माझा जन्म खेड्यातला, आजूबाजूचा परिसर पण खेड्याचा. पर्जन्य- आधारित शेतीवर उदरनिर्वाह करणारा समाज. यातून आपोआपच पाणी, माती, वनस्पती. प्राणी याबद्दल जवळीक निर्माण झाली. शेताच्या जवळच्या लहानशा ओढ्यातून जे पाणी वाहत असे त्यावर मातीचे लहानसे बांध घालून अडविलेले पाणी घायपाताच्या पानाचे पन्हाळे करून वळविणे व त्यातून नदी वळविल्याचा आनंद घेणे हा लहानपणीचा (1955 - 1965) माझा आवडीचा खेळ होता.
माझा जन्म खेड्यातला, आजूबाजूचा परिसर पण खेड्याचा. पर्जन्य- आधारित शेतीवर उदरनिर्वाह करणारा समाज. यातून आपोआपच पाणी, माती, वनस्पती. प्राणी याबद्दल जवळीक निर्माण झाली. शेताच्या जवळच्या लहानशा ओढ्यातून जे पाणी वाहत असे त्यावर मातीचे लहानसे बांध घालून अडविलेले पाणी घायपाताच्या पानाचे पन्हाळे करून वळविणे व त्यातून नदी वळविल्याचा आनंद घेणे हा लहानपणीचा (1955 - 1965) माझा आवडीचा खेळ होता. भूजलाचा उपसा कमी असल्याने नाल्यांना, ओढ्यांना साधारणत: डिसेंबर अखेतपर्यंत पाणी वाहत असे. सकाळी बांध घालायचा आणि संध्याकाळपर्यंत तो तुटत असे. वेगाने वाहणारे पाणी पाहणे हा देखील या खेळाचा एक भाग होता.गाव चारशे लोकवस्तीचेच (सरदारवाडी ता. निलंगा, जि. लातूर, मराठवाडा) व साधारणत: 150 वर्षांपूर्वी वसलेले आहे. गाव उंचावर आणि त्याला लगतच एक ओढा आहे. या ओढ्यावर व त्या ओढ्याला येवून मिळणाऐया झऐयावर कच्चे बंधारे घालून पाणी वळवून लहानशा पाटाद्वारे दुबार पीक रब्बी हंगामात घेण्याची परंपरा होती. अशा बागायती जमिनीचे क्षेत्र एकूण गावाच्या जमिनीच्या 1 ते 2 टक्के असेल. इतर सर्व जमीन (800 ते 900 एकर) जिरायती होती. शिवारात सिंचनाची विहीर नव्हती. पिण्याच्या पाण्यासाठी तुरळक ठिकाणी लहान उघड्या न बांधलेल्या विहीरी होत्या. गावात पिण्याच्या पाण्याची 1/2 कि.मी अंतरावर एकच विहीरी होती. ती पण उघडी न बांधलेली होती.
तिचा आकार 20 फूट व्यास व 30 फू़ट खोलीचा - तळाकडे निमुळता होत गेलेला. घागरीने पुरूष, महिला पाणी आणत असत. विहीरीत उतरावे लागत असे. उतरणे थोडे अवघडच. पावसाळ्यात पाय घसरत असे. गावात दगड - धोंडे खूप होते. जमिनीच्या खाली चार एक फुटावर कठीण खडक लागत असे. विहीरीत उतरण्यासाठी खडकात पायऐया केलेल्या होत्या. साहजिकच जपून उतरावे लागे. पण कधीही कोणालाही अपघात झाला नाही. मी पण अनेक वेळा पाणी आणत असे. महिला व पुरूष घागरीने पाणी आणत असत. डोक्यावर वा खांद्यावर एकच घागर असे. महाराष्ट्रात इतरत्र मात्र फक्त महिलाच पाणी वाहतात. ते पण एकावर एक तीन घागरी (ठेवून) असे दृश्य दिसून येते.
शिवारातील आणि गावातील विहीरीला गुंडवा हा स्थानिक शब्द होता. गुंड म्हणजे घागर. यावरून गुंडवा हा शब्द आला असावा. या गुंडव्या जवळून एक झरा वाहत असे. त्यामुळे गुंडव्याच पुनर्भरण होत असे. साधारणत: 1970 पर्यंत पूर्ण गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी या इतिहासकालीन गुंडव्याची व्यवस्था होती. सर्व जाती धर्माचे लोक याच गुंडव्यातून पाणी नेत असत. काही लोक गुंडव्यातून स्वत: पाणी भरत नसत. सवर्णातील व्यक्ती गुंडव्यातून पाणी काढून त्यांना देत असत. दरवर्षी उन्हाळ्याच्या शेवटी गुंडव्यातील पाणी तळाला जात असे. टंचाई निर्माण होत असे. गावकरी एकत्र जमा होत असत. प्रत्येक घरातून एक माणूस या प्रमाणे दुसऐया दिवशी सकाळी गुंडव्यातील गाळ काढून झरे मोकळे करण्याच्या कामाला सुरूवात होत असे. कुदळ, खोरे, टोपले, पहार यांच्या मदतीने साधारणत: दुपारी दोन वाजेपर्यंत गुंडवा स्वच्छ होत असे. या नंतर पाऊस पडेपर्यंत पाणी पुरत असे.
हीच व्यवस्था साधारणत: 1970 पर्यंत चालू होती. 1972 ला दुष्काळ पडला, तद्नंतर शासकीय मदत - निधी, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळू लागली. गुंडव्याचे रूपांतर आडात झाले, त्याला कप्पी आली. आजूबाजूला शेतीसाठी भूजलाचा उपसा वाढू लागला. 1972 नंतर ठराविक कालखंडाने दुष्काळाची पण झळ लागू लागली. भूजल खोल जावू लागले, गुंडवा संस्कृती लयाला जावू लागली. मग गावामध्ये विंधन विहीर व हातपंप आला. एक बंद पडला, दुसरा आला, तिसरा आला. यातील एकावर पुन्हा 1990 च्या दरम्यान पंप बसविण्यात आले. पाणी नळाने पुरवठा करण्याचा प्रयत्न झाला. 1970 ते 1990 चा काळ लोकप्रवणतेकडून शासन प्रवणतेकडे झुकत गेला. मधल्या काळात मोटारीची दुरूस्ती गावाला पेलवली नाही, जमली नाही. वीजेचा अनियमितपणा पण अडचणीचा ठरला. गुंडव्याचा वापर नसल्यामुळे तो बंद पडला. या सर्वांच्या मिश्रणातून 100 - 125 वर्षांपासून चालत आलेली स्वत:च्या पायावर उभी ठाकलेली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोडकळीस आली.
भूजलाचा उपसा करण्यास भूस्तर अनुकूल नसल्याने शिवारातील भूजलाची पातळी तितकीशी खाली गेली नाही आणि पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत गाव तसे अडचणीतच आले नाही. काळाच्या ओघात कच्चे बंधारे बांधून पाणी अडवून दुबार पीक घेण्याची व्यवस्था पण मोडून गेली. झऐयावरील सिंचनाचाच हा प्रकार होता. पण तो अस्तास गेला. गावाच्या जवळच्या ओढ्यावर, एक लघुसिंचन तलाव झाला. त्या तलावावर मोटारी टाकून पाईपलाईन द्वारे दूरवर पाणी घेवून जावून ऊस पिकविण्याचा लोकांनी प्रयत्न सुरू केला. हा 50 वर्षात घडत गेलेला बदल मी दूरून पाहत होतो. मी अंतर्मुख होत होतो. आपण कोठे जात आहोत हे मात्र समजत नव्हते. इथेच कोठेतरी मी प्रस्तूतच्या विषयात गुंतत होतो.
1996 ते 2000 हा कालावधी महाराष्ट्र जलसिंचन आयोगात घालविण्याची मला संधी मिळाली. आयोगाच्या अहवालांचे लेखन करत असतांना चर्चेमध्ये डॉ. माधवराव चितळे हे इतिहासकालीन पाणी व्यवस्थेबद्दल थोडे थोडे बोलत असत. त्यांचे ज्ञान अथांग आहे. त्यांना पाणी तर समजतेच पण त्याच्याही पुढे जावून इतिहासकालीन खाचखळगे, समाजधारणेसाठी, समाजबांधणीसाठी, समृध्दीसाठी पाण्याची गरज, पाण्याचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण इत्यादी. बद्दल अतिशय सूत्रबध्द पध्दतीने ते कधीकधी मांडणी करीत असत. जास्त बोलत नसत कारण त्यांना माहीत असावे की त्यांचे बोलणे समजून घेण्याची उंची समोरच्यात नसावी.
पण मी मात्र नकळत इतिहास आणि पाणी यांच्या एकत्रित विचाराकडे ओढला जात होतो. इतिहासाची थोडी आवड होती. या शिवाय देशाच्या इतिहासातील प्रदीर्घ वाटचालीची माहिती करून घेण्याची उत्सुकता पण होती. इतिहासातील काही चांगल्या राजवटीबद्दल माझे मन नेहमीच अभिमानाने भरून येते. पण मधल्या काळात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतांना इतिहास हा फार दूर निघून गेलेला विषय ठरला. प्रचलित शिक्षणपध्दती नुसार अभियांत्रिकी, आरोग्य शास्त्र, वास्तुशास्त्र अशा व्यावसायिक क्षेत्रातील शिक्षण घेणाऐया मंडळींना इतिहास, भूगोल, साहित्य, काव्य, इत्यादींचे ज्ञान असण्याची गरज नव्हती. मला मात्र याची उणीव जाणवत असे.
महाराष्ट्र सिंचन आयोगाच्या अहवालात महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनेच्या इतिहासाबद्दल पण मांडणी करावयाची होती. या अनुषंगाने औरंगाबाद येथे स्थायीक झालेले आणि नुकतेच विद्यापीठातून निवृत्त झालेले डॉ. मोरवंचीकर, यांची आम्ही (1997) ओळख करून घेतली. त्यांना आयोगात पाणी आणि इतिहास या विषयी विचार मांडण्यासाठी, लेखन करण्यासाठी आमंत्रित केले गेले. त्यांच्या रूपाने इतिहास जगलेला एक माणूस मिळाला. त्यांचा वास्तुशास्त्राचा व जलसंस्कृतीचा अभ्यास समोरच्या माणसाची तहान भूक हरवितो. अशा तऐहेने दोन ज्ञानी, अनुभवी आणि सामाजिक जाणीव असलेल्या व्यक्तीमत्वाचे सतत सानिध्य लाभू लागले. इतिहास समजून घेण्याची भूक भागू लागली. पाण्याला बरोबर घेतले की, इतिहास उलगडत जातो याची मला प्रकर्षाने जाणीव होवू लागली.
यातूनच माझ्या पाणी आणि इतिहास या विषयाच्या आवडीने वेग घेतला आणि पुढे मग या विषयाचा पाठपुरावा करण्याचा मला छंद लागला. दर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तुला भेट देणे आणि त्या वास्तुतील जलविषयक साधनांचा शोध घेणे, त्यातील अभियांत्रिकी समजून घेणे, त्यातील सामाजिक, आर्थिक आणि न्यायिक व्यवस्थेचा उलगडा करीत हा प्रवास पुढे जावू लागला. शासकीय सेवेत असल्यामुळे अनेक ठिकाणी कामानिमित्त जावे लागत असे. त्यावेळी थोडा वेळ त्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूला भेट देण्यासाठी बाजूला काढून ठेवत असे. विषयाची गोडी वाढ गेली आणि हा विषय माझा होवून गेला. या आवडीला या दोन विभूती, डॉ. माधवराव चितळे आणि डॉ. रा. श्री. मोरवंचीकर हे कारणीभूत आहेत. जे पाहिले ते या दोघांच्या उपस्थितीत मी अनेक ठिकाणी व्याख्यानाच्या स्वरूपात मांडले, माझा आत्मविश्वास वाढला, या देशाचा जलव्यवस्थापनातील उज्वल इतिहास अतिशय स्पष्ट शब्दात बोलण्याचे सार्मथ्य या दोन व्यक्तींमुळे मला मिळाले. गेल्या दहा पंधरा वर्षात शंभरपेक्षा जास्त व्याख्याने देण्याची संधी मिळाली, यातील तीन परदेशात (नॉर्वे, इजिप्त, जपान) दिली गेली.
दोन ते अडीच हजार वर्षांपासून निर्माण झालेल्या या व्यवस्था खूप काही सांगू लागल्या, बोलू लागल्या, माझ्याशी संवाद करू लागल्या. माझे कुतूहल वाढू लागले आणि मग सहज वाटू लागले की, या निर्मितीमागे कोण होते ? प्रचलित व्यवस्थेप्रमाणे त्या काळी शिक्षण देवून अभियंते, कुशल कारागीर निर्माण केले जात नव्हते. मग या कारागिरांचा शोध घेण्याची ऊर्मी निर्माण झाली आणि त्यांची फलश्रुती म्हणजे हा अभ्यास असे म्हणावयास हरकत नाही.
आपल्या देशातील जलसंस्कृतीत शतकानुशतके मुरलेले हे कौशल्य पुन्हा एकदा समाजापुढे उलगडणे आवश्यक वाटले. आपल्या क्षेत्रांमध्ये प्राविण्य प्रस्थापित केले होते. याचा मागोवा घेत घेत जेव्हा भारतभर प्रवास केला त्यावेळेस मात्र भारतासारख्या खंडप्राय देशातील जलव्यवस्थापनेत (उदा. राजस्थानातील जोहड पध्दती, महाराष्ट्रातील फड पध्दती, तथा मध्ययुगीन राजधान्यांना होणारा पाणी पुरवठा, दक्षिणेच्या राज्यातील विखुरलेले असंख्य तलाव वगैरे) अशा प्रकारचे लोककौशल्य भिन्न ऐतिहासिक काळामध्ये सामुहिक लोकशक्तीतून निर्माण झाल्याचे जाणवले.
भारतात दहा लाखाच्या वर तलाव अस्तित्वात असावेत. एका गावाला किमान एक तरी तलाव हे निश्चितच. गावे तलावाभोवती वाढली तर शहरे नदी व मोठ्या तलावाभोवती वाढली. नदीचे अस्तित्व तलाव निर्मितीच्या आड आले नाही. कारण नदी ही हंगामी आहे तर तलाव हे बारमाही व्यवस्थेचे जनक आहेत. लाखो तलाव एका व्यक्तीच्या, राज्याच्या किंवा साम्राज्याच्या नावे निर्माण झाले नसून लोक सहभागातून निर्माण झालेले होते हे पण दिसून आले. जलव्यवस्थापनातील लोककौशल्य या विषयामध्ये इतिहास, भूगोल, संस्कृती, अभियांत्रिकी, जलगतीशास्त्र, जलविज्ञान, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र आदी सर्व विषयांचा समावेश होतो.
त्यामुळे हे समजण्यासाठी या सर्वांचा एकत्रित विचार करून अभ्यास करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा अभ्यास अन्यत्र होत नसल्याने या विषयाला अल्पसा आपल्या परीने न्याय देण्याचा विचार मनामध्ये घर करू लागला. शासनाने नेमलेल्या महाराष्ट्र जल व सिंचन आयोगामध्ये, सचिव पदावर काम करत असतांना, सहज मनात आले की, आपणच पाण्याचा इतिहास व पाण्याची संस्कृती याचे ओझरते दर्शन (जसे पाहिले तसे) शब्दबध्द करून समाजासाठी घडवून आणावे.
हा देश विशाल आहे म्हणून देशाच्या संस्कृतीचे स्वरूप बहुआयामी आहे. त्यामध्ये अनेक वंश, भाषा, संस्कृती, रूढी, खाद्यपदार्थ, वस्त्रे, चालीरिती इत्यादी देशाच्या भिन्न भौगोलिक घटकांमध्ये शतकानुशतके जपलेल्या आहेत. आपले अस्तित्व टिकविण्यासाठी या समाजाने फार मोठे योगदान दिले आहे. जलसंवर्धन व व्यवस्थापन हे संस्कृतीच्या विकासाचे पायाभूत घटक आहेत. या पायाभूत घटकाचे संवर्धन करून ऐतिहासिक कालखंडामध्ये आपल्या देशाने या क्षेत्रात विशिष्ट सांस्कृतिक उंची गाठली होती. त्यामुळे सर्व जगाचे लक्ष भारतीय संस्कृतीकडे असल्याचे नवल वाटावयास नको.
ही उन्नत अवस्था अनेक शतके कायम राहिल्याने आपण आत्मकेंद्रित झालो व उर्वरित जगात काय स्थित्यंतरे झालेली आहेत, याचा विचार करण्याची आपली मानसिकता समाप्त झाली. युरोपात फ्रेंच राज्यक्रांती, रशियन क्रांती, औद्योगिक क्रांती, खुल्या व्यापार प्रणालीचा उदय आदि क्रांतीकारक घटना होवून गेल्या. तथापि त्याकडे आपण जाणिवपूर्वक डोळेझाक केली. त्यामुळे इंग्रज भारतात कधी आले, त्यांनी भारतीय राजघराण्यांचा पराभव कधी केला आणि संस्कृती संवर्धनाच्या सर्व क्षेत्रात स्वत:चा एकाधिकार कसा प्रस्थापित केला हे आपल्या लक्षात आले नाही.
काळाची चाहूल घेवून पाऊले टाकण्याची आपली क्षमता क्षीण झाली. त्यांच्या औद्योगिक क्रांतीला लागणारे पूरक घटक (कच्चा माल) भारतात कसे निर्माण होतील याकडे त्यांनी प्राधान्याने लक्ष दिले. कालौघात त्यांनी भारतीय संस्कृतीने अनेक क्षेत्रात निर्माण केलेले उच्चांक मोडीत काढले. याचा दुष्परिणाम आमच्या जलव्यवस्थापनावर पण झाला. हळूहळू समाजाच्या व राज्याच्या मालकीचे तलाव व जलस्त्रोत त्यांनी आपल्या मालकीचे करून घेतले. त्यामुळे पाणी वापरण्याच्या हक्काला आपल्याला पूर्णविराम द्यावा लागला. कळत नकळत त्यांनी नवी औद्योगिक केंद्रे निर्माण केली.
नव्या बाजारपेठा निर्माण केल्या आणि आमच्या ग्रामीण संस्कृतीचे रूपांतरण हळूहळू नागरी संस्कृतीत व्हायला सुरूवात झाली. आमचे जलस्त्रोताशी असणारे आपले सांस्कृतिक, धार्मिक व भावनिक संबंध संपुष्टात आले आणि पाणी शासनाच्या अखत्यारित गेले. पाण्याशी असलेली सामाजिक बांधीलकी संपली, तिथेच आमचे पारंपारिक तलाव संपले. जलसंस्कृती दुबळी झाली. नळ संस्कृतीचे आगमन झाले. जलपूजनाची संकल्पना नकळत मोडीत निघाली. आमचा आणि मूलभूत जलस्त्रोतांचा विशेषत: नदीचा संबंध संपला. नदीच्या पाण्याकडे व्यापारी दृष्टीतोनातून पाहिले जावू लागले. त्यामुळे ग्रामीण संस्कृतीकडे दुर्लक्ष झाले. पाण्याचे राजकारण व राजकारणासाठी पाणी अशी व्यवस्था निर्माण झाली. परिणामी या व्यवस्थेचे उध्वस्तीकरण गतीने होवू लागले.
1850 ते 1950 या कालखंडात पर्जन्यमानाची दोलायमानता अधिक जाणवली. अवर्षणाचे प्रमाण अधिक झाले. त्यामुळे पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढत गेली. वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे औद्योगिकरण, नागरीकरण, पाश्चिमात्य जीवन प्रणालीचे अनुकरण, पाण्याचा गैरवापर आदी घटनांमुळे पाण्याच्या समस्येत वाढ होत गेली. ब्रिटीश गेले. आपण आपल्या जलसंस्कृतीकडे फिरून पाहिले नाही. ब्रिटीशांचाच कित्ता गिरवीत गेलो. तीच आमची संस्कृती अशा भ्रमात राहिलो. याचा परिणाम म्हणून जलव्यवस्थापनात टोकाची शासनप्रवणता निर्माण झाली. जलव्यवस्थापन कोलमडले. या समस्येचे उत्तर आमच्या जलसंस्कृतीच्या वारश्यात मिळू शकेल का हे जाणून घेण्याचा ध्यास लागला.
जलव्यवस्थापनेच्या कार्याचा विचार केल्यास यापूर्वी या क्षेत्रात काही व्यक्तींनी वैयक्तिक पातळीवर योगदान देण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे. परंतु कोणीही एकत्रित अभ्यास करून त्यातून उपलब्ध होणारी मार्गदर्शक तत्वे समाजासमोर मांडली नसल्याचे दिसले. प्राचिन कालखंडापासून यांचा विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की, कौटिल्य हा या क्षेत्रात काम करणारा पहिला विचारवंत आहे. त्यापूर्वी रामायण, महाभारत, पुराण आदी धार्मिक ग्रंथातून जलव्यवस्थापनेचा अप्रत्यक्ष उल्लेख आल्याचे आढळते. परंतु ते सूत्रबध्द पध्दतीने मांडणारा चंद्रगुप्त मौर्याचा पंतप्रधान कौटील्य तथा आर्य चाणक्य हा पहिला. त्याने जलव्यवस्थापन या क्षेत्रातील राज्याची कर्तव्ये, समाजाचे कर्तव्य, जलव्यवस्थापन, कामाचे इष्टापूर्ती स्वरूप, व्यक्तीची कर्तव्ये व हक्क यांचा सखोल विचार केला. सिंचनावर अवलंबून असणारी कृषिव्यवस्था कशी असावी याचे त्याने निर्देश दिले. राज्याच्या आर्थिक स्थैर्यासाठी सिंचनाची पर्यायाने जलव्यवस्थापनाची आवश्यकता असल्याचे अग्रक्रमाने त्याने प्रतिपादन केलेले दिसून येते.
उपलब्ध पाण्याचे यथायोग्य नियोजन व इष्टतम वापराचे दृष्टीने कार्यक्षम व्यवस्थापन होण्यासाठी कोणत्याही राज्यव्वस्थेला विवक्षित जलनीती असणे हे ओघानेच आले. आणि तसेच प्रतिबिंब मौर्य काळातील चाणक्य यांच्या अर्थशास्त्र ह्या ग्रंथात पडलेले दिसून येते. आर्य चाणक्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ समाज व्यवस्थेतील सर्वच अंगांना स्पर्श करतो. साधारणत: अर्थशास्त्र म्हणजे अर्थाशी संबंधित भाष्य करणारा ग्रंथ असा समज होतो. पण कौटिल्याचे अर्थशास्त्र यास अपवाद आहे. जीवनाशी निगडीत सर्वच व्यवस्थेतील निती नियमांचा पायाच या ग्रंथात रचलेला दिसून येतो.
अर्थ हा सर्व व्यवस्थेचा आधार असल्यामुळे या ग्रंथाला अर्थशास्त्र म्हटले गेले आहे असच काहीसे वाटते. या ग्रंथात समाजधारणेसाठी जलनीतीची तत्वे स्पष्टपणे प्रतिपादीत केलेली आहेत. इतिहासकालीन जलनीतीचा हाच उगम होय असेच म्हणावे लागेल. त्यामध्ये जलाशय, तळी, नदी, कालवा यांचे नियोजन व व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शक तत्वे तर आहेतच पण त्याच बरोबर सिंचनासाठी पाण्याचा वापर या प्रित्यर्थ राज्याला शेतकऐयांकडून देय असलेली पाणीपट्टी, त्याची वसुली ती न दिल्यास दंड आकारणी आणि अनुषंगिक नियम घालून दिलेले आढळतात.
यानंतर वराहमिहीर या सहाव्या शतकात होवून गेलेल्या पंडिताने बृहत्संहिता या आपल्या ग्रंथामध्ये जलशास्त्राचा विस्तृत विचार केला आहे. तो विक्रमादित्याच्या नवरत्नांपैकी एक होता असे मानले जाते. त्यामध्ये पर्जन्य, विहीर, तलाव, वनराई, कृषी, सिंचन आदीचा सखोल तपशील दिला आहे. तथापि यावर आधारित कोणत्याही राजघराण्याने कृती केली नाही. त्यांनी आकाशातून पडणारा पाऊस, जमिनीत पाण्याच्या वाहण्याचे ठिकाण, गती, दिशा व भूगर्भातील जलाचा शोध घेण्याचा मार्ग याबद्दल विचार मांडले आहेत. त्यातील काही निवडक ठोकताळे -
1. जो प्रदेश मुळात जलहीन, दुष्काळी आहे, त्या प्रदेशात जर वेताचे झाड असेल तर त्याच्या पश्चिमेकडे तीन हातावर, दीड पुरूष खाली पाणी असते,
2. जांभळाच्या वृक्षाच्या पूर्व दिशेला वारूळ (वाल्मिक) असेल तर त्याच्या दोन पुरूष खोल खडकाखाली गोड पाण्याचा झरा लागतो,
3. सप्तपर्ण (शितवन) वृक्ष जर वारूळाने वेष्टीत असेल तर त्याच्या उत्तरेस एका हातावर पुढे पाच पुरूष खाली पाणी असते,
4.वृक्षाच्या मुळाशी जर बेडूक नजरेस पडले तर त्या वृक्षाच्या उत्तरेस एक हात पुढे साडेचार पुरूष खाली पाणी असते,
5. अर्धा पुरूष खोलीवर कासव दिसल्यास तेथे पूर्व आणि उत्तर दिशांना गोड्या पाण्याचा झरा लागेल,
6. करंज वृक्षाच्या दक्षिणेला वाल्मिक म्हणजे सर्पस्थान दिसल्यावर त्या वृक्षाच्या दक्षिणेस दोन हात पुढे साडेतीन पुरूष खाली पाणी असते,
7. गवत उगविणाऐया जमिनीवर गवत उगवत असेल तर त्या खाली झरा आहे व साडेचार पुरूष खोलीवर पाणी असते,
8. पाय आपटून जमिनीवर घुमल्यासारखा आवाज येत असल्यास त्या ठिकाणी साडेतीन पुरूष खोदले तर उत्तरेकडे जल आहे असे समजावे,
9. खजुराचे वृक्ष, पळसाचा वृक्ष आणि अक्रोड वृक्षाच्या अवती भोवती पाणी शोधल्यास सापडू शकते,
10. पाय आपटल्याने जमीन खाली जात असेल तर त्याच्या दीड पुरूष खाली पाणी असते व जेथे मुंग्या असतात तेथे दीड पुरूष खाली पाणी असते,
11. वड, पलाश, गुलर हे तिन्ही वृक्ष एकत्रित असतील तर त्याखाली पाणी असते हे असे आहेत.
अनेक राज्यकर्त्यांनी आपापल्या राज्यात निर्माण केलेल्या जलव्यवस्थापनाच्या पध्दतीची माहिती शिलालेखातून, कथा कांदबरीतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मुस्लिम कालखंडामध्ये याचा काही तपशील कागदपत्रात आढळतो. याचा ऊहापोह इंग्रजांनी त्यांच्या लिखाणात केलेला आढळतो. ब्रिटीशांच्या कालखंडात 1878 मध्ये पहिल्या दुष्काळ - अकाल आयोगाची (Famine Commission) स्थापना झाली. दुष्काळाची कारण परंपरा देतांना याकडे पहिल्यांदाच लक्ष वेधले गेले. मात्र या क्षेत्रात त्यांनी स्वच:चे नियंत्रण ठेवून लोकसहभाग जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येते.
डॉ. दि.मा. मोरे - मो : 09422776670
Path Alias
/articles/vaarasaa-paanayaacaa-bhaaga-3
Post By: Hindi