वारसा पाण्याचा - भाग 18


गंगा नदीवर हरिद्वारला बंधारा बांधून त्यातून काढलेल्या कालव्यावर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी फिश लेडर, रामधारा इ. ची निर्मिती केलेली दिसते. रामधारा ही कल्पना व्यापक सामाजिक विचार रूजविते. सर्व प्राणीमात्राची काळजी या विचारात आहे. पर्यावरणासाठी पाणी हा सद्हेतू यात आहे. या विचाराचा पाठपुरावा करण्यामध्ये नंतरचा समाज कमी पडला. नदीचे पाणी धरण बांधून अडविले.

पाण्याची स्वच्छता राखण्यासाठी, शत्रूपासून पाण्याचे संरक्षण करण्यासाठी, पाण्याला बाष्पीभवनापासून दूर ठेवण्यासाठी, देखभाल दुरूस्तीचा खर्च कमी करण्यासाठी, शहराचा पाणी पुरवठा हा भूमिगत कालव्याद्वारे वा नलिकेद्वारे केलेला दिसून येतो. या नलिकांनी वाटेतील नदी, नाला ओलांडून वक्रनलिकेची मदत घेतलेली आहे. विदर्भामध्ये तुमसर परिसरात आष्टी या गावी विहीरीवर दगडाची जाळी ठेवलेली आहे. ही विहीर रस्त्याला लागून आहे असे समजते. पोहर्‍याने पाणी काढण्यापुरतीच व्यवस्था हा या पाठीमागचा उद्देश असावा.

विदर्भातील वैरागड या किल्ल्याच्या खंदकातील पाणी सिंचनासाठी वापर केल्याचे दिसते. कोकणामध्ये नारळ आणि पोफळीच्या बागा सुंदर अशा पाटचार्‍या बांधून लोक अनेक वर्षांपासून करतात. भौगोलिक परिस्थिती जशी साथ देईल त्या पध्दतीने गिरीदुर्ग, जलगुर्ग, वनदुर्ग, स्थलदुर्ग इ. ची निर्मिती करण्यात आलेली दिसते.

गंगा नदीवर हरिद्वारला बंधारा बांधून त्यातून काढलेल्या कालव्यावर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी फिश लेडर, रामधारा इ. ची निर्मिती केलेली दिसते. रामधारा ही कल्पना व्यापक सामाजिक विचार रूजविते. सर्व प्राणीमात्राची काळजी या विचारात आहे. पर्यावरणासाठी पाणी हा सद्हेतू यात आहे. या विचाराचा पाठपुरावा करण्यामध्ये नंतरचा समाज कमी पडला. नदीचे पाणी धरण बांधून अडविले. वरच्या भागात पाणी व खाली नदीचे पात्र कोरडे अशी अवस्था आहे. कालव्याद्वारे दूरच्या क्षेत्राला पाणी, पण जवळचे नदीपात्र कोरडे. असा विभक्त व स्वार्थी विचार, अनेक प्रन निर्माण करतो.

दुजाभाव व सामाजिक अस्वस्थता रूजवितो. समाज बांधणीसाठी हे पूरक नाही. कावेरीवरील कालवे, नदी आणि कालवे अशी दुहेरी भूमिका वठवितात. मध्यप्रदेश मध्ये खजुराहो परिसरात रस्त्याच्या भरावाचा उपयोग धरणाची भिंत (तलाव निर्मितीसाठी) म्हणून केलेला आहे. धारूर येथील खार्‍या दिंडीला, धारूर गावाच्या परिसरातून पाणी येते. त्या पाण्यातील गाळ, कचरा दिंडीमध्ये येवू नये म्हणून, पाणी गाळण करण्याची (जलगती शास्त्राचा उपयोग करून) व्यवस्था केली गेल्याचे दिसून येते. ही व्यवस्था 'trash rack' म्हणून काम करीत असावी.

राजस्थान मधील जैसेलमेर किल्ल्याच्या पायथ्याशी गडीसर नावाचा तलाव आहे. पाणलोटातून येणारे पाणी बंधारा (Broad crested weir) बांधून मोजण्याची एक आगळी वेगळी सोय आपल्याला येथे दिसून येते. दरवर्षी तलावात पाणी किती साठवलेले आहे, आणि ते किती दिवस पुरेल याचा अंदाज बांधण्यासाठी या साधनाचा उपयोग होतो. पाणी मोजले पाहिजे, तरच त्यातून वापराचे गणित मांडता येते, हा या पाठीमागचा उद्देश आहे. पाणी मोजण्यामध्ये आपण मागे आहोत. पाणी कोठेही मोजले जात नाही, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कोकणामध्ये सावंतवाडी हे एकमेव असे शहर आहे की, जेथे पाणी पाणी मोजून दिले जाते. यातून आपण वेगळी प्रेरणा घेवू शकू.

विदर्भात वैनगंगा नदीचा प्रवाह वळवून किल्ल्याच्या खंदकात पाणी घेतले आहे. या किल्ल्याची तटबंदी मातीच्या भरावावर निर्माण केलेली आहे. त्या तटबंदीला आजतागायत तडे गेलेले नाहीत. भराव, तो पण मातीचा, किती शास्त्रीय पध्दतीने दबाई करून केलेला असावा याची आपण कल्पना करू शकतो. खडकामध्ये खोदून तलाव निर्माण करण्याची परंपरा याच काळात वेगवेगळ्या ठिकाणी रूजलेली दिसते. साधारणत: किल्ल्यावर अशा तलावांची निर्मिती जास्त प्रमाणात झालेली आहे. गुहा, लेणी, घाट अशा ठिकाणी पण खडकामध्ये खोदून पाणी साठविण्याच्या व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत.

नाणेघाट म्हणजे पश्‍चिमेकडे व्यापार करणारा मार्ग, या ठिकाणी पण अशा टाक्या आपणास पहावयास मिळतात. असे म्हटले जाते की, गुहा, लेण्या हे अशा मार्गावर निर्माण केलेले विश्रांतीगृह होते. व्यापारासाठी जेव्हा घोडे, उंट, बैलगाडी यांचे थवे घेवून लोक प्रवास करीत असत, त्यावेळी त्यांना थांबण्यासाठी डोंगरामध्ये कोरलेल्या या वास्तुंचा वापर धर्मशाळेसारखा होत असावा. त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून डोंगरात पाझरणारे पाणी टाक्यांमध्ये साठवून वर्षभर वापरण्याची ही एक व्यवस्था होती. शत्रूच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी मनुष्य वस्त्या ह्या डोंगराच्या पोटात, डोंगरावर असत. डोंगरी किल्ले हे एक त्याचे उदाहरण आहे. किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी तटबंदीची गरज, किल्ल्यावर वास्तव्य करण्यासाठी महालांची, बाजारपेठांची, मंदिरांची निर्मिती करणे हे ओघानेच आले. पाण्याचे साठे निर्माण करण्यासाठी तलाव बांधण्याची पण गरज होतीच. मातीच्या बांधाच्या तलावासाठी दगडी अस्तरीकरणासाठी पण दगडाची गरज असणारच.

हा सर्व दगड डोंगरावर, घाटातून खडक खोदून काढला जात असे. दगड मोठ्या प्रमाणावर लागत असे. यामुळे डोंगराच्या पृष्ठभागावर वा घाटात वा पोटात दगडाच्या खाणी निर्माण करून या खाणीचे रूपांतर अतिशय कल्पकतेने तलाव निर्मितीसाठी केलेले आढळते. रायगडावरील गंगासागर हा तलाव खाणीतून निर्माण केला गेला आहे. सिंहगड, पुरंदर, तोरणा, अशिरगढ, पावागड, अंकाई - टंकाई इत्यादी डोंगरी किल्ल्यांवर मोठा प्रमाणावर खडक तासून पाण्याचे टाके निर्माण केलेले आहेत. आज पण ते अस्तित्वात आहेत. खडक फोडणे, त्यातून पाण्याचे साठे निर्माण करणे हे तसे जास्त कष्टाचे आणि जास्त खर्चिक असते. वर वर्णन केलेल्या दुहेरी वापरासाठी, हेतुसाठी, अशा टाक्यांची निर्मिती किफायतशीर ठरली असावी. केवळ पाणी साठविण्यासाठी म्हणून खडकामध्ये टाके निर्माण करणे ही बाब आर्थिकदृष्ट्या न परवडणारी आहे. त्याची गरज पण नाही. यातील बारकावा सध्याच्या काळात शीवकालीन पाणी पुरवठाच्या व्यवस्था राबवितांना लक्षात घेण्यासारखा आहे. अन्यथा खर्च वाया जातो.

यमुनेकाठचा ताजमहाल हा खोल पाया असलेल्या ठिकाणी बांधलेला गेला आहे. पृष्ठभागावर खडक लागत नाही. मऊ वाळूमिश्रीत मातीमध्ये अशा विशाल वास्तू कशा बांधल्या गेल्या असाव्यात यावर साोंधन होण्याची गरज आहे. असे कळते की, या इमारतीसाठी वेल फाऊंडेशन (Well foundation) या तंत्राचा वापर करण्यात आलेला आहे. हे तंत्र देखील त्या समाजाला त्या काळी अवगत होते हे यावरून दिसून येते.

पाणी उचलण्यासाठी रहाटगाडगे याचा वापर सर्रासपणे होत असे. वाई येथील मोतीबागेतील रहाटगाडगे आजसुध्दा आपणास पहावयास मिळते. विजेची उपलब्धता वाढली आणि या जुन्या खर्च न कराव्या लागणार्‍या व्यवस्था नामशेष झाल्या. ही मोठी चूक झाली असेच म्हणावे लागेल. सर्वच कराणांसाठी वीजेचा वापर हा आर्थिकदृष्टया आणि उपलब्धतेच्या दृष्टीने पण परवडणारा नाही. जिथे शक्य असेल त्या ठिकाणी अशा जुन्या साधनांना परत वापरात आणावयास पाहिजे. काळ त्याचे उत्तर देईल. अलिकडे बर्‍याचशा ठिकाणी रसवंतीगृहे बैलाच्या शक्तीने चालविली जात आहेत. बैलाच्या मोटेने पाणी उचलण्याची व्यवस्था पण कार्यान्वित होण्यास काहीही हरकत नसावी. या देशामध्ये पशुधन फार मौल्यवान आहे. एक बैलजोडी म्हणजे साधारणत: एक अश्वशक्ती (Horsepower) या गणिती हिशोबाने या पारंपारिक व्यवस्थेचा आपण वापर करू शकतो.

देशभरात मंदिरांचे जाळे आहे. बहुतांश ठिकाणी त्याला जोडून तलाव आहेत. या मंदिरांच्या शिखरावर वा छतावर पडलेले सर्व पाणी तलावामध्ये साठविण्याची परंपरा अतिशय कुशलतेने अनेक ठिकाणी राबविली गेली असल्याचे आपणास दिसून येते. पाण्याजवळ मंदीर हा एक आणखी वेगळा प्रवाह निर्माण झाला आहे. पाणी हे देवाचे आहे, त्याची स्वच्छता राखणे हे आपले कर्तव्य आहे, पाणी प्रदूषित करू नये, पाण्यामध्ये पाय धुवू नयेत असा नकळत संदेश पाण्याजवळच्या मंदिरामुळे मिळतो. याचा वापर इतिहासकाळात सर्रासपणे करण्यात आलेला दिसून येतो. मंदिराचा दुसरा वापर हा छतावरील पाणी साठविण्यासाठी पण केलेला आहे. मदुराई येथील मिनाक्षी मंदीर हे त्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. अशाच प्रकारची व्यवस्था हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, केरळ, गुजराथ, राजस्थान, गोवा या ठिकाणी पण आपणास पहावयास मिळते. अनेक तलावांना (Temple tank) मंदीर तलाव या नावानेच संबोधिले जाते. रांजणगावचा गणपती, त्र्यंबकेश्वरचे मंदीर, राजूरचा गणपती, मद्रास शहरातील कंपालेश्वराचे मंदीर, गोव्यातील मंगेशी मंदीर, श्रीलंकेतील बौध्दमंदीर अशी अगणित उदाहरणे देता येतील.

गौंड राजाच्या कारकिर्दीत बल्लारशहा किल्ला वर्धा नदीच्या काठावर वसविलेला आहे. वर्धा ही शक्तीशाली नदी आहे. किल्ल्याची तटबंदी वर्धा नदीला खेटून आहे. शेकडो वर्षांपासून ही नदी या किल्ल्याला घासून जाते. किल्ल्याची तटबंदी स्थिर आहे. किल्ल्याचा दगड निखळलेला नाही. या किल्ल्यामुळे वर्धा नदीच्या पात्राला वळण मिळालेले आहे. आणि त्या अर्थाने बल्लारशहा या ऐतिहासिक ठिकाणाचे नदीच्या पुरापासून संरक्षण पण झाले आहे. नदी सुरक्षितपणे कशी वळवावी (River training) याचे बल्लारशहा किल्ला म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे असेच म्हणावे लागेल.

जलव्यवस्थापनामध्ये ही जी उत्तुंग साधने निर्माण करण्यात आलेली आहेत, या जुन्या साधनांचा नवीन व्यवस्था निर्माण करीत असतांना एकत्रितपणे विचार करण्याची नितांत गरज आहे. तसे आतापावेतो झालेले नाही. जुन्या व्यवस्था या विचारपूर्वक केल्या गेल्या आहेत. सर्वच व्यवस्था जशा आहेत तशा वापरता येणार नाहीत हे देखील तितकेच सत्य आहे. पण ज्या व्यवस्था आपण अल्पशा खर्चाने कार्यान्वित करू शकू त्या निश्‍चितपणे कार्यान्वित केल्या पाहिजेत. आड, बारवा, तलाव ही साधने निरंतर उपयोगात येणारी आहे. कोणताही काळ, कोणतेही शासन या व्यवस्थेला अस्पर्श नाही आणि म्हणून जीवनाच्या ज्या ज्या ठिकाणी अशा व्यवस्थेचे पुनरूज्जीवन करणे शक्य आहे, त्या त्या ठिकाणी नव्या जुन्याचे एकत्रित नाते निर्माण करणे हे गरजेचे राहणार आहे.

हैद्राबादचा गोवळकोंडा किल्ला, देवगिरीचा भुईकोट किल्ला, मांडवगड या ठिकाणी स्वच्छतागृहांची निर्मिती अतिशय कल्पकतेने केलेली आपणास दिसते. केरळमधील पद्मनाभन महाल या ठिकाणी पण आपणास ही व्यवस्था दिसून येते. जुन्या काळी पण स्वच्छतेचा एक भाग म्हणून अशी स्वच्छतागृहे किल्ल्यामध्ये म्हणजेच शहरामध्ये वापरली जात होती असेच दिसून येते. आपले पूर्वज कसे पाहात होते, हे यावरून शिकण्यास मिळते. कदाचित आताच्या पिढीला हा इतिहास जर आपण व्यवस्थितपणे सांगू शकलो तर स्वच्छतेविषयीच्या मानसिकतेत बदल होईल असे वाटते.

जलव्यवस्थापनातील अनेक वास्तूंची रचना ही अचूक आहे. symmetrical बांधकाम आहे. चंद्रपूर किल्ल्यात गौंड राजवटीचे समाधीस्थळ आहे. त्या ठिकाणी आपणास असे लक्षात येते की येथील वास्तू, इमारती या बांधकामातील उत्तम नमुने आहेत. ताजमहालची निर्मिती या इमारती पाहून तर झाली नाही ना असे वाटून जाते. नदीवर बांधली गेलेली धरणे, जमिनीवर निर्माण केलेले कालवे, यामध्ये अचूकता होती. सातारा शहरासाठी कास तलावावरून, २२ किलोमीटर अंतर कापून अतिशय कठीण अशा सह्याद्रीच्या रांगांमधून कालवा काढलेला आपणास दिसून येतो. त्या काळी सर्वेक्षणाची साधने, तुटपुंजी असतांना पण या व्यवस्था कशा निर्माण केल्या असाव्यात याची फक्त कल्पना केलेलीच बरी, याच कालव्यावर सातारा शहराजवळ सह्याद्रीच्या रांगेच्या उंचीचा फायदा घेवून राज्यातलं हे पहिलं (व देशातल एक) लघु जलविद्युत केंद्र आहे. त्या काळामध्ये (विसाव्या शतकाच्या सुरूवातीला १९१६) एक लघु विद्युतगृह (५० कि. वॅ x २) निर्माण केल्याचे दिसून येते. टाटांनी १९१० च्या दरम्यान पूर्ववाहिनी पाणी पश्‍चिम वाहिनी करून जलविद्युत केंद्राची मुहूर्तमेढ रोवली. कास तलावाचे पाणी पुढे सातारा शहरात भूमिगत कालव्याच्या मदतीने पिण्याच्या पाण्यासाठी खेळविलेले आहे. हे आज पण त्या ठिकाणच्या अस्तित्वात असलेल्या अवशेषांवरून दिसून येते.

इतिहासकाळात जलव्यवस्थापनाची सामुग्री ही त्या ठिकाणी उपलब्ध परिस्थितीतून मिळवली आहे. राजस्थानमध्ये पाऊस कमी पडतो, कधीतरी पडतो. तरी पण त्या समाजाने शहर असो वा ग्रामीण भाग, पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब आपल्या दारात, आपल्या घरात टाक्याच्या स्वरूपात साठवून ठेवण्याचे तंत्र आत्मसात केले होते. ग्रामीण भागात सुध्दा दारासमोर जमिनीमध्ये खोदून टाके निर्माण केलेले आहेत. साधारणत: एक ते दोन एकराचा भाग एका विशिष्ट प्रकारच्या मातीने सारवून त्यावर पडलेले पाणी त्या टाक्यांमध्ये साठवून वर्षभर त्या पाण्याचा वापर करणारी ही ग्रामीण व्यवस्था राजस्थानची जलसंस्कृती आहे. शहरामध्येसुध्दा छतावरील पडलेले पाणी बैठकीच्या खाली साठवून ठेवणे हे त्यांच्या वास्तु निर्मितीच्या शास्त्रात फार पूर्वीच अंतर्भूत झालेले आहे.

या सर्व व्यवस्था लोक सहभागातून निर्माण झाल्या. लोकांनी वेळ दिला, कष्ट दिले, प्रसंगी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. लोकांच्या समितीने याचे परिचालन केले. या व्यवस्थेमध्ये महिलांना पण स्थान होते. औरंगाबाद या ठिकाणी बायजाबाई ही महिला एका वसाहतीला पाणी पुरवठा करण्यामध्ये पुढाकार घेते. अहिल्याबाई होळकर, राणी प्रभावती देवी, राणी दुर्गावती अशी अनेक उदाहरणे आपणास महिलांच्या सहभागाविषयी सांगता येतील. छतावरील पाणी साठविण्याची व्यवस्था पाहणारी ही घरातील महिलाच आहे. या इतिहासकालीन व्यवस्था हाताळण्यास सोप्या होत्या, परवडणार्‍या होत्या, स्थानिकरित्या दुरूस्त करण्यासरख्या होत्या, बोजड अवघड, न समजणारे तंत्रज्ञान अंतर्भूत असलेल्या व्यवस्था ग्रामीण लोकांवर लादणे म्हणजेच त्या व्यवस्थेला लवकरच पूर्णविराम देणे असा याचा अर्थ निघतो, असाच अनुभवपण आहे. याचे प्रत्यंतर स्वातंत्र्यानंतर ज्या पध्दतीने आपण पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला त्यातून मिळते. इतिहासातून आपण शिकावयास पाहिजे. व्यवस्था मग ती ग्रामीण असो वा शहरी, हाताळण्यास सोपी असण्याची गरज आहे.

गाव त्या ठिकाणी तलाव, त्या ठिकाणी मंदीर, त्या ठिकाणी आड, विहीरी आणि या बरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गावाच्या जवळच देवराया निर्माण केल्याची उदाहरणे पण आपण पाहू शकतो. जागोजागी या देवराया म्हणजे वृक्षांचे आगर आहेत. हे वृक्ष म्हणजे देवाचे वृक्ष. ते कोणीही तोडू नये. तोडणे म्हणजे पाप करणे हा भाव त्या काळी लोकांमध्ये रूजविला गेला. यामुळे हजारो वर्षापासून असे वृक्षांचे पुंजके, देवराईच्या स्वरूपात सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत पण शिल्लक राहिलेले आहेत. यातून खूप मोठे तत्वज्ञान बाहेर येते. समाज बांधणीसाठी लोकांच्या भावना वापरण्याची गरज आहे हा यातील खोलवरचा विचार आहे.

किल्ला हा स्वयंपूर्ण करण्यासाठी काही ठिकाणी किल्ल्यामध्ये धान्य पण पिकविले जात असे. आंध्र प्रदेशातील वरंगलचा किल्ला हे याचे उत्तम उदाहरण आहे. किल्ला विशाल आहे, भुईकोट आहे, किल्ल्याला मातीची तटबंदी आहे. चोहोबाजूने तलाव आहेत, आणि त्या तलावाचे पाणी आत घेवून भात शेती केली जात असे. शत्रूचा वेढा जास्त काळ पडला तरी अन्नधान्याची तूट पडू नये हा या पाठीमागील विचार असावा.

पिण्याच्या पाण्यासाठी जे तलाव निर्माण केले त्या तलावातील पाण्याची शुध्दता राखणे हा एक मोठा प्रश्‍न असतो. तलावातील पाणी प्रदूषित जर केले तर ते आरोग्याला हितकारक राहत नाही. शुध्दीकरणासाठी जास्त प्रयास करावा लागतो, खर्च जास्त येतो. यावर मात करण्यासाठी म्हणून पूर्वीच्या काळी काही ठिकाणी अतिशय कल्पकतेने प्रदूषित पाणी तलावात येवू नये म्हणून व्यवस्था केलेल्या आहेत. अशीच एक व्यवस्था पुणे येथे कात्रज घाटाच्या पायथ्याशी कात्रज तलावाच्या बाबतीत दिसून येते. तलावाच्या पाणलोटात पडलेले पावसाचे पहिले पाणी पृष्ठभागावरील घाण बरोबर घेवून येते, म्हणून तलावात न घेता बाजूने काढून खालच्या बाजूला नदीमध्ये वळविण्यात आले आहे. दुसरा पूर हा तलावात घेतला जातो. अशी दुहेरी दरवाजे असलेली व्यवस्था आपणास कात्रज या ठिकाणी पहावयास मिळते. त्या समाजाने किती वेगळा विचार केला आहे हे यातून आपणास दिसून येते. हा विचार राबविण्यास पण सोपा आहे. छतावरील पाणी साठविण्याच्या व्यवस्थेमध्येसुध्दा छतावर पडलेले पावसाचे पहिले पाणी टाक्यामध्ये साठवित नाहीत. ते बाहेर वाहून जावू दिले जाते. या ठिकाणी सुध्दा हाच भाव आहे.

ब्रिटीशांच्या कालखंडात मुंबई शहरासाठी वैतरणा नदीवर मोडकसागर, तानसा नदीवर तानसा या जलाशयाची निर्मिती करण्यात आली. पाण्याची शुध्दता राखण्यासाठी या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मनुष्य वस्ती करण्यास, जनावरांचे पालन करण्यास एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस प्रतिबंध करण्यात आलेला आहे असे समजते. ही व्यवस्था आज सुध्दा चालू असावी. यामुळे तलावात येणारे पाणी हे तुलनेने स्वच्छ असेल आणि त्यावर पुन्हा स्वच्छतेची प्रक्रियाकरण्यासाठी सोपे जाईल, कमी खर्च येईल असा यापाठीमागचा हेतू आपणास दिसून येतो. पिण्याच्या पाण्यासाठी आपण जे तलाव निर्माण करतो किमान त्या तलावाच्या पाणलोटामध्ये तरी ही काळजी घ्यावयास पाहिजे हे यावरून शिकता येते.

पाणी वाटपात लोकशाही असण्याची गरज आहे, लोकशाही लोकांच्या सहभागातून निर्माण होते. तापी खोर्‍यातील फड पध्दतीच्या व्यवस्थेत, विदर्भातील गौंडकालीन तलावाच्या व्यवस्थेत देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील इतिहासकालीन तलावाचे पाणी व्यवस्थापनात लोक सहभागाचे आणि लोकशाहीचे तत्व अंगिकारले होते. अंबाजोगाई जवळ धर्मापुरी म्हणून एक ऐतिहासिक स्थळ आहे. त्या ठिकाणी किल्ला आहे, त्या ठिकाणी जुने मंदीर पण आहे. त्या मंदिरावर एक उत्तम शिल्प आहे. हे शिल्प आपणास फार अंतर्मुख करण्यास भाग पाडते. शेकडो वर्षांपूर्वी या शिल्पाची निर्मिती झाली असणार. त्या शिल्पामध्ये महिला खडू व फळ्याचा वापर करून मुलांना शिकवते असे दृष्य आहे. इतिहासकाळात महिला शिक्षण देण्यासाठी समाजामध्ये वावरत होत्या. समाजाने महिलांना तो हक्क दिलेला होता, महिलांमध्ये ती क्षमता होती हेच त्यावरून दिसून येते. वेरूळ अजिंठाच्या लेण्यांमध्ये महिला पुरूषांबरोबर दैनंदिन जीवनामध्ये मुक्त व्यवहार करीत असल्याचे त्या शिल्पावरून, चित्रावरून आपणास दिसून येते. महिला या पडद्याआड नव्हत्या. पुरूषांच्या बरोबरीने त्या व्यवहार करीत होत्या असाच यातून अर्थ निघतो आणि म्हणूनच इतिहासामध्ये जेव्हा गरज निर्माण झाली, जेव्हा संधी आली, तेव्हा अनेक महिलांनी समर्थपणे राज्यशकट पण चालविलेले आहे असे पुरावे आहेत.

सम्पर्क


डॉ. दि. मा. मोरे. पुणे - मो : ०९४२२७७६६७०

Path Alias

/articles/vaarasaa-paanayaacaa-bhaaga-18

Post By: Hindi
×