वारसा पाण्याचा - भाग 24


जलव्यवस्थापनातील हे कौशल्य प्रदेशनिहाय व संकल्पित योजना (Devices) निहाय बदलत असल्यामुळे आणि याला परंपरेची प्रदीर्घ बैठक लाभली असल्यामुळे तसेच ती शतकानुशतके यशस्वीपणे राबविण्यात कोणत्याही एका व्यक्तीचे कसब कारणीभूत नसून सर्व समाजाचे कौशल्य पणाला लागले असल्याने त्याला लोक कौशल्य असे संबोधण्यात आले आहे.

प्रस्तुत प्रकरणामध्ये यामधील निष्कर्षांचा विचार केला आहे. हे निष्कर्ष प्रत्यक्ष स्थळांना भेटी देवून त्या ठिकाणी असलेल्या अवशेषांचा अभ्यास करून व त्या योजने संबंधी असणारी सर्व साधने विचारात घेवून काढण्यात आलेले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी स्थळांशी संबंधित लोकांना विश्‍वासात घेवून त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.

प्रकरण एक मध्ये या विषयाची समाजमनात असलेली बैठक विचारात घेतलेली आहे. आणि अलिकडे निर्माण झालेल्या जलसमस्यांची कारण परंपरा देवून हा विषय का निवडला हे सांगितले आहे. या विषयावर आजपर्यंत झालेल्या अभ्यासाचा ओझरता परिचय पण करून दिला आहे.

अभ्यासासाठी निरनिराळ्या क्षेत्रातील साधने उपयोगात आणल्यामुळे त्या संदर्भातील लोकसंवाद, संदर्भ साहित्य व भौतिक अवशेष या अनुषंगाने तपशील दिलेला आहे. यामध्ये भौतिक अवशेष अस्तित्वात असणार्‍या स्थळांना भेटी देणे, त्या ठिकाणच्या अवशेषांची माहिती घेणे , त्याची छायाचित्रे घेणे, आवश्यक तेथे त्याचे रेखाचित्र काढणे व त्याचे विश्‍लेषणात्मक विवेचन करणे इ. चा समावेश होतो. संशोधनासाठी संपूर्ण भारत व महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवण्यात आल्यामुळे या भूभागाचा भौगोलिक व भूगर्भशास्त्रीय वैशिष्ट्याचा मागोवा पण प्रकरण एक मध्येच घेतलेला आहे.

प्रकरण दोन मध्ये ऐतिहासिक वाटचालीचा तपशील दिलेला आहे. दोन ते अडीच हजार वर्षांच्या कालावधीत या खंडप्राय देशावर अनेक बलाढ्य सत्तांनी, राजवटीने राज्य केलेले आहे. ज्या राजवटीच्या काळात सिंचन अथवा जलव्यवस्थापन हा घटक विकसित झालेला आहे त्यावर प्रकाश टाकलेला आहे. या परामर्श घेताना प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक कालनिहाय रचना करण्यात आलेली आहे. प्राचीन कालखंड इ.स. १२०० पर्यंत, मध्ययुगीन कालखंड इ.स. १८०० पर्यंत व आधुनिक कालखंड इ.स. १८०० नंतर असे ढोबळ मानाने मानण्यात आलेले आहे. या ठिकाणी जलव्यवस्थापनाशी संबंधित असणार्‍या राजवटीचा व त्याला जबाबदार असणार्‍या घटकांचा विचार केला आहे. मात्र त्यांचा अन्य तपशील (तारखा, वारसायुध्दे, व्यापार वगैरे) दिलेला नाही. या राजघराण्यांचा आवाका मोठा असल्यामुळे आणि प्रस्तुत अभ्यासासाठी त्याची गरज भासली नसल्यामुळे त्यावर आपोआपच बंधन आले.

प्रकरण तीनमध्ये भिन्न कालखंडामध्ये जलव्यवस्थापनासाठी कार्यान्वित केलेल्या अनेक योजनांचा (Devices) उदय कसा झाला, त्यामध्ये कालसापेक्ष, व्यक्तीसापेक्ष व समाज सापेक्ष बदल कसे झाले आणि त्याचा विकास कसा झाला याची चर्चा केली आहे. यासाठी वापरण्यात आलेल्या जलव्यवस्थापनाच्या पध्दती परिसरनिहाय भिन्न असल्यातरी उपलब्ध जलस्त्रोतांचा संतुलीत वापर कसा करावा हे याच्या मागचे मुख्य उद्दिष्ट होते.

प्रकरण चार मध्ये जलव्यवस्थापनातील लोक कौशल्याचा या कौशल्यामधील सामाजिक बांधिकली, त्यातील अर्थकारण व समन्यायी व्यवस्था यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. संबंधित समाजाने या योजनेमध्ये संपूर्ण सहभाग देवून त्या योजनेचे कौशल्यात रूपांतर कसे केले याची सध्याची कार्यक्षम असणारी उदाहरणे (Case study) देवून चर्चा केलेली आहे. लोक कौशल्यामधील अर्थकारण हे सर्वांना आर्थिक दृष्ट्या कसे सोयीचे होते हे पण दाखवून दिले आहे. त्यातील समन्यायी वाटपपध्दती का कार्यरत राहीली याची पण चर्चा केली आहे. या निष्कर्षाचा सांप्रत स्थितीमध्ये कसा उपयोग होवू शकतो याचाही थोडासा मागोवा घेतला आहे. अशा प्रकारच्या उद्बोधनाने आजची जलसमस्या सोडविण्यास अंशत: मदत होईल अशी अपेक्षा आहे.

जलव्यवस्थापनातील हे कौशल्य प्रदेशनिहाय व संकल्पित योजना (Devices) निहाय बदलत असल्यामुळे आणि याला परंपरेची प्रदीर्घ बैठक लाभली असल्यामुळे तसेच ती शतकानुशतके यशस्वीपणे राबविण्यात कोणत्याही एका व्यक्तीचे कसब कारणीभूत नसून सर्व समाजाचे कौशल्य पणाला लागले असल्याने त्याला लोक कौशल्य असे संबोधण्यात आले आहे. ही कौशल्ये निश्‍चित कधी सुरू झाली याबद्दल ठाम असा पुरावा नाही. तथापि या संबंधात काही शिलालेख, कागदपत्रे, परकीय प्रवाशांची वर्णने ऐतिहासिक चरित्रे अशी माहिती देणारी साधने असली तरी या सवार्ंमध्ये याच्या निर्मितीसंबंधातील तपशील दिलेला दिसत नाही. अशा परिस्थितीत सामुहिक लोकसहभागाशिवाय याला दुसरा कोणताही आधार प्राप्त होत नाही. म्हणून लोकांनी, लोकांच्या कल्याणासाठी, लोकांकडून संवर्धीलेले, परंपरेने जतन केलेले व काही ठिकाणी आजपर्यंत व्यवहारात असलेले तंत्रज्ञान म्हणजेच लोककौशल्य हाच निष्कर्ष या अभ्यासातून पुढे आला आहे.

या अभ्यासातून भारतीय जलव्यवस्थापनात यथाकाल निर्माण झालेले अभियांत्रिकी व समाजिक क्षेत्रातील काही उच्चांक व आदर्श समोर आलेले आहेत. यातील काही व्यवस्थेला तर जगातील पहिली निर्मिती म्हणून स्थान मिळावे. त्याची सूची पुढे दिली आहे. या बरोबरच या संशोधनातून निघालेल्या निष्कर्षांचा संक्षिप्त आशय पण सोबतच मांडलेला आहे.

१. जगातील सर्वांत जुनी (२००० वर्ष) व आजपावेतो कार्यरत असलेली सिंचन व्यवस्था - (कावेरी वरील ग्रॅन्ड ऍनिकट)
२. जगातील सर्वात मोठा त्याकाळचा जलाशय (भोज तलाव).
३. जगातील पहिले वर्षा जलसंचय - देवगिरी किल्ला.
४. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची जगातील सर्वात सुंदर व्यवस्था - (राणीची बारव - पाटण).
५. जगातील सर्वात सुंदर मंदीर व त्याच्या छतावरील जलसंचय - (मीनाक्षी मंदीर, मदुराई)
६. जगातील सर्वात सुंदर वास्तूसाठी निर्माण केलेला व आजपण कार्यरत असलेला जलसेतू (ताज जलवाहिनी)
७. जगातील सर्वात जुने व दुहेरी भूमिका बजावणारे कालवे, (कावेरी कालवे)
८. जलगती शास्त्रातील ठसा उमटविणारा कालवा - (गंगा कालवा)
९. जगातील आदर्श पुनर्वसन (नवेगांव बांध)
१०. जगात पाणी वाटपात न्याय्य हे सूत्र आणणारी एकमेव व्यवस्था (फड पध्दत)
११. लोकशाही चा उगम (तापी खोरे - फड पध्दत)
१२. जल विकासातून समृध्दीचा उच्चांक गाठलेलं नदीखोरे ( पंचगंगा)
१३. भूकंप अवरोध करणार्‍या तत्वाला जन्म देणार्‍या वास्तू (Step wells, temples)
१४. लोकसहभागातून जल व्यवस्थापन (Tank irrigation)
१५. ग्रामीण पाणी पुरवठ्याचा आधार - आड
१६. भूजलाचा आधार - पुनर्भरण (गाव तलाव)
१७. जलगतीशास्त्रातील आश्‍चर्य inverted syphon (देवगिरी)
१८. दगडी अस्तरीकरणाचा आदर्श नमुना (भोज तलाव, तुंगभद्रा कलावा)
१९. पहिला नद्याजोड प्रकल्प (सुखना - थांब व बेटवा - काली सिंद)
२०. वास्तूशास्त्रातील उंची गाठलेला जलमहल (नळदुर्ग किल्ला)
२१. एकमेव तिहेरी खंदक (बिदरचा किल्ला)
२२. जगातील पहिला मऊ मातीतून जाणारा बोगदा (जायखेडा - सोमपूर)
२३. Zero control - zero maintenance water conductor system (नहर)
२४. Weir on permeable & flexible foundation (grand anicut)
२५. स्थानिक साधनसंपत्ती - स्थानिक विकास (water harvesting at hill top fort)
२६. श्रध्दा व व्यवहार याचा एकत्र वावर (पाण्याजवळ मंदीर )
२७. पाण्यावरील आत्यंतिक प्रेमाचे प्रतीक (बारव निर्मिती)
२८. पुणे येथील शनिवार वाड्यात पाण्यावर चालणारा हजारी कारंजा
२९. एकाच विहीरीवर अदमासे दोन ते अडीच हजार एकर सिंचन करणारी बीड जवळील खजाना विहीर.
३०. सातारा येथील येवतेश्‍वर हा राज्यातला पहिला लघू जलविद्युत प्रकल्प

डॉ. दि. मा. मोरे , पुणे, मो : ०९४२२७७६६७०

Path Alias

/articles/vaarasaa-paanayaacaa-bhaaga-24

Post By: Hindi
×