समन्यायी पाणी वाटपातून समृध्दी - इंदोरे गावाची यशोगाथा


इंदोरे गावाच्या वरच्या बाजूस 2 कि.मी अंतरावर महाराष्ट्र शासनाने एक पाझर तलाव 1972 साली बांधला. सन 1989 - 92 या काळात या पाझर तलावाचे रूपांतर लघू पाटबंधारे तलावात शासनातर्फे करण्यात आले. धरण भिंतीची उंची वाढवूम साठवण क्षमतेमध्ये वाढ करण्यात आली. दोन्ही तीरावर कालवे काढण्यात आले. इंदोरे व मडके जांब या दोन गावाची मिळून एकूण 250 एकर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली.

नाशिक वणी रोड वर नाशिक पासून 20 कि.मी अंतरावर वसलेले इंदोरे हे एक गाव. गावाचे क्षेत्र मुरमाड, उन्हाळ्यात पाण्याची भिषण टंचाई, शेतातून मिळणारे उत्पन्न अगदीच तुटपुंजे. सिंचनाची सोय नसल्यामुळे शेती परवडत नसे. ही परिस्थिती आहे 10 ते 15 वर्षांपूर्वीची. पण आज या गावाचा कायापालट झाला. या गावात आर्थिक समृध्दता आली ती लोकसहभागातून केलेल्या पाण्याच्या नियोजनामुळे.

इंदोरे गावाच्या वरच्या बाजूस 2 कि.मी अंतरावर महाराष्ट्र शासनाने एक पाझर तलाव 1972 साली बांधला. सन 1989 - 92 या काळात या पाझर तलावाचे रूपांतर लघू पाटबंधारे तलावात शासनातर्फे करण्यात आले. धरण भिंतीची उंची वाढवूम साठवण क्षमतेमध्ये वाढ करण्यात आली. दोन्ही तीरावर कालवे काढण्यात आले. इंदोरे व मडके जांब या दोन गावाची मिळून एकूण 250 एकर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली. पण प्रत्यक्षात या कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडणे जमलेच नाही. धरणातून, सांडव्यातून व कालव्यातून मोठ्या प्रमाणावर गळती होत असे. त्यामुळे पाणी नाश खूपच जास्त होता. नाशिक परिसर द्राक्ष बागेसाठी प्रसिध्द आहे. नाशिक पासून जवळ असलेल्या या भागात मात्र द्राक्षबाग नव्हती. कारण सिंचनाची शाश्वती नव्हती. पुरेसा नफा मिळवून देणारी पीके पाण्याअभावी घेता येत नसल्यामुळे लाभधारक शेतकरी दिवसेंदिवस स्थलांतरित होत होते.

या प्रश्नातून सोडवणूक करून घेण्यासाठी सर्व लाभधारक एकत्र आले. वरील अडचणीवर कायमचा तोडगा काढून निरंतर विकासासाठी संघटनेत विचार मंथन व चर्चा सुरू झाल्या. जवळच असणाऱ्या पिंपळनारे येथील ग्रामस्थांनी पाणी प्रश्न चुटकीसरशी सोडविला, तसे प्रयत्न आपणही का करू नये ? असे विचार करू लागले. पिंपळनारे येथील श्रीराम पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष श्री यशवंतराव खांदवे व श्री सदुभाऊ खांदवे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली त्यांनी संघटीत होवून ' जय मल्हार उपसा जल सिंचन सहकारी संस्था मर्यादित, इंदोरे' या नावाने संस्था स्थापन केली. श्री शरद घुगे व इतर गावकरी यांनी यासाठी प्रयत्न केले. लाभक्षेत्राचे हस्तांतरण करण्यापूर्वी शासनाने तलावाची दुरूस्ती केली. सांडव्यातील गळती थांबविण्यासाठी काळी माती भरण्यात आली. या उपाय योजनेमुळे गळती थांबविण्यात बऱ्यापैकी यश मिळाले. परंतु अजूनही काही प्रमाणात गळतीने पाणी नाश होत आहे याची खंत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविली, ही जाणीव खरी महत्वाची. तलावाबद्दल लोकांना आत्मियता निर्माण झाल्याचे हे द्योतक आहे. हा तलाव आमचा, हे पाणी आमचे ही भावना पाण्याच्या नियोजनात आदर्श निर्माण करेल हे निश्चितच. दुरूस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर तलावाचे लाभक्षेत्र शासनाने संस्थेकडे रितसर हस्तांतरण केले.

जल नियोजन संस्थेकडे आल्या नंतर पुढील बाबी त्यांना प्रकर्षाने जाणवल्या -
1. नाल्याद्वारे किंवा कालव्यातून सिंचनाचे पाणी सोडल्यास 50 टक्के पेक्षा जास्त पाणी नाश होतो.
2. पाण्याची उपलब्धता कमी, पाणी नाश जास्त त्यामुळे सिंचन क्षेत्रावर मर्यादा पडू लागली.
3. 28 फेब्रुवारी पूर्वीच जलाशयातील पाणी साठा संपत असे.
4. उन्हाळ्यात पाणी टंचाईस तोंड द्यावे लागे.

उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब उपयोगात यावा, पाणी नाश टाळावा, आर्थिक समृध्दता यावी यासाठी सर्वानुमते पुढील निर्णय घेवून त्याची कठोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली.

संस्थेने घेतलेले निर्णय :


1. पाण्याचा नाश कमी करण्यासाठी पी.व्ही.सी पाईपद्वारे वितरण, कालवा किंवा नाल्यात पाणी सोडणे बंद, विमोचकाचे दार उघडू नये यासाठी वेल्डींग करून कायम बंद करण्यात यावे.

2. जल नियोजनात सामुदायिक सहभाग असावा.

3. पाण्याचे वितरण फक्त पाईपद्वारे करण्यात यावे.

4. जलाशयातील पाणी जास्त अश्व शक्तिच्या पंपाने उचलून उंच जागी उभारलेल्या टाकीत पडेल अशी व्यवस्था करावी. ही व्यवस्था सार्वजनिक असेल, त्यासाठी येणारा खर्च लोकसहभागातून करण्यात यावा. टाकीतील पाण्याचे समप्रमाणात वितरण करण्यात यावे. 3 ते 7 लाभ धारकांनी त्यांच्या वाट्याला आलेले पाणी एकत्रितपणे त्यांच्या शेतापर्यंत वाहून नेण्यासाठी पाईप लाईन टाकावी व त्यानंतर वाटून घ्यावे. पाण्याच्या समप्रमाणात वाटपाची अतिशय सुंदर पध्दती त्यांनी निर्माण केली त्याची ओळख पुढे करून देण्यात आली आहे.

5. प्रत्येक शेअर रू. 500 चा असावा.

6. प्रत्येक शेअर धारकाने योजनेच्या उभारणीसाठी रू. 5000 संस्थेकडे जमा करावे, ही रक्कम सुरूवातीस थोडी जास्त वाटल्यामुळे प्रत्येक लाभधारकाने केवळ एकच शेअर विकत घेतला. त्यामुळे सभासद संख्या आपोआप नियंत्रित झाली. या योजनेत प्रकल्पाचे नियोजित लाभधारक व अलाभधारकांनाही समाविष्ट करण्यात आले.

7. प्रत्येक लाभधारकास एक लिटर प्रति सेकंद या प्रमाणात एकाच वेळी पाणी मिळेल असे नियोजन करण्याचे ठरले. या प्रमाणात पाणी मिळाल्यास किमान दोन एकर जमीन बारमाबी पिकाखाली आणता येईल हा उद्देश होता.

समन्यायी पाणी वाटपाची अफलातून योजना :


संस्थेचे 115 भागधारक नोंद करण्यात आले.तलावात जॅकवेलचे बांधकाम करण्यात आले. धरण भिंती जवळ उंच जागी मुख्य वितरण टाकी बांधण्यात आली. 25 अश्व शक्तीचे दोन सबमर्सिबल पंप जॅकवेलमधील पाणी उचलून मुख्य वितरण टाकीत ओततात. दोन्ही पंपाचा मिळून एकूण विसर्ग 100 लिटर प्रति सेकंद आहे. पंपाचे पाणी मुख्यवितरण टाकीत वाहून आणण्यासाठी 315 मी.मी व्यासाची पी.व्ही.सी रायझिंग मेन बसविण्यात आली. ही वितरण टाकी जमिनापासून 2.5 मीटर उंचीवर बांधण्यात आली, तिचा व्यास 3 मीटर आहे व खोली 2 मीटर आहे.

या वितरण टाकीवर 63 मी.मी व्यासाचे व 30 से.मी लांबीचे 115 पी.व्ही.सी पाईपचे तुकडे सम पातळीत बसविण्यात आले. यांचा उपयोग विमोचकासारखा होतो. या टाकीत आलेले पाणी या विमोचकामधून एकाच वेळी व समप्रमाणात बाहेर पडते. मुख्य वितरण टाकीच्या घेराभोवती गोलाकार बांगडी सारखी टाकी बनविण्यात आली. विमोचकातील पाणी यात पडते. यामध्ये अनेक कप्पे (कुंडी) तयार करण्यात आले. एका कप्प्यात 3 ते 7 विमोचकातून पाणी पडते. लाभधारकांच्या संख्येनुसार त्या कप्प्यातील विमोचकांची संख्या ठेवण्यात आली. कप्प्यात पडलेले पाणी ते शेतकरी एकत्रितपणे वाहून नेतात. समजा एकमेकांच्या शेजारी शेते असलेल्या 5 लाभार्थींचा एक ग्रुप आहे. त्यामुळे एका कप्प्यात पाच विमोचकातून पाणी पडेल अशी व्यवस्था करण्यात आली. या कप्प्यातील पाणी एकत्रितपणे वाहून नेण्यासाठी एक पाईप टाकण्यात आला. शेताच्या जवळ उंचजागी दुय्यम वितरण टाकी बांधण्यात आली.

वाहून आणलेले पाणी प्रथम या वितरण टाकीत पडते. या टाकीवर पुन्ही 63 मी.मी व्यासाचे व 30 सें.मी लांबीचे 5 पी.व्ही.सी पाईपचे तुकडे सम पातळीत बसविण्यात आले. या विमोचकातून सम प्रमाणात पाणी बाहेर पडते. बाहेर पडलेले पाणी स्वतंत्र कप्प्यात गोळा होते. गोळा झालेले पाणी प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात स्वतंत्र पाईपद्वारे वाहून नेतो. हे पाणी विहीरीत साठविले जाते किंवा सरळ वापरात आणले जाते. प्रत्येक ग्रुपने पाईपलाईन साठी लागणारा निघी संकलित करून तलाव ते लाभक्षेत्रापर्यंत पाईप लाईन पूर्ण केल्या. प्रत्येक पाईप लाईनवर सभासदांची संख्या, लाभक्षेत्राचे तलावापासूनचे अंतर विचारात घेवून संस्थेच्या मार्गदर्शक सूचना नुसार पाईप लाईनचा व्यास ठरविण्यात आला. अशा प्रकारे सभासदांनी कोणत्याही वित्त संस्थेकडून अर्थसहाय्य न घेता स्वभांडवलातून खर्च केला.

पाणी वापर संस्थेमुळे खालील प्रमाणे शेतकऱ्यांचे फायदे झाले :


1. कालव्याऐवजी पाईप लाईन मधून पाणी शेतात गेल्याने पाण्याचा नाश 0 टक्के

2. सर्वांना पाईप लाईन द्वारे एकाच वेळी समप्रमाणात पाण्याचे वितरण,

3. ग्रुप पध्दतीने पाईप लाईनच्या खर्चात बचत. सभासद मध्ये संघटीतपणा. खर्चात वाटा असल्यामुळे योजनेबाबत आत्मियता.

4. संपूर्ण गावाच्या शिवारातील शेतकऱ्यांचा सहभाग, त्यामुळे कमांड, अनकमांड असा भेदभाव नाही.

5. प्रत्येक ग्रुपच्या पाईप लाईनमध्ये प्रमुख व त्यास ग्रुप मधील समस्या निवारण, पाणीपट्टी व इतर खर्चात वसुलीचे अधिकारी. त्यामुळे योजना मोठी असूनही संस्थेचा कारभार सक्षम.

6. सिंचन क्षेत्रात 200 टक्के पेक्षा जास्त वाढ. व शाश्वत पाण्याची हमी मिळाल्यामुळे संपूर्ण समाजातच समृध्दता.

7. भरपूर नफा देणारे द्राक्ष बागेचे क्षेत्र 150 एकर पर्यंत वाढले.

8. द्राक्ष बागेला ठिबक सिंचन, पाण्याची बचत, उत्पन्नात वाढ.

9. भाजीपाल्याच्या क्षेत्रात वाढ, त्यामुळे उत्पन्नात वाढ.

10. तरूण पदवीधर, सरकारी नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे वळले.

11. निर्यातक्षम द्राक्ष व भाजीपाल्याचे उत्पादन करणे शक्य झाले.

12. हेड, मिडल, टेल असा भेद नाही.

13. विमोचकावर कुठेही व्हॉल्व नसल्यामुळे विसर्गात ढवळाढवळ करणे शक्य नाही, त्यामुळे योजनेवरील विश्वास वाढला.

14. सर्वांना सारखे वितरण असल्यामुळे प्रत्येकाचे क्षेत्र मोजणे, विसर्ग मोजणे, जलमापन यंत्राच्या नोंदी घेणे या कामाची गरज नाही.

15. भूसंपादन करावे लागत नाही.

श्री. प्रदीप भलगे, औरंगाबाद , मो : 09404141543

Path Alias

/articles/samanayaayai-paanai-vaatapaatauuna-samardhadai-indaorae-gaavaacai-yasaogaathaa

Post By: Hindi
×