रोटरी क्लबने घडविली खडकी गावात जल क्रांती व वैचारिक परिवर्तन…
केल्याने होत आहे रे । आधी केलेेचि पाहिजे ॥ यत्न तो देव जाणावा । अंतरी धरितां बळें ॥ - समर्थ रामदास
नदी पात्र खोलीकरणामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने खडकी गाव आणि परिसरातील एकूण 350 एकर शेतीला मोठा फायदा झाला. लोकसहभागातून जलस्त्रोतांमधील गाळ काढल्याने पाणीसाठा वाढला व त्यामुळे नदी काठ व परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली. शेतीसाठी आणि जनावरांना पिण्यासाठी पाणी पाणी उपलब्ध झाले आहे.
समर्थ रामदास स्वामी यांनी दिलेल्या उपदेशाप्रमाणे निव्वळ चर्चा करून प्रश्न सुटत नाही परंतु नियोजन व प्रत्यक्ष कृती केल्यास प्रश्न सोडविणे शक्य आहे. खडकी (ता. नगर, जि. नगर) गावातील शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रोटरी क्लबच्या पुढाकाराने, नियोजन व रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे सेवा प्रकल्प विभागाचे संचालक रोटेरिअन सतीश खाडे यांच्या साह्याने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने मार्गी लागला आहे. रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष रोटेरिअन जॅान एफ. जर्म (अमेरिका) यांनी सन 2016 - 2017 या वर्षाचे ब्रीद वाक्य ‘ मानवतेची सेवा करणारी रोटरी ’ जाहीर केलेले आहे आणि खडकीच्या या सेवा प्रकल्पामुळे ते सार्थ ठरले आहे. साडेसहा लाखांच्या सेवा प्रकल्पाच्या खर्चापेक्षा 1643 ग्रामस्थांच्या चेहर्यावर हास्य फुलवून त्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात रोटरी यशस्वी ठरली आहे. नदी पात्र खोल केल्याने एकूण 350 एकर शेतीला या सेवा प्रकल्पाचा आज लाभ झालेला आहे.दौंड - नगर राज्य महामार्गावरील आणि नगर शहराच्या जवळ असलेल्या खडकी या गावाची लोकसंख्या 2011 च्या नोंदीनुसार 1643 आहे. सतत पाण्याची टंचाई असल्याने शेतकर्यांसमोर जनावरांना चारा, पिण्याचे पाणी, शेतीला पाणी असे अनेक प्रश्न भेडसावत असल्याने शेतकरी हवालदिल होते. गावातून नदी वाहते परंतु नदी पात्रात गाळ साठल्याने पावसाचे पाणी मुरत नव्हते आणि परिणामी भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ नसल्याने शेती अडचणीत आली होती. सततची पाणीटंचाई आणि भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत असल्याने ग्रामस्थ चिंतेत होते. निसर्गाच्या अवकृपेमुळे नेहमी सतर्क राहून पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज लोकांच्या लक्षात आली परंतु त्यासाठी होणारा खर्च हा अडचणीचा विषय होता. नदी पात्र खोल केल्याशिवाय पावसाचे पाणी मुरणार नसल्याने त्यांनी ही बाब गावचे सूपूत्र तथा रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे अतिरिक्त सहायक प्रांतपाल राजू निकम यांच्या निदर्शनास आणून दिली.
नदी पात्र रूंद करण्यासाठी पोकलेंड मशीन किंवा जेसीबी मशीनची आवश्यकता होती परंतु त्याचा खर्च प्रति तासावर असल्याने आणि यंत्र चालविण्यासाठी इंधनाचा होणारा खर्च पाहता निर्णय होत नव्हता. राजू निकम यांनी ही बाब रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे सेवा प्रकल्प विभागाचे संचालक तथा अभियंता रोटेरिअन सतीश खाडे यांना सांगून साह्य करण्याची विनंती केली. श्री. खाडे यांनी क्षणाचा विलंब न करता त्यांच्याकडील पोकलेंड मशीन उपलब्ध करून दिले. वारंवार निर्माण होणार्या टंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या धर्तीवर नदी खोलीकरणाच्या कामासाठी श्री. खाडे यांनी पुढाकार घेतला. शेतीसाठी शाश्वत पाणी आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी प्राधान्य देणारे श्री. खाडे यांनी त्यांच्याकडील मशीन कोणताही मोबदला न घेता उदार अंतकरणाने उपलब्ध करून दिले.
रोटेरिअन सतीश खाडे यांनी मशीन उपलब्ध करून दिल्यानंतर श्री. निकम यांनी सरपंच प्रवीण कोठुळे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, महसूल अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी व ग्रामस्थांची बैठक घेतली. बैठकीत खोलीकरण करावयाचे क्षेत्राचा तपशील, कालावधी, नदी पात्रातून निघणारा गाळ (माती) कोणाला द्यायची आणि पोकलेंड मशीनसाठी लागणार्य इंधनासाठी (डिझेल) वर्गणी करण्याविषयी चर्चा करण्यात आली. नदी पात्रातील माती शेतीसाठी उपयुक्त असल्याने परिसरातील शेतकर्यांनी माती स्वखर्चाने वाहून नेण्याची आणि त्या बदल्यात इंधनासाठी वर्गणी देण्याची तयारी दर्शविली. बैठकीत सर्व राजकीय भेद विसरून ग्रामस्थ एकत्र झाले होते व त्याचा परिणाम म्हणून प्रत्येकाने जबाबदारी वाटून घेतली.
20 जुलै 2016 रोजी मशीन गावात दाखल झाल्याने सरपंच, ग्रामस्थ, रोटरी क्लब ऑफ दौंडचे माजी अध्यक्ष राजू निकम यांच्यासह विद्यमान अध्यक्ष राजू निकम, सचिव डॉ. राजेश दाते, सौ. सीमा निकम व स्थानिक नेतेमंडळींच्या हस्ते मशीनचे पूजन करून कामास सुरवात करण्यात आली. आखणीनुसार गाळ काढण्यात आला व शेतकर्यांनी स्वखर्चाने तो वाहून नेला. नदी पात्र खोल झाल्याने ग्रामस्थ सुरू असलेले काम पाहण्यासाठी गर्दी करू लागले आणि यथाशक्ती ग्रामस्थांनी सहकार्य केले. पावसाच्या पाण्याचा थेंब अन् थेंब जमिनीत मुरविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आणि त्यासाठी सरपंच प्रवीण कोठुळे यांच्यासह भाऊसाहेब रोकडे, महेश कोठुळे, परसराम तडके , विनोद सरोदे, मच्छिंद्र कोठुळे, पंढरीनाथ कोठुळे, रेवणनाथ कोठुळे, गोवर्धन कोठुळे, रावजी नांगरे, बाबासाहेब घोरपडे, नारायण कराडे, आदींसह सर्व क्षेत्रातील लोकांचे सहकार्य लाभले. 20 ऑगस्ट 2016 पर्यंत गाळ काढून नदी पात्र खोल करण्यात आले.
नदी पात्र खोलीकरणामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने खडकी गाव आणि परिसरातील एकूण 350 एकर शेतीला मोठा फायदा झाला. लोकसहभागातून जलस्त्रोतांमधील गाळ काढल्याने पाणीसाठा वाढला व त्यामुळे नदी काठ व परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली. शेतीसाठी आणि जनावरांना पिण्यासाठी पाणी पाणी उपलब्ध झाले आहे.
रोटरीच्या या सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून लोकसहभागातून जलक्रांतीची किमया साधणार्या खडकी गावाचा आदर्श घेऊन अन्य गावांनी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्याची नितांत गरज आहे. लोकसहभागातून होणारा विकास गावातील वैचारिक परिवर्तनाची नांदी ठरली आहे.
रोटरीच्या पुढाकाराने एखादा सेवा प्रकल्प लोकसहभागातून यशस्वीपणे राबविल्यावर त्याचा कसा लाभ होतो याचे आदर्श उदाहरण म्हणजे खडकी गावातील नदी पात्र खोलीकरण प्रकल्प होय.
प्रफुल्ल भंडारी अध्यक्ष - रोटरी क्लब ऑफ दौंड
नदी खोलीकरण सेवा प्रकल्पाची वैशिष्ट्ये....
प्रकल्प खर्च : 6,50,000/- रूपये प्रकल्पाचे लाभक्षेत्र : 350 एकर
खडकी (ता. नगर) लोकसंख्या : 1643
प्रकल्प कालावधी : 20 जुलै 2016 ते 20 August 2016
विशेष सहकार्य : रो. सतीश खाडे व खडकीचे ग्रामस्थ.
do visit www. rotary.org
Path Alias
/articles/raotarai-kalaba-nae-ghadavailai-khadakai-gaavata-jalakaraantai
Post By: Hindi