वारसा पाण्याचा - भाग 8


भारताला ज्या अनेक उच्च परंपरा लाभलेल्या आहेत त्यामध्ये जलसंधारणाचे, सिंचनाचे स्थान अग्रभागी आहे. अमेरिकेसारख्या बलवान व समृध्द देशानेसुध्दा सिंचन हा विषय भारताकडून शिकावा असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला अमेरिकेमध्ये सिंचनाचा विकास जेव्हा सुरू झाला तेव्हा भारतातूनच तज्ज्ञ मंडळीचा समूह मार्गदर्शनासाठी तेथे पाठविण्यात आला होता असे समजते.

भारताला ज्या अनेक उच्च परंपरा लाभलेल्या आहेत त्यामध्ये जलसंधारणाचे, सिंचनाचे स्थान अग्रभागी आहे. अमेरिकेसारख्या बलवान व समृध्द देशानेसुध्दा सिंचन हा विषय भारताकडून शिकावा असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला अमेरिकेमध्ये सिंचनाचा विकास जेव्हा सुरू झाला तेव्हा भारतातूनच तज्ज्ञ मंडळीचा समूह मार्गदर्शनासाठी तेथे पाठविण्यात आला होता असे समजते. म्यानमार, इंडोनेशीया या सारख्या असंख्य देशांना सिंचनाची देणगी दिली आहे. कौटील्याच्या अर्थशास्त्रात सिंचनाविषयीच्या नोंदी स्पष्टपणे पहायला मिळतात. त्याच्याही पूर्वी इसवीसन पूर्व 2000 वर्षांपूर्वी सिंधू नदीच्या खोऱ्यात जी सिंधू संस्कृती विकसित झाली तीमध्ये मोहंजोदारो, हरप्पा, धोलवीरा या ठिकाणी पण जलव्यवस्थापनेच्या अनेक पध्दती स्पष्टपणे दिसून आल्या आहेत.

पाणी साठविण्याच्या टाक्या, पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या, स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी (आड) हे त्याकाळी या संस्कृतीने पाण्याला हाताळण्यामध्ये जी कुशलता गाठलेली होती त्याचे निर्देशक आहेत. त्या काळातील शहरे ही उत्तम नियोजनाची - रचनेची (Well planned) होती. हरप्पा येथील शहरामध्ये सर्वसाधारण माणसांची घरे पण चांगली बांधलेली होती, की जी स्थिती नाईल नदीच्या काठावरील इजिप्शियन संस्कृतीमध्ये दिसून आली नाही. याचा अर्थ हरप्पा संस्कृती ही समृध्द होती. शहरामध्ये विशाल आकाराचे हौद बांधलेले दिसून आले. पाणी साठवून ठेवणे, त्याची जपणूक करणे, ते जमिनीत पाझरविणे, बाष्पीभवनाने कमी होवू नये याची काळजी घेणे इत्यादी गोष्टी उत्खननामध्ये सापडलेल्या अवशेषावरून दिसून आल्या. स्नानगृहे व आड ही सिंधू संस्कृतीने जगाला दिलेली देण आहे असे म्हटले जाते.

सम्राट चंद्रगुप्ताचा अमात्य आर्य चाणक्य याने इसवीसन पूर्व चवथ्या शतकात अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथात तलाव, कालवे, विहिरी, नदी व त्यावरील सिंचन, पाणीपट्टी, पीक पध्दती याबद्दल स्पष्ट अशा सूचना केलेल्या आहेत. सम्राट चंद्रगुप्ताच्या काळात देशात अनेक ठिकाणी तलावांची निर्मिती झालेली होती. गुजराथ येथील सुदर्शन तलाव याचे उत्तम उदाहरण होय. तलावाची निर्मिती करणे हे शासनकर्त्यांचे कर्तव्य आहे असे स्पष्टपणे म्हटलेले आहे. यावरून असे दिसून येते की, सुमारे 2400 वर्षांपूर्वी या देशात सिंचन व्यवस्था मोठ्या प्रमाणावर राबविली जात होती आणि त्यासाठीचे नियम व कायदे करण्याची त्या काळात गरज भासली होती. चंद्रगुप्त मौर्यांनी 25 वर्षे राज्य केले. त्यातील 12 वर्षाचा काळ हा दुष्काळाचा होता. असे असतांनाही मौर्यांचा काळ हा भरभराटीचा काळ म्हणून इतिहासामध्ये नोंदविला गेलेला आहे. ग्रीक प्रवासी मॅगेस्थेनिस लिहितो की, मौर्यांच्या काळात फार मोठ्या क्षेत्रावर दोन पिके घेतली जात होती आणि त्यामुळे दुष्काळावर मात करण्याची ताकद त्या व्यवस्थेमध्ये निर्माण झोली होती. तो म्हणतो की, राज्यात अन्नधान्याचा पुरवठा करण्यामध्ये कधीही चणचण भासली नाही.

नंतरच्या काळात सिंचन व्यवस्थेचा मोठा नमुना कावेरी नदीच्या मुखाजवळ चौल राजाने जे भक्कम कावेरी धरण बांधले तेथे पहावयास मिळतो. अजूनही त्या धरणातून जवळ जवळ 12 लक्ष एकर क्षेत्राला पाणी मिळत आहे. राजा राजेंद्र चौल हा कावेरीनंदन म्हणून प्रसिध्द होता. या बंधाऱ्याचा पाया दगडाच्या शीळा एकमेकांमध्ये गुंतवून तयार केलेला दिसतो. त्या काळात हे धरण (ज्याला Grand Anicut असे म्हणतात) वाळूवर बांधलेले आहे. दोन हजार वर्षांपासून कार्यरत असलेली सिंचनाची ही जगातील एकमेक व्यवस्था असावी. आजसुध्दा आपण त्या धरणाला भेट देवून त्याचा पाया किती भक्कम आहे याची प्रचिती घेवू शकतो. नंतरच्या राजवटीमध्ये या बंधाऱ्यामध्ये सुधारणा करण्यात आली. याच नदीवर वरच्या भागात अनेक ठिकाणी अशाच प्रकारची बांधकामे करण्यात आली आणि त्यातून तामिळनाडूला भात या पीकामध्ये आत्मनिर्भर करण्यात आले. तामिळनाडू राज्याच्या क्षेत्रफळाच्या 1/3 क्षेत्रफळ कावेरी खोऱ्याने व्यापले आहे. पण हेच 1/3 क्षेत्र (पाणी या घटकाचा वापर करून) तामिळनाडूच्या उर्वरित 2/3 अर्थव्यवस्थेला आधार देते. ह्या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बंधाऱ्यापासून निघालेले त्रिभुज प्रदेशातील कालवे, हे पावसाळ्यामध्ये नद्या म्हणून (पावसाचे पाणी वाहून घेवून जाण्याचे काम) पूरक जलवहन करतात तर पावसाळ्यानंतर याच नद्या त्रिभुज प्रदेशामध्ये पिकाला पाणी देण्याचे कालवे म्हणून काम करतात. दोन हजार वर्षांपूर्वी अभियांत्रिकी क्षेत्रात केवढी उंची गाठली होती याचे हे उत्तम उदाहरण होय.

या नंतरच्या कालखंडात म्हणजे 11, 12, 13 व्या शतकात ताम्रपर्णी नदीवर पण अशाच प्रकारचे बंधारे विकसित झाल्याचे दिसून येते. यमुना नदीवर पण भक्कम पाया नसलेल्या ठिकाणी बंधारे बांधून यमुनेच्या खोऱ्यामध्ये शेतीला पाणी देवून उत्पन्न वाढविण्याची जी व्यवस्था करण्यात आली त्या पाठीमागची प्रेरणा व अभियांत्रिकी ज्ञान हे कावेरीवरील ग्रँड अनिकट या बंधाऱ्यापासूनच घेतलेले असणार हे निश्चित. याच यमुना कालव्याचा एक फाटा दिल्ली शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी वळविण्यात आला आणि तोच कालवा शेवटी दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या खंदकामध्ये सोडण्यात आला असे समजते. यमुनेच्या कालव्याचे अवशेष दिल्लीभर विखुरल्याचे स्पष्ट होते.

कर्नाटकातील हंप्पीला भेट दिली तर रोमच्या वैभवाला सुध्दा मागे टाकणाऱ्या त्या काळच्या श्रीमंतीची प्रचिती देणाऱ्या अनेक वास्तू आपणास तेथे पहावयास मिळतात. हा रामायण काळातील वाली - सुग्रीवाचा प्रदेश असल्याचे मानले जाते. श्रीरामांनी याच भागातून श्रीलंकेकडे कूच केले असणार. हा संपूर्ण प्रदेश ग्रॅनाईट या अती कठीण अशा दगडांनी व्यापलेला आहे. आजचे तुंगभद्रा जलाशय हे विजयनगरच्या राजवटीतून तुंगभद्रा नदीवर बांधलेल्या शेकडो बंधाऱ्यांपैकी काही बंधाऱ्यांना पोटात घेवून उभे आहे. त्यातून लक्षावधी हेक्टर जमिनीला, लोकसंख्येला, अनेक उद्योग व्यवसायाला अव्याहतपणे पाणी पुरवठा होत आहे. तो भाग आज पण श्रीमंती व समृध्दीच्या अग्रभागी आहे. सहाशे वर्षांपूर्वीचे बंधारे व कालवे तुंगभद्रेच्या काठावर वापरात आहेत. या दगडधोंड्यांनी व्यापलेल्या प्रदेशात सिंचन करणे ही एक आश्चर्यकारक घटना आहे. या जुन्या कालव्यांचे त्या काळी केलेले दगडी अस्तरीकरण आजसुध्दा स्थिर आहे. हंप्पी हे राजधानीचे शहर, व त्याचा परिसर हे लाभक्षेत्राचे ठिकाण आहे. या वैभवशाली राजधानीला तुंगभद्रेवर बांधलेल्या बंधाऱ्यांच्या मालिकेतून व कमलापूर या मार्गस्थ तलावाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केल्याचा दाखला आपणास आजही पहावयास मिळतो. दोनशे ते तीनशे किलोमीटर लांबीचा पट्टा या ऐतिहासिक पाण्याच्या वारशातून अनेक खोऱ्यांमध्ये जुन्या समृध्दीची फळे चाखत आहे.

तामिळनाडूमध्ये वैगई नदीच्या खोऱ्यामध्ये जुन्या तलावाच्या सिंचनाची व्यवस्था आजही कार्यरत असलेली दिसते. काळाच्या ओघात वैगईच्या खोऱ्यात सिंचनात वाढ करण्यासाठी पेरियार या पश्चिमवाहिनी नदीचे पाणी पूर्ववाहिनी करून वैगई खोऱ्यात आणले आहे. या वैगई नदीवर स्वातंत्र्योत्तर काळात धरण बांधून कालवे काढून कालव्याद्वारे सिंचन केले आहे. या बरोबरच इतिहासकालीन तलावाखालील सिंचनाला पण बळकटी देण्यात आली आहे. अशारितीने नवीन व्यवस्थेचे जुन्या व्यवस्थेशी एकत्रिकरण करून सिंचनात वाढ केल्याचे आगळेवेगळे उदाहरण या ठिकाणी दिसते. अशी व्यवस्था ताम्रपर्णी आणि पालार यांच्या खोऱ्यामध्ये केली आहे. नवीन व्यवस्था करत असतांना जुन्या व्यवस्थेकडे जर दुर्लक्ष केले तर त्या व्यवस्था उध्वस्त होतात. हे एकूण समृध्दीच्या दृष्टीने हिताचे नाही. नेमकी हीच त्रुटी महाराष्ट्रातल्या तापी खोऱ्यातील धुळे - जळगाव भागातील फड पध्दतीच्या बंधाऱ्याच्या बाबतीत राहून गेली. संपूर्ण जगातील एक आदर्श सिंचन व्यवस्था नामशेष पावली म्हटली तर चुक ठरू नये. ज्या नद्यांवर हे फड पध्दतीचे बंधारे बांधून कालव्याद्वारे हजारो वर्षांपासून सिंचन केले जात होते, त्या व्यवस्थेला पोटात घेवून त्याचे संगोपन करण्याचा विचार केला गेला नाही. नद्यांच्या वरच्या भागात धरणे बांधत असतांना हा विचार नियोजनात ठेवून जर कृती झाली असती तर, जगाला पाण्यातील न्याय्य व्यवस्थेचे धडे देणारी ही व्यवस्था आजपण उत्कर्षाकडे प्रवास करणारी ठरली असती. आपण ते केले नाही ही रूखरूख लागून राहिली. आजसुध्दा व्यवस्थेमध्ये थोडासा बदल करून ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी ह्या फड पध्दतींच्या बंधाऱ्याला जीवदान देणे हे फलदायी ठरणार आहे.

हा देश तलावांचा आहे. देशभरामध्ये लहान मोठ्या तलावांचे जाळे विखुरलेले आहे. तलावांची मोजणी अचुकपणे झाली नाही असेच म्हणावे लागते. अशा तलावांची संख्या दहा लाखापेक्षा जास्त असावी असेही म्हटले जाते. तामिळनाडूमध्ये वेगवेगळ्या राजवटीत मोठ्या प्रमाणामध्ये तलावांची निर्मिती करण्यात आली. आंध्रप्रदेश मध्ये एक लाखाच्या वर तलाव असल्याचे समजते. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजराथ, कर्नाटक, बंगाल या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जुन्या तलावांचे जाळे पसरलेले आजपण आपणास सहजपणे दिसते. हे तलाव लोकांनी निर्माण केलेले आहेत. आणि आज सुध्दा बऱ्याच ठिकाणी या तलावांचे व्यवस्थापन लोकच करतात. मधल्या काळामध्ये ब्रिटीश राजवट या ठिकाणी आल्यानंतर या तलावांकडे दुर्लक्ष झाले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटीशांच्याच नियमांनी सिंचन व्यवस्थापन करण्याचे प्रशासनाने स्वीकारल्यामुळे शासनाने त्या तलावाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वत:कडे घेतली. अशारीतीने एक लोकप्रणित व्यवस्था ही शासनप्रणित झाली.

या तलावाच्या आधाराने मोठ्या प्रमाणामध्ये इतिहासकाळामध्ये सिंचन उदयास आले होते. जळगावजवळ हरताळा या ठिकाणी हत्याळा या रामायणाकालीन तलावात कमळाच्या पानांची शेती केली जाते. राजा दशरथाकडून श्रावण बाळाची हत्या या तलावाजवळ झाली अशी लोक मानसात भावना आहे. यामुळे या तालावाचे नाव हत्याळा असे असावे. नागपूर परिसरामध्ये मौर्यकालीन तलाव आजपण चांगल्या प्रकारे सिंचन करीत असल्याचे दिसून येते. रामटेक प्रदेश हा विड्याची पाने पिकवणारा भूभाग म्हणून प्रसिध्द होता. या तलावावर या पानांचे उत्पादन करून हा भाग समृध्दीकडे वाटचाल करीत आला. काळाच्या ओघात या भागात हे उत्पादन थांबले असल्याचे दिसते. तलावाची शृंखला आणि त्यातून किमान दोन पिके काढण्याची व्यवस्था हजारो वर्षांपासून चालत आलेली पहावयास मिळते. महाराष्ट्रात विदर्भात तलावांची शृंखला वाकाटक व गौड राजाच्या कालावधीत निर्माण झाली. वाकाटक घराण्याची राणी प्रभावती देवी ही गुप्ता घराण्याची कन्या होती.

कवी कालीदास हा संस्कृत विद्वान प्रभावती बरोबर आंदण म्हणून आलेला होता. अडचणीच्या वेळी राज्यशकट चालवून या राणीने प्रजेच्या कल्याणासाठी अनेक तलाव निर्माण केले असे इतिहासकार सांगतात. वैनगंगेच्या खोऱ्यात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व नागपूर या जिल्ह्यात सुमारे 400 वर्षांपूर्वी जवळपास पन्नास हजार तलाव कोहली या जमातीच्या लोकांनी संपूर्णत: खाजगी उपक्रमातून म्हणजेच स्वत:चा पैसा व श्रम वापरून बांधले असल्याचे समजते. या तलावाच्या खाली बावड्या (विहिरी) पण बांधल्या गेल्या. भंडारा हा जिल्हा तलावांचा जिल्हा आणि तांदळाचे भांडार म्हणून ओळखला जात होता. गौंड राजाच्या कारकीर्दीत राजाश्रय मिळाल्यामुळे तलावांचा विकास झपाट्याने झाला. या राजाने कोहली जमातीच्या लोकांना उत्तर भारतातून (बनारस) आणले. असे समजते की, चंद्रपूरचा राजा हिरेशहा यांनी तर जाहीर केले होते की, जो कोणी जंगल साफ करून शेती करेल त्याला ती जमीन बहाल केली जाईल.

जो कोणी तलाव बांधेल त्याला त्या तलावाखाली जितकी जमीन ओलित करता येईल तितकी जमीन खुदकास्तकार म्हणून बक्षिस दिली जाईल. तलावाच्या शृंखलेची निर्मिती करतांना गावच्या चारही बाजूंनी तलाव निर्माण केलेले आहेत. तलावातील पुराचे पाणी सांडव्यावरून वाहण्याची जी पातळी असते ती गावाच्या खाली राहील याची पण त्यांनी काळजी घेतल्याचे दिसते. यामुळे पुराच्या पाण्याचा धोका गावाला पोहोचत नाही. एका तलावातील पाणी दुसऱ्या तलावात व त्याचे तिसऱ्या तलावात अशी शंृखला निर्माण करून पाण्याचा पुन:पुन्हा वापर करण्याचे तंत्र अंमलात आणले आहे. भूपृष्ठावर पाण्याचे साठे निर्माण करून भात या पिकासाठी पाऊस वेळेवर न आल्यास पूरक व्यवस्था म्हणून पाणी देण्यासाठी व ऊसाचे पीक काढून गुळाचे उत्पादन करण्यासाठी हे तलाव बांधले गेले होते असे दिसते. भात व ऊसाच्या शेती बरोबरच मत्स्यपालनाची सोयही त्या तलावांच्या आश्रयाने केली गेली होती. विदर्भाचा हा भाग जास्त पाणी असलेला आहे. म्हणून पूर्वीच्या काळात या तलावावर ऊस पिकवून गूळ तयार करून विकला जात असे. ऊसाच्या नगदी पिकातून या भागाला समृध्दी मिळाली होती. काळाच्या ओघात ऊस संपला व आता फक्त भातच घेतला जातो. केवळ भात पिकवणारा भाग समृध्द होत नाही असे इतिहास सांगतो.

पाणी वाटपासाठी लाभधारकांची एक समिती असे. ही समिती तलावातील पाण्याची उपलब्धता पाहून प्रत्येकाला किती पाणी द्यावयाचे हे ठरवित असे. तलावाच्या देखभाल व दुरूस्तीची कामे या समितीमार्फत लाभधारकांच्या सहकार्यातून होत असत. समितीचा निर्णय अंमलात आणण्यासाठी पानकऱ्याची (पाटकरी) नेमणुक करण्यात येत असे. हा पानकरी भूमिहीन लोकांपैकी असे. तलावातील गाळ ज्याला गरज असेल त्याला आपल्या शेतात नेवून टाकण्याची परवानगी होती. तलाव आणि या संबंधीच्या व्यवसायावर या समितीचे लक्ष असे व ही समिती राजाला दरवर्षी पाण्याच्या उपलब्धतेनुसार सारा देत असे.

देशात जेव्हा इंग्रजांचे राज्य आले (10 वे शतक) तेव्हा या तलावाची मालगुजारी वसुली करण्याची मालकी त्या भागातील काही प्रतिष्ठित नागरिकांकडे देण्यात आली व त्याला मालगुजार असे संबोधले गेले. हे मालगुजार लाभधारकांकडून वसुल केलेल्या रकमेतून ठराविक रक्कम सरकारकडे जमा करत असत. पाण्याचे वाटप, देखरेख, दुरूस्ती, गाळ काढणे ही कामे मात्र लाभधारकच करत असत. सारा वसुली करण्याच्या सोयीसाठी म्हणून इंग्रजांच्या काळात या तलावाची मालकी मालगुजारांकडे गेली म्हणून त्यांना मालगुजारी तलाव असे संबोधण्यात येवू लागले. पण खऱ्या अर्थाने हे गौंड राजांनी निर्माण केलेले (गौंडकालीन) तलाव आहेत.

सन 1950 नंतर मात्र तत्कालीन मध्यप्रदेश सरकारच्या कायद्यान्वये मालगुजारी संपुष्टात आली आणि हे तलाव शासनाने ताब्यात घेतले. या व्यवस्थेवर शासनाचे नियंत्रण आल्यामुळे लोकांचा सहभाग कमी झाला. दुरूस्ती व देखभाल व्यवस्थेच्या अभावी काही तलाव आता नाहीसे झाल्याचे दिसते. सद्य: स्थितीत विदर्भात जवळ जवळ सात हजार तलाव अस्तित्वात असून त्यापासून सिंचनाखाली असलेले क्षेत्र जवळ जवळ सव्वा लक्ष हेक्टर आहे असे दिसून येते. लोकांचा सहभाग कमी होणे व पर्यायाने शासनावर अवलंबून राहणे यामुळे लोकसहभागातून चालू असलेली एक उत्तम व्यवस्था आता मोडकळीस आल्याचे दिसते.

अशाच तलावाचे जाळे पूर्व मराठवाड्यात (ता. बिलोली, जि. नांदेड) येथेही अस्तित्वात असल्याचे दिसते. या भागात आजसुध्दा 100 च्या वर जुने लघु तलाव कार्यान्वित आहेत. त्यांना पण व्यवहारात मालगुजारी तलाव असेच संबोधण्यात येते. यावरील सिंचन व्यवस्थापन आजपण लोकव्यवस्थेतूनच राबविले जाते. लातूर जिल्ह्याच्या पूर्व भागात (तांबाळा) दोन मालगुजारी तलाव (लाल तलाव व काळा तलाव) अनेक वर्षांपासून आजूबाजूच्या परिसराला सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देत असल्याचे आजही पाहावयास मिळते. मराठवाडा भागात गावतळी असल्याच्या खुणा बऱ्याच ठिकाणी सापडतात पण काळाच्या ओघात प्रत्यक्ष तलाव मात्र नामशेष झालेले आहेत.

सिंचनाची आणखी एक जुनी उत्तम व्यवस्था मराठवाड्यामध्ये बीड या शहराजवळ आजसुध्दा खजाना विहीरीमधून कार्यप्रवण असलेली दिसते. ही व्यवस्था मध्ययुगीन कालखंडात साधारणत: 212 हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी निर्माण करण्यात आली होती, असे समजते. बीड शहराच्या दक्षिणेकडे साधारणत: 6 - 7 कि.मी अंतरावर बिंदुसरा नदीच्या, उजव्या काठावर आणि बालाघाट या डोंगराच्या पायथ्याशी ही विहीर खोदलेली आहे. विहीरीतून बोगदे खोदून (infilteration galleries) भूजल मिळविले आहे. ही एक भूजलातून अविरतपणे प्रवाही पध्दतीने सिंचन करणारी जगातील एकमेव व्यवस्था असावी. या विहीरीचा व्यास साधारणत: 20 मीटर असून चौकोनी चिऱ्याच्या दगडांनी बांधलेली आहे. बिंदुसरा नदीच्या पात्राकडून भूगर्भात दोन अर्ध्या कि.मी लांबीचे बोगदे खोदून भूजल विहीरीत घेवून विमोचकांद्वारे मातीच्या नळामधून बिंदुसरा नदीचे पात्र जमिनीच्या पोटातून ओलांडून नदीच्या डाव्या किनाऱ्यावरील बीड शहरापर्यंतचे क्षेत्र कालव्याद्वारे सिंचनाखाली आणले आहे. अलीकडच्या काळात बीड शहराच्या वाढीमुळे या खजाना विहीरीखालील सिंचन क्षेत्र आकुंचन पावत असल्याचे दिसते.

कालव्यावरील 11 द्वारे वितरिकांच्या मदतीने सिंचन केले जात होते, असे समजते. कालव्याची - वितरिकांची देखभाल, दुरूस्ती लाभधारक स्वत:च करत असत. पाणीपट्टी कायमधारा पध्दतीप्रमाणे महसूल खात्याकडून वसूल करण्यात येत असे. या 11 द्वारांतून पाणी ठराविक काळासाठी व खालच्या भागाकडून वरच्या भागाकडे सोडले जात असे. या वितरिकांना वाराची सोमवार, मंगळवार, अशी नावे दिली होती व प्रत्येक वितरिका आठवड्यातून ठराविक दिवशी ठराविक कालावधीसाठी सिंचनासाठी राखीव होती. पुढे ही व्यवस्थाही शासनाने स्वत:च्या अखत्यारित घेतली व शेतकऱ्यांच्या सहभागातून राबविली जात असलेली एक चांगली व्यवस्था मोडकळीस आली.

पाणी साठवणूक विमोचकाद्वारे वितरिकांच्या माध्यमातून सिंचन व्यवस्था राबविण्याची जुनी उदाहरणे बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा येथे मोती तलाव व चांदणी तलाव या नावाने प्रसिध्द असलेल्या तलावाखाली पण दिसून येते. हे तलाव 17 व्या शतकात जाधव घराण्याने (लखुजीराव जाधव) बांधले असावेत. आजपण या व्यवस्थेतून सिंचनासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. या व्यवस्था सध्या शासनाने स्वत:च्या अखत्यारित घेतलेल्या आहेत. या दोन्ही तलावाच्या प्रभावाखाली सिंदखेडराजा हे गाव येते याच गावात मोठ्या बारवा, विहीरी पण आहेत. या विहीरींचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी व सिंचनासाठी पण केला जात होता असे दिसते.

अशीच समकालीन व्यवस्था जालना शहराच्या पश्चिमेकडे असलेल्या मोती तलावातून केल्याचे दिसते. या तलावाचा उपयोग जालना शहराला प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी केला जात असावा असे दिसते. पाणी वाहून नेण्यासाठी खापराच्या नलिका वापरलेल्या आहेत. या योजनांचे अस्तित्व आजसुध्दा दिसते. या तलावाचा उपयोग सिंचनासाठी पण (विहीरीच्या माध्यमातून) केला जात असावा. जालना शहराच्या वाढीमुळे या लाभक्षेत्रात आता नागरी वसाहती निर्माण झालेल्या आहेत व ही व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. साधारणत: याच काळामध्ये अहमदनगर, जुन्नर या शहरासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नळ टाकून पाणी आणून केली गेली होती. काही योजनेतून सिंचन पण केले जात होते असे आजच्या अस्तित्वावरून सहजपणे लक्षात येते.

कोकण हा अधिक पाऊस पडणारा व अति उताराचा भाग आहे. तलावाद्वारे पाणी साठविण्यासाठी तुलनेने अडचणीचा भाग आणि म्हणून कोकणामध्ये नारळ, पोफळी आणि भातशेती याला सिंचनाची सोय करण्यासाठी पूर्वी पाटसिंचन ही पध्दत राबविली जात होती. अशाच प्रकारे सिंचन राबवून आजसुध्दा रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या क्षेत्रावर नारळ, पोफळी, कोकम यासारखी मूल्यदायी पिके घेण्यात येतात. अशा झऱ्यांवरील शेतीचा उपयोग शेतकऱ्यांना अजूनही अनेक ठिकाणी होत आहे. रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात झऱ्यांचे पाणी पाटाच्या पाण्यात रूपांतरीत करून 1 ते 2 कि.मी पर्यंत वाहत नेवून सिंचनासाठी उपयोगात आणण्याचा उपक्रम प्राचीन काळापासून केला जात असावा. कोकण भागात वाहणाऱ्या नदी नाल्यावर लोक कच्चे बंधारे बांधतात व पाणी पाटाने वळवून रब्बी हंगामात दुबार पीक घेतात. असे शेकडो बंधारे आजसुध्दा अनेक नदी नाल्यावर दरवर्षी बांधून सिंचन करण्याची परंपरा टिकवून ठेवण्यात आली आहे. या प्रकारे सिंचन लोक प्रेरणेतून लोकांच्या सहभागातून होते. शासन नावाची व्यवस्था या ठिकाणी अस्तित्वात नाही व त्याची गरज पण या लोकांना वाटत नाही. काही ठिकाणी मनुष्य बळाचा वापर करून पाणी उचलले जाते व उंचीवरील जमिनीचे सिंचन केले जाते.

डोंगर कपारीतून पाझरणारे झरे हे येथील पाण्याचे मुख्य स्त्रोत होत. हे पाझरून येणारे पाणी योग्य अशा उंचीवर दगडाचे बांध घालून अडविण्यात येवून बांधाच्या खालच्या भागातून समतल रेषेने पाट काढून वेगवेगळ्या पिकांसाठी खेळविले जात असे. या झऱ्यांचा मुख्य आधार म्हणजे या भागात असणारा सच्छिद्र असा लॅटॅरिटिक खडक, कोकण खोऱ्यात जो जास्त पाऊस पडतो तो या सच्छिद्र खडाकाच्याद्वारे जमिनीत भरून त्याचे भूजलात रूपांतर होते व पाटाच्या द्वारे सिंचनासाठी ते पूरक ठरते. या अति उतारावरून वाहणाऱ्या पाटातून तिथल्या भूजलाएवढाच माफक जलप्रवाह यातून वाहत असावा असे सध्याच्या व्यवस्थेच्या असलेल्या अवशेषावरून दिसून येते. या सर्व व्यवस्था शेतकरी स्वत: सहकारी तत्वावर राबवित असत. पाण्याच्या पाळ्या शेतकरी एकमेकाच्या सल्ल्याने ठरवित असत.

महाराष्ट्र व देशाच्या इतर डोंगरी भागात शेतकरी स्वत:च सामुहिक पध्दतीने एकत्र येवून अनेक ठिकाणी झऱ्यावरील सिंचन करीत असत. हिमालयीन प्रदेशात (उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश) तर आजही मोठ्या प्रमाणात बारमाही अशा प्रकारचे सिंचन केले जाते. राजगडच्या पायथ्याशी गुंजवणे गावात अशीच एक व्यवस्था आजही कार्यरत असल्याचे दिसते. झऱ्यावरील वळवणीचा कालवा गुंजवणे गावातून जातो. या कालव्यावर 100 हेक्टर पर्यंत दुबार पीक काढले जाते. सपाट प्रदेशात पण सरदारवाडी ता. निलंगा या गावी अगदी अलीकडच्या काळापर्यंत झऱ्यावर सिंचन करून साधारणत: 10 हेक्टर शेतीवर दुबार पिक घेतले जात असे. अशी उदाहरणे अगणित होती. भूजलाचा अति उपसा इत्यादी मुळे यात पुढे चालून घट झाली. सोलापूर, हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र व कर्नाटक या सरहद्दीवर अमृतकुंड (चंडिकापूर) नावाचे ठिकाण आहे. या ठिकाणी पाण्याच्या झऱ्यावर एक कुंड (बारव) तयार केलेली आहे. बाजूला जुने यादव कालीन मंदीर आहे. लोक स्नान करतात व पुण्य लागलं म्हणून भक्तीभावाने परत जातात. पण ही एक झऱ्यावरील सिंचनाची व्यवस्था आहे. या कुंडातून कालवा काढण्यात आला आहे. या कालव्यावर हजारो वर्षांपासून ऊस पिकविला जातो. पाणी अमृता सारख म्हणून अमृत कुंड असे म्हणतात. अशाच झऱ्यावरील सिंचनाच्या व्यवस्था आपणास बिदर या ठिकाणी (नानक - झीरा) पहावयास मिळतात. अशी उदाहरणे अगणित होती. भूजलाचा अती उपसा इ. मुळे यात पुढे चालून घट झाली.

उत्तर कोकणात ठाणे या भागात शेकडो तलाव असल्याचे उल्लेख मिळतात. या जिल्ह्यातील शहापूर या एकाच तालुक्यात अनेक तलाव होते असे समजते. काळाच्या ओघात हे छोटे, मोठे तलाव आता उपेक्षित होवून उध्वस्त झालेले दिसतात.

तद्नंतर ब्रिटीशांच्या प्रारंभीच्या काळामध्ये छोटे तलाव व वळण बंधारे यांचा प्रारंभी उपयोग करून नाल्यातील व नदीतील वाहत्या पाण्याचा व पावसाचा उपयोग करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्या काळातील काही सिंचनाच्या व्यवस्थेचे बंधारे आजपण उपयोगात होते. स्वातंत्र्यानंतरच्या नव्या प्रकल्पांमध्ये नंतर त्यांचे रूपांतर करण्यात आले. असे प्रकल्प कृष्णा नदीवरील खोडसी व सातारा जिल्ह्यातील कृष्णा कालवे, धुळे जिल्ह्यातील शहादा कालवे, अहमदनगर जिल्ह्यातील लाख कालवे, गिरणा नदीवरील जळगाव जिल्ह्यातील जामदा कालवे हे होत. पुण्याजवळच्या मुठा नदीवरील खडकवासला कालवा हा ब्रिटीशांच्या प्रारंभीच्या काळातलाच. ब्रिटीशांनी निर्मिलेल्या सिंचनाच्या कामात मात्र प्रथमपासूनच लोक सहभागाला स्थान नव्हते. ती शासनप्रवण व्यवस्था होती.

विसाव्या शतकाच्या सुरूवातीला लोकांचा राजा छत्रपती शाहू महाराज यांनी भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधले व त्यामागील जलाशयाचे पाणी नदीमध्ये सोडून नदीवरील बंधाऱ्यांच्या शृंखलेतून नदीकाठी लाभक्षेत्र विस्तारण्याचा यशस्वी प्रयत्न केला. धरणातून सोडावयाच्या पाण्यावर वीज निर्मिती करण्याची तरतूद ठेवण्यात आली. विजेच्या अनुपलब्धतेमुळे बंधाऱ्यांनी अडवलेले पाणी मुख्यत: मोटेद्वारे उचलून पंचगंगा नदीच्या दोन्ही काठावर सिंचनाचा विकास घडवून आणला गेला. मोटेच्या द्वारे पाणी उचलण्याची प्रथा ही सामुदायिकरित्या लोकांच्या सहकार्यातून राबविली जात होती व त्या सामुहिक सिंचन पध्दतीलाही फड पध्दत असेच म्हटले आहे. अधिक उंचीवर पाणी नेण्यासाठी ओळीने पंप लावण्याची जी व्यवस्था दिसते तशीच व्यवस्था ओळीने मोटेने पाणी उचलून जास्त अंतरावर आणि उंचीवर सामुहिकरित्या घेवून जावून आपापसांत पाणी वाटप करून सहकार्यातून सिंचन केले जात होते. आजचे त्या भागातील सहकारी चळवळीचे यश हे शाहू महाराजांच्या त्या काळात रूजविलेल्या लोकसहभागातून विकसित झालेले आहे.

मराठवाड्यामध्ये परिस्थिती 'जैसे थे' अशी होती. प्रजेमध्ये जागृती निर्माण न होवू देणे व इंग्रजांना हस्तक्षेप करण्याची संधी न मिळू देणे असे निजामचे धोरण होते. त्यामुळे येथे पण मालगुजारी तलाव निर्माण झाले असले तरी या मालगुजारी तलावावर आधारित सिंचनाचा विकास मात्र होवू शकला नाही. मराठवाड्यात कृषी मध्ये तसेच सिंचनामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झाला नसल्याने विकास क्षेत्रात मराठवाडा मागेच राहिला.

वरील सर्व विवेचनावरून असे लक्षात येते की, खानदेशातील फड पध्दती, विदर्भातील मालगुजारी तलाव, मराठवाड्यातील नांदेड या भागातील जुने मालगुजारी तलाव व खजाना विहीर व बारव विहीरींचे जाळे, दक्षिण कोकणातील झऱ्यावरील सिंचन व उत्तर कोकणातील तळी व पंचगंगा खोऱ्यातील बंधाऱ्यावरून उपसा सिंचन अशी सिंचनाची लोकसहभागाची प्रदीर्घ परंपरा ब्रिटीश काळातील शासन नियंत्रित कार्यपध्दतीपेक्षा अगदी वेगळी अशी महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी प्राचीन काळापासून रूजलेली आहे. निसर्गाच्या दोलायमानतेवर उपाय शोधण्यासाठी व लहरीपणावर मात करण्यासाठी पृष्ठभागावर तलावांची मालिका निर्माण करून पाण्याची साठवणूक करणे आणि त्या साठविलेल्या पाण्याचा उपयोग उर्वरित काळामध्ये सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी करण्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी प्राचीन काळापासून आपणास पहावयास मिळतात. तलावात पाणी साठवून व विहीरींद्वारे भूजल उपसून त्यावर दुबार व बारमाही पिके घेवून समृध्दीकडे जाण्याची प्रक्रिया हजारो वर्षांपासून या भूमीत रूजलेली आहे. सिंचित शेती महाराष्ट्राला नवीन नाही. याचे बीज हजारो वर्षांपूर्वी कौटिल्याच्या काळाच्या पाठीमागेही सापडते. विज्ञान व तंत्रज्ञानाबरोबर अलीकडच्या काळातील आता यांचेच आधुनिक विकसित झालेले रूप म्हणजे मोठे जलाशय, त्या पासून कालवे आणि वितरिकांचे जाळे, पंपाने उंचावर पाणी उचलणे, इत्यादी पध्दती होत.

प्रदीर्घ आणि प्राचीन सिंचन परंपरेचा हा असा धावता आढावा आहे. तपशीलवार माहिती संकलनाच्या अभावी त्या त्या काळातील सिंचन रचनेची वैशिष्ट्ये, पीक रचनेचे नियम, महसुल वसुली पध्दती, व्यवस्थापकीय रचना बाबतचे सर्व बारकावे नीट उपलब्ध नाहीत. परंतु एक प्रदीर्घ परंपरा हा यामधील एक महत्वाचा धागा आहे. आणि त्यातून खूप शिकण्यासारखे आहे.

देशभरातील या प्राचीन व ऐतिहासिक प्रदीर्घ अनुभवांचे सिंहावलोकन केले तर असे दिसते की, विविध भागांमध्ये पीकांमध्ये व सिंचनाच्या पाणी पुरवठ्याच्या रचनांमध्ये निसर्गानुकूल अशी विविधता स्थानिक भौगोलिक आणि हवामानाच्या परिस्थितीनुरूप समाविष्ट झाली होती. पाणी वितरणाच्या पध्दतीसुध्दा पिकाप्रमाणे, हवामानाप्रमाणे, आणि पाणी पुरवठ्याच्या रचनेप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. सर्वांमध्ये समान दिसणारी गोष्ट म्हणजे स्थानिक राजांकडून सिंचनाच्या विकासाला प्रोत्साहन व साहाय्य दिले जात होते. तरी पण सिंचन व्यवस्थेच्या दैनंदिन व्यवस्थापन कामात मात्र त्यांची ढवळाढवळ नव्हती. देखभाल व व्यवस्थापन पध्दती ही पूर्णत: लोकांच्या हाती होती.

ब्रिटीशांच्या काळात सिंचनाच्या प्राकृतिक रचनेत आधुनिक तंत्रज्ञान आले, सिंचन प्रकल्पांचे आकार मान वाढले. त्याचबरोबर त्यामध्ये शासन प्रवणता आली. पारतंत्राच्या काळात केल्या गेलेल्या कायद्यांचा दुष्प्रभाव सर्व व्यवस्थेवर आजपर्यंत टिकून राहिला आहे. नवीन प्रागतिक कायद्याला प्रतिसाद फारच कमी मिळतो आहे. 200 वर्षांच्या ब्रिटीशांच्या अंमलबजावणीच्या काळात रूजलेली प्रथा मोडून काढण्यासाठी अनेक पिढ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. आता कोठे सुरूवात होत आहे. लोकप्रवणेतच युग येण्यास वेळ लागणार आहे. हेच यातून दिसून येते.

डॉ. दि. मा. मोरे - मो : 09422776670

Path Alias

/articles/vaarasaa-paanayaacaa-bhaaga-8

Post By: Hindi
×