कोणतीही भाषा ही माणसाला प्राप्त झालेले ज्ञान व्यक्त करण्यास समर्थ ठरते तीच एक महान भाषा मानली जाते. आज प्रचलित म्हणून वापरात नसली तरीही संस्कृत भाषेने असा आपल्या महानतेचा फार मोठा वारसा निर्माण केलेला आहे. प्राचीन माणसाची संस्कृती ही कृषीवर आधारित !
कोणतीही भाषा ही माणसाला प्राप्त झालेले ज्ञान व्यक्त करण्यास समर्थ ठरते तीच एक महान भाषा मानली जाते. आज प्रचलित म्हणून वापरात नसली तरीही संस्कृत भाषेने असा आपल्या महानतेचा फार मोठा वारसा निर्माण केलेला आहे. प्राचीन माणसाची संस्कृती ही कृषीवर आधारित ! हे कृषीसंबंधीचे सर्व निरीक्षण, अंदाज, अनुमान, पध्दती वगैरे निरीक्षणावर सविस्तरपणे ग्रंथबध्द करून ठेवणारा थोर शास्ज्ञ म्हणजे पाराशर!इतर सर्वच प्राचीन ग्रंथामधील लिखाणाच्या पध्दतीप्रमाणे याची ग्रंथाच्या लिखाणाची पध्दत आहे. पद्यरूपातील चारचार ओळींचा एकेक श्लोक एकेक निरीक्षण अथवा त्याचे अनुमान नोदवून ठेवतो. ते तसे का? आणि तसेच का? हे सर्व प्रश्न वाचकांवर सोडून देतो अल्पाक्षरी रचना हे ह्या सर्वच ग्रंथांचे वैशिष्ट्यच! त्यामुळेच त्यांचा अभ्यास करणे म्हणजे दोन ओळींमधल्या कोऱ्याजागेत लिहिलेला मजकूर वाचता येणे आणि समजून घेता येणे!
अन्नं हि धान्यसैजातं, धान्यं कृष्या विना न च
तस्मात् सर्वं परित्यज्य कृषिं यात्रेन कारयेत।।
(अन्न हे धान्यापासून मिळते. ते धान्य शेतीतून उत्पन्न होते. म्हणून इतर सर्व गोष्टींचा त्याग करून प्रयत्नपूर्वक शेती करावी. असे ग्रंथाच्या प्रारंभीच सांगणारा संस्कृतमध्ये कृषीविषयक पहिला ग्रंथ म्हणजे कृषी पाराशर!
हा पाराशर केव्हा होऊन गेला ह्याबद्दल निश्चित पुरावे उपलब्ध नाहीत. इ.सनाचे चौथे शतक ते अकरावे असा वेगवेगळा कालखंड अनेकांनी मांडला आहे. एक संशोधन हा कालखंड अ.स पूर्व 600 इतका मागे होऊन जातात. परंतु सर्वांचे अभ्यासातून आपला अंदाज बांधावयाचा तर इ.स. चे 7 वे किंवा8 वे शतक हा या ऋषीचा कालखंड होता.
शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी पावसापासून मिळते. त्या पावसाबद्दल अंदाज आधीच व्यक्त करता यावा या दृष्टीने अनेक निरीक्षणे ह्या ग्रंथात मांडली आहेत. तिथपर्यंत पोहोचण्यापूर्वी महिने, राशी, नक्षत्रे ह्या संज्ञा वारंवार येतात. त्याची जळमटे झटकून जरा आठवणी ताज्या करू यात.
भारतीय मास गणनेनुसार चैत्र, वैशाख, जेष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन , कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हे बारा महिने (तर तीन वर्षांनी एक अधिक महिना येतो.)
सूर्याच्या तारकां मंडलानजिकच्या भ्रमणातून नक्षत्रे निर्माण होतात. ज्या तारका जवळ सूर्य असतो त्याचे नाव त्या राशीला दिले जाते. अशा राशी बारा मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन! ह्या त्या बारा राशी!
हाच कालखंड सत्तावीस नक्षत्रांमध्ये विभाजला जातो. एका नक्षत्रात सूर्य सुमारे 14 दिवस असतो. ह्या राशी खालील प्रमाणे शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा, रेवती, अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशीर्ष (मृग), आद्रा, पुनर्वसु, पुष्य, अश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, जेष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रावण आणि घनिष्ठा!
ह्या सगळ्याचा पाऊस व उपलब्ध पाणी ह्याचा कसा संबंध जोडलाय हे पहाणे हा एक सुरेख अनुभव आहे. ह्यातील खालील श्लोकामुळे लेखकाची वैचारिक झेप किती मोठी आहे हे लक्षात येऊ शकते. मृग ते हस्त ही नऊ पावसाळी नक्षत्रे! आषाढ, श्रावण, भाद्रपद व अश्विन हे पावसाळी महिने! लेखक म्हणतो -
अश्विन कार्तिकेचैव धान्यस्य जलरक्षणम्
न कृतं येत मूर्खेण, तस्य का सस्य वासना।।
विसाव्या शतकात पुढे आलेला माकर्सवाद ह्यापेक्षा वेगळे ते काय सांगतो? पावसाबद्दल लिहितोना पाराशर लिहितात, पृथ्वीवर पडणाऱ्या पावसापैकी दहा भाग पाऊस हा समुद्रावर पडतो. पाऊस कसा पडतो याचा त्यांचा अभ्यास असे सांगतो की मार्गशीर्ष महिन्यात पाण्याची वाफ व्हायला सुरूवात होते. ही सुरूवात ज्या नक्षत्रात व ज्या प्रहरात होते त्यानुसार त्या वर्षी किती व कसा पाऊस पडले याचा अंदाज करता येतो. त्या वाफेच्या प्रारंभ होण्याला ते ढगांचे गर्भदान असे संबोधन देतात.
वर्षातला पाऊस उत्तम पडला म्हणजे - पावसाळ्याच्या व शेवटच्या अशा दोन महिन्यात पाऊस आणि मधल्या दोन महिन्यात 2/3 पाऊस! ह्या प्रमाणे पडावयाला हवा. ह्या कालावधीत तीन वेळा लागोपाठ सात सात दिवस पाऊस, 80 वेळा बारीक शिडकावा आणि 60 वेळा उनपाऊस किंवा उन्हात पाऊस म्हणजे उत्तम पाऊस! मधूनमधून थांबून उन्हे पडणे व हवा चालणे आणि त्यामुळे शेतीचे कामास पुरेसा वेळ मोकळा मिळणे म्हणजे उत्तम पाऊस!
अशा उत्तम पावसाचे वर्षामध्ये
मार्गशीर्षात - पावसाचे तुषार
पौषात - बर्फ
माघात - जोरदार हवा
फाल्गुनी - ढग दिसणे
चैत्रात - हवा सुटून पाऊस
वैशाखात - हवा, विजा चमकणे आणि पाऊस
अशी लक्षणे आढळून येतात. बफचा उल्लेख आल्यामुळे हा लेखक हिमालयाचे आसपास रहात असावा हा अंदाज बांधता येतो. पाऊस मोजण्यासाठी आवर्त, संवर्त, पुष्कर, द्रोण अशी परिमाणे आहेत. भारतातल्या कोणत्या भागात साधारत: किती पाऊस पडतो ही निरीक्षणे कौटिल्याने अर्थशास्त्रात मांडली आहे. पाराशर आपल्या ग्रंथातून त्याला दुजोरा देतो. हे मापन करण्यासाठी ठिकठिकाणी सलोह द्रोण कुण्ड बांधावेत असेही सांगतो. याचा अर्थ सलोह द्रोण कुंण्ड हे प्रचलित पर्जन्यमापन यंत्र होते. मात्र, त्याची मापे, बांधण्याची पध्दत वगैरे याचा उल्लेख ह्या ग्रंथात आढळत नाही.
पाऊस संभाळून ठेवावा म्हणजेच पाणी अडवून व साठवून ठेवावे हे पुन:पुन्हा सांगत असतांनाही ते कसे करावे याबद्दल हा ग्रंथ काहीच उल्लेख करीत नाही. मात्र कश्यप कृषीसूक्तम् ह्या ग्रंथात लेखकाने हे सविस्तररित्या मांडले आहे. त्यामुळे येथे तो भाग गाळला असावा. दुसरीही शक्यता अशी वाटते की मुळात ह्या दोन्हींचा मिळून एकच ग्रंथ असू शकेल. दोन भाग होऊन ते दोन्ही वेगवेगळ्या नावाने प्रसिध्द झाले. भाषाशैली व रचनापध्दतीवरून ते दोन्ही ग्रंथ समकालीन आहेत हे मात्र जाणवते हे निश्चित. त्या सर्व प्रकारांचा आढावा आपण कृषीसुक्तम् ह्या पाराशराच्या दुसऱ्या ग्रंथाचा विचार करू तेव्हा घेणार आहोतच. येथे फक्त तो उल्लेख! कृषीच्या भूमी, बीज, वगैरे इतर बाबींबद्दलही ग्रंथात सविस्तर लेखन आहेच परंतु आपण पहात आहोत फक्त पाणी आणि त्याबद्दलचे उल्लेख व निरीक्षणे ! आपल्या निसर्गाच्या व निसर्गचक्राच्या निरीक्षणातून पाराशरमुनी काय काय मांडतात त्याचा अल्पसा उल्लेख आधी करतो.
1. उत्तर व पश्चिम दिशेची हवा ही पाऊस आणते तर पूर्व आणि दक्षिण दिशेची हवा ही अवृष्टी आणते म्हणजे पाऊस दूर ठेवते.
2. पौष महिन्यात धुके पडते व त्यानंतर सात महिन्यांनी पाऊस पडतो.
3. हे धुके पौष महिन्याचे शुक्ल पक्षात (मेघा नक्षत्रात ) पडले तर त्यावर्षी भरपूर पाऊस पडतो. त्यावेळी मीन किंवा वृश्चिक राशी असेल तर मध्यम पाऊस पडतो.
4. साधारणता ज्या तिथीला हे धुके पडते त्या तिथीला (सात महिन्यांनी) पावसाळा सुरूवात होते.
5. चैत्र महिन्यात भरणी नक्षत्र संपताना / मूळ नक्षत्र सुरू होतांना रात्रंदिवस वारा वहात असेल तर आद्रा नक्षत्रात पाऊस पडतो.
6. ज्येष्ठ महिन्यात चित्रा, स्वाती व विशाखा नक्षत्र असतांना आकाश निरभ्र असेल तर श्रावण महिन्यात पाऊस पडतो आणि भरपूर धान्य पिकते.
7. आषाढ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी -
पूर्वेकडून हवा वाहिली तर चांगला पाऊस पडतो.
अग्नेय दिशेने हवा वाहिली तर अन्ननाश होतो.
दक्षिण दिशेने हवा वाहिली तर हळुवार, रिमझीम पाऊस पडतो.
नैऋत्य दिशेने हवा वाहिली तर अन्नहानी होते.
पश्चिम दिशेने हवा वाहिली तर पाऊस पडतो.
वायव्य दिशेने हवा वाहिली तर वादळ येते. हवेचा कोप होतो.
उत्तर दिशेने हवा वाहिली तर भरपूर अन्न पिकते.
8. आषाढ शुध्द नवमीला पाऊस पडला तर वर्षभर यथासमय पाऊस पडत राहतो. मात्र त्यादिवशी पाऊस पडला नाही तर पाणी शोधत फिरावे लागते.
9. श्रावण महिन्यात रोहिणी नक्षत्रात पाऊस पडला तर तो (कार्तिक शुध्द एकादशी) पडत राहील. कर्क राशीत पाऊस पडला तर सर्व प्राणीमात्रांना हायहाय करावे लागेल. सर्व शेतीतील मेहनत वाया जाईल.
10. मुंग्या अंडी घेऊन जाऊ लागल्या, बेडूक ओरडू लागले, मोर नाचू लागले, साप झाडावर चढू लागले, बिळातील प्राणी उत्तेजीत होऊन धावू लागले, दुखणाईत माणसाचे अंग दुखू लागले तर लगेच पाऊस पडू लागेल.
11. सूर्य मंगळाचे आड गेला तर समुद्राला सुख देतो म्हणजे पाऊस पडत नाही. मंगळ सूर्याचे आड गेला तर डोंगराला ही पाझर फुटतात. मंगळ सिंह राशीत असेल तर पृथ्वी अग्नीइतकी तापते. चित्रा नक्षत्रात मध्यभागी शुक्र आला तर मुसळधार पाऊस पडतो.
गुरू राश्यांतर करतांना पृथ्वी पाण्याने भरून टाकते. भरपूर पाऊस पडतो. गुरू चित्रा नक्षत्राचे मध्यवर असतांना फुटलेल्या भांड्याला पाण्याची धार लागावी असा पाऊस! तर स्वाती नक्षत्रात गुरू जातो तेव्हा मुसळधार पाऊस पडतो. स्वाती नक्षत्रात पुष्पराशीतील ढग रिकामे होतात. श्रवण नक्षत्रात निर्माण झालेले ढग रेवती नक्षत्रात रिकामे होतात.
12. मंगळ जेव्हा उत्तर फाल्गुनी, उत्तराषाढ उत्तराभाद्रपद, मूळ, जेष्ठा, हस्त, कृत्तिका तसेच मघा ह्या नक्षत्रांमध्ये येईल तेव्हा अनावृष्टी म्हणजे पाऊस पडत नाही. पावसाचा अंदाज बांधण्याची एक पारंपारिक पध्दत त्यांनी लिहून ठेवली आहे.
वैशाखशुध्द प्रतिपदेला एक दंड/काठी घ्यावा त्यावर खूण करून तो नदीचे पाण्यात उभा करावा. (याचा अर्थ त्यावेळी वैशाखातही नदीला पाणी असायचे) हा प्रयोग सूर्यास्ताचे वेळी करावा. सकाळी उठल्यावर निरीक्षण करावे -
अ) दंडावरील खुणेइतकेच पाणी दिसले तर गेल्या वर्षी इतकाच पाऊस पडेल, पूर येईल.
ब) खुणेपेक्षा पाणी कमी झाले तर कमी पाऊस पडेल पूरही कमी येतील.
क) खुणेपेक्षा जास्त पाणी आढळले तर दुप्पट पाऊस पडेल आणि महापूर येतील.
पराशर मुनींनी ही सगळी निरीक्षणे 8 व्या 9 व्या शतकात केली व ते ज्या भागात उत्तर भारतात राहात तेथली आहेत हे लक्षात घेतले म्हणजे त्यांचा हा निसर्गाचा अभ्यास आणि पावसातून किती पाणी उपलब्ध होईल हे शेतीसाठी असलेले मार्गदर्शन किती महत्वाचे होते हे लक्षात येईल. त्यादृष्टीने विचार केला तर कृषी पाराशर ग्रंथाचे कर्ते पाराशर मुनी हे खऱ्या अर्थाने एक कृषी विद्यापीठच होते असे म्हणावयाला हरकत नाही.
मुकुंद धाराशिवकर, धुळे
Path Alias
/articles/udakaacai-aratai-karsai-paaraasara
Post By: Hindi