वारसा पाण्याचा - भाग 19


वर्षा जलसंधारण, छतावरील जलसंधारण, पाणलोट क्षेत्र विकास या वाक्प्रचारांचा सध्याच्या काळात फार मोठा वापर आहे असे दिसून येते. असेही वाटून जाते की, हा विचार आधुनिक आहे. आताच्या समाजाला सुचलेला आहे, पण वस्तुस्थिती तशी नाही. हजारो वर्षांपूर्वी हे तत्वज्ञान आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या भागात फार मोठ्या प्रमाणावर राबविलेले आहे.

वाकाटकाची राजधानी नगरधन (नागपूरपासून जवळच असलेले हे ठिकाण) पाण्याने समृध्द आहे. या राजवटीने प्रदीर्घ काळ संपूर्ण देशावर राज्य केले असे म्हणण्यास हरकत नाही. गुप्त घराण्यातील कन्या आणि वाकाटकाची सून, राणी प्रभावती, हिनेपण अडचणीच्या काळात राज्यशकट समर्थपणे चालविलेले आहे. या राणीच्या कालावधीत विदर्भामध्ये तलावांची निर्मिती झाली असल्याचे पुरावे आहेत.

नगरधन हे शहर लहान आहे. आजपण त्या ठिकाणी सोन्याचा व्यापार चालतो. रामटेकजवळ तलावाच्या मालिकेतून विड्याची पाने (Beatle leaves) पिकवून त्याचा मोठ्या प्रमाणावर व्यापार केला जात असे. अलिकडच्या काळात पीक पध्दतीत बदल झालेला आढळतो. सुपीक जमीन, भरपूर पाणी आणि त्यातून समृध्दी हे वाकाटकाच्या कालखंडाचे वैशिष्ट्य होय. राजधानी म्हटल्यानंतर वसाहती करण्यासाठी जागा जास्त लागते. या परिसराचे अवलोकन केल्यानंतर असे दिसून येते की, किल्ला पण मोठा नाही, आणि जवळपास कोणतेही जुने शहर नाही. अलिकडेच त्या नगरधनच्या भोवतालच्या उत्खननामध्ये असे दिसून येत आहे की, सर्व वस्त्या टेकड्यांवर होत्या.

उत्खननामध्ये महाल, मंदिरे या वास्तू दिसून येत आहेत. यावरून असे अनुमान काढता येते की, आसपासची जमीन सुपीक व बागायती असल्यामुळे त्या राजवटीने मनुष्यवस्ती अशा सुपीक जमिनीवर पसरू दिली नाही. ज्या जमिनीवर पीक येत नाही, डोंगराळ आहे, उंचवट्याचा भाग आहे. अशा ठिकाणी वस्त्या करण्यास प्रोत्साहन दिलेले आहे. कालिदासाचे वास्तव्य रामटेकवर होते. यानंतरचा संस्कृत कवी, कवी भवभूती याचे वात्तव्य पण विदर्भामध्ये गोंदिया जवळच्या पदमपूर या ठिकाणी होते. कवी भवभूतीचे पदमपूर हे जन्मस्थळ आहे. यादवांच्या कालखंडात विदर्भ भागासाठी पदमपूर हे उपराजधानीचे ठिकाण म्हणून निवडलेले असावे. अवती भोवती तलाव आहेत, परिसर संपन्न आहे. पडीक नापीक आणि डोंगरी भागात वस्त्या कराव्यात. मनुष्यवस्तीसाठी सुपीक जमीन वापरू नये ही शिकवण वाकाटकाच्या नगरधन या राजधानीच्या परिसरातून मिळते.

जलाशयाचे आयुष्य प्रदीर्घ असते. हजारो वर्ष आयुष्य असलेली जलाशये या देशामध्ये लाखोंच्या संख्येने आहेत. लोकव्यवस्थेतून गाळ काढण्याचा कार्यक्रम प्रतिवर्षी अनेक तलावांमध्ये राबविला जात होता. राजा भोज यांनी निर्माण केलेला व काळाच्या ओघात लहान झालेला तलाव आजसुध्दा भोपाळ शहराची गरज भागवितो. सातवाहन कालीन राजतडाग औरंगाबादला खेटून आज पण उपयोगात आहे. त्याचा आकार अक्रसित झालेला आहे. कंधार येथे राष्ट्रकुटाच्या काळात निर्माण केलेला जगतुंग सागर आजसुध्दा उपयोगात आहे. कावेरी नदीवरील ग्रँड ऍनिकट हा दोन हजार वर्षापूर्वीचा आहे. रामटेक, नगरधन या परिसरामध्ये अनेक तलाव मौर्यकालीन असल्याचे पण दिसून येते. वाशिम जवळ असाच एक जुना तीन किलोमीटरचा तलाव आपणास पहावयास मिळतो. हा तलाव फुटलेला आहे, गाळाने भरलेला आहे. या गाळपेर जमिनीवर उत्तम शेती केली जाते. तलाव गाळान भरल्यानंतर त्याचा वापर कसा करावा हे या उदाहरणावरून आपणास शिकता येते.

ग्रँड ऍनिकट मधून निघालेले कावेरीचे कालवे म्हणजे जलगती शास्त्रातील एक आश्‍चर्य आहे. बत्तीस शाखांमध्ये विभागलेले हे कालवे पावसाळ्यानंतर कालवे म्हणून काम करतात व पावसाळ्यात नदी म्हणून काम करतात. गंगेचे कालवे अविरतपणे वाहत आहेत. दीडशे वर्षांपेक्षा जास्त कालवाधी झाला आहे. गंगेच्या कालव्यामध्ये गाळ साठत नाही. दुरूस्तीसाठी कालवा बंद करावा लागत नाही. ही वस्तुस्थिती आहे.

तलाव निर्माण करण्यासाठी जमीन पाण्याखाली आणावी लागते. काही गावे पाण्याखाली जातात. लोकांचे विस्थापन होते. प्रजेचा राजा छत्रपती शाहू महाराज यांनी पंचगंगा खोर्‍यातील भोगावती नदीवर राधानगरी हे धरण बांधले. जमीन पाण्याखाली गेली. लोकांचे विस्थापन झाले.

विसाव्या शतकाच्या सुरूवातीला या मोठ्या जलाशयाची निर्मिती झाली. तसा काळ अलिकडचाच आहे. या विस्थापित लोकांकडून त्यांच्यावर अन्याय झाला असा अंदाज बाहेर आल्याचे ऐकिवात नाही. विस्थापितांना कसा न्याय द्यावा याचे हे एक उदाहरण व्हावे. वैनगंगा खोर्‍यात गौंड राजाच्या कारकिर्दीत अनेक तलाव निर्माण झाले. त्यांची संख्या हजारांमध्ये आहे. नवेगाव बांध हा एक जुना गौंडकालीन तलाव आहे. या तलावामध्ये विस्थापित लोकांना लाभक्षेत्रात कालव्याच्या सुरूवातीच्या भागात जमीनी देण्यात आल्या आहेत. जमिनीला जमीन या तत्वाच्याही पुढे गेलेली ही व्यवस्था आहे. विस्थापित हा त्या प्रकल्पाचा पहिला लाभधारक असावयास हवा हे तत्व त्यांनी प्रत्यक्षात आचरणात आणले.

इतकेच नाही तर जे विस्थापित भूमिहीन होते, बलुतेदार होते त्यांना पण अग्रक्रमाने प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात कालव्याच्या सुरूवातीच्या भागात जमिनी दिल्या गेल्या, आणि त्यांना न्याय दिला. नवेगाव बांध हा भंडारा जिल्ह्यात आहे. ज्यांनी लोकांच्या सामुहिक शक्तीला वळण देवून या तलावांची निर्मिती केली. त्या व्यक्तीचे मंदीर त्या तलावाशेजारी आहे असे कळते. लोक त्याची आठवण ठेवतात. दर वर्षी आदरांजली वाहतात असेही ऐकिवात आहे. तलाव निर्माण करून विस्थापितांना न्याय कशा प्रकारे देता येतो याचे हे एक आगळे वेगळे उदाहरण आहे. या उदाहरणाला जगात तोड नसावी.

भूमिहीनांना भूमी आणि ती पण सिंचित भूमी ही पुनर्वसनाची व्याख्या आहे. याच परिसरात असोलामेंढा हा ब्रिटीश कालावधीत निर्माण झालेला तलाव आहे. या तलावामध्ये जी गावे विस्थापित झाली, पुनर्वसित झाली त्या गावांना पुनर्वसित क्षेत्रातच नवीन तलाव निर्माण करून देवून विस्थापितांना पण सिंचनाची सोय करून देण्यात आली आहे. ही दोन उदाहरणे आजच्या व्यवस्थेला फार अंतर्मुख होण्यास भाग पाडतात. छत्रपती शाहू महाराज आणि गौंड राजे आज आठवणीत राहतात. कारण ते कल्याणकारी व्यवस्थेचे जनक होते म्हणून.

वर्षा जलसंधारण, छतावरील जलसंधारण, पाणलोट क्षेत्र विकास या वाक्प्रचारांचा सध्याच्या काळात फार मोठा वापर आहे असे दिसून येते. असेही वाटून जाते की, हा विचार आधुनिक आहे. आताच्या समाजाला सुचलेला आहे, पण वस्तुस्थिती तशी नाही. हजारो वर्षांपूर्वी हे तत्वज्ञान आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या भागात फार मोठ्या प्रमाणावर राबविलेले आहे. छतावरील जलसंधारण, याची राजस्थान ही खाण आहे. ज्या ज्या ठिकाणी निसर्गातील पाण्याचे, पावसाचे प्रमाण कमी होते त्या ठिकाणी या व्यवस्था त्या सुबुध्द समाजाने स्वयंप्रेरणेतून स्वीकारलेल्या आहेत. लोक, पाण्याचे प्रश्‍न, स्वत:चे प्रश्‍न, समजावून त्यावर मात करण्यात तरबेज होते. ते पंगू नव्हते. दुसर्‍यावर अवलंबून नव्हते.

हाच वारसा आपल्याला या जुन्या व्यवस्थेतून मिळतो. कठीणातील कठीण काम पण अतिशय कुशलतेने करण्यामध्ये त्यांचा हातखंड होता. यादव काळातील देवगिरीच्या डोंगरी किल्ल्याला खंदक आहे. जगातील हे असे एकमेव उदाहरण असावे. खंदक विशाल आहे. खडक उभा तासलेला आहे. खडकाचा प्रकार दक्षिणेतील ट्रप स्टोनचाच आहे. इतक्या कुशलतेने खडक कसा तासला गेला असावा हे मनुष्य बुध्दीला कोडे पडते. याबरोबरच देशात अनेक ठिकाणी निर्माण झालेल्या गुहा, लेणी शिल्प याबद्दल पण हाच विचार पुढे येतो. तो समाज अशी अतिशय अवघड आणि कुशल कामे करण्यात निष्णात होता हेच यातून दिसून येते.

नदी काठावरून पाणी वाहण्यासाठी महिलांना अवघड जात असे. या देशात पाणी आणि महिलेचे नाते फार जवळचे आहे. पुरूष प्रधान संस्कृतीला ते सोयीचेपण वाटले असावे. सार्वत्रिकपणे, मग ते शहर असो वा ग्रामीण भाग असो महिलाच पाण्याची वाहतुक करण्यात, पाणी साठविण्यात अग्रभागी असतात.किंबहुना त्यांनाच त्या कामाचे ओझे खांद्यावर घ्यावे लागते. पाण्याची वाहतुक करणे, साठविणे यामध्ये पुरूषांना कमीपणा वाटत असावा. श्रमाची विभागणी अशाच प्रकारे झालेली आहे हे कटु सत्य आहे. महिलांच्या डोक्यावरील ओझे आणि त्यांचे कष्ट कमी करण्यासाठी पण प्रयत्न झालेले आहेत. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, नद्यांच्या काठावर अनेक ठिकाणी घाटांची निर्मिती झालेली आहे. वाई शहरावजळचा कृष्णा नदीतील घाट पाहण्यासारखा आहे.

या ठिकाणच्या नदी पात्रालगतच्या मंदीरांना पुरापासून संरक्षण देण्यासाठी cut water ची तरतूद केलेली आहे. अशा प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम हे दुर्मिळच म्हणावे लागेल. नदीचे तीर उंच असले, मातीचे असेल, उभे असले तरी पण महिला डोक्यावर एकावर एक दोन तीन घागरी घेवून नदीतून प्रवास करतात तेव्हा तो त्यांना अवघड भासतो. महिलाच हे दु:ख लक्षात घेवून घाटाची निर्मिती झाली. अठराव्या शतकात प्राधान्य दिले. त्यांच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणावर घाट, बारवा यांची निर्मिती झाली. महिलेचे दु:ख महिलेलाच जास्त कळणार असा यातील भाव आहे. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला संत गाडगे महाराज यांनी पण मोठ्या प्रमाणावर घाटांची निर्मिती केली. देवळात जावून देवाची पूजा न करणारा संत, लोककल्याणणार्थ असे आगळे वेगळे काम करून खर्‍या अर्थाने देवाच्या फार जवळ गेला असेच म्हणावे लागेल. घाटनिर्मितीमागे महिलांचा त्रास कमी करणे हा हेतु प्रमुख होता असेच यावरून दिसून येते.

इंदौर येथे होळकरांच्या राजवाड्यात स्वयंपाकघरात एक आगळी वेगळी विहीर आहे. रॉकेलच्या डब्यातील रॉकेल कधीकाळी आपण काढीत होतो इतक्या सोप्या पध्दतीने पाणी काढण्यासाठी सुलभ व्यवस्था असलेली विहीर त्या ठिकाणी निर्माण केलेली आपणास दिसून येते. महिलांचा विचार केलेली ही कलाकृती मनात घर करून राहते.

भोजराजाची राजधानी धार या ठिकाणी भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला तलावांनी वेढलेला आहे. या किल्ल्यामध्ये राघोबाबदादा व आनंदीबाई यांना नजरकैदेत ठवले होते असे इतिहास सांगतो. दुसर्‍या बाजीरावचा जन्म या कि ल्ल्यातच झाला. दुसर्‍या बाजीरावाला लहानपणी खेळण्यासाठी म्हणून या किल्ल्यामध्ये वेगळ्या प्रकारची खेळणी निर्माण केलेली आहेत. यातील दोन खेळणी आजसुध्दा त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. एक लाहनशी विहीर, त्यातून मोटेने पाणी काढण्याची व्यवस्था आणि एक लहानसे Water cascade. भावी काळातील समाजाचे प्रश्‍न कोणते आहेत याची जाणीव बालपणीच करून देण्याचा मनोदय या पाठीमागे असावा असा आपण यातून अर्थ काढू शकतो.

सम्पर्क


डॉ. दि. मा. मोरे. पुणे, मो : ०९४२२७७६६७०

Path Alias

/articles/vaarasaa-paanayaacaa-bhaaga-19

Post By: Hindi
×