहरी भाग असो, ग्रामीण भाग असो, किल्ला असो, पडलेला पाऊस एकत्रित करून टाक्यामध्ये, कुंडामध्ये साठवून ते पाणी वर्षभर वापरण्याची व्यवस्था सर्वत्र आढळते. जैसलमेरच्या किल्ल्यांत देखील छतावरील पाणी साठवण्याची व्यवस्था आहे. हा किल्ला बेन्टोनाईट या पिवळ्या मातीवर वसलेला आहे. देशभरात अनेक ठिकाणी अशा व्यवस्था आपल्याला दिसून येतात. गरज आहे ती त्याला शोधून काढण्याची आणि त्यातील तत्व स्वीकारण्याची.

वर्षा जल संधारण, छतावरील जलसंधारण, इत्यादी योजना - कौशल्य इतिहासकाळात लोकांना अवगत झालेले होते व सार्वत्रिकपणे वापरले जात होते हेच यावरून दिसून येते.

आजच्यासारखा ऊर्जेचा वापर करून अपेक्षित उंचीपर्यंत पाणी उचलण्याची व्यवस्था इतिहासकाळात नव्हती. युरोपमध्ये 18 - 19 व्या शतकात औद्योगिक क्रांतीचा उदय झाला आणि त्यानंतर पाणी उचलण्याचे पंप हे साधन मानवाच्या हातात आले. सुरूवातीला हे पंप वाफेवर चालत असत. नंतर डिझेलवर आणि आता सार्वत्रिकपणे वीजेवर चालतात. हे ही सत्य आहे की इतिहासकालीन बागायती शेती ही मोठ्या प्रमाणात भूजलावर अवलंबून होती. काही ठिकाणी तलावाद्वारे, बंधाऱ्याद्वारे, नदीचा प्रवाह वळवून सिंचन केले जात असे. विहीरी खोदून त्यातून पाणी उचलून पिकाला दिले जात असे. या सर्व विहीरींना पुनर्भरणाचा आधार होता. अशी एकही विहीर नसावी की जी पुनर्भरणाच्या साधनाविरहित होती. शेत तेथे शेततळे व त्याला लागून विहीर अशी ही व्यवस्था होती.

पाणी बैलाच्या, हत्तीच्या, उंटाच्या, रेड्याच्या मोटेद्वारे उचलले जावयाचे. बऱ्याचशा ठिकाणी मनुष्य शक्तीद्वारे सुध्दा पाणी उचलून पिकाला देण्याची पध्दत होती. आज पण अशी मनुष्यशक्तीद्वारे पाणी उचलून लहान क्षेत्रावर बागायती पिके घेण्याची पध्दत कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते.

मधल्या काळामध्ये रहाटगाडगे हे एक प्रसिध्द साधन वापरात आले. रहाटगाडग्याचा वापर गेल्या पंचवीस ते तीस वर्षापर्यंत अनेक ठिकाणी केला जात होता. आजसुध्दा वाई या शहरात रहाटगाडगे दिसतात. वाईला रात्स्याच्या मळ्यामध्ये (मोती महाल) 100 फूट पाणी उचलून उंच नेणारे रहाटगाडगे आपल्याला पहावयास मिळते. दोन बैलाच्या मोटेने जमिनीच्या खालील पाणी 100 फूट वर उचलणे आणि परत तेच पाणी रहाटगाडग्याच्या मदतीने दोन माणसाद्वारे 100 फूट उंचीवर चढविणे आणि त्याद्वारे जवळच्याच तीन ते चार मजली महालांना, उद्यानाला, शेतीला पाणी पुरवठा करणे अशी ही व्यवस्था त्या काळातील पाणी उचलण्याच्या क्षेत्रातील कौशल्य दाखविते.

भीमा नदीच्या काठावरील पेडगाव येथील बहादूरशहा (श्रीगोंदा) गडावर विशालकाय अशा पाणी उचलण्याच्या व्यवस्था आज त्यांच्या अवशेषावरून आपणास पहावयास मिळतात. याच किल्ल्यांत औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना कोकणातील संगमेश्वर येथील देसाईच्या वाड्यात शिर्केच्या फितूरीचा फायदा घेवून कैद करून वापरणा नदी ओलांडून अकलूज मार्गे आणून त्यांचा अत्यंत क्रूरपणे वध केला. अशा प्रकारे पाणी उचलण्याच्या प्रकाराला झेलमोट म्हटले जात असे. अशा मोटा हत्तीच्या वा उंटाच्या मदतीने चालवत असत. अशी व्यवस्था बेगमपूर (ता. मंगळवेढा) - बेगमाचं ठिकाण येथे पहावयास मिळते. या ठिकाणी औरंगजेबाने बांधलेल्या बेगमाच्या वाड्याला भीमा नदीवरील झेलमोट द्वारे पाणी पुरवठा केला जात असे. करमाळा (जि. सोलापूर) येथे 96 पायऱ्यांची भव्य अशी बारव आहे. या बारवेतून हत्तीच्या मोटेने पाणी काढण्याची व्यवस्था अस्तित्वात असल्याचे आजपण दिसून येते.

पाणी उचलण्यासाठी मानवी शक्तीचा, प्राण्यांच्या शक्तीचा मोठ्या कल्पकतेने वापर केला जात होता. इजिप्तमध्ये नाईल नदीच्या काठावर विस्तृत प्रमाणामध्ये रहाटगाडग्यांचा वापर करून सिंचन केले जात होते. आजसुध्दा त्यापैकी काही रहाटगाडगे वापरात आहेत. कमी उंचीवर, कमी श्रमाने, उर्जेचा वापर न करता पाणी उचलण्याची ही व्ययवस्था उपयुक्तच होती असे म्हणावे लागते. कारण या व्यवस्थेमध्ये माणूस आपल्या श्रमावर अवलंबून होता. आजची वीजेची अनियमितता त्याला कधी कधी जीवनातून उठविते. कोल्हापूर भागात आज पण खेडेगावातील पाणी पिण्याच्या सार्वजनिक विहीरींवर काही ठिकाणी पवन ऊर्जेचा वापर करीत असल्याचे दिसून येते. इतिहास काळात याचा वापर जास्त होत असावा.

औष्णिक वीज दारात आल्या क्षणी अशी सोपी व अल्प किंमतीची पवन ऊर्जा लुप्त झाली असेच म्हणावे लागेल. हीच परिस्थिती बैलाच्या मोटेची झाली. साधारणत: 1972 पर्यंत मोटेचा वापर ग्रामीण भागात होत होता. 1966 पासूनच मोट पडद्याआड जावू लागली व 1972 ला ती पूर्णपणे वापारातून नाहीशी झाली. मोटेची जागा डिझेल पंपानी घेतली. 1975 ला डिझेल पंप पण लुप्त झाले व त्याची जागा इलेक्ट्रिक पंपांनी घेतली. पाण्याचा प्रमाणाबाहेर उपसा होवू लागला. कारण वीज स्वस्त व कधी कधी फुकट. याचा परिणाम भूजल पातळी खोलवर जाण्यात झाला. लहानशा क्षेत्रावरील सिंचनासाठी परत मोटेकडे जाणे हितकारक राहील असे वाटते. आज काल ऊसाचे चरक पण बैलाच्या मदतीने चालवतात. हे सूचिन्ह आहे.

हैड्रॉलिक रेम नावाचे एक अतिशय साधे आणि सोपे यंत्र पण त्याकाळी वापरात होते. पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहावर हे यंत्र चालत होते. पुण्यामध्ये मुठा नदीवर, बारामतीजवळ निरा कालव्यावर अशा प्रकारचे हैड्रॉलिक रेम पाणी उचलण्यासाठी वापरात होते असे सांगतात. नदी प्रवाहाच्या लहान उंचीची, वैगाचा वापर करून त्याच्या चार ते पाच पटीत पाण्याच्याच शक्तीचा वापर करून पाणी उचलले जात होते. या पाठीमागे जलगती शास्त्र आहे. अलीकडेच हिमाचल प्रदेश शासनाने सोलन जिल्ह्यामध्ये डोंगराळ भागात दिडशे ते दोनशे मीटर उंचीवर पाणी उचलण्यासाठी नदीच्या नैसर्गिक प्रवाहाची मदत करून अशा हैड्रॉलिक रेमचा वापर करण्यास मंजुरी दिलेली आहे असे समजते. कोकणामध्ये चिपळूण शहराच्या जवळ अशा प्रकारचे साधन आज पण वापरले जाते असे समजते. ही शास्त्रीय कल्पकता त्या काळच्या समाजाला अवगत होती हेच यावरून दिसून येते.

सध्याच्या ऊर्जा टंचाईच्या काळामध्ये हैड्रॉलिक रेम, रहाटगाडगे, प्राण्याची शक्ती, मानवी शक्ती याचा वापर करून ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी याद्वारे पाणी उचलून स्थानिक गरज भागविणे हे केव्हाही फायदेशीरच राहणार आहे. ऊर्जेची उपलब्धी म्हणजे पारंपारिक साधनांच्या वापराला पूर्णविराम हे तत्व परवडणारे नाही. दोन्ही व्यवस्थेचा संगम आणि त्यातून पुढची वाटचाल हे याला उत्तर होवू शकते. इतिहासातून हे आपण शिकावयास पाहिजे.

नदीला (माणसाळविणे) नियंत्रित करणे (taming), (तिला एक लवचिक वस्तू समजून) सार्वजनिक हितासाठी तिच्या प्रवासावर लगाम घालणे आणि तिच्या पाण्याचा उपयोग समाज धारणेसाठी करणे ही माणसाजवळची कला तशी पारंपारिक आहे. हे आपणाला अनेक उदाहरणांवरून दिसून येते. किल्ल्याच्या खंदकांमध्ये जवळच्याच नदीचा प्रवाह वळवून पाणी खेळविण्याची उदाहरणे हजारो आहेत. आग्राच्या किल्ल्यामध्ये यमुना वळविली आहे, दिल्लीच्या दोन्ही किल्ल्यांमध्ये यमुना वळविलेली आहे. तंजावरचे बृहदेश्वराचे मंदीर म्हणजे एक किल्लाच आहे. त्या किल्ल्याच्या खंदकात कावेरी नदीच्या कालव्याद्वारे पाणी खेळविलेले आहे. बीड येथे चंपावती किल्ल्याच्या खंदकामध्ये बिंदूसरा नदीचा प्रवाह खेळविलेला आहे.

विदर्भातील पवनी किल्ल्याच्या खंदकात वैनगंगा नदीचे पाणी खेळविलेले आहे. पवनी किल्ला सपाट प्रदेशात आहे. बाजूची तटबंदी खंदक खोदून मातीच्या भरावामध्ये केलेली आहे आणि याच भरावावर परत दगडी बांधकामामधील तटबंदी उभी केलेली आहे. मातीच्या भरावाची दबाई पूर्ण क्षमतेने करून त्यावर मजबूत अशी दगडी वास्तू बांधण्याची कला त्या काळी त्या समाजामध्ये होती असे यावरून दिसून येते. आंध्र प्रदेशामध्ये वरंगल येथील काकतीय राजवटीत बांधलेला वरंगलचा किल्ला पण चोहोबाजूने मातीच्या तटबंदीमध्ये सुरक्षित केलेला आहे. चोहोबाजूने खंदक म्हणजे तलावाचं जाळ आहे. या तलावातील पाणी आत घेवून किल्ल्यामध्ये भातशेती केली जात असे. या विशालकाय अशा किल्ल्यामध्ये अनेक तलाव, बारवा, मंदीरे निर्माण केलेली आहेत. पाण्याच्या साधनातून किल्ल्यामध्ये स्वयंपूर्णता देण्याचे हे एक उदाहरण आहे असेच म्हणावे लागेल. सोलापूर जवळील नळदुर्गच्या किल्ल्याच्या खंदकामध्ये बोरी नदीला वळविलेले आहे.

बोरी नदीचा प्रवाह पूर्णपणे खंदकात घेतलेला नाही, कारण पावसाळ्यामध्ये नदीला पूर आल्यानंतर सर्वच पाणी खंदकात येईल आणि खंदकाला धोका निर्माण करेल म्हणून हे टाळण्यासाठी त्यातील गरजे इतका प्रवाह खंदकामध्ये वळवून खंदकाचा वापर तलाव निर्मितीसाठी केलेला आहे. जलविज्ञानाचे व जलगती शास्त्राचे उत्तम ज्ञान निर्माण कर्त्याजवळ होत हे यावरून समजते. उदगिरचा किल्ला लोंडी नदीच्या उगमस्थानावरच वसविला आहे. लोंडी नदीला दोन फाटे करून त्या द्वारे उभय बाजूने किल्ल्याला वळसा घालून नदीला पुढे प्रवाहित केले आहे. टिपू सुलतानाने ज्या किल्ल्यातून राज्य केले तो श्रीरंगपट्टणमचा किल्ला म्हैसूरजवळ कावेरी नदीच्या दोन पात्रांच्यामध्ये वसलेला आहे. एका बाजूने कावेरी नदीच किल्ल्याचे खंदक म्हणून काम करते. परंडा गावातून जाणारी लहानशी नदी परंडा किल्ल्याच्या खंदकात घेतलेली आहे. नद्या, वळविणे हे तंत्र त्या काळच्या समाजाला अंगवळणी पडलेले होते. हे सर्व त्यांच्याकडे अनुभवातून उपलब्ध झालेले होते. हाच खंदक किल्ल्यातील विहीर, आड, बारव यांना पुनर्भरणाद्वारे आधार देतो.

डॉ. दि. मा. मोरे - मो : 09422776670

Path Alias

/articles/vaarasaa-paanayaacaa-bhaaga-9

Post By: Hindi
×