या सगळ्याचा एकत्रित अर्थ असा की समुद्राच्या पाण्याची वाफ - ढगांची निर्मिती - पाऊस - नद्या - समुद्र हे संपूर्ण जलचक्र त्यांनी माहित होते. जगात hydrological cycle चे उल्लेख तसे खूप प्राचीन आहेत. चीन मध्ये इसवी सनापूर्व १००० च्या आसपासही ते सापडतात. ऋग्वेद हा या पेक्षा खूपच जुना. परंतु भारतीयांचे हे ज्ञान अजून जगापुढे का पोहोचले नाही हे एक कोडेच आहे. आता ते प्रयत्नपूर्वक पोहोचवयास हवे.
ऋग्वेद हा आपण आदिग्रंथ मानतो. वेद कुणी लिहीले हे माहित नाही म्हणून अपौरूषेय मानले जातात. गुरू मुखात् विद्या ह्या पध्दतीने पिढ्यान् पिढ्या चालत आलेले हे ज्ञान महर्षी व्यासांनी प्रथम लिहून ठेवले. ऋग्वेदात एकंदर दहा मंडले आहेत. (आताच्या भाषेत त्याला प्रकरणे असे म्हणता येईल.) प्रत्येक मंडलात काही सुक्ते आहेत. प्रत्येक मंडलातील सुक्तांची संख्या ही सारखी नाही. सुक्तांमध्ये ऋचा आहेत. त्यांचीही संख्या सर्वत्र असमान आहे. जेव्हा आपण एखादी ऋचा १:१०:९ असे लिहितो तेव्हा ती पहिल्या मंडलातली, दहाव्या सूक्तातील नववी ऋचा असते. त्यात अशी एकूण १११९ सुक्ते आहेत तर १०५५२ ऋचा आहेत.निसर्गातील आढळणार्या विविध परिमाणांची स्तुती, प्रार्थना हे ऋग्वेदाचे वरवरचे स्वरूप आढळते. त्यामुळे, अग्नी, वरूण, आप, सरिता, वायु, उषा, रूद्र आदि विषयांवर त्यात सुक्ते आहेत. वामदेव, विश्वामित्र, अगस्त्य, वामदेव गौतम, ऋषभ, भारद्वाज, भार्गव, मरूचोद, अंगीरस, मौनम्, कण्व आदि ऋषींनी ती सूक्तात्मक भाष्ये लिहिली आहेत. आपण जल ह्या विषयासंबंधी विचार करीत आहोत. त्याप्रत्यक्ष विषयाकडे वळण्यापूर्वी दोन उल्लेख करून ठेवणे गरजेचे वाटते. वेदग्रंथांमध्येच नव्हे तर बर्याच संस्कृतमधील जुन्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे अल्पाक्षरत्त्व! अगदी कमी शब्दात विषय मांडलेला! त्यामुळे त्याचा अर्थ हा लावून घ्यावा लागतो. सरळ शब्दात व्याख्या मांडली आहे असे त्याचे स्वरूप नसते. त्यामुळेच प्रत्येक भाष्य करायला ते वेगवेगळे वाटते. मॅक्समुलर सारख्या जाणकारालाही म्हणावेसे वाटते की हे कटू वाटणारे शब्दजितके सोडविले जातील तितका त्या काळातील संस्कृतीवर चांगला प्रकाश पडू शकेल.
इंद्र ही पर्जन्याची देवता मानली गेली आहे आणि पजर्र्न्य हा पाण्याचा स्त्रोत आहे म्हणूनच पाण्यासंबंधी विचार जाणून घेतांना केवळ आप ह्या बरोबरच सरिता, इंद्र, तसेच जल वाहून नेणारा मरूत (वारा) ह्याबद्दलचे उल्लेखही विचारात घ्यावे लागतात. माझ्या ह्या लेखासाठी पं.सातवळेकरांची ऋगवेदाची टिका तसेच बापटशास्त्र्यांनी ऋग्वेदाची मराठी टिका. देशपांडे यांचे वैदिक विज्ञान तर भालेरावांचा सरिताकोश यांचा संदर्भ म्हणून उपयोग करून घेतला आहे. वेदांमध्ये सरस्वती नदीवर तीन तर सिंधूनदीवर एक सूक्त आहे. दहा सुक्तातून सरस्वती व सिंधू खेरीज परूपणी (रावी), विपाशा (बियास), शतद्रुसप्तसिंधु (सतलज), ह्या शिवाय एकदा गंगा, एकदा यमुना व इतर म्हणजे शिफा, अंजसी, सुवास्तु, असिकी (चिनाब) इत्यादी २७ अशा एकूण चौतिस नद्यांचे उल्लेख आहेत. सगळ्यात जास्त उल्लेख सरस्वती नदीचे ७९ वेळा आढळतात. सिंधूचा उल्लेख २२ वेळा येतो.
नद्यांचे उल्लेख असलेल्यांच्या ९९ ऋचा आहेत. तर नौकानयनांसंबंधी ९० ऋचांमध्ये या सगळ्यातून जलविषयक त्या काळात काय ज्ञान होते याचा शोध घ्यावयाचा आहे.
एका सुक्तात शौनक ऋषी विचारतात (२:३:१) हे नद्यांनो तुमचे अग्रभाग, मुलभाग, मध्य तसेच अंत कुठे आहेत. यावरून त्या काळात नद्यांची लांबी मोजून ठेवण्याची तसेच मध्य बिंदूही स्थापन करून ठेवण्याची पध्दत होती असे जाणवते. जलस्त्रोताची लांबी किती धनुष्ये असावी यावरून तिला नदी म्हणायचे की नाही हेही निश्चित करून दिलेले आढळते. (ही लांबी आजच्या मापनानुसार सुमारे १५ किलोमीटर येते) आपसूक्त, नदी सूक्त, इंद्रसूक्त, मरूतसूक्त, अग्नी सूक्त यावरून खालील गोष्टी निश्चितपणे कळतात.
धान्य व समृध्दी उत्पन्नासाठी जल हे कारणीभूत आहे. हे त्या काळी निश्चितपणे माहित होते. नदी तटावरील वृक्ष व वनराई ही विविध जीवनोपयोगी वस्तूंची निर्मिती आहे. अश्व, रथ, वस्त्र, फळं, लोकर इत्यादी वस्तू तिथे मिळतात. अर्थात या सर्व उल्लेखात सरस्वती चा उल्लेख अनेकदा येतो. आर्य उत्तर ध्रुवावरून भारतात आले की दक्षिण भारतातून उत्तरेकडे गेले की सरस्वती नदीच्या तीरावरच ते प्रगट झाले व तिथून इतरत्र पसरले या मतमतांशी येथे अडकण्याचे कारण नाही. परंतु वैदिक संस्कृती ही सरस्वती नदीच्या किनार्यावर बहरली हे सत्य मात्र मान्य करावेच लागते. एके काळी सरस्वती ही गंगेपेक्षाही मोठी नदी होती. यमुना ही सरस्वतीला मिळत असे. नंतरच्या काळातील भूगर्भीय हालचालींनी यमुनेनी प्रवाह बदलला व ती पूर्वेकडे वाहू लागली व गंगेला मिळाली असे भूगर्भशास्त्र सांगते. हे वैज्ञानिक सत्य येथे मुद्दाम नोंदवून ठेवत आहे.
वर उल्लेखिलेल्या सूक्तांमधून आढळणारी काही विधाने आधी उधृत करतो.
१. विश्वामित्राने प्रवाह ओलांडून जाण्यासाठी आथांग पाणी भरलेली नदी थांबविली (३:४३:९)
२. कवच एलूण या ऋषीला इतर ऋषींनी यज्ञाच्या वेळी मान दिला नाही म्हणून तो अरण्यात निघून गेला व त्याने सरस्वती नदीचे पात्र आपल्या आश्रमाकडे वळविले. (सरस्वती सूक्त २:१०:३०)
३. अश्विनी कुमारांनी नद्यांचे पाणी निराळ्या मार्गाने वळविले (१:१८१:६)
४. बृहस्पतीने अचल जलराशींना प्रवाहित केले व तो प्रदेश वस्ती योग्य बनविला. (२:२४:२)
५. बृहस्पतीने वळरूपी पर्वतातून धेनू (नद्या) मुक्त केल्या. (१०:६८:९)
या पाचही उल्लेखांमधून नदीचा प्रवाह तात्पुरता अडविणे, वळविणे, अडथळा काढून टाकून नदी पुन्हा प्रवाही करणे इत्यादी गोष्टींचे ज्ञान त्याकाळी समाजाला होते हे लक्षात येते.
त्या लोकांना समुद्र माहित होता, नौका नयन माहित होते त्यामुळेच समुद्रात नावा सकाळी स्वच्छ प्रकाश असतांनाच हाकाराव्यात (१:४८:३). समुद्र प्रवासात वारा पडला तर काय करावे (१:११७:१५) समुद्र खवळला तर इंद्राची आराधना करावी (१:५६:२) हवामान चांगले असले तर मजेत झोक्यावर बसल्याप्रमाणे नावेतला प्रवास गंमतीशीर असतो (७:८८:३) असे अनेक उल्लेख सापडतात. नौकेतून पाण्यात पडलेल्या माणसाला कसे वाचवावे यासह समुद्र मार्गाने त्या काळी व्यापार चालत असे याचेही उल्लेख आढळतात. हे उल्लेख तपासतांनाच तीन अतिशय महत्त्वपूर्ण उल्लेख सापडले आहेत.
ऋषी दीर्घतमा औचथ्य : समानमेतदुदक मुद्यैत्येव चाहभि:।
भूमि पर्जन्य: जिन्वान्ति दिवं जिन्वन्त्यग्रय:॥ (१:१८४:५१)
(हे पाणी तेच आहे. ते आकाशात जाते. काही काळानंतर पावसाच्या रूपाने पुन्हा पृथ्वीवर परत येते आणि तिला प्रसन्न करते. अग्नी म्हणजे सूर्य. पाण्याची आहूती आकाशाप्रत नेवून त्याला प्रसन्न करतो.)
ऋषी वाशिष्ठ: समुद्र जेष्ठा: सलीललस्य मध्यात पुनना यत्न्य निविशमान:।
इन्द्रो या वृषभो रशद ता आपो देविरिह मामवन्तु ॥(७:४९:१)
या आपोदिव्या उतवा स्तवन्ति खनिजिया उतवा या : स्वयंजा:।
समुद्रार्था मा: सुचय: पावकास्ता आपो देवरिह मामवन्तु॥(७:४९:२)
(वज्रधारी, इच्छा पुरविणारा इंद्र जे पाणी आपल्याला देतो ते मुख्यत: समुद्रात असते. ते आकाशातून पृथ्वीवर येते. ते सतत प्रवाही असते. ते नद्यांतून वाहते. विहीर खोदली तर उपलब्ध होते. ते स्वगुणाने समुद्रात जाते. ते जल आमचे रक्षण करो.)
त्याचप्रमाणे दहाव्या मंडलात म्हटले आहे (तो आपल्या किरणांच्या सहाय्याने उदक पितो नंतर त्या उदकाचा (पृथ्वीवर) वर्षाव करतो. प्रथम मेघ उत्पन्न झाले नंतर त्याच्या छेदनातून पाणी उत्पन्न झाले. आदित्य व वायू हे पृथ्वीला संतप्त करतात. आणि तिच्या जवळील उदक वर वाहून नेतात.
या सगळ्याचा एकत्रित अर्थ असा की समुद्राच्या पाण्याची वाफ - ढगांची निर्मिती - पाऊस - नद्या - समुद्र हे संपूर्ण जलचक्र त्यांनी माहित होते. जगात hydrological cycle चे उल्लेख तसे खूप प्राचीन आहेत. चीन मध्ये इसवी सनापूर्व १००० च्या आसपासही ते सापडतात. ऋग्वेद हा या पेक्षा खूपच जुना. परंतु भारतीयांचे हे ज्ञान अजून जगापुढे का पोहोचले नाही हे एक कोडेच आहे. आता ते प्रयत्नपूर्वक पोहोचवयास हवे.
त्यानंतर इंद्राच्या स्तवनामध्ये काय उल्लेख येतात ते आपण बघूया -
१. नद्या रोखून धरणार्या वृत्ताचा आपल्या वज्राच्या सहाय्यावे वध करून इंद्राने नद्यांचा मार्ग मोकळा करून दिला.
२. कौशिकी म्हणतोय - मी दूर देशातून रथाला घोडे जोडून इथवर आलो आहे. मला पलीकडच्या तीरावर जायचे आहे. तुम्ही जरा अर्धेच चक्र पाण्यात बुडेल इतकेच पाणी प्रवाहात ठेवून वाहा.
३. इंद्राने, वज्राने आखून दिलेल्या मर्यादेतच नद्या वाहतात. (१:६१:११)
५. मापे घेऊन घरे बांधावित त्याप्रमाणे वज्राच्या सहाय्याने त्याने (इंद्राने) मार्ग आखून दिले आणि लांबलचक नद्या सहज निर्माण केल्या. (२:१५:३)
६. विपाशा (बियास) आणि शतघ्रु (सतलज) विश्वामित्राला म्हणतात - आम्हाला अडवून ठेवणार्या अहिला त्याने (इंद्राने) ठार मारले. त्याने आम्हाला खणले आहे त्याच्या आज्ञेने आम्ही वाहतो. (३:३३:७)
७. हे इंद्रा ज्या नद्यांच्या पाण्याला तू मार्ग खोदून दिले. ते अजूनही तसेच वाहात आहेत. (६:३०:३)
८. इंद्राने आपल्या प्रज्ञेने सिंधूला पृथ्वीवर आणले. तिचा सुपिक प्रदेशातील मार्ग वरूणाने खोदलेला आहे. (४:३०:१२) आणि (१:७५:२३)
एकदा पर्वतराशींवर पाऊस पडला की उताराच्या दिशेने पाणी वाहू लागते. व नदीत रूपांतरण होऊन समुद्राकडे वाहात जाते. उताराच्या दिशेने वाहत जाणे ही तिची नैसर्गिक प्रक्रिया आहे. अशा वेळी वर आलेले उल्लेख जरा वेगळाच अर्थ दर्शवितात. सिंधू नदी ही मुद्दाम खोदून काढलेली, मानवनिर्मित नदी तर नाही ना? वरील वेगवेगळ्या ठिकाणी आलेल्या विधानांचा अर्थ तरी तसाच आहे. त्यावर आधुनिक शास्त्राची जोड देऊन अभ्यास केला तर आजच्या या समाजनिर्मितीच्या इतिहासावर वेगळाच प्रकाश टाकला जाऊ शकेल. गंगा नदी भगिरथाने आणली ही गंगावतरणाची कथा आहे.
तिचाही या संदर्भातून पुन्हा मुळापासून अभ्यास करता येऊ शकेल.
हे पाणी पावसातून मिळते. तो पाऊस किती हे मोजावयाची पध्दतही त्या काळात अस्तित्वात होती. वेगवेगळी परिमाणे निरनिराळ्या ठिकाणी होती. शेवटी कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात पर्जन्यमापिका कशी असावी याचे प्रमाणीकरण केले आहे.
तिसरा गंमतीदार उल्लेख म्हणजे द्यु: अंरतीक्ष म्हणजे वातावरण साधारणत: ७५ किलोमीटरपर्यंत असलेल्या या वातावरणापलीकडे हे अवकाश. ऋग्वेद त्याला द्यु:म्हणतो. या अवकाशातील पाणी आम्हाला मिळो अशी येथे प्रार्थना करण्यात आली आहे. त्याला देव पर्जन्य असे म्हणले आहे. (१०:९८:५,६)
सन १९९७ मध्ये नासा ने केलेल्या संशोधनात खालील उल्लेख आढळतो -
“We observed first time that snow ball shaped microscopic heavenly bodies flying in .......... Towards earth’s atmosphere from space’’. दररोज काही हजाराच्या संख्येने ते पृथ्वीवर येतात त्यातील पाण्याचे प्रमाण अल्प असले तरी आजपर्यंत आपले सर्व सागर अनेकदा भरून जातील येवढे पाणी त्या मार्फत आले आहे. या अत्याधुनिक ज्ञानाचा या ऋग्वेदातील देव पर्जन्याशी प्रत्यक्ष संबंध असलाच पाहिजे.
असाच उल्लेख विहीरीतून पाणी काढण्याचे घटीचक्राचाही आढळतो. (१०:१:७) आणि (१०:६३:१३) आज पर्शियन व्हिल या नावाने ते ओळखले जाते याबद्दलही अधिक संशोधनाची गरज आहे.
पाऊस पडावा म्हणून यज्ञ करतात हे आपल्याला माहित आहे. पण जास्त पाऊस पडला तर नुकसान होऊन तो थांबवावा म्हणून करावयाच्या यज्ञाचा उल्लेखही आढळतो. तसेच नद्यांनी आपल्या पात्रातून बाहेर येऊन किनार्यावरील प्रदेशाचे नुकसान करू नये म्हणूनही केलेली प्रार्थना आढळते.
एकूणच ऋग्वेदच नव्हे तर इतरही वेद, उपनिषदे व प्राचीन ग्रंथ यामध्ये जलशास्त्र, हवामान, ऋतु शास्त्र, पर्जन्य अंदाज असे Hydrology, climetology, Meteorology, Rain forecasting science यांचेबद्दल तसेच धरण निर्मिती, कालवे काढणे वगैरेचेही बरेच उल्लेख सापडत असतात. आज हे सगळे विस्मृतीत गेले असले तरी आपल्या वैभवशाली ज्ञानसमृध्दीचे ते मानदंड आहेत. त्यांची पुन्हा आठवण करून आजच्या शास्त्राशी त्यांची सांगड घालणे म्हणजेच त्यांचे खरे स्मरण. इतरांबद्दल पुढील लेखात.
Path Alias
/articles/rgavaeda-jalasaasataraacaa-vaisamayakaarai-saathaa
Post By: Hindi