टँकरमुक्तीसाठी स्वबळावर जिद्दीने धडपडणारे आगळेवेगळे गुहीणी गाव


गावाची आर्थिक परिस्थिती जेमतेम असून उन्हाळ्यात घरटी एक पुरुष माणूस पुण्या-मुंबईला किंवा सांगली, कोल्ह्यापुरला कुल्फी विकायला जात असते. मटक्यातल्या दुधाची कुल्फी बनविण्याची कला अवगत असणार्‍या या गावाची पाणीटंचाईमुळे मात्र पार दुर्दशा झालेली आहे. होळीच्या आसपास म्हणजे मार्च महिन्यापासून गावातील पाणीटंचाई भीषणता दरवर्षी जाणवू लागते.

भोर : शासनाच्या नावाने खडे फोडत न बसता व पुढार्‍यांच्या वांझोट्या आश्वासनांवर विसंबून न घालता स्वबळावर पाणीटंचाईमुक्तीच्या दिशेने वाटचाल करणारे भोर तालुक्यातील गुहीणी हे गाव सध्याच्या भीषण पाणीटंचाईच्या काळात उठून दिसते आहे.

राजगड किल्ल्याच्या बरोब्बर पाठीमागे व शिवकालीन येसाजी कंकांच्या भुतोंडे या ऐतिहासिक गावाशेजारी वसलेले हे अवघ्या 96 उंबर्‍याचे जेमतेम साडेचारशे लोकवस्तीचे दुर्गम गाव आहे. भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या डोंगराळ पाणलोट क्षेत्रातील अंशतः बुडीत क्षेत्रात हे गाव असले तरी धरणाच्या प्रत्यक्ष पाणीसाठ्यापासून भरपूर लांब आहे. गावाची सुमारे 25 % शेतजमीन या धरणात गेलेली आहे. उन्हाळ्यात तर धरणातील पाणी आटून अजून लांबवर जात असल्यामुळे प्रत्यक्षात गेले 15 वर्षाहून अधिक काळ या गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. ‘धरण उशाला अन कोरड घशाला’ अशी शब्दशः या गावाची परिस्थिती आहे.

गावाची आर्थिक परिस्थिती जेमतेम असून उन्हाळ्यात घरटी एक पुरुष माणूस पुण्या-मुंबईला किंवा सांगली, कोल्ह्यापुरला कुल्फी विकायला जात असते. मटक्यातल्या दुधाची कुल्फी बनविण्याची कला अवगत असणार्‍या या गावाची पाणीटंचाईमुळे मात्र पार दुर्दशा झालेली आहे. होळीच्या आसपास म्हणजे मार्च महिन्यापासून गावातील पाणीटंचाई भीषणता दरवर्षी जाणवू लागते. गावातील रस्त्याकडेची शासकीय पाणवठ्याची विहीर आटल्यामुळे शेजारील चांदवणे गावाजवळील ओढ्याशेजारच्या झर्‍यावरून महिला बाया-बापड्यांना पाणी आणावे लागते. हे अंतर जीवघेण्या चढ-उताराचे असल्यामुळे बाया व पुरुष मंडळी मेटाकुटीला आली होती. मग कसेबसे शासकीय अधिकार्‍यांच्या गळ्यात पडून गावाला टँकर मंजूर करून घ्यायचा व उन्हाळ्याचे तीन-साडेतीन महिने ढकलायचे. अशी ही दरवर्षीची गावाची रडकथा ठरलेली ! ही रडकथा तालुक्याच्या पुढार्‍यांच्या अनेकदा कानी घातली पण पोकळ आश्वासनांपलीकडे गावाच्या पदरात काहीच पडले नाही.

गावाची ही दारूण परिस्थिती पलीकडच्या खोपडेवाडी गावात पाणीटंचाईमुक्तीचे कार्य करणार्‍या ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या कानावर गेली. संस्थेच्या अजित देशपांडे, सुनीताताई गायकवाड व शैला भोंडेकर यांनी स्थानिक कार्यकर्ते सुनिल जोरकर व बापू जोरकर यांच्यामदतीने गावात गेल्यावर्षी (2015) उन्हाळ्यात बैठक घेतली व लोकसहभागातून या कामाला हात घालण्याचे गावाला आवाहन केले. पण व्यर्थ ! गाव एकत्र येण्याच्या मनस्थितीत नव्हता. पावसाळ्यानंतर या कार्यकर्त्यांनी पुन्हा 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत ग्रामस्थांना एकत्र करून या विषयाला हात घातला. मुंबईला राहणार्‍या बाळाबाई श्रीपती जाधव यांच्या ‘अंबागाणीचे पाणी’ या जुन्या पडक्या विहिरीचे खोलीकरण व रुंदीकरण करून पुनरुज्जीवन करायचे ठरवले. या कार्यकर्त्यांनी गावातील जाणत्या मंडळीच्या मदतीने सुरवातीला तीव्र विरोध करणार्‍या या मुंबईकर कुटुंबाला विहिरीपूरत्या जमिनीचे गावाच्या नावाने बक्षीसपत्र करून देण्याला राजी केले. गावच्या ननावरे नावाच्या ग्रामसेवकाने ते झटपट करूनही दिले आणि गावाला हुरूप आला. संस्थेच्या आग्रहाप्रमाणे ग्रामस्थांनी स्वखर्चाने जेसीबी चालवून विहिरीपर्यंत जाण्याचा रस्ता व्यवस्थित करून दिला तसेच जुनी विहीर पाडून दिली.

दरम्यानच्या काळात ज्ञान प्रबोधिनी संस्थेने पुण्यातील केपीआटी टेकनॉलीज् या माहिती क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीतील सीएसआर प्रमुख तुषार जुवेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या विहिरीसाठी साडेतीन लक्ष रुपयांचे अर्थसहाय्य देऊ केले. त्यातून दगड फोडणार्‍या भूसुरुंगाच्या खर्चाची व दगड-माती उचलणार्‍या यारीमशीनच्या (क्रेन) खर्चाची तरतूद झाली. या यारीमशीनमध्ये दगड-माती श्रमदानाने भरून देण्याची हमी ग्रामस्थांनी दिली आणि 17 फेब्रुवारीला विहीर खोलीकरणाचे व रुंदीकरणाचे काम मोठ्या उत्साहाने चालू झाले ते आजतागायत चालू आहे. गावात श्रमदानाच्या घरटी पाळ्या ठरवून देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार विहिरीवर दररोज किमान 15 ते 20 ग्रामस्थ गरजेनुसार श्रमदानासाठी हजर असतात. ग्रामस्थांचे हे मोलाचे सहकार्य उभे करण्यात रामभाऊ वरे, मारुती धनावडे, सुरेश रेणुसे, गणपत गुहीणे, तुकाराम मोरे व सुरेश गुहीणे यांनी महत्वाचा पुढाकार घेतला.

जेमतेम 22 फुटाचा व्यास असणार्‍या जुन्या विहिरीचा व्यास आता वाढून तब्बल 38 फुटाचा झाला आहे. अवघी 12 फुटाची खोल असणारी विहीर आता सुमारे 22 फुट खोल झाली आहे. एकूण खोली किमान 35 ते 40 फुट खोल नेण्याचा ग्रामस्थांचा निर्धार आहे. यामुळे विहिरीची जेमतेम सव्वा लाख लिटरची पाणी क्षमता तब्बल 11 लक्ष लिटरवर जाऊन पोहोचणार आहे. ग्रामस्थांनी आत्तापर्यंत विहिरीच्या कामासाठी घरटी रु. 600 इतकी लोकवर्गणी काढली असून ग्रामस्थांनी केलेल्या श्रमकार्याचे मुल्यांकनच मुळी सव्वा लाख रुपयांपेक्षा जास्त आहे !

अजून सुमारे महिनाभर विहिरीचे काम चालणार आहे. कुल्फी बनविण्यात हातखंडा असलेले हात सध्या श्रमकार्यात गुंतले आहेत. आता ही मंडळी तुम्हाला कदाचित यंदा कुल्फी विकायला शहरात दिसणार नाहीत ! आता शहरवासीयांनी ग्रामस्थांच्या या चिकाटीला दाद देण्यासाठी व काम पूर्ण करण्याच्या निर्धाराला बळ देण्यासाठी गुहीणीला भेट दिली पाहिजे किंवा किमानपक्षी फोनवर अभिनंदन तरी केले पाहिजे !!

गाव संपर्कासाठी दूरध्वनी: सुरेश शंकर रेणुसे (02130) 218047

Path Alias

/articles/tankaramaukataisaathai-savabalaavara-jaidadainae-dhadapadanaarae-agalaevaegalae-gauhainai

Post By: Hindi
×