समृध्द जलस्त्रोतांसाठी सृष्टीतंत्रज्ञान


सेरी च्या इतर कामांमध्ये पर्यावरण, आघात मुल्यांकन, इको टूरिझम प्रकल्प, इको विलेज इत्यादीचाही समावेश होतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमुख वैज्ञानिक अधिकारी डॉ.अमर सुपाते यांनी सेरीस बारामतीजवळील काटेवाडी येथील इको प्रकल्पातील जलाशय संवर्धन व सांडपाणी निर्मूलनाच्या कामाचे प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी आमंत्रित केले होते. सन्माननीय श्रीमती सुनेत्रादीदी पवार यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या प्रकल्पामध्ये सेरीने तांत्रिक सहकार्य केले होते.

सृष्टी तंत्रज्ञान (इकोटेक्नॉलॉजी) ची उद्‍गाती सृष्टी इको रिसर्च इन्स्टिट्यूट जवळ जवळ गेल्या 18 वर्षांपासून सातत्याने कार्यरत असणारी काही थोडक्या संस्थांपैकी एक अग्रगण्य संस्था आहे. संस्थेचे औद्योगिक सांडपाणी शुध्दीकरण नदीजल आणि जलाशय पुनरूज्जीवन करण्यातील संशोधनात्मक पूर्णाकृती प्रकल्पांची यशस्विता युरोप अमेरिकेतील परिसर विज्ञान - तंत्रज्ञानाच्या तोडीची आहे. हे करताना सेरीचे प्रमुख वैज्ञानिक संदीप जोशी व त्यांच्या सहकारी, सहधर्मचारिणी सायली जोशी यांना खडतर आव्हानांना तोंड देत शासकीय, औद्योगिक आस्थापनांनी प्रदूषण नियंत्रणांच्या सृष्टीतंत्रज्ञानाच्या अविष्कारीत संकल्पना समजावून अंमलात आणताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. सृष्टीतंत्रज्ञानातील संशोधनाचे वैश्विक महत्व लक्षात न आल्याने व नियमपुस्तके याप्रमाणे अनुकरण करण्याच्या मानसिकतेमुळे भारतीय मातीतील प्रदूषण तंत्रज्ञान स्थानिक वातावरणात अधिक चांगले कार्य करू शकते, त्यासाठी परदेशी मार्गदर्शकांची व व्यावसायिकांची आवश्यकता नाही, हे भारतीय विश्वविख्यात इको टेक्नॉलॉजिस्ट - ग्रीन सर्जन - संदीप जोशी व त्या संघर्षात अविरतक साथ देणार्‍या सायली जोशी यांच्या अतुलनीय कार्याने सिध्द झालेले आहे.

सृष्टी इको रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापनेची कथा ही वेगळी आहे. 1980 - 90 च्या दशकात पर्यावरण नियंत्रणाच्या संकल्पनांनी भारतीय शासकीय व औद्योगिक क्षितीजावर जोरदार विचारमंथन चालू झाले होते. नेहमीप्रमाणे काही उत्तम आर्थिक बळ असणार्‍या संस्थांनी परदेशात शॉपिंग करून आणलेल्या यु.ए.एस.बी (अप फ्लो अ‍ॅनरोबिक स्लज प्लॅकेट), बायोमिथेनेशन, ए.एस.पी. (अ‍ॅक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस) या व अशा विविध तंत्रज्ञानांनी वातावरण भारलेले होते. संदीप जोशींना अशाच एका ‘सु’दर्शन असणार्‍या औद्योगिक समुहाच्या पर्यावरण विभागात काम करणार्‍या व्यवस्थापकाने सुनावले होते, संशोधन करण्यापेक्षा विक्री वाढवण्याचे बघा, कारण आपले संधान अमेरिकी कंपनीशी आहे, त्यांच्या पर्यावरण - प्रदूषण नियंत्रण संयंत्रणा विकून जो नफा मिळतो त्यात आपला पगार होतोय ना... मग कशाला उरफोड करायची ? नाहीतरी आपल्याकडे परदेशी म्हटल्यानंतर अधिक किंमत मिळते ! इतकेच नव्हे तर संदीप जोशी त्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या अनुमोदनाने करीत असलेल्या पायलट प्रोजेक्ट अयशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले गेले. जैविक प्रक्रियेत फॉर्मेलिन ओतून प्रदूषण करणार्‍या सजीवांना नष्ट करण्याचे प्रयत्न झाले.

सातत्याने तोट्यात चालणार्‍या जलप्रदूषण नियंत्रण विभाग असणार्‍या कंपनीच्या एका साईटवर काम करताना लक्षात आले की ‘प्रोसेस’ पेक्षा ‘अ‍ॅसेट’ कडे अर्थकरण घोटाळतं, म्हणून संदीप जोशी दिखाव्याच्या पर्यावरण प्रदूषण नियंत्रणाच्या कामाकडे पाठ फिरवण्याचा निर्णय घेतला व भारतीय वातावरणाशी मिळतं - जुळतं तंत्रज्ञानाचा विकास करण्याचा ध्यास घेतला. त्यातूनच सृष्टी इको रिसर्च इन्स्टिट्यूटचा जन्म झाला. मास मेंटॅलिटी पेक्षा क्लास विचार करणार्‍या काही औद्योगिक संस्था असतात. यातूनच ग्रॅहॅम फर्थ च्या औरंगाबादेतील युनिटमध्ये अत्यंत आम्लधर्मीय सांडपाणी शुध्दिकरणाचा प्रकल्प सृष्टी इको रिसर्च इन्स्टिट्यूटने 1995 - 96 मध्ये अत्यंत विक्रमी वेळात पूर्ण केला. तो इतका चांगला चालला की दहा वर्षांनंतर त्याच्या पुनर्विलोकनासाठी भेट दिली असता ग्रॅहॅम फर्थ च्या व्यवस्थापकीय संचालकांनी संदीप जोशींची आवर्जून भेट घेतली व सांगितले की, सांडपाणी प्रकल्पाच्या गुणवत्तेमुळे त्यांच्या कारखान्याला सातत्याने मदतच झाली. तसेच बॉश चॉसिस (पूर्वीची कल्याणी बेक्स) या कंपनीने तर जळगाव व पुणे येथील प्रकल्पांसाठी इलेक्ट्रो प्लेटिंगचे सांडपाणी शुध्दीकरणासाठी सेरीचे सॉइल स्केप फिल्टर ( Soil Scape Filter) हे सृष्टीतंत्रज्ञान वापरले. मानवी श्रम, वीज वापर व रसायने यांचा अर्थिक ताळेबंद मांडला तर 15 वर्षांपेक्षाही अधिक काळ चालणार्‍या या प्रदूषण नियंत्रण संयंत्रणांनी कंपनीचे दोन कोटींहून अधिक रूपये वाचविले आहेत. ज्या उद्देशाने सेरी स्थापन झाली होती, त्याचे उत्तम प्रमाण समोर येऊ लागले आहेत. अशाच प्रकारे टेक्नोव्हा इमेजिंग सिस्टिम कंपनी सेरी चे तंत्रज्ञान वापरून लांभांकित झाली आहे. अशी उदाहरणे भारतीय पर्यावरण नियंत्रणाच्या इतिहासात कायम दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत राहतील.

पुण्यातील काही प्रदूषण मंडळाच्या अधिकार्‍यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सेरी ने कारखान्यांच्या अल्पखर्चिक, टिकाऊ सुलभ वापराच्या संयंत्रणा उभारण्यावर भर देण्याऐवजी क्लीन रिव्हर कमिटीच्या साथीने आगळा - वेगळा प्रकल्प हाती घेतला - दूषित प्रवाह शुध्दीकरणाचा. त्यास कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग व कमिन्स फाऊंडेशननेही साथ दिली. भोसरीच्या परिसरातील कारखाने व वस्ती यांचे जवळ जवळ 70 - 72 एमएलडी (दशलक्ष लिटर्स प्रतिदिनी) सांडपाणी नाल्याद्वारे दापोडी (पुणे) तील सी.एस.ई च्या परिसरातून वाहत पवनेला मिळते. 2003 साली कर्नल (आता निवृत्त) राजेंद्र केंजाळकर यांनी क्लीन रिव्हर कमिटीचे प्रोबिर सिन्हा व डॉ.विश्वास येवले यांच्याशी विचारविनिमय करून सेरी च्या आविष्कारित (Innovative) ग्रीन ब्रिज तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरविले. यासाठी विद्युत ऊर्जेची वा सिमेंटची अजिबात गरज नव्हती. सर्व संस्थांनी या पथदर्शी प्रकल्पासाठी तन, मन, धनाने सहभाग दिला अन् तीन महिन्यात हा प्रकल्प कार्यान्वित झाला. प्रदूषणाने मृतवत झालेला नाला - पूर्वाश्रमीचा नैसर्गिक जलप्रवाह पुनरूज्जीवित झाला. 800 - 1000 मि.ग्रॅ/लि. एवढा असलेला सी.ओ.डी (C.O.D) (केमिकल ऑक्सिजन डिमांड - रासायनिक प्राणवायू मागणी - प्रदूषण मापनाचा एक घटक) ग्रीन ब्रिजनंतर 60 - 65 मि,ग्रॅ / लि. एवढा झाला ! सहभागी संस्थांनी एवढ्या यशाची अपेक्षाच केली नव्हती. म्हणून वेगवेगळ्या शैक्षणिक, खाजगी आणि संस्थात्मक प्रयोगशाळांमध्ये पाण्याचे नमुने पाठवून खात्री करवून घेण्यात आली अन् त्यातून सिध्द झाले की, ग्रीन ब्रिज चा पहिला प्रयोग अत्यंत यशस्वी झाला आहे.

या प्रयोगाचा बोलबाला झाल्यानंतर पुण्यातील इंटेक - गोमुख प्रणित 10 -12 स्वयंसेवी संस्थांनी सेरी च्या रेखांकनानुसार पुण्यातील दोन नाल्यांवर - दापोडीतील नाला व आंबिल ओढा - या दोन अत्यंत दूषित जलप्रवाहांवर ग्रीन ब्रिज तंत्रज्ञान वापरण्याचे ठरविले. 2004 साली क्लीन रिव्हर कमिटीचे सचिव श्री.प्रोबिर सिन्हा यांनी भूपेंद्र मणियार यांच्या साथीने सॅडविक एशियाच्या आर्थिक पाठिंब्याने दापोडीतील दुसरा नाला शुध्दीकरण व पुनरूज्जीवनाचा प्रकल्प यशस्वी केला. 2005 साली आंबिल ओढ्याच्या ग्रीन ब्रिज प्रकल्पासाठी उद्योजक श्री.अतुल किर्लोस्कर तसेच ज्येष्ठ उद्योजक श्रीमती अनु आगा, पर्यावरणप्रेमी सौ.आरती किर्लोस्कर, पर्यावरण अभ्यासक श्री. विजय परांजपे, पर्यावरणप्रेमी संस्कृती मेनन यांनी परिश्रमपूर्वक ग्रीन ब्रिज तंत्रज्ञान शासकीय कामकाजामध्ये रूजविण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी आपला अमूल्य वेळ तंत्रज्ञान समजावून घेत पुणे महापालिकेच्या आयुक्तांना व अधिकार्‍यांना आंबिल ओढ्यावर ग्रीन ब्पिज लावण्यास राजी केले व आर्थिक मगतही देऊ केली. सेरी या सुरूवातीच्या प्रयत्नांना साथ देणार्‍या सर्वच आदरणीय व्यक्तींची व संस्थांची कायम ऋणी राहील. कारण आविष्कार प्रकल्पांना पाठिंबा देण्याची सवय सार्वत्रिक नव्हती अन् आजही विरळच आहे.

तद्नंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तत्कालिन सचिव डॉ.दिलीप बोराळकर यांनी उल्हासनगर, कोल्हापूर, पालघर येथे सृष्टीतंत्रज्ञान रूजण्यासाठी सरकारी माध्यमातून खूप प्रयत्न केले. नियंत्रकांच्या भूमिकेतून जलसेवकाच्या भूमिकेत जाणे प्रदूषण व महापालिकांच्या अधिकार्‍यांना खूप अवघड गेले. डॉ.दिलीप बोराळकरांनी महाराष्ट्रातील दूषित नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी सेरी ला आवाहन करीत सुरू केलेले पथदर्शी प्रकल्प आजही उत्तम सरकारी प्रकल्प - नियोजकाची वाट पाहत आहे. सेरी च्या दृष्टीने परिसंस्थीय आरोग्य खालावलेल्या नद्या, जलाशय म्हणजे पेशंटच आहेत. त्यामुळे नियंत्रकांमुळे कितीही अडथळ्यांची शर्यत, मान - अपमान झाले तरी जेव्हा नदी शुध्दीकरणाचे प्रकल्प व्यापक समाजहित डोळ्यांसमोर ठेवून करायचे असतील तेव्हा तेव्हा सेरी आघाडीवर असते. हेच लक्षात घेऊन कै.डॉ.मोहन कोडरकर यांनी 2008 साली पुण्यात म्हटले होते, संदीप जोशी यांच्यासारखा प्रयोगशाळेला चार भिंतीतून विस्तीर्ण निसर्गात घेऊन जाणारा व प्रकल्प वीजेविना, सिमेंटविना, केवळ परिसंस्थीय जैविक प्रक्रियांचा आधार घेऊन यशस्वी करणारा लोकसेवी वैज्ञानिक अख्या दक्षिण आशियात नाही.

डॉ.मोहन कोडरकर हैद्राबादेतील प्रख्यात जीवविज्ञानतज्ज्ञ होते आणि जपानमधील आंतरराष्ट्रीय जलाशय - पर्यावरण समिती (ILEC), International Lake Environment Committee) चे सन्माननीय सदस्य होते. त्यांनी पुढाकार घेऊन हैद्राबादेत सेरी च्या कार्यकुशलतेचा उपयोग मेडी कुंठा या जलाशयाच्या जैविक पुनरूज्जीवनासाठी करवून घेतला. विप्रो केअर या सन्माननीय अझीम प्रेमजी यांच्या संस्थेने प्रकल्पास निधी पुरविला. या प्रकल्पाचा दृष्यपरिणाम जलाशयाचे आरोग्य सुधारण्यावर तर झालाच पण त्याबरोबर त्यावर अवलंबून असणार्‍या 5000 लोकवस्तीतील जलोद्भवी रोगांचे प्राबल्यही नष्ट झाले. साधारपणे 2006 नंतर सायली जोशीही सेरी च्या कामात सहभागी झाल्या. त्यांच्या कुशल प्रशासकीय मार्गदर्शनाखाली सेरीची घोडदौड सुरू राहीली. वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम, सामाजिक कार्यक्रम व झोपडपट्टी पुनर्वसनातील पर्यावरण प्रशिक्षणात आपल्या कार्याचा ठसा उमटविला. या कामात सर्वश्री विनोद बोधनकर, नरेंद्र चुघ, सुनिल जोशी, विवेक वेलणकर इत्यादींनी सहकार्य केले व घेतले. सेरीच्या एकूणच कामकाजात सामाजिक पर्यावरणीय निकड यांस प्राधान्य आहे. सेरीने प्रतिवर्षाच्या जलदिंडीत केलेल्या 2008 पर्यंतच्या पर्यावरणीय अभ्यासात सायली जोशींचे मार्गदर्शन लक्षणीय होते.

उदयपूरच्या जलाशयप्रेमी श्री.अनिल मेहता, प्रिसिंपॉल, इंजिनिअरिंग कॉलेज व शल्यचिकित्सक डॉ.तेज राझदान यांनी प्रदूषणाने विकलांग झालेल्या आयड नदीच्या पुर्नसंजीवनासाठी सेरी ला साद घातली. सेरी च्या बरोबर ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर च्या प्रोबिर सिन्हा आणि भूपेन मणियार यांनीही आयद पुनरूज्जीवनात सहभाग घेतला. आयलेक, जपानचे अध्यक्ष डॉ.मासाहिसा नाकामुरा आणि उपाध्यक्ष डॉ.वाल्टर रास्ट, टेक्सास विद्यापीठातील पारिस्थितीकीचे प्राध्यापक यांनी आपल्या चिकित्सक नजरेने मूल्यमापन करीत गौरवोद्‍गार नोंदविले आहेत. आयड नदीचे संजीवन उदयसागर जलाशयातील अगणित मत्स्योत्पादनात परावर्तित झाले अन् त्यामुळे प्रदूषण - बाधित मच्छिमारांच्या जीवनात समृध्दीची पहाट आलीय.

या प्रकल्पास भारतीय नियोजन मंडळाचे सदस्य डॉ.के.कस्तूरीरंगन, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. एस.पी. गौतम यांनी भेट देऊन उपक्रमाची माहिती घेतली अन् अखिल भारतीय तंत्रज्ञान परिक्षणाचा ( Technological Assessment) चा शासकीय उपक्रम हाती घेतला. यातूनच सेरी च्या मार्गदर्शनानुसार ग्रीन इन्फ्रास्ट्रक्टर ने 600 एमएलडी बुढ्ढा नदीचा (नाला नव्हे) लुधियानातील प्रकल्प हाती घेतला आहे. त्यातील कामाचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. त्याच्या पूर्तेतेसाठी तरूण अभियंता गौरांग सिन्हाने आपला संगणकीय व्यवसाय पणाला लावला. या प्रकल्पाच्या कालबध्द जलपर्यावरणीय चाचण्यांसाठी डॉ.प्रमोद सालसकर, पल्‍लवी पाटील व प्रज्ञेश आग्रे यांनी सहभाग घेतला, तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने सचिव श्री.जे.एस.कम्योत्रा, संचालक डॉ.अविनाश अकोलकर व शास्त्रज्ञ श्री.ए.के.चौधरी हे सातत्याने प्रकल्पावर लक्ष ठेवून आहेत. या प्रकल्पाची माहिती केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या वेबसाईटवर तर आहेच पण माननीय पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या फेसबुकवर ही या प्रकल्पाची माहिती देण्यात आली आहे. पंजाब चे मुख्यमंत्री माननीय प्रकाशसिंह बादल यांनी ग्रीन सर्जन संदीप जोशी यांची दिल्‍लीत भेट घेवून हा प्रकल्प हाती घ्यावा म्हणून खास विनंती केली होती तर माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी प्रकल्पाचे भूमीपूजन स्थानिक खासदार मनीव तिवारी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले होते.

त्याचवेळी आलाहाबादेत स्वामी आविमुक्‍तेश्वरानंद व स्वामी ज्ञानस्वरूप सानंद यांच्या पुढाकाराने रसुलाबाद घाटाच्या जवळ 5 दूषित नाल्याचे शुध्दीकरण सेरी व ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चरने केवळ 2 महिन्यात पूर्ण केले. हिंदू धर्माच्या धर्मगुरूंनी गंगा शुध्दीकरणाच्या प्रकल्पात पथदर्शी ग्रीन ब्रीज तत्वज्ञान वापरून एक जगावेगळा आदर्श निर्माण केला आहे. हिंदू धर्मगुरूही जलविज्ञान व तंत्रज्ञानात कोणापेक्षाही मागे माहीत हे सोदाहरण दाखवून दिले आहे. भारतीय जलपुरूष डॉ.राजेंद्र सिंह यांनी आपल्या जलबिरादरीच्या सहकार्यासह भेट देवून कामाचे कौतुक केले आहे. अशा विविध प्रकल्पामधून सेरी चा अनुभव समृध्द होत गेला आणि त्याचा फायदा विविध भौगोलिक प्रदेशांमध्ये रहाणार्‍या प्रदूषण बाधीत जनतेला होत आहे.

सेरी च्या इतर कामांमध्ये पर्यावरण, आघात मुल्यांकन, इको टूरिझम प्रकल्प, इको विलेज इत्यादीचाही समावेश होतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमुख वैज्ञानिक अधिकारी डॉ.अमर सुपाते यांनी सेरीस बारामतीजवळील काटेवाडी येथील इको प्रकल्पातील जलाशय संवर्धन व सांडपाणी निर्मूलनाच्या कामाचे प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी आमंत्रित केले होते. सन्माननीय श्रीमती सुनेत्रादीदी पवार यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या प्रकल्पामध्ये सेरीने तांत्रिक सहकार्य केले होते. पर्जन्य जलसंचयन च्या राज्यभर जनजागरण अभियान 2003 साली अग्रगण्य दैनिक सकाळ ने सेरीच्या साथीने 10-11 शहरांमध्ये त्याविषयी व्याख्यान मालिका आयोजित केल्या होत्या. त्यास नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. तसेच सर्व आवृत्यांमध्ये दैनिक सकाळ ने आकाशीची गंगा आंगणी ही संदीप जोशी लिखित लेखमालिका देखील प्रकाशित केली होती.

संदीप जोशी नेहमी म्हणतात, एक डॉ. पेशंटचे ऑपरेशन करतो तेव्हा एक जीव वाचतो पण एक ग्रीन सर्जन प्रदूषित नदीचे वा जलाशयाचे ऑपरेशन करतो तेव्हा हजारो लक्षावधी जीवांचे पुनर्वसन होते. तर सायली जोशी म्हणतात, म्हणूनच विविध यंत्रणांनी नदीजल व जलाशय आरोग्याचे काम करतांना निविदा वगैरे गुणवत्ता नाशक पध्दतींचा अवलंब न करता जैविक प्रक्रियांवर भर द्यावा ना की इन्फ्रास्ट्रक्चरवर. आजतागायत सेरी ने जलप्रदूषण निर्मूलनावर भर दिला आहे व या पुढेही आपल्या समर्पित कर्मचार्‍यांच्या साथीने समाजोपयोगी काम करण्याचा पण केला आहे.

Path Alias

/articles/samardhada-jalasataraotaansaathai-sarsataitantarajanaana

Post By: Hindi
×