थेंब थेंब पाणी बचतीची आठवण उन्हाळ्यातच का?


पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय सजीवांचे जगणे अशक्य आहे. पाण्याशिवाय पशूपक्षी, वनस्पती, रोप रोपटे जगणे, जमिनीतील अन्नधान्याची पीके जगवणे अशक्य आहे. मग असे जर आहे तर पाण्याबाबत मनुष्याने अधिक काळजी घेवून पाण्याची योग्य साठवणूक करायला नको का ? पाण्याचे योग्य नियोजन संबंधित खात्यांनी करायला नको का ? पिण्यासाठी पाणी, पिकांसाठी पाणी या बाबत सुयोग्य नियोजन असायलाच हवे. पाण्याची गळती याकडे विशेष लक्ष द्यायलाच हवे.

पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय सजीवांचे जगणे अशक्य आहे. पाण्याशिवाय पशूपक्षी, वनस्पती, रोप रोपटे जगणे, जमिनीतील अन्नधान्याची पीके जगवणे अशक्य आहे. मग असे जर आहे तर पाण्याबाबत मनुष्याने अधिक काळजी घेवून पाण्याची योग्य साठवणूक करायला नको का ? पाण्याचे योग्य नियोजन संबंधित खात्यांनी करायला नको का ? पिण्यासाठी पाणी, पिकांसाठी पाणी या बाबत सुयोग्य नियोजन असायलाच हवे. पाण्याची गळती याकडे विशेष लक्ष द्यायलाच हवे. असे कितीतरी प्रश्न फक्त उन्हाळ्याच्या चार महिन्यातच आठवतात. इतरवेळी मात्र पाणी बचतीचा. पाणी वाटपाचा, पाणी गळतीचा एकही प्रश्न कुणाच्याही ध्यानी मनी येत नाही. थेंब थेंब पाणी बचतीची आठवण फक्त उन्हाळ्यातच येते इतर वेळी मात्र घडा घडा पाणी वाहून जाते तरी त्याबाबत विचार येत नाही. पाणी गळतीचाही प्रश्न उन्हाळ्यातच निघतो, इतर वेळेला पाण्याची गळती नको त्यापेक्षा जास्त होते पण त्याकडे लक्ष द्यायला वेळ कुणालाच नाही.

नळाची पाईप फुटी उन्हाळ्याच्या दिवसातच होते. मोठ्या प्रमाणात पाणी गळतीही उन्हाळ्यातच होते. पाण्याच्या वापराबाबत काटकसर करायला हवी हे सुध्दा आम्हाला व शासनालाही कळते इतर वेळी मात्र पाणी वापरा बाबत निष्काळजीपणा, दुर्लक्षितपणा व बेजबाबदारपणा दिसून येतो आणि इतर वेळेच्या ह्याच दुर्लक्षित पणाचे दुष्परिणाम संपूर्ण मानवजातीला, पशू पक्षांना उन्हाळ्याच्या चार महिने भोगावे लागतात. वास्तविक पाणी साठवणूक, पाणी वापर, पाणी गळती या बाबत आधीचा म्हणजे पावसाळ्यात हिवाळ्यात खबरदारी घेतली व पाण्याबाबत जागृकता बाळगली तर उन्हाळ्यात होणारी ससे होलपट, उन्हाळ्यात होणारी तारांबळ सहज टाळता येईल व सर्व घटकांना ही व्यवस्थित पाणी व तेही पुरेसे मिळेल. मात्र या साठी अगदी वरच्या म्हणजे शासकीय पातळीपासून ते गाव पातळी व जगपातळी पर्यंत जागृकता हवी व पाणी साठवण, पाणी वापर, पाणी गळती, थांबविणे या बाबतची नियोजनबध्द आखणी हवी. म्हणजे उन्हाळ्यात बसणारे पाण्याचे चटके कमी तीव्रतेचे असतील. व उन्हाळा सर्वांचा सुखा - समाधानाचा व आनंदाचा जाईल. यासाठी सर्वांनीच खालील बाबींचा साकल्याने विचार केला व हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविला तर बरेच काही साध्य होवून उन्हाळ्याची तीव्रता कमी करता येईल.

पाण्याचे साठे वाढविण्याची गरज :


वाढती जनसंख्या व त्या प्रमाणात पाण्याचा वापर यांची सांगड घालावयाची असेल तर पाण्याचे साठे वाढविण्याची नितांत गरज आहे. पिकांचे विविध हंगाम उन्हाळी व हिवाळी आरंभ झाल्यामुळे यासाठी अधिकच्या पाण्याची गरज असते या अधिकच्या पाण्याचा विचार करताही पाण्याचे साठे जसे तलाव, मध्यम प्रकल्प, गावतळे, शेततळे या वाढलेल्या साठ्यांमुळे जास्तीचे पाणी उपलब्ध होवू शकेल ज्याचा वापर उन्हाळ्यात अत्यंत उपयुक्त असेल.

असलेल्या तलावातील गाळ काढा :


राज्यात मोठ मोठे तलाव, धरण आहेत. प्रकल्प आहेत मात्र यातील गाळ गेल्या कित्येक वर्षांपासून व्यवस्थितपणे काढलेला नाही. साचून साचून या गाळाचे ढीग झालेले असल्यामुळे पावसाळ्यात पाणी जास्त प्रमाणात साचत नाही यासाठी शासनाने या उन्हाळ्यातच राज्यातील अशा सर्व तलाव व धरणातील गाळ काढण्याची मोहीम हाती घ्यावी यात शासनाला थोडा पैसा लागेल परंतु धरण व तालावांची साठवण क्षमता वाढेल व ही वाढलेली पाणी क्षमता उन्हाळ्यात उपयोगी पडेल.

धरण व तलावांची पाणी गळती थांबविणे गरजेचे :


धरण व तलाव किंवा मध्यम प्रकल्पात पावसाळ्याच्या दिवसात खूप पाणी साचते मात्र महाराष्ट्रातील सर्व धरणांच्या दारातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. हिवाळ्यात या दारांतून अर्ध्यापेक्षा जास्तीचे पाणी वाहून जाते यामुळे पाणी टंचाई होते. शासनाने महाराष्ट्रातील सर्वसाधारण सर्व तलाव व सर्व प्रकल्पाच्या दारांची दरवर्षी दुरूस्ती करून पाणी गळती थांबवावी.

धरण व तालावातील नियमबाह्य पाणी उपासा थांबवायलाच हवा :


ज्या गावी धरण, तलाव, प्रकल्प आहे तेथील काठावरील शेतकरी मोठ्या प्रमाणात जास्त हॉर्सपॉवरच्या वीजेच्या मोटारी बसवून त्या धरण किंवा तलावाताली पाणी उपसून घेतात व आपल्या पिकांना देतात. वास्तविक शेतकऱ्यांचे अशाप्रकारचे पाणी चोरणे कायद्यानुसार गुन्हा आहे. मात्र हे प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहेत. तसेच काही ठिकाणी कॅनॉलच्या पाण्याची चोरी मोठ्या प्रमाणात होते. जे कर्मचारी या चाऱ्यांवर नेमलेले असतात त्यांचेही आर्थिक व्यवहारामुळे दुर्लक्ष होते व पाणी चोरी मोठ्या प्रमाणात होते. हे सर्व प्रकार म्हमजे पाण्याची उन्हाळ्यात तीव्र टंचाई भासणे होय. या सर्व प्रकारांना शासनाने आपली यंत्रणा सक्रीय व कडक करून आळा घातला तर पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होईल व उन्हाळ्यात भरपूर पाणी शिल्लक राहील.

पाणी वाटपाचे अयोग्य व निष्काळजीयुक्त नियोजन :


पिकांसाठी पाणी सोडण्यात येते यासाठी व्यवस्थित किंवा कालबध्द नियोजन नसते. ठरलेल्या कालावधीपेक्षा जास्त काळ पाणी सोडल्या जाते. तसेच जर धरणातील किंवा प्रकल्पातील पाणी पिकांसाठी सोडले तर ते पाणी कोठे जात आहे ? किती जात आहे? कसे जात आहे ? याबाबत कुणीही दक्ष नसतो. काही वेळा तर कॅनॉलचे पाणी नद्या नाल्यातून वाहते आणि कित्येक दिवस ते वाहत असते. त्याकडे कुणाचेही लक्ष नसते. असा प्रकार म्हणजे साठवलेल्या पाण्याची नासधूस व तीही केवळ पाटबंधारे खात्याच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे होय. असे जर दरवर्षी हेत असेल तर उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणारच ! यासाठी शासनाने पाणीवाटप योग्य होते किंवा नाही ? पाहिजे तेवढेच पाणी सोडल्या जाते का ? त्याच्या कालावधी प्रमाणे पाणी सोडले जाते का ? पाणी पिकांऐवजी नदीनाल्यात तर जात नाही ना. याच्या पाहणी व देखरेखीसाठी त्या काळापुरते पथक नेमण्याची नितांत गरज आहे.

पाण्याचे नियोजन कोटेकोरपणे पाळावे :


पिकांसाठी किती पाणीसाठा हवा आहे आणि पिण्यासाठी किती पाणी साठा हवा आहे व तो दरवर्षी जुलै अखेर पुरते का ? याचे अतिशय चोख असे नियोजन असावे. या नियोजनाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यात राजकीय दबाव सुध्दा येवू नये किंवा या नियोजनाबाहेर जावून काम करा असा राजकीय हस्तक्षेप सुध्दा होवू नये तरच उन्हाळ्यात पाण्याचे प्रश्न उद्भवणार नाहीत.

फेब्रुवारी पासून पाणी साठे पिण्यासाठी राखून ठेवावेत :


वरील प्रमाणे नियोजन असल्यास पाणी राखून ठेवण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही तरी सुध्दा शासनाने दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून धरण, तलाव व प्रकल्पातील पाणी साठे फक्त पिण्यासाठीच राखून ठेवावेत म्हणजे उन्हाळ्याच्या चार महिन्यात उद्भवणारी दरवर्षीची गंभीर व अती गंभीर स्थिती उद्भवणार नाही व या चार महिन्यात पाण्यावर व फक्त पाण्यावर होणारा अब्जो रूपयांचा खर्च वाचेल व विशेष म्हणजे नागरिकांचे पाण्याविना होणारे हाल थांबतील.

नागरिकांनीही पाणी वापरात प्रमाणबध्दता ठेवावी :


उन्हाळ्याच्या चार महिन्यात पाण्याविना होणारे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल पाहवत नाही. हे हाल थांबवायचे असतील तर शहरी व नागरी भागातील नागरिकांनी विशेषत: महिला वर्गाने पाणी अत्यंत प्रमाणबध्द व काटकसरीने वापरायला हवे.

घरातील पाणी गळती, नळांची पाणी गळती, गल्लीतील पाणी गळती तात्काळ दुरूस्त करावी. पाणी झाल्यावर तोटी बंद करावी. पाण्याचा गेरवापर थांबवावा. पाणी पाहिजे तेवढेच वापरावे. व पाणी कटाकसरीने वापरण्याची सवय लावून घ्यावी.

स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणी प्रमाणात वाटप करावे व पाणी गळती थांबवावी :


ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका यांनीही पाणी पुरवठा करतांना प्रमाणबध्दता पाळावी. बऱ्याचदा पाईप लाईनचे वॉल्व्ह कित्येक दिवस खराब असतात. पाण्याचे पाईप फुटतात व यातून भरपूर पाणी वाहून जाते. याबाबत पालिकांनी तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.

एवढ्या सर्वबाबींचे काटेकोरपणे पालन झाल्यास उन्हाळ्यात पाण्याविना होणारे हाल निश्चितपणे थांबतील व सर्वांना पुरेसे पाणी मिळेल. पाण्यासाठी तिसरे महायुध्द होणार हे जे म्हटल्या जाते ते भाकित वरील उपाय योजनांची निश्चितपणे खोटे ठरेल व पाणी अनमोल, पाणी जीवन वाचविण्यामध्ये आम्हाला यश मिळेल.

श्री. धोंडीराम राजपूत, वैजापूर - मो : 9421312244

Path Alias

/articles/thaenba-thaenba-paanai-bacataicai-athavana-unahaalayaataca-kaa

Post By: Hindi
×