शुष्क नद्यांचे आक्रोश : अल्प परिचय


मानवाचा मागील हजारो वर्षांच्या काळात नदीशी आलेल्या संबंधांचा मागोवा घेण्याचा येथे प्रयत्न केला गेला आहे. याचे तीन टप्पे दिसतात. सुरूवातीचा नदीकेंद्री समाज आणि त्याचा नदीकडे माता म्हणून पाहण्याचा आणि एकूणच प्रेमाचा व उपकृत भावनेचा दृष्टिकोन. त्यातून झालेली मानवी समाजाची प्रगती. जल आणि भूमी यांची नैसर्गिक निवड करण्याचा एक सिध्दांत असतो. त्याच्याशी सुसंगत असे मानवाचे वर्तन असेल तोपर्यंत त्याची प्रगती होत रहाते. शुष्क नद्यांचे आक्रोश या डॉ.रा.श्री.मोरवंचीकर यांच्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने जलसंवाद मधून त्यांचा अल्प परिचय मी करून द्यावा असे जलसंवादचे एक संपादक व माझे स्नेही श्री.मुकुंद धाराशीवकर यांनी सुचवल्यावरून केलेला हा प्रयत्न.

डॉ.मोरवंचीकरांचा जवळचा मित्र या नात्याने मी हा ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली असे त्यांना विचारले. त्यांनी सांगितले की - जल या विषयावरचा माझा पहिला ग्रंथे म्हणजे भारतीय जलसंस्कृती. तो 2006 मध्ये प्रसिध्द झाला. त्यात जल आणि पर्जन्य यावर जास्त भर आहे. म्हणजे ती नाण्याची एक बाजू झाली. दुसरी बाजू म्हणजे नदी. त्यापुस्तकात नदीला तसा वावच मिळाला नाही ही रूखरूख मनात होती. या विषयावरील वाचन व मनन सतत चालू होते. मला आठवतं की नंतर म्हणजे फेब्रुवारी 2010 मध्ये मुंबईत निर्माण ग्रुप कडून माझ्या त्याच ग्रंथाच्या निमित्ताने सत्कार झाला होता. त्यावेळी बोलताना कोरड्या होणार्‍या नद्या, नद्यांचे प्रदूषण व असा त्यांचा आक्रोश याविषयी लिहिण्याचा मनोदय मी जाहीरपणे व्यक्त केला होता. या सगळ्याचा परिपाक म्हणून हा ग्रंथ साकारला आहे. यात मी काय सांगितले आहे ? नद्यांची तीन रूपे मला जाणवतात. पहिले त्यांचे भौगोलिक व्यक्तिमत्व, दुसरे त्यांचे सांस्कृतिक व्यक्तिमत्व आणि तिसरे त्यांचे सध्याचे वास्तविक रूप. या तीन दृष्टिकोनातून भारतातल्या तसेच जगातल्या महत्वाच्या नद्यांचा आढावा घेण्याचा हा माझा प्रयत्न आहे.

गेले काही महिने त्यांचे या पुस्तकाच्या लेखनाचे काम चालू आहे. या काळात त्यांची प्रकृती त्यांना पुरेशी साथ देत नसल्याने त्यांना स्वत:च्या हस्ताक्षरात त्याचे पहिले लेखन करता आले नाही. त्यामुळे मिळेल त्या लेखनिकाला त्यांनी तोंडी मजकूर सांगावा. तो त्याने जमेल तसा लिहून घ्यावा आणि नंतर कोणाकडून तरी त्याचे डीटीपी करून घ्यावे अशा तर्‍हेने याचे पहिले लेखन झाले. साहजिकच त्याचे स्वरूप तितकेसे चांगले झाले नव्हते. अनेक ठिकाणी मजकुरात सुसंगती नव्हती, बर्‍याच ठिकाणी द्विरूक्ती झालेली होती आणि शुध्दलेखनाबद्दल तर विचारायलाच नको अशी स्थिती ! लेखकाचा बालमित्र म्हणून त्याने हक्काने मला या कच्च्या खर्ड्याचे वाचन व संपादन करायचे काम दिले व ते मी आनंदाने केले. माझ्या सूचनांचा विचार करून लेखकाने मजकुराला अंतिम रूप दिले व त्यानंतर त्याचे हे सध्याचे परिष्कृत रूप तयार झाले. पुस्तकाशी माझा असा हा निकटचा संबंध असल्यानेच मला श्री. धाराशीवकरांनी त्याचा परिचय करून देण्याची विनंती केली.

लेखकाने पुस्तकाचे तीन ठळक भाग कल्पिले आहेत. पहिला : शोध नद्यांचा, दुसरा : शोध नदी संस्कृतीचा आणि तिसरा : शोध वास्तवाचा. या प्रत्येक भागाचे स्वरूप आता थोडक्यात पाहू.

1. शोध नद्यांचा :


या भागात भारतातील महत्वाच्या नद्यांचे भौगोलिक रूप तपशीलाने सांगितले आहे, त्यात पुढील बाबी आहेत.

क. भारत व त्याची भौगोलिक स्थिती :
नद्या निर्माण होणे हे पर्वतांवर अवलंबून आहे. म्हणून येथे भारतातील सर्व पर्वतराजींचे भौगोलिक वर्णन केले आहे.

तसेच तिथे पडणारा पाऊस, त्या ठिकाणचे हवामान, तेथील ऋतु आणि तिथे आढळणारी जंगले यांचे विस्तृत वर्णन आहे. तसेच निरनिराळ्या नद्यांच्या खोर्‍यांची सविस्तर माहितीही येथे सापडेल.

ख. शोध सरितांचा :
या प्रकारणात केवळ ठळक नद्यांचा उल्‍लेख केलेला आहे असे नसून देशाचे विभागनिहाय वर्गीकरण करून तेथील नद्यांचा, भूगर्भशास्त्राच्या फार खोलात न जाता, पण सविस्तर परिचय करून दिलेला आहे. तसे पाहता कै.श.म.भालेराव यांनी त्यांच्या सरिताकोष या तीन खंडात्मक ग्रंथात सर्वच नद्यांचे भौतिक वर्णन अतिशय तपशीलवार दिले आहे. पण त्या ग्रंथाचा तीन सहस्त्र पृष्ठांचा विस्तार व तशीच मोठी किंमत या गोष्टींमुळे तो सामान्य वाचकाच्या आवाक्याबाहेरचा आहे. म्हणून येथे पुरेशी पण अतिविस्तार टाळून योग्य ती माहिती देऊन सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न डॉ.मोरवंचीकरांनी केलेला दिसेल.

ग. सांस्कृतिक भूगोल :
सांस्कृतिक भूगोल म्हणजे संस्कृती निर्माण करण्यासाठी जे भौगोलिक घटक कारणीभूत ठरतात त्यांचा विचार. लेखकाने ही संकल्पना येथे प्रथमच मांडली आहे. पर्जन्य, पर्वत व नद्या यांच्या योगदानाशिवाय संस्कृती आकार घेऊ शकत नाही. म्हणून या तीन घटकांचे परस्परसंबंध आणि त्या परिसरातील समाजाने निर्माण केलेली जीवनशैली यांचा एकत्रित विचार व्हावा लागेल. भारतात संस्कृतीची विविध रूपे का दिसतात ? कारण येथील नद्या अतिशय भिन्न नैसर्गिक परिस्थितीचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांच्या तीरांच्या संस्कृतीचा बाज वेगवेगळा वाटतो. उदाहरणार्थ राजस्थान, हिमाचल, आसाम व केरळ येथील भौगोलिक परिस्थिती अत्यंक भिन्न म्हणून तेथील नद्या भिन्न व अर्थातच त्यामुळे तेथील संस्कृतींचा बाजही भिन्नच. या संकल्पनेचे सोदाहरण व सविस्तर विवेचन येथे केलेलेे दिसेल.

घ. नदीखोर्‍यांचा इतिहास :
इतिहास हा लेखकाच्या अभ्यासाचा खरा मूळ विषय. त्यामुळे इतिहासाचा एक वेगळा दृष्टीकोन येथे लेखकाने मांडला आहे. तो म्हणजे नदीखोर्‍यांचा इतिहास. हा इतिहास मांडताना जी साधने उपयोगात आणली जाऊ शकतील त्यांची येथे विस्ताराने चर्चा केलेली आहे. तसेच खोर्‍यात विकसित झालेल्या मानवी वसाहती व त्यांची सांस्कृतिक जडणघडण यावर मौलिक भाष्य केले आहे. यावर वाचकांकडून अधिक विचार व संशोधन व्हावे अशी त्यांची इच्छा आहे.

2. शोध नदीसंस्कृतीचा :
मानवाने नद्यांच्या काठी वस्ती करून राहण्यास सुरूवात केली आणि हळू हळू तेथे मानवी संस्कृती विकसित होत गेली. या विकासाचे निरनिराळे पैलू उलगडून दाखवणारा हा भाग आहे. यातही दोन उपविभाग कल्पिले आहेत.

क. नदी आणि मानव :
मानवाचा मागील हजारो वर्षांच्या काळात नदीशी आलेल्या संबंधांचा मागोवा घेण्याचा येथे प्रयत्न केला गेला आहे. याचे तीन टप्पे दिसतात. सुरूवातीचा नदीकेंद्री समाज आणि त्याचा नदीकडे माता म्हणून पाहण्याचा आणि एकूणच प्रेमाचा व उपकृत भावनेचा दृष्टिकोन. त्यातून झालेली मानवी समाजाची प्रगती. जल आणि भूमी यांची नैसर्गिक निवड करण्याचा एक सिध्दांत असतो. त्याच्याशी सुसंगत असे मानवाचे वर्तन असेल तोपर्यंत त्याची प्रगती होत रहाते. पण अधिकाधिक प्रगतीच्या हव्यासापोटी मानव निसर्गावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्यातून त्याची उपभोगकेंद्री, स्वार्थी वृत्ती वाढीला लागते आणि परिणामस्वरूप माणूस नको कशी आणि नको इतकी धरणे बांधतो. नद्यांचे प्रवाह वळवतो, भूजलाचा अतोनात उपसा करतो आणि नद्यांच्या पात्रांमधली वाळूसुध्दा आपल्या बांधकामाच्या हव्यासापोटी उपसून टाकतो. यातून पर्यावरणाचा र्‍हास होतो आणि मग मानवापुढे प्रश्‍न उभा राहतो की प्राधान्य कशाला द्यायचे : पर्यावरणाला की तथाकथित विकासाला ? अशा सर्व मुद्यांची येथे चार प्रकरणात विस्तृत चर्चा केली आहे.

ख. सरिता आणि संस्कृती :
या उपविभागात इतिहासकालात नद्यांच्या काठी निर्माण झालेल्या मोठ्या संस्कृतीचा ओझरता परिचय करून दिलेला आहे. यात भारतातील सोळा प्रमुख नद्या आणि भारताबाहेरील दहा प्रमुख नद्या यांचा समावेश आहे. सोबत स्पष्टीकरणासाठी अनेक नकाशेही जोडलेले आहेत.

3. शोध वास्तवाता :


इतिहासात निरनिराळ्या नद्यांच्या काठी कीर्तिमान अशा वेगवेगळ्या संस्कृती होऊन गेल्या. त्यावेळी नदीच्या पावित्र्याच्या संकल्पना विकसित झालेल्या असल्या तरी आजचे वास्तव काय आहे ? हा शोध तीन पातळ्यांवर घेतला आहे. त्या अशा -

क. सरिता समस्या :
या प्रकरणात अनेक निरनिराळ्या कारणांनी होणारी नद्यांची कोंडी स्पष्ट केली आहे. यात भारतीय तसेच इतर परदेशातील नद्यांची नोंद घेतलेली आहे. तसेच मध्य आशियातील उरल सागराची व्यथा सुध्दा बोलकी केली आहे.

ख. धरणे :
नदी म्हटली की आता धरणे आलीच. पण खरेच धरणांनी फायदा होतो का ? तसा झालेला आहे का ? की धरण हीच एक समस्या आहे ? धरणांचे विविध असे काय परिणाम संभवतात ? त्यांचा इतिहास काय सांगतो ? धरणांबाबत जगातील सध्याचा विचार काय आहे ? धरणफुटीचा काय अहवाल आहे ? धरणासंबंधीच्या अशा वेगवेगळ्या प्रश्‍नांची सविस्तर व उद्बोधक चर्चा या विभागात केली आहे. ती मुळातूनच वाचण्यासारखी आहे.

ग. प्रदूषण :
जलप्रदूषण हा जो सध्याचा ज्वलंत प्रश्‍न आहे त्याबद्दलचा उहापोह या प्रकरणात आहे. यात प्रदूषणाची कारणे, प्रदूषण करणार्‍या घटकांचा तपशील, प्रदूषणाचे परिणाम याचे विवेचन आहे. प्रदूषण टाळण्याच्या बाबतीत भारतातील प्राचीन समाजाने काय काळजी घेतली होती याची माहिती आहे. नद्यांचे प्रदूषण मोजण्याच्या मानकांची माहिती आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर गंगा, यमुना, नर्मदा, महानदी, गोदावरी, कृष्णा, भीमा, कावेरी अशा प्रमुख भारतीय नद्यांमधील प्रदूषणाचा तपशील दिला आहे. गंगा प्रदूषण नियंत्रण योजनेची माहिती आहे.

ग्रंथातील तीन मुख्य भागातील विषयांची ही माहिती झाली. याखेरीज सुरूवातीला लेखकाची भूमिका स्पष्ट करणारे विस्तृत प्रास्ताविक आणि शेवटी ग्रंथातील सर्व माहितीचा थोडक्यात गोषवारा देणारे व लेखकाच्या चिंतनाचा सारांश सांगणारे उपसंहाराचे प्रकरण आहे.

शिवाय अशा तर्‍हेच्या संशोधनपर ग्रंथाचा अविभाज्य भाग म्हणजे संदर्भ ग्रंथांची यादी, अनेक नकाशे, तालिका असा तपशील अर्थातच ग्रंथाच्या शेवटी आहेच.

सुमेरू प्रकाशनातर्फे हा जवळपास चारशे पृष्ठांचा ग्रंथ प्रसिध्द होत असून जल या विषयावरील मराठीतील ग्रंथांमध्ये ही मोलाची भर ठरेल असा विश्वास आहे.

Path Alias

/articles/sausaka-nadayaancae-akaraosa-alapa-paraicaya

Post By: Hindi
×