पाणी हे जीवन आहे. पुर्वीच्या काळी घरातील आवारात असणार्या आड - विहीरी यातील पाण्याची काळजी घेतली जात असे. जसे महापालिकाद्वारे बंद नळातून पाणी मिळू लागले (तेही स्वस्त व सहजपणे) तसे पाणी वापरबद्दल आपली अनास्था वाढत गेली. मर्यादित पाणीसाठा असूनसुध्दा ते शुध्द करून ग्राहकांपर्यंत पोहचवण्याची, त्या पाण्याची गुणवत्ता रोजच्या रोज पडताळण्याचे काम पालिकेचे अधिकारी व कर्मचारी करत असतात. याबद्दल खरे तर आपण त्यांचे आभार मानावयास हवे. पाणी शुध्दीकरण व पाणीपुरवठा हा खरेतर महापालिकेचा नित्याचा व्यवहार आहे. 24 तास, अवास्तव पाणी पुरवठ्याची मागणी खरोखर चुकीचे आहे. पाणी हे जीवन आहे. याचा अनुभव आपण नित्य घेत असतो. भारताची लोकसंख्या 2050 साली 170 कोटी वर स्थिरावेल असा अंदाज आहे. आपल्या देशात वाढत्या लोकसंख्येमुळे बर्याच नद्यांच्या खोर्यामध्ये नजीकच्या काळात प्रती - माणशी वार्षिक उपलब्ध पाणी 1000 घनमीटर पेक्षा कमी होऊ शकते. त्यामुळे आरोग्य, आर्थिक प्रगती व मानवी स्वास्थ्य यावर परिणाम पडू शकतो. गेल्या 30-40 वर्षात जस-जशी शहरे मोठी होत गेली तस-तसा उपलब्ध पाणीसाठ्यावर ताण पडत गेला. वाढत्या शहरीकरणामुळे व शेती सिंचनासाठी लागणार्या पाणी पुरवठ्याची तरतूद पाटबंधारे विभाग - (राज्य शासनाचे) करत असते तर पाणी वापरल्यानंतर मल:निस्सारणाची जबाबदारी महापालिकेसारख्या स्वयत्तसंस्था पार पाडतात.
भारतातील अनेक शहरात दररोज प्रतिमाणशी 200 लिटर पाणी पुरवले जाते. स्थानिक परिस्थितीनुसार 15-20 लिटर कमीजास्त असू शकते. प्रत्येकाने वापरलेल्या पाण्याचे 150-160 लिटर मैला मिश्रीत सांडपाणी तयार होते. तयार झालेले 30-35 टक्के बर्याच शहरात त्याहीपेक्षा जास्त सांडपाणी जवळच्या नाल्यामधून नद्यांना जावून मिळते. संपूर्ण भारतात रोज तयार होणार्या मैला मिश्रीत सांडपाण्याच्या शुध्दीकरण व विल्हेवाटीचा आढावा घेतल्यास असे निदर्शनास येते की, फक्त 22-25 टक्के शहरी सांडपाण्याचे शुध्दीकरण केले जाते (10000 दशलक्ष लिटर) तर उर्वरित 75 ते 78 टक्के (30000 दशलक्ष लिटर) सांडपाणी शुध्दीकरणाशिवाय नद्यांना जावून मिळते. त्याचा परिणाम नागरी वस्त्यामध्ये दुर्गंधी, नदीपात्रातील पाण्याचा खालावलेला दर्जा, स्थिरावलेल्या पाण्यातील तण व जलपर्णी यांची बेसुमार वाढ, अस्वच्छ धरणे, मैला - मिश्रीत पाण्याचा पिण्यासाठी अप्रत्यक्षपणे पुर्नवापर, त्यातून उद्भवणारे पाणीजन्य विकार यांस आपण सध्या सामोरे जात आहोत.
शहरातील प्रक्रिया विरहीत 75 ते 78 टक्के सांडपाणी शुध्दीकरणासाठीची यंत्रणा बनवणे व कार्यान्वित ठेवणे महापालिकांना शक्य नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. महापालिका आपल्या मैला - शुध्दीकरण केंद्राची क्षमता वाढवत असतात, तसेच नवीन केंद्राचीही उभारणी करत असतात, परंतु वाढत्या शहरीकरणामुळे तयार होणार्या सांडपाणी आणि शुध्दीकरण क्षमता यात बरीच तफावत रहात असते.
1000 लिटर पाणी साठवणीपासून ग्राहकांपर्यंत शुध्द स्वरूपात पोहचवण्यासाठी शासनाला 50 ते 60 रूपये खर्च करावे लागतात. मैला पाणी प्रदूषणाचे परिणाम आपण गेली 30 - 35 वर्षे सातत्याने अनुभवत आहोत. शहरी सांडपाण्यामुळे होणार्या जलप्रदूषणाचा आवाका इतका मोठा आहे की 50 टक्के पेक्षा जास्त नद्यांचे जलप्रदूषण मैला - मिश्रीत सांडपाण्यामुळे होत असते. सद्यस्थितीत आपला देश 1972 सारख्या दुष्काळाचा सामना करू शकणार नाही, ह्याचा प्रत्यय आपल्याला पावसाने ओढ दिल्यामुळे जून ते सप्टेंबर 2009 मध्ये व गेल्या वर्षी पण देशभर अनुभवण्यात आलेला आहे. 1972 ची आणि सद्य सामाजिक परिस्थितीत खूप फरक आहे. महापालिका प्रत्येक कुटुंबाला संपूर्ण वर्षासाठी 350000 लिटर पिण्यायोग्य पाणी पुरवत असते. त्या मोबदल्यात आपण फक्त 700 - 800 रूपये पाणीपट्टी म्हणून देतो.
पाण्याची बचत, नदीतील पाण्याची शुध्दता, पर्यावरण संतुलन ही सर्व जबाबदारी शासन व महापालिका यावर आहे असे म्हणून चालणार नाही. पर्यावरणाचा एक घटक म्हणून पाणी बचत, त्याचा योग्य वापर व जलप्रदूषण कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो ह्याचा विचार करणे गरजेचे आहे.
पाणी व पाणी प्रदूषणाचा प्रश्न आत्ताच्या आपल्या पाण्याच्या मानसिकतेत बदल करून, काटकसरीने पाणी वापर करून, पाण्याचा पुर्नवापर करून हाताळू शकतो. मैला - पाणी शुध्दीकरण तंत्राच्या वापराबरोबरच जलप्रदूषण कमी करण्यासाठी जनजागृती होणे तितकेच महत्वाचे आहे.
1. पाण्याबाबतच्या मानसिकतेत सुधारणा :
पाणी हे जीवन आहे. पुर्वीच्या काळी घरातील आवारात असणार्या आड - विहीरी यातील पाण्याची काळजी घेतली जात असे. जसे महापालिकाद्वारे बंद नळातून पाणी मिळू लागले (तेही स्वस्त व सहजपणे) तसे पाणी वापरबद्दल आपली अनास्था वाढत गेली. मर्यादित पाणीसाठा असूनसुध्दा ते शुध्द करून ग्राहकांपर्यंत पोहचवण्याची, त्या पाण्याची गुणवत्ता रोजच्या रोज पडताळण्याचे काम पालिकेचे अधिकारी व कर्मचारी करत असतात. याबद्दल खरे तर आपण त्यांचे आभार मानावयास हवे. पाणी शुध्दीकरण व पाणीपुरवठा हा खरेतर महापालिकेचा नित्याचा व्यवहार आहे. 24 तास, अवास्तव पाणी पुरवठ्याची मागणी खरोखर चुकीचे आहे. त्याउलट पाणी शुध्दीकरणासाठी लागणारी अद्ययावत सामुग्री व तंत्रज्ञान उभारण्यासाठी महापालिका वार्षिक पाणीपट्टीमध्ये जुजबी 100-200 रूपये वाढ केली तर ती विनासायास व खळखळ न करता स्विकारावयास हवी. तरच पाणी पुरवठ्याचे सातत्य व गुणवत्तेबद्दल आग्रह धरणे संयुक्तीत ठरेल. एक गोष्ट येथे नमुद करावीशी वाटते की, आपण एक लिटर पाण्याच्या बाटलीसाठी रू.12 -15 सहजपणे देतो पण महापालिकेच्या वाढीव दरास तत्परतेने विरोध करतो, हे बदलणे गरजेचे आहे.
2. शुध्द पाण्याचा व्यवस्थित वापर :
आपल्या वापरातले प्रतिमाणशी 200 लिटर पाणी काटकसरीने वापरल्यास 120 ते 130 लिटर पर्यंत कमी करू शकतो. पाणी जेव्हा मर्यादित उपलब्ध असते (उन्हाळ्यात) तेव्हा पाणी वाचवण्यासाठी आपण जे काही करत असतो ते इतर वेळी अथवा पावसाळ्यात देखील करणे गरजेचे आहे. विंधनविहीरीचे पाणी आपण जर दुय्यम वापरासाठी (Secondary use) जसे की, स्नान, कपडे धुणे, घरगुती स्वच्छता साठी वापरले तर महापालिकेच्या शुध्द पाणीपुरवठ्यावरचा ताण 30-40 टक्के कमी होऊ शकेल. गळके नळ वेळीच दुरूस्त करणे, कपडे धुण्याच्या मशीनमधून पाणी सततचे वाहत न ठेवणे आणि भांडी धूत असतांना नळ गरजेपुरताच उघडे ठेवणे या सर्व गोष्टींमुळे पाण्याचा योग्य वापर शक्य आहे. पाणी भरपूर उपलब्ध असताना, त्याचा अतिरेकी वापर करून पाणी प्रदूषण का करावयाचे ? ते नैतिक होत नाही, मी पालिकेला पाण्यासाठी वर्षाकाठी फक्त (!) 700 -800 रूपये भरतो मग इतरांपेक्षा जास्त पाणी का वापरू नये ? हा दृष्टीकोन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक नसून घातकच आहे. गरजेपुरताच पाण्याचा वापर हा विचार जनमानसात बिंबवणे गरजेचे आहे.
3. पाण्याचा पुनर्वापर :
अशुध्द पाणी कमीत कमी जवळच्या नदी- नाल्यात पोहचले पाहिजे. त्यामुळे नद्यांचे प्रदूषण नियंत्रित राखता येईल. शहरातील सांडपाणी शुध्दीकरणानंतर त्याचा 100 पुनर्वापर शहरातच करणे अशक्य आहे. त्यामुळे मैला पाणी कमी तयार होणेच उत्तम.आखाती देशांप्रमाणे सांडपाण्याचा पुनर्वापर (शुध्द करून) ही संकल्पना समाजमानसात रूजणे गरजेचे आहे.
महाविद्यालये, विश्व-विद्यालये, शाळा, शासकीय संस्था, औद्योगिक वसाहती, भव्य गृह संकुले यांचे आवार व बगीचे विस्तृत असतात. या ठिकाणांतील मैलापाणी शुध्द करून तेथील बाग-बगीच्यांना वापरणे सहज शक्य आहे. अशा पाण्याच्या पनर्वापरामुळे महापालिकेद्वारे मिळणार्या पाण्यावरचा (Fresh Water) ताण सहज कमी होईल. ते पाणी अन्यत्र शेतीसाठी वापरले जावू शकते. शहरातील सांडपाणी शुध्द केल्यानंतर आसपासच्या शेतीसाठी पुरवणे शक्य आहे. यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात अनुभवास येणारा पाणी तुटवडा टाळता येईल. एखाद्या वर्षी जर पावसाचे आगमन लांबलेच तर उपलब्ध जलसाठ्यावर जनजीवन सुरळीत चालू ठेवणे शक्य आहे.
पाणी जीवनासाठी महत्वपूर्ण घटक आहे. ते देशाच्या प्रगतीसाठी, शेतीसाठी, औद्योगिक विकासासाठी गरजेचे आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर व सुधारित जीवनमानाबरोबर शुध्द व नैसर्गिक पाण्याची गरज वाढतच जाणार आहे.
पाण्याबाबतच्या मानसिकतेत बदल करत उपलब्ध पाण्याचा योग्य व गरजेपुरताच वापर, पाण्याचा पुनर्वापर करणे ह्या गोष्टी समाजाच्या, शहरांच्या व देशाच्या शाश्वत प्रगतीसाठी (Sustainable Development) गरजेचे आहे.
Path Alias
/articles/saasavata-saharaikaranaasaathai-paanai-va-paanayaacaa-paunaravaapara-kaalaacai-anaivaaraya
Post By: Hindi