वारसा पाण्याचा - भाग 20


पारंपारिक जल व्यवस्थापनातील लोककौशल्य सामाजिकता, अर्थकारण आणि न्याय्य व्यवस्था समजून घेण्यासाठी आजच्या घडीला दिसून येणार्‍या / अनुभवांस आलेल्या काही प्रकरणांचा अभ्यास डोळ्यासमोर आणणे गरजेचे वाटते. प्रातिनिधिक स्वरूपात पाच ठिकाणांच्या जलव्यवस्थापनाचा उल्लेख येथे करण्यात येत आहे.

जलव्यवस्थापनातील लोककौशल्य, सामाजिकता, अर्थकारण व न्याय्य व्यवस्था हे घटक एकमेकांशी घट्ट बांधलेले आहेत. सुट्या पध्दतीने याचे विवेचन करणे अवघड आहे. या चार घटकांच्या मिलनातूनच जलव्यवस्थापनाच्या पार्थीव सांगाड्यात आत्मा ओतता येतो. एकोप्याने, संघशक्तीने, सांघिक कौशल्याने, समजूतदारपणाने, प्रत्येकाने श्रमात आपला वाटा उचलून उपलब्ध झालेल्या जलसंपत्तीतून इतराला झळ न पोहचू देता आपली गरज भागविण्याचं कसब अंगिकारण यालाच लोकसहभागातील जलव्यवस्थापन असं आपण म्हणू शकू. यातील प्रत्येक कडी तितकीच महत्वाची आहे. एक कडी निखळली तर सर्व व्यवस्था कोलमडून पडणार हे निश्‍चित. तरी पण विषयाची ओळख होण्यासाठी या घटकाची पृथकपणे मांडणी केलेली आहे.

पारंपारिक जल व्यवस्थापनातील लोककौशल्य सामाजिकता, अर्थकारण आणि न्याय्य व्यवस्था समजून घेण्यासाठी आजच्या घडीला दिसून येणार्‍या / अनुभवांस आलेल्या काही प्रकरणांचा अभ्यास डोळ्यासमोर आणणे गरजेचे वाटते. प्रातिनिधिक स्वरूपात पाच ठिकाणांच्या जलव्यवस्थापनाचा उल्लेख येथे करण्यात येत आहे.

सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले हे गाव अडीच हजार लोकवस्तीचे आहे. गावातील लोक साडेसातशे हेक्टर जमिनीवर शेती करतात. शेती पावसाच्या पाण्यावर आधारलेली आहे. खरीपात एक पीक आणि रब्बीमध्ये शक्य होईल तेव्हा काही जमिनीवर एक पीक घेवून जगणारे हे गाव. आर्थिकदृष्ट्या गरीब राहिलेले. गेल्या पंधरा एक वर्षांपासून गावाच्या जवळ एक लघु सिंचन तलाव व पाझर तलाव शासनाने निर्माण केला. लघु तलावाच्या कालव्याच्या सुरूवातीच्या एखाद्या कि.मी पर्यंत पाणी जायचे आणि पुढील भाग कोरडाच राहायचा. कारण कालव्याची देखभाल दुरूस्ती शासनाकडून नियमितपणे होत नसे. पाझर तलावातले पाणी लवकर पाझरून पंधरा दिवसात तलाव रिकामा व्हायचा. लघु सिंचन तलाव दर वर्षी भरत नसे. पाझर तलाव मात्र वर्षातून तीन चार वेळा भरत असे.

लघु तलाव पाण्याने भरायचा नाही आणि उपलब्ध असलेले पाणी कालव्याद्वारे दूर पर्यंत जात नसे. पाझर तलावातून पाणी लवकर पाझरून जाते. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना त्या पाण्याचा लाभ होत नसे. जवळ पाणी आहे. जमीन बागायती करण्यासारखी आहे. जवळच नाशिकला द्राक्षांचा बाजार आहे पण वर उल्लेख केलेल्या परिस्थितीमुळे शेतकरी जास्तीची जमीन बागायतीखाली आणू शकत नव्हाता आणि वर्षानुवर्षे रोजगार हमीच्या कामावर आयुष्य कंठत होता.

१९९६ च्या दरम्यान काही शेतकरी एकत्र आले. त्यांनी सामुहिकपणे विचार केला, दारिद्य्रातून वर येण्यासाठी आपणालाच काही तरी करावे लागेल असे त्यांना वाटू लागले. शासनाने दोन तलाव बांधून दिले आहेत, कालवा बांधून दिलेला आहे, या पुढेही वर्षानुवर्षे शासनाने नियमितपणे त्यांनीच निर्माण केलेल्या व्यवस्थेची देखभाल दुरूस्ती करावी, पाणी आपणास घेण्यासाठी सांगावे, आवडले तर, जमले तर आपण पाणी घ्यावे आणि पाणीपट्टीही शासनाला देवू नये, हा भाव कितपत योग्य आहे याचा त्या मंडळींनी विचार केला. त्यांची अंतप्रेरणा जागृत झाली. काही लोकांनी एकत्र येवून शासनाकडे न जातात उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. सुरूवातीला दहा लोक एकत्र आले. त्यांनी एकत्रित येवून स्वत:च्या खाजगी अर्थातून आणि बँकाकडून कर्ज काढून पैसा उभा केला. दहा एचपी चा पंप विकत घेतला, शासनाकडून फक्त विद्युत जोडणीची परवानगी घेतली.

पाणी उचलून वापरण्याची पण परवानगी घेतली. वीज व पाण्याची सरकारला किंमत देण्याची जबाबदारी स्वीकारली. कामाला लागले. पावसाळ्यात पंप व वाहिन्यांच्या मदतीने तलावाच्या खालचे वाहून जाणारे पाणी अडवून लघु तलावात भरले. या बरोबरच पाझर तलावातील पाणी पाझरण्यापूर्वी लघु तलावात उचलून टाकले. पावसावर खरीपातील पिके घेतली आणि पावसाळ्यानंतर त्याच पंपाचा आणि पाईपलाईनचा वापर करून रब्बीचे एक पिक घेवून आणि प्रत्येकाने आपल्या शेतावर काही मर्यादित क्षेत्रावर द्राक्षांची लागवड केली. जमिनीला पाणी मिळाले. सामुहिकपणे एकत्रित आलेल्या शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ झाली. त्यांना हुरूप आला. दुसर्‍या वर्षी जोमाने कामाला लागले. त्यांच्याकडून धडा घेवून पुढील तीन चार वर्षात आणखी दहा समुह निर्माण झाले. प्रत्येकाने पंप व पाईपलाईन खरेदी केली. अशा तर्‍हेने या गावातील सर्व जमीन धारण करणार्‍यांनी सामुहिकरित्या २२ संस्था स्थापन करून आणि २२ पंप बसवून पिंपळनारे गावाची संपूर्ण जमीन दोन पिकांखाली आणली आणि त्यातील जवळजवळ १०० हेक्टर जमीन द्राक्ष या बारमाही पिकाखाली आणली. १९९६ ला लोकांचे परिवर्तन झाले. परिस्थितीने त्यांचे परिवर्तन केले. लोक शासनाकडे परत गेले नाहीत. आपल्या पायावर उभे राहिले. बँकाकडून मदत घेतली.

अधिकार्‍यांकडून तांत्रिक मार्गदर्शन घेतले. स्वत: अर्थ उभा करून वीजेची व्यवस्था, पंपाची व्यवस्था, पाईपलाईनची व्यवस्था बसविली. यासाठी त्यांनी जवळजवळ रूपये १.२५ कोटी ची पूर्णपणे खाजगी गुंतवणूक केली. सहा सात वर्षांनंतर सन २००३ - ०४ पर्यंत या गावाचे उत्पन्न दहा पटीने वाढले. १९९६ ला वार्षिक एकूण उत्पन्न ५० लाख रूपये, २००५ ला हा आकडा रूपये ५ कोटी पर्यंत गेला आहे. दोन हेक्टरची द्राक्षाची बागायत १०० हेक्टरच्या पुढे गेली. दर माणशी उत्पन्न रूपये २००० पासून रूपये २०००० पर्यंत वाढले. रोजगार हमीच्या कामावर या गावात मजूर मिळत नाही. दर माणशी पाण्याची उपलब्धता १००० घ.मी पेक्षा कमी असून सुध्दा हा बदल झाला.

आपल्या पायावर उभे ठाकले, सामुहिक तत्व जाणले, विवेकाला जागे केले, शासनाने सर्व करून द्यावे या लाचार भूमिकेपासून दुर ते गेले. काढलेले कर्ज बुहतेकांनी शेतीच्या उत्पन्नातून फेडले. प्रत्येक लाभधारक या जलव्यवस्थापनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेला आहे. एकूण ४२५ कुटुंबापैकी १०० कुटुंबे भूमिहीन आहेत. गावातील रोजगाराच्या निमिर्तीमुळे या भूमिहीन लोकांची आर्थिक परिस्थिती भूमी असलेल्या शेतकर्‍यांसारखीच आहे.

उपलब्ध झालेल्या पाण्याचे वाटप करण्यामध्ये त्यांनी समन्यायी व्यवस्था निर्माण केली आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडते, प्रत्येक शेतकर्‍याला १८ तासापेक्षा जास्त पाणी (१० एचपी च्या पंपाने) मिळत नाही. शेतकर्‍याने जास्तीत जास्त ३ एकर द्राक्षाची बाग करावी असेही त्यांनी स्वत:च नियम करून बंधन घातले. खरीपामध्ये सर्वसाधारणत: पिकांना पाणी लागत नाही. रब्बीमध्ये स्वत:च्या विहीरीमध्ये पाणी असते. जवळजवळ सर्वच शेतकर्‍याकडे विहीरी आहेत आणि म्हणून या सामुहिक व्यवस्थेतील प्रत्येक शेतकरी फक्त १२ तास पाणी घेतो. अधिक उत्पन्न काढण्यासाठी सर्वांनी द्राक्षांची शेती ठिबक वर आणली आहे. अलिकडेच ते द्राक्षापासून मनुका निर्माण करून शेतीला उद्योगाचे रूप देत आहेत. पाण्याची उपलब्धी त्यांची जमीन पूर्णपणे बागायती करण्यास कारणीभूत झाली. त्यांच्या भावनेत झालेला बदल. त्यांना आर्थिक उन्नतीकडे घेवून जावू शकला. शासनाकडून कसलीही सवलत घेतली नाही. आपले कष्ट आपल्या उध्दारासाठी या भावनेने गेल्या १० वर्षांपासून सामुहिक शक्तीतून, पाण्यातून संपत्ती निर्माण करून आपल्या कुटुंबाचा व गावाचा आर्थिक स्तर वाढविम्यात गाव यशस्वी झाले आहे.

ही भावना त्यांच्यामध्ये कशी निर्माण झाली ? तलावात साठलेल्या पाण्याचा वापर पंप विकत घेवून पाईपलाईनच्या माध्यमातून करावे असे त्यांनी कसे सुचले ? नेहमीच्या कालव्याद्वारे सिंचन करून पाणी वाया जाते हे त्यांच्या लक्षात आले. एका आगळ्या वेगळ्या सिंचनाच्या पध्दतीने ६-७ वर्षात समृध्दीकडे त्यांनी पाऊस टाकले. पावसाळ्यात वहात जाणारे पाणी उचलायचे व ते साठवावयाचे आणि पावसाळ्यानंतर तेच पाणी शेतीस वापरावयाचे हे त्यांना कोणी शिकविले ? कोणत्याही महाविद्यालयातून त्यांनी हे शिक्षण घेतलेले नाही. कुठलेही प्रशिक्षण त्यांनी घेतलेले नाही. आपल्या मातीशी, परिस्थितीशी एकरूप होवून, समोर आलेल्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यामध्ये त्यांचे प्रयत्न कसाला लागले. त्यातूनच त्यांनी हे सर्व निर्माण केले. या निर्मितीच्या प्रयत्नाला आपण लोककौशल्य म्हणायचे, ही एक अंत:प्रेरणा आहे, स्फूर्ती आहे, चांगला हेतू ठेवून केला जाणारा प्रयत्न आहे. माणसालच्या प्रामाणिक प्रयत्नांना निसर्गाची साथ ही सातत्याने लाभत असते. पिंपळनारे गावाची ही प्रक्रिया पुढे चालत राहाणार आहे. प्रयत्न, अर्थ, समृध्दी, प्रतिष्ठा हे घटक त्यांना बांधून ठेवणार आहेत. हे गाव तापी खेर्‍याशेजारीच आहे.

इतिहास काळामध्ये या परिसरात फड या पाणी वाटप न्याय पध्दतीचा उदय झाला होता. परिसरामध्ये, वातावरणामध्ये या फड पध्दतीच्या तत्वाचे गुण, अणु रेणू मध्ये शिल्लक असावेत. या गुणांनी त्यांना प्रेरणा दिली असे म्हंटले तर वावगे ठरू नये. इतिहास काय करू शकतो याचे हे एक मूर्तीमंत उदाहरण आहे. लोक स्वत: या व्यवस्था चालवतात. पाण्याची आणि वीजेची किंमत शासनाला इमाने इतबारे देतात. तलाव, पंप, पाईपलाईन आणि स्वत:च्या शेतीवरील पाणी वितरणाच्या जाळ्याचे ओझे त्यांनी स्वत: स्वीकारले आहे. शासनाची मूळ तलावाच्या स्वरूपात मदत घेतली आणि पुढचा प्रवास सामुहिक शक्तीतून स्वत:च करण्याचे व्रत घेतले. हे व्रतच त्यांनी समृध्दीकडे सातत्याने वाटचाल करण्यास आधार देणारे आहे.

गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा जवळ बामणी हे एक आदिवासी खेडे आहे. लोकसंख्या साधारणत: ४०० च्या जवळपास आहे. ९० टक्के लोक भूमिहीन आहेत, गावाजवळून बामणी नदी वाहते. ही नदी जवळच्याच डोंगरातून उगम पाऊन साधारणत: २० कि.मी अंतरावर प्राणहिता या नदीला मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून या गावातील लोक या नदीवर मातीचे कच्चे बंधारे बांधतात. आणि नदीतील पाणी वळवून कालव्याद्वारे नदीच्या दोन्ही बाजूंची जमीन सिंचनाखाली आणतात. अशा रितीने जवळ जवळ सर्व जमिनीवर दर वर्षी दोन पिके घेतात. दर वर्षी दिपावलीला, पावसाळा संपल्यानंतर सर्व लाभधारक गावात एकत्र जमतात आणि नदीवर बंधारा बांधून कालव्याची दुरूस्ती करणे इ. कामे करण्याचा सामुहिक निर्णय घेतात आणि कामाला लागतात. साधारणत: एका एकराला एक मजूर अशा प्रकारे श्रमाची वाटणी केली जाते. जे लोक मजूर देवू शकत नाहीत, त्यांना मजुरांची मजूरी द्यावे लागते. हा निर्णय शेतकर्‍यांच्या समितीचा असतो.

आणि त्याचे पालन सर्वजण करतात. ज्या लोकांच्या मालकीची जमीन आहे (१० टक्के जमीन आहे) ती मंडळी जवळच्याच आलापल्ली या शहरात राहतात आणि गावातील इतर लोकांना खंडाने जमीन देतात. कालव्यावर झाडाच्या बुंध्याच्या मदतीने जलसेतू केलेले दिसले. पावसाळ्यामध्ये भात हे पीक घेतात आणि रब्बीमध्ये पण बुहतांशी लोक भातच घेतात. काही लोक भाजीपाला, फळपिके पण घेतात. भर मे महिन्यामध्ये सुध्दा बामणी नदीच्या आजूबाजूला भाताचे पीक सुंदर असते. दर एकरी साधारणत: २५ पोती (२ टन) भात पिकवतात. सर्वांना जवळ जवळ वर्षभर रोजगार मिळतो. उत्पन्न वाढते. लोक समाधानात रहात असलेले दिसतात. आज पण त्या ठिकाणी महिला सरपंच आहे.

बामणी सारखीच परिस्थिती आजूबाजूच्या गावांची असणार. २० कि.मी च्या लांबीमध्ये दर वर्षी१० ते १२ कच्चे बंधारे लोकश्रमातून बांधतात. शासनाकडून कसलीही मदत घेत नाहीत. किंबहुना शासनाला हा काय प्रकार आहे हे माहितीही नाही म्हंटले तर अतिशयोक्ती ठरू नये. पण लोक शेकडो वर्षांपासून आपल्या पायावर खंबीरपणे उभे ठाकलेले आहेत. दर वर्षी साधारणत:नदीच्या दोन्ही भागात दोन ते अडीच हजार हेक्टर जमीन दुबार पिकाखाली आणली जाते असे समजते.

एखाद्या वर्षी पाणी कमी येते तेव्हा तो ताण बंधार्‍यावरील सर्व शेतकरी वाटून घेतात. बंधार्‍याच्या जवळच्या शेतकर्‍याला जास्त पाणी आणि लांबच्या शेतकर्‍याला कमी पाणी असे होवू देत नाहीत. मुबलक पाणी ज्या प्रमाणामध्ये वाटून घेतले जाते त्याच प्रमाणामध्ये पाण्याचा ताण (चणचण) पण वाटून घेतला जातो. हीच पाण्याच्या समन्यायीपणाची व्याख्या आहे असे समजण्यास हरकत नाही.

सामुहिकपणे, सहभागाने पाण्याला हाताळून शेतीतून अधिक उत्पन्न काढण्याची ही व्यवस्था ऐतिहासिक वारसाचे एक प्रतीक आहे असे समजण्यास हरकत नसावी. ही व्यवस्था किती जुनी आहे असा प्रश्‍न त्यांना जेव्हा करण्यात आला तेव्हा ते पूर्वीपासून आम्ही अशाच प्रकारे पाण्याला हाताळतो असे उत्तर मिळाले. आदिवासी भागातील सामुहिकपणे, न्याय्य पध्दतीने आणि स्वत:च्या खर्चाने हाताळली जाणारी ही व्यवस्था म्हणजेच जलसंस्कृती आहे असे म्हणावेसे वाटते. गरीब लोक श्रम देतात, कोणाकडूनही कसलीही मदतीची अपेक्षा न करता. अशा पारंपारिक व्यवस्था अनेक ठिकाणी आपणास आढळतील, जर आपण त्या नजरेने त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला तरच. दर वर्षी बंधारा कसा बांधावा, कालवा कसा दुरूस्त करावा याचे ज्ञान त्यांना अनुभवाने मिळालेले आहे आणि त्यात ते पारंगत आहेत.

सामुहिकपणा, निर्मितीमध्ये, दुरूस्तीमध्ये, पाणी वाटपामध्ये पूर्णपणे लोक सहभाग यालाच आपण पाणी व्यवस्थापनातील लोकशाही असे का म्हणू नये?

नांदेड जिल्ह्यामध्ये ४० वर्षांपासूनचा हा एक सिंचनाचा जुना प्रकल्प आहे. ह्या प्रकल्पापासून साधारणत: २५००० हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ होतो. इ.स. २००० पर्यंत ह्या प्रकल्पावर पूर्णपणे ऊस पिकविला जात होता. या भागात बरेच साखर कारखाने निघाले, बाजारपेठ उपलब्ध झाल्या, पाण्याची मोजणी होत नसल्याने पाणी वापरावर बंधन नाही. यामुळे ऊस फोफावला. अनेक वर्ष शासनाने प्रयत्न केले पण पीक पध्दतीत बदल झाला नाही.

इ. स. २००० नंतर मात्र पीक पध्दतीत एकदम बदल झाला. सर्वत्र ऊसाच्या जागी भुईमूग, सोयाबीन, गहू अशी पिके दिसू लागली. लोकांनी हा बदल स्वयंप्रेरणेने केला. त्याला एक कारण घडले आणि ते म्हणजे परिसरातील साखर कारखान्यांचा विस्कळीत कारभार. ऊस या पिकाची बाजारपेठ ढासळली. लोक दुसर्‍या पीक पध्दतीकडे आपोआप वळले. ऊस हे जास्त पाणी पिणारे पिक आहे. त्यामुळे कमी क्षेत्रावर हे वाढते. काही मोजक्याच शेतकर्‍यांना याचा लाभ होतो आणि इतरांना पाणी मिळत नाही. त्यामुळे विषमता निर्माण होते. पाणी वाटपात समन्यायीपणा राहात नाही. बदललेल्या पीक पध्दतीमुळे सर्वच क्षेत्रावर दुबार पीक घेण्याची व्यवस्था निर्माण झाली. पाणी वाटपामध्ये न्याय्यपणा आला. लोकांनी हा बदल सामुहिकपणे घडवून आणला. ३० - ४० वर्षांपासून या प्रकल्पावर जो इतिहास घडत होता, तो सामुहिक प्रेरणेने बदलला गेला.

मराठवाड्यातील चार लक्ष लोकवस्तीचे लातूर हे एक शहर आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या भागात हे शहर वसलेले आहे. या शहराला राष्ट्रप्रेमाची, शिक्षणाची संस्कृती आहे. इतिहास काळात काही काळासाठी हे शहर राष्ट्रकुटाची राजधानी होते. हैद्राबादच्या निजामाशी अन्यायाविरूध्द टक्कर देणारे हे शहर. महर्षी दयानंद सरस्वती या थोर विभूतीने स्थापन केलेल्या आर्य समाज या वैचारिक संघटनेतील लोकांचे हे शहर म्हणजे बालेकिल्लाच म्हणावे लागेल. यांनीच मराठवाड्याचे निजामापासून संरक्षण केले. अलिकडच्या शहरीकरणाच्या काळात शहर झपाट्याने मोठे झाले. शहराचा पाणी पुरवठा बहुतांशी भूजलावर (विहीर, आड इ.) चालायचा. मधल्या काळात जवळच्याच मांजरा नदीतून पाणी पुरवठा करण्यात येवू लागला. गेल्या चार वर्षांपासून (इ.स. २०००) या भागात पाऊस नसल्यासारखाच आहे. मांजरा जलाशयात पाणी नाही. भूजलाची पातळी खोल गेली आणि भूजल संपल्यासारखेच झाले. पिण्यासाठी पाणी हा एक यक्षप्रश्‍न ठरला, शासन हतबल झाले.

लोक मात्र जागरूक झाले, एकत्र आले. त्यांनी ठरविले हा प्रश्‍न शासनावर न ढकलता आपण स्वत: सोडविला पाहिजे. कसलाही संप, मागणी इ भडकपणा केला नाही. पहिल्या वर्षीच पाणी विकत घेण्याचा, पाण्याच्या चणचणीचा अनुभव घेवून जवळ जवळ सर्वच लोकांनी त्यांच्या छतावरील पाणी एकत्रित करून भूजलाची पातळी वाढविली आणि विंधन विहीरी, आड, विहीरी यांना पाणी उपलब्ध करून दिले. या सामुहिक प्रयत्नामुळे लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोपा ठरला. लोकांनी ठरविले, तर काय घडू शकते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. आपले प्रश्‍न आपण सोडवावेत. शासन जमेल तितकी मदत करेल पण व्यवस्थेला वेठीला धरून गुंतागुंत निर्माण न करण्यात शहाणपण आहे हे या शहरातील लोकांनी स्वयंप्रेरणेतून सुचले. आणि त्यांनी स्वत:च्या श्रम आणि आर्थिक बलाने छतावरील जलसंचयाचे कौशल्य अंगिकारले.

पिंपळनारे, बामणी, मानार, लातूर सारखी अनेक उदाहरणे राज्यामध्ये आणि देशामध्ये आपल्याला पहावयास मिळतात. गरज आहे, ती लोकांची मानसिकता बदलण्याची. ह्या सर्व बदलाला कुठे तरी ऐतिहासिक वारशाचा आशिर्वाद मिळालेला असणार. कुठे प्रत्यक्ष असेल, कुठे अप्रत्यक्ष असेल. आपले पूर्वज आपल्या पायावर उभा ठाकत होते. आपण का उभा ठाकू नये ? हा विचाराचा वारसा त्यांनी अंगिकारल्यामुळे त्यांची भविष्यातील वाटचाल सुखकारक झाली. यालाच आपण लोककौशल्य म्हणू.

नाशिक पासून सुमारे ३० कि.मी अंतरावर, मुंबई रस्त्यावर, घोटीजवळ माणिकखांब नावाचे एक गाव आहे. हे सुध्दा आदिवासी खेडे आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले आहे. लोकसंख्या ४००० च्या आसपास. पाऊस चांगला पडतो, भात चांगला पिकतो. गाव सधन आहे. गावापासून १ कि.मी अंतरावर दारणा नदी व दारणा जलाशय आहे. गाव डोंगरावर वसलेले आहे. गावातील जवळ जवळ सगळीच घरे दोन मजली आहेत. गावातील लोक धार्मिक आहेत. गावात साधुसंतांची प्रवचने होतात.

गेल्या ३० - ३५ वर्षांपासूनचा अनुभव, या डोंगरावर वसलेल्या गावातून महिला दारणा नदीतून सकाळी आणि संध्याकाळी पिण्याचे पाणी वाहून घेवून जातात. अपवादाला सुध्दा पुरूष पाणी वाहत नाहीत. महिला डोक्यावर तीन चार घागरी घेवून पाणी वाहण्याचे काम वर्षानुवर्षे करीत आहेत. गावामध्ये २० वर्षांपूर्वी नळ योजना पण झाली आहे. वीज मिळण्यामध्ये काही अडचण, पंपांची दुरूस्ती यामुळे नळ योजना चालू झाली नाही. गावातील प्रत्येक घरातला माणूस आपापल्या स्वत:च्या कामाला लागतो. तो सुटा - सुटा विचार करतो. महिला पाणी आणतात, आणि वर्षानुवर्षे हा प्रकार चालत आहे. या गावातील पाणी आणण्याची अडचण जाणून आजूबाजूचे लोक या गावात आपल्या मुलीचे लग्न करीत नाहीत असे पण समजते. आणि म्हणून या गावातील लग्न हे आपापसात, सोयरेमंडळीतच करतात हे ही समजले. या गावातील लोकांनी कधीही असे वाटले नाही की, आपण एकत्र यावे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवावा.

गरज भासल्यास वर्गणी करून पंपाची दुरूस्ती करावी आणि नियमितपणे आपल्या गावामध्ये पाणी आणावे, जेणेकरून आपल्या महिलांच्या डोक्यावरील घागर खाली उतरेल. गाव आणि नदी यामध्ये एक राष्ट्रीय महामार्ग आणि एक रेल्वे लाईन आहे. दर वर्षी दोन तीन अपघात होतात असे पण समजले. गावात शिकलेले लोक आहेत. वारकरी पंथाचे लोक आहेत, तरी पण कोणालाही असे वाटत नाही की महिलांचे दु:ख कमी करावे. सामुहिक शक्तीचा अभाव आहे, स्वयंप्रेरणा जागृत होत नाही, त्यामुळे हा प्रश्‍न सुटला नाही. पावसाळ्यामध्ये नदीचे पाणी गढूळ होते त्या काळात छतावर पडलेले पाणी भांड्यांमध्ये साठवून महिला हा प्रश्‍न कसातरी सोडवितात. हे पाणी अशुध्द असते, आणि म्हणून रोगराई पाचवीला पुजलेली आहे. गावातल्या मंडळींना विचारणा केली तर शासन काही करत नही, आमचे प्रश्‍न सोडवीत नाहीत, अशी उत्तरे दिली जातात.

अगोदरची चार गावांची उदाहरणे आणि हे उदाहरण यामध्ये मानसिकतेचा प्रचंड फरक दिसतो. शासन सगळीकडे सारखे आहे. ज्या ठिकाणी लोक पुढे आले, सामुहिक विचार व प्रयत्न कारणी लावले, त्या ठिकाणी प्रश्‍न सुटले. त्यांनी इतिहास घडविला. ज्या ठिकाणी हे झाले नाही, त्या ठिकाणी महिलांचे दु:ख कायम राहिले.

ही पाच उदाहरणे फार बोलकी आहेत. समाजामध्ये दोनही प्रकारची उदाहरणे आपणास पहावयास मिळतात. जाणकारांनी नेमके काय स्वीकारले हे त्यांनी ठरवावयाचे आहे.

सम्पर्क


डॉ. दि. मा. मोरे.
पुणे, मो : ०९४२२७७६६७०


Path Alias

/articles/vaarasaa-paanayaacaa-bhaaga-20

Post By: Hindi
×