सौर ऊर्जा व दुष्काळ


प्रस्ताव 1 - निकृष्ट जमिनीची उत्पादकता वाढवणे


गेली काही वर्षे मराठवाड्यातील शेतकऱ्याला भीषण दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे, रोजच्या जीवनाला आवश्यक उत्पन्न शेतीतून मिळणे अशक्य झाले आहे विशेषत: कोरडवाहू शेतकऱ्याचे हाल पहावत नाहीत. दर तीन वर्षांनी अवर्षण व 10 वर्षांनी महा दुष्काळाला त्याला तोंड द्यावे लागत आहे. आता ते असह्य झाले आहे त्याच्या जवळच्या जमिनीची उत्पादन क्षमता कशी वाढवता येईल हा यक्ष प्रश्न आहे. ज्या शेतकऱ्याच्या विभागात पाऊस अत्यंत कमी आहे व नजीकच्या काळात सिंचनाची कोणतीही सोय होण्याची शक्यता नाही त्या ठिकाणी नवा विचार केला पाहिजे.

गेली काही वर्षे मराठवाड्यातील शेतकऱ्याला भीषण दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे, रोजच्या जीवनाला आवश्यक उत्पन्न शेतीतून मिळणे अशक्य झाले आहे विशेषत: कोरडवाहू शेतकऱ्याचे हाल पहावत नाहीत. दर तीन वर्षांनी अवर्षण व 10 वर्षांनी महा दुष्काळाला त्याला तोंड द्यावे लागत आहे. आता ते असह्य झाले आहे त्याच्या जवळच्या जमिनीची उत्पादन क्षमता कशी वाढवता येईल हा यक्ष प्रश्न आहे. ज्या शेतकऱ्याच्या विभागात पाऊस अत्यंत कमी आहे व नजीकच्या काळात सिंचनाची कोणतीही सोय होण्याची शक्यता नाही त्या ठिकाणी नवा विचार केला पाहिजे. मराठवाड्यातील जालना, उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्हे विशेष अवर्षणग्रस्त आहेत. त्यांच्यासाठी सौर ऊर्जेचा उपाय विचार करण्यासारखा आहे. काय आहे हा उपाय -

जमीन पडीक आहे वा ती अत्यंत कमी प्रतीची मुरमाड आहे व अशा जमिनीतून फारतर बाजरीसारखी हलक्या दर्जाची पीके घेता येतात व फारसे उत्पन्न मिळत नाही. अशा जमिनीचा उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी करता येईल. त्याचे गणित असे आहे -

सौर ऊर्जा निर्मितीसाठी सोलर पॅनल वापरले जातात. त्याचा आकार साधारणपणे 15 स्क्वेअर फूट असतो व त्याची बाजार किंमत 11000 रूपये आहे. ताशी 1 किलो वॅट वीज निर्मितीसाठी चार पॅनल्स लागतात. एक एकर क्षेत्रात (44000 स्क्वेअर फूट) अंदाजे 2666 पॅनल्स बसवता येतील व तत्वत: 666 किलो वॅट वीज निर्माण होवू शकेल. पण त्यांच्या देखभालीसाठी काही जागा मोकळी सोडावी लागेल. त्याचा विचार करता दर एकरी अंदाजे 300 किलो वॅट वीज निर्मिती होवू शकेल. 1 वॅट निर्मितीसाठी सर्व प्रकारचा भांडवली खर्च विचारात घेता अंदाजे 85 रूपये लागतात. एक एकरासाठी रूपये 2.55 कोटी लागतील व दर दिवशी 6 तास सूर्यप्रकाश मिळाला व शासनाने ही वीज 5 रूपये दरानी खरेदी केली तर एका एकरातून रोज रूपये 10800 चे उत्पन्न मिळेल. वर्षातील 300 दिवस सूर्यप्रकाश मिळाला तर एकूण उत्पन्न रूपये 32.4 लाख मिळेल. वरील हिशोबावरून हे लक्षात येईल की गुंतवणूकदाराला 13 टक्के परतावा मिळेल. जमीन मालकास वर्षाचे एकरी पन्नास हजार भाडे देवू शकेल, कोरडवाहू शेतकऱ्याच्या दृष्टीने हे किफायतशीर ठरू शकेल. अशा ह्या प्रस्तावासाठी भांडवल उभारणीसाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत -

भांडवल उभारणी :
1. शेतकरी स्वत: गुंतवणूक करू शकतो
2. शेतकरी सहकारी संस्था स्थापू शकतो व त्यामार्फत गुंतवणूक
करेल
3. भांडवलदार वा कंपनी गुंतवणूक करू शकते व शेतकऱ्याला भू
भाडे देईल
4. शेतकऱ्याला भू भाडे देवून, शासन वा राज्य विद्युत मंडळ
गुंतवणूक करू शकते
5. शासन आयकर माफी असलेले कर्जरोखे विक्रीतून भांडवल
उभारू शकेल
6. शासन व उद्योगपती एकत्र येवून भांडवल उभारतील
7. शासन एकूण क्षेत्राचे भाग करून त्याची लिलावाने विक्री करेल
8. शासन जागतिक बँकेकडून अल्प दराने कर्ज उभारेल

ह्या प्रकारच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये समजून घेणे इष्ट होईल :

1. वीज निर्मिती अल्प प्रमाणातही करता येते
2. वीज नाशवंत आहे ती न वापरल्यास वाया जाते
3. त्याचा कच्चा माल सतत आयात करावा लागत नाही किंवा
त्याची वाहतुक करावी लागत नाही
4. त्याचा उत्पादित माल वाहून नेण्यासाठी रस्ते, रेल्वे वा विमानाची
जरूरी नाही
5. वीज निर्मितीसाठी पाणी, इतर इंधने वा रसायाने यांची जरूरी
नाही
6. वीज निर्मितीसाठी मनुष्यबळ वा यंत्रसामग्रीची जरूरी नाही
7. वीज निर्मिती कुठेही (जिथे सूर्यप्रकाश) निर्माण करतो येते
8. देखभाल खर्च अत्यल्प आहे
9. सध्या सबसिडी उपलब्ध आहे त्यामुळे भांडवली खर्च कमी आहे
10. शेतकऱ्याशी भाडे करार केल्यास भूमी अधिग्रहण करण्याचा प्रश्न नाही
11. वीज निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या फोटो सेल्स आज सहज उपलब्ध आहेत. कोणा एका देशाची मक्तेदारी नाही
12. अणु ऊर्जेसारखे ते अपघातग्रस्त नाही
13. टाकाऊ जमिनीवर वीज निर्मिती होत असल्याने कृषी क्षेत्रावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही
14. भूमी, वर्षातील सर्व दिवस, उत्पादक रहाते
15. देखभालीसाठी फार वेळ व पैसा लागत नसल्याने जमीनधारक अन्य उद्योग करू शकतो
16. उत्पादनक्रियेत पाण्याचा वापर होत नसल्याने दुष्काळी भागातील पाण्याची उत्पादकता निश्चितच वाढते
17. शेतकऱ्याने आपली जमीन भाड्याने दिली असता मिळणारे उत्पन्न नक्त असेल. ते मिळवण्यासाठी काही उत्पादन खर्च नाही

सध्या वीज खरेदी - विक्रीवर शासकीय नियंत्रण आहे. त्यामुळे या बाबत शासनाशी करार करावा लागेल.

प्रस्ताव 2 - भूमीसंपादन विना सौर ऊर्जा


ऊर्जा निर्मितीतील एक प्रमुख अडचण आहे भूमीची उपलब्धता. 300 किलो वॅट सौर ऊर्जा निर्मितीसाठी एक एकर जमिनीची जरूरी लागते. आज मोठ्याप्रमाणावर एकाच ठिकाणी स्वस्त दरात जमीन मिळणे अत्यंत अवघड आहे. त्यामुळे आज शासनाच्या ताब्यात जी जमीन आहे तिचा उपयोग कसा करून घेता येईल याचा विचार व्हावयास पाहिजे.

आज राज्य शासनाच्या ताब्यात अनेक धरणे व त्यावरील कालवे आहेत. धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी साठवलेले आहे. उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होते. पाण्याची कमतरता लक्षात घेता बाष्पीभवन कमीत कमी होईल ह्यासाठी प्रयत्न व्हावयास पाहिजेत. ह्या उद्देशाने पाण्यावर आच्छादन टाकले जाते. पाण्याखालील जमीन जरी आपल्याला उपलब्ध झाली नाही तरी पाण्याचा पृष्ठभाग आपल्याला उपलब्ध असतो आणि त्याचा उपयोग सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फोटोवोल्टॅईक सेल्स पॅनल ठेवण्यासाठी करता येईल. ऊर्जा निर्मिती पाण्यावर तरंगणाऱ्या पॅनल्सद्वारे होईल. धरणाचे कालवे व धरणात साठवलेला पाणीसाठा याद्वारे मोठे क्षेत्रफळ सहज उपलब्ध होवू शकते. धरणातील जलसाठ्यावरील सर्व आकाश मोकळे असल्याने दिवसभर सूर्यप्रकाश उपलब्ध होतो. त्याचा कल्पकतेने वापर केला तर भूसंपादनातील अडचणी विशेषत: लोकक्षोम टाळता येईल. पाण्याचे बाष्पीभवन टाळणे व त्याचबरोबर वीज निर्मिती ही दोन्ही उद्दिष्ट्ये एकाच वेळी साध्य होतील. आज महाराष्ट्रात पाणी, वीज व भूमी यांचा भयंकर तुटवडा भासत आहे. त्यांची उत्पादकता सध्या अत्यंत कमी आहे. उत्पादकता वाढवण्यासाठी व टंचाई दूर करण्यासाठी सौर ऊर्जेचा उपयोग अत्यंत फलदायी ठरेल.

जायकवाडी धरण


वरील प्रस्तावाचे विवेचन मराठवाड्यातील जायकवाडी तथा पैठण धरणाच्या संदर्भात अधिक स्पष्ट करता येईल. या धरणाच्या कालव्यांची आपल्याला उपयुक्त लांबी अंदाजे 300 किलोमीटर आहे व त्याची सरासरी रूंदी 20 मीटर धरल्यास वीज निर्मितीसाठी 1467 एकर क्षेत्र उपलब्ध होवू शकते. एका एकरासाठी रूपये 2.55 कोटी ह्या हिशोबाने त्यासाठी अंदाजे 3740 कोटी रूपयांची गुंतवणूक लागेल व शासनाने ही वीज 5 रूपये युनिट ह्या दराने खरेदी केल्यास दरवर्षी 396 कोटी रूपये उत्पन्न मिळेल. गुजराथ शासनाने नर्मदा कॅनॉल्सवर हा प्रयोग यशस्वी केल्याचे कळते.

जायकवाडी धरणाच्या पाण्याखाली 36000 हेक्टर जमीन बुडालेली आहे, सौर ऊर्जेची पॅनल्स उभारण्यासाठी ह्या क्षेत्रातील 10000 हेक्टर (24700 एकर) चा वापर करता येईल. ह्या क्षेत्रातील सौर पॅनल्स ही पाण्यावर तरंगती असतील व पावसाळ्यातही त्यास इजा होणार नाही व वीज निर्मितीत खंड पडणार नाही. टाटा वीज कंपनाने त्यांच्या लोणावळा व मुळशी येथील धरणावर असे प्रकल्प उभारलेले आहे व ते यशस्वी झाल्याचे समजते. अशा प्रकल्पासाठी अपेक्षित खर्च व उत्पन्न असे असतील -

1. दर दिवशी 4.45 कोटी किलो वॅट वीज निर्माण होईल
2. रोज 22.25 कोटी रूपये उत्पन्न मिळेल

सौर ऊर्जा संबंधीची महत्वाची काही सांखिकीय माहिती :
1. सोलर पॅनल क्षेत्र 1 नग 15 वर्ग फूट
2. सोलर पॅनल वीज निर्मिती 1 नग 250 वॅट दर ताशी
3. सोलर पॅनल वीज निर्मिती 4 नग 1 किलो वॅट दर ताशी
4. सोलर पॅनल 1 नग किंमत रूपये 11000
5. एक एकर क्षेत्र 44000 वर्ग फूट
6. एक हेक्टर = 2.47 एकर
7. एक वॅट सोलर वीज निर्मितीसाठी भांडवली खर्च रूपये 85
8. एक एकर क्षेत्रातून दर ताशी किमान 300 किलो वॅट सोलर वीज निर्मिती होईल
9. रोज 6 तास प्रकाश उपलब्ध असेल तर एक एकर क्षेत्रफळावर दर दिवशी 1800 किलो वॅट सोलर वीज निर्मिती होईल व
10. प्रतिवर्षी 300 दिवस सूर्यप्रकाश उपलब्ध असेल असे गृहित धरले तर वर्षाला 540000 किलो वॅट वीज निर्माण होईल
11. एक एकर क्षेत्रफळावर सोलर वीज प्रकल्प उभारण्यासाठी रूपये 2.55 कोटी भांडवली खर्च अपेक्षित आहे
12. शासनाने 1 किलो वॅट ला रूपये 5 दर दिला तर एक एकरापासून 27 लाख रूपये उत्पन्न मिळेल

डॉ. नीळकंठ बापट, औरंगाबाद - मो : 9325613936

Path Alias

/articles/saaura-urajaa-va-dausakaala

Post By: Hindi
×