संकटातील पाणी


रात्रीची दृश्ये सकाळच्या उलट असतात. ए.सी.कूलर्स, पंखे, समारंभाच्या ठिकाणचा डोळे दिपविणारा झगमगाट. पंचतारांकित हॉटेलमध्ये तर रोजच दिवाळी असते. पाण्याची आणि रोषणाईची चंगळ असते. रात्री राजरस्त्याने प्रवास करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणाऱ्या झाड-झाडोऱ्यानाही रोषणाईने सजविलेले असते.जलातून जीवनाकडे पाहण्याचा अत्यंत वास्तववादी दृष्टीकोन जगासमोर ठेवून भारतीय ऋषींनी जीवनातील जलाचे महत्व स्पष्ट केले होते. त्याला आता बराच काळ लोटला आणि कधी काळच्या या सुजलाम्-सुफलाम् गेशात पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. देशातील व शेजारच्या देशांशी असलेले पाण्याचे तंटे अधिकाधिक तीव्र होत आहेत. राज्या-राज्यातील नद्यांच्या पाणी वाटपांचा कोणताच वाद मागील साठ वर्षात मिटलेला नाही उलट त्यावरीन रक्तपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच संभाव्य युध्दाचे पाणी हे एक महत्वाचे कारण असणार आहे. पाण्यावरून भांडणे का व्हावीत? पाणी ही नैसर्गिक देणगी आहे. पृथ्वीवर 97 टक्के पाणी असल्यानेच पृथ्वीला नीलगृह मानले जाते. असे असून सुध्दा पाण्यासाठी जगभर संघर्ष का व्हावेत? याचे समाधानकारक उत्तर सापडत नाही. याचा अर्थच पाण्याकडे पाहण्याचा मानवाचा दृष्टीकोनच बदलला आहे. पाणी नैसर्गिक असले तरी समाजाला पाण्यापासून वंचित करून त्याचे व्यापारीमूल्य वाढविणे आणि त्यातून प्रचंड संपत्ती निर्माण करणे या एकाच ध्येयाने मानव पछाडला आहे. त्यामुळे जलाचे सामाजिक व सांस्कृतिक मूल्य नष्ट होऊन त्याचे व्यापारी तथा राजकीय मूल्य हेतुत: वाढविण्यात आले आहे. Political Hydrology - या नव्या संकल्पनेचा प्रचार व प्रसार वेगाने होत आहे. आणि जलसंस्कृतीची प्रदीर्घ बैठक असणारा भारतासारखा पारंपारिक देशही त्याचा बळी ठरत आहे म्हणून आपण त्याचा थोड्या तपशीलाने विचार करू या.

जागतिक तपमानात सतत वाढ होत असल्याने आणि वातावरणाचा सातत्याने ऱ्हास होत असल्याने हवामानात झपाट्याने बदल (Climate change) होत आहे. त्याचा दृष्य परिणाम मान्सूनवर होत आहे. पावसाबद्दलचे सर्व अंदाज फोल ठरत आहेत. नको तेव्हा नको त्या ठिकाणी नको तेवढा पाऊस पडत आहे. याच्या उलट अपेक्षित वेळेत, आवश्यक त्या ठिकाणी, पाहिजे तेवढा पाऊस होत नाही. त्यामुळे मान्सूनचे लाडके अपत्य असणाऱ्या भारतासारख्या देशाचे जलजीवन (Hydrosphere) जलावरण उध्वस्त होत आहे. परिणामी जलाच्या क्षेत्रात एक प्रकारचे अराजक (Hydrological Anarchy) निर्माण होत आहे. मिळेल त्या मार्गाने जो तो पाणी मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. परिणामी वास्तवात भरच पडत आहे. आगामी वर्षासाठी हीच परिस्थिती कायम राहिली तर विकासाचा तथकथित डोलारा ढासळून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण निसर्ग शक्यतो सावत्र - मातेची भूमिका वठवत नाही ही त्यातल्यात्यात जमेची बाजू आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचे उध्वस्तीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे. जैव विविधतेचा वेगाने ऱ्हास होत आहे. पर्यावरण संतुलनाचे निकश मानले जाणारे वाघासारखे प्राणी तथा अक्लपितसारखे मासे पृथ्वीवरून अदृष्य होत आहेत. क्षे वाचवण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करित आहोत तथापि त्यांच्या यशाची खात्री नाही. कागदावर मात्र सर्व चांगले दाखविले जात आहे. सुखाची साधने निर्माण करणे आणि प्रत्यक्षात सुखी होणे यामध्ये खूप तफावत आहे. तथाकथित विकासाच्या परमोच्च शिखराला पोहोचलेला मानव इतर प्रण्याच्या तुलनेत अतिशय दु:खी आहे. त्यामुळे विकासाची व्याख्या तपासून पाहणे गरजेचे आहे.

महाराष्ट्राचेच उदाहरण घ्या. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात कित्येक खेडी पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. 1950 मध्ये असलेल्या जलपिडीत तालुक्यांची संख्या आज तीन पटीने वाढली आहे. कधी काळी महाराष्ट्र हे देशातील प्रगत राज्य मानले जात होते. आज दरमहिन्याला over draft घेणारे ते सर्वात मोठे कर्ज बाजारी राज्य झाले आहे. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात अधिक धरणे आहेत. त्यासाठी महाराष्ट्राने पाण्यात किती पैसे ओतले तरीही महाराष्ट्र तहानलेलाच आहे. आता जलटंचाईवर मात करण्यासाठी टँकर संस्कृतिचा प्रचार व प्रसार होत आहे. या टँकर संस्कृतीचे जनक कोण? त्यामध्ये कोणाचे किती हितसंबंध गुंतले आहेत हा संशोधनाचा स्वतंत्र विषय आहे.

दरवर्षी या परिस्थितीमध्ये वाढच होत आहे. या महिन्यातील प्रतिवर्षीच्या वर्तमान पत्रातील बातम्याकडे लक्ष दिल्यास कोणते चित्र दिसते पहा. महानगराना पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख जलवाहिन्या फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहून जाते आहे. केवढा पाण्याचा अपव्यय. तहान लागल्यावर आड खोदण्याच्या बातम्याही म्हणजे विंधण विहीरी खोदण्याच्याही शेकडो बातम्या तथा जाहिराती असतात.

याच काळात लग्न समारंभाचे निमित्ताने पाण्याचा प्रचंड अपव्यय चाललेला असतो. पंचतारांकित गटातील सोहळा असल्यास मिनरलवॉटरचा इतक्या मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो की या भागात जलदुर्भिक्ष्य असेल याची कोणाली पुसटशीही कल्पना येणार नाही.

दुसरीकडे टँकरच्या पाणी वाटपावरून दोन गटात तुफान हाणामारी होऊन एका बालकाचा मृत्यू झाल्याचे दृष्य वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर दाखविलेले आढळते. अग्नीशामक दलाच्या बंबाच्या कमतरतेमुळे भडकलेल्या आगीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश अशाही स्वरूपाची बातमी असते.

या काळात सकाळी फिरून येत असताना दिसणारी दृष्ये वेगळीच असतात. बहुतेक गल्लीबोळामधून आणि उंच इमारतीवरील हौद भरून पाणी धो धो वाहत असते. पालिकेच्या नळाला सरर्ास विद्युत मोटारी लावलेल्या आढळतात. काही मंडळी याच पाण्याचा वापर करून आप-आपली वाहने धुवून काढतात, काही बागेला पाणी घालत असतात, सडे टाकत असतात, अनेक प्रकारे पाण्याचा अपव्यय रोजच चालू असतो. येथे समजावण्याचा प्रश्नच नसतो. जलसाक्षरता वगैरे सर्व पुस्तकात असते. कृतीमध्ये त्याचा लवलेशही नसतो. आम्ही पालिकेला पट्टी दिली आहे हे आमच्या मालकीचे पाणी आहे अशा कायदेशीर उत्तराबरोबरच, तुम्ही फिरायला जाता का नसत्या चौकश्या करताय, तुम्हाला निवृत्तीची शेखी मिरवायचीय पण आमच्याकडे तुमची करमणूक करण्यास वेळ नाही. उच्चभ्रू वसाहतीमधील माता- पित्यांची ही उत्तरे.

रात्रीची दृश्ये सकाळच्या उलट असतात. ए.सी.कूलर्स, पंखे, समारंभाच्या ठिकाणचा डोळे दिपविणारा झगमगाट. पंचतारांकित हॉटेलमध्ये तर रोजच दिवाळी असते. पाण्याची आणि रोषणाईची चंगळ असते. रात्री राजरस्त्याने प्रवास करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणाऱ्या झाड-झाडोऱ्यानाही रोषणाईने सजविलेले असते. पथदिव्यांच्या झगमगाटाने नगरे बेधुंद झालेली असतात. कर्ण- कर्कश संगीताने बिअरबार मदहोश झालेले असतात. शहरालगतच्या टपऱ्या रोषणाईने आणि जलकारंजानी ओथंबलेल्या असतात. या ठिकाणी होणारा विजेचा वापर आणि पाण्याचा विध्वंस पाहिल्यावर येथे अुभयतांचे दूर्भिक्ष्य असेल असे चुकूनसुध्दा वाटत नाही.

थोडेसे पुढे असणाऱ्या खेड्यामध्ये हेच दृश्य कसे दिसते पहा. किमान 12 तासाच्या भारनियमनाने खेडी वैतागलेली असतात, काळोखामुळे पडक्या वाड्याच्या भिंती अधिकच भयाण वाटत असतात. हा भितीदायक काळोख उजेडात आणण्यासाठी कुठेतरी एखादा दिवा मिणमिणत असतो. तो भूताटकीचा चमत्कार की माणूसकीचा आधार म्हणून तेवत असतो? विज कधी येईल आणि शिवाराला पाणी कधी देता येईल या विवंचनेत लहानसा मळेवाला रात्रभर जागतच असतो. गायब झालेल्या विजेचे परत येण्याचे वेळापत्रक नसते.

याउलट पाटाच्या पाण्यालगतच्या वसाहतीचे चित्र असते. पाण्याचा अमर्याद उपसा करून आपले शिवार हिरवेगार कसे राहील यासाठी सरंजामदाराची धावपळ चाललेली असते. जमिनीच्या मगदूराला न पेलतील अशा प्रकारची, पाणी पळविणारी पिके (ऊस, केळी, द्राक्ष इ.) मोठ्या हौसेने जोपासली जातात. याचे सुरेख उदाहरण म्हणजे नगर जिल्हा. महाराष्ट्रातील नैसर्गिक दृष्ट्या जल दुर्भिक्ष्य म्हणून ज्ञात असलेल्या या जिल्ह्यात कधीकाळी सर्वात अधिक साखर कारखाने होते. आणि प्रवरा खोऱ्यात आजही अधिक ऊस उत्पादन घेतले जाते. 1948 पासून परिसरात साखरेचे उत्पादन घेतले जात आहे. भूमिचे आणि पर्यावरणाचे किती प्रमाणात प्रदूषण झाले असेल याचा विचार करण्यास कोणालाच वेळ नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्राची जलनीती येथेच साकार झाल्याचे निदर्शनास येते. मग पर्यावरणाच्या तथा जलावरणाच्या या प्रचंड हानीचे जबाबदार कोण? मानवी जीवनावर याचे झालेले दुष्परिणाम पहावयाचे असतील तर येथील शेकडो इस्पितळांना भेटी द्या. ते मुक्यानेच सर्व काही सांगतील. येथील सामाजिक दुष्परिणाम हा संशोधनाचा स्वतंत्र विषय करावा.

राज्याच्या राजधानीतील तथा प्रत्यक्ष देशाच्या राजधानीतील चित्र यापेक्षा वेगळे आहे असे समजण्याचे कारण नाही. लोकसंख्येच्या प्रचंड भाराखाली कधीकाळची ही वैभवसंपन्न नगरे आज बकाल तर झाली आहेतच, शिवाय जलदुर्भिक्ष्यामुळे रोगराईची प्रसार केंद्रे आणि घाणीची साम्राज्ये बनली आहेत. या महानगरातून विजेची एवढ्या मोठ्या प्रमाणात नासाडी चाललेली असते की आपण भारतात राहत आहोत की परदेशात आहोत असा क्षणभर आभास निर्माण व्हावा.

कशी परस्पर विरोधी चित्रे आहेत ही. यामध्ये खऱ्या जलसंस्कृतीचे चित्र झाकोळून गेले आहे. किंवा मुद्दाम झाकून टाकले आहे. पाणी नाही म्हणून वीज नाही आणि वीज नाही म्हणून असणारे पाणी वापरता येत नाही अशा प्रतिकूल परिस्थितीत समाजाची विचित्र कोंडी झाली आहे. वर्षानुवर्षे हे चित्र भेसूर आणि गडद होत चालले आहे. याचा सामना करण्यासाठी स्वतंत्र खात्याची निर्मिती (disaster management) करण्यात आली आहे. तथापि हे सारे कागदावरील खेळ असावेत असे वाटते. वास्तवापासून शेकडो मैल दूर असणारे सचिवालय याची कागदावर आखणी करणार, मंत्रीमंडळ ती योजना राबविण्यासाठी एकमुखाने मान्यता देणार योजना ते आणि सचिवालयच राबविणार, आणि यशस्वीरित्या राबविल्याची कागदोपत्री नोंद करून सर्वच जण कृतकृत्य होणार. असा हा सिध्द साधकांचा खेळ चालू आहे.

विकास योजना कशी राबविली जाते या संबंधात एक मजेदार कथा सांगितली जाते. असेच एक नवशिक्षित दांपत्य होते. पतिपत्नी उभयता नोकरीसाठी जात होते. कालांतराने त्यांना एक कन्या रत्न झाले. तिचे नाव ' योजना ' ठेवण्यात आले. योजनेचे संगोपन जोरात चालू होते. पहिलेच अपत्य असल्याने त्याचे फारच कोड - कौतुक होत होते. कालांतराने त्यांना एक पुत्र रत्न झाले. त्याचे नाव विकास ठेवले गेले. दरम्यान योजना मोठी झाली आणि विकासला सांभाळण्याची जबाबदारी दांपत्याने योजनेवर सोपविली. दोघांना लागणारे सर्व खाद्य ठेवून ते दांपत्य नोकरीला जात होते. पण योजना फार खादाड झाली होती. तिच्या वाट्याचे तर ती खातच होती शिवाय विकासच्या वाट्यामधील पुष्कळसे ती हडप करित होती. त्यामुळे विकास रोडावतच चालला आणि योजना विस्तारत चालली. आणि आज तर विकास कुठेच दिसत नाही. वाढीचा वेग भलेही दोन अंकी झाला आहे असे शासन कितीही कंठरवाने सांगत असले तरी दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतेच आहे. मग विकास कोणाचा झाला हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे - हे सर्व कागदी सत्य.

जलसंस्कृतीचा, भारतीयांचा जलाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाचा विचार करत असता भिन्न रंगमंचावर चाललेल्या नाटकातील प्रसंगाचा विचार करत आणि काहीसे दूर गेलो असलो तरी वास्तवाच्या सानिध्यातच आहोत. तेव्हा या पार्श्वमूमिवर आपणास पारंपारिक जलसंवर्धन पध्दतीकडे वळता येईल का ? देशावर निर्माण झालेल्या जलाच्या ताणातून (Water stress) जलासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षातून लोकांची सुटका करता येईल काय? जलसंकट (Water crisis) म्हणजे नेमके काय? ते असल्यास त्याचे जनक कोण? आणि पारंपारिक जलसंस्कृतिच्या माध्यमातून ते आपणास दूर करता येईल का? हे अनुषंगाने निर्माण होणारे किंवा झालेले काही मूलभूत (अंगभूत - Potential) प्रश्न संभवतात. त्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केल्यास काय दिसते?

भारतीय जलसंस्कृतीमध्ये पाण्याला देव तर मानले आहेच शिवाय त्याला पंचमहाभूतामध्ये स्थान दिले आहे. त्यामुळे जलालाच जीवन म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे. जल हेच जीवन हे एक शास्त्रीय सत्य असल्याचे भारतीयांनी सर्व जगाला सर्वप्रथम सांगितले आहे. म्हृणून आपण जीवन या शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. जीवन या शब्दामध्ये जीव + अयन असे दोन शब्द अंतर्भूत आहेत. जसे नारायण किंवा रामायण - नारायण म्हणजे नर + अयन आणि रामायण मध्ये राम + अयन अयन याचा अर्थ चलन, वलन - अस्तित्व - कर्तृत्व वगैरे. म्हणजे जीवाचे अयन किंवा चलन - थोडक्यात ज्याच्या शिवाय सजीवांची (Life) (अस्तित्व) पैदास होऊच शकत नाही असे द्रव्य (Nector) रासायनिकदृष्ट्या पाणी म्हणजे H2+ 0 असे समीकरण असले तर या H2O मध्ये नैसर्गिक जलाची सजीवता नसते. म्हृणून नैसर्गिक जल महाभूतांपैकी एक असून त्याची स्वत:ची अशी काही ठळक वैशिष्ट्ये भारतीयांनी गृहीत धरली आहेत.

जलावरण हे सर्वात पहिले वैशिष्ट्ये होय. पृथ्वीभोवती जसे वातावरण आहे, तसेच जलावरणही (Hydrosphere) आहे. हे जलावरण जोपर्यंत अभंग आहे तोपर्यंत तिच्यावरील जीवांना कोणताच धोका संभवत नाही. पृथ्वीवर 70 टक्के पाणी असून केवळ 30 टक्के जमीन आहे. पृथ्वीवरील जलावरण आणि वातावरण जीव निर्मितीस पोषक असल्याने अन्य ग्रहाच्या तुलनेत पृथ्वीवरच सजीवांची निर्मिती झाल्याचे स्पष्ट होते. या उभय आवरणामध्ये नैसर्गिकरित्या बदल होऊ शकतो. त्यामुळे अनेक वेळा प्रलय (Deluge) झाल्याचे मानले जाते. अशा प्रकारच्या बदलास मन्वन्तर म्हटले जाते. आत्तापर्यंत सात मन्वन्तरे होऊन गेल्याचे मानले जाते. भारतीय संस्कृतीच्या दृष्टीकोनातून एकंदर 14 मनू असून पैकी सात झाली आहेत. आणि सात होणे बाकी आहेत. उपरोक्त आवरणात माणूस किती बदल करू शकतो हा विवाद्य मुद्दा असला तरी तंत्रज्ञानाच्या बळावर जलावरणात / वातावरणात आधुनिक मानवाने परिणामकारक विशेषत: हानीकारक बदल करण्याचा चंग बांधला असल्याचे अलिकडील त्याच्या कृतीतून सिध्द होत आहे.

नागरीकरणाचा विकास म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास हे समीकरण अलिकडे रूढ झाले आहे. त्याचा नैसर्गिक घटकावर दाहक परिणाम होत आहे. सर्व प्रथम जल लात्र (पाणलोट) क्षेत्राचे उध्वस्तीकरण होते. दिवसेंदिवस ही प्रक्रिया विस्तारत असून त्यामध्ये पारंपारिक तलाव, बारवा, विहीरी, नदी-नाले या सर्वांचे अस्तित्वच नामशेष झाले आहे. वनराई, उद्याने, मोकळी - मैदाने, कुरणे, गावठाण परिसरातील डोंगर या सर्वांवर अतिक्रमण होऊन त्यावर प्रचंड वास्तू उभारल्या जातात त्यामुळे ओसाडीकरण (desertification) वेगाने होते. त्यामुळे जलावरण व पर्यावरण याला प्रचंड तडे जातात. वसाहतीचे परावलंबित्व वाढत जाते. महानगरातील कृत्रिम झळाळीला भूलून आजूबाजूच्या वसाहती -यामध्ये समाविष्ट होतात - उजाडीकरणाची प्रक्रिया अधिक विस्तारली जाते. काही दिवस नागरी सुविधा पुरविण्याचे नाटक केले जाते, काहींना या सुविधांचा लाभ मिळतो. काहींना काठावरच्या सुविधा मिळतात तर काहींना आश्वासनावरच पिढ्यांनपिढ्या गुजराण करावी लागते. प्रत्येक निवडणूकांमध्ये पिण्याचे पाणी, गुंठेवारी, रस्ते व पूल याच घोषणा होत असतात - गावात रोजगार नाही, शहरात निदान रामप्रहरात कागद-गोळा करण्याचा स्वयंरोजगार त्यांना मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो. त्यामुळे त्याची अवस्था ना गावातला ना नगरातला अशी असते - महानगरांच्या बकालीकरणास ही परिस्थिती जबाबदार ठरते.

वर्षानुवर्षे हीच परिस्थिती कायम असते. त्यामध्ये सतत वाढच होत असते. महानगरांची होणारी बेसुमार वाढ, त्याला लागणाऱ्या किमान सुविधांचे वाढते दुर्भिक्ष्य. पिण्याच्या पाण्यासाठी होणारी साठमारी, प्रशासन अधिकाऱ्यांकडे असणारी नळ-जोडणीची संख्या आणि वास्तवातील नळ-जोडण्या यातील प्रचंड तफावत, गंजून गेलेल्या सांडपाण्यातून नेण्यात आलेल्या गळक्या वाहिन्या, याच काळात जलजन्य रोगांचा होणारा प्रसार, हे थांबविण्यासाठी लागणाऱ्या नेतृत्वाचा अभाव. या दुष्टचक्रातून सुटका कशी करायची? असा हा असहाय्य माणूस वसुंधरा वाचवा असे जेव्हा जोर जोरात घोषणा देत आपल्याच तंद्रीत जात असतो तेव्हा मला त्याची कीव कराविशी वाटते. वसुंधरा वाचवायच्या ऐवजी माणूस वाचवा असे म्हणणे अधिक संयुक्तिक वाटते.

नगरांची तथा महानगरांची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी ताज्या पाण्याची (Fresh Water) मागणी सतत वाढते आहे. त्यांना पिण्याचे पाणी देणे ही फार मोठी समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. भविष्यकाळात साऱ्या महाराष्ट्राची लोकसंख्या एकट्या पुणे - मुंबई पट्यात एकत्रित होते काय अशी शंका वाटते. या पाच कोटी लोकांना पाणी कसे पुरवायचे ? ज्या ठिकाणी पाणी नाही म्हणजे ज्या परिसरातील जलावरण कमकुवत आहे त्याठिकाणी एवढ्या प्रचंड वसाहतींचे जलावरण कसे करणार - तळ्याशिवाय गाव वसवू नये अशी परंपरा आहे. कधीकधी ठाणे - कल्याण परिसरातील गोड्या पाण्याच्या तलावांची संख्या काही हजारात होती. उल्हास आणि मीठी सारख्या नद्या होत्या. यमुनेच्या तीरावर कधीकाळी दिल्ली सारखे सुंदर शहर होते. यमुनाही देखणी होती आणि शहरही देखणे होते. आज उभयतांची काय दशा आहे. महाभारतात वर्णन केलेली हीच ती यमुना दायिनी मातांची घोर उपेक्षाच होय. मानवाच्या कृतघ्नतेची परमसीमा. थोडक्यात न पेलणारी जनसंख्या धारण करणारी महाकाय नगरे, अतिरिक्त पाणी शोषण करणारी पीकपध्दती, लगत असणाऱ्या अवजड औद्योगिक वसाहती, पंचतारांकित वसाहती, स्वायत्त नागरी वसाहती, (Town-ships) या सर्वांना लागणारे अमर्याद पाणी कसे आणावयाचे - ते जर पर्जन्याच्या पाण्याचा वापर करत असतील तर काळजी करण्याचे कारण पण वास्तव वेगळे आहे. सर्वांनी वसुंधरेला घायाळ करूनच जल शोषण चालविले आहे. जलतृप्तता करण्यासाठी सर्वांनी मिळेल त्या अवैध मार्गाचा वापर करण्यावर भर दिला आहे. विंधण- विहिरींची प्रमाणाबाहेर गेलेली संख्या, प्रतिदिनी खालावत जाणारी भूजल पातळी - देशातील उजाड होणाऱ्या खेड्यांची संख्या अन्नधान्याची वाढती टंचाई आणि दिवसेंदिवस महाग होत जाणारे पाणी सारेच असह्य - यातच भर पडून वसुंधरेचे वाढते तापमान, हवामानातील बदल तडा गेलेले जलावरण - पारंपारिक जलसंसकृतिला मारक ठरत आहे. पारंपारिक जलव्यवस्थापनामध्ये जलस्त्रोतांचे जतन, संवर्धन व वितरण करण्यामध्ये स्थिर समाजाचे मोठे योगदान होते. या सर्व बदलामुळे समाजाचे स्थैर्य नष्ट झाले. सामंजस्य लुप्त झाले आणि सामाजिक नेतृत्व उध्वस्त झाले. पाण्याची वाढती मागणी व घटता पुरवठा हे यामागील एक महत्वाचे कारण असावे.

वास्तविक जल, भाषा आणि धर्म हे समाजाला एकत्र बांधून ठेवणारे घटक - पण आज दुर्दैवाने त्यावरूनच समाजाचे जोमाने विघटन चालू आहे. देश एका संक्रमण अवस्थेतून जात आहे. अनेक क्षेत्रात विकासाचे नवे आयाम निर्माण होत आहेत. जलव्यवस्थापन क्षेत्र याला अपवाद नाही. देशातील पारंपारिक जलव्यवस्थापन पर्जन्य आणि नदी (तथा तलाव) या दोन प्रमुख जलस्त्रोतावर आवलंबून होते. पर्जन्यावर जोपासल्या जाणाऱ्या संस्कृतिला देव-मातृक संस्कृती तर नदीवर आधारलेल्या संस्कृतिला नदी- मातृक संस्कृती म्हटले जाते. अलिकडील हवामान बदलाचा परिणाम म्हणून पर्जन्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. परिणामी देव मातृक संस्कृती धोक्यात आली आहे. नदीवर बांधल्या गेलेल्या लहान मोठ्या शेकडो धरणांमुळे नदीचे वहन प्रतिबंधीत झाले आहे. त्यामुळे नदीसंस्कृती नष्ट झाली आहे. यापूर्वीचे तलाव, विहिरी इतिहास जमा झाल्याने त्यावरील खेडी केव्हाच नामशेष झाली आहेत.

नदीकडे भारतीय माणूस माता म्हणून पाहत होते. त्यामुळे नदीचे पाणी दूषित होणार नाही याकडे भारतीयांचे लक्ष होते. अभिजात स्वरूपाच्या जल संवर्धन, जतन व वितरण संस्था या जलसाठ्याची योग्य त्या प्रमाणात दक्षता घेत असल्याने जल प्रदूषणापासून तसेच दूरूपयोगापासून दूर असल्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्येही निभावून जाणे सक्य झाले. समाजाचे जलस्त्रोताशी प्रत्यक्ष अनेक पातळीवर दृढ नाते असल्याने ते जलाचे काटेकोरपणे नियोजन करत असत. शिवाय यातून त्यांना लोकोपयोगी काम केल्याचा निर्मळ आनंद मिळत होता. नळाचे पाणी वापरणे, विंधन विहीर खोदणे, धरण बांधणे व कालव्याचे जाळे निर्माण करणे ही आधुनिकतेची परिमाणे ठरल्याने जलसंधारणाच्या पारंपारिक पध्दती काळाच्या पडद्या आड गेल्या याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शासनाने पाण्यासारखा पैसा खर्च केला. परिणामी जलमूर्त असणाऱ्या वसाहतींचे जलस्वराज्य नष्ट झाले. जलपारविलंबित्व वाढत जाऊन तहान भागविण्यासाठी राज्यकर्त्याच्या टँकरची प्रतिक्षा करावी लागत आहे. टँकर संस्कृतीचा अभ्यास केल्यास आपणास या मागील प्रेरणा समजण्यास मदत होईल. जल व्यवस्थापन क्षेत्रात असलेली पारंपारीक सामाजिक बांधिलकी मोडून त्या ठिकाणी राजकीय एकाधिकार प्रस्थापित झाला. राजा कालस्थ कारणम्।

लहान मोठ्या नद्यांवर त्यांच्या आवाक्याबाहेरचे प्रकल्प उभारल्याने त्यांचे वाहणे थांबले आहे. परिणामी परिसरातील पाणलोट क्षेत्रांचे व जंगलाचे उध्वस्तीकरण झाल्याने भूजलाशी असणारे त्यांचे नाते खंडीत झाले आहे. पाझरणे संपल्यामुळे खेड्यातील विहीरी कोरड्या पडल्या आहेत. समाज जीवनातून नदी आणि तलावांच्या लुप्त होण्याने पर्यावरणाचा अपरिमित ऱ्हास होवून, भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हवामान बदलास (Climate change) मोठा हातभार लागला आहे. जल स्त्रोतांशी समाजाची बांधिलकी संपलेली असल्याने जलाशयाशी अनेक प्रकारच्या नात्यांनी जोडलेला समाज आत्मसंरक्षणासाठी जलापासून दूर जात आहे आणि शासनावर अवलंबून राहून कृत्रिम जलावर स्वत:ची गुजराण करीत आहे. धरणे बांधून नदी जायबंदी करणे योग्य की अयोग्य याच्या तपशीलात आज जाण्याची गरज नाही. 1937 मध्ये अमेरिकेने हूवर धरण बांधून जगासमोर मोठ्या प्रकल्पाचा आदर्श उभारण्याचा प्रयत्न केला. निसर्गावर मानवाने संपादित केलेला सर्वात मोठा विजय म्हणून त्याचे जगभर कौतुक झाले. जगभर त्याचे अनुकरण करण्यात आले. तथापि भारतासारख्या जलसंस्कृतिप्रधान देशात अशा प्रकारची धरणे की ज्यामध्ये सामाजिक सहभाग नसतो ती लोकप्रिय होत नाहीत. स्व. पंडित नेहरूंनी म्हटल्याप्रमाणे ती तीर्थक्षेत्रे होतील, देवस्थानेही होतील पण दुर्दैवाने ती आधुनिक तीर्थक्षेत्रे होऊ शकली नाहीत. उलट ती शोषितांचे अधिक शोषण करणारी, उलट भ्रष्टाचाराची केंद्र झाली. बांधलेली धरणे आता तोडणे योग्य ठरणार नाही करिता त्यामधील पाणी सुनियोजीत पध्दतीने नदीत कसे खेळविता येईल याचे संशोधन ही काळाची गरज ठरणार आहे. भारतात पूर्वी धरणे बांधली नाहीत असा याचा अर्थ नाही. तथापि, त्यांनी धरणेही बांधली आणि नदीही जीवंत ठेवली. त्यामुळे जलावरण, पर्यावण वाचलेच शिवाय, घाट, तीर्थक्षेत्रे, मंदिरे जीवंत राहून नदी संस्कृती हसती खेळती राहण्यास मदत झाली. ते सारे आता इतिहास जमा झाले.

त्याचे जलाशयाशी तुटलेले नाते प्रस्थापित करण्यासाठी धरणातील पाणी पुन्हा नदीत सोडण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. नदी जीवंत असल्यास नदीखोऱ्यात नवचैतन्य साकारण्याची शक्यता आहे. नदी सजीव केल्यास तळी व विहीरी मध्ये पुन्हा पाणी येण्याची शक्यता आहे. हजारो वर्षाच्या बहुसंख्य तलावांचे नुतनकरण झाल्यास जलावरणामध्ये अमूलाग्र बदल होऊन पर्यायवरणाचे संतुलन तर होईलच शिवाय खेड्याचे पुनरूज्जीवन होईल. आणि खेड्यातील बेरोजगार तरूण वर्ग पुन्हा कार्यप्रवण होईल. विहीरीतील पाझर वाढल्यामुळे ओलीताखालील क्षेत्राची वाढ होईल. आज जरी देशाच्या एकंदर उत्पादनातील शेतीचे योगदान 20 टक्के च्या आसपास असले तरी त्यामध्ये 60 टक्के समाज गुंतला आहे. त्यामुळे शेतीवरील भार काहीसा कमी होण्यास मदत होईल.

आजही धरणातील ओलीताचे क्षेत्र विहिरीवरील ओलीताच्या क्षेत्राचे तुलनेत कमी आहे. म्हणून विहीरी सक्षम करण्यावर अधिक भर देणे अगत्याचे आहे. खेड्यातील विहीरी, बारवा व तत्सम लहान मोठे जलाशय कार्यान्वित करण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न केले जावेत. अशा प्रकारचा कार्यक्रम पावसाळ्यापूर्वी राबविल्यात त्यांचे नैसर्गिकरित्या पुनर्भरण होईल. निर्मलग्राम व तत्सम योजना राबविणे चांगलेच आहे. तथापि तत्पूर्वी ग्राम जलपूर्त मोहिम राबविणे, ग्रामस्थांना त्याचे महत्व पटवून देणे त्यासाठी उत्तेजनार्थ काही प्रलोभन ठेवण्यास कोणतीच अडचण असू नये. अशा प्रकारची काही गावे अलीकडे जोमाने पुढे येत आहेत. सक्षम खेडे हा जसा देशाचा पाया आहे तसाच तो जलसंस्कृतीचा मूलभूत घटक आहे. त्याचे जलाशी तुटलेले नाते त्यांच्या कडूनच दृढ करणे म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रामजीवदान होईल.

जलसंस्कृती क्षीण होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे सतत वाढत जाणारी विंधन विहीरींची संख्या. त्यावर कोणतेच बंधन नसल्याने त्या कुठे घ्याव्यात, किती व्यासाच्या घ्याव्यात व किती मीटर खोल घ्याव्यात यावर कोणाचीही देखरेख नाही. भूजलावर विचार करणारा शासनाचा स्वतंत्र विभाग आहे. तथापि त्याच्याकडेही आवश्यक निश्चित माहिती नाही. विंधन विहीरीद्वारे केले जाणारे भूजलाचे शोषण हे रक्ताला चटावलेल्या जळवासारखे आहे. पृथ्वीच्या अंगाला या नलिकानी इतकी छिद्रे पाडली आहेत की अंतप्रवाहाचे जाळे शतखंडीत झाले आहे. त्यामुळे त्यांचे नियंत्रण करणे प्राधान्यक्रमाने अपरिहार्य आहे. कूपनलिका खोदण्याची परवानगी घेणे बंधनकारक असावे. खोलीची मर्यादा असावी. भूजल ही शासकीय संपदा समजण्यात यावी - यासंबंधातील अस्तित्वात असणाऱ्या कायद्यात सुधारणा होऊन त्याची अंमलबजावणी व्हावी. त्यासाठी लागणारे विद्युत मापक स्वतंत्र असावे. त्याची मालकी शासनाकडे असावी. कूपनलिकांना जलसंस्कृतीमध्ये विघातक घटक मानले जाते. समाजातील सामंजस्य नष्ट करण्यास व दोन कुटुंबात वितुष्ट आणण्यात कूपनलिकेने मोठे योगदान दिले आहे. करिता कूपनलिका उपभोक्त्यांचे विभाग पाडून त्यांच्या कडून योग्य ते शुल्क आकारण्यात यावे, त्यांची क्षेत्र मर्यादाही निश्चित केली जावी आणि त्याचे काटेकोर पालन व्हावे. अमर्दाय भूजल उपसा हा पर्यावरणाचा कर्करोग आहे. यामधून पर्यावरणाची मुक्तता करण्यासाठी कठोर उपायांची अंमलबजावणी करण्याशिवाय पर्याय नाही.

जलमेघचक्र (Water cycle) हे भारतीय जल संस्कृतीचे एक महत्वाचे गृहीतक आहे. त्याला वराहमिहिरा सारख्या विचारवंतानी याच्या समर्थक असे न्द्रिय - सिध्दांतात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पृथ्वीवरील जलाचा, जलाशयांचा पर्जन्य हाच एकमेव स्त्रोत (Hydro Unity) असल्याचे त्यांचे ठाम मत आहे. त्याच्या पृथ्वीवरील आगमनाचे संदर्भात त्यांनी आत्तापर्यंत बरेच ठोकताळे मांडले आहेत. प्रत्येक पिढीने त्यामध्ये भर घालून पर्जन्यविषयक अंदाज अचूक करण्याचा प्रयत्न केला आहे. आजही आपल्या प्रगत हवामान संशोधन केंद्रांना म्हणावी तशी अचूकता साध्य करता आलेली नाही. त्यामुळे पूर्वजांची या क्षेत्रातील प्रगती स्तूत्यच मानावी लागते. यामध्ये म्हणजे पर्जन्याचे भाकित वर्तविण्यासाठी त्यांनी अन्य नैसर्गिक परिमाणांचा म्हणजे पशु -पक्षी, वृक्ष, वारे यांचे ऋतूनिहाय वर्तन उपयोग केला आहे. आणि पावसाळ्यापूर्वी ते भाकित शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी गावोगावीच्या यात्रेतील भागणूक (पर्जन्याचे अंदाज) या समारंभात त्याचा समावेश करण्यात आला आहे. नित्याच्या पंचागामध्येही त्याचा समावेश केला आहे. आणि अद्याप तरी पर्जन्यविषयक हेच प्रमाण मानले जात आहे. तथापि दरम्यानच्या काळात वातावरणाची भयानक पडझड झाल्याने, हवामानात अमूलाग्र बदल झाला त्यामुळे अंदाजशास्त्र काहीसे डळमळीत झाले. जलमेघचक्रामध्ये बाधा निर्माण झाली पावसाच्या वेळापत्रकात कमालीची अनिश्चितता निर्माण झाली. त्यामुळे मागील काही वर्षात शेतीला जबरदस्त हादरे बसले. उत्पन्नातील हमखासपणा संशयास्पद झाला. त्याला काहीसे जुगारी स्वरूप येऊ पहात आहे. म्हणजे वातावरणातील बिघाडामुळे हवामानात बदल झाला, त्याचा परिणाम जलमेघचक्रावर होऊन आजपर्यंतच्या ऋतू चक्रात बाधा निर्माण झाली. भारतासारख्या मान्सूनजन्य संस्कृतीला (Hydraulic Civilization) त्यामुळे गंभीर धोका निर्माण झाल्याचे सध्यातरी दिसत आहे.

जलसंस्कृतीचे आणखी एक गृहीतक म्हणजे पाणी मर्यादित आहे (Finite) आणि आपण या मर्यादेचे उल्लंघन करू शकत नाही. पण अलिकडे नियोजन करताना आपण पाणी अमर्याद (Infinite) असल्याचे गृहीत धरले आहे. पृथ्वीवरील पाण्याच्या व्यापामध्ये मागील सहस्त्रवर्षात झीज किंवा भर पडलेली नाही. तसेच जलाला क्षेत्र मर्यादाही आहेत त्यानुसार पर्यावरणाचा, जैवविविधतेचा आराखडा (Structure) साकार झालेला आढळतो. मागील दशकापासून जैवविविधतेचा झपाट्याने ऱ्हास होत आहे. वसुंधरेच्या या प्रचंड व्यवहारामध्ये मानवाने किती प्रमाणात हस्तक्षेप करून पर्यावरणाच्या तथा अन्यप्रकारच्या मोडतोडीस हातभार लावला हा वादाचा मुद्दा असला तरी ऱ्हास प्रक्रिया गतिमान झाली आहे हे वास्तव नाकारता येत नाही. म्हणून जल संकटाचा प्रश्न नसून, (Water Crisis) उपलब्ध जलाला आपल्या कृतीने आपण संकटात (Water in crisis) ओढत नाहीत ना याची खातरजमा करून घेतली पाहिजे. थोडक्यात पाणी जेवढे होते तेवढेच आहे मात्र त्याच्या क्षेत्रिय आवरणातून आपणास ते अन्यत्र न्यावयाचे आहे. प्रश्न त्याच्या व्यवस्थापनाचा आहे. त्याच्या मर्यादा विचारात घेऊन आपण व्यवस्थापन केल्यास किंवा पाण्याला संकटात न लोटल्यास आपण सुखाने राहू शकू असे वाटते.

डॉ. रा. श्री. मोरवंचीकर, औरंगाबाद - (दू : 0240 - 2353275)

Path Alias

/articles/sankataataila-paanai

Post By: Hindi
×