वारसा पाण्याचा - भाग 5


ऐतिहासिक जलव्यवस्थापनाच्या ज्या पार्थिव व्यवस्था राज्यात व देशात अस्तित्वात आहेत पण माहितीत नाहीत त्या स्थळांना प्रत्यक्ष भेटी देवून त्या व्यवस्थांचे रेखाचित्र - चित्र काढून स्थानिक जुन्या लोकांना बोलतं करून त्यातील कौशल्य शोधण्याचा प्रयत्न करणे क्रमप्राप्त ठरते. वर्तमान पत्रातील पाण्याला स्पर्श करणारे लेखन पण उपयोगी पडले. यातून लोक आपल्याशी बोलतात.

या ऐतिहासिक जलव्यवस्थापनातील लोक कौशल्याची मांडणी करण्यासाठी व त्या पाठीमागे तत्वज्ञान (Wisdom) शोधण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी व त्याचे विश्लेषण करण्यासाठी खालील साधनांचा उपयोग करण्यात आला आहे.

1. अशा व्यवस्था सांप्रत ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी देणे
2. अशा साधनांचे रेखाचित्रात रूपांतरण करणे
3. अशा व्यवस्थांचे छायाचित्रिकरण करणे
4. या व्यवस्थांमधील लोककौशल्याचा मागोवा घेणे
5. स्थानिक लोक, जाणकार, इतिहासकार यांच्याशी चर्चा करणे, संपर्क करणे
6. वर्तमानपत्रातील माहिती, इतिहाससंबंधीचे लेख, त्यातील पाण्यासंबंधीचे उल्लेख इत्यादींचा संदर्भ घेणे

मागील काळात वेगवेगळ्या प्रयोजनासाठी पाण्याचा वापर झालेला आहे. त्या व्यवस्थापनेला अभियांत्रिकी, समाजिक, आर्थिक, न्याय्यिक कौशल्याची जोड मिळालेली आहे. विकासाच्या घटनाची नोंद नाही, संदर्भ नाहीत, तुरळक शिलालेखाच्या स्वरूपात काही छिकाणची माहिती मिळते. भेटी देवून या व्यवस्थेचे जे पार्थिव सांगाडे पाहता आले, चित्रबध्द करता आले त्याचाच संदर्भ म्हणून उपयोग केलेला आहे. इतिहास लेखनामध्ये आणि इतरत्र पाण्यासंदर्भात जे उल्लेख येतील त्याचा पण आवश्यक तितका आधार घेतला आहे. इतिहासतज्ज्ञ, अभियंते इतर जाणकार यांच्याशी व्याख्यानाच्या, परिसंवादाच्या, चर्चासत्राच्या, लेखाच्या माध्यमातून संवाद साधता आला त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेता आल्या. त्याचा पण संदर्भ म्हणून उपयोग झाला. अलिकडे वर्तमानपत्रातपण इतिहासावर लेखन वाचावयास मिळते. त्याचा पण वापर करता आला.

कालखंड ठरविण्यासाठी इतिहासाचा आधार लागणार आहे. पण असा कालखंड निश्चित करण्यासाठी अभ्यास करणे हे उद्दिष्ट्य नाही. हे करत असताना राज घराण्याचा व्यक्तीसदृष्य, व्यक्तिसापेक्ष कर्तृत्व याचा अभिनिवेश आणणे टाळले आहे. या व्यवस्था निर्माण करण्यात त्या त्या कालखंडातील राजकीय व्यवस्थांमागील प्रेरणा, त्यांचा आधार, आर्थिक साहाय्य हे निश्चितपरणे कारणीभूत राहिले आहे. दानाची प्रेरणा हे भारतीय संस्कृतीचे मूळ आहे. समाजासाठी केलेले इष्टापूर्ती कार्य हे सत्कृत्य असते. सध्याच्या राजकीय व्यवस्थेत याला पायाभूत सोय असे म्हटले जाते. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण इत्यादी साठीच्या सुविधा या सर्व समाजाच्या समृध्दीसाठीच्या पायाभूत सोयी आहेत. त्या त्या कालखंडातील कल्याणकारी राज्यव्यवस्थेला समाजाची धारणा, समाजाचे हित, समाजाची बांधणी करावयाची असते, समाजाला पुढे घेवून जावयाचे असते, लोककल्याण करावयाचे असते, समृध्दीला स्थैर्य द्यावयाचे असते. त्यांना या अशा इष्टापूर्ती कार्याचा अंगिकार करणे अपरिहार्य असते. पाणी हा समृध्दीचा आधार, पण त्याच्या उपलब्धतेतील अनिश्चितता, कुठे पूर तर कुठे दुष्काळ या चक्रामुळे बदललेल्या समाजाचे जीवन आणि यावर मात करून समृध्दीकडे वाटचाल, यातील गमक (Wisdom) जाणून घेणे हा मुख्य हेतू आहे.

ऐतिहासिक जलव्यवस्थापनाच्या ज्या पार्थिव व्यवस्था राज्यात व देशात अस्तित्वात आहेत पण माहितीत नाहीत त्या स्थळांना प्रत्यक्ष भेटी देवून त्या व्यवस्थांचे रेखाचित्र - चित्र काढून स्थानिक जुन्या लोकांना बोलतं करून त्यातील कौशल्य शोधण्याचा प्रयत्न करणे क्रमप्राप्त ठरते. वर्तमान पत्रातील पाण्याला स्पर्श करणारे लेखन पण उपयोगी पडले. यातून लोक आपल्याशी बोलतात. अशा कात्रणांच्या संचयाचा संवादासाठी उपयोग झाला. शासकीय काम करीत असतांना थोडासा वेळ बाजूला काढून राज्यातील आणि देशातील जवळ जवळ पाचशे एक स्थळांना भेटी दिलेल्या आहेत. या भेटीतून हजार पेक्षा जास्त पार्थिव सांगाड्यांची वास्तूची (Devices) माहिती पुढे आली. या सर्व माहितीचे संकलन चित्राच्या, टिप्पणाच्या स्वरूपात संकलित करण्याचा प्रयत्न झालेला आहे. काही भेटी बाहेरच्या देशांना नॉर्वे, इंग्लंड, फ्रांस, हॉलंड, जर्मनी, इटाली, इजिप्त ला पण देता आल्या. ही संधी पण पाण्याचा इतिहास याच विषयावर संशोधनपर प्रबंध सादर करून मिळाली. तेथील पाणी, इतिहास, संस्कृती व एकूण जीवन याचे पण ओझरते अवलोकन करता आले.

या भेटीतून, चित्रातून व लोकसंवादातून जो ऐतिहासिक ठेवा मिळत होता त्याचे वेगवगेळ्या जसे अभियांत्रिकी, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, इत्यादी अंगाने विश्लेषण करता आले आणि त्यातून या देशाच्या जलव्यवस्थापनातील वैभवशाली परंपरेचा / कौशल्याचा पाठपुरावा करता आला. हा सर्व अभ्यास शास्त्र, अभियंते, इतिहासकार, सामजचिंतक, संशोधक इतर जाणकार व्यक्ती आणि लोक यांच्यापुढे मांडून त्यांच्यातील निष्कर्षांबद्दल खात्री करून घेण्यासाठी या काळात लेख लिहिणे, व्याख्याने देणे, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध सादर करणे यांचा पण अवलंब करण्यात आला. या सर्व प्रक्रियेतून संप्रेषित झालेले जलव्यवस्थापनातील लोककौेशल्य जनमानसापर्यंत वरील माध्यमातून पोहोचविण्याचा अल्पसा प्रयत्न पण करण्यात आला. या उपक्रमाचा गोषवारा -

1. लेख 100, 2. व्याख्याने - 100, 3. भेट दिलेली स्थळे - 500, 4. शोधलेल्या वास्तू - 1000, 5. रेखाचित्रे / चित्र - 5000, 6. कात्रणे - 100000 असा आहे.

वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या संस्कृतीत, वेगवेगळ्या विचारात रूजलेल्या गटाशी संवाद साधून विचार घट्ट करण्याची गरज भासते. समाजातील या वेगवेगळ्या गटामध्ये ग्रामीण लोक, शहरी लोक, तरूण वर्ग, प्रौढ वर्ग, शिकलेले न शिकलेले, महिला, पुरूष, गरीब, श्रीमंत, शेतकरी, मजूर, कामगार, विद्यालय, महाविद्यालय, विद्यापीठ येथील जाणकार वर्ग, विविध शासकीय संस्था, सेवाभावी संस्था, अशासकीय संस्था, यातील तज्ज्ञांचा समावेश होतो. ढोबळमानाने या गटांची विभागणी - 1. समाज, 2. संस्था, 3. शासन या मध्ये होवू शकते. व्याख्यानाच्या, लेखनाच्या, चर्चेच्या, परिसंवादाच्या माध्यमातून या गटाशी विचाराची देवाण घेवाण करून निष्कर्ष निश्चित करता आले. अभ्यासातून सखोल व नवीन ज्ञान प्राप्त करणे एवढाच मर्यादित हेतू न ठेवता या नवीन ज्ञानाला समाजामध्ये कसे घेवून जाता येईल हा पण विचार महत्वाचा ठरतो.

नवीन माहिती, नवीन ज्ञान हे येणाऐया काळात प्रत्येक व्यक्तीचे, संस्थेचे, समाजाचे व राष्ट्राचे शक्तीस्थान, बलस्थान ठरणार आहे. म्हणून हे ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचले हे पण पाहिले पाहिजे. पाणी हा समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्तींचा जिव्हाळ्याचा विषय रहाणार आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर या पार्थीव सांगाड्यात जे ज्ञान, शहाणपण दडलेले आहे ते काढून त्याची मांडणी करून, समाजापर्यंत पोहोचविण्याठी त्याला शब्दबध्द करण्याची गरज आहे. आणि याच हेतूने या प्रकारचा अभ्यास हातात घेण्याची गरज दिसून आली. या शोधून काढलेल्या आणि शब्द रूपात मांडलेल्या शहाणपणाला समाजातील वेगवेगळ्या गटांपर्यंत परिणामकारकपणे कसे घेवून जाता येईल हा अभ्यासासाठी एक वेगळा विषय ठरणार आहे.

इतिहासकाळात पाणी या विषयाचे संप्रेषण व्यापक प्रमाणावर होत असावे, असे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम इत्यादी महान विभूतिंच्या काही अभंगांवरून दृष्टी फिरवतांना दिसून येते. अलीकडे याचा पूर्णपणे अभाव जाणवतो. संप्रेषणाची वेगवगेळी माध्यमे जसे किर्तन, परिसंवाद, चर्चासत्रे, कृतिसत्र, व्याख्यान, सहली, रेडीओ, दूरदर्शन, आकाशवाणी इत्यादी आहेत. यातील नेमके कोणते माध्यम परिणामकराक ठरणार आहे, याचे उत्तर सखोल अभ्यासाअंतीच काढणे संयुक्तिक रहाणार आहे. जे ज्ञान, शहाणपण समाजापर्यंत पोहचवावयाचे आहे, ते शोधून काढणे, त्यांचे संकलन करणे, समाज घारणेसाठी त्यातील कोणता भाग उपयुक्त राहणार आहे हे पण महत्वाचे उद्दिष्ट्य आहे. ज्ञानप्रसार हे ज्ञान निर्मितीपेक्षा वेगळे आहे आणि म्हणून तो भाग प्रस्तुतच्या अभ्यासात आणलेला नाही.

महाराष्ट्राचे वर्णन दगडाच्या देशा राकट देशा म्हणून केले जाते. क्षेत्रफळाने 307.60 हजार चौरस किलोमीटर इतका मोठा आहे. आकाराने देशामध्ये महाराष्ट्र दुसऐया क्रमांकावर आहे. लोकसंख्या 11 कोटीच्या वर आहे. राज्यामध्ये 35 जिल्हे (भारतात 604 जिल्हे) आहेत. राज्यात तालुक्यांची संख्या 354 आहे. सुमारे 42000 खेडी आहेत. देशपातळीवर खेड्यांची संख्या 6 लाखाच्या वर जाते. प्राकृतिकदृष्ट्या महाराष्ट्राचे चार विभाग पडतात.

1. पश्चिमेकडील कोकण पट्टी, 2. सह्याद्री पर्वत / पश्चिम घाट, 3. दख्खनचे पठार, 4. उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगा. सातपुडा वगळता अजिंठ्यांचे डोंगर, सातमाळा डोंगर, हरिश्चंद्र डोंगर, बालाघाट डोंगर, महादेव डोंगर हे सह्याद्रिच्या रांगांमध्ये मोडतात.

महाराष्ट्रात पाच प्रमुख नद्यांची खोरी आहेत. नर्मदा, तापी, गोदावरी, कृष्णा व कोकण नदीसमूह. उत्तरेस सातपुडा पर्वत रांगा पूर्व पश्चिम पसरलेली आहे. नर्मदा नदी महाराष्ट्राच्या उत्तर सीमेजवळून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. नर्मदेला लागूनच तापी नदीचे खोरे आहे. तापी खोरे पण पश्चिमवाहिनी आहे. याच्या उत्तरेला सातपुडा पर्वत व दक्षिणेला अजिंठा डोंगर रांगा आहेत. गिरणा, पांझरा, मौसम, पूर्णा इत्यादी या तापीच्या प्रमुख उपनद्या आहेत. गोदावरी महाराष्ट्रातील सर्वात मोठा नदी आहे, आणि ती पूर्ववाहिनी आहे. या खोऐयाच्या उत्तरेला सातमाळा व अजिंठा डोंगर तर दक्षिणेला बालाघाट डोंगर आहे. ही नदी सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाटातून उगम पावते. प्रवरा, सिंधफणा, मन्याड, पूर्णा व मांजरा या गोदावरीच्या उपनद्या आहेत. गोदावरी नदीलाच विदर्भातील सातपुडा पर्वतातून उगम पावणारी वैनगंगा नदी मिळते. पैनगंगा, वर्धा या वैनगंगेच्या उपनद्या आहेत. पैनगंगा वर्धा नदीला मिळते, वर्धा वैनगंगेस मिळते, व या नंतर वैनगंगेस प्राणहिता म्हणतात. प्राणहिता पुढे शिरोंचा टेकडीजवळ गोदावरीला मिळते.

महाराष्ट्राच्या दक्षिणकडील भागात कृष्णा नदीचे खोरे आहे. कोयना, वारणा, पंचगंगा, ह्या कृष्णेच्या प्रमुख उपनद्या आहेत. भीमा ही कृष्णेला डावीकडून मिळणारी मोठी उपनदी आहे. भीमेचे खोरे दक्षिणेकडून महादेव डोंगर व उत्तरेकडून बालाघाट डोंगर यांच्या दरम्यान पसरलेले आहे. इंद्रायणी, मुळा, मुठा, घोड, नीरा, सीना या भीमेच्या उपनद्या आहेत.

कोकण किनारपट्टीच्या अरूंदपणामुळे कोकणात वाहणाऐया नद्यांची लांबी कमी आहे. नदीच्या मुखातून भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी नदीत शिरते. तेथपर्यंतच्या नदीच्या भागास खाडी म्हणतात. कोकणात पश्चिम वाहिनी अनेक नद्या आहेत. त्या सह्याद्रीच्या कड्यावरून वेगाने वाहत येवून समुद्राला मिळतात. वैतरणा, उल्हास, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री, तिल्लारी इत्यादी प्रमुख नद्या कोकणातून वाहतात.

महाराष्ट्रात मार्च ते जून ह्या महिन्यात जास्त उष्णता जाणवते. या उलट ऑक्टोबर ते फेब्रुवारी या दरम्यान तापमान कमी आढळते. जून ते सप्टेंबर हा पावसाळ्याचा कालावधी आहे. कोकणचे हवामान समुद्र सान्निध्यामुळे उष्ण व दमट आहे. पठारावरील हवेत बाष्पाचे प्रमाण कमी असल्याने हवामान कोरडे असते.

अरबी समुद्रावरून पाऊस घेवून येणारे वारे सह्याद्री पर्वतामुळे अडवले जातात. म्हणून हे ढग उंच जातात व अधिक थंड होतात व पाऊस जास्त पडतो. या पावसाला मोसमी पाऊस म्हणतात. कोकणात सुमारे 300 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो. पठारावर काही भागात 50 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो. बंगालच्या उपसागरात बाष्पयुक्त वारे उत्तरेकडे वाहतांना नैऋत्य मान्सून वाऐयांशी टक्कर झाल्यामुळे राज्याच्या पूर्वेकडच्या भागात म्हणजेच विदर्भात अधिकचा पाऊस पडतो. गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यात सुमारे 150 सेंटीमीटर पाऊस मिळतो. राज्याचा जवळ जवळ 85 ते 90 टक्के भूभाग या अग्निजन्य खडकाचा बनला आहे.

या खडकाच्या वरच्या कुजलेल्या भागात आणि खडाकातील रंध्रे व भेगा यामध्येच भूजलसाठा उपलब्ध होतो. सातपुड्याच्या पायथ्याला गाळाचा प्रदेश आहे. हा भाग पाणी मुरवून घेण्यास जास्त अनुकूल आहे. राज्याचा उर्वरित भाग भूजलाच्यादृष्टीने प्रतिकूलच म्हणण्यास हरकत नाही. राज्यामध्ये पाऊस अनियमित पडतो. कोठे, कधी व किती पडेल याबद्दल निश्चित असे भाकीत मांडता येत नाही. उंच, सखल, दगड, धोंडे, टेकड्या, डोंगर या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांचे जाळे पसरलेले आहे. एकूण नद्यांची संख्या 400 पेक्षा जास्त आहे. कोकणातील नद्यांची लांबी 50 ते 100 कि.मी पर्यंत आहे. उत्तर सीमेवरील नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी सुमारे 55 कि.मी आहे. तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी सुमारे 200 कि.मी आहे. गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी सुमारे 1000 कि.मी आहे. तर कृष्णा व भीमेची अनुक्रमे सुमारे 300 व 450 कि.मी आहे. सह्याद्री पर्वताला लागून पूर्वेकडे असलेला प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जाते.

सध्याचा भारत आकाराच्या मानाने जगात 7 व्या क्रमांकावर आहे. जगात दुसऐया क्रमांकाने याची लोकसंख्या आहे. हा देश पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात येतो. इतिहासकालीन आकार व व्याप्ती आतापेक्षा बरीच मोठी होती.

भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत, पूर्वेस उपसागर, पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस हिंदी महासागर आहेत. भारताचे क्षेत्रफळ 3297.03 हजार चौ. कि.मी आहे. पूर्व पश्चिम अंतर सुमारे 3000 कि.मी तर उत्तर दक्षिण अंतर 3200 कि.मी आहे. देशाला सुमारे 7500 कि.मी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. सध्या भारतात 28 घटक राज्ये व 7 केंद्रशासित प्रदेश आहेत.

भारताचे खालील प्राकृतिक विभाग पडतात.
1. उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश
2. उत्तरेकडील मैदानी प्रदेश
3. भारतीय पठारी प्रदेश
4. किनाऐयावरील मैदानी प्रदेश

हिमालय पर्वतामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे अडवले जातात व त्यापासून भारताचे संरक्षण होते. दक्षिणेकडून वाहाणारे वारे पण हिमालयामुळे अडवले जातात व त्यामुळे त्या भागात खूप पाऊस पडतो. हिमालयाची सरासरी उंची 6000 मी. आहे. या पर्वताचा उंच भाग नेहमी हिमाच्छादित असतो म्हणून त्याला हिमालय म्हणतात.

हिमालय पर्वताच्या दक्षिणेस व भारतीय पठाराच्या उत्तरेस गंगा व सिंधू नद्यांचे मैदान आहे. या मैदानाची लांबी 2400 कि.मी व रूंदी सुमारे 300 कि.मी आहे. सिंधू, गंगा व ब्रम्हपुत्रा या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे हा प्रदेश सुपीक व सपाट बनला आहे.

उत्तरेकडील मैदानी प्रदेशाच्या दक्षिण भागात भारतीय पठार हा प्रदेश पसरलेला आहे. या पठाराच्या वायव्येस अरवली पर्वत, दक्षिणेस निलगिरी पर्वत, पूर्वेस पूर्व घाट व पश्चिमेस पश्चिम घाट आहेत. नर्मदा नदीच्या दक्षिणभागाला दख्खनचे पठार म्हणतात. या पठाराच्या उत्तरेला सातपुडा पर्वत आहे. सातपुड्याच्या उत्तरेकडे विंध्य पर्वत आहे तर सातपुड्याच्या दक्षिणेकडे सातमाळा, अजिंठा हे डोंगर आहेत.

पूर्वेस पूर्व घाट व बंगालचा उपसागर या दरम्यान व पश्चिमेस पश्चिम घाट व अरबी समुद्र या दरम्यान किनारी प्रदेश पसरला आहे.

या देशात नद्यांचे फार मोठे जाळे आहे, हिमालयातून उगम पावणाऐया नद्या या बारमाही नद्या आहेत तर पठारी प्रदेशातून आलेल्या नद्या या हंगामी नद्या आहेत. नद्यांच्या प्रवाहाच्या वाहिनी दिशेनुसार चिनाब, रावी, बियास, सतलज, लुनी, साबरमती, मही या दक्षिणवाहिनी नद्या आहेत. नर्मदा, तापी या पश्चिववाहिनी नद्या, चंबळ, बेटवा, केन, शोन या उत्तरवाहिनी नद्या आणि गंगा, यमुना, गोमती, घागरी, गंडक, कोसी, ब्रम्हपुत्रा, दामोदर, सुवर्णरेखा, ब्राम्हणी, महानदी, वैनगंगा, वर्धा, पैनगंगा, गोदावरी, भीमा, कृष्णा, तुंगभद्रा, पेनार, पालार, कावेरी, वैगई, ताम्रपर्णी या पूर्वनाहिनी नद्या आहेत.

भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे. म्हणून भारताचा बुहतेक भाग उष्ण कटिबंधात मोडतो. भारताचे तापमान साधारणपणे जास्त आहे. हिमालयाच्या उत्तरेकडून येणारे थंड वारे, त्याच्या दक्षिणेकडून येणारे उष्णवारे हिमालयामुळे अडवले जातात त्यामुळे हिमालायाच्या दक्षिण भागात तापमान अधिक असते. विंध्य, सातपुडा, सह्याद्री इत्यादी उंच पर्वतावर तापमान कमी असते. उंच पर्वतामुळे बाष्पयुक्त वारे अडवले जातात. त्यामुळे पाऊस पडण्यास मदत होते. हिमालयात सर्वात कमी तापमान तर तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या पूर्व भागात सर्वात जास्त तापमान असते.

भारतात उन्हाळ्यात जून ते सप्टेंबर या काळात नैऋत्येकडून ईशान्येकडे (सागरातून जमिनीकडे) वारे वाहतात आणि हिवाळ्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात ईशान्येकडून नैऋत्येकडे (जमिनीकडून समुद्राकडे) वारे वाहतात. नैऋत्य मान्सून वारे सागरावरून वाहत येत असल्याने त्यात भरपूर बाष्प असते. या बाष्पयुक्त वाऐयापासून भारतातील बहुतेक भागात पाऊस पडतो. ईशान्य मान्सून वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहत असल्यामुळे त्यात बाष्प कमी असते म्हणून जास्त पाऊस पडत नाही पण बंगालच्या उपसागराकडून जे वारे येतात ते बाष्प युक्त असतात त्यामुळे पूर्व किनारी प्रदेशात पाऊस पडतो.

मान्सून वाऐयांपासून पडणारा पाऊस अनियमित असतो.मान्सून सुरू होण्याचा व संपण्याचा काळही अनिश्चित असतो. दरवर्षी एकूण पर्जन्यमानात पण फरक पडतो. कधी कधी पाऊस सलगपणे खूप प्रमाणात पडतो व माहपूर येतात तर एखाद्या भागात कमी पाऊस पडून टंचाईची परिस्थिती निर्माण होते. पावसाळ्याचा काळ चारच महिने असल्यामुळे व पावसाचे प्रमाण अनिश्चित असल्यामुळे पावसावर अवलंबून असणारी शेती व उद्योगधंदे अडचणीत येतात.

भारतात खाऐया व गोड्या पाण्याची सरोवरे आहेत. ओरिसात चिल्का, राजस्थानात सांबार, आंध्र मध्ये पुलीकत. कोलेरू व महाराष्ट्रात लोणार ही खाऐया पाण्याचे सरोवरे आहेत. जम्मू काश्मीरमध्ये दल व वुलर ही गोड्या पाण्याची सरोवरे आहेत. भारतात शेती व पशुपालन हा इतिहासकालापासून प्रमुख व्यवसाय आहे. मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय भूजलावर अवलंबून आहे. पृष्ठभागावर लाखो लहान मोठे जलसाठे निर्माण करून शेतीला शाश्वती देण्याचा प्रयत्न हजारो वर्षांपासून राबविला जात आहे. भारतात जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. या पावसाच्या पाण्यावर जी पीके घेतली जातात त्यांना खरीप पिके म्हणतात. पावसाळा संपला तरी जमिनीत काही प्रमाणात ओलावा असतो. त्यावर काही पिके घेतली जातात त्यांना रब्बी पिके म्हणली जातात. सिंचनाच्या सोयीनुसार ऊस, फळे, भाजीपाला यासारखी पिके घेतली जातात. त्यांना बागायती पिके म्हणतात. गहू व तांदूळ ही प्रमुख अन्नाची पिके आहेत.

भारतात खेड्यांची संख्या जास्त आहे. त्यामानाने शहरांची संख्या कमी आहे. मोठ्या शहरांची वाढ नदी काठावर पाण्याच्या जवळ झाली आहे. श्रीनगर, जम्मू, अमृतसर, चंदीगड, मेरठ, दिल्ली, जयपूर, अजमेर, जोधपूर, उदयपूर, आग्रा, लखनौ, अलाहाबाद, वाराणसी, पाटणा, रांची, कलकत्ता, भुवनेश्वर, भोपाळ, इटारसी, जबलपूर, इंदौर, बडोदा, सुरत, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, नांदेड, मुंबई, पुणे, विशाखापट्णम, हैद्राबाद, विजयवाडा, बेळगांव, हुबळी, चेन्नई, बंगलोर, म्हैसूर, तुरूअनंतपुरम, कानपूर इत्यादी काही महत्वाची शहरे आहेत.

भारतात सर्वाधिक पाऊस आसाम व पश्चिम किनारपट्टीवर पडतो. राजस्थानच्या पश्चिम भागात व काश्मीरच्या उत्तर भागात सर्वात कमी (50 से.मी पेक्षा कमी) पाऊस पडतो. राजस्थान वरून वाहणारे कमजोर मोसमी वारे व त्यांना अडवण्यासाठी त्या प्रदेशात पर्वत नसणे ही कमी पावसाची कारणे आहेत. काश्मीर मधील उत्तर भागात मोसमी वारे पोहचेपर्यंत त्यातील बाष्प कमी झालेले असते. त्यामुळे कमी पाऊस पडतो. आसामांत पूर्व पश्चिम अशा खासी, गारो सारख्या टेकड्या, पर्वत मोसमी वारे अडवतात म्हणून पाऊस जास्त पडतो. या ठिकाणच्या चेरापुंजी येथे वार्षिक 1500 सें.मी पेक्षा अधिक पाऊस पडतो. भारतात पश्चिम किनारी प्रदेश, पश्चिम घाट, आसाम, मेघालय, त्रिपूरा, मणिपूर या भागात जास्त पाऊस पडतो. बिहार, उत्तरांचल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पूर्व महाराष्ट्र, ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगाल या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो. पंजाब, पूर्व राजस्थान, गुजराथ, मध्य महाराष्ट्र, पूर्व कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू हे कमी पावसाचे प्रदेश आहेत. जम्मू कश्मीर, पश्चिम राजस्थान, उत्तर गुजराथ हे अतिशय कमी पावसाचे प्रदेश आहेत. गहू या पिकास थंड व कोरडे हवामान लागते तर तांदूळ या पिकास दमट व उष्ण हवामान व भरपूर पाऊस लागतो.

वरील विवेचनावरून हे स्पष्ट होते की भारताचा व महाराष्ट्राचा प्रदेश भिन्न भौगोलिक भागात विभागलेला आहे. पडणारा पाऊस पण फारच लहरी आहे. त्यातील दोलायमानता अतिरेकी आहे. तो वर्षातील काही दिवसच पडतो. राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात तो फक्त दहाच दिवस तोंड दाखवतो.

भूपृष्ठीय रचना पण फार भिन्न आहे. गंगेचे व सिंधूचे सपाट खोरे पाणी मुरवून घेण्यास अनुकूल आहे. या प्रमाणेच महाराष्ट्रातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला भाग, तापीखोऐयाचा गाळाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पण भूजलाची उपलब्धता जास्त राहू शकते. भूस्तर पाणी मुरवून घेण्यास अनुकूल आहे. उर्वरित भाग पठाराचा, खडकाचा असल्यामुळे जमिनीमध्ये पाणी मुरवून घेण्यास अनुकूल नाही. भूजल मर्यादित प्रमाणात उपलब्ध करणारा आहे.

हा सर्व भाग उष्ण कटिबंधात मोडतो. तापमान जास्त आहे, बाष्पीभवन पण जास्त आहे, आर्द्रता कमी आहे. जलव्यवस्थापनासाठी या बाबी प्रतिकूल आहेत. अशा भिन्न भूगोल, भूपृष्ठीय स्थिती असलेल्या खंडप्राय देशामध्ये इतिहास काळात त्या त्या भागाला अनुकूल राहतील अशा असंख्य साधनांची निर्मिती करून तो समाज त्या काळात पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला होता असेच दिसून येते. पाया कमजोर असतांनासुध्दा अभियांत्रिकी कौशल्याचा वापर करून भक्कम साधनांची त्यांनी निर्मिती केली. सर्वत्र एकच सूत्र, एकाच प्रकारची साधने, असे त्यांना करता आले नाही. ते शक्य पण नव्हते.

राज्यात कोकण प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त आहे. पण तो कमी कालावधीच पडतो. मान्सून नंतर नद्यांचे वाहणे बंद होते. या वरून हेच दिसून येते की, कोकणासारख्या जास्त पाऊस पडणाऐया प्रदेशात पण साधारणत: डिसेंबर नंतर नद्यांचे वाहणे बंद होते. दर हेक्टरी पाण्याच्या उपलब्धतेनुसार राज्याच्या विविध उपखोऐयांचे वर्गीकरण पाहता प्रदेशनिहाय विषमतेचा अंदाज येतो. निसर्गात प्रदेशा प्रदेशामध्ये जमिनीचा प्रकार, पावसाचे प्रमाण, बाष्पीभवन, हवामान इत्यादी मध्ये टोकाची विषमता आहे. या विषमतेवर मानवी प्रयत्नातून मात करण्यासाठी वाटचाल करण्याची गरज आहे. इतिहास काळात त्या दृष्टीने प्रवास झालेला आहे असे दिसून येते. अतिशय विरळ पावसाच्या प्रदेशात (पैठण, देवगिरी, वेरूळ इ.) चौदाशे ते पंधराशे वर्षाच्या कालखंडात वेगवेगळ्या राजवटीनी त्यांच्या राज्यांची मुख्यालये त्या ठिकाणी वसवून त्या त्या काळात समाजाला व देशाला समृध्दी मिळविण्यात यश मिळवले आहे.

महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशामध्ये मुबलक पाऊस पडतो त्याला अनुसरून तिथली पाणी हाताळण्याची व्यवस्था, त्या हवामानाशी सुसंगत असणाऐया पीक रचनेसाठी त्यांनी बसवलेली दिसते. मराठवाड्यातील औरंगाबाद, देवगिरी, बीड, परळीवैजनाथ, अंबाजोगाई, जालना, लातूर, परांडा, अंबड आणि पश्चिम महाराष्ट्रातील करमाळा, मंगळवेढा, सोलापूर, अक्कलकोट इ. जो भाग अवर्षणप्रवण आहे, खडकाचा आहे, शुष्क वातावरणाचा आहे, उष्ण आहे त्या ठिकाणच्या पाणी हाताळण्याच्या व्यवस्था या वेगळ्याच आहेत. तापीच्या खोऐयात सह्याद्रीच्या पायथ्याशी पाणी प्रचंड प्रमाणात मुरवून घेणारा गाळाचा प्रदेश विस्तीर्णपणे पसरलेला आहे.

तर त्यालाच लागून शेजारच्या पूर्णा या खाऐया पाण्याच्या खोऐयात वेगळीच परिस्थिती आहे. ऊर्जा निर्मिती आणि त्यावर आधारित औद्योगिक प्रगती या क्षेत्रातील ऐतिहासिक काळातील उणीवेमुळे पाणी उचलण्याच्या प्रक्रियेला मर्यादा होत्या. पण त्यावरसुध्दा मात करून ऐहिक सुखाची प्राप्ती करून घेण्याचे कौशल्य आपणास भीमा खोऐयातील बेगमपूर, कृष्णा खोऐयातील वाई इत्यादी ठिकाणी अवलोकनास व अभ्यास करण्यास उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या बाहेर थोडे पाऊल टाकल्यास फत्तेपूर शिक्री, आग्रा, दिल्ली या ठिकाणच्या पाणी हातळण्याच्या व्यवस्था या वेगळ्या दिसतात. गडावरील किल्ले जसे देवगिरी, अंकाई - टंकाई, अशीरगड, प्रतापगड, रायगड, सज्जनगड इत्यादी ठिकाणी उंचावर गडावर टाके खोदून, तळी बांधून किल्ल्यावर पाणी साठवण्याच्या विविध पध्दती आपणास दिसून येतात. पाणी साठवण्यासाठी जे टाके खोदत त्यांना आधारासाठी खांबही कोरलेले (पेमगिरी, अंकाई इ.) आपणास दिसतात.

गडावर अगोदर पाणी पाहून मग किल्ला बांधावा, त्यासाठी खडक फोडून तळी, टाके तयार करावेत, बारमाही पाणी पुरेल अशी व्यवस्था मजबूतपणे निर्माण करून पाण्याचे जतन होईल हे पहावे, निसर्गातील पाणी अडवून ते पाणी साठवण्याची व्यवस्था निर्माण करावी इ. तंत्र डोंगरमाथ्यावर उंच ठिकाणी निर्माण केलेल्या कलाकृतीतून पहावयास सापडते. कोकणामध्ये पाझरणाऐया खडकातून निर्माण होणाऐया प-ह्या वरील सिंचन तर औरंगाबाद, बुऐहाणपूर, तीसगाव, अचलपूर इ. ठिकाणी पाण्याचे संरक्षण व त्याची स्वच्छता राखण्यासाठी भूमिगत कालव्याचा वापर अशी अनेक वेगवगेळी उदाहरणे वेगवेगळ्या प्रदेशाला अनुरूप अशी इतिहासातील कौशल्य दाखवण्यासाठी आज पण उभी आहेत.

वर उल्लेख केल्याप्रमाणे या अभ्यासासाठी संदर्भ ग्रंथाची उणीव आहे. आणि त्यामुळे ठोस लिखित पुरावे देणे यावर फार मर्यादा आहेत. जाणकारांकडून, इतिहासकारांकडून, विद्वानांकडून वा अभियंत्यांकडून या व्यवस्थेला शब्दरूपात स्पष्ट करून समाजापुढे आणण्याचा प्रयत्न झालेला नाही. फार मोठा काळ हा भाग पारतंत्र्यात राहिला. त्यामुळे बऐयाचशा व्यवस्थेचे उध्वस्तीकरण पण झाले आहे. सर्वच व्यवस्थांचे मुळापासून ते शेवटपर्यंत व्यवस्थित रूप आपल्याला दिसेलच असे नाही. त्यामुळे त्याच्या चित्रिकरणास, त्याच्या आराखड्यास पण मर्यादा आहेत. ज्ञान एका पिढीपासून दुसऐया पिढीकडे असे वाहत येत असते पण त्यासाठी जो काही लिखित आधार लागतो त्याची वाण असल्यामुळे लोकांशी चर्चा करूनसुध्दा त्यातून नेमके सत्यच बाहेर येईल असे समजण्याला देखील मर्यादा आहेत. प्रत्यक्ष भेटी, माहितीचे संकलन, त्याचे चित्रिकरण, त्याची अभियंत्रिकी उकल त्यातून पुढे येणारे कौशल्य आणि त्याला पुढे समाजापर्यंत घेवून जाणे या मर्यादेत हा अभ्यास आहे.

देशात आणि महाराष्ट्रात ऐतिसाहिक जलव्यवस्थापन साधनांचे पार्थिव सांगाडे अगणित आहेत. लाखो तलाव, लाखो विहीरी, हजारो बारवा, शेकडो किल्ले, अगणित गावतळी, शेतचाऐया, बंधारे, भूमिगत नहरी, कालवे, नलिका याचा यात समावेश होतो. या सर्व व्यवस्थेची प्रदेशवार सूची उपलब्ध नाही. त्यांच्या नोंदी पण नाहीत. कोणत्या भागात किती तलाव आहेत, कोणत्या गावात किती आड आहेत, याची माहिती नाही. अशा नोंदी अभावी या वास्तू विस्मरणात जातात. अज्ञानातून वा अन्य कारणाने अनेक ठिकाणी या वास्तूंची मोडतोड झालेली दिसते. समाजाला, शासनाला वा इतर जाणकार संस्थांना याचे महत्व वाटले नाही.

अनेक ठिकाणी अशा वास्तूचा उपयोग चुकीच्या पध्दतीने केलेला दिसून येईल. किल्ल्याभोवतीचे खंदक अनेक ठिकाणी नामशेष झालेले दिसतात. विहीर, आड बुजविले गेले आहेत, बंधारे तोडून टाकण्यात आले आहेत, काळ हा पुढे सरकत आहे, आणि आपल्या बरोबर या व्यवस्थेला क्षीण करीत चाललेला आहे. इतिहास लेखनात पण या व्यवस्थेला क्वचित उल्लेख आहे. अशा उल्लेखाची सुची जरी केली तरी त्याचीसुध्दा संख्या अफाट होणार आहे.

प्रस्तुतच्या मांडणीत फक्त त्याच वास्तूंना स्पर्श करण्यात आला आहे की ज्याला मी स्वत: भेट दिलेली आहे, त्याचे छायाचित्रण केलेले आहे, त्याचे रेखाचित्र काढले आहे. ज्या वास्तू, पार्थिव सांगाडे, साधने, पाहिली नाहीत त्याबद्दल भाष्य करण्याचे टाळलेले आहे. केवळ संदर्भासाठी म्हणून काही न पाहिलेल्या साधनाचा पण उल्लेख झालेला आहे. पण अशांची संख्या अल्प आहे. या सर्व प्रवासामध्ये हजारोपेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे पार्थिव सांगाडे जवळ जावून पाहता आले, त्या वास्तूशी बोलता आले. ज्या साधनांना भेट देता आली तो एक योगायोगाचा भाग असे म्हणावयास हरकत नाही. या परिघाच्या बाहेर, ज्याला मी भेट देवू शकलो नाही अशाची संख्या लाखो मध्ये आहे. त्यापैकी अनेक कार्यरत पण असतील. त्यांना प्रत्यक्षात पाहिले नसल्यामुळे त्याचे वर्णन देता आले नाही. ऐकीव माहितीवर लिहिण्याचा मोह टाळलेला आहे. संदर्भ साहित्यामध्ये सुध्दा जे उल्लेख दृष्टीस आले त्याचा पण परामर्ष घेण्याचा मोह टाळलेला आहे.

थोडक्यात, मी असे स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की, जे पाहिले आहे, जे डोळ्याला दिसले आहे तेच मोजक्या शब्दात व आवश्यक त्या स्वरूपात मांडलेले आहे. त्याच्या पलिकडे गेलेलो नाही. जे मांडलेले आहे त्याच्या कितीतरी पटीने बाहेर आणखी अभ्यासण्यासारखे उपलब्ध आहे.

डॉ. दि. मा. मोरे - मो : 09422776670

Path Alias

/articles/vaarasaa-paanayaacaa-bhaaga-5

Post By: Hindi
×