तहानलेला महाराष्ट्र


गोदावरी, तापी, नर्मदा, कृष्णा आणि कोकणातील पश्चिम वाहिनी नद्या अशा पाच नद्यांच्या खोऱ्यांतून महाराष्ट्राला मुख्यत्वे पाणी उपलब्ध होते. या पाच नद्यांच्या खोऱ्यांतून एकूण सरासरी 163820 दशलक्ष घनमीटर पाणी दरवर्षी उपलब्ध होते. या पाण्यापैकी 75 टक्के म्हणजे सरासरी 131562 दशलक्ष घनमीटर पाणी दरवर्षी हमखास उपलब्ध होते.

जून 2007 अखेर महाराष्ट्रात मोठे 66, मध्यम 233 व लघु 2777 जलप्रकल्प असे 2076 जलप्रकल्प पूर्ण झाले आहेत. स्थानिक स्तरावर 2340 लघुप्रकल्प होते. त्याशिवाय 18578 पाझर तलाव, 9440 कोल्हापुरी बंधारे आणि 10479 गावतलाव, भूमिगत बंधारे हे जलसाठेही होते.

राज्यात 2007 - 2008 अखेर 373766 विहीरी होत्या. त्यापैकी 321600 विहीरींचा वापर सिंचनासाठी करण्यात आला. मराठवाड्यात 46986 विहीरींपैकी 31358 विहीरींचा सिंचनासाठी वापर करण्यात आला. राज्यात सुमारे 400 लहान मोठ्या नद्या आहेत. त्यांची लांबी सुमारे 20000 किलोमीटर आहे.

गोदावरी, तापी, नर्मदा, कृष्णा आणि कोकणातील पश्चिम वाहिनी नद्या अशा पाच नद्यांच्या खोऱ्यांतून महाराष्ट्राला मुख्यत्वे पाणी उपलब्ध होते. या पाच नद्यांच्या खोऱ्यांतून एकूण सरासरी 163820 दशलक्ष घनमीटर पाणी दरवर्षी उपलब्ध होते. या पाण्यापैकी 75 टक्के म्हणजे सरासरी 131562 दशलक्ष घनमीटर पाणी दरवर्षी हमखास उपलब्ध होते. ही पाण्याची विश्वासार्ह उपलब्धता आहे. या व्यतिरिक्त आंतरराज्य पाणी वाटपानुसार महाराष्ट्राला दरवर्षी 112568 दशलक्ष घनमीटर पाणी वापरण्यासाठी उपलब्ध होते. मागील वर्षी राज्यातील जलप्रकल्पांमधील 25489 दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 308 लाख हेक्टर आहे. त्यापैकी जवळपास 225 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. शेतीसाठी 19763 दशलक्ष घनमीटर आणि अन्य कारणांसाठी 6671 दशलक्ष घनमीटर पाणी वापरण्यात आले. राज्यात तुषार व ठिबक सिंचन यांचा वापरही वाढला आहे. मार्च 2008 अखेर 435000 हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. राज्यात 2007 - 2008 मध्ये 4331000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात 2764000 हेक्टर (63.8 टक्के) शेतीला पाणी देण्यात आले. राज्यात एकूण 1046 पाणीवापर संस्थांची नोंदणी झाली. यापैकी प्रत्यक्षात 1019 संस्थाच कार्यरत राहिल्या आहेत. त्यांच्यामार्फत 335000 हेक्टर शेती ओलिताखाली आली आहे.

सिंचन प्रकल्पातील पाणी वापरून राज्यात 42 जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. या प्रकल्पात 3292.83 मेगावॉट वीज उत्पादन केली जाते. वीज उत्पादनाचे प्रमाण 2007 - 2008 मध्ये उत्पादन करण्यात आलेल्या विजेच्या 20 टक्के आहे.

राज्याला मागील वर्षी उपलब्ध झालेले पाणी आणि प्रत्यक्षातील पाण्याचा वापर लक्षात घेता शेती, जलविद्युत, उद्योगधंदे, पिण्यासाठी आणि घरगुती वापरसाठी वर्षभर पुरेल इतके पाणी उपलब्ध झाले होते. राज्याला उपलब्ध झालेल्या पाण्याचे शास्त्रशुध्द नियोजन झाले असते तर कुठल्याच शहराला किंवा गावाला पाणी कमी पडले नसते असे तज्ञांचे म्हणणे आहे आणि वेळोवेळी तज्ञांनी तसे परखडपणे पाण्याच्या नियोजनाबाबत त्यांचे विचारही मांडले आहेत. पूर्वीच्या तुलनेत लोकांना जलसाक्षर करण्याचे प्रयत्न पाणीप्रश्नाची जाण असणाऱ्या तज्ञ व्यक्ती, संस्था यांच्यामार्फत जोमाने सुरू आहेत. परंतु पाण्याचे नियोजन करणे ज्यांच्या अखत्यारीत आहे त्यांनी तज्ज्ञांच्या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घेतली नाही आणि जनतेनेही त्यांच्या पाणी वापराच्या सवयीत म्हणावा तसा बदल केला नाही. परिणामी या वर्षी अभूतपूर्व भीषण पाणी टंचाईला लोकांना तोंड द्यावे लागत आहे.

सर्वच जलसाठ्यांमधील पाण्याचे प्रखर उन्हाळ्यामुळे जलदगतीने बाष्पीभवन होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळील जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयातून औरंगाबाद शहर, 256 छोटी मोठी गावे, शेती, जलविद्युत निर्मिती, उद्योगधंदे यासाठी पाणी पुरवठा केला जातो. जवळपास 45 लाख लोकांची तृष्णा भागविणारा हा जलाशय आहे. मात्र 45 लाख लोकांना आठ दिवस पिण्यासाठी जेवढे पाणी लागते तेवढ्या पाण्याचे प्रखर उन्हाळ्यामुळे एका दिवसात बाष्पीभवन होत आहे. या जलाशयात ऑक्टोबर 2008 अखेर 1522 फूट पाणी होते. अवघ्या सात - आठ महिन्यात 16 फूट पाणी बाष्पीभवनामुळे घटले आहे. सध्या उन्हाळ्यात पाण्याची पातळी 1506 फूट आहे. अद्याप उन्हाळ्याचा उत्तरार्ध संपावयाचा आहे. सध्याच्या वेगाने पाण्याचे बाष्पीभवन होत राहिल्यास झपाट्याने जलाशयातील पाण्याची पातळी घटत जाणार आहे. कारण दर 24 तासाला 138 दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. सध्या नाथसागरात 38 टक्के पाणी शिल्लक आहे. राज्यातील इतर जलसाठ्यांचीही अशीच शोकांतिका आहे. मोठ्या सिंचन प्रकल्पांवर आजपर्यंत 40 ते 50 हजार कोटी, जलसंधारणावर 15 ते 20 हजार कोटी, ग्रामीण पाणी योजनांवर हजारो कोटी रूपये खर्च होऊनही महाराष्ट्र तहानलेलाच आहे. उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न समाधानकारकपणे सुटू शकला नाही.

महाराष्ट्रासह भारतातील सर्वच नद्यांची घुसमट होत आहे. वाढत्या जागतिक तापमानाचा परिणाम केवळ उष्मा वाढण्यात आणि पर्जन्यमान घसरण्यात होत नाही तर नद्यांवरही याचा विपरित परिणाम होत आहे. अपूरे पर्जन्यमान, वाढते प्रदूषण, सरकारी महसूल बुडवून नद्यांमधील केला जाणारा वाळूचा प्रचंड उपसा, अतिनागरीकरणामुळे लोकसंख्येचा नद्यांवर पडणारा ताण यामुळे नद्या आकुंचन पावत आहेत. परिणामी अवघ्या मानवजातीला पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या नद्यांमधील गोड्या पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे. जागतिक तापमानाचा हा दृष्य परिणाम आहे. भारतातील गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा या सारख्या मोठ्या नद्यांची पाण्याची पातळी घटत चालली आहे. जगभरच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जगातील 925 प्रमुख नद्यांचे सर्वेक्षण अलिकडेच अमेरिकन मेटरॉलॉजीक सोसायटीने केले आहे. 1948 ते 2004 या काळातील नद्यांच्या प्रवाहाचा अभ्यास या संस्थेने केला आहे. जगातील सर्वच नद्या आक्रसत चालल्या आहेत, असा निष्कर्ष संस्थेने काढला आहे.

या वर्षी विक्रमी उन्हाळ्याचा सूर्य आग ओकत आहे. उन्हाची काहिली वाढत आहे. असह्य उन्हाच्या उकाड्याने आणि उष्माघाताने लोक हैराण झाले आहेत. सारा महाराष्ट्र उष्णतेच्या लाटांमुळे भाजून निघत आहे. पशु-पक्षी, वन्य प्राणी पाण्याच्या शोधात रानोमाळ भटकत आहेत. वन्यप्राण्यांनी तर मानवी वस्त्यांकडे आपला मोर्चा वळविला आहे. दे माय धरणी ठाय अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यात कधी नव्हती एवढी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सद्य परिस्थितीत राज्यात 950 गावात आणि 849 वाड्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे आणि ही संख्या उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. ही सर्व गावे टँकरग्रस्त आहेत. यावर्षी तर एप्रिल मध्येच काही गावांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले आहे. काही गावामध्ये तर पैसे मोजून पाणी विकत घ्यावे लागले आहे. पाणी महागले असून त्यामानाने दूध स्वस्त आहे असे म्हणण्याची वेळ आली आहे. शहरांमध्येही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. पाण्याच्या टँकरवर लोकांच्या अक्षरश: उड्या पडत आहेत. पाण्याचे टँकर पळविण्यापर्यंत लोकांनी मजल मारली आहे. पाणी मिळवण्याच्या स्पर्धेत सामाजिक ताण - तणाव वाढत आहेत. महाराष्ट्राची ओळख आता टँकरग्रस्त राज्य म्हणून होऊ लागली आहे. प्रशासन हतबल आणि जनता हवालदिल अशी ही परिस्थिती आहे. पाणी टंचाईची परिस्थिती आता अधिकाऱ्यांच्या इतकी अंगवळणी पडली आहे की उन्हाळ्याची चाहूल लागताच पाण्याचे नियोजन करण्याऐवजी ते टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या तयारीस लागतात. अशी मानसिकताच तयार झाली आहे. गाव तेथे टँकर ही म्हण रूजु होऊ पाहात आहे.

दरवर्षी पाणी टंचाई जाणवत असतेच परंतु पाणी टंचाईच्या कालावधीतही वाढ होत चालली आहे. याचा संबंध जागतिक पातळीवर होत असलेल्या हवामानाशी जोडला जातो. कारण या बदलामुळे पडणाऱ्या पावसावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे जलसाठे पुरेसे भरत नाहीत. जागतिक तापमानात जो बदल होतो तो कार्बन डाय ऑक्साईड वातावरणातमध्ये उत्सर्जित केला जात असल्यामुळे होतो. मागील वर्षी खनिज तेल, वायु आणि कोळसा यांच्या ज्वलनातून 9 गिगा टन कार्बन डाय ऑक्साईड वातावरणात टाकला गेला होता. याच पध्दतीने आणि गतीने आपण कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जित करीत राहिलो तर येत्या 21 वर्षात म्हणजे 2029 पर्यंत आपण 190 गिगा टन कार्बन डाय ऑक्साईड वातावरणात टाकलेला असेल. एक गिगा टन म्हणजे एक अब्ज टन हे प्रमाण लक्षात घेतले तर भविष्यात जागतिक तापमानवाढीचे आणि पर्जन्यमान घटण्याचे महाभयानक संकट साऱ्या जगावर कोसळणार आहे.

असा इशारा नेचर या प्रसिध्द आणि प्रतिष्ठित विज्ञान विषयक नियतकालात देण्यात आला आहे. यामुळे जागतिक तापमान वाढून दोन्ही धृवांवरचे बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढेेल, हिमनद्या आकसतील, सागराची पातळी वाढेल आणि त्यामुळे मोठा प्रदेश जलमय होईल आणि सर्वांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. आपला देश यास अपवाद असणार नाही हे आपण डोळसपणे लक्षात घेतले पाहिजे. म्हणून सर्व विकसित आणि विकसनशील देशांनी एकत्र येऊन वातावरणात कार्बन डाय ऑक्साईड टाकण्याचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. मात्र पुढारलेले विकसित देश याबाबतीत पुढाकार घेण्याचे टाळतात आणि याचा मोठा फटका गरीब विकासाच्या मार्गावर असणाऱ्या देशांना बसणार आहे. सर्व देशांनी सांघिक प्रयत्नांनी हा प्रश्न सोडवावयाचा आहे हे प्रखर वास्तव लक्षात घेणे आवश्यक ठरते.

पाणी टंचाईची ही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला मुख्यत्वे मानव निर्मित कारणेच कारणीभूत आहेत. आपली जीवनशैली, कार्यशैली अधिक पाणी मागणारी आहे आणि म्हणून पाणी टंचाई जाणवते. शिळ्या पाण्याची संकल्पना, नळाच्या वाहत्या पाण्याखाली केली जाणारी धुणी-भांडी, शॉवरखाली केल्या जाणाऱ्या आंघोळी, बागेला आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देणे, गाड्या धुणे, नद्यांच्या पात्रातील बेसुमार वाळूचा उपसा करणे, जलवाहिन्या फुटण्याने आणि तडकण्याने होणारी पाण्याची नासाडी, पाण्याचे न केले जाणारे पुनर्भरण, शेतकऱ्यांचे निर्मितीकडे केले जाणारे अक्षम्य दुर्लक्ष, पाणी जिरवा, पाणी अडवा योजनेची काटेकोरपणे न होणारी अंमलबजावणी, अतिनागरिकरणामुळे नद्यांच्या पात्रांवर पडणारा लोकसंख्येचा ताण आणि आकसत जाणारी नद्यांची पात्रे, नद्यांना आलेल्या पुराचे सागरात वाहून जाऊ दिले जाणारे पाणी, कार्बन डाय ऑक्साईडचे वाढते उत्सर्जन, वाढते जागतिक तापमान आणि परिणामी नद्यांच्या प्रवाहात होणारे बदल, घटत जाणारे पर्जन्यमान आणि अवर्षण ही मानव निर्मित कारणे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण करण्यास कारणीभूत आहेत.

हे सर्व टाळावयाचे असेल तर आपल्याला प्रथम आपली जीवनशैली आणि कार्यशैली बदलावी लागेल. हे सहज साध्य आहे. कोठल्याही प्रकारचा खर्च न करता केवळ आपल्या सवयी बदलण्यातून आपण मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत करू शकणार आहोत. पाणी टंचाईचा दोष सरर्ास प्रशासनाच्या माथी मारण्यात अर्थ नाही. याव्यतिरिक्त जर शास्त्रशुध्दरित्या पाण्याचे नियोजन केले तर कुठल्याच गावाला आणि शहराला पाणी कमी पडणार नाही. देश आणि जागतिक पातळीवर कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनास निर्धाराने आळा घालणेही आवश्यक आहे.

मोठ्या विसंगत परिस्थितीचे आपण साक्षीदार आहोत. एकीकडे धो- धो बरसणारा पाऊस आणि त्याचे वाहून दिले जाणारे आणि सागराला मिळणारे पाणी तर दुसरीकडे उन्हाळ्यात कंठी प्राण आणणारी उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई वर्षानुवर्षे हेच चालले आहे. परिणामी उन्हाळ्यात कुटुंबातील महिलांना आणि पुरूषांना प्रसंगी रोजगार बुडवून रोज मैलोगणती पाण्यासाठी उन्हाच्या झळा सोसत भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या व्यवस्थापनातील विस्कळीतपणा आणि नियोजन शुन्यता यापायी लाखो लोक वेठीस धरले गेले आहेत. टँकरने पाणी पुरवठा करणे हा काही पाणी टंचाईवर मात करण्याचा एकमेव उपाय नाही. पाणी टंचाईवर कायम स्वरूपी उपाययोजना करणे हाच श्रेयस्कर मार्ग आहे. पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे उत्तम नियोजन आणि पावसाळ्याव्यतिरिक्तच्या काळात काटकसरीने पाण्याचा वापर आणि थेंबनथेंब पाणी वाचविण्याची पराकष्टा करणे काळाची गरज आहे. यासाठी लोकसहभाग वाढवण्याची गरज आहे. थोडक्यात जलसंवर्धनाच्या आणि जलसाक्षरतेच्या सार्वत्रीकरणाची आणि जलसंचयाची संस्कृती समृध्द करण्याची नितांत आवश्यकता आहे. जलसंस्कृती जोपासू पाहणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना पाठबळ देण्याची आणि कृतीशील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.

संदर्भ :


- शहाणपण येईल, महाराष्ट्र टाईम्स, मुंबई
- महाराष्ट्राचे पाणी, दैनिक सकाळ, औरंगाबाद
- नद्यांची घुसमट, दैनिक सामना, औरंगाबाद
- आपल्याच पायावर आपलीच कुऱ्हाड, महाराष्ट्र टाईम्स, मुंबई
- नाथसागराला विक्रमी उन्हाचा फटका, दै. सामना, औरंगाबाद
- पाण्याचे नियोजन करणार कधी ? महाराष्ट्र टाईम्स, मुंबई
- राज्याचा घसा पडला कोरडा, दैनिक सकाळ, औरंगाबाद

Path Alias

/articles/tahaanalaelaa-mahaaraasatara

Post By: Hindi
×