वारसा पाण्याचा - भाग 17


अपवादाला पण त्या वाटेवरील गावाच्या तहानेची आपण काळजी घेतली आहे. दारातून पाणी जाते. त्यांच्याच भागातील पाणी पण त्यांना वापरण्याचा अधिकार नाही. अशीच परिस्थिती मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या व्यवस्थेत आहे. वाटेतील आदिवासी गावांना पाणी दिले जात नाही. अशी विषमता जुन्या काळात नव्हती. त्यामुळे जल व्यवस्थापनातील प्रश्‍न अधिक गुंतागुंतीचे झाले असेच म्हणावे लागेल.

भारतभर जल व्यवस्थापनाची वेगवेगळी साधने आपणास अनेक ठिकाणी पहावयास मिळतात. ही साधने म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रातील मानव निर्मित उत्कृष्ट कलाकृती आहेत. त्याच्या मागचे ज्ञान हे आजच्या पेक्षा तसूभरही कमी नव्हते. या वास्तू सौंदर्याने नटल्या आहेत. या भौतिक सौंदर्याबरोबर आणि अभियांत्रिकी उंचीबरोबरच त्या साधनामध्ये काळाबरोबर वाटचाल करण्याची क्षमता होती. याचे गमक त्या व्यवस्था हाताळण्यातील सोपेपणात आहे. नियमनासाठी नियंत्रणाची गरज नव्हती. थोडक्यात या व्यवस्था zero control and zero maintenance या तत्वावर चालत होत्या.

या सर्व व्यवस्था / साधने लोकांनी निर्माण केलेल्या होत्या. लोकांचे कष्ट, श्रम हे त्यांचे भांडवल होते. या भांडवलाचा त्यांनी अतिशय तारतम्याने उपयोग केलेला आपणास दिसून येतो. अनेक साधनांचे सौंदर्य कलेच्या दृष्टीने अलौकिक आहे. या व्यवस्थेची रचना व मांडणी अतिशय आकर्षक आहे व अपवाद न वगळता या साधनाच्या रचनेमध्ये सारखेपणा (symmetry) आहे. आणि म्हणून हजारो वर्षाच्या कालखंडात पण भूकंप, वादळ, पूर या सारख्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देत न ढळता उभ्या आहेत.

नळदुर्गचा जलमहाल, मदुराईचे मिनाक्षी मंदीर, हंपी येथील राणीचे स्नानगृह (queen’s bath), पाटण येथील राणीची बारव, मुथेरा येथील सूर्य मंदीर, बहादूर गड येथील झेलमोट, बाळापूर अकोला येथील बागबारव या वास्तू हजारो वर्षापासून उभ्या आहेत आणि त्या उभ्या रहाणार. रचनेतील वैशिष्ट्याबरोबरच त्याच्या निर्मितीसाठी वापरलेल्या साहित्याची गुणवत्ता आणि कारागीरांचा कुशलपणा पण वाखाणण्यासारखा असणार. वास्तूला जी नावे दिलेली आहेत, (राणीचे स्नानगृह, राणीची बारव, सूर्य मंदीर इ.) ती पण विचारांती दिलेली आहेत असे दिसते. ही वास्तू राणीची आहे, ही वास्तू देवासाठी आहे. अशी भावना त्या कारागीरांच्या मनात सातत्याने तेवत राहते. आणि मग यातून त्याच्या हातून निर्मितीमध्ये यत्किंचितही त्रुटी राहात नव्हती. वापरले गेलेले साहित्य हे उत्तमच असावयास पाहिजे असा आग्रह होता. दोन दगडामधील जोड ही धातूची वा पक्क्या सांध्याची (male – female joint) दिलेली आहे. त्यामुळे तीव्र अशा भूकंपाच्या धक्क्यात पण वास्तू खिळखिळ्या होवू नयेत हा विचार त्या पाठीमागे होता.

रचनेतील या वैशिष्ट्यापासून आपणास खूप काही शिकावयास मिळते. येणार्‍या काळात आपणास भूकंपाबरोबर जगणे भाग पडत आहे आणि अशा परिस्थितीत आपण निर्माण करावयाच्या वास्तू कशा असावयास पाहिजे याचे शिक्षणच या ऐतिहासिक वास्तूतून मिळते.

या वास्तू लोक कौशल्यातून निर्माण झाल्या या विषयीची चर्चा आपण यापूर्वीच केलेली आहे. दक्षिण भारतात एक गाव असे आहे की ते शिल्पकाराचे गाव म्हणून ओळखले जाते. तेथील मुले शाळेत जात नाहीत. पण पाच सहा वर्षाची असल्यापासून छिन्नी हातोडा हातात धरायला शिकतात. अशीच उदाहरणे आपल्या अवती भवती पण पहावयास मिळतात. रस्त्यावर तात्पुरता आसरा करून दर आठवड्याला मुक्काम बदलणार्‍या भटके कारागीरांच्या हातातील कला अशीच उपजत आहे. परंपरेची ही त्याला देण आहे. वडीलांनंतर मुलगा आपोआप हात चालविण्यास शिकतो. कुंभारांच्या शाळा नाहीत, पण मातीचे भांडी बनवणार्‍या कलाकारांची उणीव नाही. कुठल्या शाळेमध्ये ते ही कला शिकले ? त्यांची शाळा म्हणजे त्यांचा समाज.

अनुभवातून त्यांनी पारंगतता मिळविली. तथाकथित शाळेची महाविद्यालयाची त्यांच्याकडे पदवी नसेल म्हणून आपण त्याला शहाणे म्हणणार नाही का ? ज्ञान म्हणजे knowledge आणि wisdom म्हणजे शहाणपण या दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. ज्ञानी माणूस हा शहाणा असेलच असे नाही. परंतु शहाणा माणूस अडाणी कसा ? ज्याच्याकडे शहाणपण आहे तो फार ज्ञानी नसेल पण कठीण परिस्थितीत शहाणपण कसा वापरावा आणि खर्‍या ज्ञानाचा अविष्कार कसा करावा हे त्याला आपोआप समजते. ही उपजत उर्मी, प्रतिभा त्याच्याकडे धाव घेत असते. जातीने वडार असलेली मंडळी दगडातून उत्तम शिल्पे निर्माण करतात. त्या शिल्पात भाव ओततात. अशा कलाकृती तन्मयतेतून साकार होतात. सांगली जिल्ह्यातील विटा हे गाव सोनार या कलाकारांना जन्म देणारी खाण आहे. येथून देशभर सुवर्णकारांचे काम करणारी मंडळी बाहेर पडतात. या गावी सोनाराचे शिक्षण देणारी कसलीही संस्था नाही.

ग्रामीण भागात लोखंडासारख्या कठीण धातूला पाहिजे तो आकार देणार्‍या कारागिरांचा समूह आहे. या सर्वांचे आकलन होणे कठीण आहे. नेमकी हीच कुशलता, हाच भाव जलव्यवस्थापनेतील या साधन निर्मितीच्या पाठीमागे असणार यात शंका नसावी. जीवन समृध्द करण्यासाठी इतिहासकाळापासून वेगवेगळ्या प्रकारची साधने वेगवेगळ्या कालखंडात निर्माण करण्यात आली. काही साधनांचे उद्दिष्ट सारखे आहे. काहींचे वेगवेगळे आहे. काही तलाव पुनर्भरणासाठी आहेत. काही तलाव सिंचनासाठी आहेत. या साधनांच्या पाठीमागे सामाजिक शास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, सामाजिक न्यायाचा भाव पण आहे. या देशाचा भूगोल, वातावरणातील चढउतार सर्व ठिकाणी सारखे नाहीत. पावसाचे प्रमाण वेगवेगळे आहे, त्यातील दोलायमानता पण वेगळी आहे. बांधकाम साहित्याची उपलब्धता पण वेगवेगळी आहे. राज्याकर्त्यांचा व्यवहार हा सारखा असेलच असे नाही. या सगळ्यांचा मेळ घालून विविध प्रकारच्या साधनांची निर्मिती झालेली आहे.

गेल्या दोन अडीच हजार वर्षांच्या कालखंडात या व्यवस्था निर्माण झाल्या त्या कालखंडातील समाजाला, लोक समुहाला, कारागिरांना भूगोलाचे ज्ञान होते. त्यांना जलविज्ञान माहित होते, त्यांना हवामानशास्त्र माहित होते, त्यांना जलगतीशास्त्र ज्ञात होते, वक्र नलिकेचे तत्व माहित होते. भूस्तर ओळखण्याची ताकद त्यांच्यात होती. भूगर्भशास्त्र त्यांना माहित होते. भूजलाची निर्मिती कशी होते व त्यांच्या वापरासाठी कोणते गणित पाळावे लागले याची त्यांना जाणिव होती. आणि म्हणूनच कोणत्याही आडाचे पाणी आटत नसे. कारण त्या आडाला पाणी पुरवठा करणार्‍या पुनर्भरणाच्या साधनांची कशी काळजी घ्यावी याचे ज्ञान त्यांच्याकडे होते. वाडा तेथे आड हे तत्व त्यांनी सार्वत्रिकपणे राबविलेले होते.

घराच्या छतावरील पाणी वाड्यात घेवून त्याला जमिनीमध्ये मुरू देवून, भूगर्भात पाण्याचा साठा करून त्याद्वारे स्वच्छ व टिकाऊ पाणी पुरवठा करणार्‍या या व्यवस्थेला तोड नसावी. महाराष्ट्रातील बीड, वाशी या ठिकाणच्या आडाची घनता कदाचित देशामध्ये सर्वाधिक असावी. अशा गावाचा अभ्यास करण्याची गरज भासते. त्या समाजाने तलावांची पूजा केली, विहीरींची पूजा केली, दर वर्षी तलावातील, विहीरीतील गाळ काढून व तो शेतीत वापरून हलक्या जमिनीची सुपिकता वाढविली. याचे शिक्षण त्यांनी मागच्या पिढीकडून मिळविले. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सामुहिक शक्तीद्वारे तलावातील, आडातील गाळ काढण्यात येत असे. यासाठी लागणार्‍या श्रमरूपी भांडवलाची विभागणी होत असे. घरटी एक माणूस हे त्यांचे गणित होते.

तलावातील गाळ मात्र ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार, कुवतीनुसार काढून घेवून जाण्याची मोकळीक असे. हे काम पिढ्यांपिढ्या चालत राहिले. या साठी कोणत्याही कायद्याची गरज भासली नाही. कर्नाटकात अगदी अलीकडच्या काळात आणि काही ठिकाणी आजसुध्दा (तळभोग, प्रतापपूर, ताबसव - कल्याण) या ठिकाणी जुन्या तलावातील गाळ लोक स्वेच्छेने काढून घेवून जातात आणि तलावाची क्षमता वाढवतात. कुंभार या बलूतेदारानी हा गाळ काढून घ्यावा असे पण अपेक्षित होते.

या देशामध्ये पाण्याची स्वयंपूर्णता आणण्यासाठी आड, विहीर, बारव, पुष्करणी, कुंड याची रेलचेल करण्यात आलेली आहे असेच म्हणावे लागेल. एक शास्त्र त्यांनी पाळले आणि ते म्हणजे पुनर्भरणाचे. गुजरातमधील पाटण येथील सातमजली राणीच्या बारवेला बारमाही करण्यासाठी लगतच सहस्त्रलिंग तलाव निर्माण केलेला आहे. सरस्वती नदीचा प्रवाह या तलावात आणला आहे. पुनर्भरणाच्या साधनाविना (तलाव, नदी, नाला) बारव, विहीर, आड याची निर्मिती म्हणजे अपवादच मानावा लागेल. परभणी जिल्ह्यातील पिंगळी येथील बारवी ओढ्या लगत आहेत. हा ओढा या बारवेचे पुनर्भरण करतो. चारठाणा येथील बारवेस वरच्या भागातील तलावाद्वारे पुनर्भरण केले आहे. त्या काळात सिंचनपण मोठ्या प्रमाणावर भूजलावर अवलंबून होते. शेतातील विहीरीला शेतातील तलावाचा आधार देणे हे त्यांना जमलेले होते. अशा रीतीने शेत तेथे शेततळे हे तत्व त्यांनी राबविले होते. आड बारव इ. साधने त्यांनी अतिशय कलात्मक पध्दतीने निर्माण केली आहेत. दोन ते तीन फूट व्यासाचे आड खोलपर्यंत तयार करण्याची कला त्या समाजाला सहजगत्या अवगत झालेली होती.

मातीचे धरण, दगडी धरण, दगडी बंधारे, कालवे, बोगदे इ. व्यवस्था निर्माण करण्याची कला व शास्त्र त्यांच्याकडे पारंपारिक पध्दतीने आलेले होते. सिंचनासाठी पाण्याचा वापर, घरगुती वापरासाठी पाणी, पिण्यासाठी वेगळे पाणी, यांत्रिकी शक्तीसाठी (पानचक्की) पाणी, मनोरंजनासाठी पाण्याचा वापर, तापमान कायम राखण्यासाठी पाणी, स्वच्छतेसाठी पाणी, पर्यावरणासाठी पाणी, संरक्षणासाठी पाणी, सैन्यासाठी पाणी, वाहतुकीसाठी पाणी, फळाच्या व फुलांच्या बागा फुलविण्यासाठी पाणी, मत्स्यपालनासाठी पाणी अशा विविध उपयोगासाठी त्या समाजाने कौशल्य वापरून पाणी उपलब्ध करून घेतले व त्याचा वापर केलेला आहे.

पाणी शुध्द करण्याचे शास्त्र पण त्यांनी समजून घेतले होते. कंधार येथील जगतुंग समुद्र आणि मांडवगड येथील पाणी रूपमतीच्या महाल या ठिकाणी राबविलेल्या जलशुध्दीकरणाच्या व्यवस्था आज पण तेथील त्याच्या अवशेषावरून दिसून येतात. माती आणि पाण्याचे संधारण करून पाणलोट क्षेत्र विकास घडवून आणणे हे देखील त्यांना जमले होते. किंबहुना सार्वत्रिकपणे त्याचा वापर ते करीत होते हे आपणास सिंदखेडराजा, शिखर शिंगणापूर इ. ठिकाणच्या जुन्या अवशेषावरून सहजपणे लक्षात येते. वाळूवर महाकाय बंधारे बांधण्याचे शास्त्रपण त्यानी विकसित केले होते कावेरीवरील बंधारे, यमुनेवरील बंधारे ही काही त्यांची उदाहरणे होत.

तलावांची मालिका निर्माण करणे, बंधार्‍यांची मालिका निर्माण करणे याचे कसब त्यांच्याकडे होते. कालव्यावर पूल बांधणे, वक्रनलिका पध्दतीने पाणी दुसर्‍या नदी खोर्‍यात वळविणे हे शास्त्र देखील त्यांना ज्ञात होते. पाणी वाटपातील न्याय वाटप त्यांनी कृतीमधून व्यवहारात आणला होता, फड पध्दतीचे सिंचन, कोल्हापूर येथील पंचगंगा नदीवरील सिंचन, ही त्याची काही उदाहरणे आहेत. नदी वळविणे, नद्या जोडणे हा विषय त्यांना नवीन नव्हता. औरंगाबाद येथे बायजाबाई या महिलेने बायजीपुरा या जुन्या वस्तीत पळशी या गावातून पळशी नदीवर बंधारा बांधून सुखना या नदी खोर्‍यातून खांब नदीच्या खोर्‍यात भूमीगत कालव्याद्वारे पाणी आणल्याचे उदाहरण आज पण आपण डोळ्याने पाहू शकतो. आणि म्हणून inter basin transfer, inter linking of rivers हा विषय त्यांना नवीन नव्हता. असेच म्हणावे लागेल.

याचाच मागोवा घेवून ब्रिटीश कालखंडात केरळ मधील पेरियार या पश्‍चिम वाहिनी नदीचे पाणी पश्‍चिम घाटात अडवून बोगद्याद्वारे पूर्व माहिनी करून वैगई या नदीत आणून तामिळनाडू राज्यातील मदुराई सारख्या तुटीच्या प्रदेशात संपन्नता निर्माण केली गेली. पश्‍चिम वाहिनी पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पूर्व वाहिनी करण्याचे हे देशातील पहिलेच उदाहरण आहे.

जमिनीमध्ये बोगदे खोदण्याचे शास्त्र ते उत्तमपणे हाताळत होते, असे अनेक ठिकाणच्या उदाहरणावरून आपणास दिसून येते. फड पद्दतीच्या बंधार्‍यांसाठी मऊ मातीत पण बोगदे खोदून पाणी वाहून घेवून जाणार्‍या व्यवस्था आपल्या डोळ्यापुढे आहेत. त्या हजारो वर्षांपासून आजपर्यंत कार्यरत आहेत. औरंगाबाद येथे थत्ते नहरीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जवळील टेकडी ७० - ७५ फूट खोल खोदलेली दिसते. नहर बांधल्यानंतर परत तो खोदलेला भाग भरून कालवा शास्त्रातील cut and cover हे तंत्र शेकडो वर्षांपूर्वी राबविलेले दिसून येते. शहरातील पाणी पुरवठा हा बंद नलिकेतून, भूमिगत कालव्यातून केला जात असे. या नलिकांचा कोठेही नियंत्ररक व्हॉल्व्ह (valve) बसविलेला नव्हता. सकाळी आणि संध्याकाळी पाण्याचा वापर जास्त होतो. मधल्या काळात आणि रात्री या भूमिगत कालव्यातून, नलिकेतून अविरतपणे वाहणारे पाणी वाया जावू नये म्हणून शहरामध्ये हौदांचे जाळे निर्माण केलेले होते.

औरंगाबाद शहरात असे किमान ७१३ हौद होते. हौदाची रचना बांधकाम वास्तूकलेचा उत्तम नमुना होता. नहरेअंबरी म्हणून प्रसिध्द असलेल्या नहरीचा शेवट शहागंज येथील विस्तीर्ण अशा हौदात केला आहे. या हौदात भूमिगत नहरी नलिकेतून आलेले पाणी मध्या काळात (non peaking hours) साठविले जात असे. कालव्याचे, नलिकाचे बांधकाम दगड विटांमध्ये केलेले आहे. काही नलिका दगडात पण कोरलेल्या आहेत. हिमाचल प्रदेशामध्ये झर्‍याचे पाणी वळविण्यासाठी बांबूंचा पण नलिका म्हणून वापर केलेला आहे. कालव्यासाठी जलसेतू पण बांधलेले आहेत. आग्रा येथील ताज जलसेतू हा रोमन जलसेतूच्याही पुढे एक पाऊल टाकतो. शिरोंचा जवळील बामणी या गावाच्या शिवारात लोक सहभागातून निर्माण केलेल्या कालव्यासाठी झाडाचा बुंधा कोरून जलसेतू म्हणून वापर करून आज पण सिंचन करीत असल्याचे दिसून येते. याचाच अर्थ असा होतो की, जी सामुग्री स्थानिक पातळीवर उपलब्ध असेल त्याचाच वापर करून जल व्यवस्थापनातील गरजा भागविण्याला अग्रक्रम दिलेला होता. कोकण आणि सह्याद्रीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झर्‍यावर सिंचन केले जाते. बाष्पीभवनापासून पाण्याचे संरक्षण करण्यासाठी अनेक ठिकाणी विहीरी झाकलेल्या दिसतात.

पुण्याजवळ धायरी येथे पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी विहीर ही झाकलेली आहे. मांडवगड येथील विहीरीचे नांवच अंधेरीबाव असे आहे. नाशिक मुंबई रस्त्यावर इगतपुरी येथे अतिशय कलात्मक पध्दतीने विहीर झाकलेली आहे. हिमाचल प्रदेशात सिमला, मंडी या भागात रस्त्याच्या कडेने झर्‍याचे पाणी एकत्रित करून मंदिराच्या आकाराचे आड निर्माण करण्यात आलेले आहेत. याला गुफी बावली असे संबोधिले जाते. सार्वजनिक पाणी पुरवठा करणार्‍या या व्यवस्था आज पण आपणास दिसतात. या जलसमंदिरात देवी देवतेची मूर्ती पण ठेवली जाते. यामुळे या व्यवस्थेची मोड तोड झाली नाही. पाण्याची स्वच्छता पण राखली गेली.

करमाळा येथे सात विहीरींची विहीर आहे. कोकणातील महाड येथील चवदार तळ चौदा विहीरीचं तळं आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस अमृतसर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी चाळीस विहीरी एकाच ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत. या विहीरीच्या समुहाला ‘चालिस कँुवा’ या नावाने संबोधले जाते. या विहीरींना पुनर्भरणाची सोय केलेली दिसून येते. बुर्‍हानपूर हे तापी नदीच्या काठावर वसलेले शहर आहे. या ठिकाणी १०० विहीरींची विहीर असल्याचे लोकांच्या आठवणीत आहे. या विहीरी म्हणजे सातपुडा पर्वताच्या पायथ्यातून काढलेल्या भूमिगत कालव्यावरील मनोरे (air vents) आहेत. याचा व्यास ३ ते ४ फूटाचा आहे.

हवेचा पुरवठा करण्यासाठी, नियमितपणे गाळ काढण्यासाठी (desilting) या मनोर्‍याचा उपयोग केला जात असे. भुईकोट किल्ल्याचा खंदराचा वापर पुनर्भरणाचे साधन म्हणून करण्याचे कौशल्य त्य काळात रूजलेले होते. त्या त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे खंदक भरण्यासाठी नदी, सिंचनाचा कालवा, तलाव, सांडवा इ. चा वापर अतिशय कलात्मक पध्दतीने केल्याचे अनेक ठिकाणच्या त्याच्या अवशेषांवरून दिसून येते. काही ठिकाणी या खंदकाची रूंदी वाढवून जलाशय पण निर्माण केलेले आहे. धारूर येथील किल्ला आणि नळदुर्गचा किल्ला ही त्याची उदाहरणे आहेत. धारूरच्या किल्ल्यात एका बाजूला ‘गोडी दिंडी’ आणि दुसर्‍या बाजूला ‘खारी दिंडी’ अशा नावाने खंदकातच पाण्याचे साठे निर्माण केलेले आहेत.

बिदर येथील जवळ जवळ ५०० एकर परिसरात पसरलेल्या भुईकोट किल्ल्यास तिहेरी खंदकाची सोय केलेली आहे. जगातील असे हे एकमेव उदाहरण असावे. हैद्राबाद शहराला जुन्या काळी बुलकापूर या मुसा नदीवरील तलावातून जवळ जवळ बावीस किलोमीटर लांबीच्या कालव्याद्वारे पाणी पुरवठा केला जात असे असे कळले. हा कालवा सध्याच्या हुसेन सागर या तलावात पाणी सोडत असे. वावीस किलोमीटरचा प्रवास करीत असतांना वाटेतील सर्व गावांना जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था त्या काळी करण्यात आलेली होती. ही व्यवस्था जलव्यवस्थापनातील सामाजिक आणि समन्यायी अंगाला स्पर्श करते. आधुनिक व्यवस्थेमध्ये या तरतुदी आपण केल्या नाहीत आणि शहरी व ग्रामीण समाजामध्ये दुजाभाव निर्माण केला. उजनी जलाशयातून १०० किलोमीटर अंतर कापीत सोलापूर शहराला पाणी नेले आहे. वाटेत अनेक लहान मोठी गावे आहेत.

अपवादाला पण त्या वाटेवरील गावाच्या तहानेची आपण काळजी घेतली आहे. दारातून पाणी जाते. त्यांच्याच भागातील पाणी पण त्यांना वापरण्याचा अधिकार नाही. अशीच परिस्थिती मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या व्यवस्थेत आहे. वाटेतील आदिवासी गावांना पाणी दिले जात नाही. अशी विषमता जुन्या काळात नव्हती. त्यामुळे जल व्यवस्थापनातील प्रश्‍न अधिक गुंतागुंतीचे झाले असेच म्हणावे लागेल. यातून आपण शिकावे व भव्ष्यातील प्रश्‍न कमी करावेत अशी अपेक्षा.

सम्पर्क


डॉ. दि. मा. मोरे. पुणे - मो : ०९४२२७७६६७०

Path Alias

/articles/vaarasaa-paanayaacaa-bhaaga-17

Post By: Hindi
×