सागरमित्र अभियान-शहर जिंका, जग जिंका


आपण सर्व जगच स्वच्छ करायला जात आहोत किंवा आपले शहर स्वच्छ करण्याच्या प्रयत्नात आहोत हा या योजनेचा उद्देश नाही तर या कामात आपलाही खारीचा वाटा आहे ही बाब त्यांच्या लक्षात आली तरी पुरेसे आहे. खूप मुंग्या एकत्र आल्या तर धान्याचे संपूर्ण कोठारच रिकामे केले जाऊ शकते, म्हणजेच त्यांचा प्रयत्न हा खारीचा वाटा नसून मुंगीचा वाटा आहे ही बाब त्यांना समजावी. तुम्ही आपल्या घरातून वर्षभरात ५ किलो प्लास्टिक आणू शकले तर एक चौरस किलोमीटर समुद्र आपण साफ ठेवू शकतो ही गोष्ट त्यांचे मनावर बिंबवता आली पाहिजे.

पुणे शहरातील १,१०,००० मुले शाळेत निघतांना जसे आपले दप्तर आवरतात, जसे होमवर्क पूर्ण करतात तसेच सागरमित्र या संस्थेने पुरविलेल्या बॅग्ज मध्ये घरातल्या स्वच्छ, कोरड्या, रिकाम्या प्लास्टिकच्या वस्तु (मग त्या रिकाम्या कॅरी बॅग्ज असोत, बाटल्या असोत, बाटल्यांची झाकणे असोत, खराब बॉल पेन्स असोत अथवा तुटके कंगवे असोत) जमा करतात. महिन्यातील एका विशिष्ट ठरविलेल्या दिवशी अशा बॅग्ज ते शाळेत आणून आपल्या शिक्षकांना अथवा त्या जमा करण्यासाठी आलेल्या स्वयंसेवकांना सुपूर्द करतात. त्यांच्या स्वतःच्या घरात जमलेल्या अशा वस्तूच त्यांनी आणाव्यात अशी त्यांना स्पष्ट सूचना त्यांना देण्यात आली आहे. असे करणार्‍या विद्यार्थ्याला सागरमित्र या नावाने ओळखले जाते.

स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून द अ‍ॅकेडेमिक अ‍ॅडवायजर्स (टीएए) या स्वयंसेवी संस्थेने सुरु केलेला हा उपक्रम आहे असे संस्थेचे सचिव श्री. विनोद बोधनकर म्हणतात. ते स्वतः, श्रीमती सुसान राज आणि श्री. ललित राठी यांनी नदी काठी जमा झालेले प्लास्टिकचे ढीग विद्यार्थ्यांना दाखवून प्रश्‍न किती गंभीर आहे याची जाणीव करुन दिली. त्यांना ते उचलण्यासाठी सांगणे आम्हाला धजवेना कारण त्याठिकाणी वापरलेल्या इंजेक्शनच्या सूया, काचेचे तुकडे अशा अणकुचीदार वस्तू मोठ्या प्रमाणावर दिसल्या व प्लास्टिक जमा करतांना त्या हाताला जखमा करतील अशी भिती आम्हाला वाटली म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना घरी परत पाठविले असे श्री. बोधनकर म्हणाले. यावरचा सुरक्षित व परिणामकारक मार्ग म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःच्या घरातील स्वच्छ प्लास्टिकचा कचरा आणायला सांगून त्याचा पुनर्निर्माणासाठी वापर करणे जास्त प्रशस्त व योग्य वाटले.

अशा प्रकारे सागर मित्र या टीएए संस्थेने सुरु केलेल्या अभियानाला २०११ साली प्रारंभ झाला. २०११ साली प्रथमतः आम्ही एकाच शाळेतील १५० विद्यार्थ्यांपासून या अभियानाला सुरवात केली. पण वाढत वाढत हा आकडा आता अनेक शाळांतील १,११,००० विद्यार्थ्यांपर्यत कसा पोहोचला हे आम्हालाच समजले नाही. या अभियानात अनेक शाळांतील पाचवी ते नववी वर्गात शिकत असलेले विद्यार्थी आम्ही निवडले आहेत. हा आकडा दररोज वाढतच चालला आहे. विविध शाळांत जाऊन आम्ही तिथे सागर मित्र अभियानाबद्दल सादरीकरण करतो व त्यांना या अभियांऩाशी जोडून घेतो. पुणे शहरातील ७८० शाळेतील १२ लाख विद्यार्थी या अभियानाशी जोडले जावेत हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही पुढे जात आहोत. पुणे शहरातील नागरी संस्कृतीत या मुळे निश्‍चितच बदल होईल असे आम्हाला विश्‍वास आहे. श्री. बोधनकर रोज सकाळी आपला लॅपटॉप आणि प्रोेजेक्टर घेवून घराबाहेर निघतात, शाळांच्या प्राचार्यांना व शिक्षकांना भेटतात आणि विद्यार्थ्यांसमोर या संकल्पनेचे सादरीकरण करतात व या अभियानात सामील होण्याची विनंती करतात.

विद्यार्थ्यांसाठी हे सादरीकरण या कामाची तोंडओळख ठरते. श्री. बोधनकर किंवा त्यांचे सहाय्यक हे सादरीकरण अत्यंत सोप्या व स्पष्ट शब्दात करतात. नद्या, तलाव,आणि इतर जलसाठ्यांमध्ये जमा झालेले टनावारी प्लास्टिक जलसाठे कसे प्रदूषित करतात व त्यामुळे पाण्यात राहणारे प्राणी व जीव मरणाच्या दारात कसे ओढले जातात हे पाहून मुले गहिवरुन जातात. तुमच्या घरात असलेल्या फिशपाँडमध्ये तुम्ही स्वच्छ पाण्यात असेच प्लास्टिक वा घाण टाकाल का असा प्रश्‍न विचारताच ते एकमुखाने नाही असे उत्तर देतात. त्यांचा कोणताही दोष नसतांना हे जीव मरत आहेत वा गुदमरत आहेत, त्यांना वाचवणे हे आपले कामच नाही काय हा प्रश्‍न विचारताच त्यांचेकडून एकदमच होकार येतो.

एका तासाच्या सादरीकरणात श्री. बोधनकर आणि त्यांचे विचार सगळ्यांच्या मनात घर करतात. त्यांच्या सादरीकरणातील प्रमुख मुद्दे असे -

◆ सर्व जमिनीचा उतार हा समुद्राच्या दिशेनेच असल्यामुळे सरतेशेवटी आपण रस्त्यावर फेकलेले प्लास्टिक हे समुद्रात फेकण्यासारखेच आहे.

◆ समुद्रातील वाहत्या वार्‍यामुळे व लाटांमुळे या प्लास्टिकचे बारीक बारीक तुकडे होतात व ते सर्व पाण्यात व शेवाळात पसरतात.

◆ पोटात प्लास्टिक हे कण गेल्यामुळे मासे मरतात व हे मेलेले मासे खावून पक्ष्यांची सुद्धा तीच गत होते.

◆ हे अन्नच आहे असे समजून समुद्रकाठावरील पक्षी ते खातात.

◆ हे पक्षी आपल्या पिलांना अन्न भरवीत असतांना प्लास्टिकचे कण त्यांच्या पिल्लांच्याही पोटात प्रवेश करतात.

◆ पाण्याच्या साठ्याच्या पृष्ठभागावर जमलेल्या प्लास्टिकमुळे सुर्यप्रकाश खाली जात नाही. यामुळे पाण वनस्पती मरतात व त्यामुळे आपल्याला हवा असणारा प्राणवायू निर्माण होण्याची प्रक्रियाच बंद पडते.

◆ सरते शेवटी आपल्या प्लास्टिकच्या चुकीच्या वापरामुळे व निष्काळजी वासलातीमुळे आपले समुद्र मरणासन्न झाले असून पृथ्वीवरील जीवनाला सुद्धा धोका पोहोचत आहे.

आपल्या चुकीच्या जीवन पद्धतीचा व त्यामुळे नष्ट पावत चाललेल्या लक्षावधी निष्कपट जीवांचा असा संबंध असू शकतो हे प्रथमच मुलांच्या लक्षात येते. जगातील सर्वच समुद्रांमध्ये तरंगत्या प्लास्टिकची बेटे तयार होत आहेत याची जाणीव त्यांना होते. अशा प्रकारची सर्वात मोठी बेटे पॅसिफिक महासागराच्या उत्तर भागात प्रामुख्याने आढळून येतात. त्यांना नदीचे प्रदूषण त्यामुळे कसे होते हे लक्षात येते. त्याचप्रमाणे समुद्रातील २५ टक्के माशांच्या पोटात प्लास्टिक आहे हा यू.एन.ओ.चा अहवालही लक्षात येतो. या अहवालात असेही म्हंटले आहे की २०३० पर्यंत समुद्रातील तीन टन माशांच्या पोटात एक टन प्लास्टिक पोहोचणार आहे. या मुळे आपण बेऱफिकरीने टाकलेले प्लास्टिक काय गहजब करणार आहे व त्यामुळे पर्यावरणीय धोका कसा निर्माण होतो हेही मुलाच्या लक्षात येते.

व्यवहारातील साधेपणा -


२०११ साली आम्ही हे काम सुरु केल्यावर मुलांकडून व त्यांच्या पालकांकडून प्लास्टिक जमा करण्यात कोणत्या अडचणी येवू शकतात व त्यावर काय उपाय राहू शकतो याबद्दल विचार करायची संधी मिळाली. त्यामुळे या अडचणी येवू नयेत यासाठी आम्ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून सर्वात साधी व सोपी पद्धती शोधून काढली. त्यांची शाळा सागर मित्र अभियानाशी जोडल्या गेल्याबरोबर शाळेतील विद्यार्थीही या अभियानाशी आपोआप जोडला गेला. पाचवी ते नववी वर्गातील विद्यार्थ्याना ज्या प्लास्टिक बॅगमध्ये प्लास्टिकची सामुग्री जमा करायची आहे ती बॅग निवडायला सांगितले.

त्यावर मोठ्या ठळक अक्षरात सागर मित्र असे लिहायला सांगितले. या बॅगमध्ये घरातल्या स्वच्छ, कोरड्या प्लास्टिक बॅग्ज व इतर प्लास्टिकच्या वस्तू जमा करायला सांगितले. त्यांनी घरातली किमान एक प्लास्टिकची वस्तू दररोज या बॅगमध्ये टाकावी म्हणजे महिन्यात किमान तीस तरी वस्तू या बॅगमध्ये जमतील. एखादे दिवशी अशी वस्तू सापडली नाही तरी काही हरकत नाही. पण एका ठरवलेल्या दिवशी त्यांनी ही बॅग आतील वस्तुंसह शाळेत आणून जमा करावी. या सूचनेचा मोठा लाभ झाला. अशा जमलेल्या हजारो बॅग्ज द्वारे त्या शाळांतून जवळपास ५० टन विविध घरातील प्लास्टिकचा कचरा जमा झाला. जर १५० टन असा कचरा जमा झाला तर त्यापासून एक टन प्लास्टिक तयार होते. सांगायची गोष्ट अशी की पाच किलो प्लास्टिक कच-यापासून एक चौरस किलोमीटर सागर अथवा शेतजमीन प्रदूषित होत असते.

एकदा का विद्यार्थ्यांनी या बॅग्ज शाळेत आणल्या तर नंतर सागर मित्रचे स्वयंसेवक वा शिक्षक त्या एकत्र जमा करतात आणि सागर मित्रचे वाहन त्याठिकाणी येवून हा जमा झालेला कचरा घेवून जाते. तो नेण्याच्या आधी या कच-याचे वजन केले जाते व किलोला रुपये ८ या दराने शाळेला पैसे देण्यात येतात. हा सर्व कचरा श्री. ललित राठी आपल्या क्‍लीन गार्बेज मॅन्युफॅक्‍चरिंग प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या गोडाऊनमध्ये घेऊन जातात व ते त्याचा पुनर्वापर करुन योग्य विनियोग करतात.

जमा झालेले प्लास्टिक वीस वेगवेगळ्या प्रकारांत विभागले जाते. त्यातील काही वस्तू सरळ बाजारात विकल्या जातात. बाटल्यांसारख्या वस्तू आपला माल त्यात टाकून सरळ विकण्यासाठी वापरल्या जावू शकतात. काही कंपन्यांच्या खोबरेल तेलाच्या निळ्या रंगाच्या बाटल्या प्रक्रिया करुन त्यापासून निळ्या रंगाच्या बकेट्स तयार करण्यासाठी वापरल्या जातात. जवळपास ३० ते ४० टक्के वस्तू या कोणत्याही प्रत्यक्ष वापरासाठी उपयुक्त नसतात. अशा वस्तूंचे उष्णतेद्वारे रासायनिक विघटन करुन त्यापासून फरनेस ऑईल तयार करण्यात येते. या क्रियेला शास्त्रीय भाषेत पायरोलायसिस असे म्हणतात.

श्री. विनोद बोधनकर आणि श्रीमती सुसान राज हे दोघे टीेेएए या संस्थेचे सहसंचालक आहेत आणि श्री. ललित राठी हे क्‍लीन गार्बेज मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड हे आपल्या संस्थेमार्फत प्लास्टिक जमा करतात आणि जमा केलेल्या प्लास्टिक पासून पायरोलायसिस प्रक्रियेद्वारे त्याचा पुऩर्वापर करतात. जमा केलेल्या प्लास्टिकचा आकार बघता त्याचे संघनन कसे करायचे याचे तंत्र त्यांनी विकसित केले आहे. पॅटपर्ट टेक्नेा सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडचे श्री. निलेश इनामदार हे सागरनित्रचे सल्लागार म्हणून काम पाहतात. ते पायरोलायसिस प्रक्रियेत संशोधन करीत असतात. त्यांनी तयार केलेल्या यंत्राद्वारे कोरड्या व स्वच्छ प्लास्टिकचे रुपांतरण फरनेस ऑइल, कोळशाची भुकटी व कंबस्टिबल गॅसमध्ये केले जाते. हा गॅस सिलिंटरमध्ये साठवून ठेवता येतो आणि तो हे यंत्र चालविण्यासाठी जी उष्णता लागते त्यासाठी वापरला जातो. या प्लास्टिक कचर्‍यापासून तयार झालेल्या मालाचे प्रमाण २५: (फरनेस ऑइल, कोळशाची भुकटी आणि गॅस) असे राहते. या प्रक्रियेत जे प्रदूषण निर्माण होते ते अत्यंत क्षुल्लक असते. मोठ्या गृह निर्माण संस्था आपल्या परिसरात असे यंत्र बसवून आपल्या संस्थेत जमा झालेल्या कचर्‍याची विल्हेवाट लावू शकतात.

सवयीत झालेला बदल :


शालेय मुलांकडून राबवलेल्या सागर मित्र या योजनेचा समाजातील विविध कुटुंबांवर झालेला सकारात्मक परिणाम जाणवतो. पुण्यातील सर्व प्रथम ज्या ११ शाळा या योजनेत सम्मिलित झाल्या त्यापैकी कोथरुड येथील परांजपे शाळेतील प्राचार्या श्रीमती फिलोमिना गायकवाड या एक होत. त्या म्हणतात, सुरवातील मुलांना व त्यांच्या पालकांना या योजनेशी जमवून घेतांना थोडा वेळ लागला. पण नंतर मात्र मुले स्वतःच्या घरातील व शाळेतीच्या परिसरात जमा झालेला प्लास्टिकचा कचरा जमा करण्यात रस घेवू लागलीत. पालक आणि शाळेतील शिक्षकसुद्धा आता या योजनेत पूर्णपणे रुऴले आहेत.

शाळेचे माजी विद्यार्थीसुद्ध आपल्या घरातील कचरा शाळेत जमा करतात हे विशेष. आम्ही शाळेसाठी या मोहिमेसाठी एक वेळापत्रकच तयार केले आहे. ते नोटिसबोर्डवर ला़वण्यात आले आहे. शिवाय प्रत्येक महिन्याची तारीख ज़वळ आली असतांना विद्यार्थ्यांना स्मरण सूचना दिली जाते. यातून जमा झालेला पैसा श्री. बाबा आमटे यांच्या हेमलकसा प्रकल्पाला पाठविला जातो. यावर्षी घरोघर जी दिवाळी पूर्व सफाई केली जाते त्यातून आम्ही एकाच आठवड्यात १५० किलो कचरा जमा करु शकलो.

पुण्यातील शाळांतच सागर मित्र ही योजना राबविली जाते असे नाही तर न्यूयार्क शहरातील लीन किड्स या संस्थेच्या संस्थापिका श्रीमती लीन रोझेन यांनीही दोन शाळात ही योजना सुरु केली आहे. त्या म्हणतात, मी सुरवातीला ही योजना दोन वर्गांमध्ये सुरु केली. पालकांनीही या योजनेला पाठिंबा दिला कारण रस्त्यावरचे नाही तर घरातलेच प्लास्टिक जमा करायचे होते. आम्ही नोव्ंहेबर मध्ये हे काम सुरु केले आणि पुढील मे मध्ये ते पूर्ण केले. विद्यार्थ्यांमध्ये आम्हाला बराच बदल जाणवला. विद्यार्थी जास्त जबाबदारीने वागायला शिकले, आम्ही अशा प्रकारच्या कामात सहभागी आहोत याचा त्यांना अभिमान वाटायला लागला आणि आपण हे जग सुंदर करण्यास हातभार लावत आहोत याची जाणीव त्यांचेमध्ये निर्माण झाली. आपण त्यांना मोठ्या माणसांसारखे वागवतो, त्यांचेवर जबाबदारी टाकतो, आणि समाजात महत्वाचे स्थान देतो तेव्हा मिळणारे निकाल फारच उत्साहवर्धक असतात ही बाब माझ्या लक्षात आली. अ‍ॅमेझॉन.कॉम ला उपलब्ध असलेल्या उर्रीीशी-झड १३५ या पुस्तकात त्यांनी सागरमित्रबद्दल आपले अनुभव लिहिले आहेत.

सध्या जळगावमधील १२ शाळा, वाईमधील २ शाळा, राजस्थानमधील ६ शाला, आणि गुजराथमधील एका शाळेत प्लास्टिक जमा करण्याचे काम सुरु झाले आहे आणि दररोज या संख्येत भर पडत आहे. या कामात सहभागी झालेले स्वयंसेवक वेगळेपण टिकवून ठेवत आहेत असे श्री. बोधनकर म्हणतात. जळगावमधील कार्यकर्ते श्री. विशाल सोनकुळ यांचा ते याबाबत खास उल्लेख करतात. आपल्याला असे स्वयंसेवक पाहिजेत जे स्पष्टपणे आपले विचार मांडू शकतील. दिला जाणारा संदेश योग्य पद्धतीने पोहोचवणे त्यांना शक्य असले पाहिजे.

आपण सर्व जगच स्वच्छ करायला जात आहोत किंवा आपले शहर स्वच्छ करण्याच्या प्रयत्नात आहोत हा या योजनेचा उद्देश नाही तर या कामात आपलाही खारीचा वाटा आहे ही बाब त्यांच्या लक्षात आली तरी पुरेसे आहे. खूप मुंग्या एकत्र आल्या तर धान्याचे संपूर्ण कोठारच रिकामे केले जाऊ शकते, म्हणजेच त्यांचा प्रयत्न हा खारीचा वाटा नसून मुंगीचा वाटा आहे ही बाब त्यांना समजावी. तुम्ही आपल्या घरातून वर्षभरात ५ किलो प्लास्टिक आणू शकले तर एक चौरस किलोमीटर समुद्र आपण साफ ठेवू शकतो ही गोष्ट त्यांचे मनावर बिंबवता आली पाहिजे.

सागरमित्र अभियान एका दृष्टीने नशीबवानच समजले जायला पाहिजे. श्रीमती मीनाक्षी रावत (उपसंचालक, शिक्षण खाते, पुणे) व श्री. सुरेश जगताप (घनकचरा व्यवस्थापनाचे अतिरिक्त कमिश्‍नर, पुणे महानगर पालिका) यांना सागरमित्र अभियानाचे प्रयत्न लक्षात आले आणि भारताचे पर्यावरण मंत्री श्री. प्रकाश जावडेकर आणि शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या भेटीसाठी टीएए ला पाचारण करण्यात आले आहे.

जानेवारी २०१७ मध्ये १२०० शाळेतील प्राचार्य आणि शिक्षक यांचे बालगंधर्व रंगमंदीरात प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. यात ठीएएचाही सहभाग असेल. पुणे, अहमदनगर आणि सोलापूर येथील १५,१११ शाळा आणि ५० लाख विद्यार्थी यांचेशी शिक्षण संचालकांच्या मदतीने सागरमित्र अभियान जोडले जाणार आहे. सागरमित्र संस्थांनी २०१५ पासून गृहनिर्माण सोसायट्याच्या प्रांगणात प्रवेश केला आहे. आता त्यांना सामाऊन घेण्यासाठी सागरसंकूल अभियान असे त्यांचे नाव ठेवण्यात आले आहे.

या प्रयोगात प्रत्येक विद्यार्थी कमीतकमी घरातील वा घराबाहेरील तीन व्यक्तींच्या संपर्कात येतो असे गृहीत धरले तर २०२० पर्यंत पुणे परिसरातील १२ लाख व्यक्तींपर्यंत सागरमित्र संकल्पना पोहोचू शकेल व प्लास्टिक कचरा संकलन व त्यावरील प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होवू शकेल हा आम्हाला प्रोत्साहन देणारा घटक ठरेल म्हणूनच आम्ही या योजनेला शहर जिंका, जग जिंका म्हणून ओळखतो असे श्री. बोधनकर म्हणतात.

Path Alias

/articles/saagaramaitara-abhaiyaana-sahara-jainkaa-jaga-jainkaa

Post By: Hindi
×