संशोधनाच्या माध्यमातून जलसंरक्षण


समजा एखाद्या व्यक्तीला जर ताप आला तर त्याच्या शरीराचे तापमान वाढते, त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. व परिणामी त्याचा ज्वर वाढून इतरही आजार संभवतात. त्याचप्रमाणे आता हिमालयालाही ताप आला आहे. भारत, चीन, मॅनमार, थायलंड येथे बेदरकार पणे वाढणारे उद्योगधंदे, जंगलातील बेसुमार लाकूडतोड व त्याचा अनियंत्रित इंथन म्हणून वापर या सर्वांमुळे हिमालयाभोवती एक दूषित वायुचा काळा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या ६०० ते ७०० वर्षात हिमनद्या लुप्त होण्याचा धोका संभवतो.

सदर विषयाची सुरूवात करत असताना मला प्रसिध्द जलतज्ज्ञ श्री. माधवराव चितळे यांच्या आयुष्यातील एक प्रसंग नमुद करणे, विषयाच्या अनुषंगाने फार महत्वाचे वाटते. श्री. माधवराव चितळे पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवीधर झाल्यावर त्यांच्यासमोर एक यक्ष प्रश्‍न आ - वासून उभा राहिला की महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेत रूजू व्हावे की केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे सेवेत भरती व्हावे ? सहाजिकच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेपेक्षा केंद्रीय सेवेत मिळणारे अधिकार व पैसा जास्त होता. सर्वसाधारणपणे विचार करू जाता कोणीही केंद्रीय सेवेचाच पर्याय निवडणे साहजिक होते. परंतु तरीही माधवरावांच्या मनात द्विधा मन:स्थिती कायम होती त्यावेळेस महाराष्ट्रात कोयना प्रकल्पाचे काम जोमात चालू होते. श्री चाफेकर हे नावाजलेले अधिकारी त्या प्रकल्पाचे मुख्य अभियंता होते. माधवराव थेट श्री. चाफेकर यांना जावून भेटले व त्यांच्या समोर आपली द्विधा मन:स्थिती कथन केली. तेव्हा श्री. चाफेकर यांनी जे स्पष्टीकरण दिले ते अतिशय समर्पक आहे.

श्री. चाफेकर माधवरावांना म्हणाले की - भावीकाळात पाण्याचा प्रश्‍न फार अवघड होणार आहे आणि त्याचबरोबर पाण्याची सुरक्षा हा कळीचा विषय बनणार आहे. आणि सुदैवाने पाणी हा विषय घटनेप्रमाणे राज्य सुचित असल्याने संशोधनाला व त्याच्या अंमलबजावणीला उचित वाव मिळेल.

श्री. चाफेकरांचे हे स्पष्टीकरण ऐकून माधवरावांनी एका क्षणाचा ही विलंब न लावता राज्य अभियांत्रिकी सेवेचे नियुक्तीपत्र स्वीकारले आणि आता कदाचित त्यामुळेच आज आपल्याला श्री. माधवराव चितळे हे पाणीप्रश्‍न व त्यातील संशोधनातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक उत्तुंग असे नाव दिसते. महाराष्ट्रातील वाल्मि, निरा या जलसंशोधनातील आग्रगण्य संस्था म्हणजे माधवरावांचेच अपत्य आहे. असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. आणि म्हणूनच आज माझ्यासारख्या युवकाला माधवरावांसारख्या संशोधकाकडे पाहून संशोधनाशीच निगडीत - संशोधनातून जलसंरक्षण हा विषय निवडणे योग्य वाटते. सदर विषय चार वेगवेगळ्या टप्प्यात मांडता येईल -

१. पूर्वी जलसंरक्षणाबाबत कसे धोरण होते ?
२. सध्या वर्तमानात जलसंरक्षणाची स्थिती काय आहे ?
३. भविष्यात जलसंरक्षण धोरण कसे असेल / कसे असावे
४. आंतरराष्ट्रीय स्तरावर जलसंरक्षण व त्याच्या संशोधनाबाबत सद्य स्थिती काय आहे ?

वरील मुद्यांना हात घालण्यापूर्वी संशोधन आणि जलसंरक्षण यांचा सविस्तर अर्थ व व्याख्या समजावून घेणे उचित ठरेल. सर्वप्रथम संशोधनाबाबत समजावून घेताना लक्षात येते की - ‘आपल्या अवतीभवती च्या अज्ञात गोष्टी मागील कार्यकरण भाव जाणून घेणे आणि त्या संबंधातील तोपर्यंतच्या मानवी आकलनाच्या मर्यादा उल्लंघून प्राप्त झालेल्या त्या नव्या ज्ञानाचा मानव जातीचे कल्याण प्रगती साठी वापर करणे होय.’ यावरून असे लक्षात येते संशोधन हे केवळ वैज्ञानिक बाबतीतील नसून सामाजिक, आर्थिक इत्यादी बाबतीत असते. त्यामुळे जलसंरक्षण या विषयाकडे पाहत असता व्यापक संशोधनात्मक भूमिका असणे आवश्यक आहे. त्याच बरोबर जलसंरक्षण समजावून घेताना लक्षात येते की सर्वांना पिण्यासाठी स्वच्छ व वापरण्यायोग्य असे पाणी पोहचणे म्हणजे जलसंरक्षण.

वरील मुद्द्यांकडे परत येत असताना आपल्या पारंपारिक जलसंरक्षण घोरणाकडे पहावे लागेल. या बाबतीत मला थेट ४०० -५०० वर्षे मागे जावून समर्थ रामदास स्वामी फार समर्पक वाटतात. समर्थ रामदास म्हणतात -नाना नद्या नाना देसी । वहात मिळाल्या सागरासी ।

लाहन थोर पुण्यरासी । अगाध महिमे।
नद्या पर्वताहून कोसळल्या । नाना साकडीमध्ये रिचवल्या
धबाबा खळाळां चालिल्या । असंभाव्य ।

वरील रचनावरून समर्थ रामदासांचा कार्यकारण भाव व सौंदर्यभाव पाण्याबाबत लक्षात येतो. परंतु त्याचबरोबर वाहते पाणी सुंदर असते, सुंदर भासते म्हणून ते केवळ वाहतच रहावे आणि समुद्राला जावून मिळावे असे त्यांना वाटत नाही. त्यांचे म्हणणे असे की, हे पाणी पृथ्वीच्या गर्भापर्यंत जायला हवे. वॉटर सेक्युरिटी (Water Security), वॉटर टेबल (Water table) हे शब्द तेव्हा जन्माला यायचे होते आणि कोणी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ अशी मोहिम ही हाती घेतली नव्हती. पण तरीही रामदास स्वामींना पाणी जमिनीत मुरवण्याचे माहीत होते. पाणी जमिनीत मुरले तरच ते सुरक्षित राहू शकते हे सांगताना रामदास स्वामी म्हणतात -पृथ्वीतळी पाणी भरले । पृथ्वीमध्ये पाणी खेळे।

पृथ्वीवरील प्रगटले । उदंड पाणी।

पृथ्वीच्या पोटात हे असे पाणी भरले की मगच ते लागेल तेव्हा वाहू शकते. त्याचे कालवे, पाट काढता येवू शकतात. हे सर्व समर्थ रामदासांना सांगावयाचे आहे. त्याचबरोबर गावा- गावातले लक्षावधी छोटे तलाव, फड पध्दत, मालगुजारी तलाव, खजाना बावडी, नहर ए अंबरी इत्यादी पारंपारिक पध्दतीत संशोधन करून जलसुरक्षेला वाव देणे आवश्यक आहे.

निबंधाच्या दुसर्‍या भागाकडे येत असताना सध्या वर्तमानात जलसंरक्षण व त्यातील संशोधनाची स्थिती लक्षात घेता येईल. त्याकरिता राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, ( µNational Chemical Laboratory) चा सुपर अ‍ॅब्सॉर्बंट जेल, (Super Absorbant Gel) हा प्रकल्प समजावून घेणे समर्पक ठरेल. मातीतल ओलावा दीर्घकाळ टिकवून पाण्याची सुरक्षितता वाढविणार्‍या या संशोधन प्रकल्पाला खरच दाद देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नदीजोड प्रकल्पाकरीता करण्यात येणारे भगिरथ प्रयत्न वाखाण्याजोगे आहे व जलसंरक्षणाला चालना देणारे आहे. धुळ्यात साकारलेल्या शिरपूर पॅटर्न असो की गुजरात मधील गाव गावाचे लेक टॅपिंग असो किंवा या सर्वांवर व्यापक संशोधन करणारे श्री. राजेंद्र सिंह यांचे राजस्थान मधील पाणी विद्यापीठ असो हे सर्वच प्रयत्न जलसंरक्षण व त्यातील संशोधनाला चालना देणारे आहेत.

निबंधाच्या तिसर्‍या भागाकडे येत असताना, भविष्यात पाणी संरक्षणाकरिता व संशोधनाकरिता काय करता येईल हे पाहुयात - ज्या पद्दतीने अन्न सुरक्षा कायदा करण्यात आला त्याचप्रमाणे पाणीसुरक्षा कायदा करणेही तितकेच आवश्यक आहे. सदर विषयातील भविष्यातील संशोधनाविषयी चर्चा करताना तांत्रिक, वैज्ञानिक दृष्टीकोन, सामाजिक अशा विविध अंगांनी संशोधनाचा विचार करता येईल. उदाहरणार्थ रिमोट सेन्सिंग प्रणाली (Remote Sensing) मर्चिन चा प्रयोग इत्यादी तांत्रिक संशोधनातून जलसंरक्षण करता येणे शक्य आहे त्याचबरोबर पाण्याचे बाष्पीभवन थांबविण्याकरिता रासायनिक तवंगाचा वापर, रिसर्च वॉटर स्ट्रक्चर, (Research Water Structure) स्टोरेज वॉटर स्ट्रक्चर (Storage Water Structure) पाईपलाईन प्रकल्प बदलेल्या पाऊसाच्या स्वभावावर अशा अनेक विषयांवर वैज्ञानिक संशोधन करून जलसंरक्षणाची उद्दिष्ट्ये साधता येईल.

तांत्रिक व वैज्ञानिक संशोधनाबरोबर लोकांमध्ये जल संरक्षणाबाबत वैज्ञानिक दृष्टीकोन तयार करणे आवश्यक आहे, उदाहरणार्थ पाणी व पिक पध्दती याबाबत विशिष्ट वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करणे आवश्यक आहे. आज जलयुक्त शिवारासारखी योजना जलसंरक्षणाबाबत व संधारणाबाबत लोकसहभागातून चालविलेली महत्वपूर्ण योजना आहे. परंतु त्यातही वैज्ञानिक दृष्टीकोनाचा व संशोधनाचा अभाव दिसतो आहे. उदाहरणार्थ, नदी खोलीकरण, रूंदीकरण करताना त्यातील वैज्ञानिक धागा लुप्त होतो की काय, अशी दाट शंका आहे. अगदी नदी खोलीकरणच नाही तर शेततळीही चुकीच्या ठिकाणी केली जात आहे. त्यातून अधिक बाष्पीभवन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व यातून पुन: एकदा जलसंरक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर येवू शकतो. यावर उपाय म्हणून वाल्मी सारखी एखादी संशोधन संस्था नियंत्रक म्हणून काम करणे गरजेचे आहे.

आम्ही बिघडलो तुम्ही बिघडावना :


वरील संत नामदेवांच्या अभंगाच्या पंक्ती लक्षात घेता पाणी संरक्षणाला लोकांमध्ये साक्षरता व जागृकता निर्माण करणे गरजेचे आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्रात वधू - वर सुचक मंडळाची जाहिरात वाचण्यात आली. सदर जाहिरातीत पाणी प्रश्‍नाकरिता पूर्णवेळ काम करणारा वर हवा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. आजपर्यंत जाती- धर्म - पंथ या साच्यात येणारी ही जाहिरात वरील वराकडून असलेली अपेक्षा पहाता जलसंरक्षणाबाबत एक नवा दृष्टीकोन तयार झाल्याची पावती आहे. माझ्या मते असाच कल्पक दृष्टीकोन सदर विषयात खोलवर संशोधन करून रूजवणे आवश्यक आहे. कारण जगभरात (पृथ्वीवर) पाण्याचा साठा हा स्थायी स्वरूपात आहे हा साठा झालाच तर कमी होईल परंतु वाढणार नाही. पुढील येणार्‍या काही काळात आपल्या सर्वांना स्वच्छ पिण्यायोग्य पाणी व वापरा योग्य पाणी मिळवायचे असेल तर जलसाक्षरता, जलजागृकता या सामाजिक विषयात संशोधन व प्रशिक्षणाशिवाय पर्याय नाही.

निबंधाच्या शेवटाच्या भागाकडे येत असताना जलसंरक्षण व संशोधन या विषयाची आंतरराष्ट्रीय किनारही लक्षात घेणे आवश्यक आहे असे मला वाटते. याबाबत एक व्यक्तीगत अध्ययन लक्षात घेवू यात. आपल्याला माहीतच आहे की, जगाच्या नकाशात मध्य पूर्वेकडे पाण्याची तूट व पर्यायाने जलसंरक्षण कळीचा मुद्दा राहिलेला आहे. परंतु योग्य संशोधन यावर रामबाण इलाज ठरला आहे. कसे ते पाहू या - टेग्रिस व सुफ्रेटिस ह्या नद्या तुर्कस्थान सिरिया व लेबेनॉन या देशात अनुक्रमे वाहतात. ओरांटिस ही नदी सिरिया व लेबेनॉन मध्ये वाहते. यार्मुक नदी सिरिया व जॉर्डन मध्ये वहाते. परंतु तरीसुध्दा योग्य नियोजन व संशोधनाच्या अभावामुळे मध्य पूर्वेत स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा व त्याच्या संरक्षणाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. परंतु स्टॅटेजिक फोरसाईट ग्रुप या भारतातील संशोधन संस्थेने सदर नद्यांचे चार स्वतंत्र खोर्‍यांमध्ये विभाग पाडून व चार खोरे - एक धोरण या सूत्रानुसार मध्यपूर्वेतील जलसंरक्षणाचा प्रश्‍न कायमचाच मिटवून टाकला. अगदी अशाच प्रकारची संशोधनीय इच्छाशक्ती सदांध विश्‍वात पसरणे आवश्यक आहे.

पॅसिफिक इन्स्टिट्यूट च्या संशोधनानुसार जेव्हा प्रादेशीक गोष्टी हवामान बदलांवर परिणाम व्हायला लागतो, तेव्हा स्वच्छ पाणी सर्वांपर्यंत पोहचवायचा प्रश्‍न ज्वलंत होतो व पर्यायाने जलसंरक्षण हे राजकीय असते म्हणून उदयाला येते. ते कसे हे पुढीलप्रमाणे पहाता येईल -

हिमालयाला ताप येतो आहे :


समजा एखाद्या व्यक्तीला जर ताप आला तर त्याच्या शरीराचे तापमान वाढते, त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. व परिणामी त्याचा ज्वर वाढून इतरही आजार संभवतात. त्याचप्रमाणे आता हिमालयालाही ताप आला आहे. भारत, चीन, मॅनमार, थायलंड येथे बेदरकार पणे वाढणारे उद्योगधंदे, जंगलातील बेसुमार लाकूडतोड व त्याचा अनियंत्रित इंथन म्हणून वापर या सर्वांमुळे हिमालयाभोवती एक दूषित वायुचा काळा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या ६०० ते ७०० वर्षात हिमनद्या लुप्त होण्याचा धोका संभवतो. ज्या हिमनद्यांचा प्रवाह हजारो लाखो वर्षे जीवन समृध्द करत आहे, त्या जर लुप्त झाल्या तर व्यावहारिक भाषेत येत्या तीन ते चार दशकातच हाहाकार माजल्या शिवाय रहाणार नाही. व त्यामुळे भारतातील गंगा, ब्रम्हपुत्रा, चीनमधील पिवळी नदी यातून पंधरा ते वीस टक्के पाणी कपात होण्याची धोक्याची घंटा एका संशोधन संस्थेने वाजविली आहे. वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर दक्षिण आशियात ५०० अब्ज घनमीटर पाण्याची कटौती भासेल. हे टाळायचे असेल तर योग्य संशोधनातूनच जलसंरक्षण करणे आवश्यक आहे.

त्यामुळे मला असे वाटते की, ज्याप्रमाणे अंटार्टिका खंडात विविध देशांनी एकत्र येवून हवामान बदलाचा अभ्यासासाठी केंद्र उभी केली आहेत त्याचप्रमाणे दक्षिण आशियाई देशांनीसुध्दा आपापसातील हेवेदेवे विसरून आपल्या घरातील कर्त्या पुरूषाचे म्हणजेच हिमालायाचे प्राण वाचविणे आवश्यक आहे. त्यासाठी हिमालयाच्या कुशीतच संयुक्त रित्या एक संशोधन केंद्र उभे करून हिमालयाचा ताप कमी करण्यासाठी सामुहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण यातूनच जलसंरक्षणाचे उद्दिष्ट साध्य होणार आहे.

विषयाचा शेवट करत असताना गेल्या काही दिवसात घडलेला माझ्याच आयुष्यातील प्रसंग नमूद करावा वाटतो. दुष्काळी प्रदेशातील एका गावात गेलो असताना, सदर गावातील केशकर्तनालयात केवळ एका व्यक्तीसाठी २ ते २ १/२ लिटर पाण्याची नासाडी केली जात होती. गावातील युवकांची पाण्याबाबतची अनभिज्ञ दृष्टी पाहून मला सदर विषय निवडावासा वाटला. कारण इथून पुढे पाणी संरक्षणाकरिता, संशोधनाकरिता जलसाक्षर युवकांची भक्कम फळी निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. जाता जाता सुरेश भटांची एक कविता विषयाच्या अनुषांगाने मला फार संर्पक वाटते -

दिले प्रत्येक वस्तीला निळे आकाश आम्ही,
जेथे जातो तेथे हाकेच्या वाटतो आम्ही
जरी कळेना वर्तमानाला आमुची भाषा
वीजा घेवून येणार्‍या वाटेशी बोलत असतो आम्ही.

(सदर लेख हा सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पावर रिसर्च स्टेशन खडकवासला या संस्थेने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत सादर करण्यात आला)

सम्पर्क


सिध्दार्थ नितीन नाईक
email - siddharthnaik1530@gmail.com


Path Alias

/articles/sansaodhanaacayaa-maadhayamaatauuna-jalasanrakasana

Post By: Hindi
×