तलावाचा आकार कसा निश्चित करावा हा एक नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. त्यामध्ये निसर्गातून उपलब्ध होणार्या पाण्यातील दोलायमानता हा एक महत्वाचा घटक आहे. एखाद्या क्षेत्रावर दरवर्षी किती पाऊस पडतो आणि त्यापैकी आपण किती साठवू याचे गणित महत्वाचे असते. जलविज्ञानामध्ये विश्वासार्हता हा एक शब्दप्रयोग आहे, दरवर्षी पडणारा पाऊस सारखा नसतो. पावसाचे चक्र ही १०० वर्षापेक्षा जास्त असते असे म्हणतात. पण तज्ज्ञांच्या मते प्रत्येक वर्ष हे स्वतंत्र चक्रच आहे व कोणतेही वर्ष दुसर्या वर्षासारखे नाही. दरवर्षी बदलणार्या लहरी आकडेवारीतून पाण्याचा अंदाज बांधणे व त्यावरून तलावाचा आकार म्हणजेच त्यांची क्षमता ठरविण्याचे सूत्र आपल्याला गणितीय पध्दतीने शोधावे लागते आणि यालाच विश्वासर्हतेच्या सूत्रामध्ये बांधावे लागते. विश्वासार्हता जितकी जास्त, तितकी तलाव दरवर्षी भरण्याची शक्यता जास्त. सध्या देशामध्ये बर्याचशी ठिकाणी ७५ टक्के विश्वासार्हता गृहीत धरून पाण्याचे नियोजन व जलाशयाचा आकार ठरविला जातो. अशा बदललेल्या आकड्यांचे गणितीय पध्दतीने उत्तर हे सरासरी विश्वासार्हता हे आहे. विश्वासार्हता कमी, जलाशय दरवर्षी भरण्याची क्षमता कमी. जलाशयाचा आकार मोठा, विश्वासार्हता जास्त, दरवर्षी जलाशय भरण्याची शक्यता जास्त व जलाशयाचा आकार लहान.
राजा भोज यांनी बेटवा नदीवर त्या काळातील सर्वात मोठा जलाशय निर्माण केला. भोपाळ हा जास्त पाऊस पडणारा प्रदेश नाही, भोज जलाशय मोठा, त्याची विश्वासार्हता कमी म्हणजेच तो दरवर्षी भरणार नाही. सातवाहन कालखंडात पण खडकी (औरंगाबाद) येथे खांब नदीवर राजतडाग नावाचा मोठा जलाशय निर्माण केला होता. त्याच लहानसं रूप आज आपणास हरिशूल नावाच्या तलावाच्या रूपाने पाहवयास मिळते. राजतडाग विशाल होता. त्याच्या तीरावर (घाटावर) सध्याचे शासकीय रूग्णालय आहे म्हणून त्याला घाटीचा दवाखाना असे संबोधतात. वाशीम जवळील पेनगंगा नदीच्या उपनदीवरील तीन किलोमीटर लांबीची मातीची पाळ असलेला सुदर्शन नावाचा जलाशय हे पण असेच एक उदाहरण आहे.
अलीकडच्या काळात २० व्या शतकाच्या सुरूवातीला टाटांनी सरकारशी करार करून सह्याद्रीमध्ये कृष्णाखोर्यातील पूर्ववाहिनी नद्यांचे पाणी पश्चिम वाहिनी करून विद्युत निर्मितीसाठी पाच जलाशय (मुळशी, आंध्रा वळवन, शिरोटे व लोणावळा) निर्माण केले आहेत. त्यातील मुळा नदीवर बांधलेले मुळशी हे धरण मोठे आहे. गेल्या जवळ जवळ ८५ वर्षांपासून या जलाशयात पाणी साठवून वीज निर्मिती केली जाते. या ८५ वर्षाच्या कालावधीत ही पाच जलाशये किती वेळा भरून वाहिलेली आहेत हे जर पाहिले तर असे लक्षात येते की, फार कमी वेळा ही पूर्णपणे भरून वाहिलेली आहेत. काही जलाशयाच्या बाबतीत सहा ते सात वर्षात धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहिलेलेच नाही. याचाच अर्थ असा होतो की, ही सर्व जलाशये टाटांनी त्या काळात कमी विश्वासार्हता गृहीत धरून बांधली म्हणून जलाशयाची साठवण क्षमता मोठी झाली आणि जलाशय दरवर्षी भरण्याची शक्यता कमी झाली.
आपण देशातील अलीकडील काही जलाशयांचा विचार केला तर असे दिसून येते की, अमेरिकेमध्ये काही जलाशये बांधल्यापासून एकदाही पूर्णपणे भरून वाहिलेली नाहीत. काही जलाशये १० - १२ वर्षातून एकदा भरून वाहतात. श्रीलंकेमध्ये सुध्दा हीच परिस्थिती आहे. याचाच अर्थ असा होतो की, निसर्गातील या दोलायमानतेचा विचार करून जलाशये निर्माण करतांना ती मोठ्या आकाराची करणे हितकारक असते. जलाशये मोठी याचा अर्थ त्यांच्यासाठीचा खर्च जास्त . कधी कधी जास्त क्षेत्र पाण्याखाली जाते. जास्त लोकांना याची झळ पोहचते. त्याला आर्थिक व्यवहार्यता पण तापूसन पाहावी लागते. जलाशयाचा आकार मोठा असेल तर पूर नियंत्रणासाठी पण त्याचा उपयोग करता येतो.
या उदारणावरून आपणास असे दिसून येते की, इतिहासकाळात मोठ्या आकाराची जलाशये निर्माण करण्याचे तत्व अंगिकारले होते. याचाच अर्थ कमी विश्वासार्हतेला जलाशये संकल्पित केली जात होती. नागपूर जवळील खिंडसी हा तलाव ३० टक्क्यांपेक्षा कमी विश्वासार्हतेचा विचार करून निर्माण केलेला आहे.
तुटीच्या प्रदेशामध्ये पडणारा पाऊस जास्त दोलायमान असतो. ४ - ५ वर्षातून एकदा मोठा पाऊस पडतो. अशा परिस्थितीत हा कधीतरी पडणारा जास्त पाऊस साठवून ठेवण्याची व्यवस्था दूरगामी दृष्टीने फलयादी ठरत असते. जलाशयाखाली जाणारी सर्वच जमीन ही कायमची बुडीत नसते, सर्वसाधारणत: जलाशयातील २/३ पेक्षा जास्त जमीन दरवर्षी एक बागायती पीक घेण्यासाठी मूळ मालकाला उपलब्ध होवू शकते. जलाशय निर्मितीच्या पूर्वी या बुडीत जमिनी कोरडवाहू होत्या. जलाशय निर्माण झाल्यानंतर मात्र या गाळपेर जमिनी किमान एक पीक घेण्यासाठी बागायती होतात. याचा प्रत्यय आपल्याला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसून येतो. कंधार या ठिकाणचे मानार जलाशय, पुणे येथील खडकवासला जलाशय, नाशिक जवळील दारणा जलाशय, इत्यादी ठिकाणी दिसून येतो. जलाशयाच्या भोवतीचे विस्तापित झालेले बहुतांशी लोक अनेक ठिकाणी दरवर्षी एकतरी पीक शिवाय भाजीपाल्यासारखे कमी कालवाधीचे २ - ३ पीके घेतात आणि मोठ्या प्रमाणात उत्पन्न काढतात. हा एक जमेचा भाग आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे.
या अवलोकनावरून असे दिसून येते की, पाण्याची तूट असणार्या भागात जलाशयाचा आकार सुरूवातीलाच मोठा ठेवण्याची गरज आहे. नंतरच्या कालावधीत त्या जलाशयाला मोठे करणे कठीण असते. म्हणून पाण्यातून समृध्दी गाठण्यासाठी इतिहासकाळात वापरले गेलेले हे तत्व भविष्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
वरील विवेचनात जलव्यवस्थापनातील ज्या ज्या क्षेत्रामध्ये लोक कौशल्याचे (शहाणपणाचे) दिग्दर्शन झाले त्याचा संक्षिप्त आढावा घेतलेला आहे. ज्या साधनांना प्रत्यक्ष भेटी दिल्या त्यापैकी काही साधनांचा परामर्श या विवेचनात घेतलेला आहे. भेट न दिलेल्या असंख्य व्यवस्था देशाच्या अनेक भागात विखुरलेल्या आहेत. त्यातून पण वेगवेगळे संदेश संप्रेषित होणार आहेत. या सर्व वास्तूतून लोक कौशल्याचे वेगवेगळे संदेश पुढे आणण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला आहे.
बिहार, छत्तीसगढ, झारखंड, रायपूर, रांची या विपूल पर्जन्यवृष्टी होणार्या भागातील तलावांचे जाळे, अहमदनगर जवळील चांदबिबीच्या महालाजवळच्या डोंगर रांगातील जलसंधारणाचे उपचार (लहान तलाव), हिमाचल प्रदेशातील मंदिर - वजा - विहीरी, बेळगाव शहरातील आडांचा जाळ (वैयक्तिक व सार्वजनिक उपयोगांचे एकत्रीकरण), गोवा व पारोळा (जळगाव) परिसरातील मंदिराच्या छतावरील वर्षा जलसंचय, तलावाधारित भात शेती, भूमिगत अविरत वाहणारे कालवे, नालंदा विद्यापीठ परिसरातील आड, मद्रास येथील कम्पालेश्वर मंदिराचे वर्षा जलसंचय ही ठिकाणे जलसंधारणाच्या वेगवेगळ्या अंगाचे दर्शन घडवितात. जयपूर, जोधपूर, कोल्हापूर ही शहरे पण पाण्याचा वारसा सांगणारी विद्यापीठेचे आहेत.
कोल्हापूर येथील रंकाळा तलाव आणि त्यातून पाईपलाईनद्वारे दूर अंतरावर पाणी घेवून जावून सार्वजनिक स्नानगृहे व कपडे धुण्यासाठी केलेली व्यवस्था हे तलावातील पाण्याची स्वच्छता राखण्याचा व त्यातून सार्वजनिक सोयी निर्माण करण्याचा एक आगळा - वेगळा प्रयोग समोर येतो. जयगढ (राजस्थान) येथील राजा मानसिंगाच्या महालावर केलेल्या छतावरील जलसंचयाचा उपक्रम व लगतच्याच आमेर किल्ल्यावरील वर्षी जलसंचयाचा व्यापक प्रयोग यातून खूप काही शिकता येते. जोधपूरच्या बेहराम गडावरील राहाटगाडग आज पण पाहता येते. धुळे जिल्ह्यातील साक्री गावाजवळील पांझरा नदीवरील फड कलाव्यावर सर विश्वैश्वरय्या यांनी एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस बांधलेली साधारणत: २०० ते ३०० फूट लांब व २० फूट खोल, दीड फूट व्यासाची लोखंडी पाईपमधील सायफन आज पण पूर्ण क्षमतेने कार्यरत असलेली आपणास पहावसायस मिळते. धावडशी, जिल्हा - सातारा येथील तीन तलावांची बारव विहीरजोड प्रकल्पाला जन्म देणारी ठरली आहे. या सर्व वास्तूंतून लोककौशल्याचे वेगवेगळे संदेश समोर आणण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला आहे.
या अनेक साधनांमध्ये काही उल्लेखनीय व्यवस्था दृष्टीस पडल्या. सर्वात जुनी आणि अद्याप कार्यान्वित असलेली व्यवस्था म्हणून कावेरी वरील ग्रॅन्ड ऍनिकेटचा उल्लेख करावा असे अभिमानाने वाटते. सातवाहन आणि भोजराजाच्या काळातील अनुक्रमे खडकी (औरंगाबाद) आणि भोपाळ येथील दोन मोठे तलाव पण डोळ्यापुढे येतात. वेगवेगळ्या प्रकारच्या विहीरी, आच्छादित विहीरी, तलावातील किल्ले, तलावातील विहीरी, भूमिगत कालवे, महालाला मागे टाकतील अशा बारवा, जलमहल, किल्ल्याचे तिहेरी खंदक, जीवन समृध्द करणारी, सुखद करणारी, चैनीची करणारी, मध्ययुगीन राजवटीतील हमाम, कारंजी, उद्याने अशा फार मोठ्या साधनांची यादी नजरेआड करता येत नाही, ही साधने हाताळण्यास सोपी होती. देखभालीचा खर्च अल्पसा होता. या दृष्टीने या व्यवस्था जल व्यवस्थापनेमधील अभियांत्रिकी, समाजिक, आर्थिक, न्यायिक बाबतीतील अत्युच्य शिखरे गाठलेल्या आहेत, असेच म्हणावे लागते. देवगिरी औरंगाबाद, मांडवगड, जुन्नर, विजापूर, बुर्हाणपूर इ. ठिकाणचे जलव्यवस्थापन हे जीवनाच्या सर्वच अंगाना स्पर्श करणारे आहे असे वाटते.
पाणी, समाजातील विषमता कमी करण्यासाठी आहे हे, प्रत्यक्ष कृतीने सिध्द करणारी व सिंचनासाठी जमीन कशा प्रकारे तयार करावी हे सांगणारी तापी खोर्यातील फड पध्दत, लोक भावनाचा वापर कशा प्रकारे करावा हे सांगणारी, तलावाजवळील मंदिरे, बारवेतील मंदिरे, वृक्ष आणि मंदिरे यांची जोड हे वेगवेगळे संदेश देतात. गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशात आजही जलवाहतुक केली जाते. सध्याच्या ऊर्जा टंचाईच्या काळात जलवाहतुक किफायतशीर ठरणार आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब पकडावा तो साठवावा, मग ते पाणी मंदिराच्या छतावरील असेल, शासकीय इमारतीच्या छतावरील असेल, राजा - राणीच्या महालाच्या छतावरील असेल वा सामान्य लोकांच्या घराच्या छतावरील असेल, शक्य आहे त्या ठिकाणी नद्यांना वळविणे, नद्या एकमेकाला जोडणे याकाळच्या गरजा आहेत हाच संदेश इतिहास देतो. हैद्राबाद शहरात २१ कमानीचा दगडी तलाव आहे.
पुनर्भरण हा जलव्यवस्थापनेचा आत्मा आहे. पाण्यातून समृध्दी मिळविण्याचा फार मोठा भाग मग तो पिण्यासाठीचा असो वा सिंचनासाठीचा असो, तो भूजलावर अवलंबून राहीला आहे व राहणार आहे. भूजल हे पुनर्भरणावरूनच मोजले जाणार आहे. येणार्या काळात शहरीकरणामुळे आणि औद्योगिककरणामुळे केंद्रीभूत पध्दतीने पाण्याचा वापर होवून अशुध्द पाणी मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहे. यावर मात करण्यासाठी वापरलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याची संधी भविष्यातील सुखकारक वाटचालीसाठी गरजेची आहे. हा देश जलव्यवस्थापनेमध्ये जगाच्या अग्रभागी होता. परकीयांच्या आक्रमणाच्या कालावधीत मध्यंतरीच्या आणि विशेषत: १९ व्या व २० व्या शतकातील वसाहतवादाखालील राजवटीत लोकव्यवस्था पूर्णपणे लयास गेल्या. ती भावना पुन्हा जागृत करून लोकप्रवण व्यवस्थेला पुनर्जिवीत करण्याची गरज, हाच संदेश या अभ्यासातून संप्रेषित होतो.
डॉ. दि. मा. मोरे. पुणे - मो : ०९४२२७७६६७०
Path Alias
/articles/vaarasaa-paanayaacaa-bhaaga-15
Post By: Hindi