श्री. खानापूरकर यांची फोनवरुन घेतलेली मुलाखत


प्रश्न : महाराष्ट्र सरकारने निर्गमित केलेल्या जीआर बद्दल तुमचे काय मत आहे?
उत्तर : 9मे, 2013 ला राज्य सरकारने काढलेला हा जीआर संपूर्णपणे अतांत्रिक (नॉन टेकनिकल) आहे. या जीआर मुळे राज्याचा पाणी प्रश्न सुटू शकणार नाही याची मला खात्री आहे.

प्रश्न : सरकारने काही तंत्रज्ञांची समिती नेमून, त्यांची मते विचारात घेवून मगच हा जीआर निर्गमित केलेला आहे. असे असून सुद्धा या निर्णयाला तुम्ही अतांत्रिक कसे काय म्हणू शकता?
उत्तर : So called technical persons in the Government have given a non techhnical report on the basis of which this GR is finalised .

म्हणूनच हा जीआर महाराष्ट्राचा पाणी प्रश्न कायमचा सोडवू शकणार नाही नाही असे माझे मत आहे. सेकंड व थर्ड चे नाले या भागात वन क्षेत्रात आढळतात. तिथे या जीआर च्या आधारे काम करता येणार नाही. त्याचप्रमाणे जिथे वनक्षेत्र नाही त्या पाणलोट क्षेत्राच्या फक्त 10 टक्के भागातच हे काम केले जावू शकते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या जीआर प्रमाणे काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

प्रश्न : वाळूसाठा असलेल्या क्षेत्रात असे काम करु नये असे या जीआर मध्ये म्हटले आहे. याबाबत तुमचे काय मत आहे?
उत्तर : नदी नाल्याच्या वाळू क्षेत्रात खोलीकरण करु नये असे जे जीआर मध्ये म्हटले आहे ते सुद्धा अतांत्रिक आहे. नाल्याच्या खोलगट भागातच वाळू साचते. 100 घनमीटर वाळू क्षेत्रात फक्त 30 घनमीटर पाणी थांबेल कारण वाळूची पोरॅसिटी फक्त 30 टक्के असते.या क्षेत्रातील वाळू काढून टाकली तर 100 घनमीटर पाणी जमा होईल असे साधे गणित आहे.

प्रश्न : तीन मीटर खोलीपेक्षा जास्त खोल जावयाचे झाल्यास जीएसडीएची परवानगी घ्यावी असे जीआर मध्ये म्हटले आहे. याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे?
उत्तर : जीएसडीए च्या नावातच ती सर्व्हे आणि विकास यंत्रणा आहे. ती संस्था जलसंधारणाची अथॉरिटी होवू शकत नाही. याचे कारण की तिला या क्षेत्रातील कामाचा प्रॅक्टीकल अनुभव नाही. खोदकामाची तीन मीटर मर्यादा असेल व त्याठिकाणी काळी मातीच पाच मीटर असेल तर या तीन मीटर खोदकामाचा काय फायदा होईल याचा विचार करावयास हवा होता.

प्रश्न : गाळ क्षेत्रात नाला खोलीकरण करु नये आसे जीआर म्हणतो. याबद्दल तुमचे काय मत आहे?
उत्तर : गाळ क्षेत्रात नाला खोलीकरणाचे काम हाती घेवू नये असे म्हणणे पूर्णपणे अतांत्रिक आहे. आतापर्यंत अशा प्रकारचे काम हाती न घेतल्यामुळेच तापी व पूर्णा खो-यात विहीरी कोरड्या आहेत. कूपनलिका अतिशय खोल गेल्या असून त्यातील पाणी संपत आले आहे. अशा परिस्थितीत कितीही पाऊस पडला तरी विहीरींना व कूपनलितांना पाणी येणे शक्य नाही. या गाळाच्या प्रदेशात पिवळी माती व वाळू यांचे आलटून पालटून अंदाजे 30 थर आहेत. पिवळी माती पाण्याला खाली मुरु देत नाही. त्यामुळे या गाळाच्या प्रदेशातील नाले खोल करुन पिवळ्या मातीचे किमान दोन थर काढून वाळूचे थर ओपन करणे आवश्यक आहे. सिमेंटचे पक्के बंधारे बांधून या वाळूच्या थरावर 40 ते 50 फूटाचे कॉलम उभे करण्याची गरज आहे. शिरपूर परिसरात नेमके हेच केल्यामुळे फायदा दिसून येत आहे.

प्रश्न : पुण्यातील काही विचारवंतांनी या कामासाठी यंत्रांचा वापर करु नये असे मत मांडले आहे. याबद्दल तुमचे काय मत आहे?
उत्तर : हे काम लवकरात लवकर पूर्ण केल्याशिवाय दुष्काळावर मात करता येणार नाही. मजूर लावून हे काम केल्यास कालाव्यपय जास्त होवून यश मिळायला उशीर होईल. हीच बाब विचारात घेवून सरकारने सुद्धा यंत्रांच्या वापराला अनुमती दिलेली आहे. असे मत मांडणा-यांनी मार्च, एप्रिल, मे, जून या चार महिन्यात नॉन कमांड एरियातील 83 टक्के शेतक-यांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन करुन देण्याचा एखादी मार्ग सांगावा अशी माझी त्यांना विनंती आहे. त्याचप्रमाणे एखादे क्षेत्र हाती घेवून त्याठिकाणी प्रत्यक्षिक घेवून मार्ग दाखवावा असे माझे त्यांना सांगणे राहील.

माझे विचार बरोबरच आहेत असा माझा आग्रह नाही. पण सद्य परिस्थितीत मी सुचविलेली उपाय योजना प्रत्यक्ष प्रात्यक्षिके घेवून सिद्ध केलेली आहे याचाही विचार करावा असे माझे मत आहे असे श्री. खानापूरकर यांचे म्हणणे आहे.
 

Path Alias

/articles/sarai-khaanaapauurakara-yaancai-phaonavarauna-ghaetalaelai-maulaakhata

Post By: Hindi
×